हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!
तर लेखमालेचा मुख्य उद्देश आहे की इतरांना अशी ट्रिप जर करायची असेल तर आम्ही ही ट्रिप कशी आखली याची माहिती आणि उपयोगी पडतील असे (माझ्या अल्पमतीनुसार) काही पॉइंटर्स देणे.
हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!
तर लेखमालेचा मुख्य उद्देश आहे की इतरांना अशी ट्रिप जर करायची असेल तर आम्ही ही ट्रिप कशी आखली याची माहिती आणि उपयोगी पडतील असे (माझ्या अल्पमतीनुसार) काही पॉइंटर्स देणे.
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अमेरिकेत तेही कॅलिफोर्नियात जाण्याचं ठरवून त्याप्रमाणे माहिती शोधाशोध सुरू झाली. मी आधीही बहिणीबरोबर कॅलिफोर्नियात जाऊन आले होते. पण त्यावेळी सगळी ट्रिप तिनंच आखली होती. (इन फॅक्ट तिच्या या घरबसल्याबसल्या नेटवरून केलेल्या ट्रिप प्लॅनिंगमुळे मी चांगलीच इम्प्रेसही झाले होते.) यावेळी सगळी आखणी आमची आम्हालाच करायची होती.
बेसिक प्लॅन असा होता: लॉस एंजेलिस, डिस्नीलँड (हे लॉस एंजेलिस पासून जवळच असलेल्या अनाहिम नावाच्या भागात आहे.), तिथूनच बस पकडून लास वेगास ( हे साधारण पाच तासाच्या अंतरावर आहे.), लास वेगासहून ग्रँड कॅनियन, मग पुन्हा लॉस एंजेलिस, पॅसिफिक कोस्टल हायवेवरची ठिकाणे बघत बघत दोन रात्री मुक्काम करून लॉस आल्टोस, योसेमिटी नॅशनल पार्क, सॅन फ्रान्सिस्को.
जाण्याआधी काही गोष्टी ठरवल्या होत्या. एक म्हणजे हाताशी वेळ भरपूर असल्याने जास्तीत जास्त रोड ट्रान्स्पोर्ट वापरायचा. तेवढंच जास्त साईटसिईंग होतं. म्हणजे विमानानं एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यापेक्षा बस वापरायची (हे मुख्यत्वे एले ते लास वेगासकरता). दुसरं म्हणजे, फ्लेक्सिबिलिटी करता म्हणून ट्रीपची सगळीच्या सगळी बुकिंग्ज आधीपासूनच करायची नाहीत. आणि तिसरं हे की, शक्यतो अपार्टमेंट अथवा घर हायर करायचं. अर्थात या करता त्या त्या ठिकाणी निदान आठवडाभर राहणं गरजेचं. यापेक्षा कमी कालावधीकरता व्हेकेशनल रेंटिंग सहसा मिळत नाही.
आधी मारे कार हायर करण्याची स्वप्नं बघत होतो. लायसन्स वगैरेचाही काही प्रॉब्लेम नव्हता कारण कॅलिफोर्नियात भारतातील इंग्लिशमधलं लायसन्स चालतं. पण मुळात दोघांनाही ड्रायव्हिंगचा कंटाळा. त्यात उजवीकडचं ड्रायव्हिंग, अशा ड्रायव्हिंगचा शून्य अनुभव, एलेचा ट्रॅफिक, अमेरिकेतील लांबच्या रोड ट्रिप्सबद्दल स्वतःवर नसलेला भरवसा असे अनेक फॅक्टर्स बघता शेवटी पब्लिक ट्रान्स्पोर्ट आणि टूर्स यांचा सहारा घेण्याचं ठरवलं.
ठरवल्याप्रमाणे सगळी ट्रिप आधी पूर्णपणे न आखता साधारण पुढचे एक दोन टप्पे आखत गेलो. त्यामुळे बरीच फ्लेक्सिबिलिटी राहिली. शिवाय काही गोष्टी शेवटपर्यंत नक्की होत नव्हत्या. त्यामुळे आधीपासून खूप काटेकोरपणे बुकिंग्ज वगैरे केली नाहीत हे बरंच झालं. अर्थात याचा थोडाफार तोटाही झाला.
आमच्या ट्रीपदरम्यान बीएमएमच्या निमित्ताने सिअॅटलला राहणारी बहिण एलेमध्ये येणार असंही कळलं. तिनेही बीएमेम नंतर आमच्यासकट एले ते सॅन फ्रान्सिस्को अशी पॅसिफिक कोस्टल हायवे ची रोडट्रिप करण्याचं ठरवलं. त्यामुळे या रोडट्रिपपुरता ड्रायव्हर मिळाल्यानं कार घेण्याचं ठरलं. पुढे तिनंही तीन आठवड्याची सुट्टी काढली आणि मग कार हायरचा कालावधी वाढला. ते पुढे येईलच.
तर येणार येणार म्हणताना अखेर तो दिवस आलाच......
भारतातून ३ जूनला निघालो. विमानाचं मुंबई-एले आणि एले-मुंबई बुकिंग http://www.goibibo.com तर्फे केलं होतं. तसंच https://www.airbnb.co.in/ या साईटवरून एलेच्या अपार्टमेंटचं बुकिंग केलं होतं. हे अपार्टमेंट बुक करताना नेटवर वाचून साधारण कोणता एरीया चांगला याची माहिती घेतली. http://www.tripadvisor.in/ या साईटवर चांगली चर्चा वाचायला मिळाली. शिवाय हाताशी कार नसल्याने सबवे स्टेशन, बस स्टॉप पासून जवळ, साधारणपणे प्रेक्षणीय स्थळांपासून जवळ हे ही घटक लक्षात घेणं गरजेचं होतं. ही प्रोसेस जरा मोठीच होती. पण हॉलिवुड बुलेवार्डला हॉलिवुड-व्हाईन स्टेशनच्या अगदी जवळ एक छान २ बेडरूमचं अपार्टमेंट मिळालं. एलेमध्ये बसस्टॉप्स स्टेशन जवळ आणि प्रत्येक मेजर रस्त्यांच्या क्रॉससेक्शनला आहेत. भर म्हणून एले विमानतळापासून निघणारी फ्लाय-अवे बस अगदी घरासमोर येऊन थांबली. हा बोनसच होता. हॉलिवुड बुलेवार्डला अगदी रात्रीही व्यवस्थित रहदारी होती, शेजारीच पँटाजेज हे थिएटर असल्याने उशीरापर्यंत वर्दळ असे. थोडक्यात, हवा होता तसा सेफ एरीया मिळाला.
एलेमध्ये साधारण आठवडाभर राहून मग डिस्नीलँडच्या रिझॉर्टमध्ये जाऊन रहायचे असा आणि इतपत प्रोग्रॅम भारतातूनच ठरवला गेला. डिस्नीलँडहून बसनं लास वेगासला जाण्याचेही ठरवले होते. अर्थात डिस्नीच्या आणि त्यापुढच्या प्रोग्रॅमच्या तारखा ठरवल्या नव्हत्या आणि त्यामुळे बुकिंगही केलं नव्हतं.
लास वेगासहून अनेक टूर्स ग्रँड कॅनियनला जातात. त्यापैकी एखादी सुटेबल टूर घेण्याचं ठरवलं होतं. या टूर्सपैकी एक दिवसाची की ओव्हरनाईट की दोन रात्रींच्या मुक्कामाची की हेलिकॉप्टर टूर असे अनेक ऑप्शन्स बघत होतो. नक्की काहीच ठरवलं नव्हतं. लास वेगासला (गेला बाजार एलेला) जाऊन ठरवू असं मनात होतं. पण इथून निघायच्या आठवडाभर आधीच एक फॅमिली फ्रेंड भेटायला आला. तो नुकताच कॅलिफोर्नियाची टूर करून आला होता. त्याने ग्रँड कॅनियन एक दिवसात न उरकण्याचा सल्ला दिला आणि शक्यतो आतमधीलच लॉजमध्ये राहण्याचाही सल्ला दिला. झालं..... मग त्या दृष्टीनं सर्च सुरू झाला.
सगळ्या टूर कंपन्या नॅशनल पार्काबाहेर दोनेक मैलांवर असलेल्या हॉटेलात उतरवतात, त्यामुळे तशी टूर घेण्याचा ऑप्शन आता बाद झाला होता आणि आता हे बुकिंग आमचं आम्हालाच करावं लागणार होतं. अर्थात टूर न घेतल्यानं लास वेगास ते ग्रँड कॅनियन हा प्रवास कसा करायचा असा एक वेगळा प्रश्न उभा रहात होता. तो तूर्तास बाजूला ठेवला आणि ग्रँड कॅनियनच्या बुकिंगवर लक्ष एकत्रित केलं.
ग्रँड कॅनियनमध्ये ५ की ६ लॉजेस आहेत. पण भर समर सिझनमध्ये आयत्यावेळी आम्हाला कोण बुकिंग देणार होतं? तरीही नशीब आजमवायचं ठरवलं. यावापाई लॉजमध्ये थोडीफार बुकिंग्ज अव्हेलेबल दिसत होती. मग एलेमधले काही दिवस + डिस्नेमध्ये ४ रात्री + लास वेगास मध्ये ३ रात्री आणि मग ग्रँड कॅनियन असा हिशोब करून इथे असतानाच १८ तारखेचं यावापाई लॉजचं बुकिंग मिळत होतं ते करून टाकलं. आता हे बुकिंग मिळाल्यावर एकच रात्रं काय रहायचं इतक्या सुंदर जागी? असा विचार मनात बळावत चालला. यावापाई मध्ये १७ किंवा १९ चं बुकिंग मिळत नव्हतं. पण पुढचं पुढे पाहू म्हणत सतत सगळ्या लॉजेसमध्ये जागा शोधत रहायचं असं ठरवलं. कदाचित कोणी आयत्यावेळी कॅन्सल केलं तर मिळेल असा आशावादी विचार मनात ठेऊन शोधाशोध सुरूच ठेवली. अगदी काही नाही तर एक रात्र राहून परत येण्याची तयारी होतीच.
बरं या सगळ्या घडामोडीत अजून एक गोष्ट पार्श्वभूमीवर होतीच... बहिणीला सुट्टी कधी मिळणार? तिचा प्रोजेक्ट संपणार असेल तर नविन प्रोजेक्ट जॉईन न करता ती गॅप घेणार आहे का? मुळात प्रोजेक्ट संपणार आहे का? प्रोजेक्ट संपला तरी बीएमेमच्या नाटकाच्या प्रॅक्टिस मुळे ती येऊ शकणार नाहीये का? बीएमेम मध्ये तिचं नाटक नक्की कोणत्या दिवशी आहे? (ते नंतर काही दिवसांनी ३ जुलैला असल्याचं कळलं). त्यामुळे ४ तारखेला पीसीएच करता कूच करायचं हे नक्की झालं. बरं ती नक्की कोणत्या आणि कोणत्या कोणत्या टप्प्यांवर आमच्याबरोबर असणार आहे हे न कळल्यामुळे पुढची अपार्टमेंट बुकिंग्ज आधी करता येईनात. ती आणि तिची फॅमिली जर येणार असतील तर मोठं घर लागणार होतं.
भारतातून निघताना ही स्थिती होती : मुंबई-एले आणि परतीची विमानतिकिटं, एलेचं अपार्टमेंट आणि ग्रँड कॅनियनचं १८ तारखेचं बुकिंग! अशा या तुटपुंज्या शिदोरीवर निघाली की मंडळी !!!!
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
आधीचा भाग - कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
आम्ही इतक्या दिवसांकरता अमेरीकेला जाणार म्हटल्यावरच बहिणींनी बोटावर बोटं ठेवायला सुरूवात केली. त्याचं कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड खरंच खराब होतं. कोणत्याही ठिकाणी १० दिवसांकरता जरी गेलो तरी ५-६ दिवसांत आम्हाला घरची आठवण येऊ लागते. कधीकधी तर ट्रिप प्रीपोन करून घरी आलोय. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतंच.
नवर्यालाही मनातून थोडी धाकधुक होती की या दोन बायका 'आत्त्ताच्या आत्ता घरी जायचंय' म्हणून टाळा तर पसरणार नाहीत ना? (अर्थात होमसिक होण्यात तो ही काही कमी नाहीये.) पण तसं काही न होता आम्ही ट्रिप पूर्ण केली. यात कदाचित तिथे घरं आणि अपार्टमेंटस घेऊन राहिलो या घटकाचा मुख्य हात असेल. शिवाय बहिण आल्यावर तिच्याबरोबर दोन फुलटाईम कॉमेडी एंटरटेनमेंट चॅनेल्सही होती हे ही एक महत्त्वाचं कारण असेल. तर या दोन कारणांमुळे आम्ही तग धरून राहिलो बुवा!
मी आधीही मोठ्या कालावधीकरता अमेरीकेत जाऊन आले आहे. पण त्या प्रत्येकवेळी बहिणीकडे ठिय्या देऊन राहिले होते. त्यामुळे त्यावेळी होमसिक होण्याचा प्रश्न नव्हता. नवरा इथे भारतातच राहिला होता त्यामुळे घराचीही काळजी नव्हती. पण यावेळी पूर्ण कुटुंब ५० दिवसांकरता देशाबाहेर जाणार होतं. त्यामुळे घराच्या फ्रंटवरही तयारी गरजेची होती.
कारची बॅटरी बंद करून ठेवण्याची गरज होती. मग एकदा मेकॅनिकला बोलावून त्याच्या समोर कारच्या बॅटरीची वायर काढण्याचा सोहळा झाला. रात्रभर तशीच ठेऊन सकाळी पुन्हा लावून पाहिली. कार व्यवस्थित सुरू झाली. चला, म्हणजे आता ही काळजी नाही.
घरात भरपूर झाडं. एरव्ही कुठेही गेलो तरी झाडूपोछा करणारी माझी बाई माझ्या मैत्रिणीकडे ठेवलेली चावी घेऊन एक दिवसाआड झाडांना पाणी घालून जाते. यावेळी नेमकी तिच्या मुलीची डिलिव्हरी होती आणि त्याकरता तिला तिच्या गावाला - कर्नाटकात - जावं लागणार होतं. माझी दिवसाभराची बाई तिच्या गावी चिपळूणला जाणार होती. त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट म्हणजे कर्नाटकवाली साधारण १२ जुलैच्या सुमारास जाणार होती, त्यामुळे तोवर ती होतीच. आणि मग १८-१९ जुलैपर्यंत चिपळूणवाली परत येणार होती आणि तिनं मग झाडांची काळजी घेतली असतीच. मधल्या काही दिवसांचा प्रश्न होता. मग त्यावर उपाय म्हणून सगळी झाडं बाल्कनीच्या बाहेरच्या कडेला आणून ठेवली. पाऊस सुरू होणार होताच त्याचा फायदा घेण्याचं ठरवलं. प्रत्यक्षात काही घोटाळे झालेच. कर्नाटकवाली मी गेल्यागेल्या लगेच एका अॅडिशनल एक आठवड्याच्या सुट्टीवर गेली. नंतर परत आली तर तिच्या लेकीची डिलिव्हरीही लवकर झाली त्यामुळे ती गावी निघून गेली. मग मैत्रिणीनं तिच्या बाईला माझ्या झाडांना पाणी घालण्याच्या कामावर लावलं. तर ती दोन बाल्कन्यांमधल्या झाडांना पाणी घालायलाच विसरून गेली. पण अधून मधून का होईना पडणार्या पावसामुळे बहुतेक सगळी झाडं जगली. जरा नुकसान झालंय पण ठीक आहे.
