लग्नाला गेले मी ओसाका पुरा..
माझ्या भटकेपणात मौज आणणारी, काही अनपेक्षित दिसलेली इंद्रधनुष्ये आहेत. उन पावसाचा खेळ पहाताना ,ओल्या मातीचा वास घेत , अचानक दिसलेली कमान , अजूनही 'हैला कस्ल भारी' अस वाटवते, तसेच हे भटकंतीत अचानक ठाकलेले प्रसंग !!
जपानात नविन काम मिळालं होते आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून तोक्यो हून ,ओसाका नावाच्या शहरात जायच होत. आदला आठवडा कामानी पिट्ट्या पडला होता, म्हणून ओसाकात पोचले की गुमान पडी मारायची अस ठरवल होतं. पण शिंकान्सेन नी जाताना सहज खिडकीतून पाहिले तर फुजी सान ! (एक जपानची वारी केली की सगळ्याना सान जोडायची सवय करून घ्यायची अस मला शिकवलय :winking: ) का कोण जाणे हे महाशय दिसले की आश्वस्त वाटत. सगळी मरगळ गेली . म्हटल ओसाका मधे मिळणारी रिकामी दुपार सत्कारणी लावायचीच.
बाडबिस्तरा मुक्कामी टाकून लगेच मी बाहेर पडले. ओसाका मधे जायची पहिलीच वेळ. त्यात तोक्यो, योकोहामा मधे तुरळक दिसणारं इंग्लिश इथे लापता होतं. हॉटेल लॉबी मधल्या मुलीला ,'हाताशी ४ तास आहेत इथे जवळ पास काय पहाता येइल " हे साभिनय ,जापनीज अॅक्सेंट्च्या इंग्लीश मधे , चित्र काढून विचारायचा प्रयत्न केला पण गाडी पुढे सरकेना.
शेवटी ओसाका कॅसल नावाची इमारत झळकवणारं ब्रोशर दिसल. ओसाका कासल हे शब्द सोडून उर्वरीत मजकूर अर्थात जपानीत , मी निरक्षर. मी ते चित्र दाखवून विचारल? त्यावर तिनी एका बस चा नंबर सांगितला . म्हटल, मुग्धाच्या रंगित गोष्टी सारख तिथवर पोचले की पुढचा पत्ता विचारता येइल. :)
बस मधून उतरून कॅसल च्या प्रवेश द्वारातून आत शिरले. पत्ता विचारण्यात वेळ घालवण्यापेक्षा रमत गमत फॉल कलर्स मधे रंगलेली पान पहात जाव असा विचार केला.
निंजा ड्रेसिंग ची परेड होती तिच्या बरोबर चालले थोडावेळ. सगळे बहुधा कॅसल च्या मुख्य प्रांगणातच चालले होते.
वाटेत एक पारंपारिक कपडे घातलेला घोळाका दिसला. मी परेड सोडून त्यांच्या मागे निघाले. :)
मंडळी एका देवळाअपाशी थांबली.
7
तिथे एक फोटोग्राफर दिसला. मोडक्या इंग्लिश मधे त्याला विचारल की नाटक आहे का ? का कल्चरल प्रोग्रॅम. तो म्हणाला लग्न आहे. आपुन खुश ! जपानी लग्न पहायला मिळणार! लग्नाच्या फोटोग्राफर ह्यापेक्षा अधिक चांगला वशिला कोण मिळणार मला . पण त्यानी माझ्या कडे 'येडी झाली का तू' अश्या स्वरूपाचा कटाक्ष टाकला आणि म्हणाला तूच काय मलाही आत एंट्री नाही ये. आता मी येझाकातू कटाक्षाची परतफेड करून टाकली. {) त्याला सांगितल आम्च्या इंडियात लग्नात , नवरा नवरीपेक्षा फोटोग्राफर महत्वाचा असतो. :)
ह्या गप्पा होइपर्यन्त वर्हाडी जमा व्हायला लागले. मुलीकडचे १०-१२ मुलाकडाचे तेवढेच. त्यातल्या एकाला विचारल , तुमची हरकत नसेल तर मला हा सोहाळा पहाता येइल का ? अत्यंत नम्र शब्दात त्यानी नकार दिला आणि समजावल. कुटुंबिय सोडून इतर कोणी देवळात येउ शकत नाही. पण तू नंतरच्या भोजनास अवश्य ये. मी मनातल्या मनात म्हटल माझा नवरा माझ्याबरोबर नाही हे बरय. माझ्या अश्या भोचकपणा (त्याच्या भाषेत गेटक्रॅशीग :ड ) करण्याबद्दल माझे त्याचे अगणीत वाद घडलेत. मी पडेल चेहेरा केल्यावर काका म्हणले ' देवळात नाही आलीस तरी खिडकीच्या उभ्या फटीतून पहा. आवाज मात्र करू नकोस, आणि फोटो काढू नकोस. ओक्के म्हणून मी आणि फोटोग्राफर खिडकीला नाक लावते झालो.
