कर्करोग

कर्करोग. याबद्दल सगळ्यांनीच काही ना काही ऐकलेलं किंवा वाचलेला असत. कर्करोगाचे वाढते प्रमाण, सध्याची परिस्थितीत आणि आपल्या एकूण जीवनशैलीचा विचार करता, या रोगाबद्दल योग्य माहिती असणं महत्वाचं आहे. मी या लेखमालेतून कर्करोगाची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Keywords: 

लेख: 

कर्करोग - १

कर्करोग. याबद्दल सगळ्यांनीच काही ना काही ऐकलेलं किंवा वाचलेला असत. कर्करोगाचे वाढते प्रमाण, सध्याची परिस्थितीत आणि आपल्या एकूण जीवनशैलीचा विचार करता, या रोगाबद्दल योग्य माहिती असणं महत्वाचं आहे. मी या लेखमालेतून कर्करोगाची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

कर्करोग म्हणजे काय? साध्या शब्दात, शरीरातील पेशींचे अनिर्बंध वाढणे. आता अश्या सगळ्यानाच कर्करोग म्हणतात का?
तर नाही. आपल्या अंगावरचे तीळ किंवा मस हे सुद्धा साधारण पेशींच्या अनिर्बंध वाढीमुळेच होतात. पण नंतर ते आटोक्यात येतात. अशा प्रकारच्या गाठींना (tumors), benign असं म्हणले जाते. काही वेळा अश्या benign गाठी बऱ्याच मोठ्या असू शकतात. जसे स्तनाचे benign tumors हल्ली बऱ्याच स्त्रियांमध्ये आढळतात. अश्या गाठींवर, योग्य वैद्यकीय सल्याने, फक्त औषधांनी उपचार केले जातात किंवा त्या surgery ने काढल्या जातात. ज्या गाठी वाढतच जातात आणि शरीरात इतरत्र पसरतात अश्या गाठींना malignant असं म्हणतात. अशा गाठींना आपण साधारणतः कर्करोग म्हणून संबोधतो. मी जरी वरती आणि या पुढे 'गाठ' असं लिहिलं तरी आपण हे लक्षात ठेऊया की, रक्ताचा कर्क रोग पण असतो ज्यात मी म्हणत्ये तशी गाठ नसली तरी, रक्तातल्या एका किंवा अनेक प्रकारच्या पेशी प्रमाणाबाहेर वाढतात.

कर्क रोग का होतो? कोणत्या व्यक्तींना कर्क रोग होण्याची संभावना असते- आपण अश्या व्यक्तींना रोग होण्याआधी ओळखणे व सावधान करणे शक्य आहे का? झाला तर उपचार काय असतात? या मुद्यांवर आपण या लघु - लेखमालेतून चर्चा करूया. या प्रत्येक प्रश्नांची अनेक उत्तरे आहेत आणि तीही खूप गुंतागुंतीची. अनेक दशकांच्या संशोधनातून वरच्या प्रश्नांची काही उत्तरे शास्त्रज्ञांनी शोधली आहेत आणि पुढचा शोध अजूनही चालूच आहे. नवीन तंत्रज्ञानाने अनेक दारं आज उघडली आहेत. रोगाचे मूळच नाही तर व्यक्तीच्या रचने प्रमाणे उपचार (ज्याला आपण personalized medicine म्हणतो) आणि कर्क रोग होण्याची शक्यता वर्तवणारे घटक अश्या व आजून काही मुद्द्यांवर हजारो शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. मी त्यातील एक.

-
नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.

कर्करोग - २

आज आपण कर्क रोग कसा होतो त्यावर जरा विस्ताराने चर्चा करूया. जसे आपण आधी पहिले, कर्क रोग म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ जी आटोक्याबाहेर जाते. त्यातल्या काही पेशी मूळ स्थान सोडून जेव्हा शरीरात इतरत्र पसरतात तेव्हा त्याला मेटॅस्टॅसिस असं म्हणतात. मेटास्टॅटिक पेशी नवीन ठिकाणी परत वाढायला लागतात. वेळेत निदान न झाल्यास व उपचार न केल्यास, कर्क रोग शरीरात अनेक ठिकाणी पसरू शकतो.