क्रेडिट कार्ड
इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड असल्याने फार काही कॅश बाळगण्याची गरज नव्हती. फॅमिली फ्रेंडकडून थोडे डॉलर्स विकत घेतले. बाकी मुख्यतः कार्डच वापरलं. मधून मधून थोडीफार कॅश ATM मधून काढावी लागली.
फोन कार्ड
आम्ही मॅट्रिक्स चे पोस्टपेड फोनकार्ड घेतले. त्यांचा एजंट अगदी घरी येऊन फॉर्मवर सही घेऊन कार्ड देऊन जातो. आम्ही ३० दिवसांचा अनलिमिटेड डेटा प्लान घेतला. पुढच्या एक्स्ट्रा दिवसांकरता प्रपोर्शनेट चार्ज लावून एकूण ५० दिवसांसाठी एजंट बरोबर वाटाघाटी करून केवळ रु. १३,०००/- त मॅट्रिक्स कार्ड मिळालं. पण पुढे या कार्डनं आम्हाला चांगलाच धक्का दिला.
त्याचं झालं असं की एजंटनं ही वाटाघाटीची बातमी कंपनीला कळवलीच नाही (म्हणे). त्यामुळे कंपनीनं ३० दिवसांकरता हा प्लॅन होता असं गृहित धरून पुढे डेटा युसेजप्रमाणे पैसे लावायला सुरूवात केली. बरं त्याबद्दल लगेच आम्हाला काही कळवलंही नाही. अचानक १० जुलैला बँकेचा मेसेज आला की मॅट्रिक्स कंपनीनं रु. १, ३०,००० क्लेम केले आहेत. बापरे! शिवाय अशी गलेलठ्ठ रक्कम क्रेडिट कार्डावर क्लेम झाल्यानं कार्डाची लिमिट ओलांडली गेली आणि रेस्टॉरंट आणि दुकानात कार्ड डिक्लाईन होऊ लागलं. आणि मग फोनही बंद झाला. बहिणीच्या फोनवरून फोन केला तर आधी पैसे भरा आणि मग फोन सुरू होईल अशी भाषा! आम्ही असे तिहेरी खोड्यात अडकलोच.
नशिबानं आमच्यात आणि एजंटात जो व्यवहार झाला तो सगळा माझ्या नवर्यानं इमेल करून त्या एजंटला पाठवून त्यावर त्याचा होकार घेतला होता. पण एजंटला फोन केला तर तो फोन उचलेना. इमेल पाठवली, मेसेज पाठवले पण एजंट काही उत्तर देईना. कंपनीत फोन केला तर शुक्रवार म्हणून की काय कंपनीतही कोणी फोन उचलेना. या सगळ्यात पदरचे आणखी पैसे खर्च झाले ते वेगळेच. दोन दिवस वाईट्ट काढले. मग एजंट साहेब जागे झाले, त्यांना चांगलं खडसावलं. कंपनीतून फोन आला तो नविन फोन नंबर देण्यासाठी. आम्ही सगळे जास्तीचे पैसे भरायला तयार आहोत आणि त्यामुळे ते आता आम्हाला नवा नंबर देत आहेत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही चाटच पडलो. मग त्या कंपनीला एजंट आणि आमच्यातल्या व्यवहाराची इमेल पाठवली आणि हे असले उद्योग करता हे सगळीकडे पसरवू असं स्पष्ट सांगितलं. चुपचाप फोन पुन्हा सुरू झाला. क्लेम केलेली रक्कम अजूनतरी आमच्या खात्यातच राहिली आहे. पण प्रकरण पूर्णपणे निस्तरलं नाहीये. तो एजंट भेटायला येईल तेव्हा काय ते कळेल किंवा अजून एखाद महिना जर क्लेम आला नाही तर प्रकरण संपलं असं म्हणता येईल. या सगळ्यात एक भयानक अनुभव गाठिशी जमा झाला.
नेटवर शोधल्यावरही अनेक जणांच्या मॅट्रिक्सबद्दल अशा आणि इतरही बर्याच तक्रारी वाचनात आल्या. त्यामुळे मॅट्रिक्स कार्ड वापरताना कृपया काळजी घ्या. एजंटला इमेल करून त्याची सगळ्या व्यवहाराकरता कबुली घ्या आणि मगच पुढे जा. विमानतळांवरही मॅट्रिक्स कार्डस मिळतात पण त्यावेळी वेळ थोडा असल्याने वाटाघाटी आणि इमेलाइमेली करण्यास वेळ नसेल तेव्हा हे सगळं आधीच घरून व्यवस्थित करून घ्या. मॅट्रिक्सला काही पर्याय असेल तर तोही असाच काळजीपूर्वक वापरा. बाकी मॅट्रिक्स कार्डाबद्दल काहीही तक्रार नाही. उत्तम चाललं आणि खूप उपयोगी पडलं.
व्हेकेशनल रेंटिंग करताना
आम्ही मुखत्वे https://www.airbnb.com/ आणि https://www.flipkey.com/ या साईट्स वापरल्या. यात अकाउंट उघडून आपल्याला आवडलेल्या जागा फेवरिट लिस्टमध्ये टाकून ठेवता येतात. मग त्यातून जी हवी ती निवडावी. फ्लिपकी ही ट्रिपअॅडवायझरचीच साईट आहे. दोन्ही साईटस वापरायला अतिशय सोप्या आणि उपयोगी फीचर्स असलेल्या आहेत.
घर घेताना कोणत्या एरीयात आहे हे काळजीपूर्वक पहावे लागते. कार असेल तर पार्किंग आहे ना? कार नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टची अव्हेलेबिलिटी वगैरे बघावे. घरी जेवण किंवा निदान ब्रेकफास्ट करणार असू तर जवळ ग्रोसरी शॉप आहे ना? रेंट केलेल्या घरात किचन मध्ये पुरेशी उपकरणं आहेत ना? (उदा. गॅस, फ्रीज, आवन, टोस्टर, मिक्सर, कटलरी, कप्स, पॉट्स आणि पॅन्स वगैरे) याची खात्री करून घेतली. ७-८ दिवस रहात असल्याने भांड्यांकरता डिश वॉशर आणि कपड्यांकरता वॉशर ड्रायरही गरजेचा ठरतो. घराचे तपशील व्यवस्थित वाचून, वाटल्यास घर मालक /मालकिणीशी त्या साईटवरील मेसेजतर्फे बोलून आपल्या शंका दूर कराव्यात.
आम्ही घर घेतल्यानं नवर्याची शाकाहाराचीही चांगली सोय झाली. सकाळी ब्रेफा घरीच केले. लंच, डिनर मी आणि लेक बाहेरच घेत होतो. पण नवरा आवर्जून डिनर घरीच घेत होता. इंडियन ग्रोसरी मधून बर्याच भाज्या आणि लाटलेल्या चपात्या आणून ठेवल्या होत्या. दीपचे सुप्रसिद्ध सामोसे भरपूर खाल्ले. आधी बस्केच्या घरी आणि मग घरी आणून, बेक करून. ते खरंच छान आहेत. सायोनं सांगितल्याप्रमाणे भारतातून अमेरिकेत जाणार्या प्रत्येकानं दीपचे सामोसे खावेत असा लाडिक आग्रह मी करत आहे.
आमचं खूप बुकिंग बाकी असल्याने आणि एकूणच बरेच दिवस बाहेर असणार होतो म्हणून लॅपटॉप अत्यंत गरजेचा होता. त्याकरता आणि लेकीच्या आयपॅडकरता वायफायही लागणारच होतं. त्यामुळे अपार्टमेंट / घर / हॉटेल बुक करताना ही एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली. अर्थात अमेरिकेत बहुतेक सगळीकडे वायफाय असतंच. फक्त ग्रँड कॅनियनमध्ये रुममध्ये मिळालं नाही. आमच्या इंच इंच पुढे बुक करू या धोरणानुसार रोज थोडा वेळ पुढच्या बुकिंगकरता देणे आवश्यक होतं. कारण पुढचे घर / हॉटेल / प्रेक्षणीय स्थळे याचं बुकिंग सतत सुरूच राहिलं. पुढे जेव्हा केव्हा शेवटचं बुकिंग केलं तेव्हा हुश्श्य झालं! :)
नेटवरची पूर्वतयारी
प्रवासाची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक ठिकाणची जास्तीत जास्त माहिती वाचली. या माहितीत एलेवर एका स्त्रीनं लिहिलेलं लिखाण खूप आवडलं. अतिशय डिटेल्समध्ये आणि शहराला भेट देणार्या टुरिस्टना काय काय नेमकं लागेल ते ओळखून केलेलं लिखाण आहे.
प्रत्येक ठिकाणच्या नेहमीच्या टुरीस्ट स्पॉट्स व्यतिरीक्त काही हटके ठिकाणं आहेत काय? काही वेगळा अनुभव देणार्या गोष्टी करता येतील काय. एलेमध्ये एखादा ऑपरा बघायला मिळेल काय? असंही काही वाचून काढलं.
युनिव्हर्सल स्टुडियो, डिस्नीलँड अशा हमखास यशस्वी जागांकरता कोणते दिवस योग्य, त्यांच्या दरात काही डिस्काउंटस आहेत का? फास्ट पासची सोय, कोणती आयटनरी योग्य असे अनेक छोटे छोटे डिटेल्स वाचून काढले. काही नोंदी केल्या. प्रत्येक शहराकरता ठिकाणांची लिस्ट केली.
याव्यतिरिक्त लेकीची एक लिस्ट होती. क्राफ्टची दुकानं म्हणजे मायकेल्स, जोअॅन, हॉबीलॉबी वगैरेना जास्तीत जास्त भेट देणे आणि खरेदी करणे. सध्या ती पॉलिमर क्लेच्या प्रचंड प्रेमात आहे. त्यामुळे त्याकरता लागणार्या अनेकानेक गोष्टींची ही भली मोठी यादी तयार होती. ती दुकानं कुठे कुठे आहेत हे साधारण शोधून ठेवलं. अमेरिकेत घेतलेल्या पॉलिमर क्लेमधून अनेक सुरेख सुरेख वस्तूही तिने बनवल्या. दर ठिकाणचा मुक्काम उठवताना तिच्या त्या मुक्कामात बनवलेल्या वस्तू बेक करणे हे एक रुटीन कामच बनून गेलं. शिवाय पुस्तकांची दुकानं, ट्रिंकेट्स वगैरेंची दुकानं होतीच तिच्या यादीत.
लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथिल पब्लिक ट्रान्सपोर्ट्बद्दल चिक्कार म्हणजे चिक्कार वाचलं. अगदी मेट्रोचा पास कसा काढायचा याचे व्हिडिओज पण पाहिले. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावरच ग्राउंड लेवलची परिस्थिती लक्षात आली. महाकिचकट पब्लिक ट्रान्स्पोर्ट व्यवस्था. अनेक वेगवेगळ्या नावानं चालणार्या बसेस. काढलेला पास बर्याच रुटवर चालतो पण तरीही डाऊनटाऊन एलेमध्ये आणखी काही वेगळ्याच बसेस आहेत त्यावर चालत नाही. असं बरच काही काही. सॅन फ्रान्सिस्कोच्या पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल तर काय बोलावे! ते एक वेगळंच आणि जिवंत व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्त्वानं आम्हाला भंडावून सोडलं हे ही खरं. त्याबद्दल नंतर बोलूयात. या सगळ्यात मात्र माझ्या मुंबईतल्या बेस्ट बसेसबद्दल कौतुक मनात दाटून येत होतं प्रत्येकवेळी. (आला, आला मुद्दा आला!)
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
३ जून. लॉस एंजेलिसच्या LAX एअरपोर्टवर सामानसुमानासकट बाहेर आलो. टर्मिनलच्या बाहेरच फ्लाय-अवे बस मिळते असं गृहपाठात कळलंच होतं. सगळ्या शटल बसेस (म्हणजे कार रेंट केली असेल तर त्या त्या रेंटल कंपनीच्या कारतळावर घेऊन जाणार्या, वेगवेगळ्या हॉटेलच्या, विमानतळाहूनच डिस्नीला जाणार्या लोकांसाठी डिस्नीलँड रिझॉर्टसच्या वगैरे वगैरे) थांबण्यासाठी प्रत्येक टर्मिनलबाहेर एक जागा ठरवून दिलेली. तिथं थांबायचं, आपली शटल आली की त्यात बसायचं. आम्ही फ्लाय-अवेची वाट बघत थांबलो. त्यावेळी लक्षात आलं की सगळ्यात जास्त बसेस आहेत त्या - सेपुलवेडा नावाच्या ठिकाणी जाणार्या! त्यात बसणार्या मंडळींकडे उगाचच जरा संशयानी बघितलं. डोळा मारा फिदीफिदी
आमची फ्लाय-अवेही लगेच आलीच. आमच्या नशिबानं ती आमच्या बिल्डिंगसमोरच उभी राहणार होती. संध्याकाळच्या एलेच्या ट्राफिकमध्येही तिनं आम्हाला पाऊणतासात हॉलिवुड बुलेवार्डच्या आमच्या नव्या घरी आणून सोडलं. घरमालकाच्या वतीनं एक स्त्री हजर होतीच आमची वाट पहात. घराची ओळख, अपार्टमेंटमधल्या सोई, कचर्याची विल्हेवाट लावण्याची वहिवाट, अपार्टमेंट कॉम्लेक्स मधल्या सोई आणि बाहेर पडायचे रस्ते वगैरे तिनं दाखवले आणि ती गेली.