तेवढ्यात मुख्य प्रिस्ट आले. काय तो रुबाब!!
त्यांच्या मागुन दोघी असिस्टंट प्रिस्ट्स ! ह्या बासरी सद्रुश वाद्य वाजवून एव्हिल स्पिरिट्स (ह्याला भुताखेताना हा शब्द योग्य वाटेना) दूर ठेवतात.
ह्या तिघांचा मागोमाग नवरी आणि नवरा. नवरीचा लग्नाचा किमोनो ३२ किलो चा होता. आणि केसांचा टोप आणि त्यातल्या स्पेशल पिना ,मेकप तयारीला ३ तास लागतात म्हणे. ही माहिती पुरवणारा फोटो ग्राफर. आमच कस? तुमच कस? हो का? अगदी सेमच रे! अश्या स्वरूपाच्या गप्पा चालल्या होत्या.
दांपत्यापाठोपाठ नातेवाईक.
ही नक्की वरमाई आणि ती शेजारची तिची बहिण ! ह्यावर फोग्रा चकीत! तुला कस कळल? म्हटल तुमच आणि आमच सेम असत :) तोरा सेम :winking:
8
आतले विधी अत्यंत शांततेत गंभिरपणे चालू होते, हे मात्र आप्लया अगदी उलट गडबड आवाज गोंधळ नाही ते लग्न कसल? असो, इथे त्या दोघी बासरीवादक मुली मंद्र सप्तकात सूर लाउन होत्या. मुख्य भटजीबुवा एकदा नवर्यामुला समोर मग नवरी समोर उभे राहून मंत्र पुटपुटत होते. नंतर ३ ग्लासातून साके ठेवली गेली. नवरा नवरी नी ते प्यायले मग असेच ३ ३ सुंदर प्याले वर्हाडाचा समोर गेले त्यांनी ते प्यायले. आणि लग्न संपन्न झाले. इथे माझा नवा मित्र सरसावून उभा राहिला. अवजारं परजली आणि दरवाज्यासमोर पळाला. हे का ते कळलेच थोड्या वेळात. मुख्य भटजींनी दरवाजा उघडून नव दांपत्याला जगा समोर पेश केले.
9
टाळ्या वाजल्या. सख्यांचे मागुन अभिनंदनाचे चित्कार ऐकू आले. धार्मिक रितीरिवाज संपवून सोहाळा सुरू झाला. :) फोग्रा बिझी झाला , नवरीचा कपडेपट , मेकप , केशरचनाकार मुली सरसावल्या. तेवढ्यात ते परमिशन वाले काका दिसले. मुलाचे वडिल होते बहुधा. त्याना माझ्या पोतडीत असलेली छोटी गणपतीची मुर्ती दिली. एलिफंट गॉड पाहून काका खूष झाले. मी नवपरिणित दांपत्या चे अभिनंदन केले आणि काढता पाय घेतला.
एरवी कुठे जाणार असले की थोडीफार माहिती शोधलेली असते. पण हे अचानक दिसलेल इंद्र धनुष्य. नंतर,' समुराई लगिन' म्हणून गुगल देवाला साकड घातल तरी बरच कळल असत पण तस करावस वाटल नाही. फोटोग्राफर्शी मोडक्या इंग्लिश मधे मारलेल्या गप्पा, त्यातून हाताला लागलेले विविध रंग, समोर दिसलेला नव्या जोडप्याच्या डोळ्यातला आनंद , वरवधू पित्यांची कार्य सुखरूप पार पाडण्या साठी केलेली धावपळ, अन पार पडल्यावर चेहेर्यावर झळकणारी कॄतार्थता सगळे रंग झकास दिसत होते. मला अनपेक्षित दिसलेलं इंद्रधनुष्य!!