भाग्यश्रीच्या खाद्ययात्रेत माझ्या प्रिय रेस्टॉरंटचं नाव वाचल्यावर मी २०१२ मध्ये लिहिलेला हा लेख आठवला. तो मैत्रिणींसाठी इथे देते आहे. आय होप तुम्हालाही आवडेल. :)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सॅलड्स हा कुठल्याही जेवणचा एक अविभाज्य भाग मानला, तरी केवळ सॅलड्स हा मुख्य मेनू असलेली रेस्टॉरंट्स असू शकतात, हे मला अमेरिकेत पाऊल ठेवेपर्यंत माहित नव्हतं. तसा सॅलड्स हा माझा पहिल्यापासून जिव्हाळ्याचा विषय होताच. एकदा कॉलेजच्या गोतावळ्यासकट मुंबईतल्या पिझ्झा हट किंवा तत्सम हॉटेलमध्ये बसलेलो असताना, तिथल्या छोटेखानी सॅलड बारकडे दिल्या जाणाऱ्या माझ्या वाढत्या भेटी पाहून माझ्या एका अमेरिका-रिटर्न्ड मैत्रिणीने ती अमेरिकेतल्या ज्या राज्यात असते, तिथे सॅलड्स हा स्थायीभाव असलेली काही चेन रेस्टॉरंट्स आहेत, अशी माहिती दिली. ते ऐकून, त्याविषयी कुतूहल वाटलं.
कालांतराने कॅलिफोर्नियात अस्मादिकांचं आगमन झालं आणि "इकडे अगदी सगळ्या भारतीय गोष्टी मिळतात" असे आश्चर्य आणि कौतुकाचे उद्गार काढायचे, नव्याच्या नवलाईचे दिवस भरभर जात असताना, एक दिवस अचानक मैत्रिणीने भारतात असताना सांगितलेल्या, सॅलड्सच्या अनंत प्रकारांचा, सूप्ससमवेत, अनलिमिटेड आस्वाद घेऊ देणाऱ्या 'स्वीट टोमॅटोज' या "exclusive" सॅलड व सूप बारमध्ये जाऊन पोचले.
त्यानंतर कॅलिफिर्नियात मुक्काम असेपर्यंत आपसूकच स्वीट टोमॅटोजला अनेक प्रामाणिक भेटी दिल्या गेल्या. पुढे कामानिमित्त कॅलिफोर्निया सोडून न्यूयॉर्कला गेल्यावर, कॅलिफोर्नियाच्या हवामनाला जितक्यांदा आठवलं, तितक्यांदाच तिथे ’स्वीट टोमॅटोज’ नसल्याबद्दल उसासेही टाकले. नंतर एकदा फ्लोरिडा ट्रिप आखताना, तिथे ही चेन बऱ्यापैकी पसरलेली आहे हे कळल्यावर, इतर स्थलदर्शनाइतकंच स्वीट टोमॅटोजला महत्त्व देणं ओघाने आलंच होतं.
बुफे पद्धतीच्या या रेस्टॉरंटमध्ये शिरताक्षणीच पहिलं काम काय करायचं, तर एक मोठ्ठा ट्रे घ्यायचा. त्यावर दोन काचेच्या प्लेट्स ठेवायच्या. सोबत वेगगेगळ्या प्रकारची ड्रेसिंग्स घ्यायला कागदी वाट्या आणि काटेचमचे घ्यायचे आणि मग पुढे जायचं. चौकोनी खळगे असलेली एक लांबलचक ओळ आपली वाट पहात असते. निसर्गाची वेगवेगळी देणी त्यांच्या नैसर्गिक रुपात त्यामध्ये विराजमान झालेली असतात. त्या ताज्या, रसरशीत रंगांच्या उधळणीवर आपली नजर ठरत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या काकड्यांच्या चकत्या, निरनिराळे लेट्यूस, पालकाची पाने, हिरव्या-जांभळ्या कोबीच्या झिरमिळ्या, लाल-पांढऱ्या कांद्याच्या रिंग्ज, हिरव्या-लाल-पिवळ्या सिमला मिरचीची फुलं, केशरी गाजरचा कीस, गडद आमसुली रंगाच्या उकडलेल्या बीटरुटचा कीस, पांढराशुभ्र आणि लाल मुळा, पोपटी मटारांचे दाणे, पिवळेधमक मक्याचे मोती, हिरवीगार ब्रोकोली, ऑलिव्ह्ज, मश्रूम्स, चेरी टोमॅटो, बेबी कॉर्न्स हे आणि असलेच भाज्या-फळभाज्यांचे अक्षरश: पन्नासेक प्रकार! आणखी, सूर्यफुलाच्या बीया, बेदाणे, श्रेडेड चीज, उकडलेला राजमा, बीन्स, तळलेल्या ब्रेडचे तुकडे (क्रूटॉन्स), नूडल्स, पास्ता इत्यादी गोष्टीदेखील रॅंचसारख्या सात-आठ तऱ्हेच्या सॅलड ड्रेसिंग्ज, सिझनिंग्जसकट मांडलेल्या असतात. या सर्व गोष्टी सढळहस्ते वाढून घेत घेत प्लेटमध्ये त्याचा चक्क एक छोटा ढीग करायचा आणि वरुन ड्रेसिंग्ज-सिझनिंग्ज शिंपडून स्वाहा करणे! ही भेळ खरोखर मस्त लागते! याखेरीज, "अॅपल विथ पीनट्स" किंवा "स्वीट अॅन्ड टॅंन्जी लेमन ब्रोकोली मॅडनेस" असली स्टायलीश आणि अफलातून नावं मिरवणारी, सुरेख चवींची वेगवेगळी tossed salads देखील तिथेच स्वागताला सज्ज असतात.
सॅलड्सइतकीच सूप्स हीसुद्धा या रेस्टॉरंटची एक खासियत आहे. सॅलड्सने गच्च भरलेल्या प्लेट्स घेऊन आपण बसायला जागा शोधू लागतो, तोपर्यंत डावीकडील सूपबार खुणावत राहतोच. शाकाहारी लोकांची जराही पंचाईत होऊ नये याचा पूर्ण विचार करुन योजलेल्या साताठ प्रकारच्या सूप्सचा तो मेनू बघून आपण खूष होतो. ’मेड फ्रॉम द स्क्रॅच’ असे लिहिलेल्या पाट्या मानाने मिरवणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये सूप्सपासून ब्रेडपर्यंत सर्वकाही दररोज स्क्रॅचपासून बनवले जाते, असं इथे सांगितलं जातं. "क्रीम ऑफ ब्रोकोली" किंवा "क्रीमी स्वीट टोमॅटो अॅन्ड बेसिल सूप"सारख्या पाश्चात्य चवींपासून अगदी आपल्या भारतीय जिव्हाग्रंथींना ओळखीची वाटतील असे "बासमती लेन्टिल सूप"सारखे प्रकार आवर्जून चाखण्यासारखे आहेत. अश्या वाफाळत्या सूपमध्ये मस्त कुरकुरीत क्रूटॉन्स घालायचे, त्यावर गरजेनुसार आणखी सॉल्ट अॅन्ड पेपरचे संस्कार करुन, मित्रमंडळी किंवा कुटुंबासमवेत निवांत गप्पा मारत त्याचा आस्वाद घ्यायचा. अगदी आयडीयल संडे प्रोग्राम! रेस्टॉरंटमधील इंटीरियरही या रेस्टॉरंटच्या संकल्पनेला साजेसं असं मोहक असतं. भिंतींवरील सुंदर ताज्या फळांच्या, हिरव्यागार भाज्यांच्या तसबिरी मन प्रसन्न करतात.
सूप बारच्या शेजारीच एक छोटी बेकरी असते ज्यातील ताजे ताजे बेक केलेले चॉकलेट किंवा ब्ल्यूबेरी मफिन्स, ब्रेड्स (त्यातही कॉर्न ब्रेड मस्तच), पिझ्झा, व्हेजिटेबल पास्ता, मॅकरोनी चीज पास्ता इत्यादींची असलेली रेलचेल सुखावते. तिथे मिळणारा स्टर फ्राय व्हेजिटेबल्स विथ हर्ब राईस हा प्रकार झकास आहे. याखेरीज ताज्या मोसमी फळांची फ्रूट डीश मिळते तिथेच टॅपिओका पुडींग (साबुदाण्याचं पुडींग!), जेली, कॉटेज चीज पासून आइसक्रीमचा सॉफ्टी कोन विथ चॉकलेट सॉस दिमतीला असतोच. संध्याकाळी बरोब्बर चार वाजता बेकरीमधून गरमागरम लुसलुशीत चॉकलेट लाव्हा केक किंव अॅपल कॉब्लर यासारखे हाय कॅलरी आणि डाएट फ्रीक लोकांची फेफे उडवणारे नमुने तुमच्या भेटीला येतात. दर महिन्याला रेस्टॉरंटमधले सॅलड्स, सूप्स आणि डेझर्टचे मेनू ऋतू किंवा सणावारांच्या थीमनुसार बदलत असतात आणि फेसबुक, ट्विटरमधून वेळोवेळी लोकांपर्यंत पोचतातही!