हे बाहेर पडायचे रस्ते लवकरच उपयोगी पडले. आल्याच्या साधारण तिसर्या दिवशीची गोष्ट. जेट लॅग पूर्ण उतरला नव्हता त्यामुळे दुपारी सगळेजण अंथरुणात लोळत, पेंगत होतो. आणि अचानक बिल्डिंगचा फायर अलार्म वाजायला लागला. घोषणा ऐकू यायला लागली की "बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागली आहे. बाहेर पडा आणि लिफ्ट न घेता जिन्यानं खाली उतरून जा." झोपाळलेल्या डोक्यात ही सुचना जाईपर्यंत आणि त्यानंतर जरा बरे कपडे पटापट चढवून, पासपोर्टस, पर्सेस, मोबाईल्स, लॅपटॉप वगैरे गोळा करून घराबाहेर पडायला फारतर दीड मिनिट लागलं असेल पण मनावर प्रचंड दडपण यायला लागलेलं. बाहेर पडलो तर कुठे काही धूर दिसत नव्हता किंवा वासही येत नव्हता. बहुधा चुकून झालेला अलार्म असणार असा संशय आलाच. पण तरीही टेन्शन होतं. लांबलचक कॉरीडॉरच्या एका टोकाला गेलो तर ते दार उघडेना. धावत पुन्हा दुसर्या टोकाला गेलो, तिथेही दार उघडेना. मग रितसर भिती वाटली. पुन्हा एकदा ट्राय केला अन उघडलं एकदाचं दार. खाली आलो आणि बिल्डिंगमधल्या इतर मंडळींबरोबर बसलो. फायरब्रिगेडच्या गाड्या आल्या, सेक्युरिटीबरोबर काहीतरी गुफ्तगु केलं आणि फॉल्स अलार्म आहे हे डिक्लेअर झाल्यानं आम्ही सगळे पुन्हा आपापल्या घरी गेलो. अवघं १५-२० मिनिटांचं नाट्य! पण त्यानंतर फायरब्रिगेडचा सायरन वाजला की जीव धसकायचा!
घर हॉलिवुड बुलेवार्डवरच असल्याने घरातून बाहेर पडून उजवीकडे सरळ चालायला लागलं की पायाखाली दिसायचा सुप्रसिद्ध Walk of Fame. याच रस्त्यावर अनेक फेमस थिएटर्स, ऑस्कर सोहळा जिथे भरवला जातो ते कोडॅक (आताचं डॉल्बी) थिएटर, त्याबाहेर हॉलिवुडी सिनेमातील कॅरॅक्टर्सचे पोशाख करून उभे राहिलेले लोकं, मधल्या बिल्डिंगच्या मागे दिसणारं Hollywood Sign असं सगळं सामावलेलं. सर्व प्रकारची रेस्टॉरंट्सही चिक्कार होती. एक ट्रेडर जोजही अगदी जवळ होतं. घरा समोरच सबवेचं स्टेशन होतं. मोक्याची जागा होती खरी.
गृहपाठात घोकल्याप्रमाणे, नेटवर व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे स्टेशनवर जाऊन माणशी एक अशी ३ TAP cards काढली आणि त्यांत ७ दिवसांचा मेट्रो पास भरून टाकला. आता आम्ही सगळ्या मेट्रो ट्रेन्स आणि बसनं ७ दिवस अमर्याद फिरायला मोकळे होतो. शिवाय ११ नंबरची बस तर होतीच बरोबर! मात्र, एले जर केवळ ३-४ दिवसांत बघायचं असेल तर सरळ हॉपऑन हॉपऑफ बस करणं योग्य.
३ जून ते १० जून आम्ही या पहिल्या अपार्टमेंटमध्ये होतो. या मुक्कामात युनिव्हर्सल स्टुडिओ, सांता मोनिका बीच, डाऊनटाऊनचा फॅशन डिस्ट्रिक्ट, द ग्रोव आणि इतर काही मॉल्स, मायकेल्सच्या दुकानात घालवलेले ३ तास आणि त्यातील वस्तूंना दिलेला उदार आश्रय, दिसामाजी एकदा तरी ट्रेडर जोजला भेट देणे आणि हॉलिवूड बुलेवार्डवर फिरायला जाणे अशा टवाळक्या केल्या. ११ जूनला या घराला टाटा करून डिस्नी रिझॉर्ट मध्ये मुक्काम हलवायचा. मग तसंच पुढे लास वेगास, ग्रँड कॅनियन करून १० दिवसांनी पुन्हा एलेला यायचं होतं. बरोबर एक मोठ्ठी सूटकेस, दोन कॅबिन बॅग्ज आणि दोन बॅकपॅक्स होत्या. मध्येच आणखी एक छोटी स्ट्रोलर बॅग या ताफ्यात सामिल झाली. हे इतकं सामान सगळीकडे नाचवण्यापेक्षा बस्केकडे ठेवण्याचं ठरवलं. आधी एक मोठी बॅगच फक्त ठेवणार होतो. पण बस्केनं एक बोट पुढे केलंय असं बघून आख्खा हात खेचला आणि तिन्ही मोठ्या बॅगा तिच्या सुपुर्द केल्या. त्यानिमित्तानं तिच्या घरी जाऊन साचीखि, दीपचे सामोसे, लाडू आणि कॉफीही रिचवून आलो. बस्के आणि तिच्या आईबाबांशी मस्त गप्पा झाल्या. आता केवळ बॅकपॅकिंग!!!
एलेमध्ये अवतीर्ण झाल्यावर काही दिवस जाऊ दिले आणि मग जेटलॅगबिग गेल्याची खात्री पटल्यावर युनिव्हर्सल स्टुडियोचा घाट घातला. नेटवर वाचल्यावर इथे सोमवारी किंवा मंगळवारी जाणं उत्तम असं कळलं. मग सोमवारी संध्याकाळी दुसर्या दिवशीची तिकिटं बुक केली. नेटवरच वाचल्याप्रमाणे सक्काळी गेट्स उघडण्याआधी जाऊन उभे होतो. त्यामुळे निदान सकाळच्या अर्धा दिवसांत तरी गर्दी बर्यापैकी कमी होती. सगळ्या राईडस करता आल्या. काही काही तर दोनदाही केल्या. धम्माल आली.
या मुक्कामात पुढची काही बुकिंग्ज केली. सगळ्यात पहिले डिस्नीलँड! खरंतर डिस्नीला जायचं तर शनिवार-रविवार टाळून जायला हवं. पण आमचा पुढचा प्रोग्रॅम '१८ तारखेला यावापाई लॉज' या क्लॉजमुळे मर्यादित होता. त्यामुळे शेवटी ११ ते १४ जून ( गुरुवार ते रविवार) असा नेमका डिस्नीचा प्रोग्रॅम ठेवावा लागला. एलेच्या डिस्नीलँडमध्ये असलेल्या तीन हॉटेल्सपैकी जे मोक्याचं आणि सुंदर हॉटेल आहे त्यात खोल्या रिकाम्या नव्हत्या. पण पॅराडाईज पिअर हॉटेलात मिळाली एक रूम. रुममधल्या खिडकीतून कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्कचा मस्त देखावा! हॉटेलपासून चालत ७व्या मिनिटाला डिस्नीलँड अथवा कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्कला जाता येत होतं. आम्ही दोन्हीही पार्कची तिकिटंही ऑनलाईन काढून टाकली.
अन एका शुभसकाळी 'अहो आश्चर्यम' घडलं. ग्रँड कॅनियनमधल्या अजून एका लिंबूटिंबू लॉजचं (Maswik Lodge) १९ तारखेचं बुकिंग मिळालं. अहाहा!!!!! मग डिस्नीलँड असलेलं अनाहिम गाव ते लास वेगास अशी जाणारी बस शोधली आणि Lux Bus America चं जाण्यायेण्याचं बुकिंग केलं. ही बस लास वेगास मध्ये Harrah's नावाच्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये आपल्याला घेऊन जाते आणि परत येतानाही तिथूनच उचलते. हे बुकिंग झाल्यानंतर मग हातासरशी लास वेगासच्या हॉटेलचंही बुकिंग करून टाकलं. लास वेगासला बक्कळं होटेलं त्यामुळे तिथल्या बुकिंगची काळजी नव्हती. Harrah's हॉटेलपासून जवळच असलेलं, स्ट्रीपच्या मध्यवर्ती विसावलेलं, माझ्या आवडत्या Ocean's Eleven सिनेमाच्या कथेत आलेल्या आणि नाचत्या कारंज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेलाजिओमधे एक रूम ३ रात्रींकरता बुक केली. ग्रँड कॅनियनमधून परत आल्यावर एक रात्र पुन्हा लास वेगासला मुक्काम करणार होतो. त्याकरता मग सोईचं पडावं Harrah's मध्येच रूम बुक केली.
शिवाय, दुसर्या टप्प्याकरता एलेची काही मोठी घरं हेरून फेवरीट लिस्टमध्ये टाकून ठेवली होती. आधीच्याच एरियातली घरं होती ती. पहिल्या मुक्कामाच्या शेवटी शेवटी जेव्हा बहिण २९ जूनला एलेत येऊन आम्हाला जॉईन होणार हे ठरलं तेव्हा घर बुक करायला घेतलं. एव्हाना, काही घरं ऑलरेडी बुक झाली होती म्हणून आमच्याकरता उपलब्ध नव्हती. एका घरमालकिणीनं तिच्या ३ मांजरांची काळजी घेण्याचं आव्हान केलं म्हणून आम्ही ते गाळलं. एक खूपच महाग वाटलं त्यावर काट मारली. करता करता एक सुरेख, ४ बेडरूमचं घर आमच्याकरता उरलं. ते बुक केलं. आता घोळ असा होता की मधल्या काळात हे घर आम्हाला हवं त्या सर्व तारखांसाठी उपलब्ध नव्हतं. आम्ही २१ जूनला एलेला परत येणार होतो आणि हे घर आम्हाला २५ तारखेपासून मिळणार होतं. मग २१ ते २४ डाऊनटाऊनमधिल कोणत्यातरी हॉटेलात राहून तिथला भाग बघून टाकायचा असं ठरवलं. लक्सबस अमेरिका थोडे जास्त पैसे भरल्यास डाऊनटाऊनपर्यंत सोडणार होती. डाऊनटाऊनच्या हॉटेलातलं बुकिंग अजून केलं नव्हतं.
एलेमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टनं बरंच फिरलो. हाताशी सतत फोनवरचा नकाशा, जीपीएस गरजेचा. एक अॅपही आहे तिथल्या पब्लिक ट्रान्स्पोर्टचं. ते ही डाऊनलोड करून घेतलं होतं. थोडं फार चुकत माकत का होईना, हिंडलो. कुठेही गेलं तरी भारतीय पब्लिक दिसलं की मराठी ऐकू यायचंच. आपण मराठी लोकं भारीच भटके!
एले खादाडी : ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, प्लम्स, अॅप्रिकॉट्स, ब्लॅकबेरीज ढीगानं खाल्ली. एकदम फ्रेश आणि चविष्ट. केळ्यांना मात्र काही चव नाही हां. चविष्ट केळी लास वेगासला मिळाली. आमच्या घराच्या आजूबाजूला सर्व प्रकारची चिक्कार रेस्टॉरंटस होती. लेकीनं फक्त सुशी खाण्याचं व्रत घेतलं होतं. मी फक्त सीफूड, चिकन खात होते. नवरा जितकं शक्य होईल तितकं इंडियन खात होता. तिघांच्या तीन तर्हा! पण जमवलं कसंतरी. स्मित
डिन्सीलँडकरता एले सोडलं तेव्हा लास वेगास, ग्रँड कॅनियन आणि पुन्हा लास वेगासची बुकिंग्ज झाली होती. एलेमध्ये परत आल्यावर मधले ४ दिवस सोडले तर एलेच्या पुढच्या टप्प्यातलं घर बुक झालं होतं.
बाकी राहिलेलं ठळक बुकिंग : पीसीएच वरच्या दोन ठिकाणची हॉटेल्स, पालो आल्टो जवळपास घर, योसेमिटी नॅशनल पार्कातलं बुकिंग, सॅन फ्रान्सिस्कोचं बुकिंग. कार रेंटिंगही बाकी होतं. ते बहिणीच्या गळ्यात मारलं. हो, जी गाडी चालवणार तिनंच वाहन निवडावं नाही का?
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
११ तारखेला सकाळी मेट्रोनं डाऊनटाऊनमधल्या 7th Street / Metro Centre Station ला उतरलो आणि स्टेशनबाहेरूनच अनाहिमला जाणारी बस पकडली. या बसनं आम्हाला प्रचंड फिरवलं फिरवलं आणि एकदाचं डिस्नीच्या हॉटेलात आणून सोडलं. अर्धादिवस गेला होता. पण उरलेला दिवस घालवला आम्ही डिस्नीलँड पार्कात.
डिस्नीलँड मध्ये जास्तीतजास्त राईडस कमीतकमी वेळात करण्याचे काही फंडे आहेत. नेटवर सगळे आणि त्याहूनही अधिक कितीतरी टिप्स, चीट्स वगैरे उपलब्ध आहेत. उदा. पार्क हॉपर टिकेट्स, मॅजिक आवर, फास्ट-पास सिस्टिम, पेरेंट स्वॉप सिस्टिम, वर्षातील कोणकोणत्या दिवशी कमी गर्दी, आठवड्याच्या कोणकोणत्या दिवशी कमी गर्दी, कोणत्या क्रमानं राईडस कराव्यात असं बरंच काय काय आहे. अगदी अॅप्सही निघालीयेत. वाचून गेलं की सोईचं पडतं. राईडस व्यतिरीक्त इतर अनेक शोज असतात. त्यांच्या वेळा ठिकठिकाणी लावलेल्याही असतात. या शोजचे पासेस आधीच घेऊन ठेवावे लागतात तरच आत प्रवेश मिळतो.
डिस्नीच्या पार्कांत चालायला मात्र चिक्कार लागतं. एक दोन दिवसांत पार्कस करायचे तर भारी धावपळ होते. पण एकंदरीत वातावरणात इतका उत्साह दाटलेला असतो की आपणही त्या उत्साहात मस्त सामिल होऊन जातो. या पार्कांचे वार्षिक पासेसही असतात ते तसे घेऊन सुट्टीच्या दिवशी बच्चेकंपनीला घेऊन येणारे कितीतरी जणं. पण केवळ लहान मुलंच नव्हे अगदी म्हातारेकोतारेही किती उत्साहानं पार्कात बागडत असतात ते पाहून आनंद वाटतो. आमच्याकडे चार दिवस होते त्यामुळे वेळ भरपूर होता.
डिस्नीमध्ये पहिल्याच दिवशी संध्याकाळी एका पिझ्झेरियात पिझ्झा खाल्ला आणि मग बिल भरताना क्रेडिट कार्ड चुकून विसरलो. लक्षात आलं त्यावेळी आम्ही पार्काच्या दुसर्या टोकाला होतो. मग त्या रेस्टॉरंटाला फोन करून सांगून ठेवलं आणि रात्री परत जाताना कार्ड ताब्यात घेण्याचं ठरवलं. तसं ते घेतलंही. पण या घटनेमुळे पुढे एक महान रहस्य निर्माण झालं ते आत्ता परवा उलगडलं.....