असं काय होतं ज्यांनी अचानक सरळमार्गी पेशी अश्या बेताल होतात?
थोडं विषयांतर होतंय पण उत्तरा आधी आपण थोडी पार्श्वभूमी बघूया. आपलं संपूर्ण शरीर हे विविध प्रकारच्या पेशींनी बनलेलं असतं. प्रत्येक प्रकारच्या पेशिनची एक ओळख असते, एक आकार, ठरलेली कार्य / जवाबदाऱ्या असतात. माणसाची सुरुवात एका पेशीपासून होते (शुक्राणू आणि बीजांड एकत्र येऊन बाळाची पहिली पेशी बनते). त्या पेशीचा रिप्लिकेशन होऊन एक समूह तयार होतो. या समूहामध्ये आजून वाढ होऊन, त्यातल्या काही पेशींची एक आयडेंटिटी विकसित व्हायला लागते (त्याला differentiation असं म्हणतात). अश्या differentiated पेशींच प्रयोजन हळू हळू ठरत जातं. म्हणजे त्यापैकी काही त्वचेचा पेशी बनतात तर काही हाडांच्या इ. अश्या differentiated पेशी अतिशय नियंत्रित असतात. जसा बाळ तयार होत, तसं या differentiated पेशींचं प्रमाण वाढत जातं आणि undifferentiated पेशी ज्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व नसतं, अशा पेशींचं प्रमाण घटत. अजून माहिती साठी हे बघा: https://en.wikipedia.org/wiki/Human_embryogenesis
प्रौढ व्यक्तींमध्ये तुलनेने undifferentiated पेशी थोड्या प्रमाणात असतात ज्यांना स्टेम cells म्हणतात. या अतिशय नियंत्रित असतात आणि त्यांचही कार्य थोड्याफार प्रमाणात ठरलेलं असतं (स्टेम सेल्स हा फारच इंटरेस्टिंग विषय आहे पण परत, व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्याबद्दल लिहिणं इतक्यात शक्य होणार नाही. कधीतरी नंतर बघते).

हे सगळं रामायण सांगण्याचं कारण असं की, कर्क रोग हि प्रक्रिया पूर्ण उलटी करतो. तंतोतंत नाही पण साधारणतः. म्हणजे, उदाहरणार्थ, आपल्या त्वचेच्या पेशी आयताकृती असतात. कर्क रोगात त्यांच्यावरच नियंत्रण जातं, आकार बिघडतो आणि त्या साधारण गोलाकार किंवा थोड्या वाकड्या तिकड्या दिसायला लागतात. त्यांच स्वत्व हरवून बसतं. त्याला de -differentiation अस म्हणतात. एका रेषेत वाढायच्या ऐवजी एकमेकांवर चढायला लागतात. वेगळे पदार्थ स्रवायला लागतात. संख्या वाढते, पोषण कमी पडायला लागतं आणि अधिक पोषण मिळावं म्हणून पेशी शरीराच्या आतल्या भागात शिरायला लागतात. पोषणासाठी नवीन आणि अनैसर्गिक रक्तवाहिन्यांची वाढ व्हायला लावतात. असे अनेक बदल घडवून आणण्याची क्षमता या पेशींमध्ये असते. आता हे सगळं घडत असताना आपली रोगप्रतिकार शक्ती झोपलेली असते का? तर नाही.. पण फसवली जाते. सोपं उदाहरण देते. आपण तांदूळ निवडताना पटकन काळे (निराळा रंग) खडे ओळखू शकतो. पण जर खडे पांढरे आणि साधारण तांदळासारखे दिसणारे आणि फील असले तर खडे निवडणं अवघड जातं. त्यात अपुऱ्या प्रकाशात हे अजूनच अवघड होऊन बसत. तसंच, या पेशी आपल्याच असतात आणि त्यांनी स्रवलेल्या पदार्थांमुळेही रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करू शकत नाही.. त्या पेशींचं उच्चाटन हवं तसं होत नाही.

