बेकरी प्रॉडक्ट्स सोबत माझा मजेदार खेळ सुरु असतो. ठरवलं तर बिस्कीटं, ब्रेड, खारी, केक, नानकटाई अशा चविष्ट गोष्टींपासून मी आरामात दूर राहू शकते पण एखाद्या बिस्किटाची किंवा केकची चव आवडली तर मात्र एखादा बाईट घेऊन सोडणं महाकठीण काम होतं. त्याचा पॅक संपल्या शिवाय चैन पडत नाही
पहील्या अमेरिकावारी शोधलेला असाचं एक पदार्थ म्हणजे पामिअर. आपल्याकडच्या खारीच्या जवळपासं जाणारी, किंचित गोडसर फ्रेंच पेस्ट्री. या गावात आल्यावरही पहिल्याच ग्रॉसरी शॉपिंगमधे इतर वस्तू सोडून पामिअर्स शोधत होते. एकदाचा तो बॉक्स सापडल्यावर डोळ्यासमोर चहाचा कप आणि सोबतीला पामिअर असं सुंदर चित्र दिसू लागलं. मग नाइलाजाने चहा करता दूध, साखर अशा वस्तू घेतल्या गेल्या :) तरं माझ्या या आवडत्या पेस्ट्रीचा बॉक्सही मला आवडला.(खाऊन नाही बघितला ). ब्रेडच्या लोफचा साईजचा प्लॅस्टिकचा पारदर्शक बॉक्स पाहून डोक्यातले अप्सायकलिंगचे सेंटर जागे झाले. तो बॉक्स साठवला गेला आणि आणखी एक ,आणखी एक असं करत तब्बल ५ खोके जमा झाले ,त्यानंतरच माल बनवायला सुरुवात झाली. :winking:
कल्पना साधीचं होती. बॉक्सला एखाद्या छान रंगाने रंगवणे आणि घरातील ज्युनिअर आर्टीस्टला त्यावर फोमचे स्टिकर्स लावयला सांगणे.बॉक्सच्या प्लॅस्टीकवर साध्या अॅक्रीलिक ऐवजी मेटॅलिक शेड्स जास्त व्यवस्ठित पसरते हे लक्षात आल्यावर तेच रंग पुढेही वापरले. आणि एका बेसावध क्षणी घेतलेली लालभडक रंगाची नेलपॉलिशपण एका बॉक्ससाठी कामास आली.:)
हेच ते पामिअर
हा त्याचा बॉक्स
खाऊ खाल्यानंतरचा उरलेला बॉक्स
त्याचे बनवलेले ऑर्गनायझर्स
लाल रंग दिसला की त्यावर वारली पेंटिग करायचा मोह आवरत नाही :)
गोल्डन बॉक्स वुईथ फ्लॉवर्स. हा ट्रेझर बॉक्स म्हणून बरेचदा वापरला गेल्याने जूना झालाय जरासा :)
स्टार बॉक्स
डार्क कॉपर कलरचा बॉक्स माझ्या सगळ्यात आवडता
सगळे एकावर एक रचून त्यांची रवानगी कपाटात करता येते
ह्यावरुन प्रेरित होऊन एका ब्लूबेरीच्या बॉक्सला पण रंगवलं पण ते प्लॅस्टीक खूपच नाजूक असल्याने रंग एकसारखा बसला नाही
पण शार्पीच्या पेन्ससाठी पर्फेक्ट झाला तो
हे पुर्ण आर्ट सेटच काँबिनेशन
मागाहून घर आवरताना एक शेवटचा शिलेदार भेटला , मग त्यालाही सजवलचं. फोमचे तुकडे करुन कोलाज करायचा प्रयत्न केलाय.