झालं काय की, डिस्नीचा मुक्काम सोडल्यावर एकदा क्रेडिट कार्डावर केलेल्या खर्चाचे बँकेकडून आलेले स्टेटमेंट बघत असताना ११ जूनला कोणत्यातरी रायगडमधल्या एका हॉटेलात रु. ३,५००/- खर्च केल्याचे दिसत होते. आम्ही थक्क! हे कुठून आलं? हे कसं शक्य आहे? बरं त्या रेस्टॉरंटचं बिल वेगळं दिसत होतं. कार्ड त्या रेस्टॉरंटमध्ये ३-४ तास राहिलं असेल पण ते तर कोणा जबाबदार व्यक्तीच्या ताब्यात असणार. समजा कोणी ते मुद्दाम वापरलं तरी रायगडमधल्या हॉटेलाकरता?????? चिडचिड होण्यापेक्षाही आम्ही प्रचंड अचंबित झालो होतो. पिझेरियाचा मालक भारतीय आहे की काय? त्याची एक शाखा डायरेक महाराष्ट्रात आहे की काय? अश्या कायच्याकाय शक्यता डोक्यात! रक्कम जास्त नव्हती पण हे रहस्य काय आहे याचीच उत्सुकता होती. ट्रिपमध्ये असताना या रहस्याचा पाठपुरावा केला नाही पण भारतात परत आल्यावर बँकेकडे तक्रार केली. त्यांनाही काही डिटेल्स देता येईनात. मग ते हॉटेल नेटवर शोधलं आणि फोटो बघून आठवलं की आपण मागे कधीतरी या हॉटेलात गेलो आहोत. पण माझ्या दादरच्या बहिणीला विचारलं तेव्हा खुलासा झाला की मागच्यावर्षी बरोबर ११ जूनला आम्ही सगळेच माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्या भागात फिरायला गेलो होतो आणि त्या रेस्टॉरंटमधे जेवलो होतो. ते बिल एक वर्षानंतर कसं काय क्लेम केलं गेलं देव जाणे!
१५ तारखेला सकाळी ८ वाजता लक्सबस अमेरिकानं आम्हाला आमच्या हॉटेलखालूनच पिक-अप केलं. आणि ५-६ तासात आम्ही लास वेगासला पोहोचलो. मधल्या रस्त्यात जे वाळवंट लागतं ते ही बघण्यासारखं. याच रस्त्यावर अमेरिकेतला सगळ्यात मोठा सोलार पॉवर प्रोजेक्टही आहे.
एले मध्ये आम्हाला चांगलं हवामान मिळालं होतं. एलेचा उन्हाळा फार काही जाणवला नाही कारण हवा ढगाळच होती. संध्याकाळी थंडही होत होतं. मात्र लास वेगास ला भट्टी धडाडून पेटलेली. चपात्या लाटून रस्त्यावर ठेवल्या तर २ मिनिटांत भाजून निघतील अशी महाभयानक गरमी. गरम वारा अगदी पार रात्रीपर्यंत तसाच गरम असायचा. सकाळी ५ -५.३० वाजता कडकडीत उन्हं. आणि ही म्हणे केवळ सुरूवात होती. बापरे! कसे काय राहत असतील लोकं? लास वेगासची सुप्रसिद्ध हॉटेल्स आतून पाहिली. कसिनो मध्ये जाऊन खेळण्याची हौस काय, इच्छाही आम्हा दोघांकडे नाहीये. त्यामुळे ती एक मुख्य अॅक्टिविटी ऑप्शनला. खरंतर मायबोलीकर चिन्नूनं खास फोन करून खूप काही काही टीप्स दिल्या होत्या. पण त्या काही वापरल्या गेल्याच नाहीत. तरीही थँक्यू गं चिन्नू. :) इथेही एलेच्या वेगास बफेसारखा एक बफे सापडला - तोडाई बफे. झक्कास!
लास वेगासला आल्यावर ग्रँड कॅनियनला जाणार्या टूर्सची चौकशी सुरू केली. ठिकठिकाणी त्यांचे बुथ्स असतातच. सर्वजण हेच सांगत होते की आम्ही एक दिवस जाणार आणि दोन रात्री राहून येणार असलो तरी दोन्ही वेळी पूर्ण दिवसाच्या टूरचे पैसे भरावे लागतील. कारण अर्थात आमच्या तीन सीटस त्यांना तशाच राखीव ठेवाव्या लागतील. पण आम्ही चौकशी सुरू ठेवली. आणि मग एक टूर कंपनी सापडली - स्वीटटूर्स नावाची. जाताना आणि येताना फक्त त्या त्या एका वेळचे पैसे द्यावे लागणार होते. एकदम परफेक्ट! शिवाय जाताना हूवर डॅमदेखिल बघायला घेऊन जाणार होते. चला जशी हवी तशी टूर मिळाली. आणि खरचं अतिशय छान व्यवस्था होती स्वीटटूर्सची. सर्व पॅसेंजर्सना त्यांच्या त्यांच्या हॉटेलातून पिक-अप करून एके ठिकाणी गोळा करून मग टूर्सप्रमाणे वेगवेगळ्या बसेसमध्ये बसवून नेतात. दोन्ही वेळेस आमचे बसचालक कम गाईड अतिशय छान होते. भरभरून माहिती सांगत होते. बसमध्ये सकाळचा नाश्ता बॉक्सेस मधून दिला. पूर्णवेळ ज्यूस, कोल्डिंक्स, थंड पाणी होतं. जाताना मध्ये दोन स्टॉप्स, येताना एक स्टॉप. एकदम शिस्तशीर काम! खूश झालो. तुम्हाला सगळ्यांनाच मी ही टूरकंपनी रेकमेंड करेन.
कोणत्याही हॉटेलरूममध्ये असतो तसा बेलाजिओच्या हॉटेलात फ्रिज होता. रूममध्ये गेल्या गेल्या जवळच्या काही खाद्यवस्तू ठेवाव्यात म्हणून मी फ्रिज उघडला तर तो खचाखच भरलेला. दारवा, स्नॅक्स, चॉकलेटं वगैरे इतरही हॉटेलांतून ठेवलेली असतात. या वस्तू सहसा कॉम्प्लिमेंटरी नसतात (जे काही कॉम्प्लिमेंटरी असतं त्यावर तसा टॅग लावलेला असतो.) म्हणजे आपण जर त्यातील काही वस्तू वापरली तर त्याचे पैसे भरावे लागतात. पण मी आधी कधीही फ्रीज असा भरगच्च भरलेला पाहिला नव्हता. ' काय की बाई, असेल इथली पद्धत. आता जागा करायला हवी' असा विचार करत आतील सामानाची हलवाहलव करणार इतक्यात नवरा मागून ओरडला ' खामोश! अज्जिबात सामान हलवू नकोस.' तो फ्रीज नव्हताच मुळी. ते एक कपाट होतं - छोट्या फ्रीजसारखं दिसणारं. आणि ती सिस्टिम अशी की आतली एखादी वस्तू तुम्ही नुसती जागेवरून उचलली तरी त्याखाली असलेल्या सेन्सॉरवरून ती हॉटेलच्या सिस्टिमला कळणार आणि त्या वस्तूचे पैसे तुमच्या रुमवर लागणार. मग तुम्ही ती वस्तू वापरा किंवा पुन्हा परत तिच्याजागी ठेऊन द्या. काय त्रास! मी फोटूच काढून घेतलाय त्या फ्रीजचा. तो नंतर टाकते.
पण मंडळी, सावध रहा.
ग्रँड कॅनियन! हा एक महान अनुभव आहे. आम्ही आधी हे प्रकरण एका दिवसात उरकू पहात होतो ते नंतर इथे दोन रात्री राहण्यापर्यंत प्रगति झाली. आणि योग्य निर्णय घेतला गेला याचा आनंद झाला.
सर्वसामान्य पर्यट्कांसाठी ग्रँड कॅनियनच्या दोन भागांत भेट देण्याची सोय आहे - साउथ रिम आणि वेस्ट रिम. तसं नॉर्थ रिमही आहे पण ती सिरीयस हायकर्स, शांतपणे फोटोग्राफी वगैरे करणार्या लोकांसाठी. पैकी वेस्ट रिम ही रुढार्थानं ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कचा भाग नाही. पण तिथे रहात असलेल्या नेटिव्ह अमेरिकन हावासुपाई जमातीच्या मालकीच्या जागेवर आहे. इथून जो ग्रँड कॅनियन दिसतो तो साऊथ रिमवरून दिसणार्या ग्रँड कॅनियनच्या तुलनेत काहीसा उणाच आहे खरंतर. पण इथेच तो सुप्रसिद्ध काचेचा वॉकवे बांधलाय जेणेकरून इथे टुरिस्ट येत राहतील आणि त्या जमातीला अर्थार्जन होत राहिल. शिवाय वेस्ट रिम ही लास वेगासहून अगदी जवळ पडते. त्यामुळे एका दिवसात ट्रिप करण्यासाठी ही योग्य ठरते. साऊथरिमची एका दिवसाची ट्रिप बरीच दगदगीची होऊ शकते. बर्याचश्या हेलिकॉप्टर टूर्स वेस्ट रिमलाच घेऊन जातात.
पण साऊथ रिमवरून खर्या अर्थानं ग्रँड कॅनियन भेटतो. (मी नॉर्थ आणि इस्ट रिम इथे धरल्या नाहीयेत. पहिल्यांदा ग्रँड कॅनियनला भेट देणारे साऊथ किंवा वेस्ट रिमवालेच असतात.) अनेक पॉइंटस आहेत आणि प्रत्येकावरून कॅनियनचं वेगळं स्वरूप दिसतं. खाली उतरून जाणारे ट्रेल्सही आहेत. खेचरावरूनही ट्रेल्स करता येतात. पार्कात फिरण्यासाठी वीजेवर चालणार्या बसेस आहेत. त्यामुळे अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंतचे सगळे पॉइंट्स कव्हर करता येतात. कुठेही उतरा, त्या ठिकाणचा कॅनियन मनसोक्त पहा आणि पुढची बस पकडून पुढच्या पॉइंटवर जा. चंगळ. पार्काचं व्हिजिटर सेंटरही मस्त आहे. खूप माहिती मिळते.
आम्ही राहिलो होतो त्या दरम्यान या पार्कात स्टारपार्टी नावाचा रेंजरचा आकाशदर्शनाचा कार्यक्रम सुरू होता. त्या दिवशी सूर्य मावळता मावळता म्हणजे सुमारे ७.३०-७.४५ च्या दरम्यान आम्ही मेन व्हिजिटर सेंटरमागच्या कार पार्किंगपाशी पोहोचलो. तिथे गेले काही दिवस आपापले टेलिस्कोप्स घेऊन हौशी आणि प्रोफेशनल खगोलप्रेमी मंडळी हजेरी लावून होती. कसले भारी टेलिस्कोप्स होते. कोणी सूर्यावर, कोणी चंद्रावर, कोणी गुरूवर, कोणी मंगळावर फोकस लावून बसले होते. आम्ही जमलेले सगळे एका टेलिस्कोपवरून दुसर्या टेलिस्कोपवर अश्या उड्या मारत मेजवानी चाखत होतो. बघायलाही मिळत होतं आणि माहितीही मिळत होती. एकतर काही मिलियन डॉलर्समध्ये किंमत जाईल असा एकदम स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी असलेला टेलिस्कोप होता. त्यातून आम्ही चक्क दुसरी एक गॅलक्सी पाहिली. महान!
मग रात्री ९ वाजता रेंजरचा कार्यक्रम तिथेच सुरू झाला. जवळजवळ २००-२५० लोकं पूर्ण अंधारात उभी राहून आकाशाचं अदभूत जाणून घेत होते. किती सुरेख अनुभव होता तो.
दुसर्या दिवशीची संध्याकाळ खास कॅनियनच्या सूर्यास्ताकरता राखून ठेवलेली. सनसेट पॉइंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपी पॉइंटवर जमलेल्या गर्दीत आम्हीही होतो. चिक्कार फोटो काढले पण हवामान खूप उत्तम नसल्याने खास नाही आलेत. ( तरीही थोडे फोटो नंतर टाकते. )
एक नितांत सुंदर अनुभव घेऊन आम्ही २० तारखेला लास वेगासला परत आलो. आणि २१ तारखेला पुन्हा एकदा लक्सबसनं एले डाऊनटाऊनमध्ये रहायला आलो.
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
आता डाऊनटाऊनमध्ये राहतोय म्हटल्यावर जवळपासची जी ठिकाणं राहिली होती ती चार दिवसांत उरकली. जरा इकडे तिकडे जवळपास शॉपिंग, लाराकरता म्हणून हॉबीलॉबी शोधून तिथे खरेदी, जवळच असलेली पब्लिक लायब्ररी,नॅचरल हिस्टरी म्युझियम, सायन्स सेंटर, चायनाटाऊन, पर्शिंग स्क्वेअर, ग्रँड पार्क वगैरे बघून टाकलं.
मग २५ तारखेला सामान आणि आम्ही एका टॅक्सीत बसलो आणि एलेतल्या दुसर्या घरात रहायला आलो. हे खरंखुरं घर होतं. मुंबईत राहून कधी बंगल्याचं सुख अनुभवायला मिळणं अशक्य! त्यामुळे हे तात्पुरतं का होईना आपलं घर आहे या कल्पनेनं हरखूनच गेलो. बहिण २९ तारखेला येणार होती. आता हे चार दिवस फक्त घर एंजॉय करायचं ठरवलं. बहिण, तिची मुलं आणि तिच्याबरोबर कार आली की पुन्हा भटकंती सुरू होणारच होती. मग ही मधली सुट्टी आरामात घालवूयात असं ठरवून टाकलं.
घराचा मालक एक गुजराती निघाला. एक ७५ वयाचा गोड म्हातारा. त्यालाही भारतीय मंडळी बघून आनंद झाला. त्याचंही घर आमच्या घराच्या मागेच होतं. एकटाच रहात होता तो. आम्ही घर ताब्यात घेतल्यावर जवळपास कोणकोणती दुकानं आहेत वगैरे त्याला विचारत होतो. तर त्यानं सरळ स्वतःची कार काढली आणि आग्रह करकरून नवर्याला कारमध्ये बसवून आधी इंडियन ग्रोसरी आणि मग आमच्या (त्याच त्या) सुप्रसिद्ध ट्रेडर जोजमध्ये घेऊन गेला. नवर्यानंही दांडगी खरेदी केली. पाणी, लाटलेल्या चपात्या, तयार भाज्या, डाळ-तांदूळ, कांदे बटाटे, दीपचे सामोसे हे न ते ..... फ्रीज भरून गेला. हिंग, हळद विसरलो ते घरमालकानं दिलं. मग पुढचे दोन दिवस मी ही घरीच जेवले. लारानं सुशीच्या ऐवजी सामोसे खाल्ले. घराजवळच एक थाई रेस्टॉरंट होतं त्यालाही उदार आश्रय दिला. रविवारी जवळच्या फार्मर्स मार्केटमध्येही चक्कर मारली. बाकी घरी टिव्ही, लाराचं क्राफ्ट, पुस्तकं आणि आमचं बुकिंग यात मस्त वेळ घालवला. आरामच आराम.