थोडं आजून खोलात जाऊया. पेशींमध्ये काय बदल होतात? का अनियंत्रित होतात? याचं उत्तर अनेक पदरांच आहे आणि बराच गुंतागुंतीचं. थोडक्यात बघूया. प्रत्येक पेशी मुळात ३-४ प्रकारच्या घटकांनी बनलेली असते - deoxyribonucleic acid (DNA), ribonucleic acid (RNA), sugars, proteins आणि lipids. कर्क रोग हा जनुकीय मनला जातो. म्हणजेच, अनेक कारणांनी आपल्या DNA मध्ये असे बदल घडून येतात की ज्यामुळे कमीत कमी खालील गोष्टी होतात - १. जनुकीय अस्थैर्य २. चुकीची proteins निर्माण होणे ३. जनुकांवरच्या नियंत्रणात बिघाड ४. ह्या सगळ्या चुकांवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेत बिघाड. पेशी जेव्हा replicate होतात तेव्हा अतिशय कडक QC आणि स्टॉक टेकिंग असते. जर काही कमी असेल, चुकीचा DNA तयार झाला, तर सगळ्या गोष्टी जेथल्या तेथे थांबवल्या जातात. कर्क रोगात हे नियंत्रण हरवून बसल्याने, DNA तल्या चुका वाढतच जातात, पोषण पुरेसं नसलं तरी पेशी वाढतात आणि आजून पोषण मिळावं म्हणून आक्रमक होतात. सर्व संरक्षक पदर भेदत रक्तात प्रवेश करतात आणि नवीन घर थाटतात. बऱ्यापैकी साधर्म्य दिसतंय ना माणसांच्या मानसिकतेबरोबर ? :)

आता हे सगळं खरं असलं तरी आपण काय करू शकतो म्हणजे कर्क रोगाचं लवकर निदान होईल आणि आटोक्यात आणता येईल? पुढच्या भागात आपण यावर चर्चा करूया. अंमळ लांबला आजचा भाग.. वाचल्याबद्दल धन्यवाद.

-

नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.

कर्करोग - ३

कर्क रोग होण्याची कारणं थोडक्यात आपण मागील भागात पहिली. या भागात आपण कर्क रोगाचे लवकर निदान करता येऊ शकतं का नाही त्यावर चर्चा करूया. प्रत्येक रोगाचं कमीत कमी दोन प्रकारच representation असतं - १. Physical २. molecular. पहिलं तसं म्हंटलं तर दुसऱ्यावर अवलंबून असतं. Physical representation म्हणजे काय? दृष्टी, स्पर्श किंवा इतर संवेदनातून ज्याची जाणीव होते, ज्याला आपण बरेचदा रोगाची लक्षणं दिसणे असं म्हणतो. दीर्घकाळ हळू हळू वाढणाऱ्या बाकीच्या रोगांप्रमाणेच जसे की मधुमेह, कर्क रोगाची लक्षणे पटकन लक्षात येणं अवघड असतं. उदाहरणार्थ, पचन संस्थेचा कर्क रोग झाला तर पोट बिघडते किंवा पित्त वाढू शकते आणि असे झाल्यास नेहमी ती कर्क रोगाची लक्षणं असतात असेही नाही. अश्या अस्पष्ट लक्षणांमुळे बरेचदा कर्क रोगाचे निदान खूप उशिरा होते. बहुतेकवेळा अशी लक्षणं नेहमीचे उपचार करूनही बरी होत नाहीत आणि त्याबरोबरच अचानक वजन घटते किंवा बाकीच्या तक्रारी सुरु होतात. अश्यावेळी मग कर्क रोगाच्या चाचण्या केल्या तर तो बराच वाढला असल्याचं दिसून येतं. हे जरी खरं असलं तरी निदान होण्याच्या या विलंबात बऱ्याच प्रमाणात पचन संस्थेचे अवयव आपल्याला दिसत नाहीत किंवा स्पर्श करता येत नाहीत या गोष्टींचा सहभाग आहे. थोडं लक्ष ठेवलं तर स्तनाचा कर्क रोग तसा वेळेत ओळखता येऊ शकतो. हाताच्या तळव्याला स्तनाच्या कर्क रोगाची गाठ जाणवू शकते आणि दुर्लक्ष केले नाही तर बरेचदा औषधे आणि शास्त्रक्रियेवर काम भागते. त्वचेच्या कर्क रोगाचीही तशीच कथा.