पिझ्झा आणि ब्रेड किंवा केकसारखे ’जंक’ पदार्थ तिथे पाहून जरा आश्चर्य वाटतं, पण तेव्हाच हे पदार्थ रेस्टॉरंटच्या आतील बाजूस मांडण्याची व सॅलड्स मात्र रेस्टॉरंटमध्ये शिरताक्षणीच मांडून ठेवण्याची चतुराई लक्षात आली की, आपण स्वत:शीच हसतो. कारण काय होतं की, पुढ्यातली आकर्षक सॅलड्स न खाता पुढे सहसा कोणी जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आपोआप भरपूर सॅलड खाल्लं जातं! एरवी गरमागरम चीज पिझ्झा व सॅलड अशी दोन्ही एकदम समोर ठेवली तर, साहजिकच पिझ्झ्याकडे हात आधी वळणाऱ्या बहुतांशी लोकांना सॅलड्स अशा प्रकारे खायला लावण्याची कल्पना मला भलतीच आवडली. अर्थात, ज्यांना सॅलड्स अजिबातच आवडत नाहीत त्यांना सॅलडबारला रितसर टॅंजट मारुन थेट मफिन्सकडे मोर्चा वळवणे सहज शक्य आहे पण असे लोक कमी असावेत, असं वाटलं. बहुतेक जनता सॅलड्स व सूप्सचाही तितक्याच आनंदाने आस्वाद घेताना दिसते.
"स्वीट टोमॅटोज" किंवा "सूप्लॅन्टेशन" या दोन्ही नावांनी आढळणाऱ्या या चेनचे १९७८ साली कॅलिफोर्नियातील सॅन डिएगोत प्रथम रेस्टॉरंट निघाले. आज एकट्या कॅलिफोर्नियातच या चेनची ४८ रेस्टॉरंट्स आहेत. त्याखालोखाल फ्लोरिडात २६ ठिकाणी, अॅरिझोनात १० ठिकाणी अशी विस्तार होत होत आज १५ राज्यांमध्ये ही चेन लोकांना सॅलड्स खायला लावते आहे.
सॅलड्सला ’पालापाचोळा’, ’घासफूस’ अशी कोणी कितीही काहीबाही नावं ठेवली तरी, त्यांचं आरोग्याच्या दृष्टीने असलेलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच अध्येमध्ये ठराविक व पारंपरिक लंच किंवा डिनर मेनूला छेद देत, सुंदर सॅलड्स व चविष्ट सूप्सच्या वाटेने जायला काहीच हरकत नसावी. ’पिझ्झा हट’, ’मॅकडोनाल्ड्ज’, ’डॉमिनोज’ वगैरे अमेरिकन कौतुकांनी आपल्याकडे पाय रोवल्याची घटनाही आता जुनी झालीय. त्यामुळे ही ’सॅलड व सूप बार’ची अमेरिकन कल्पनाही इकडे रुजायला अडचण नसावी असं वाटतं. या अमेरिकन संकल्पनेतच भारतीय मोसमी फळांचे व भाज्यांचे "व्हॅल्यू-अॅडीशन" करुन एक सुंदर ’एक्स्क्युझिव्हली’ सॅलड्स रेस्टॉरंट आपल्याकडेही निघालं तर लोकांना नक्कीच आवडेल, असं मला वाटतं.
समाप्त.
फोटो सौजन्य: Souplantation/ Sweet Tomatoes
(२१ एप्रिल २०१२च्या सकाळ साप्ताहिकमध्ये पूर्वप्रकाशित)