२६ तारखेला बस्केच्या नवर्यानं आमचं सामान आम्हाला घरपोच आणून दिलं. (बस्के त्यावेळी बेएरीयात गेली होती.) त्याबद्दल निनादला एक मोठ्ठा थँक्यू! तीन जड बॅगा बिचार्यानं त्याच्या घरातून आणून , गाडीत घालून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याला तातडीनं कुठेतरी जायचं होतं त्यामुळे तो घाईत होता. आम्ही त्याच्याशी घराबाहेरच दोन मिनिटं बोलत उभे होतो तर त्याचवेळी एका बाईला त्याच ठिकाणी तिची गाडी पार्क करायची होती. त्यामुळे आम्हाला बोलणंही आटोपतं घ्यावं लागलं. तिला घाई होती कारण तिची आमच्या शेजारच्या घरात कोणाकडे तरी डेट होती आणि त्या डेटकरता ती अगदी आतूर झाली होती. शुक्रवारी डेटला गेलेली ती रविवारपर्यंत तिथेच राहिली बहुतेक. दोघं हातात हात घालून फिरायला जाताना दिसले त्या एक दोन दिवसांत. नवर्याला म्हटलंही की " लगता है, इनकी तो चल पडी!"
बुकिंगचं म्हणाल तर आता पुढच्या टप्प्यांची बुकिंग्ज करणं गरजेचं होतं. ४ जुलैला पॅसिफिक कोस्टल हायवेवर कूच करणार होतो. पीसीएच वर काय काय करता येईल याची एक आयटिनरी बहिणीनं बनवली होती. त्यानुसार दोन रात्री मुक्काम होता. सॅन सेमियन नावाच्या गावाजवळ एक हर्स्ट कॅसल नावाचा अतिशय सुंदर कॅसल आहे. पहिल्या दिवशी एलेहून निघून मधली सांता बार्बरा, सॉल्वँग ही सुंदर शहरं बघून संध्याकाळपर्यंत सॅन सेमियन गाठायचं. तिथला कॅसल बघून तिथं रात्रीचा मुक्काम करायचा. ५ जुलैला सकाळी निघून बिग सर वगैरे करत मॉनरे ला मुक्काम करायचा. मॉनरेचा अॅक्वेरियम बघायचा. ६ तारखेला संध्याकाळ पर्यंत पालो आल्टोला पोहोचायचं असा बेत.
सगळ्यात जास्त बदल या बेतात होत गेले. एक छान बदल झाला म्हणजे आयत्यावेळी बहिणीचा नवराही पीसीएच करता आम्हाला जॉईन होणार असं ठरलं. तो ३ तारखेला सकाळी एलेत येणार होता आणि ६ तारखेला संध्याकाळी परत जाणार होता. भले शाब्बास! एक अॅडिशनल कुशल ड्रायव्हर मिळणार होता.
मग लक्षात आलं की हर्स्ट कॅसल बघण्यासाठी किमान २ तास लागतील. त्यांची अगदी लहानशी टूरच ४५ मिनिटांची असते. शिवाय त्या डोंगरावर जाण्यायेण्याचा वेळ वगैरे धरून २ तास होतीलच. पहिल्या दिवसाच्या शेवटी २ तास मिळणं कठिणच होतं. त्यातून बरोबर ३ लहान मुलं आणि १ माझा नवरा अशी अरसिक मंडळी. त्यांना असलं काही बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मग शांतपणे हर्स्ट कॅसल गळून टाकला. त्यामुळे दिवसभर जी इतर ठिकाणं बघणार त्यांच्याकरताही जास्तीचा वेळ मि़ळणार होता. मुक्काम मात्र सॅन सॅमियन मध्येच करायचा ठरला. एका मोटेलमध्ये २ खोल्या बुक केल्या. पण ते मोटेलचे रेट कसले मेले. एखाद्या चांगल्या हॉटेलाच्या तोंडात मारतील असे. समर व्हेकेशन, ४ जुलै आणि त्या भागात असलेली कमी मोटेलं असं सगळं मिळून त्यांनी रेट वाढवले होते बहुतेक.
मॉनरे मध्ये अॅक्वेरियम शेजारच्याच एका हॉटेलात दोन रुम्स बुक केल्या. या इथल्या रुम्स राजकन्येच्या महालासारख्या सजवलेल्या. सगळं गुलाबी गुलाबी! लारादेवी या हॉटेलवर बेहद्द खुश झाल्या. 'हे मी पाहिलेलं बेस्ट हॉटेल' असंही डिक्लेअर करून झालं. अर्थात असं 'बेस्ट हॉटेल' त्यांना प्रत्येक प्रवासात किमान एक या रेटनं सापडतं हे सांगायला नकोच.
तेवढ्यात बातमी आली की बहिणीचा नवरा ६ तारखेच्या संध्याकाळ ऐवजी सातला पहाटे परत जाणार. त्यामुळे आता आमच्या हातात ६ जुलैची संध्याकाळही आली. मग साराटोगाला आतेबहिण राहते तिच्याकडे डिनरला जाऊन मग पुढे मुक्कामाला जायचं असं ठरवून टाकलं.
आता एव्हाना हे मुक्कामाचं ठिकाण बदललं होतं. पालो आल्टो करता आम्ही एक छानसं स्विमिंग पूल वगैरे असलेलं घर बघून ठेवलं होतं. पण आम्ही बुकिंगला जरा उशीर केला तर ते गेलं. फार वाईट वाटलं. मग आमच्या क्रायटेरियात बसणारी घरं अचानकच मॅपवरून नाहिशी झाली. मी जाम वैतागले आणि मग आमच्यात तेवढ्यात एक संयमित चर्चाही घडली. अजून एक चर्चा घडण्याच्या भितीनं नवर्यानं चपळाई करून एक घर पटकावलं. ते पालो आल्टोच्या थोडसं खालीच होतं - लॉस आल्टो नावाच्या गावात. पण चला, तुका म्हणे त्यातल्या त्यात!
आणि मग आणखी उशीर न करता सॅन फ्रान्सिस्कोचंही बुकिंग केलं. खरंतर सॅन फ्रान्सिस्कोला आम्हाला फिशरमन्स वार्फच्या जवळ घर हवं होतं. पण मनासारखं मिळेचना. मग शेवटी एका वेगळ्याच भागातलं पण चांगली कनेक्टिव्हिटी असलेलं घर घेतलं. हे शेवटचं बुकिंग होतं. हुश्श्य्!
परत जाताना बहिण सॅन फ्रान्सिस्कोहून सिएटलला जाणार होती आणि त्याचवेळी आम्ही एलेला एका रात्रासाठी परत येणार होतो. ही विमानाची बुकिंग्ज बहिणीन केली होती. एलेच्या एअरपोर्टजवळच्या होटेलाचं बुकिंगही झालं होतं.
लॉस आल्टोस नंतर योसेमिटी नॅशनल पार्काचाही विचार होता. पण पुन्हा खूप धावपळ झाली असती आणि कुठलंच ठिकाण नीट बघता आलं नसतं. असा विचार करून योसेमिटीही चक्क गाळून टाकलं. पुन्हा कधीतरी योसेमिटीचा योग येईलही. कुणी सांगावं!
२९ तारखेला सजून धजून मंड्ळी बसनी एअरपोर्टवर पाहुण्यांना रिसिव्ह करायला गेली. ही एलेतली पब्लिक ट्रान्स्पोर्टनं फिरायची शेवटची खेप होती - निदान या ट्रिपपुरती तरी. त्या आनंदात ट्रेन पकडून, बस पकडून वगैरे एअरपोर्ट वर पोहोचलो. बसमधून उतरल्या उतरल्या "कसे बाई लोकं पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरतात. ठेपी कार असली की कसं बरं वाटतं नै!" वगैरे उच्च विनोद करून वर त्यांवर ख्याँ ख्याँ हसूनही झालं.
यथावकाश श्रींचं आगमन झालं आणि पुन्हा सामानसुमानासकट आम्ही कार रेंटच्या बसमध्ये जाण्यासाठी टर्मिनलच्या बाहेर येऊन उभे राहिलो. आम्ही उभे राहतोय नाही तर एक फॉक्सरेंटची शटल दिसली. त्याला हात केला तर त्यानं मागून दुसरी शटल येतच आहे असं काहीतरी हातवारे करून सांगितलं असं वाटलं. आणि मग आम्ही एक दीर्घ वाट बघत उभे राहिलो. अर्धा तास झाला तरी पुढची शटल येईना. बाकी दुनियाभरातल्या सगळ्या शटला आम्हाला वाकुल्या दाखवून जात होत्या. फॉक्सवाल्यांना फोन केला तर "दर १० मिनिटाला शटल आहे" असा बाणेदार पण रेकॉर्डेड मेसेज ऐकू येत होता. त्यात काही दम नाही हे तर दिसतच होतं. शेजारीच तीन मुली फॉक्स करता थांबलेल्य दिसत होत्या. त्यांना विचारलं तर म्हणे त्या गेले २ तास थांबल्यात. अरे देवा! म्हणजे ही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती आणि आता पुढचा मार्ग काढण्यासाठी सुप्रसिद्ध भारतीय जुगाड करण्याची गरज होती तर! मग आम्ही सरळ पुढची जी कोणती कार रेंटलची शटल आली त्यात घुसलो. फॉक्समध्ये कार फक्त रिझर्व्ह करून ठेवली होती. पैसे काही भरले नव्हते. ते एक उत्तम झालं होतं.
मग या दुसर्या रेंटल कंपनीच्या ऑफिसात पोहोचलो. तिथे ही भली मोठ्ठी लाईन. मग पुन्हा जुगाड! मी आणि तीनही मुलं त्याच ऑफिसच्या लाउंजमध्ये सामानसकट बसलो आणि बहिण आणि नवरा टॅक्सी करून फॉक्सच्या ऑफिसात गेले. तिथे त्यांनी शटलबद्दल तक्रार केली आणि टॅक्सी करावी लागली सांगितल्यावर त्यांनी गपचूप टॅक्सीचे पैसे दिले. फॉक्समधे कार (७ सिटर व्हॅन) तयार होतीच. मग काही फॉर्मॅलिटीज पार पडल्यावर एकदाची मंडळी कारमध्ये बसून आम्हाला घ्यायला आली. एव्हाना मुलांचे भूकबळी पडायची वेळ आली होती. त्यामुळे कारमध्ये बसल्यावर सगळ्यात पहिले एक रेस्टॉरंट शोधून पोरांना खायला घातलं. ( कोणत्याही ट्रीपमध्ये मुलांना खायला घालणे ही एक मेजर अॅक्टिव्हिटी होऊन बसतेच.) समोरच फॉक्सचं ऑफिस होतं. तिथे मी अन बहिण पुन्हा गेलो आणि कागदपत्रांवर माझंही नाव ड्रायव्हर म्हणून लावण्यात आलं. माझ्याकरता अॅडिशनल इन्श्युरन्सही भरला होता. तर अशा तर्हेने आमच्या दिमतीला कार आणि ड्रायव्हर हजर झाले.
मग काय! आमचा पुन्हा धडाकेबाज प्रोग्रॅम सुरू झाला. आता एकदम विळ्याभोपळ्याची मोट बांधायची होती. तीनही मुलांना जास्त इंटरेस्ट घरी बसून सुट्टी एंजॉय करण्यात होता. त्यांची एंजॉयमेंटची व्याख्या आम्हाला झेपत नव्हती. तीघही जणं तीन स्क्रीन बघत बसणार. लारा युट्युबवर पॉलिमर क्लेचे व्हिडियोज, अरिन आणि रोहन माईनक्राफ्टचे व्हिडियोज बघणार आणि त्याबद्दलच बोलणार. शिवाय, सुट्टी आहे म्हणून मंडळी लवकर झोपायला अजिबातच तयार नाहीत. "इट इज आवर व्हेकेशन आणि वी विल नॉट स्लीप सो अर्ली." असा ठाम पवित्रा घेऊन आयांना झोपवूनच ही मंडळी कधीतरी उशीरा झोपायची. मग सकाळी कसली लवकर उठताहेत! व्हेकेशन असल्याच्या मुद्द्यावरून लवकर उठवायलाही मनाई होती. त्यातून उठून साईटसिईंग सारखं बोअर काम करायचं होतं ना! काय ती झाडं आणि घरं बघता! वेस्ट ऑफ टाईम नुसता ही मनोधारणा असली तर किती डोकं फोडणार अशा मंडळींसमोर?
बरं हे राजपुत्रं आणि राजकन्यका उठले की पुन्हा स्क्रीनसमोर ठिय्या देऊन बसणार. मग चढत्या भाजणीत आवाज चढवून, त्यांना स्क्रीनसमोरून हलवून, खंगाळून, खायला घालून मग बाहेर पडायला भल्या दुपारचे निदान बारा वाजायचेच. आम्हीही खमक्या! आज जरा अंमळ उशीर झाला नै. उद्या जरा लवकरच निघू म्हणजे बरंच बघून होईल, आज रात्रीच पोरांना आंघोळी घालून टाकू असे इमले रोज हवेत बांधायचो आणि ते तेवढ्याच तत्परतेनं ढासळायचे. रात्री आंघोळी घाला नाहीतर आंघोळीची गोळी घ्या, निघायला बाराच वाजायचे.
एलेमध्ये बहिणीकडे ३० जून ते २ जुलै इतकेच म्हणजे ३ दिवस होते. ३ जुलैला बीएमेममध्ये तिचं नाटक होतं. आता या ३ दिवसांत आम्हाला अनेक गोष्टी बसवायच्या होत्या. आम्हाला एक ऑपरा बघायचा होता. फँटम ऑफ द ऑपरा आम्ही एका संध्याकाळी पँटाजेज थिएटरमध्ये बघितला. बिव्हर्ली हिल्स, रोडिओ ड्राईव्ह बघितले. त्यावरची सुंदर, सुंदर घरं पाहिली. पहिल्यांदा तिथं गेलो तर कोणतं घर कोणाचं ते कळेचना. मग परत येताना एका स्त्रीकडून १५ डॉलर्स देऊन स्टारमॅप विकत घेतला. आता उद्या या मॅपनुसार घरं बघू असा विचार. दुसर्या दिवशी गेलो तर मॅप असला तरी ती घरं काही आपल्याला दिसत नाहीयेत. ती आत कुठेतरी आहेत आणि आपण नुसतं रस्त्यावरून हे इथे याचं घर आणि हे तिथे तिचं घर इतपतच करू शकतो म्हटल्यावर आमचा उत्साह आटला. कारमधल्या चिल्ल्यापिल्यांनीही असल्या फालतू प्लॅनबद्दल निषेध व्यक्त करायला सुरूवात केली होतीच. त्यामुळे ते तिथेच राहिलं.
एका संध्याकाळी सांता मोनिका बीचवर गेलो. मुलांनी तिथे पाण्यात सॉल्लिड मजा केली. सर्फबोर्डवगैरे वरून चिक्कार सर्फिंगही केलं. मग तिथल्या पीअरवरच्या राईडस केल्या. त्या दिवशी आम्हाला हवाही छान मिळाली होती. आम्ही घरून मस्त बीच टॉवेल्स वगैरे घेऊन गेलो होतो. लारा आणि अरिन समुद्रात पोहत असताना, आम्ही जवळच उभे राहून गप्पा मारत होतो. रोहनला पाण्यापेक्षा सीगल पकडण्यात जास्त इंटरेस्ट लागला. तो आमच्या अवतीभवतीच सीगल पकडत धावत होता. मध्येच बहिणीच्या लक्षात आलं की रोहन कुठे दिसत नाहीये. अरे बापरे! ती धावत सुटली. आम्हीही शोधायला सुरूवात केली. कुठे दिसेना. तेवढ्यात बहिण बर्याच दूरवरून आम्हाला खुणा करताना दिसली. हां, म्हणजे रोहन मिळाला म्हणायचा. त्याला घेऊन ती आली आणि विचारायला लागली की अरे काय हे, तू हरवला होतास माहित आहे?