दुसरं वर म्हणाले ते molecular representation. म्हणजेच, प्रत्येक प्रकारच्या कर्क रोगाचं गुणवैशिष्ट्य सांगणार DNA, RNA, proteins इ. घटकांचं profile असतं. बरेच संशोधक हेच profile लवकर कसं ओळखता येईल यावर काम करत आहेत जेणेकरून निदान आणि कर्क रोग बरा करण्याची शक्यता वाढते. प्रत्येक स्तरावरच्या चाचण्या आज वापरात आहेत. Protein-based चाचण्या बऱ्याच ठिकाणी वापरात आहेत, जसे की, स्तनाच्या कर्करोगाच्या उपप्रकारांचे निदान करण्यासाठी, protein-based (ER, PR and HER२) चाचण्या जगन्मान्य आहेत. जसे आपण मागच्या लेखात पहिले, कर्क रोग हा जनुकीय मानला जातो. याचाच अर्थ, रोगाचं लवकर निदान करायला जनुकीय चाचण्या केल्या पाहिजेत हे तार्किक उत्तर आहे. तांत्रिक दृष्ट्याही जनुकीय चाचण्या म्हणजेच DNA/chromosome -based tests करणं जास्त सोपं आणि scalable आहे. अर्थातच त्या दिशेने बरंच संशोधन झालाय आणि सध्या त्यातले काही यशस्वी प्रयोग वैद्यकीय चाचण्या म्हणूनही वापरल्या जातात. या चाचण्यांमागच्या तर्काचा विचार करूया.

एखाद्या वेळी तुम्हाला तुमच्या डॉक्टरनेही विचारले असेल की, 'तुमच्या कुटुंबात कोणाला कधी कर्क रोग झाला होता का? कधी, कुठला, आईच्या का बाबांच्या बाजूच्या नातेवाईकांना?' हे प्रश्न जर तुम्हाला विचारले गेले नसतील, तर ते नक्की स्वतःला विचारा. जर एका बाजूच्या एकापेक्षा जास्त नातेवाईकांना कर्क रोग झाला असेल, तर नक्की तुम्हाला स्वतःला किती धोका आहे ह्याची चाचणी करून घेणं उपयुक्त ठरेल. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की काही प्रकारचे कर्करोग होण्यासाठी काही जनुकांमधील विशिष्ट बदल एकटे सुद्धा पुरेसे आहेत. उदा. BRCA जनुकांमधील काही बदल आणि स्तनाच्या कर्करोग. असे बदल जर शुक्राणु आणि / किंवा बीजांडातून पुढच्या पिढीत गेले तर पुढच्या पिढीलाही धोका असतो. उदाहरणादाखल खालील चित्र पहा :
classic_brca1.jpg
https://www.meb.uni-bonn.de/Cancernet/CDR0000062855.html
यामध्ये गोल म्हणजे स्त्रिया, चौकोन म्हणजे पुरुष, भरलेले गोल / चौकोन म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचे निदान झाले आहे आणि छाट मारलेले म्हणजे मृत.
ह्या कुटुंबामध्ये, BRCA१ नामक जनुकामधला विशिष्ट बदल अनेक पिढ्यांमध्ये दिसतो ज्याने अंडाशय (ovarian) किंवा / आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार वाढते. आपल्याला तसेच चित्र या वंशावळीत दिसते.
सोलोमन आणि त्याच्या सहकार्यांनी २०१४ ASCO meeting मध्ये फारच महत्वाचा मुद्दा मांडला ज्यामुळे रोगाचा कौटुंबिक इतिहास फक्त आई-वडील यांच्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही हे पटते (Solomon et al., ASCO meetings, 2014) . त्यांच्या अभ्यासानुसार जर बाकीच्या नातेवाईकांची आरोग्यासंबंधित माहिती घेतली नसती तर अनेक संभवनीय कर्करोगींचें लवकर निदान होणे चुकले असते. हे खालील चित्रावरून स्पष्ट होते:
hboc_missed_patients.jpg
https://new.myriadpro.com

