‘रंग दे’ हा असा उपक्रम आहे ज्यात भारतातील अतिशय मागासलेल्या आर्थिक पार्श्वभूमीच्या गरजू नव-उद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज देण्याची सोय पहिल्यांदाच उपलब्ध करून देतो. देशातल्या विविध NGOs बरोबर 'रंग दे' काम करते आणि विविध गरजू लोकांच्या कर्जांचे प्रस्ताव गोळा करते. हे सगळे प्रस्ताव ‘रंग दे’च्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातात. तुमच्या-आमच्यासारखे लोक हे सगळे प्रस्ताव बघू शकतात आणि कर्जाच्या काही भागासाठी हातभार लावण्याचा पर्याय निवडू शकतात. एकदा ‘रंग दे’ला हवे तवढे कर्ज उभारून देणे जमले की ते कर्ज संबंधित NGO ला सूपूर्त केले जाते आणि ती NGO त्या कर्जाचा बटवडा संबंधित गरजू व्यक्तीकडे करते. याशिवाय ‘रंग दे’ कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक जाहीर देते आणि तुम्ही परतफेडीच्या सद्य स्थिती मासिक मागोवा घेऊ शकता. कर्जदाराने तुमचे पैसे थोड्याशा व्याजदरासकट परत केल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे परत घेऊ शकता किंवा वेगळ्या उद्योजकामध्ये पुन्हा गुंतवू शकता.
युमनाम राशी देवीचं उदाहरण घ्या. ती भारतातल्या मणिपूर राज्याची हातमागावर काम करणारी विणकर आहे. तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. ५०,०००/- च्या जवळ जाणारे आहे. एवढ्या उत्पन्नात २ शाळकरी मुलांसकट एकूण चौघांचा संसार चालवणे, सोपे नाही. एक विणकर म्हणून ती सगळं निभावून नेण्यासाठी काबाडकष्ट करते. विणकामाच्या तिच्या व्यवसायवृद्धीसाठी जास्तीच्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी तिला रू. ८०००/- चं छोटंसं कर्ज हवं होतं, म्हणून तिने मणिपूरच्या Self Employment Voluntary Association (SEVA) या समाजिक संस्थेशी संपर्क साधला. SEVA ने तिचा प्रस्ताव 'रंग दे'ला सादर केला. विविध सामाजिक गुंतवणूकदारांनी तिच्या प्रस्तावामध्ये गुंतवणूक करून तिला मदत करायचे ठरवलं. तिच्या कर्जाचा बटवडा लवकरच झाला. तिने एपिल २०१६ पासून तिच्या कर्जाच्या परतफेडीला सुरूवात केलीही. तिच्या परतफेडीची सद्य स्थिती ऑनलाईन उपलब्ध आहे. आता या मेहनती कुटुंबाच्या गरीबीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नाला साथ मिळावी, अशी आशा आहे.
‘रंग दे’बाबत सगळ्यांत आश्चर्यकारक वस्तूस्थिती ही आहे की, सर्व कर्जदारांपैकी ९९% कर्जदारांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली आहे. ‘रंग दे’ तुमच्याकडून देणगी मागत नाही, तर गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू इच्छिणार्या मेहनती आणि स्वाभिमानी कुटुंबांना कर्ज देण्यासाठी मदतीचा हात मागते.
तेव्हा नक्की 'रंग दे'च्या वेबसाईटला एकदा भेट द्या आणि जमल्यास या हटके समाजकार्याला मदत करा.
https://www.rangde.org/
डिस्क्लोजर :
१. मी किंवा माझे कुठलेही नातेवाईक 'रंग दे'शी कुठल्याही प्रकारे संबंधित नाहीत.
२. 'रंग दे' भारतातील विनानफा तत्वावर चालणारी कायदेशीर नोंदणीकृत संस्था आहे.
३. कर्जदारांनी पूर्ण परतफेड केलेल्या सगळ्या कर्जांतून नाममात्र २% 'रंग दे' आपल्या कामकाजाच्या खर्चासाठी घेते.
(सगळ्या इमेजेस 'रंग दे'च्या वेबसाईटवरून साभार.)