रोहन - चेहरा मख्खं आणि मॅटर ऑफ फॅक्टली म्हणे "ओ! आय कुडन्ट सी यु एनिव्हेअर."
" अरे मग लक्षात आल्या आल्या शोधायचं नाही का आम्हाला? सीगलच्या मागेच कसा धावत बसलास?"
"आय वॉज लुकिंग फॉर द व्हाईट थिंगी!"
"कसली व्हाईट थिंगी?"
" दोज व्हाईट थिंग्ज यू हॅव स्प्रेड ऑन द सँड."
म्हणजे हा पठ्ठ्या पांढरे टॉवेल शोधत होता. तीन साडेपाच फुटांची, जमिनीवर काटकोनात उभी असलेली मंडळी शोधण्यापेक्षा वाळूवर पसरलेले टॉवेल शोधणं त्याच्या लॉजिकमध्ये बसत होतं. कर्मं!!!
एलेमधली गेटी सेंटर आणि ग्रिफिथ ऑबसर्व्हेटरी पाहिली. फार मस्त आहेत दोन्ही ठिकाणं. दोन्ही उंचावर असल्यानं व्हूदेखिल सुरेख आहे. ग्रिफिथला गेलो तर त्या दिवशी खूप गर्दी होती. वरपर्यंत जाऊन परत आलो, पार्किंगच मिळेना. आता खाली कुठेतरी पार्क करून मग टेकडी चढत चढत वर जावं लागणार असं दिसत होतं. जाण्यायेण्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना गाड्या पार्क केलेल्या. कुठेही मध्ये जागा सापडेना. आता इतक्या खाली गाडी पार्क करून मुलांना घेऊन इतकी चढण चढून जाण्याचं जीवावर आलं होतं. शेवटी पुन्हा एकदा ट्राय करून तर बघू, असा विचार करून कारनं पुन्हा एकदा वर जायला लागलो, रस्त्यात कुठेही पार्किंग न मिळाल्यानं थेट वर गेलो तर काय! अगदी ऑब्झर्व्हेटरीच्या दारात पार्किंग मिळालं. कोण आनंद झालाय!
एलेबद्दल माहिती शोधताना Tripadvisor.com वर मला एक गंमतीशीर गोष्ट मिळाली होती - Maze rooms! वाचूनच आम्ही हे करायचं ठरवलं. मुलांनाही खूप आवडेल असं वाटत होतं. या रुम्स बुक कराव्या लागतात म्हणून एका सकाळचा कॅसलरुमचा पहिला स्लॉट बुक केला. सकाळी मोठ्या उत्सुकतेनं आम्ही तो पत्ता शोधत पोहोचलो. बापरे, आधी त्या रुम्स शोधायलाच वेळ लागला. मग त्यांच्या बाहेर जाऊन उभे राहिलो तरी आत असा काही गेम आहे यावर विश्वास बसेना. एका लाकडी पार्टिशन मागे आहेत या रुम्स. पण आम्ही उत्साहानं फुरफुरत होतो. आता आत जायचं आणि रिअल लाईफ रुम एस्केप गेम खेळायचा. बेल वाजवल्यावर काही वेळानं झोपेतून उठून आल्यासारखा एक माणूस आला. "जर्रा मेल्या मेझ रूम्स सुरू केल्या तर आले लग्गेच खेळायला!" असा थेट पुणेरी भाव चेहर्यावर. कोण तुम्ही? का आलायत? गेम खेळायला? असे बेसिक प्रश्न त्यानं विचारायला सुरूवात केली. अरे भल्या गृहस्था, कालच आम्ही तुमचा खेळ ऑनलाईन बुक केलाय. जरा चेक करायला काय घेशील? आमचा धीर सुटत चालला. ओके बघतो म्हणत तो दरवाजा आमच्या तोंडावर बंद करून आत गेला. आणि पुन्हा दोन मिनिटांनी येऊन आम्हाला आत या म्हणाला. तेवढ्यात त्याच्या नजरेला बच्चे कंपनी पडली. मग म्हणे १३ वर्षांखालील मुलांना अलाउड नाही. म्हटलं असं काही तुमच्या वेबसाईटवर नाहीये. पण तो ठामच राहिला. गेम थोडा डेंजरस असू शकतो म्हणाला. मुलांना सगळ्यात जास्त रस होता या अॅक्टिव्हिटीत. तेच खेळू शकणार नाही म्हटल्यावर आम्हाला खेळायचं नव्हतं. हिरमुसले होऊन आम्ही परत फिरलो. एक वेगळा अनुभव हुकला. तुम्हा कोणाला इंटरेस्ट असेल तर जरूर जा इथे. अशा मेझ रुम्स ठिकठिकाणी आहेत. आम्हालाही हा साक्षात्कार नंतर झाला. काही सिअॅट्लला आहेतच पण नेटवर बघितलं तर चक्क लोअर परेलमध्येही अशा रुम्स आहेत असं दिसतंय. आता तिथे जाऊन बघते.
एलेत मुलांना नुकताच रिलिज झालेला ज्युरासिक वर्ल्ड सिनेमा बघायचा होता. मग नवर्याला त्या तिघांबरोबर सिनेमाला पाठवलं आणि मी आणि बहिण जवळच राहणार्या बस्केकडे त्या दोन तासांत गप्पा आणि पोहे हाणून आलो. गटग हो!
३ तारखेला सकाळीच बहिणीचा नवरा एलेत येणार होता. त्याला पिक-अप करायला बहिण आणि माझा नवरा गेले. तिथूनच बहिण एक शटल घेऊन अनाहिमला बीएमेमला गेली. त्या आधी पिकअप झाल्यावर पुन्हा एकदा तिच्या नवर्याला घेऊन फॉक्सच्या ऑफिसात जावं लागलं. त्याच्या नावाचा आणि सहीचाही फॉर्म भरायचा होता. आणि शिवाय आमची व्हॅनही बदलायची होती. आधीच्या व्हॅनच्या मधल्या रांगेच्या खिडक्यांच्या काचाच खाली होत नव्हत्या. ते सगळं आटोपून, बहिणीला शटलमध्ये बसवून मग दुपारी मंडळी घरी आली.
आधी खरंतर बहिणीबरोबर सगळेच अनाहिमला जाणार होतो. बहिणीच्या नवर्याला पिक-अप करून तिथूनच डायरेक्ट तिला अनाहिमला सोडायचं आणि मग आम्ही मुलांना घेऊन Knott's Berry Farm ला दिवसभराकरता जायचं असं ठरत होतं. पण ४ जुलैच्या मुळे तिथे अभूतपूर्व गर्दी असण्याचा संभव होता. त्या दिवशी हवामानही गरम होतं. शिवाय दुसर्या दिवशी सकाळी पीसीएच करता प्रयाण करायचं होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता शेवटी बहिणीनं शटलनं जायचं आणि यायचं आणि आम्ही मुलांना व्हेनिस बीचवर घेऊन जायचं असं ठरलं. संध्याकाळी बीचवरूनच एअरपोर्टवर जाऊन तिला पिकअप करायचं ठरलं. हा प्रोग्रॅम मग मस्त पार पडला. तिचं नाटक आणि आमचा बीच! मग चीजकेक फॅक्टरीत जेवण! एलेचा द्सर्या टप्प्यातला मुक्काम असा भरगच्च आणि आनंददायी झाला.
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
या भागात मात्र भरपूर प्रचि आहेत. पॅसिफिकचे सगळे नखरे दाखवायचे आहेत ना?
४ जुलै. आज रोडट्रिप वर निघायचा दिवस. एलेला रामराम करायचा दिवस.
सकाळी उठून गाठोडी बांधली. पोराटोरांना तयार केलं. खाणीपिणी उरकली आणि लक्षात आलं की सामान अवाढव्य झालंय. गाडीत ठेवणार कसं आणि कुठं?????? प्रसंग बाका होता. पण कसं कोण जाणे, मधल्या सीटच्या पायाखाली असलेल्या दोन कंपार्टमेंटस आणि सगळ्यात मागे सामान ठेवायच्या जागेत आम्ही आमच्या अचाट कल्पक बुद्धीनं ते बसवून दाखवलं. अगदी पहिल्यांदा ड्रायव्हरला दिसत नव्हतं. पण सामान रीअॅरेंज करून तिथेही पोकळी निर्माण करून दाखवली. फक्त मागचं दार उघडताना साधारण तीन लोकं सामान पकडायला उभे असले की काम होणार होतं.
आता गाडीच्या मुख्य भागात सात मंडळी, एक खाऊची पिशवी, एक थर्माकोलचा आईसबॉक्स (त्यात पाणी आणि कोल्ड्रिंक्स आणि वारुण्या) आणि एक कचरा बॅग असे ऐवज दिसत होते. ठळक ठळक कचरा जरी कचरा बॅगेत गेला तरी खाल्लेला प्रत्येक खाऊ प्रेमानं गाडीलाही भरवला जात होता हे अगदी उघड होतं. हा कचरा पुढे लॉस आल्टोसमध्ये गेल्यावर व्हॅक्युम क्लिनरनं काढला.
भल्या पहाटे असे साडेअकराला म्हणजे तसं पाहिलं तर आमच्या वेळेआधीच निघालो होतो. पीसीएचला लागलो :
पहिला मुक्काम टुमदार सांता बार्बरा आणि ४ जुलैची परेड
नंतर थांबलो सॉल्वँगला. हे एक डॅनिश शहर आहे. फार सुंदर. घरं, दुकानं सगळ्यावर डच संस्कृतीचा प्रभाव.
संध्याकाळ होत आली आणि आम्हाला प्रचंड भूक लागली होती. एका कोणत्यातरी गावात शिरून एक थाई रेस्टॉरंट पकडून जेवलो. आणि मग आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. त्या दिवशी सॅन सेमियन ला मुक्काम होता. रात्र झाल्याने ४ जुलैची आतषबाजी ठिकठिकाणी दिसत होती. आम्ही जेमतेम मोटेलवर आलो, खोल्या ताब्यात घेतल्या आणि ताणून दिली.
आमच्या सॅन सेमियनच्या खोलीतून दिसणारे दृष्य. पॅसिफिकच्या दिसतोय ना?
दुसर्या दिवशी पुन्हा लवकर बाहेर पडलो. कालचा बराचसा रस्ता आतून जात होता. आज मात्र पॅसिफिकची विविध रुपं बघायला मिळणार होती.
एके ठिकाणी सील्स वाळूत पहुडले होते. इतका घाण वास येत होता त्यांचा.
रगेड पॉइंट नावाच्या एका जागी तर इतका सुरेख व्ह्यू पॉइंट होता. त्या वेळी नेमका माझा फोन कार मध्ये राहिला होता. त्यामुळे माझ्याकडे फोटो नाहीयेत. रायगड कडे असतील. तिला टाकायला सांगते.
बिग सर मधल्या एका सुंदरशा सुवेनिअर शॉप मधून
हे सुवेनिअर शॉप अतिशय सुरेख वस्तुंनी खचाखच भरलं होतं. कितीतरी भारतीय वस्तूही होत्या त्यात - लखनवी कुरते, उशांचे अभ्रे, देवांवर पुस्तकं आणि हनुमानाचा पुतळाही होता. मी आणि बहिण तन्मयतेनं इथल्या वस्तू न्याहाळत होतो. तर बहिणीचे थोरले चिरंजीव कंटाळले. "आई, there is nothing here. It is all junk." अशी मोठ्या आवाजात आकाशवाणी केली. बापरे, दुकानातलं सगळं पब्लिक - अगदी विक्रेत्या बायकांसकट - काय धो धो हसलंय. धाकट्याला तर प्रवास सुरू केल्यापासून केव्हा एकदा हॉटेलवर पोहोचतोय अशी ओढ लागलेली. प्रवास सुरू झाल्यापासून एकच धोशा "Are we almost there?" हॉटेल नाहीतर डिपार्टमेंटवर जाणे हे त्यांच्या आयुष्यातलं एकमेव ध्येय होतं. डिपार्टमेंट म्हणजे अपार्टमेंट. आम्ही चुकीचं बोलत असून ते म्हणताहेत तो शब्दच बरोबर असाही त्यांचा आग्रह होता. बरं आम्हाला हसायचीही चोरी. आम्ही हसलो की त्यांचा घोर अपमान होत असे. शेवटी आम्हालाही तोच शब्द आवडला. आम्हीही आमच्या घराला डिपार्टमेंट म्हणायला लागलो.
एका ठिकाणी पाण्यात पाय बुडवले.
पाणी एकदम स्वच्छ
संध्याकाळी मॉनरेला पोहोचलो. हे ही एक छोटसं पण सुरेख शहर आहे. इथे पॅसिफिक ओशन नाही पण त्याचाच भाग असलेला मॉनरे बे आहे. आम्ही अगदी अॅक्वेरियमच्या जवळच हॉटेल घेतलं होतं. त्यामुळे ते अगदी शहरात होतं. हॉटेल समोरच एक भारतीय रेस्टॉरंट. दोन तीन भारतीय दुकानं. बे एरीयाच्या उंबरठ्यावर उभे आहोत याची झलक होती ती.
मॉनरे :
इथला अॅक्वेरियम छान आहे म्हणतात. पण खरंतर इतकाही काही उच्च नव्हता. सॅन फ्रान्सिस्कोच्या सिटीपासमध्ये मॉनरे किंवा सॅन फ्रान्सिस्को चा अॅक्वेरियम असा ऑप्शन असतो. आम्ही इथे पैसे भरून अॅक्वेरियम पाहिला आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन सिटी पास घेतला. तो सिटीपास इथेच घेऊन टाकला असता तरी चाललं असतं.
पाच तारखेला मॉनरेला राहून दुसर्या दिवशी अॅक्वेरियम, जेवण वगैरे अगदी आरामात उरकून आम्ही प्रस्थान ठेवलं आणि साधारण ४.३०-५.०० वाजता साराटोगाला आतेबहिणीकडे आलो. रात्री तिच्याकडे डिनर करूनच मग अगदी उशीरा आमच्या लॉस आल्टोसच्या डिपार्टमेंटमध्ये दाखल झालो.
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
लॉस आल्टोसमध्ये आम्ही ६ जुलै ते ११ जुलै होतो. आमचं हे घरही फारच छान होतं. सुरेख नेबरहुड. घरापुढे मोकळी जागा, मागे मोठं बॅकयार्ड वगैरे. खरंतर अमेरिकेत अशीच असतात घरं. पण आम्हाला 'हे आमचं घर' म्हणून भारी अप्रुप वाटलं.