जनुकीय बदल, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका संभवतो, तपासणाऱ्या विविध चाचण्या सध्या उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारचे कर्करोग या चाचण्यांमध्ये समाविष्ट होत नसले तरी आपण आपल्या डॉक्टर किंवा/आणि जनुकीय तज्ज्ञ सल्लागारांशी नक्की बोला. आपली जनुकीय रचना आणि बाकीच्या अनेक घटकांचा विचार करून योग्य सल्ला मिळाला तर भविष्य सुकर आणि सुरक्षित होऊ शकतं. योग्य माहिती असणे, जागरूक असणे आणि वेळेत पाऊल उचलणे महत्वाचे आहे. चला, संवादाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करूया.

ह्या संकेतस्थळावरील माहिती जरूर वाचा:
https://www.cancer.net/cancer-types/hereditary-breast-and-ovarian-cancer...

-

नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.

Keywords: 

कर्करोग - ४ (उपचार पद्धती)

मागील भागात आपण कर्करोग होण्याच्या संभाव्य धोका ओळखण्यासाठीच्या जनुकीय चाचण्यांबद्दल थोडक्यात चर्चा केली. या भागात, कर्करोग झाला असता सध्याची अत्याधुनिक उपचार पद्धती आणि त्यामागचा विचार याबाबत बोलूया. या लेखाची व्याप्ती allopathy पर्यंत मी मर्यादित ठेवली आहे. आयुर्वेद आणि बाकी उपचारपद्धतीचा समावेश यात नाही

अर्थातच शस्त्रक्रिया हा कर्करोग निवारणाचा महत्वाचा मार्ग आहे पण यात अनेक मर्यादा आहेत. यातील महत्वाची अट अशी आहे की कर्करोगाचा शरीरातील प्रसार आणि त्याच्या कक्षा ठामपणे माहिती असणे अत्यंत गरजेचे असते कारण शस्त्रक्रियेनंतर थोडासा कर्करोग मागे ठेऊन काही उपयोग नाही. मागे उरलेल्या पेशी नवीन जोमाने वाढून कर्करोग परत बळावू शकतो. तसेच कर्करोगाचे निदान उशिरा झाले असेल तर हा धोका फार मोठा होतो आणि बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया टाळली जाते. बाकीच्याही अनेक गोष्टी जसेकी रोग्याचे वय या निर्णयावर परिणाम करतात. हल्ली अनेकदा औषधे देऊन रोगाचा प्रसार कमी केला जातो आणि मग शस्त्रक्रियेची शक्यता पडताळली जाते. या पद्धतीला neoadjuvant थेरपी असे म्हणतात. अन्यथा माझ्यामते उपचाराबाबतची सध्याची विचारसरणी मूलतः तीन भागात मोडते. १. Chemotherapy २. targeted थेरपी ३. Immunotherapy (किंवा आजून उपचार पद्धती ज्या कर्करोगाच्या नियंत्रण प्रक्रियेवर केंद्रित आहेत). या वर्गीकरणावर मतभेत होऊ शकतात पण मी याचा पाया त्या उपचारपद्धतीमागील तर्क हा ठेवलेला आहे.