७ तारखेला बहिणीच्या नवर्याची सकाळी ७ ची परतीची फ्लाईट होती. पहाटे साडेपाचला मी अन ती जाऊन त्याला एअरपोर्टवर सोडून आलो आणि पुन्हा झोपलो.
सकाळी उठून बॅकयार्डात पाहिलं तर २-३ भले दांडगे पाईनकोन्स पडलेले होते. मी आणि लारानं जाऊन ते हावरटासारखे गोळा केले. बॅकयार्डात झाडच होतं. लारानी आधीपासून दोन तीन पाईन कोन्स जमवलेच होते. पण हे जरा जास्त मोठे होते. असे बरेच पाईन कोन्स इथून गोळा करून घरी नेऊया का? या प्रश्नाला मी ताबडतोब मान्यता दिली. मलाही ते खूप आवडतात. एक वेगळी बॅगच करूयात या करता असाही आम्ही विचार करत होतो. पण हे बेत नवर्याला झेपले नाहीत. त्यानं लाराला पटवून फक्त ३ पाईनकोन्सवर मांडवली केली.
लॉस आल्टोसमध्ये खूप काही अजेंड्यावर नव्हतं. बे-एरीयाचा फील घेणे आणि भारतीय जेवण जेवणे हे मुख्य हेतू होते. :)
आम्हाला इथल्या आची कप्पाकडाई नावाच्या रेस्टॉरंटमध्ये अप्रतिम केरळी थाळी मिळाली. त्यांची चेट्टीनाड चिकनही अमेझिंग. वर फिल्टर कॉफी. त्या जेवणावर आम्ही अगदी बेहद्द खुश होऊन गेलो. बहिण सिअॅटल सोडून आची अप्पाकडाईच्या शेजारी घर घेऊन राहण्याचा सिरीयसली विचार करू लागली.
शिवाय एकदा एक गुजराथी थाळी - थाळी नावाच्या रेस्टॉरंटामध्ये खाल्ली. ठीकठीक होती. विशेषतः त्याकरता जे १ तास वेटिंगला उभे राहिलो त्यामानानी ती ओकेच वाटली. मद्रास कॅफेचा डोसा, इडली देखिल ठीक ठाक. आची कप्पाकडाई रॉक्स! बे-एरिया रॉक्स!
एक दिवस उठून लॉस आल्टोस पासून साधारण पाऊणएक तासाच्या अंतरावर सांताक्रूज नावाच्या जागी Mystery Spot आहे तिथे गेलो. बघण्यासारखी जागा आहे. एक गंमत म्हणून आणि डोकं खाजवायची सोय होते म्हणून. त्यांच्या टूर्स असतात त्यापैकी आपल्याला हवी ती आदल्या दिवशी बुक करायची. या ठिकाणी एकदम झक्काससा दृष्टीभ्रम केलेला आहे. माणसं तिरकीच उभी रहिलेली काय दिसतात, पाणी खाली न वाहता वरच काय वाह्ते, चेंडू चढ चढत जातो असे मजेशीर प्रकार दाखवले जातात. वर त्यामागे काहीतरी मिस्टरी आहे असंही ठासून सांगतात. आपल्याला हे दृष्टीभ्रम करून गंडवत आहेत हे कळतं पण तरीही मजा येते.
मिस्टरी स्पॉट नंतर आम्ही Santa Cruz Beach Boardwalk ला गेलो. इथे पाण्यात धमाल करून, मग सगळ्या राईडस वगैरे करून, खाऊनपिऊन संध्याकाळ कारणी लावली. विशेषतः बच्चेकंपनी बेहद्द खुश होती. गेले काही दिवस नुसतंच साईटसिइंग करून आम्ही त्यांना खूप पकवलं होतं त्यावर ऐकूणच तो पूर्ण दिवस हा जालिम उतारा ठरला.
एक दिवस बे एरियातील हिरे बघायला बाहेर पडलो.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी
गुगल
अॅपल
लॉस आल्टोसमधले बाकीचे दिवस मग मॉल्सना भेट देणे, सुरेख वस्ती असलेला लॉस आल्टोस हिल्स एरिया बघणे यात घालवले. बहिणी तिच्या दोन मैत्रिणींना भेटून आली. आणि एक दिवस संध्याकाळी आतेबहिणीची फॅमिली आमच्याकडे डिनरला आली तेव्हा मस्त धम्माल पार्टी केली आम्ही. बाहेरून जेवण आणल्यामुळे घरी ऐसपैस बसून खाऊपिऊ, डान्स, मस्ती करता आली. या घरात अजून एक खजिना मला मिळाला ते म्हणजे टीव्हीवर उपलब्ध असलेले गेम ऑफ थ्रोन्सचे भाग. अर्थात सगळे नाही बघून झाले.
सॅनफ्रान्सिस्कोला जाताना फेसबुक बघू असं ठरवलं होतं पण ते राहिलंच. पण आम्हाला जाता नाही आलं म्हणून सॅन फ्रान्सिस्कोला चक्क मार्क झुकेरबर्गच आम्हाला भेटायला आला. पण ते पुढच्या भागात...
(क्रमशः)
पुढचा भाग - कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
सॅन फ्रान्सिस्को हा आमचा शेवटचा मुक्काम होता. आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासून सॅन फ्रान्सिस्को दोन अडिच तासाच्या अंतरावरच होतं. १२ जुलैला नेहमी प्रमाणेच सकाळी उठून बांधाबांध केली. बाकी सामान परवडलं पण किचन मधल्या गोष्टी विशेषतः फ्रीज आणि फ्रीझरमधल्या गोष्टी आईसबॉक्समध्ये बर्फासकट बसवणं म्हणजे एक कलाच होती. एकीकडे पुन्हा पुन्हा घरात जाऊन जाऊन सगळे कप्पे, ड्रॉवर्स तपासणे, उशा- गाद्यांखाली लपलेल्या वस्तू गोळा करणे, बॅकयार्ड तपासणे, घर जास्तीत जास्त स्वच्छ करून कचरा बाहेर गार्बेज बिनमध्ये टाकणे ही कामंही होतीच.
आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा या घरात आलो तेव्हा आम्हाला उशीर होणार होता म्हणून तसं आमच्या घर मालकिणीला सांगितलं होतं. तिनं घराबाहेर एका ठिकाणी चावी ठेवली होती, कुठे ठेवलीये ते आम्हाला कळवलं होतं आणि निघून गेली होती. घरात वेलकम वाईन आणि चॉकलेटस ठेवायला मात्र विसरली नव्हती ती. :)
दोन दिवसांनी आम्हाला मिक्सरची गरज भासली होती आणि शोधल्यावर घरात मिक्सर नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तिला मेसेज केला. तर ती कुठेतरी दौर्यावर होती. पण संध्याकाळी आम्ही बाहेरून फिरून येईपर्यंत तिच्या एका सहकार्याने एक मिक्सर आमच्या घराबाहेर आणून ठेवला होता. त्या मिक्सरबरोबर पुन्हा चॉकलेटस आणि बिस्किट्स. सो स्वीट! आता जातानादेखिल ती म्हणाली होती की कदाचित येईन म्हणून पण तिला नाहीच जमलं. तिनं सांगितल्याप्रमाणे आम्ही चावी किचन काउंटरवर ठेऊन निघून आलो. अशा तर्हेने अगदी अजिबात एकमेकांची तोंडं न बघता आम्ही तिच्या घरात सहा दिवस राहून आलो. गॉड ब्लेस हर.
सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचलो ते आधी तडक गोल्डन गेट ब्रिजवर गेलो. आधी ब्रिजवरून गेलो, मग ब्रिजखालच्या विस्टा पॉइंटवरून बे आणि ब्रिज पाहिला मग शेजारची टेकडी चढून बॅटरी स्पेन्सर पॉइंटला जाऊन वरून ब्रिजचं दर्शन घेतलं. ढगांत लपलेले गोल्डन गेटचे भलेमोठे खांब पाहिले. खूप लाड केले गोल्डन गेट ब्रिजचे. खरंतर हा ब्रिज सोनेरी नाहीये. त्याचा जो काही रंग आहे त्या रंगाला international orange कलर म्हणतात. मग या ब्रिजला गोल्डन गेट का बरं म्हणतात? १८४६ मध्ये (म्हणजे कॉलिफोर्नियातील गोल्ड रश सुरू होण्याअगोदर दोन वर्षं) एका आर्मी ऑफिसरनं - जॉन फ्रीमाँट - म्हणे या बे ला उद्देशून उद्गार काढले की "हा बे (पॅसिफिकला जोडत असल्याने) पूर्वेकडील देशांशी व्यापाराचं गोल्डन गेटच आहे." त्यावरून ते नाव आलंय म्हणे. कशाचं काय अन कशाचं काय!
प्रचि १ : गोल्डन गेट ब्रिज खालच्या विस्टा पॉइंटवरून
प्रचि २ : बॅटरी स्पेन्सर टेकडीवरून ( फोटोत ब्रिजला चिकटून जो चौरस दिसत आहे तिथून प्रचि १ काढलं आहे.)
प्रचि ३ : टेकडीवरून गोल्डन गेट ब्रिजचं रुपडं
गोल्डन गेट ब्रिज मनसोक्त बघून झाल्यावर आम्ही आमच्या नविन डिपार्टमेंटमध्ये येऊन दाखल झालो.
सॅनफ्रान्सिस्को एक मजेशीर शहर आहे. या शहराला फॉग सिटीही म्हणतात. धुक्याचं शहर. खरंच बरेचदा ढग आणि धुकं इथे मुक्कामाला असतं. अर्थात स्वच्छ सूर्यप्रकाशही असतोच. आम्हाला आमच्या घरमालकानं एक महत्त्वाची टिप दिली की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये फिरताना घरातून निघताना तुम्हाला जरी गरम होत असेल तरीही सोबत जॅकेट वगैरे तत्सम काही गरम कपडे घेऊनच निघा. शहराच्या एका भागात जरी गरम वाटलं तरी दुसरीकडे गेल्यावर चांगलीच थंडी वाजू शकते. संध्याकाळी तर थंड वाटायचंच.
शहरभर टेकड्या आणि टेकड्यांवर एकमेकांना खेटून असलेली घरं. एक घर दुसर्यापासून ओळखता यावं म्हणून त्यांना वेगवेगळे रंग दिलेले. खूप गोड दिसतात ती घरं.
प्रचि ४
प्रचि ५
बरं सगळी घरं पहिल्या मजल्यावर. कारण खाली गॅरे़ज. त्याशेजारून पायर्या चढून वर गेलं की घर. इतर ऐसपैस अमेरिकन घरांच्या तुलनेत ही घरं तशी छोट्या जागेत दाटीवाटीनं बसवलेली दिसतात. शिवाय पावलोपावली लाँड्र्या. इतक्या लाँड्र्या का बरं या प्रश्नाचं उत्तर आमच्या घरी गेल्यावर कळलं. घरात वॉशिंग मशिनच नाही. आता ते कदाचित गॅरेजमध्ये असेलही पण आमच्या लँडलॉर्ड सायबांनी आम्हाला घराजवळच्या दोन तीन लाँड्र्यांचे पत्ते देऊन त्या वापराव्यात असं सुचवलं. आम्हीही चँपियनगिरी करून आधीच्या घरून आतापर्यंतचे दोन-तीन दिवसांचे कपडे न धुताच आणले होते. विचार केला होता की नव्या घरी जाऊनच धुऊ आता म्हणून. ते असं उलटलं.
सॅन फ्रान्सिस्कोला घर घेताना जास्त चॉईस उरला नव्हता. शिवाय आम्ही सगळं लक्ष फोकस केलं होतं ते घर सपाटीवर असण्याकडे. टेकडीवर नको, जवळच बसथांबा हवा, किमान ३ बेडरूम्स वगैरे. या महत्त्वांच्या पॅरामीटर्समध्ये वॉशिंगमशिन सारख्या बारीकसारीक गोष्टी बघितल्याच गेल्या नव्हत्या. त्याची ही सजा.
मग आधी जाऊन कोपर्यावरच्या लाँड्रीत कपडे टाकून आलो. तो दुसर्या दिवशी सकाळीच लगेच देणारही होता. या घराजवळही एक छानसं ग्रोसरी स्टोअर होतं. घराखालीच एक चायनीज रेस्टॉरंटही होतं.
हे झाल्यावर बहिण आणि नवरा जाऊन सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्ट वर गाडी सोडून आले. आता पुन्हा पब्लिक ट्रान्स्पोर्ट. आणि तो ही सॅन फ्रान्सिस्कोचा! आमची जामच दाणादाण उडवून दिली इथल्या बसेस, ट्राम्स आणि केबल कार्सनं. खरं तर आमच्या घरापासून निघणारी बस इथल्या मार्केट स्ट्रीटवरून मग पुढे फिशरमन्स वार्फला जायची. हीच बस उलट्या दिशेनं पकडली तर गोल्डन गेट पार्कला जायची. त्यामुळे खूपच सोईचं व्हायला हरकत नव्हती खरं तर पण त्यातल्या त्यातही या बसनं नको जीव करून सोडला. (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. रायगड लिहिलच त्याबद्दल.)
इथे मिळणार्या सिटीपासमध्ये बरीच महत्त्वाची ठिकाणं आणि बसप्रवास कव्हर होतो. तो नक्की घ्यावाच. या पासमध्ये बस आणि मेट्रो अनलिमिटेड राईडस ( यांना इथे मुनी म्हणतात.) आणि केबल कार्स अनलिमिटेड राईड्स असतात. शिवाय, कॅलिफोर्निया अॅकेडेमी ऑफ सायन्स, एक बे क्रूज, फिशरमन्स वार्फवरचा अॅक्वेरियम (किंवा मॉनरे चा अॅक्वेरियम - काहीतरी एक) आणि एक्स्प्लोरेटोरियम अशी आकर्षणं सामील असतात.
गोल्डनगेट ब्रिज खालोखाल फेमस म्हणजे फिशरमन्स वार्फ आणि त्यातलं पिअर ३९. हे प्रकरण सदैव नुसतं उत्साहानं फसफसलेलं. समोरच दिसणारा निळा बे, अल्काट्राझ तुरुंग, गोल्डन गेट, शेजारीच असलेली गिरार्डेलि चॉकलेटची फॅक्टरी, पिअर ३९वरची असंख्य सीफूड रेस्टॉरंट, सुंदरशी सुवेनिर शॉप्स, सील्स करता पिअरशेजारी पाण्यात ठेवलेले तरंगते लाकडी प्लॅटफॉर्मस, येजा करणार्या असंख्य बोटी ..... मस्त भारलेलं वातावरण. आम्ही निदान ४-५ वेळातरी पिअर ३९ वर गेलो आणि प्रत्येकवेळी तिथलं फेमस 'क्लॅम चाउडर इन सावरडो ब्रेड बोल' खाल्लंच.
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
पिअरवरून दिसणारा टेकडीवरचा कॉईट टॉवर. या टॉवरशेजारून पायर्या उतरून खाली यायला जागा आहे. या पायर्या खूप फेमस आहेत. आजूबाजूला घरं आणि झाडं आणि ही छोटीशी पायरीवाट आम्ही उतरून आलो.