१. Chemotherapy - या पद्धतीचा उल्लेख बरेच वेळा होतो त्यामुळे बहुतेक जणांनी हा शब्द निदान ऐकलेला असतो. या पद्धतीमागचा तर्क काय आहे ते बघूया. कर्करोगात सूक्ष्मदर्शकात काय दिसते? पेशींची वेडीवाकडी अनिर्बंध वाढ. ही वाढ अर्थातच अनिर्बंध जनुकीय पुनर्निर्मितीमुळे होते. जर एखादे औषध ही प्रक्रिया थांबवत असेल तर त्यानी तत्वतः प्रत्येक प्रकारचा कर्करोग बरा व्हायला पाहिजे. हा विचार अर्थातच तेव्हाच्या ज्ञानाच्या कक्षेचा विचार केला तर क्रांतिकारक किंवा आमूलाग्र बदल घडवून आणणारा होता. Chemotherapy चा अलीकडचा इतिहास पहिला तर मजेची बाब अशी की पहिले संदर्भ DNA च्या रचनेच्या शोधाच्या आधीचे आहेत म्हणजे १९४० च्या आसपासचे. अर्थातच जनुकांची संकल्पना ही DNA च्या रचनेच्या शोधाच्या अनेक दशके आधी मांडली गेली होती. १९५० नंतर या उपचार पद्धतीचे उपयोग रक्ताच्या तसेच इतर अवयवांच्या कर्करोगासाठी दिसून आला. नंतरची अनेक वर्षे या पद्धतीने कर्करोगाचा उपचार केला गेला. कालांतराने या पद्धतीच्या अनेक मर्यादा लक्षात यायला लागल्या. एक म्हणजे पेशींची वाढ रोखण्यासाठी या पद्धतीत जनुकीय पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे अडथळे निर्माण केले जातात ते कर्करोगाशीच फक्त संलग्न ना राहता अन्यथा निरोगी पेशींना पण त्रासदायक ठरतात आणि त्या पण मारल्या जातात. त्यामुळे रोग्यांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते उदा. अंगाची लाही होणे, केस गळणे इ. हे दुष्परिणाम कधी कधी रोगाइतके त्रासदायक ठरू शकतात. दुसरा मोठा धोका असतो तो रोगाचे उलटणें. काही उदाहरणे अशीही आहेत ज्यात एक प्रकारचा कर्करोग बरा करण्यासाठी वापरलेल्या chemotherapy मुळे त्या रोग्यामध्ये वेगळ्या प्रकारचा कर्करोग निर्माण झाला. या दुष्परिणामांचा molecular पाया अतिशय गुंतागुंतीचा आहे. एक लक्षात घेणे अतिशय महत्वाचं आहे की हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आज उपाय उपलब्ध आहेत. अनेक प्रसंगी अजूनही chemotherapy हीच उपचार पद्धती उपयोगी आहे आणि वापरातही आहे. Radiation therapy पण बऱ्याच वेळा वापरली जाणारी उपचार पद्धती आहे पण इथे त्यावर विस्ताराने लिहिणे मी जाणीवपूर्वक टाळले आहे.

२. Targeted therapy:

targeted-therapy-for-cancer.jpg

Source: http://puhuahospital.com/treatments/cancer/targeted

Chemotherapy च्या पुढे आलेल्या मर्यादांमुळे अनेक शास्त्रज्ञांनी मग जरा वेगळ्या मार्गाचा विचार करायला सुरुवात केली. अर्थात मूलभूत संशोधनाने याचा पाया पडला. दोषयुक्त जनुके असलेल्या पेशींची अनिर्बंध वाढ आणि पुनर्निर्मिती कश्यामुळे होते यावर बरेच संशोधन झाल्यावर काही ठळक गोष्टी समोर आल्या. दोषयुक्त जनुकांमुळे चुकीची प्रथिने निर्माण होतात आणि ही प्रथिने अश्या पेशींच्या वाढीला कारणीभूत ठरतात. या प्रथिनांमधले काही महत्वाचे नियंत्रक असतात. या नियंत्रकांवर आळा घातला तर कर्करोगाचे निवारण करता येते आणि या प्रणालीमुळे निरोगी पेशींना ज्यांमध्ये निरोगी प्रथिने असतात त्यांनाही दुष्परिणाम सहन करावे लागत नाहीत. या उपचार पद्धतीला targeted therapy असे म्हणतात ज्यात औषधांचे लक्ष्य फक्त चुकीची प्रथिने असलेल्या पेशी असतात. Chemotherapy च्या मानाने targeted therapy अनेक पटीत परिणामकारक आहे हे लगेच दिसून आले. त्याबरोबरच Chemotherapy एवढे दुष्परिणाम नव्हते. अर्थातच गुण इतके होतेच पण दोषही होते. एक म्हणजे ही औषधे अतिशय महागडी असतात, भारतातच नाही तर बाहेरही. दुसरं म्हणजे प्रत्येक प्रकाच्या दोषासाठी वेगळे औषध असते. त्यामुळे नेमका दोष कोणता आहे हे ओळखणं अनिवार्य आहे. त्यासाठी केलेल्या जाण्याऱ्या चाचण्याही स्वस्त नाहीत. तिसरं आणि माझ्यामते सर्वात महत्वाचे म्हणजे कर्करोगाच्या पेशींमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारची दोषी प्रथिने असू शकतात आणि आपण एकासाठीचे औषध घेतले तर ज्यासाठी औषध घेतलेले नाही ते मान वर काढू शकते आणि रोग उलटू शकतो. हे सर्व खरे असले तरी या पद्धतीची स्पष्ट उपयुक्तता नाकारता येणार नाही.