प्रचि ९
अल्काट्राज तुरुंगाचं बेट. नामचिन खतरनाक कैदी इथे ठेवले जात. आता इथे कैदी नाहीत पण तुरुंगाची वारी आपल्या सारख्या सामान्य लोकांना करायची असेल तर करता येते. गाईडेड टूर्स आहेत. असं म्ह्णतात की इथल्या तुरुंगात कैद्यांना आंघोळीला मुद्दाम गरम पाणी देत असत. त्यांना थंड पाण्याची सवय झाली तर इथल्या समुद्राच्या महाथंड पाण्यातून पळून सोपं होईल. ते होऊ नये म्हणून.
प्रचि १०
दोनदा तर मी आणि बहिण दोघीच गेलो. मुलांना ( पुन्हा एकदा) नवर्याबरोबर मिनियन्स सिनेमा बघायला पाठवून आम्ही दोघीच पिअरवर आलो. तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये वारुणीचे घुटके घेत क्लॅम चाउडर, चिकन विंग्ज आणि क्रॅब केक्स खात होतो. तर समोरून एक ४-५ लोकांचा घोळका गेला. आम्ही दोघी एकाच वेळी चित्कारलो. बहिणीला त्यात मार्क झुकेरबर्ग दिसला तर मला 'ट्वायलाईट' चा हिरो रॉबर्ट पॅटिंसन दिसला. हे खरेच आहेत की आपल्याला भास होताहेत की वारुणीचा परिणाम ते कळेना. बाकी आजूबाजूचे कोणी त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. पण आपल्याला हेच दोघे दिसले यावर आम्ही टिकून होतो. काय की!
इथेच एक्प्लोरेटोरियम नावाचं अफलातून विज्ञान म्युझियम. पण तेवढंच नाही म्युझियमपेक्षाही अनेक पटीनं जास्त काहीतरी. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर The Exploratorium isn't just a museum; it's an ongoing exploration of science, art and human perception—a vast collection of online experiences that feed your curiosity. एक आठवडातरी लागेल सगळं व्यवस्थित बघायला. मुलांनी आणि त्यांच्याइतकंच आम्हीही खूप एंजॉय केलं इथे.
अशीच दुसरी एक देखणी जागा म्हणजे गोल्डन गेट पार्क. प्रचंड मोठ्या जागेवर असलेलं हे पार्क. काय नाही इथे? फाईन आर्टचा डी यंग म्युझियम, कॅलिफोर्निया अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस च्या भव्य वास्तू, पोलो ग्राउंड, जॅपनीज गार्डन, बोटॅनिकल गार्डन,कॉन्सर्वेटारी, गोल्फ कोर्स, स्टेडियम, तलाव, धबधबा, जंगल ..... सगळं केवळ महान आणि बहुतांशी गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट!
इतकी सुंदर जागा, इतकी सुंदर संकल्पना. लोकं देखिल याचा पुरेपुर फायदा घेताना दिसत होते. सायकलिंग, सेगवे, बोर्ड स्केटिंग, बोटिंग, जॉगिंग करत होते. कित्येक लहान मुलांच्या टूर्स आल्या होत्या आणि ते चिल्ड्रन्स पार्कमध्ये खेळत होते. अगदी नुसतं तळ्याकाठच्या एखाद्या झाडाखाली पुस्तक वाचत आख्खा दिवस आनंदात घालवू शकता. एका मैदानात खुर्च्या वगैरे मांडून बहुतेक भाषणाची तयारी सुरू होती.
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
<
धबधबा आणि बोटिंगकरता तलाव
प्रचि १४
आम्ही त्या पार्कच्या प्रेमात पडलोच.
एक दिवस मुलांबरोबर कॅलिफोर्निया अॅकॅडेमी ऑफ सायन्सेसला भेट दिली. मस्त जागा पण सेम एलेच्या नॅचरल हिस्टरी म्युझियम सारखीच. मुलांना मात्र खूप मजा आली. पेंग्विन फिडिंगचा शो देखिल होता. इथे प्लॅनेटोरीयमही होतं. खरंतर आधी एलेला देखिल ग्रिफिथ ऑब्झर्वेटरीमध्ये एक शो पाहिला होता. आणि शो सुरू होताच दमल्यामुळे सगळे गाढ झोपले होते. तरीदेखिल (आणि किंबहुना म्हणूनच) इथेही सगळ्यांना शो बघायची जोरदार घाई. आम्ही म्हणतही होतो की पांघरूणं, फ्लॉस वगैरे घेऊन यायला हवं होतं. वाटत होतं तसंच पुन्हा या शो मध्येही सगळ्यांनी पाऊणतासाची घनघोर झोप काढली. आणि मग ताजेतवाने होऊन पुढच्या मोहिमेवर निघालो. आता प्लॅनेटोरियममधला शो = हक्काची झोप असं समीकरणच झालंय.
पण एकदा आम्ही दोघीच भटकायला बाहेर पडलो ते इथेच आलो. त्या सुंदर पार्कात भरपूर भटकलो. एक सुंदर कॉन्झर्व्हेटरी पाहिली.
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
डि यंग म्युझियमबाहेरचा परिसर
प्रचि १९
सॅन फ्रान्सिस्कोचा प्रसिद्ध लॉम्बार्ड स्ट्रीट पाहिला. हा रस्ता उंचावरून खाली नागमोडी वळणं घेत येतो. इथून कार चालवत खाली जायचं म्हणजे एक चॅलेंजच आहे.
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
लॉम्बार्ड स्ट्रीट बघायला (जर कार नसेल तर) आधी एक पॉवेल-हाईड रुटची केबल कार पकडायची. या केबल कार्सना प्रचंड गर्दी. त्या जिथून सुरू होतात त्या थांब्यावर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. आम्ही अशाच एका रांगेत उभे असताना एका जुन्याजाणत्या रहिवाश्यानं येऊन आम्हाला सांगितलं की इथे उभे राहू नका. दोन तास रांगेतच उभे रहाल. त्यापेक्षा एक स्टॉप वरच्या अंगाला जा. तिथेही थोड्या लोकांना घेतात बसमध्ये. आम्ही तसंच केलं आणि त्यामुळे चौथ्या बसमध्ये जागा मिळाली लगेच. खाली थांबलो असतो तर नक्कीच आठ तरी बसेस डोळ्यासमोरून गेल्या असत्या. क्या केबल कार्स म्हणजे एक महदाश्चर्यच! किती ते उंच चढ आणि खोल उतार त्या रस्त्यावर. काही उतारांवर तर बसमधला कंडक्टर उतरून ब्रेक लावतो. आम्ही बसमध्ये नुसते डुचमळत राहतो. पण तो ही मस्त अनुभव.
केबलकारचा रस्ता वर खाली करत किती वरून येतोय बघा
प्रचि २४
आणि मग खालीही तसाच उतरून जातोय
प्रचि २५
सॅनफ्रान्सिस्कोचा आणखी एक हायलाईट म्हणजे मंगोलियन हॉट पॉट. बहिण केव्हाची याबद्दल भरभरून सांगत होती. त्यामुळे यंदाच्या अमेरिकावारीत या प्रकरणाला भेट देणं मस्टच होतं. एलेमध्ये जायला जमलं नाही पण इथे शेवटी जमवलंच. कोण एक्साईटमेंट! टेबलावर एक भलं मोठं सुपाचं घंगाळ येतं. त्यात एक स्पायसी आणि एक ब्लांड अशी दोन सुपं. हे टेबलवरच्या हॉटप्लेटवर ठेवलं जातं आणि आतली सुपं उकळू लागतात. मेन्युमधून आपल्याला हवे ते खाऊचे ऑप्शन्स मागवायचे. अनेकानेक व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स असतात. ते कच्चेच असतात. आपण ते आपल्याला हव्या त्या सुपात सोडायचे आणि शिजले की खायचे. अधून मधून सूप ही प्यायचं. महाचविष्ट सूप आणि ऐकूणातच मस्त बैठक जमते. तास-दीडतास सहज सावकाश गप्पा मारत जेवण होतं. मुंबईत एकाच ठिकाणी हे मिळतं. आता जाऊन पहायला पाहिजे कसं आहे ते.
प्रचि २६
या घराला असलेल्या तीन बेडरुम्सपैकी एका बेडरूममध्ये गेल्या गेल्या लेकीनं तिचा पॉलिमर क्लेचा संसार थाटला. थोड्यावेळानं तिच्या मावसभावंडांपैकी कोणीतरी त्यातलं काहीतरी बघत असताना ते टेबलावरून खाली पडलं म्हणून बाई अपसेट झाल्या आणि त्यांनी भावांना त्या रुममध्ये जाण्यास बंदी घातली. झालं! आता हे कळल्यावर मोठ्याला सारखं त्याच रुममध्ये जावसं वाटायला लागलं. तो आपला संधी शोधून तिथे जायला बघतोय आणि लारा पहार्याला रुमबाहेर उभी असा खेळ सुरू झाला. तो दिवसभर पुरला. शेवटी वैतागून अरिननं जाहिर रित्या अनाउन्स केलं की "मी प्रेसिडेंट झाल्यावर सगळ्यात पहिले पॉलिमर क्ले बॅन करणार!!!!" ऐकून इतकं मोठं ध्येय ठेवल्याबद्दल आनंदावं की प्रेसिडेंट झाल्यावर अजेंडावर असलेलं पहिलं काम बघून रडावं ते कळेचना!
शेवटच्या फिरण्याच्या दिवशी आम्ही बे क्रूजही केली. फार मस्त मजा आली. डेकवर उभं राहून भणभणत्या वार्यात गोल्डन गेट ब्रिजच्या खालून, अल्काट्राझला वळसा घालून एक तासाची भटकंती झाली.
बोटीतून सॅन फ्रान्सिस्को सिटी
प्रचि २७
गोल्डन गेट ब्रिजखाली
प्रचि २८
अल्काट्राझ
प्रचि २९
या नंतर घरी गेल्यावर आम्हाला पासांची गरज नव्हती. पास ७ दिवसांचे असतात असं वाचलं होतं पण आम्ही घेतलेले पास ९ दिवस चालणारे होते. शिवाय आम्ही मॉनरेला आणि बाकीच्या म्युझियम्स मध्येही बरेच अॅक्वेरियम्स बघितल्यानं पुन्हा इथला बघण्याचा उत्साह मुलांनी दाखवला नाही. ते अॅक्वेरियमचे पासेस तसेच राहिले होते. मग आम्ही अॅक्वेरियमच्या दाराशी जरा उभे राहिलो. एक मोठा गृप अॅक्वेरियम बघायला आला आणि तिकीट काढायला लागला तेव्हा त्यांना सांगितलं की आमच्याकडे आहेत पासेस. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ४ अॅडल्ट आणि २ लहान मुलांचे पासेस मिळतील. ते खुश आणि आमचे पासेस कारणी लागले, वाया नाही गेले म्हणून आम्ही खुश. त्यांचे १०० डॉलर्स तरी वाचले असतील.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आम्ही थोडीफार खरेदीही केली. इथल्या मंडळींसाठी गिफ्टस वगैरे घेतल्या. आहेत त्या बॅगांच्यात आणि वजनात सगळं बसलं देखिल समहाऊ. पण एक महाघोटाळा झाला.
सॅनफ्रान्सिस्कोहून डोमेस्टिक फ्लाईट पकडून आम्ही एका रात्रीपुरतं एलेला येणार होतो. या फ्लाईटमध्ये केवळ एकच मोठी बॅग चेक इन करायची ठरवली कारण बाकीच्या बॅगांना पैसे पडणार होते. पण बॅगा भरताना मात्र आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट प्रमाणे भरल्या ना. एले-मुंबई प्रवासात सगळ्याच बॅगा चेकइन करणार होतो. केवळ एक लॅपटॉप आणि पुस्तकं वगैरे असलेली बॅगपॅक बरोबर असणार होती. आम्ही दूरदृष्टी दाखवून लांबच्या प्रवासाप्रमाणे सामान भरलं आणि त्यामुळे सॅन्फ्रान्सिस्कोच्या एअरपोर्टवर सेक्युरिटीत आमच्या बॅगेत अनेक ऑब्जेक्शनेबल वस्तू सापडल्या की राव! आता????? इतका साधा मुद्दा कसा काय लक्षात नाही आला? वैताग नुसता. बरं या सगळ्या गोष्टी नेमक्या होत्या लाराच्या - पॉलिमर क्ले, टूल्स, बस्केनं दिलेलं क्रीम वगैरे असं सगळं. त्या लोकांनी त्या गोष्टी बाजूला काढल्या म्हणताना लारानं तिकडे टिपं गाळायला सुरूवात केली. ते कोण देवदूत होते कोण जाणे पण लहान मुलगी रडतेय आणि हे तिचं सामान आहे कळल्यावर सगळ्या गोष्टी अगदी पाण्याच्या बाटलीसकट त्यांनी निमुटपणे बॅगेत पुन्हा भरल्या. देवाचा महिमा अगाध आहे. आता हा महत्त्वाचा धडा कधीच विसरणार नाही.
सॅन फ्रान्सिस्कोहून निघायच्या आदल्या दिवशी एअरपोर्ट ड्रॉपकरता एक व्हॅन बुक केली. तो वेळेआधीच आला खरं तर पण आमचं आवरत होतं तर शांतपणे थांबलाही. ब्रेकफास्ट, बाकीच्या खाऊची योग्य विल्हेवाट लावणे, घराची स्वच्छता आणि अर्थात बांधाबांधा यात सकाळ पटकन निघून गेली. सामान व्हॅनमध्ये चढवलं, घरमालकाला बाय बाय केलं आणि निघालो. रस्त्यात अजून दोघांना व्हॅन पिकअप करणार होती. ते करून आम्ही एअरपोर्टला पोहोचलो.
आमचं एलेचं फ्लाईट आणि बहिणीचं सिअॅटलचं फ्लाईट यात खरं तर दोनेक तासाचा फरक होता. आमचं फ्लाईट आधी होतं. पण काय योगायोग बघा, आमची विमानं नेमकी शेजारशेजारच्या गेटांवरून सुटणार होती. त्यामुळे तिथेही आम्ही एकत्र होतोच. शिवाय आमचं फ्लाईट डिले होत गेलं आणि चांगलं दीड तास डिले झालं. त्यावेळी मेक्सिकोत वादळ सुरू होतं आणि त्यामुळे फ्लाईट इथे एलेहून पोहोचलंच नव्हतं. पण दीड तासानं झालं एकदाचं बोर्डिंग सुरू आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला ....... पुन्हा एकदा स्काईपवर भेटण्यासाठी.
मग एले, तिथे रात्री मुक्काम आणि दुसर्या दिवशी (२० जुलैला) दुपारी २ वाजता मुंबईचं फ्लाईट पकडून तब्बल ५० दिवसांनी २२ जुलैला पहाटे १ वाजता आमच्या घरी परतलो. बॅक टू रुटिन!
(समाप्त)