३. Immunotherapy:

640x-1.jpg

Source:https://www.bloomberg.com/quicktake/cancer-coup

मागे मी म्हणाले तसं कर्क रोग शरीरात पसरताना आपली प्रतिकार शक्ती फसवली जाते कारण या पेशींची/प्रथिनांची अनिसर्गिकता कर्करोगात बेमालूमपणे लपवली जाते. अर्थातच शास्त्रज्ञ असा विचार करू लागले की काय असे करता येईल जेणेकरून प्रतिकारशक्ती परत चेतावता येईल. या पद्धतीमध्ये अनेक मार्ग अवलंबले जातात उदा. कर्करोगाच्या पेशी ओळखता येतील अश्या निशाणी ओळखून देणारी प्रतिद्रव्य प्रथिने, प्रतिकारशक्तीला चालना देणारी नैसर्गिक रसायने किंवा इतक्यात सगळ्यात मोठं यश मनाली जाणारी म्हणजे प्रतिकारशक्तीच्या पेशींचे एक प्रकारचे प्रत्यारोपण (CAR - T cell therapy). काही महिन्यांपूर्वीच US FDA ने पहिल्या CAR - T cell therapy ला मान्यता दिली. खाली दिलेले संदर्भ नक्की वाचा ज्यात यावर विस्ताराने लिहिलेले आहे.

Immunotherapy - https://www.cancer.net/navigating-cancer-care/how-cancer-treated/immunot...

CAR-T cell therapy - https://www.cancer.net/blog/2018-01/car-t-cell-immunotherapy-2018-advanc...

ही सर्व प्रगती नक्कीच उत्साहवर्धक आहे.. आशादायी आहे. पण हेही खरे की कुठलीही एक उपचार पद्धती कर्करोगाचे समूळ उच्चाटन करण्यास समर्थ नाही किंवा पहिल्या यशानंतर कर्करोग आपलं रूप असं बदलतो की त्यावर मात करायला नवीन विचार करायला लागतो. मग एकापेक्षा अधिक पद्धतींचे मिश्रण उपयोगी ठरू शकते. अर्थात आपण सतर्क असलो तर कर्करोगाचे निदान अगदी लवकर होऊ शकते आणि तेव्हा १००% यशाची अपेक्षा करू शकतो. सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी बऱ्याचश्या असतात आणि त्यांनी परिणाम पूर्णतः बदलू शकतो.

धन्यवाद,
नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.

टीप : हा या लघुमालिकेतील शेवटचा भाग. मला संपूर्ण कल्पना आहे की या विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि एवढ्या छोट्या लेखांतून सर्व गोष्टींचा अंतर्भाव झालेला नाही. हेतू तोंडओळख करून देणे इतकाच होता. आपण काही गोष्टी ऐकलेल्या असतात पण त्यामागची करणं माहिती असतातच असं नाही. ते थोड्याप्रमाणात पुरवण्याचाही प्रयत्न केला आहे. लिखाणात काही चूक झाली असल्यास क्षमस्व.

Keywords: