हे असं चालणार नाही' आदित्य मनोमन ठरवत होता. उर्वी इथे अचानक येऊन थडकली हे त्याला अजिबात पटले नव्हते. ती दिसल्यावर तिला घरातच घ्यायचे नव्हते पण ती इतकी थकलेली, गारठलेली होती की शेवटी तिला उचलूनच न्यावे लागले. त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, घरात आली तर आली पण तो तिला कणभरही माहिती मिळू देणार नव्हता. ना तिच्याशी कामाशिवाय काही बोलणार होता. फक्त हो, नाही मध्ये उत्तरे द्यायची आणि वादळ जरा थांबले की लगेच तिला पिटाळून लावायचे हाच त्याचा प्लॅन होता.
आणि तरीही गेल्या २४ तासात तिला स्वतःबद्दल नको तितकी माहिती दिली गेली होती. त्याचे सगळे खाजगी आयुष्य, त्याचे नताशाबरोबरचे नाते, जे खूपच कमी लोकांना माहीत होते ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर उघड झाल्या होत्या. वर हे कमी की काय म्हणून आता त्याला तिच्या उद्यापासून तिथे नसण्याची हुरहूर लागली होती. तिचे केस, डोळे, ओठ, चेहरा राहूनराहून त्याला आठवत होता. संध्याकाळी तिला घट्ट मिठीत घेण्याची एवढी तीव्र इच्छा झाली होती की तो शेवटी सीडरला घेऊन घराबाहेर पडला.
काही किलोमीटर पळून मनातले सगळे विचार खोडून तो घरी पोचतो तोच ती त्याला खुर्चीवर उभी दिसली आणि थेट त्याच्या हातातच पडली. त्याने तिला पकडल्यावर तिने तिच्या त्या सोनेरी मधाळ डोळ्यांनी त्याच्याकडे असे पाहिले की त्याने स्वतःभोवती उभी केलेली मजबूत भिंत कधीच कोसळून गेली. पण पुढे न जाता त्याने पाऊल मागे घेतले कारण त्याला तिसऱ्यांदा पुन्हा तुटून पडायचे नव्हते. हृदयावर आधीच झालेल्या जखमा इतक्या खोल होत्या की आता एखाद्या ओरखड्यानेसुद्धा त्याचे तुकडे झाले असते. त्याने मन घट्ट केले पण तरीही त्याच्या हृदयात कुठेतरी खोलवर मऊ मऊ वाटत होते आणि आतून येणारी उबदार जाणीव काही कमी होत नव्हती.
मन ताळ्यावर ठेवायला म्हणून त्याने फुलीगोळा खेळून पाहिला, स्वयंपाक करून पाहिला, वाईनही उघडली. पण त्याला जेवणापूर्वी ती जेवढी सुंदर दिसत होती, त्याहून आता खळखळून हसताना ती अक्षरशः चमकत होती. इतकी जीवघेणी गोड दिसत असताना तो तिच्यावरुन डोळे अजिबात हटवू शकत नव्हता.
तो हातातल्या पिनो न्वा ला दोष देऊ शकत होता, पण तिच्या त्याच्याकडे बघून साध्या हसण्याची नशा त्याहून जास्त होती. काय घडतंय कळण्याचा आत त्याचा स्वतःवरचा कंट्रोल हळूहळू सुटत चालला होता. दिस इज बॅड! रिअली बॅड.
"मनीssषा, विथ टू 'ई'ज अँड टू 'ए'ज" तिच्यासमोरची हिऱ्यांनी मढलेली मध्यमवयीन बाई तिला मोठ्या आवाजात सांगत होती.
"ओकेss गॉट इट" म्हणून सवयीचे खोटे हसू चेहऱ्यावर आणत उर्वीने हातातल्या नोटपॅडवर बरोबर नाव लिहून अंडरलाईन केले. टू 'ई'ज अँड टू 'ए'ज वाल्या मनीषा मेहताने आत्ताच एका चिवित्र पेंटिंगवर दोन लाख रुपये वाया घालवले होते. ठिके, पैसे चांगल्या कारणासाठी दिले, पण तिला तिचं नावपण बरोब्बर स्पेलिंगसकट उर्वीच्या लेखात छापून आणायचं होतं.
"आणि तुझ्या आर्टिकलबरोबर माझा आणि मिस्टर मेहतांचा फोटो पण पाहिजे हां, पेंटिंग समोरच फोटो घ्या आमचा" म्हणत ती नवऱ्याला आणायला गेली. उर्वीने इकडे तिकडे पाहिले आणि कोपऱ्यात कुठल्या तरी मॉडेलबरोबर गप्पा मारणाऱ्या फोटोग्राफर रवीला हात करून बोलावून घेतले. थँक गॉड, रवी पटकन आला आणि त्याने त्या दोघांचे पेंटिंगसमोर दोन तीन पोझेसमध्ये फोटो काढले. त्या लाखोंच्या चित्रात पांढऱ्या कॅनव्हासवर फक्त एक मोठाच्या मोठा लाल, तेलकट ठिपका पसरलेला होता. आर्टिस्टने त्याला कुठल्यातरी फुलाचे नाव दिले होते पण ते फुलापेक्षा जास्त कुठलातरी मर्डर सीन नाहीतर डेक्स्टरचा ब्लड स्मीअर रिपोर्ट वाटायची शक्यता जास्त होती. ह्या विचारानेच आता तिला हसू येत होतं.
"इजन्ट इट जस्ट अमेझिंग?" तिला चित्राकडे बघताना बघून मनिषाने खुश होत विचारले.
"ऍबसल्यूटली माइंडब्लोइंग!" शक्य तितका कोरा चेहरा ठेवत तिने उत्तर दिले.
"फोटो पब्लिश करायच्या आधी माझं अप्रूवल घेशीलच ना तू?" जाताजाता बाई अजून एक डिमांड टाकून गेल्या.
"ऑफ कोर्स!" उर्वी पुन्हा गोड हसून म्हणाली.
उर्वी आज तिच्या 'द सिटी बझ' नावाच्या वृत्तपत्राकडून हा चॅरिटी आर्ट शो आणि ऑक्शन कव्हर करायला आली होती. तीन साडेतीन तास नवीन घेतलेल्या तीन इंची हील्सवर उभी राहिल्यामुळे आता तिच्या पायांनी बोंबा मारायला सुरुवात केली होती. रवीला ते जाणवून त्याने तिला एक दयार्द्र स्माईल दिले.
आह, ह्या थोड्याश्या ग्लिटरी, नी लेंथ एलबीडीवर हे पीप टो स्टिलेटोज किती मस्त दिसत होते, पण नेमके एक साईज लहानच मिळायचे होते.. म्हणून कपाळावर आठ्या आणत तिने पायाची बोटं हलवून पहिली तर त्याने पाय अजूनच दुखायला लागले.
प्रोग्रॅम संपून उबरमध्ये बसताच तिने घाईघाईने शूज काढून पाय मोकळे केले. हाताने टाच चेपताना तिच्या डोक्यात विचार सुरूच होते. मास कॉमची डिग्री मिळताच योगायोगाने पटकन एवढ्या मोठ्या पेपरमध्ये मिळालेला जॉब, मग सुरुवातीला दिल्ली एडिशनसाठी दोन वर्षे, आता मुंबईत परत येऊनसुद्धा वर्ष झालं तरीही तिच्यावर सोसायटी पेजचीच जबाबदारी होती. तिने खूपदा डिमेलोला समजवायचा प्रयत्न केला की बाबा मला यात इंटरेस्ट नाही, मला प्लीज काहीतरी मीनींगफूल काम दे. तरीही तो या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत होता. तिला रिसर्च करायचा होता, माणसांच्या खऱ्या गोष्टी लिहायच्या होत्या, अगदी बुक रिव्ह्यूसुद्धा चालतील पण सोसायटी पेज नको हे तिने कित्येकदा स्पष्ट सांगितलं होतं. पण काही उपयोग नव्हता.
दिल्लीतून मुंबई ब्रांचला परत येईतो बाबांची बदली नाशिकला झाली आणि आईबाबा तिकडे शिफ्ट झाले. त्यामुळे मुंबईतल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये ती एकटी राहून राहून कंटाळली होती. जय, तिचा कॉलेजमधला बॉयफ्रेंड ती दिल्लीला जाताच लग्न करून मोकळा झाला होता. तो धक्का पचवल्यापासून तिला कुणाच्यात इंटरेस्टच वाटत नव्हता. हल्लीच ती अकाउंट्समधल्या कुणालबरोबर एकदोनदा मुव्हीज, डिनर डेट्सवर गेली होती पण तो तिला बॉयफ्रेंडपेक्षा मित्रच जास्त वाटत होता. लोकांचं सोशल लाईफ कव्हर करण्यात ती इतकी बिझी होती की तिला स्वतःचं सोशल लाईफ काही उरलंच नव्हतं.
गेटसमोर उतरून ती घाईघाईत लिफ्टमध्ये घुसली. दहाव्या मजल्यावर उतरून लॉबीतून डावीकडच्या तिच्या फ्लॅटपर्यंत जाणेही पायांना सोसवत नव्हते. तरी दाराशेजारी भिंतीवरची झाडाच्या खोडाची लाकडी चकती आणि त्याच्यावर तिनेच पायरोग्राफी शिकताना लिहिलेली 'काळे - प्रमोद, अपर्णा, उर्वी' अशी नावे दिसल्यावर आपोआप तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दार उघडून आत शिरताच तिने पहिल्यांदा ते हील्स काढून शू रॅककडे भिरकावले आणि डोळ्यांवर आलेली झोप नाहीशी होण्याच्या भीतीने लगेच झोपायला निघून गेली.
-----
"तुम सिरीयस हो क्या?" अना नेहमीप्रमाणे घाबरट तोंड करून तिला विचारत होती. अना म्हणजे अनामिका तिवारी. फ्लोरवरची तिच्या शेजारच्या क्यूबिकलमध्ये बसणारी तिची एकमेव मैत्रीण. बाकी सगळे फक्त कलिग्ज!
"टोटली!" उर्वीने चेहऱ्यावर शक्य तितकी बेफिकीरी आणत उत्तर दिले. त्याच क्षणी तिच्या दुखऱ्या अंगठ्यातून कळ आली आणि तीने स्स.. करून खुर्चीत बसून तळपाय चेपायला सुरुवात केली.
"अरे अरे, पैरमे क्या हुआ? कहीं गिर गई थी ? अनाची सरबत्ती सुरूच होती.
"पागलपंती! कल जो स्टीलेटोज लिए थे, वो इतने सेक्सी थे लेकीन एक साईज छोटे थे. लास्ट पीस बचा था. फिरभी हमे पागलपंती करना जरुरी है, है ना! उसके साथ ऑफर मे एक फ्लॅट्स फ्री दे रहे थे तो मैने ले लिए." तिने बारीक आवाज करून, डोळे फिरवत सांगितले.
"क्रेझी!!" अना तिला मदत करण्याऐवजी जोरजोरात हसत होती.
"दुष्ट! अब जाओ मुझे कुछ मेडिसिन ला दो" ती रागाने म्हणाली.
"मत करो उर्वी." अना पटकन आणलेलं मलम तिच्या पायाला लावत म्हणाली.
"हां बिलकुल, आय एम नॉट गोइंग टू वेअर देम अगेन. डोन्ट वरी"
"इडियट, वो नही. नोटीस मत दो बोल रही हूं! वैसे नुकसान तुम्हारा ही है. देखो तुम्हारी पर्सनॅलिटी अच्छी है, लूक स्मार्ट है और सोशली तुम बहोत इझीली घुलमिल जाती हो लोगोंके साथ. सो अपने ऑफिसमे सिर्फ तुम ही हो जो सोसायटी पेज के लिए परफेक्ट है और पे भी तो कितना अच्छा है!" अना डोळे मोठे करून तिला बजावत म्हणाली.
"देखती हूं, लेकीन मुझे इन सब फेक लोगोंमे अब इंटरेस्ट नही है." म्हणून तिने खांदे उडवले. थोडावेळ कालच्या शोचं आर्टिकल ड्राफ्ट केल्यानंतर ती उठून सरळ बाहेर काचेवर मोठ्या फॉण्ट मध्ये 'एडिटर' लिहिलेल्या डिमेलोच्या केबिनसमोर जाऊन थांबली. काचेतून बाकी कुणी आत नसल्याची खात्री करून तिने दारावर हळूच नॉक केले.
"हम्म?" म्हणत त्याने वैतागून स्क्रीनवरून नजर हटवून तिच्याकडे पाहिले.
"सर, दिस इस माय टू मंथस नोटीस" तिने पुढे होऊन टेबलवर एन्व्हलप ठेवले.
स्टाफ आपापसात त्याचा एकेरी उल्लेख करत असले तरी विन्सेंट डिमेलो हुशार आणि अनुभवी माणूस होता.
"नॉट अॅक्सेप्टेड! एनी पर्टीक्युलर रिझन?" त्यांनी भुवया उंचावत विचारले.
"आय एम टोटली फेड अप विथ दिज सोशल इव्हेंट्स, पार्टीज अँड सेलिब्रिटीज... आय वॉन्ट टू वर्क ऑन रिअल न्यूज, रिअल स्टोरीज. यू हॅड प्रॉमिस्ड मी, बट नथिंग हॅपन्ड. सो!" तिने भराभर मनात घोळणारे सगळे विचार बाहेर ओतून टाकले.
"ओह, आय डोन्ट रिमेम्बर प्रॉमिसिंग एनीथिंग.. ओके तो एक काम करते है, डू थिस लास्ट इंटरव्ह्यू फॉर मी. इफ यू सक्सीड, आय विल रिमूव्ह यू फ्रॉम सोसायटी अँड गिव अदर असाईनमेंट्स. चलेगा?" त्यांनी शांतपणे विचारले.
"ओ..के" ती विचारात पडली. "आय'ल डू इट, बट गिव मी युअर वर्ड!"
"डन, गो फॉर इट. बाय द वे, दिस पर्सन नेव्हर गिव्ज इंटरव्ह्यू टू एनीबडी" म्हणून त्यांनी एक पुस्तक तिच्यासमोर टाकले आणि पुन्हा स्क्रीनमध्ये डोके घातले.
तिने पुस्तक उचलून निळसर कव्हर पाहिले. खाली बर्फ, वर चंद्र आणि पेटलेली एक शेकोटी.
On my own
Aaditya Sant
हम्म. आदित्य संत! ज्याला इंटरव्ह्यूची अलर्जी आहे. कोण आहे हा माणूस? तिने तर कधी नावसुद्धा ऐकले नव्हते. देखा जाएगा, म्हणून ती पटकन वळून केबिनमधून बाहेर आली.
क्रमशः
केबिनबाहेर पडल्यावर तिने पुस्तक उलटसुलट करून, उघडून बघितले. त्यात लेखकाचा फोटो किंवा इमेल, पत्ता वगैरे काहीही छापलेच नव्हते. नशीब नाव तरी लिहू दिलं या माणसाने! मनात म्हणत ती अनाच्या क्यूबिकलसमोर थांबली. अनाचं दिसणं सोडता ती तिवारी नाही अगदी गटणेच वाटेल. तसा चौकोनी काळ्या फ्रेमचा अर्थात स्टायलिश चष्मा तीही लावतेच. बारीकसं हसत ती अनाशेजारी जाऊन तिच्या डेस्कला टेकली.
"अना, एक बात पूछनी थी.. आदित्य संत करके एक बंदा है, नाम सुना है कभी?"
"सुना है मतलब? सब जानते है उसे. वे..ट, डोन्ट यू नो?? कौनसे प्लॅनेट पर रहती हो तुम!" अना चक चक करत मान हलवत म्हणाली.
"हां हां ठीक है, नही सुना. नाउ, टेल मी." उर्वी तिच्यासमोर नाटकी हात जोडत म्हणाली.
"ये उसकी फर्स्ट बुक है. वो extreme survival टाईपके शो नही आते टिवीपर, ये उस टाईप का बंदा है. वो हिमाचल के किसी फॉरेस्ट मे रहता है जहा ह्यूमन इंटरऍक्शनही नही है. तो उसी एक्स्पीरीयंसेसपर बेस्ड स्टोरीज लिखी है. लास्ट एट मंथस ये बुक इंटरनॅशनल बेस्टसेलर्स मे है, दो तीन महिने तो टॉपपर था."
"ओह फिर तो पढनी पडेगी" पुन्हा एकदा पुस्तक चाळत ती म्हणाली. "मुझे नॉन फिक्शन बोर लगता है, इसिलिए ये पता नही था. ऑथर के बारे मे और कुछ पता है? ऍड्रेस, फोन नं कुछ भी.. "
"ओह नो, इसके उपर स्टोरी बनानी है क्या? अब भगवान ही बचाए तुम्हे! आदित्य संत इज अ लेजंड. आज तक किसीने उसे देखा नही, ना उसके कॉन्टॅक्ट डिटेल्स पता है. सारे रिपोर्टर्स उसे ढुंडकर थक गये लेकीन ये कही छुपकर बैठा है. उसने पब्लिशर से भी कह कर रखा है की वो कोई पब्लिसिटी, कोई इंटरव्ह्यू नही देगा." अना चष्मा डोक्यावर सरकवत म्हणाली.
उर्वी हे सगळं ऐकून थक्कच झाली होती. "ठीक है, ट्राय तो करना पडेगा. ये मेरा लास्ट चान्स है."
"डिमेलोने तुझे पर्पजली फसाया है, तुम ये इंटरव्ह्यू करही नही सकती." अना मान हलवत रागाने म्हणाली.
ती उदास होऊन तिच्या क्यूबिकलमध्ये शिरली. त्याला शोधायचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते, कुठल्याच सोशल मीडिया साईटवर तो सापडला नाही. ना त्याचा काही पत्ता, ठिकाणा. ती फ्रस्ट्रेट होऊन इंटरनेट सर्च करत होती, एव्हाना चावून चावून तिच्या हातातल्या पेन्सिलचं डोकं खलबत्त्यात घालून कुटल्यासारखं झालं होतं. आता तर काहीही करून, कुठल्याही थराला जाऊन हा इंटरव्ह्यू तिला घ्यायचाच होता. आपल्या करिअरबद्दल तिला कुठलेही चान्सेस घ्यायचे नव्हते, काही करून हे सोसायटी पेज सुटलं पाहिजे एवढंच तिला हवं होतं.
पुढचे दोन दिवस तिने पुस्तक वाचण्यात घालवले. एकदा नाही चक्क तीन वेळा तिने ते पुस्तक वाचून काढले. आदित्यबद्दल जी काही वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी जाणवल्या त्या हायलाईट करून ठेवल्या. बऱ्याचदा ती जेवायचं विसरून अव्याहत त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी गुगल करत होती. आदित्य संत या नावाने आता तिला झपाटून टाकलं होतं.
पुस्तकानुसार त्याचे वडील हिमाचल प्रदेशातल्या किन्नौर जिल्ह्यात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पोस्टेड होते आणि तो तिथेच वाढला. पण कुठेही त्याच्या आईचा किंवा अजून कुठल्याही स्त्रीचा उल्लेख तिला सापडला नाही. या न सापडलेल्या गोष्टीही तिने मार्क करून ठेवल्या.
"तो कुछ मिला?" अनाने कॉफीचा मग तिच्यासमोर ठेऊन, स्वतःची कॉफी पितापिता विचारले.
आपले सगळे शोध सांगून झाल्यावर ती शांतपणे कॉफी प्यायला लागली.
"मुझे तो लगता है, ये पक्का पचास साल का बुढाऊ होगा. एक तो किसीको अपना मूह नही दिखाता और अकेले रहता है. कही ये नाम भी सूडो नेम तो नही, चेक करो" अना तोंड वाकडं करत म्हणाली.
उर्वी तिच्याकडे बघून काय वेडी आहे असा लूक देत हसायला लागली होती. "डिसकरेज मत करो यार. अब मै उसे ढूंढकर ही रहूंगी!" म्हणून ती मग विसळायला सिंककडे निघाली.
परत आल्यावर तिला आठवलं की या संताच्या चक्करमध्ये तिने आई बाबांना कॉलच केला नव्हता. लगेच मोबाईल उचलून तिने आईला कॉल केला. जनरल बोलणं झाल्यावर ती मूळ मुद्द्यावर आली. "आई तुला आदित्य संत नावाचा नवा लेखक माहिती आहे का?"
"म्हणजे! तुझे बाबा फॅन आहेत त्याचे. काय छान पुस्तक आहे ग ते. आपल्याकडे दोन्ही आहेत बाबांनी इंग्लिश वाचलं, मी मराठी अनुवाद वाचला. सुरेख लिहिलंय."
"मी म्हणूनच फोन केला की यंदा दिवाळी नव्हेंबर लास्ट वीकमध्ये आहे ना, बहुतेक मला दिवाळीला यायला जमणार नाही. मला हिमाचल प्रदेशात जाऊन त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे अर्जंट!"
"अग पण बाबा म्हणत होते तो कुठेतरी जंगलात राहतो, पत्रकार लोकांना भेटत नाही वगैरे."
"माहिती आहे म्हणूनच आधी त्याला शोधून काढायचाय!"
"काय ग बाई एकेक कटकट. मग मी बाबांना सांगू का त्यांच्या आवडत्या लेखकाची मुलाखत घ्यायला तू जाणार आहेस म्हणून? खूप आनंद होईल त्यांना."
"नाही आधी कुणालाच सांगू नको, मला तिथे पोहोचू दे मग फक्त बाबांना सांग. आणि प्लिज वाईट नको वाटून घेऊ दिवाळी नंतर सुट्टी घेऊन नक्की येईन मी चार पाच दिवस."
"हम्म तुझी मर्जी, आम्हाला कोण विचारतं आता!"
"आई प्लीज! आता सुरू नको करू. हे खरंच खूप गरजेचं आहे म्हणून चाललेय मी. प्लीज समजून घे जरा. बाय, टेक केअर." म्हणून हुश्श करून तिने फोन टेबलवर ठेवला.
नोटपॅड आणि पेन समोर ओढून आता पुढची स्टेप काय घ्यायची याचा ती विचार करायला लागली आणि तिच्या हातातल्या पेनाने तिच्याही नकळत कागदावर दाट झाडी आणि एका झोपडीचं डूडल तयार होऊ लागलं होतं...
क्रमशः
डोकं चालवून चालवून तिला दमायला झालं पण आता अजून कुठून माहिती काढणार हे काही सुचलं नाही. पण लॅपटॉप बूट करताना अचानक डोक्यात एक विचार चमकून गेला. आयटीमध्ये ती नवीन मुलगी आलीय, काय तिचं नाव.. हां समीरा पण तिला सॅम म्हटलेलं आवडतं. कूल, तसंही तिला फार काम नाहीये, कायम खुर्चीत मांडी घालून, भलेमोठे हेडफोन लावून, चिप्स खात बसलेली तर असते. पण हुशार आहे, ती नक्की हे काम करू शकेल. हॅकिंग तर तिच्या डाव्या हातचा मळ आहे. लगेच तिने फोन करून हे काम सॅमला देऊन टाकले आणि संध्याकाळच्या एका अतिबडबड्या सोशलाईटच्या दरवर्षी असणाऱ्या एकोणतीसाव्या बर्थडे पार्टीसाठी तयारी करायला लागली.
------
अगदी दरवर्षी सारखीच पार्टी झाली, सगळ्या लोकांचे वागणे, एकमेकांशी संभाषणे सगळेच इतके नाटकी होते की गेल्या वर्षीचेच आर्टिकल यावर्षी वापरले तरी काही फरक पडणार नाही. तीच ती कॉकटेल्स आणि तेच ते फिंगर फूड खाण्यातही काही मजा राहिली नव्हती. शेवटी शेवटी तर जिथे तिथे फोटोसाठी पाऊट करणाऱ्या जुनाट हिरोइनींना सोडून रवी आणि ती एक कोपरा धरून सगळ्या लोकांवर गॉसिप करत बसले तेव्हा कुठे पार्टीची जरा मजा आली. पार्टीमुळे सकाळी हँगओव्हर होताच म्हणून ऑफिसला जायला थोडा उशीर झाला. आज अनापण सुट्टीवर होती. तिने सॅमला कॉल केला पण तिला अजून काहीही ब्रेकथ्रू मिळाला नव्हता. आजचा दिवस किती बोर आहे म्हणत शेवटी ती कॉफी मशीनकडे निघाली.
दुपारपर्यंत सॅमकडे काही माहिती नव्हती. पण साडेतीनच्या सुमारास सॅम जवळपास उड्या मारतच तिच्या क्यूबिकलमध्ये घुसली. आल्या आल्या चपला काढून, खुर्चीत मांडी घालून बसत तिने हातातला चॉकलेट बार पुढे केला.
"घे घे, एक तुकडा तरी खावाच लागेल अशी गुड न्यूज आहे माझ्याकडे! आजच्या दिवस तुझा तो डाएट विसर प्लीज." उत्साहात सॅमची कॅसेट सुरू झाली होती.
"बास! हे घेतलं चॉकलेट. सांग आता पटापट." तिचं तोंड बंद करायला चॉकलेटच्या दोन वड्या तोडत ती म्हणाली.
"ओक्के, तर काल दिवसभर तू दिलेल्या नावाची भारतातली सगळी बर्थ रजिस्ट्रेशन तपासली त्यात टोटल आठ आदित्य संत सापडले पण त्यातला एकही लेखक नाहीये. हा त्या आठ जणांचा डेटा, तुला हवं तर पुन्हा डिटेल्स चेक कर. त्याच्या पब्लिशरकडून त्याच्या वडिलांचं नाव मिळालं. घे लिहून, विजय रघुनाथ संत. पण ते आधीच वारलेत.
मग मी त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट शोधून काढलं त्यात त्यांच्या बायकोचं नाव मिळालं. त्यात तिचं मेडन नेम होतं माया रणदिवे मग मी माया संत म्हणून सर्च दिला पण ती सापडली नाही मग मेडन नेमने सर्च केला तर आता तिच्या टॅक्स रिटर्नवर माया रणदिवे- कासेकर असं नाव आहे." उर्वी आ वासून तिच्याकडे पाहतच राहिली, काय भन्नाट पोरगी आहे ही!
"तर मुख्य गोष्ट, ह्या ज्या माया रणदिवे- कासेकर आहेत ना त्यांचा पत्ता मिळाला! आणि त्या मुंबईत राहतात!" आता तर उर्वीला आनंदाने चक्कर यायचीच बाकी होती.
"हे सगळं करताना तू किती सरकारी वेबसाईट्स हॅक केल्या असशील त्याची कल्पना आली मला" ती खोटा खोटा राग दाखवत म्हणाली.
सॅमने उरलेला अर्धा चॉकलेट बार तोंडात कोंबला. "ज्याष्ट नाई, एक दोन स्टेत गवमेंत, एक दोन कॉपोरेशन एवदयाच" चॉकलेटसकट तिने बोलायचा प्रयत्न केला.
"थँक यू सो मच, तू माझं केवढं मोठं काम केलंस तुला कल्पना नाहीये. माझ्याकडून तुला तू म्हणशील तिथे पार्टी पक्की, फक्त मी काम पूर्ण करून परत आल्यावर जाऊ" पुढे होऊन सॅमला मिठी मारत ती म्हणाली.
"जा जाऊन आधी ते बरबटलेलं तोंड आणि हात धू!" आणि लगेचच बाजूला होत ती पुन्हा म्हणाली.
"येस टीचर, बाय बाय टीचर" म्हणून तिला चिडवत सॅम पळून गेली.
हुश्श, फायनली! हातातल्या कागदावरचं नाव आणि पत्ता वाचत ती म्हणाली.
रात्रभर तिला आनंदाने झोपच येत नव्हती. मग पुन्हा एकदा तिने उश्यापासचं 'ऑन माय ओन' उचलून पारायण सुरू केलं तेव्हा कुठे तिला शांत झोप लागली.
सकाळी उत्साहात ती भराभर तयार झाली. पांढऱ्या लेगिंग्स आणि वर बारीक पांढऱ्या फुलांची प्रिंट असलेला लिननचा चॉकलेटी कुर्ता, पायात परवाच्या स्टीलेटोजवर फ्री मिळालेले चॉकलेटी लेदरच्या पट्ट्यांचे फ्लॅट सॅंडल. खांद्याच्या थोडे खाली येणाऱ्या तिच्या अनमॅनेजेबल कुरळ्या केसांना तिने कसेबसे क्लचरमध्ये बसवले आणि बाहेर पडली. वर्सोव्यातल्या एका रो हाऊस कॉलनीतला पत्ता होता. घरासमोर उतरून तिने तळहाताला आलेला घाम कुर्त्याला पुसला आणि बेल वाजवली.
बराच वेळ कोणी दार उघडलं नाही, तिने परत बेल वाजवायला हात वर केलाच होता तेवढ्यात दार उघडले आणि समोर साधारण तिच्या आईच्याच वयाची एक बाई उभी होती.
" माया रणदिवे- कासेकर आपणच का? मला त्यांना भेटायचं होतं." असे कुणा अनोळखी घरी आधी न सांगता जाणे तिला जरा विचित्र वाटत होते पण काही पर्याय नव्हता.
समोरच्या निळा बाटीक कफ्तान घातलेल्या, पांढऱ्या केसांचा बॉयकट असलेल्या उंच बाईंनी चष्म्यातून आपल्या पिवळट घाऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे रोखून पाहिले आणि "येस? कशासाठी??" असे एकदम कडक आवाजात विचारले.
" अं.. आदित्य संत नावाचे लेखक आहेत त्यांच्याशी बाय चान्स तुमचं काही नातं आहे का?" तिने घाईने विचारले.
आता बाईंचे डोळे अजून बारीक झाले होते. "हम्म अजून एक रिपोर्टर!" म्हणत सुस्कारा सोडत त्या अचानक दार लावायला वळल्या.
"एक मिनिट मॅम, मॅम प्लीज ऐकून तर घ्या.." जवळपास ओरडतच तिने पटकन पाय मध्ये घालून दरवाजा थांबवला. पण काय कारण सांगून या कंविन्स होतील हे मात्र आता तिला सुचत नव्हतं. ती तशीच ओठ चावत, विचार करत दारात थांबून राहिली.
आणि माया रणदिवे- कासेकर आता आधीपेक्षाही रागात तिच्यावर नजर रोखून, दार न सोडता तिच्यासमोर ताठ उभ्या होत्या.
क्रमशः
विचार करूनही तिला कुठलीही थाप माराविशी वाटली नाही, त्यामुळे तिने खरेच काय ते सांगून टाकायचे ठरवले.
"यू आर राईट! मी रिपोर्टरच आहे, द सिटी बझ कडून आले आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा इथे येण्याचा माझा हेतू वेगळा आहे." अशी सुरुवात करत तिने तिथे दारातच उभी राहून त्यांना तिची कामाची सुरुवात, सोसायटी पेज, पार्ट्या, खरी पत्रकारिता वगैरे सगळे समजावून सांगितले आणि आदित्यवरची स्टोरी तिच्या करियरसाठी कशी आणि किती महत्वाची आहे तेही सांगितले. एकेक गोष्ट ऐकताना हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचा राग कमीकमी होत जाऊन किंचितसे हसू आले होते. शेवटी हळूच मागे होत ये म्हणून त्यांनी तिला हाताने इशारा केला.
"थॅंक यू, थॅंक यू सो मच.." पुटपुटत ती हळूच आत आली. बाहेरच्या दमट, गरम हवेतून आत एसीची गार हवा लागल्यावर तिला एकदम हायसे वाटले.
त्या दार लावून आत येईपर्यंत ती अवघडून इकडे तिकडे पहात उभी होती. घर, सगळे फर्निचर अगदी चकाचक स्वच्छ होते पण कोपऱ्यातल्या कॅबिनेटवर अर्धवट रंगवलेल्या पणत्या दिसत होत्या.
"इथे डायनिंग टेबलपाशीच बोलू, ये बस" म्हणून खुर्चीत बसून त्यांनी त्यांचे अर्धवट राहिलेले मटार सोलायला घेतले.
"हो चालेल" म्हणत ती त्यांच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसली.
"पाणी?" म्हणत त्यांनी टेबलावरच्या जगमधून पाणी ओतून ग्लास तिच्या हातात दिला आणि ती घटाघट पाणी पितानाच विचारले, "आदित्यबद्दल तुला किती आणि काय माहिती आहे?"
तिने ग्लास ठेवता ठेवता आवंढा गिळत त्यांच्याकडे पाहिले. आज काही करून काहीतरी क्लु मिळायलाच हवा, गिअर अप उर्वी! ती खुर्चीतच ताठ बसली. "मी पुस्तक वाचलं आहे त्यातून जेवढी माहिती कळली तेवढीच आणि शोधताना तुमचं नाव आणि पत्ता मिळाला. मला वाटलं मीच तुम्हाला शोधून काढलं पण आधीच अजून हुशार लोक इथे येऊन गेलेले दिसतात." जीभ चावत ती म्हणाली.
"पण माझ्याकडूनही तुला फार काही मदत होईल असं वाटत नाही. कारण आदित्यला मी शेवटची भेटून सात वर्ष झाली.." त्या उदास सुरात म्हणाल्या. "सात वर्षांपूर्वी त्याचे वडील वारले आणि तेव्हाच त्याने मला पुन्हा कधीच भेटू नको असं सांगितलं होतं, तेव्हापासून आमचा काही कॉन्टॅक्ट नाही."
ओह.. उर्वी आता चक्रावून गेली होती. नक्की आहे तरी कसा हा माणूस... त्याच्या आईच्या डोळ्यात आता स्पष्ट दिसणारी वेदना पाहून तिने त्यांच्या सुरकूतलेल्या हातावर हलकेच थोपटले.
"मी एकदोनदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण मला उडवून लावलं. मग आता मीही या गोष्टीचा जास्त विचार करत नाही."
"मॅम, ते कुठे रहातात याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला?" जरा वाट बघून ती हळूच म्हणाली.
"किन्नौर व्हॅलीजवळ चिटकुल नावाचं एक खेडं आहे, तिथून तीन चार किलोमीटर जंगलात नदीपलिकडे त्याच्या बाबांचं एक घर आहे, घर म्हणजे केबिनच म्हणता येईल. बहुतेक तो तिथे असेल." त्यांनी उत्तर दिले.
ग्रेट! तिने पटकन हा साधारण पत्ता नोटपॅडवर लिहून घेतला. "मी तिथे जाण्याच्या बऱ्याच लिंक्स लावून बघितल्या पण काही उपयोग नव्हता, आता पत्ता मिळाल्यावर मला अजून थोडे प्रयत्न करता येतील."
"तुझं खरं बोलणं मला पटलं, नाहीतर पत्रकार असल्याचं लपवून लोक नेहमी घरात घुसायला बघतात. म्हणून तुला घरात घेतलं." त्या थोडं हसून म्हणाल्या पण लगेच त्यांचा चेहरा उदासवाणा झाला. "आदी काही आता मला आयुष्यभर माफ करणार नाही."
"म्हणजे?"
"कारण थोडं पर्सनल आहे पण आता इतक्या वर्षांनी मोकळेपणी सांगायला हरकत नाही. आदीचे बाबा म्हणजे विजय आणि मी कॉलेजपासून एकत्र होतो. त्याला लहानपणापासून जंगलाचं फार आकर्षण होतं. त्यानुसार त्याने IFS क्लीअर केली आणि मग फॉरेस्ट ऑफिसर म्हणून हिमाचल केडर घेऊन तिकडे गेला. मी पक्की मुंबईकर, शहरी मुलगी! पण तेव्हा प्रेमात इतकी वेडी होते की लग्न करून तिथे जंगलात राहायला तयार झाले. लग्न होऊन लगेच वर्षभरात आदीचा जन्म झाला. एव्हाना विजय त्या एकांतात, त्याच्या कामात मश्गुल होता आणि माझं करियर, माझं असणं सगळंच त्या निर्जन जागेत थांबून गेलं होतं. मी दिवसागणिक अजून अजून खचत होते."
त्या न थांबता पुढे बोलतच राहिल्या. "आदी सात वर्षांचा होईपर्यंत आमचं अजिबात पटेनासं झालं आणि मी सगळं सोडून परत मुंबईला निघून आले. मी आदीला घेऊन येण्यासाठी खूप आर्जवं केली पण त्याने आणू दिले नाही, आदीचाही बाबावर खूप जीव, त्यामुळे तोही राहिला माझ्याशिवाय. मी मुंबईत राहून माझं पीजी पूर्ण केलं मग अमेरिकेत जाऊन एक डिप्लोमाही केला. या सगळ्या मधल्या काळात आमचा डिवोर्स झाला होता. देन.. आय गॉट मॅरीड. अगेन. तेव्हा ही बातमी कळल्यावर विजयने रागाने त्याची अंगठी मला परत पाठवून दिली होती. इतकं सगळं होऊनही त्याचा माझ्यावरचा राग संपला नव्हता. त्याने आदीलाही सारखं वाईट सांगून सांगून त्या रागाचा भागीदार केलं. त्याचा कडवटपणा माझ्या त्या लहान, गोड मुलातही भरून टाकला. पण सात वर्षांपूर्वी त्याला कॅन्सर होऊन कळेपर्यंत तो गेलाच. तेव्हाच मी आदीला शेवटची भेटले. सगळे विधी पार पडल्यावर त्याने रागानेच मला निघून जायला आणि पुन्हा कधीही न भेटायला सांगितले. तीच आमची शेवटची भेट होती. नंतर वर्षभरात माझे हजबंडही हार्ट अटॅकचं निमित्त होऊन अचानक गेले. आता मी पूर्णपणे एकटी झालेय." त्यांच्या डोळ्यात एव्हाना पाणी जमा झाले होते.
"ओह, आय एम सो सॉरी.." उर्वी हळुवारपणे म्हणाली.
"असो, मी काय सांगत होते.. हां मला तुझं खरं वागणं आवडलं आणि म्हणूनच तू जर आदीपर्यंत पोचलीस तर माझं एक काम नक्की करशील याची खात्री वाटली. थोड्या माझ्या स्वार्थासाठीच मी तुला आत घेतलं." आता त्यांचे डोळे चमकत होते.
उठून त्या आत जाऊन आल्या तेव्हा त्यांच्या हातात एक मरून रंगाची मखमली डबी होती.
"ही विजयची एंगेजमेंट रिंग! ही मला आदीला द्यायची होती पण तो आता मी जिवंत असेपर्यंत काही मला भेटत नाही. तुझ्यावर मी विश्वास टाकतेय. तू चुकूनमाकून आदीपर्यंत पोचलीस तर ही अंगठी नक्की त्याला दे आणि ममाने दिलीय म्हणून सांग." डबी उघडून त्यातली प्लेन सोन्याची अंगठी दाखवत त्या म्हणाल्या."
"नक्कीच!" म्हणून तिने ती डबी हातात घेतली.
---
घरी पोहोचल्यावर बेडवर बसून तिने ती अंगठी नीट पाहिली. ती अंगठी बोटात फिरवतानाच तिच्या मनात विचार आला, दिस ईज डेफिनिटली माय टिकेट टू आदित्य संत...
क्रमशः
"तुमने उसे ढुंढ लिया!! सचमे??" फोनवर पलीकडून अना अत्यानंदाने किंचाळत होती. तिचा अजिबात विश्वासच बसत नव्हता.
उर्वी शिमला एअरपोर्टवरच्या तुरळक गर्दीतून एका हाताने आपली ट्रॉली बॅग खेचत, दुसऱ्या हातात सेलफोन धरून अनाला उत्तरे देत होती. बॅगेज क्लेम करून गुळगुळीत फरशीवर तिच्या मिडीयम हिल्स टॉक टॉक वाजवत ती पटापट दाराच्या दिशेने निघाली होती.
"अभी तक ढुंढ नही लिया, बट आय एम क्लोज!" मान वाकडी करून फोन धरत एकीकडे पर्समध्ये काहीतरी शोधता शोधता ती म्हणाली.
"हॅ? और आप हो कहां मॅडम?" तिने लगेच विचारले.
"शिमला एअरपोर्ट! चिटकूल के लिए निकल रही हूँ. आज फ्रायडे है अगर मै मंडेको ऑफिस नही आ पायी तो प्लीज कोई बहाना बना लेना. यहां नेटवर्कमे थोडा प्रॉब्लेम है, मै कॉल या मेसेज करके अपडेट देती रहूंगी."
"क्या क्या क्या?? तुम पहूंच भी गयी, डिमेलो पगला जाएगा जब उसे पता चलेगा." अनाला आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसत होते.
"नो, नो.. अभी उसे मत बताना. अगर सब ठिकसे हुआ और मैने इंटरव्ह्यू लिखा तब फायनली उसे बताउंगी." उर्वीने तिला बजावले.
"ओके! तुम्हारे लिए मेरे फिंगर्स क्रॉस्ड है याद रख और ऑल द बेस्ट!!" अना आज फोनवर किंचाळणे काही थांबवत नव्हती.
"थँक्स! चलो अब रखती हूं, रोमिंग मे हूं." उर्वीने मोबाईल व्यवस्थित प्लास्टिक पिशवीत घालून पर्समध्ये ठेवला. बाहेर प्रचंड थंडी आणि रिमझिम पाऊसही होता. तिने ब्लॅक जीन्स आणि थंडीचा विचार करून पूर्ण बाह्या असलेला पातळ राखाडी टीशर्ट घातला होता, वर पिवळे ऑल सिझन जॅकेट होते. पण मुंबईत गरम वाटणारे हे कपडे इथे काहीच कामाचे नाहीत हे बाहेर पडताच तिच्या लक्षात आले. जॅकेट ऑल सिझन असले तरी त्यात आता सगळीकडून पाणी आत झिरपू लागले होते. जॅकेटचे हूड डोक्यावर ओढून ती पावसातून जवळ जवळ पळतच टॅक्सी स्टँडकडे निघाली.
आदित्यच्या आईने सांगितल्याप्रमाणे तिने दोन तीन टॅक्सीवाल्यांकडे मां शेरोवाली ट्रॅव्हल एजन्सीची चौकशी केली. पुढच्या चौकातच ते ऑफिस सापडले. ट्रॅव्हल एजन्सी कसली एक लहानशी खोली आणि त्यात टेबल, खुर्ची आणि एक कम्प्युटर होता. सकाळची वेळ असूनही तिथे एकही माणूस नव्हता. तिने आत जाऊन बॅग पायापाशी ठेवली आणि वाट बघायला लागली.
तेवढ्यात तिला बाहेर एक माणूस एका जुन्या मारुती जिप्सीच्या खाली झोपून काहीतरी दुरुस्त करताना दिसला. चला, कोणीतरी माणूस आहे इथे म्हणून ती त्याला विचारायला गेली.
"क्या आप बता सकते है मुझे फतेबीर सिंग कहां मिलेंगे?"
"क्यूँ?" त्याने तिथूनच रांगड्या भारदस्त आवाजात विचारले.
"उनसे बात करनी है, कुछ जरूरी काम है. एक ऍड्रेस चाहीए" ती रागाने ताठ उभी राहत म्हणाली.
तो लगेच बाहेर येऊन तिच्यासमोर फडक्याने हाताचे ग्रीस पुसत उभा राहिला. त्याच्या आवाजाच्या अगदी उलट त्याची पर्सनॅलिटी होती. तिच्यासमोर उंच, किडकिडीत, जीन्स आणि टीशर्ट घातलेला साधारण पंचवीशीचा सरदार उभा होता.
"ऍड्रेस चाहीये? कौन हो तुम?" त्याने डोळे बारीक करत विचारले.
"फतेबीर कहां है वो बताओ." ती त्याचे प्रश्न टाळत म्हणाली.
"कहासे आयी हो? रिपोर्टर हो, है ना?" त्याने फडके बाजूला ठेऊन जॅकेट घालता घालता विचारले.
"तुम क्यू पुछ रहे हो ये सब, पता है तो बोलो. मुझे बहुत अर्जंट काम है उससे. उसके एक दोस्त को कुछ चीज पहूंचानी है." ती कशीबशी शांत रहात म्हणाली.
"दोस्तका नाम?"
"आदित्य संत" तिने आता बेफिकीरीने उत्तर दिले.
"पता था!" खांदे उडवत तो म्हणाला आणि तिथून जायला निघाला.
"हेयss हेलोss रुको, मिस्टर फतेबीर कहा मिलेंगे वो तो बताव!" ती आता ओरडलीच.
"अच्छा! अब मिस्टर फतेबीर!" तो वळून तिच्याकडे बघत कुत्सित हसला.
"देखो मुझे सचमे आदित्य को कुछ देना है." ती अजिजीने म्हणाली.
"क्या देना है? सरदर्द?" तो पुन्हा भुवया वर करून म्हणाला.
हूं, व्हेरी फनी. तिचा आता पेशन्स संपला होता आणि त्या फतेबीर माणसाचाही अजून काही पत्ता नव्हता. "उसकी माँ ने कुछ भिजवाया है."
"अच्छा? माँजी का नाम बताओ तो". एव्हाना तो रोड क्रॉस करून चहाच्या दुकानासमोर होता आणि ती त्याच्यामागे पळत तिथे पोहोचली होती.
"माया"
आता त्याने तिच्या डोळ्यात रोखून पाहिले, जरावेळ विचार करून शेवटी त्याने बोलायला सुरुवात केली. "फतेबीर सिंग मै ही हूं!"
"तुम हो?" तिने अविश्वासाने विचारले.
"हां तुम्हारे सामने बंदा खडा है" तो रिलॅक्स होऊन जरासं हसत म्हणाला. "हसनभाय, दो चाय और दो समोसे." त्याने हात वरून करून सांगितले.
"अरे मुझे नही चाहीये.. " ती म्हणेपर्यंत त्याने समोश्याची प्लेट तिच्या हातात दिली.
"जब सरदार खिलाते है, तब ना नही बोलना चाहीये." तो हसून म्हणाला.
तिच्या पोटात तसेही एव्हाना कावळे ओरडत होतेच, तिने न बोलता खायला सुरुवात केली.
समोसा, चहा संपवून ते दोघे ऑफिसमध्ये गेले.
"मै उर्वी, उर्वी काळे. मुंबईसे आयी हूँ." ती समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली.
"तुम्हारे जैसे और बहोत सारे रिपोर्टर्स यहां आ के गए लेकीन मैने किसीको घास नही डाली. आदित्यने उसका पता बतानेसे मना किया हुआ है. वो किसीसे भी नही मिलता. लेकीन तुम आंटी का मेसेज ले कर आयी हो इसलीये सुन रहा हूं."
"हां, मुझे आदित्यसे मिलके पर्सनली बात करनी है. तुम मेसेज नही दे सकते. देखो ये उसकी माँ ने उसे देने के लिए दी है." म्हणून तिने पर्समधून अंगठी काढून टेबलवर ठेवली.
त्याने अंगठी हातात घेऊन नीट बघितली, सोन्याची अंगठी आणि आत लिहिलेली VS ही अक्षरे बघून त्याने अंगठी परत दिली.
"अगर मैने तुम्हे पता बताया, तो तुम्हारा या मेरा मर्डर पक्का है. आहो!" तो दाढी खाजवत म्हणाला.
"एक काम कर सकते है मै तुम्हारी कोई टॅक्सी हायर करती हूं. तुम उसे बोल देना ड्रायव्हर लेके गया करके." तिने त्याला ऑप्शन सुचवायचा प्रयत्न केला.
"अभी तो एक भी गड्डी खाली नही है, सिर्फ वो जिप्सी छोडकर. लेकीन वो भी इतना नही चलेगी. उपरसे उधर जोरोंकी बारीश और बर्फबारी हुई है. रोडपर बर्फ गिरी है इसिलिए सारे रोड्स भी बंद है." तो कम्प्युटर ऑन करत म्हणाला.
शिट! मलाही यायला हीच वेळ मिळाली होती. तिने स्वतःलाच चार शिव्या घातल्या.
"फतेबीर, प्लीज कुछ करो. मेरा आजही उससे मिलना बहुत जरुरी है."
"हम्म, एकही ऑप्शन है. हम यहांसे ये जिप्सी लेके निकलते है. सांगला मे मेरा घर है वहा जिप्सी रखेंगे और चिटकूल तक मेरी बुलेट लेके जा सकते है."
"लेकीन.. इतनी दूर बाईकपर... मैने कभी ऐसा ट्रॅव्हल नही किया." एव्हाना तिचा शूरपणाचा आव गळून पडायला लागला होता.
"देखो अगर तुम आदित्य तक पहूंचना चाहती हो तो सिर्फ यही एक रास्ता है. मुझसे डरो मत. ये मेरा लायसन्स चेक करलो. अब डर तो मुझे लग रहा है, आदित्य मुझे मार डालेगा!" त्याने वॉलेटमधून लायसन्स काढून तिच्याकडे दिले.
तिने वाचून ते परत केले. "जाना तो पडेगा... ठीक है." ती खोल श्वास घेत म्हणाली. "चलो चलते है!"
क्रमशः
"मै पहले उसे बताता हूं, फिर निकलते है. कितनी बरफ गिरी है वो भी जानना पडेगा." खिशातुन सेलफोन बाहेर काढत तो म्हणाला.
"उसे कॉल कैसे करोगे? नेटवर्क नही होगा ना?"
तिने जरा संशयाने विचारले.
"नेटवर्क नही है, लेकीन उसके पास इमर्जन्सी के लिए एक सॅटेलाईट फोन है. पैसे बहोत ज्यादा लगते है लेकीन अब तुमसे बडी इमर्जन्सी क्या हो सकती है!" तो परत ऍटीट्यूड दाखवत म्हणाला.
त्याने चार पाच वेळा प्रयत्न करूनही फोन लागला नाही.
"नही लग रहा, मेराभी नेटवर्क गडबड है शायद. ठीक है और बरफ के पहले पहूचने का ट्राय करते है." त्याच्या अंगात जाडजूड जॅकेट होतंच, आता त्याने कानावर इअरमफ लावले.
"ये कॅप पहन लो और फिर उपरसे हूड डालो" तिला एक लाल पांढऱ्या डिझाईनची जाड लोकरी बीनी देत तो म्हणाला. ऑफिसला कुलूप लावून तो येईपर्यंत तयार होऊन तिने बॅग बाहेर आणली.
बॅग उचलून बॅकसीटखाली ठेऊन तो पुढे येऊन बसला. "अरे एक मिनिट रुको, रुको.." म्हणत ती गाडीतून उडी मारून पटकन खाली उतरली.
"अब्ब क्या है?" त्याने तोंड वाकडं करत विचारलं.
तिने पळत शेजारच्या दुकानात जाऊन दोन तीन क्रीम बिस्कीट, चॉकलेट्स, चिप्स आणि एक पाण्याची बाटली घेतली. परत येऊन त्याला पिशवी दाखवून हसत, अब चलो! म्हणत ती शेजारी बसली. दोन तीन वेळा खर्रर्रर्रर्र, फसस्स असे चित्रविचित्र आवाज करत एकदाची ती जिप्सी सुरू झाली.
शिमल्याच्या बाहेर पडल्या पडल्या बारीक बारीक, वळणदार डोंगरावरची माती घसरलेले रस्ते, इकडेतिकडे उन्हात चमकणारी ओलेती हिरवी, पोपटी सुचिपर्णी झाडे त्यात मधेच एखादे लालभडक सफरचंदानी लगडलेले झाड, रस्त्याकडेला मळलेला काळपट भुश्यासारखा बर्फ, दरीत दिसणारी कुठल्यातरी खेड्यातली लेगोसारखी रंगीबेरंगी घरं, त्यातल्या कुठल्यातरी घरातून निघणारी धुराची एक बाळसेदार रेघ हे दृश्य थोड्याफार फरकाने दहा किलोमीटर गेले तरी कायम होते. नऊला निघालो असलो तरी बर्फामुळे सांगलापर्यंत पोहोचायला जवळ जवळ तीन - चार वाजणार होते आणि तिथून दीड दोन तासात त्याच्या केबिनपर्यंत! तिच्या चेहऱ्यावर आता आनंद, उत्सुकता, भीती सगळ्याचं मिश्रण होतं.
"उघ, फत्ते प्लीज साईडमे रोको एक मिनिट.." ती पाण्याची बाटली उचलत म्हणाली.
त्याने लगेच गाडी थांबवली. कशीबशी उतरत रस्त्याकडेला जाऊन पोटातल्या मळमळीला तिने वाट करून दिली आणि खळखळून चूळ भरली.
"सॉरी, ऐसे रोड्स की आदत नही है." त्याच्याकडे बघून ती कसंबसं हसली.
"हम्म होता है, अब ठीक हो?" त्याने तिच्या हातात दोन तीन पॉपिन्सच्या गोळ्या ठेवल्या.
"पॉपिन्स! मुझे वो पर्पल चाहीये" ती हसून म्हणाली आणि त्याने गाडी पुन्हा सुरू केली.
रात्रीचा सगळा प्रवास आता तिच्या अंगावर आला होता. सीटबेल्ट लावून तिने मागे डोके टेकून डोळे मिटले.
"म्युझिक चलाऊ? लेकीन एकही सीडी है, वो भी पंजाब्बी." तो वळून बघत म्हणाला.
"हम्म. कुछ भी चलेगा, मुझे सोना है अब" ती मिटल्या डोळ्यांनीच म्हणाली.
त्याने सीडी लावून आवाज अगदी कमी केला. जिप्सी हळूहळू रब्बी शेरगिलच्या 'बुल्लाह की जाणा मै कौन'च्या आवाजाने भरून गेली.
तिने डोळे उघडून "थँक गॉड, मुझे लगा हनी सिंग होगा" म्हटल्यावर तो जोरजोरात हसला.
"इसके बाद हो भी सकता है!" म्हणून तो परत हसायला लागला.
तिने तोंड वाकडं करून दाखवलं आणि पुन्हा डोळे मिटले.
---
"उर्वीss उर्वीss" तिच्या कानाजवळ येणाऱ्या हाकाऱ्यांनी तिला जाग आली. "लडकी हो या कुंभकरण! दस बार चिल्लाया तब जाके तुम उठी हो!"
तिने डोळे चोळत, जांभई देत त्याच्याकडे पाहिले. गाडी रस्त्याकडेला थांबलेली होती.
"हम सांगला पहूंच गये है. शुकर है रस्ते मे बरफ नही मिली तो जलदी पहूंच गये. लेकीन आगे बरफ गिरनेवाली है, हमे जल्द से जल्द निकलना है. हम गाव के अंदर नही जा रहे, नही तो मेरी माँ और बीबीजी तुमचे खाना खिलाके ही छोडेंगे. इतना टाइम नही है. मेरा छोटा भाई बुलेट लेके आ रहा है, यहीसे जिप्सी उसे दे देंगे और हम चिटकूल के लिए निकलेंगे." तो सांगत असतानाच बाहेर त्याचा भाऊ येऊन थांबला. तो उतरून भावाला भेटेपर्यंत तिने गाडीमागे जाऊन बॅग काढली आणि बुलेटजवळ जाऊन थांबली. फतेबीर किल्ली हातात फिरवत तिच्याजवळ आला आणि तिची बॅग उचलून दोरीने कॅरियरला बांधून टाकली.
बुलेटवर बसून निघाल्यापासून हेल्मेटमुळे तिचा चेहरा सुरक्षित होता पण भणाणणारा वारा आणि जोरदार टाचणीसारखा टोचणारा पाऊस याने तिला हुडहुडी भरली होती. वळणदार रस्ते इथेही होतेच पण इथे जेमतेम एक गाडी जाण्याएवढा बारीकसा रस्ता, एका बाजूला कधीही दगडमाती अंगावर कोसळेल असे डोंगर आणि एकीकडे प्रचंड खोल दरी! ती अजिबात इकडेतिकडे न बघता समोर रस्त्यावर फोकस करत होती. तासाभरात ते चिटकूल जवळ पोचले आणि हळूहळू वरून कापसासारखा बर्फ पडायला सुरुवात झाली.
"शिट!" म्हणत त्याने गाडी थांबवली.
"उर्वी सुनो, एक काम करना पडेगा. बरफ गिरनी शुरू हो गयी है मै और रुक नही सकता, लौटना पडेगा. नही तो रोड बंद हो जाएगी." तो उतरून पटापट तिची बॅग सोडवायला लागला.
"लेकीन आदित्य का घर कहा है? तुमने घरतक छोडने का प्रॉमिस किया था!" ती कंबरेवर हात ठेवून ओरडत होती. आता वाऱ्याचे रूपांतर हळूहळू वादळात होत होते.
"अरे सुनो तो, घर यही पास मे है हार्डली पांच सौ मीटर होगा. वो ब्रिज दिख रहा है? वो क्रॉस करो और सीधे चलती जाओ. डेड एन्ड आयेगा वही उसका घर है. मै ब्रिजपर बाईक नही ला सकता, बर्फ जमी है, स्लीप होने का खतरा है. प्लीज तुम्हे चलके जाना पडेगा और कोई ऑप्शन नही है." वाऱ्यातून तो ओरडून बोलत होता.
तिने उजवीकडे पाहिले, फसफसून वाहणाऱ्या नदीवर हिरव्या रंगाचा लोखंडी पूल होता आणि पुलापलिकडे काळोखे निबिड जंगल. एव्हाना तिचे हात पाय थंडीने बधिर व्हायला लागले होते.
"डरना मत, कुछ नही होगा. जलदी जाओ. मै कल शाम तक तुम्हे वापस लेने आता हूं. बाय बाय" तो बाईक वळवत म्हणाला.
"ठीक है.. बाय.." कुडकुडत तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
ती बॅग खेचत ब्रिजवर गेली. त्याने म्हटल्याप्रमाणे तिथे बर्फ जमलाच होता. ती हळूहळू तिच्या ओपन सँडल्समुळे जितकं पटापट चालता येईल तेवढं चालत पुढे कच्च्या रस्त्यावर पोहोचली. तिथे बर्फात पाय रुतत होते आणि त्याचवेळी घसरतही होते. वरून जोरदार वारा आणि बर्फाचा मारा सुरूच होता. एव्हाना तिचे जॅकेट आणि जीन्स पूर्ण भिजून तिचाच बर्फ व्हायला लागला होता. समोर अंधार पडायला लागल्यामुळे बर्फातून हातभर अंतरावरचेही काही दिसत नव्हते. काळोखात जोरजोरात हलणारी काळपट झाडे बघून भीती वाढत होती.
"गुर्रर्रर्र" अचानक तिच्या उजवीकडून गुरगुरल्याचा भयानक आवाज आला.
तिने त्या दिशेला मान वळवली तर एक लांडगा दबा धरून टोकदार सुळे विचकत तिच्याकडे रोखून पहात होता. कुठल्याही क्षणी हा उडी घेत आपल्यावर येऊ शकतो या विचाराने ती किंचाळून मागे मागे जायला लागली. तिची हालचाल बघून तोही हळूहळू तिच्या दिशेने यायला लागला. त्याच क्षणी तिचे सँडल्स बर्फावरून घसरले आणि ती तशीच पाठीवर कोसळली. किंचाळत तिने डोळे घट्ट मिटून घेतले. एव्हाना तिच्या चेहऱ्यावर आणि पापण्यांवरही बर्फ जमू लागला होता.
क्रमशः
मी अशी हार मानणार नाही, मी शेवटपर्यंत लढेन.. म्हणत तिने डोळे उघडेपर्यंत तो लांडगा तिच्यापर्यंत पोचला होता. तिच्या गळ्याजवळ त्याचा धापापता गरम श्वास जाणवला. आणि ती जोरदार किंचाळली.
"सीडर, सिट!" अचानक समोरून मोठा, गंभीर आवाज आला.
अचानक तो गरम श्वास नाहीसा होऊन तिथे पुन्हा बर्फाचे कण जमू लागले. ती धडपडत कशीबशी अर्धवट उठून हातांवर रेलली तेव्हा समोरच्या अंधुक काळोखातून एक आकृती तिच्या दिशेने येताना दिसत होती. त्याच्या अवतीभवती वारा आणि बर्फ घुमत होता त्यामुळे चेहरा दिसत नव्हता, तरीही त्याचे मजबूत पाय झपाट्याने अंतर कापत होते.
त्याच्यावरून नजर तिने शेजारी बसलेल्या प्राण्याकडे वळवली तेव्हा तिच्या लक्षात आले की तो लांडगा नाही फक्त तसा दिसणारा एक भलाथोरला ब्राऊन हस्की आहे. हुश्श, तिने निःश्वास टाकला तेव्हा तिच्या नाकातोंडातून फक्त थंड वाफा निघाल्या. गारठून आवाज तर गायबच झाला होता.
सीडर आता बसल्याबसल्या त्याच्या मालकाकडे बघून जोरजोरात शेपूट हलवत होता.
त्याचा मालक!
आदित्य संत सोडून कोण असणार हा!
तिचे हृदय आता धडधडून बाहेर येईल परिस्थिती होती आणि ती डोळे फाडून त्याच्याकडे बघत होती.
तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला तेव्हा त्याची उंची आणि जाडजूड जॅकेट, डोक्यावरचे फर लायनिंग असलेले हूड, जड मोठेमोठे बूट्स यामुळे तो खूपच भलामोठा, रांगडा दिसत होता.
कपाळापर्यंत हुड आणि बऱ्यापैकी वाढलेली दाढी यामुळे त्याचा चेहरा दिसतच नव्हता पण त्याचे खोल, गडद धारदार डोळे तिच्या आतपर्यंत चिरत जात होते. तो प्रचंड चिडला असणार पण बर्फामुळे तिला त्याच्या चेहऱ्यावरचे कोणतेच भाव दिसत नव्हते. आत्तातरी त्या लांडगा कम कुत्र्यापेक्षा त्याचा मालकच जास्त भयंकर वाटत होता.
"हू आर यू?" त्याने ओरडून विचारले तरी त्याचा आवाज भणाणत्या वादळात कुठेच विरून गेला. शेवटी खाली वाकून त्याने हात धरून तिला उठून उभे केले पण बधिर झालेले पाय आणि ते सॅंडल या मूर्ख कॉम्बोमुळे ती पुन्हा घसरली. ती बर्फात पुन्हा वेडीवाकडी कोसळणार इतक्यात त्याने तिच्या कंबरेला धरून तिला परत उचलले. त्याने रागाने मान हलवत तिच्याकडे बघितले आणि तिला काही कळायच्या आत ती पोत्यासारखी त्याच्या खांद्यावर टाकली गेली होती. तो चिडून लांब लांब ढांगा टाकत भराभर चालत होता.
तिची लोकरी टोपी पडू नये म्हणून तिने ती हातात पकडून ठेवली. आता लोंबणारे गोठलेले केस वाऱ्यामुळे सटासट तिच्या चेहऱ्यावर आपटत होते. खाली फक्त वेगाने मागे जाणारा बर्फ दिसत होता. तिने विरोध करायचा प्रयत्न केला पण ना तिचे हातपाय हलत होते ना तोंडातून आवाज फुटत होता. "म.. माझी बॅग.." ती पुटपुटली पण ते त्यांच्यापर्यंत पोचणे शक्यच नव्हते. तिने मान थोडी वळवली तेव्हा त्याचा बॅग खेचत नेणारा दुसरा हात तिला दिसला. त्याने तिला एखादी चिध्यांची बाहुली उचलावी तसे उचलले होते आणि तिची बॅग त्याच्या हातात खेळण्यातली असल्यासारखी वाटत होती. सीडर जोरदार उड्या मारत एव्हाना त्याच्या मालकाच्या पुढे पोहोचला होता पण मालकाच्या एका इशाऱ्यावर तो नक्कीच माझ्या चिंध्या करू शकतो... विचारानेच तिचा थरकाप झाला.
ते केबिनपाशी पोहोचेपर्यंत ती डोक्यापासून पायापर्यंत कुडकुडत होती. आदित्यने आत येऊन पायानेच दार बंद केले आणि तिला खाली उतरवले. तिचे डुगडुगणारे पाय बघता त्याने तशीच तिला कंबरेला धरून नेऊन छोट्याश्या डायनिंग टेबलसमोरच्या खुर्चीत बसवले.
"हू द हेल आर यू? यहां क्या कर रही हो??" तिच्यासमोर विठोबासारखे कंबरेवर हात ठेवून उभा राहत त्याने ओरडून विचारले.
तिने बोलायला तोंड उघडले पण थंडीने तिचे दात एकमेकांवर आपटत होते. घशातून शब्द फुटत नव्हता. केबिनमधल्या गरम हवेने तिचे गोठलेले केस वितळून पाण्याचे ओघळ अंगावर वहात होते. ओलेत्याने सपाट चिकटलेले केस पुन्हा त्यांचा गोल गोल कर्ली आकार धारण करत होते. नशिबाने कोपऱ्यातल्या फायर प्लेसमुळे आत तरी थंडी अजिबात नव्हती. ही केबिन सुंदरच होती. बाहेरून लाकडी रस्टीक लूक असला तरी आतले भरलेले बुकशेल्वस, जाड लोकरी हॅन्डमेड रग्ज आणि लाकडी मजबूत फर्निचर बघून तिला खूपच आश्चर्य वाटलं होतं.
"क्या करने आयी हो यहां?" त्याने पुन्हा वाकून तिच्या चेहऱ्यासमोर येत विचारले.
"अं.. माय नेम.."
"आय डोन्ट केअर व्हॉट युअर नेम इज!" ओरडून आता राग सहन होत नसल्यासारखा तो एक जुनाट गॅस शेगडी ठेवलेल्या ओट्याकडे गेला आणि एका किटलीत पाणी तापत ठेवले. ती पांढऱ्या पडून सुरकूतलेल्या हातांची घट्ट घडी घालून स्वतःलाच सावरत होती.
एखाद्या घाणेरड्या वस्तूकडे पहावं तसं आठ्या पाडून तो तिच्याकडे बघत होता. "गीले कपडे चेंज कर लो." तो हळू आवाजात गुरगुरत म्हणाला.
तिचे कपडे तिथल्या वातावरणाला सुटेबल नव्हते हे सांगण्याची गरज नव्हती. ती काल त्याच्या आईला भेटल्यापासून तिचं आयुष्य म्हणजे एक रोलरकोस्टर राईड झाली होती. रात्री उशिराच्या फ्लाईटवर आश्चर्यकारकरित्या मिळालेले बुकिंग, शिमल्याला येणे, तिथून दिवसभर प्रवास करून काळोख पडताना इथे पोहोचणे या सगळ्या गडबडीत तिने जरी दोन तीन पातळ स्वेटर आणि टीज पॅक केले असले तरी ते मुंबईच्या नसलेल्या थंडीलाच सुटेबल होते.
तिने थरथरत्या हातांनी झिप उघडून ओले जॅकेट आणि चिंब भिजलेला तिचा नवा स्कार्फ काढून ठेवला. गोठलेल्या हातांनी तिला सँडल्सचे बक्कल उघडता येत नव्हते. शेवटी तो येऊन गुडघ्यावर बसला आणि बक्कल उघडून त्याने सँडल्स काढले. ते मऊ होण्यासाठी फायरप्लेस समोर ठेऊन तो आत निघून गेला.
काही वेळात पुन्हा बाहेर येऊन तिच्यासमोर लोकरीचे जाड सॉक्स धरले. तिने काही न बोलता ते घेऊन पायात घातले. जास्त वापर नसल्यामुळे टणक झालेल्या फॅब्रिक सोफ्यावर टाकलेला एक जाड स्वेटर त्याने तिच्यासमोर ठेवला. तिच्यासारख्या दोन जणी आरामात मावतील असा तो लूज स्वेटरही तिने अंगात अडकवून टाकला.
त्यांच्यात एका शब्दाचेही संभाषण झाले नव्हते, तरीही त्याचे वागणे ती लेखात लिहिण्याच्या दृष्टीने नीट निरीक्षण करून लक्षात ठेवत होती. पिळदार शरीर असले तरी थंडीचे जाड कपडे काढल्यावर आता तो तितकाही प्रचंड मोठा दिसत नव्हता. त्याचे काळेभोर वेव्ही केस मानेपर्यंत वाढले होते. चेहरा टीपीकली हँडसम म्हणावा असा नव्हता. नाक जरा जास्त मोठं होतं आणि ओठ जरा जास्त पातळ. बाकी वाढलेल्या दाढीमुळे काहीच दिसत नव्हतं. उंची आणि एवढे मसल्स असले तरी त्याच्या चालण्या, वागण्यात एक ग्रेस, चपळपणा, एक रॉ अपील होते जे कुणाचेही लक्ष वेधून घेईल.
पाणी पूर्ण उकळल्यावर त्याने एका मोठ्या मगमध्ये फेटून ब्लॅक कॉफी बनवली आणि एकही शब्द न बोलता तिच्यासमोरच्या टेबलवर मग आणून ठेवला. तिनेही पडत्या बर्फाची आज्ञा मानून दोन्ही हातात गरम मग धरून पटकन वाफाळत्या कॉफीचा घोट घेतला. ओठांना चटका बसूनही तिला एकदम खूप बरं वाटलं. तो तिच्यापासून अगदी लांब सोफ्यावर खिडकीबाहेर घोंगावणारे वादळ बघत बसला होता जसे काही तिच्यापासून शक्य तितक्या दूर अंतरावरच रहायचे आहे.
सीडर आता फायरप्लेस समोरच्या लांबट विणलेल्या रगवर मजेत पाय पसरून पडला होता. आधी ती जितकी घाबरली त्याच्या अगदी उलट तो एखाद्या टेडी बेअरसारखाच वाटत होता. ती केबिनमधल्या वस्तूंचे निरीक्षण करत होती. केबिनमध्ये लाईट्स होते पण त्यांचा उजेड फार कमी पडत होता. फायरप्लेस शेजारी लाकडांचे तुकडे व्यवस्थित रचून ठेवलेले होते. सगळ्याच वस्तू बेसिक पण हॅन्डमेड होत्या. जड लाकडाच्या टेबल खुर्च्या, कॅबीनेटस, किचन एरियात दोन मोठी कपाटं, एक जुनाट फॅब्रिक सोफा आणि एक भिंत पूर्ण व्यापून पुस्तकांनी खचाखच भरलेला लाकडी रॅक.
सो आदित्य संत इज अ रीडर! शक्य तेव्हा ही पुस्तकं बघितली पाहिजेत म्हणजे पुस्तकांच्या निवडीवरून याच्या आवडी निवडी नक्कीच कळू शकतील.. मेंदूपर्यंत पोचलेल्या कॅफेनने तिचे विचारचक्र आता जोरदार सुरू केले होते.
क्रमशः
"हाय, मी उर्वी." काहीतरी सुरुवात करायला हवी म्हणून ती बोलू लागली. तिने स्वतःहून पुढाकार घेतल्यावर कदाचित तो उत्तर देईल अशी आशा होती. "उर्वी काळे."
तो जराही हलला नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच बाहेर बघत राहिला.
गरमागरम कॉफीमुळे आता तिच्या जिवात जीव आला होता. अर्धा झालेला मग घेऊन ती उठली आणि सरळ त्याच्या सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसली. इथे फायर प्लेसची मस्त उबदार हवा होती. "न सांगता आल्याबद्दल आय एम रिअली सॉरी.." ती त्याच्याकडे बघून म्हणाली.
"कोणी आणलं तुला?" तो तिच्याकडे न बघताच रागाने म्हणाला.
"फतेबीर सिंग. तो तुम्हाला कॉल करत होता पण-"
"कितीला विकत घेतलं त्याला?" तिचे बोलणे मधेच तोडत तो म्हणाला.
"वेल.. अजून तरी मी त्याला पैसे दिले नाहीत. तो उद्या मला परत न्यायला येईल त्यानंतर बघू."
तो नाक फुगवून हसला.
त्याला नक्की काय म्हणायचं आहे तेच तिला कळत नव्हतं. तो काहीच बोलत नाहीसे बघून ती पुन्हा इंटिरियरचे निरीक्षण करू लागली. अचानक तिचे लक्ष कोपऱ्यातल्या लहान टेबल खुर्चीकडे गेले. तिथे एक लॅपटॉप, लहानसे स्पीकर्स आणि एक छोटेसे रेडिओसारखे काहीतरी सेटअप करून ठेवलेले होते. ओह, जर याचा इमेल ऍड्रेस मिळाला असता तर मी मेल वरच इंटरव्ह्यू द्यायला कंविन्स करू शकले असते. हम्म, किंवा नसते. ती डोळे बंद करून विचार करत होती.
"हे घर छान आहे, सगळ्या सोयी आहेत. लॅपटॉप पण आहे. पण मला आश्चर्य नाही वाटलं कारण तुम्ही पब्लिशरबरोबर कॉन्टॅक्ट इमेल थ्रूच करत होतात. हे मला पक्के माहिती आहे."
तरीही हा माणूस एक शब्द बोलत नाहीये. हा असा एकतर्फी संवाद काही उपयोगाचा नाही.
"आय रेड योर बूक." तिने प्रयत्न सोडला नाही. "नॉन फिक्शन असलं तरी माझ्यासारख्या कधी शहराबाहेर न राहिलेल्या लोकांसाठी त्या गोष्टी फिक्शनलच आहेत. आय जस्ट गॉट लॉस्ट इन इट. खूप सुंदर लिहिलंय. तुम्ही वाचकांना ते त्या अनोळखी जागी घडणाऱ्या, आधी कधीही न जगलेल्या गोष्टीचा भाग असल्यासारखं वाटायला लावता हे खरंच ग्रेट स्किल आहे. माझ्या वडिलांनी माझ्या खूप आधी वाचलंय ते पुस्तक, ते तर फार फॅन झालेत तुमचे. ऑन माय ओन खूप महिने बेस्टसेलर लिस्टवर आहे हे माहितीच असेल ना तुम्हाला?" आपण एकट्याच खूप वेळ बडबडतोय याची तिला अचानक जाणीव झाली आणि तिने तोंड बंद केले.
थोडावेळ त्याचं लक्ष नाही बघून तिने वेडीवाकडी तोंडं करून त्याला चिडवूनही दाखवले. आता पुढे काय म्हणून डोकं खाजवून ती पुन्हा बोलायला लागली.
"थँक गॉड तुम्ही मला अगदी वेळेवर वाचवलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं." तरीही आजूबाजूला सगळं शांतच होतं. "खरं तर फते इथे तुम्हाला भेटून मला सोडून जाणार होता पण अचानक बर्फ सुरू झाल्यामुळे त्याला गडबडीत निघावं लागलं. रस्ते बंद होण्याआधी त्याला सांगलीला पोचायचं होतं."
"सांगला" त्याने दुरूस्ती केली.
"अरे हो सांगला, सॉरी!" समोरून काही प्रतिसाद नसताना अशी खोटीखोटी उत्साही बडबड करणं फार टफ होतं.
"तुम्हाला नक्की उत्सुकता असेल ना की मी तुम्हाला शोधून कसं काढलं?" तिने आता टेक्निक बदललं. प्रश्न विचारून तरी उत्तर मिळेल अशी आशा होती.
शांतता. ती चुकीचा विचार करत होती. ती कुठल्याही मार्गाने प्रयत्न करुदे, आदित्य संतला तिच्याशी बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.
"तुम्हाला बोलायचं नसेल तरी ठीक आहे. मी समजू शकते. आय मीन, मी अशी अचानक तुमच्या शांत आयुष्यात घुसखोरी केली हा आगाऊपणाच आहे .. अगेन, आय एम व्हेरी सॉरी."
आता घरभर एक अस्वस्थ शांतता पसरली होती. मोठ्या स्पीकरवर फक्त बेस घुमत रहावा असा ताण दोघांच्यामध्ये जाणवत होता. तिला आता गप्प बसवत नव्हतं. एवढी सगळी अडथळ्यांची शर्यत पार करून ती इथपर्यंत पोचली होती. आता ती हार तर नक्कीच मानणार नव्हती.
"तुमचा विश्वास बसणार नाही, मी कायकाय जुगाड करून तुमच्यापर्यंत पोचलेय!" पण हे सगळं आता वरवरचं वाटत होतं. तो जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत तिच्या फक्त इथे पोचण्याला काही अर्थ नव्हता.
सीडर पंजे टेकवून बसून तिच्यावर सलग लक्ष ठेऊन होता. ती उठून त्याच्यासमोर जाऊन जरा लांबच गुडघे टेकून बसली. "गुड बॉय! तू एकदम गोडूला कुत्तु आहेस, हो ना?" तिने हळुवार आवाजात सीडरला मस्का मारत म्हटले.
मालकासारखंच सीडरने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. फक्त त्याची नजर तिच्या प्रत्येक हालचालीवर होती. आदित्यचा थंड प्रतिसाद बघता तिला कोणाचीतरी सोबत हवीच होती. या क्षणी तिला सीडरकडून जी काही कंपनी मिळेल ती हवी होती.
"तू इतक्या जोरात धावून मला हार्ट अटॅक देणार होतास, माहितीये?" ती हळूच त्याच्यासमोर हात धरत म्हणाली, म्हणजे त्याला कळावं की तिचा उद्देश त्याला गोंजारायचा आहे.
"चावतो तो" आदित्य तुटकपणे मोठ्याने म्हणाला. सीडरने एकदा त्याच्याकडे बघून पुन्हा तिच्याकडे नजर वळवली.
हुंह, असं झालं तर ते बघून खूषच होणार तू.. मनात म्हणून तिने सीडरकडे बघून डोळे फिरवले.
"तू एक बिग बॅड वूल्फ आहेस ना?" तिने पुन्हा हळूवारपणे विचारले. "मी अजिबात त्रास नाही देत, माझा फ्रेंड होशील?"
सीडरने एक जांभई देऊन पंजे लांब करून त्यावर डोके टेकले. आणि अचानक आश्चर्यकारकरित्या शेपटी हलवली. फक्त एकदाच, पण तेवढ्याने तो तिला शत्रू मानत नाही हे तिच्यापर्यंत पोहोचले.
"येस्सss" ती आनंदाने ओरडलीच. आणि तिने पुन्हा तिचे हात सीडरसमोर धरले.
"मी तुझ्याजागी असतो तर हे नक्कीच करणार नाही." त्याने तिला पुन्हा वॉर्न केले.
तिने पटकन हात मागे घेतले.
सीडरने त्याचे भलेमोठे डोके वर उचलून तिच्याकडे, तिच्या डोळ्यांत पाहिले आणि त्याची शेपटी हलायला लागली. यावेळी तो सलग शेपूट हलवत तिला जणू सांगत होता की ती विश्वास ठेवणार असेल तर तो तिच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे.
तिने आनंदाने त्याच्या डोक्याच्या दाट फरमधून हात फिरवला आणि तो विरोध करत नाहीये बघून तिने त्याच्या मानेला मिठीच मारली. थँक्स सीडर.. ती हळूच त्याच्या कानात म्हणाली आणि पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला गोंजारायला लागली. तोही पठ्ठ्या डोळे मिटून उं, उं आवाज काढत लाड करून घेत होता.
"अजून एक धोकेबाज!" आदित्य तोंडातल्या तोंडात पुटपुटतला.
"फत्ते धोकेबाज नाहीये." ती ठामपणे म्हणाली. "आणि सीडरसुद्धा."
आदित्यने नाक उडवून आपल्या कॉफीचा एक घोट घेतला.
"आदित्य.. अम्म.. मिस्टर संत.." तिने पुन्हा सुरुवात केली. तरी मिस्टर संत काहीच्या काही फॉर्मल वाटत होतं.
क्रमशः
"हम्म तर माझ्याबद्दलचा तुमचा अंदाज बरोबरच आहे. मी एक पत्रकार आहे आणि मुंबईच्या 'सिटी बझ'साठी काम करते. मी सोसायटी पेजसाठी लिहिते. हा विषय माझ्या आवडीचा नसला तरीही हे काम मला मिळालं यासाठी मला खरंच कृतज्ञता आहे. मी बऱ्यापैकी चांगली रिपोर्टर आहे आणि मला फक्त एक संधी हवी आहे ज्यात मी प्रूव्ह करू शकेन की माझ्यात झगडणारी खरी माणसं, त्यांच्या खऱ्या स्टोरीज जगासमोर आणण्याची क्षमता आहे. सेलिब्रिटी पार्टीज, कोण कुणाशी अफेअर करतंय, कोण लग्न करतंय हे लिहून मला आता प्रचंड कंटाळा आलाय. इतका कंटाळा की मी ही नोकरी सोडण्याच्या तयारीत होते पण माझ्या एडिटरने मला अट घातली की मी या नोकरीत थांबले आणि तुमची मुलाखत घेण्यात सक्सेसफुल झाले तर ते मला हव्या त्या असाईनमेंट्स देतील. पण हे किती नेक्स्ट टू इम्पॉसिबल काम आहे हे मला तेव्हा माहीत नव्हतं."
एकदा सगळं एक्स्प्लेन करून सांगायला लागल्यावर ती बोलतच सुटली. ती एवढ्याच आशेवर होती की तिची पूर्ण गोष्ट कळल्यावर तरी आदित्य काहीतरी को-ऑपरेट करेल.
शेवटी त्याला कुणा ना कुणाला तर मुलाखत द्यावीच लागेल, मग तिला का नाही. तिने त्याला शोधून काढले यातून तिची क्षमता थोडी तरी जाणवतेच. त्याच्या पुस्तकाला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली होती. लोक त्याला पर्सनली जाणून घ्यायला प्रचंड उत्सुक होते. त्याची बाहेर किती क्रेझ आहे याची बहुतेक त्याला इथे जाणीवच नाहीये. तिने विचार करत पुढे बोलायला सुरुवात केली.
"समजा तुम्ही मला मुलाखत नाहीच दिली आणि मी निघून गेले तरीसुद्धा जशी मी तुम्हाला शोधू शकले तसे अजून लोकही शोधू शकतात..."
त्याने आता धारदार नजरेने तिच्याकडे रोखून बघितले.
"योर बुक इस अमेझिंग! आणि लोकांना ऑन माय ओन मागचा माणूस जाणून घ्यायचाय. त्यात त्यांची काय चूक? तुमच्या वाचकांना तुम्ही का समजून घेत नाही? पुस्तक प्रसिद्ध करताना हे तुम्हाला जाणवलं असेलच ना?"
तरीही तो शांतपणे बसून होता. तिने आता नवीन तंत्र वापरायचे ठरवले. कदाचित त्याला तिच्याबद्दल दया वाटून तो तयार होईल..
"मी दिवाळीत एकदाच मोठी सुट्टी घेऊन माझ्या आईबाबांना भेटते. वर्षातून एकदाच एवढा मोठा वेळ आम्ही एकमेकांबरोबर मजेत रहातो. पण ह्या मुलाखतीसाठी मी ती सुट्टीसुद्धा कॅन्सल केली. कारण ही मुलाखत मला त्या सुट्टीपेक्षा जास्त महत्वाची वाटली. माझं सगळं फ्युचर करियर ह्या मुलाखतीवर अवलंबून आहे."
बोलता बोलता ती त्याला निरखत होती पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नव्हते.
"आता तुला माझ्याकडून सिम्पथी हवी आहे का?"
"हा! असं काही नाही. अम्म्म.. हो, मेबी थोडीशी.." ती जीभ चावत म्हणाली.
त्याने डोळे मिटून मान हलवली.
"हं! आपण एक काम करू शकतो. मी लेख लिहून तुम्हाला वाचायला देईन, तुम्ही तो वाचून ओके केला तरच तो पुढे छापायला देईन. तुम्हाला आर्टिकल पसंत नाही पडलं तर ते छापलं जाणार नाही." ती उत्साहाने म्हणाली.
" तुला खरंच वाटतं मी ह्याच्यावर विश्वास ठेवीन?" तो डावी भुवई उचलून म्हणाला.
"ऑफ कोर्स! मी शब्दाला पक्की मुलगी आहे."
"अजून तरी अशी एकही स्त्री मला भेटलेली नाही." त्याच्या शब्दांतून तिरस्कार ओघळत होता. तो उठून लॅपटॉपच्या टेबलकडे गेला. खुर्ची खेचून बसत त्याने हेडफोन लावला. एकदोन स्विच दाबले आणि सॅटेलाईट फोन सुरू केला.
त्याने नक्की फतेबीरला कॉल केला असणार हे तिला लगेच क्लिक झाले. तिला फक्त एकतर्फी संभाषण ऐकू येत असले तरी मुख्य मुद्दा तीच आहे हे न कळायचा प्रश्नच नव्हता.
"ये कोई जोक नही है.. मुझे बिलकुल हसी नही आ रही."
बहुतेक पलीकडे फतेबीर या गोष्टीवर काहीतरी थट्टा करत असावा.
" नही चाहीये यार तेरा फेवर! यहां एक लेडी, वो भी एक लेडी रिपोर्टरको छोडके जाना ये कोई फेवर नही है." तो ओरडून म्हणाला.
"नही. उसको क्या पता है, क्या नही इससे मुझे कोई लेनादेना नही है. -- नही, मुझे कुछ नही सुनना."
"मेरी लास्ट वॉर्निंग है, अगले चौबीस घंटे है तुम्हारे पास. आके ले जाओ उसे यहांसे."
थोडावेळ शांतता पसरली. तो वैतागून दाढी खाजवत होता.
अचानक टेबलवर हात आपटत तो ओरडला, " नो! आय डोन्ट केअर. बर्फबारी! डोन्ट टेल मी, सब तुम्हारी गलती है."
हे ऐकून उर्वी फार चिंतेत पडली. तिला ह्या संताबरोबर एकटं ह्या केबिनमध्ये अजिबात राहायचं नव्हतं. फटाफट इंटरव्ह्यू घेऊन आपण निघू हा तिचा प्लॅन होता. तिकडे दिवाळीमुळे फिल्मी दिवाळी पार्ट्या शेड्युल झाल्या होत्या आणि तिला त्या कव्हर करणं गरजेचं होतं. जर ती इथे राहिली तर हा इंटरव्ह्यू तरी मिळाला पाहिजे तरच डिमेलो तिला सूट देईल. इथे ती थोडाच काळ असली तरी संताबद्दल एक इंटरेस्टिंग लेख आरामात लिहू शकेल याची तिला खात्री होती.
"चौबीस घंटे!" जोरात ओरडून त्याने रागाने हेडफोन काढून टेबलवर आपटला आणि फटाफट सगळे स्वीचेस बंद केले.
उर्वी घाबरून काही न बोलता, शांतपणे जशी होती तशीच बसून राहिली.
आदित्य लाकडी फ्लोअरिंगवर धाडधाड पावलं वाजवत सोफ्याकडे गेला. उभ्या उभ्याच उरलेली कॉफी एका घोटात पिऊन तो कॉफी मग विसळायला सिंकपाशी गेला. अचानक तिला आपल्या हातातल्या रिकाम्या मगची जाणीव झाली. ती उठून लगोलग त्याच्या मागे निघाली. तिच्या जाड सॉक्समुळे पायरव अजिबात जाणवत नव्हता. त्या दोघांनाही समजायच्या आत, घाईत ती त्याच्यामागे खूपच जवळ उभी राहिली होती कारण तो मग ठेऊन जेव्हा मागे वळला तेव्हा त्याच्यामुळे ती चिरडायचीच बाकी होती.
त्याने पटकन तिचे दंड धरून तिच्या डोळ्यात रागाने रोखून बघितले. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. "स्टे आउट ऑफ माय वे" एकेक शब्दावर जोर देऊन त्याने तिला धमकावलेच.
"आय.. आय एम सॉरी. इट वॉज ऍन ऍक्सिडंट.." ती घाबरून गडबडून जात म्हणाली. तेव्हाच तो पुन्हा जोरजोरात पाय वाजवत सरळ मुख्य दारापाशी गेला. स्टँडवरून जॅकेट, टोपी, बूट सगळा सरंजाम चढवून, खाडकन दार आपटून तो बाहेर निघून गेला.
ती थक्क होऊन दाराकडे बघत राहिली. ती जितक्या आशेने इंटरव्ह्यू घ्यायला आली होती त्या सगळ्याचा चुराडा होताना तिला दिसत होता. दाराबाहेर बर्फ कोसळतच होता.
तिने बॅग उघडून केस टॉवेलमध्ये बांधून टाकले. सीडर अजूनही फायरप्लेसच्या उबेत लोळत पडला होता. उर्वी त्याच्याशेजारी रगवर मांडी घालून बसली.
"त्याला मी आवडत नाही" सीडरची पाठ खाजवत ती म्हणाली. त्याने हळूच मुंडी उचलून तिच्याकडे पाहिले. "म्हणजे त्याचं बरोबरच आहे. मीच इथे घुसखोर आहे आणि त्याचं फळ मी भोगतेय."
सीडरने हलकेच डोके उचलून तिच्या मांडीवर ठेवले. आनंदाने तिला धक्काच बसला. आदित्यने त्याच्या चाव्याबद्दल बजावूनही तिने डोक्यावरून हात फिरवला. "तो म्हणतो तसा भयानक लांडगा वगैरे तू नाहीच्चेस." त्याच्या डोक्यावर हनुवटी टेकवत ती म्हणाली. "तू ना नुसता एक फरबॉल आहेस."
अदित्यऐवजी निदान त्याच्या कुत्र्याला तरी ती आवडत होती हे तिला सध्यातरी पुरेसे होते.
"मेबी त्याच्याऐवजी मी तुझाच इंटरव्ह्यू घेते. काय?" त्याच्या दाट फरमधून हात फिरवता फिरवता ती म्हणाली.
त्या ढोल्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलले नाहीत.
"सो. सीडर मला हे सांग की आदित्य--"
तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला आणि बरोबर थंड हवेचा एक झोत आणि लाकडाचे काही तुकडे घेऊन आदित्य आत आला. रात्रीच्या तयारीने त्याने ते त्यांच्या जागी रचून ठेवले.
"मी काही मदत करू का?" उर्वीने बारीक आवाजात विचारले.
"लीव्ह!"
"आय कान्ट!" ती पुटपुटली.
"हुं! लाईक आय डोन्ट नो दॅट!" म्हणून तो उठला आणि सोफ्याशेजारच्या रॉकिंग चेअरमध्ये जाऊन बसला.
ती त्याच्या मागोमाग येऊन सोफ्यावर बसली. "मला वाटलं होतं मी फत्तेबरोबर तुम्हाला भेटून पटकन मुलाखत घेईन आणि तशीच त्याच्याबरोबर परत निघून जाईन. तो मला इथे सोडून जाईल अशी मला खरंच कल्पना नव्हती."
"पण मी इथे आता तुझ्याबरोबर अडकून पडलोय." तो राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत म्हणाला.
"आय नो.. मी खरंच त्याबद्दल माफी मागते." ती म्हणाली. एव्हाना त्याने उठून किचनमध्ये जाऊन भाज्या चिरायला सुरुवात केली होती. त्याला स्वयंपाकातसुद्धा तिची मदत नको होती. हे पाहून तिला निदान आपण आपली मोठी बॅग उचलून बाजूला ठेवावी असे वाटले.
"माझी बॅग कुठे ठेऊ?"
"तुला काय गेस्टरूम वगैरे हवीय का?" त्याने तिरकसपणे विचारले.
"हो, चालेल." ती नकळत म्हणाली.
तो कुत्सितपणे हसलाच. "इथे एकच बेडरूम आहे, त्यात एकच बेड आहे. आणि मी आत्ताच क्लीअर करतोय की मी सोफ्यावर अजिबात झोपणार नाही."
क्रमशः
हे अचानक अंगावर आलेले पेच सोडवताना आदित्य अतिशय वैतागून गेला होता. सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे फत्तेने त्याच्याशी केलेली गद्दारी. फत्तेला तो शाळेत असल्यापासून ओळखत होता आणि खूप चांगली मैत्रीही होती. पहाडी लोक निष्ठेला फार महत्व देतात आणि फत्तेनेही त्याला कधीच धोका दिला नव्हता.. आजपर्यंत! ह्या मुलीने अशी काय जादू केली केली आणि तो पाघळला... फत्ते म्हणाला की तिला मला काहीतरी महत्वाची वस्तू द्यायची आहे, पण अजून तरी ती या विषयावर गप्पच आहे. ती काय वस्तू आहे हे विचारायची त्याला खूप उत्सुकता होती पण त्याने खूप प्रयत्नाने स्वतःला थांबवले. ह्या काही सेकंदाच्या कॉलमुळे उत्तरांऐवजी त्याच्या डोक्यात प्रश्नांचीच गर्दी झाली होती. तेवढी महत्वाची काही गोष्ट असेल म्हणूनच फतेने तिला मदत केली हे त्याला कळत होते. निदान त्याने आधी कॉल करून त्याला कळवायचा तरी प्रयत्न केला होता.
बराच वेळ तणाव आणि शांततेत घालवल्यावर तो उठून किचनमध्ये गेला. कुलच्यांची कणिक मळता मळता त्याच्या डोक्यातले विचार थांबत नव्हते. त्याने कितीही मान्य केले नाही तरी तिचा मुलाखतीबद्दलचा मुद्दा बरोबर होता. जर ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते तर बाकी रिपोर्टर्सही पोचणारच आहेत. मग हिलाच इंटरव्ह्यू दिला तर? शक्य नाही. त्याला हा अंदाज होता म्हणून त्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये तो कुठल्याही पब्लिसिटी इव्हेंट किंवा मुलाखतीसाठी तयार नाही हा क्लॉजच टाकून घेतला होता. खिडकीबाहेरची निसर्गाची रंगसफेदी बघत एका लयीत त्याचे काम सुरू होते.
तासाभराने लहानश्या टू सीटर डायनिंग टेबलवर दुपारचे उरलेले बटर चिकन, जाड भाकरीसारखे पण मऊ वाटणारे थोडे तीळ लावलेले कुलचे आणि एक लालभडक, चमकदार किनौरी सफरचंद कप्पे असलेल्या दोन ताटात त्याने वाढले आणि कढई, पाण्याचे ग्लास वगैरे मधोमध ठेऊन त्याने तिच्याकडे बघितले.
नॅपकीनने हात पुसत तो सोफ्याजवळ जाऊन उभा राहिला. एव्हाना दिवसरात्रीच्या प्रवासामुळे कंटाळून तिला सोफ्यावर बसल्या बसल्याच डुलकी लागली होती. केस बांधून ठेवलेला टॉवेल बाजूला गळून पडला होता आणि तिचे अर्धवट ओलसर कुरळे केस तिच्या गालावर चिकटून आजूबाजूला पसरले होते. तो पहिल्यांदाच तिला एवढं नीट न्याहाळत होता. तिचे काळेभोर टोपलीभर केस, उत्साहाने बोलताना चमकणारे बदामी डोळे जे त्याने आधीच नोटीस केले होते, सरळ नाक आणि मॉडेलला लाजवतील असे चीक बोन्स! बर्फाच्या माराने पांढऱ्या पडलेल्या तिच्या गालाओठांवर उष्ण हवेमुळे आता हळूहळू पुन्हा लाली पसरत होती. ही नक्की मुंबईत तुटलेल्या दिलांची रास मागे सोडून आलेली दिसतेय. तरीच फते पण इतक्या लवकर गद्दार झाला.
नॉट गुड! संत, तुमच्या केबिनमध्ये एकट्या अडकलेल्या मुलीवर नजर टाकणे बंद करा. त्याने स्वतःलाच मनातल्या मनात एक चापट दिली. तिच्याबद्दल अजिबात विचार करायची गरज नाही. एकतर तिने येऊन त्याच्या सरळ चाललेल्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ केली होती. त्याने एकवार तिच्या मांडीवर डोकं टाकून, पाय ताणून सोफ्यावर आरामात झोपलेल्या सीडरकडे पाहिलं. सीडरने त्याला दिलेला आश्चर्याचा धक्का अजूनही ओसरला नव्हता. जनरली सिडू अनोळखी लोकांच्या कधी जवळही जायचा नाही. त्याला लोकांची सवयच नव्हती. पण असे दिसत होते की त्याचा कुत्राही तिच्या चार्म्सपासून वाचला नव्हता.
अचानक तो शिंकला आणि त्या आवाजाने उर्वीने पटकन डोळे उघडले. जाग येताच आलेल्या बटर चिकनच्या टेम्पटींग वासाने तिच्या पोटात कावळे नुसते ओरडायला नाही, भांडायला लागले होते. फ्लाईटमधले बेचव सँडविच आणि फतेबरोबरचे दोन समोसे सोडता तिने दिवसभरात काहीच खाल्ले नव्हते.
"टेबलवर ताट वाढलंय, जेवून घे." म्हणून तो जाऊन जेवायला बसला, तीही मागोमाग गेलीच. शांततेत जेवून तिने भांडी आवरायला मदत केली. "जेवण खूप छान होतं, थॅंक्यू." ती खुर्चीत बसून सफरचंद खातखात म्हणाली.
तो फक्त हसला. लगेच आत जाऊन तो हातात दोन जड ब्लॅंकेट आणि एक ऊशी घेऊन आला.
"काय ठरलं मग? सोफ्यावर की खाली?" सगळे सोफ्यावर ठेऊन त्याने विचारले. त्याला खरे तर झोपायच्या ह्या अरेंजमेंटबद्दल जरा वाईट वाटले होते, पण तेव्हाच दुसरे मन सांगत होते की हे तिनेच अचानक घुसखोरी केल्याचे फळ आहे.
"फक्त लक्षात ठेव की सोफा सीडरच्या मालकीचा आहे, तो कधीही मालकी दाखवू शकतो" तो खांदे उडवत म्हणाला.
ती आधीच त्या टणक, खड्डे पडलेल्या निळ्या सोफ्यामुळे वैतागली होती. त्याच्यावर झोपून सकाळी पाठीचं भजं नक्कीच होतं. पण खाली रगवर झोपण्यापेक्षा ठीक आहे. विचार करून तिने सोफ्यावर तिची शाल पसरली आणि उशी, ब्लॅंकेट वगैरे ठेवून टेम्पररी बेड तयार केला.
"मी पण इथे रात्री न थांबण्याचा इराद्यानेच आले होते. ऑफिसमध्ये मला असाईन केलेली खूप कामं करायची आहेत, माझी मैत्रीण त्यात मदत करेल पण मला लवकरात लवकर तिथे हजर व्हावे लागेल." ती पायांवर ब्लॅंकेट ओढत म्हणाली.
"हा विचार तू इथे येण्याआधी करायला हवा होता." त्याने नाक उडवले आणि दिवे बंद करून झोपायला आत निघून गेला. "थँक्स, गुडनाइट!" त्याच्या पाठीमागून ती ओरडून म्हणाली.
बाहेर चंद्रप्रकाशात अजूनही जोरदार बर्फाचा वर्षाव तिला अर्धवट पडदा सरकलेल्या खिडकीतून अंधूकसा दिसत होता. जर हे वादळ असेच सुरू राहीले तर अजून किती वेळ या भयंकर बोर जागी काढावा लागेल याचा ती हिशेब करत होती. ती ब्लॅंकेट अंगावर ओढून आडवी होताच सीडर उडी मारून तिच्या पायापाशी ब्लॅंकेटमध्ये मुटकुळे करून झोपला. पाठीला टोचणाऱ्या सोफ्यामुळे तिला झोप तर लागत नव्हतीच. ती अर्धवट मागे सरकून सोफ्याच्या आर्मरेस्टला उशी टेकून बसली. सीडर मान ब्लॅंकेटबाहेर काढून तिच्याकडे बघत होता. ह्याच्या इंटरव्ह्यूचे तर काही खरे नाही.
"मग सीडू? आपण तुझा इंटरव्ह्यू कंटीन्यू करायचा का?" तिने कंटाळा घालवायला विचारले.
सीडर अजूनच बोर होऊन कान हस्कीना शक्य तितके पाडून तिच्याकडे बघत होता.
"हम्म, मग मला हे सांग की ऑन माय ओन पुस्तकाचे जगप्रसिद्ध लेखक आदित्य संत यांच्याबरोबर रहाणे कसे आहे?" उत्तराची वाट पहिल्यासारखी ती काही सेकंद थांबली.
"नोss काय म्हणालास? तुला दिवसेंदिवस अश्या अबोल, चिडक्या माणसाबरोबर घालवायला आवडतात? धन्य आहेस बाबा तू. काय म्हणालास? मी चुकीचं समजले, मला वाटला तितका तो वाईट माणूस नाहीये. प्लीजच! मला नाही हं असं वाटत. तो फॉर्मली बरा वागतो पण मला तो काहीतरी भयानक भूत घरात घुसल्यासारखं ट्रीट करतोय. आणि लवकरात लवकर तो माझा एक्झॉरसिझम करायच्या मागे लागलाय. आय नो, आय नो खूप लेम जोक मारला. पण बघ ना, आमचं कुठल्याच मुद्द्यावर पटत नाहीये. नंतर इथे कोणी ना कोणी येऊन पोचणारच आहे इंटरव्ह्यू मागत, तेव्हा काय करणार हा?" बोलून ती पुन्हा सीडरची प्रतिक्रिया ऐकायला थांबली.
"काय? हो, बरोबर. तो तुझ्यासाठी छान, प्रेमळ माणूस आहे पण माझ्यासाठी एक उद्धट, चिडका आणि नार्सिसिस्ट माणूस आहे. ओके, नार्सिसिस्ट जरा जास्त होतंय, स्वतः मध्ये मश्गुल म्हणू हवं तर."
हे म्हणताच आतून फिसकन हसलेले तिला ऐकू आले. नक्कीच तो अजून जागा होता आणि तिची बडबड ऐकत होता.
"ओके सीडू, तुलापण माझ्याबद्दल बरेच प्रश्न पडलेले दिसतायत. बोल बोल, विचारून टाक." लगेच ती पुढे म्हणाली .
क्रमशः
पुढे काही बोलण्यापूर्वी तिने भुवया उंचावून सीडरकडे पहात त्याचं ऐकतेय असं दाखवलं.
तोही प्रॉम्प्टली तोंड पाडून काय येडी पोरगी आहे असे एक्सप्रेशन्स देत होता!
"हम्म मी आधी म्हटल्याप्रमाणे अख्या जगाला ऑन माय ओन मागचा माणूस कसा आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यांच्यालेखी तो एक सर्व्हायवर, एक हिरो आहे. पण तो नक्की काय चीज आहे हे त्यांना अजूनही माहीत नाही."
पुन्हा थोडं थांबून तिने बोलणं सुरू केलं.
"ओsss, इतके सगळे जण प्रयत्न करूनही इथे फक्त मीच कशी पोचले हे समजत नाहीये ना तुला? फत्तेने पण मला हेच विचारलं. तो म्हणाला खूप रिपोर्टर्स येऊन त्याला आणि बाकी इथल्या लोकल ट्रान्सपोर्टवाल्यांना भेटले, भरपूर पैश्याचंही आमिष दाखवलं पण कोणीही माहिती द्यायला तयार झालं नाही."
सीडरने पुन्हा पायावर डोकं टेकलेलं बघून एक मोठी जांभई देत तीही झोपायचा प्रयत्न करू लागली.
"सीडरला पूर्ण उत्तर दे" तो दोन्ही हात खिशात घालून बेडरूमच्या दाराला टेकून उभा होता. काळोखात त्याची फक्त चौकट भरून टाकणारी आकृती दिसत होती. "मला हे ऐकायचं आहे की तू फत्तेला इथे यायला कसं तयार केलंस. माझा मित्र आहे, इतक्या लवकर ऐकणारा नाही तो."
ती आता उठून उशीला टेकून बसली. ओहह, तर या गोष्टींमुळे भिंतीला खिंडार पडलंय तर! तिने मनातच स्वतःला हाय फाईव्ह दिला. "ऐकायचं असेल तर सांगते. मी त्याला तुमच्या आईबद्दल सांगितलं."
"माझ्या आईबद्दल" त्याने एकेक शब्द म्हटला. "तिचा काय संबंध?"
"मी त्यांना शोधून काढलं आणि-"
"तू माझ्या आईला शोधून काढलंस?" तो स्वतःला कसंबसं कंट्रोल करत दात चावत म्हणाला.
"उम्म.. हो म्हणजे माझ्याआधीही काहीजण त्यांच्यापर्यंत पोचले होते. पण त्यांच्याशी बोलण्याची संधी फक्त मलाच मिळाली. आम्ही बराच वेळ बोललो आणि-" ती जरा घाबरूनच सांगत होती.
तो दोन पावलात तिच्यासमोर येऊन कंबरेवर हात ठेवून रागाने खाली तिच्याकडे बघत होता. "तू माझ्या आईबरोबर बोललीस!" तो आवळलेल्या दातांतून निघेल इतक्याच हळू आवाजात म्हणाला.
"पण मी.. त्या इतकंच म्हणाल्या-" ती पटापट बोलायचा प्रयत्न करत होती, त्याच्या रागाला भिऊन तिचा श्वास कोंडला गेला होता.
"आय डोन्ट केअर ती काय म्हणाली! माझ्यासाठी ती कोणीही नाहीये"
उर्वीने एक खोल श्वास घेतला. माया आपल्या मुलाला भेटायला, त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्यायला किती डेस्परेट झाली होती ते तिला आठवलं.
"त्यांचं नाव काढताच तुम्ही अगदी असेच रिऍक्ट व्हाल असंही त्या म्हणाल्या होत्या."
"ती स्वतः माझ्या बाबाला आणि मला सोडून निघून गेली होती-"
"ओह प्लीज आदित्य तुला माहिती आहे ही एवढीच गोष्ट नाहीये. हे सगळं बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांचीही काही बाजू असू शकते" ती त्याचं बोलणं तोडत म्हणाली. तिच्याही नकळत तिने त्याचा एकेरी उल्लेख केला होता.
"ऐक, मिस रिपोर्टर! तुझा यात काडीचा संबंध नाही. स्टे आऊट ऑफ इट!" आता तो जोरात म्हणाला आणि तरातरा दार आपटून बेडरूममध्ये गेला. त्या पातळ फायबरच्या दाराचं नशीब चांगलं म्हणून त्याचे दोन तुकडे होता होता वाचले.
ती पुन्हा सरकून आडवी झाली. सोफ्यामुळे पाठ रगडून निघतच होती. ती वर आढयाकडे बघत विचार करत होती. ह्या इतक्या रुक्ष, कंटाळवाण्या माणसापासून कधी एकदा सुटका होतेय असं झालं होतं. सीडर तिच्या पायावरून डोकं उचलून तोंड वर करून एकदा जोरदार हुंकारला. तिने उठून त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केले.
"सीड, ह्याला फारच मदर इशूज आहेत नाही?" ती हळूच बोलली.
"मला ऐकू येतंय" आतून आवाज आला.
तिने त्याच्यासारखंच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
"ह्या थंड रक्ताच्या प्राण्याबरोबर तू कसा रहातोस रे सीडू? एक तर ह्याला आपल्या आईबद्दल जराही दया वाटत नाही आणि एकीकडे आई सोडून गेली म्हणून राग आहे. पण इतकी वर्ष!"
"रिपोर्टर! तोंड बंद!" आतून पुन्हा रागीट आवाज आला.
"नक्की ह्याला लोक सोडून जाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणूनच इथे असा ऑन माय ओन म्हणत येऊन राहिला"
"स्वतःला फार शहाणी समजू नको." तो पुटपुटला.
"हे सगळे बहुतेक ज्वालामुखीचे फक्त तोंड आहे, आत अजून किती लाव्हा भरलाय देव जाणे."
"आता झोपणार आहेस का? प्लीज झोप!" स्वतःला कंट्रोल करत तो ओरडलाच.
तिला त्या ओबडधोबड सोफ्याच्या किती त्रास होतोय हे त्याला सांगायला तिने तोंड उघडलं पण त्याला वाटेल ती त्याच्या बेडवर झोपायला निमित्त शोधतेय ह्या विचाराने ती एकदम गप्प झाली.
"मी ट्राय करतेय पण मला तुझा इतका राग येतोय की मी झोपू शकत नाहीये." तीही ओरडून म्हणाली.
"ट्राय हार्डर!" आतून तुसडा रिप्लाय आलाच.
तिने डोळे मिटले. एव्हाना सीडरचा झोपून एका लयीतला श्वास ऐकू येत होता. तिला रात्री उशिरा कधी झोप लागली ते कळलेच नाही. मध्यरात्रीनंतर कधीतरी मधेच जाग आली तेव्हा आदित्य फायरप्लेस मध्ये जास्तीची लाकडं टाकताना दिसला पण ते खरे होते की स्वप्न काय माहीत. तिने ब्लॅंकेट अजून तोंडावर ओढून घेतले आणि पुन्हा झोपून गेली.
तिला पहाटे कधीतरी जाग आली तेव्हा तो तिच्या खांद्याला हलकेच हलवून उठवत होता. तिने डोळे चोळत त्याच्याकडे पाहिले. तो बाहेर जायच्या तयारीत समोर उभा होता. खिडकीबाहेर अजून पूर्ण अंधार होता. "तू आता बेडवर झोपू शकतेस. मी बाहेर जातोय आणि परत यायला बराच वेळ लागेल." तिला झोपेत काही धड समजत नाही बघून त्याने तिच्या हाताला धरून उठवून आतल्या बेडवर नेऊन बसवले.
तो अति मऊ बेड आणि डोकं रुतणाऱ्या परांच्या उशीवर आडवी होताच तिचे डोळे मिटले. त्याने दोन तीन जड ब्लॅंकेट तिच्या अंगावर पांघरली.
"मला बराच वेळ लागेल यायला, ठीक आहे?" तो हळूच म्हणाला. ओके.. ती झोपेतच म्हणाली आणि त्या मऊ ब्लॅंकेटमध्ये अजून गुरफटली.
रात्रभर कुस बदलत कशीबशी त्या दगडी सोफ्यावर झोपल्यावर हा बेड म्हणजे तिच्यासाठी स्वर्गच होता. तो निघून गेलेला तिला कळलेही नाही इतकी तिला लगेच गाढ झोप लागली.
शेवटी ती उठली तेव्हाही एकतर अंधार होता किंवा कोसळत्या बर्फाने सूर्य किडनॅप केला होता. तिने ब्लॅंकेट बाजूला करून कुडकुडत बॅग उघडून एकावर एक दोनतीन स्वेटर घातले. एका पायातील गळून पडलेला मोजा परत चढवला. पांघरुणांच्या घड्या घालून ती बाहेर आली. सोफ्याच्या मालक पण त्याच्या मालकाबरोबर गायब होता.
ती ब्रश वगैरे करून आली आणि किचनकडे वळली. किचनमध्ये थोडी गंजून जुनाट दिसणारी शेगडी होती. जरा शोधल्यावर खालच्या कॅबिनेटमध्ये चहाची तांब्याची किटली ठेवलेली मिळाली. तिने सिंकचा नळ सोडला पण पाईप्स गोठल्यामुळे की काय त्याला पाणीच येत नव्हते. शेवटी तिने दार उघडले त्याबरोबर प्रचंड थंड हवेचा झोत ठोसा मारल्यासारखा तिच्या अंगावर आला. कशीबशी कुडकुडत तिने एक ताट बाहेर नेऊन ठेवले आणि थोड्या वेळाने त्यात साचलेला बर्फ चहाच्या भांड्यात टाकला.
लायटरही थंडीने सुन्न पडला होता, तो आठदहा वेळा खाटखुट करून शेवटी गॅस पेटला. दूध, चहा, साखर आणि फ्रिजमध्ये अंड्याच्या ट्रे मध्ये ठेवलेला आल्याचा वाळलेला तुकडा शोधून तिने कालपासून तलफ आलेला चहा केला. सोफ्याशेजारच्या रॉकिंग चेअरवर बसून ती आरामात वाफाळत्या चहाचे घोट घेऊ लागली.
तेवढ्यात बाहेरून जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला.
क्रमशः
आदित्य आला होता.
इतक्या पहाटे उठून बाहेर इतका वादळी वारा असताना बर्फात तो काय करायला गेला होता काय माहीत. तिने उठून नकळत गरम चहाचा दुसरा कप भरला. समोरच्या खिडकीतून लांबवर दिसणारे उंच हिरवेगार देवदारसुद्धा आता पांढराशुभ्र बर्फ पांघरून झोपले होते.
लॅच उघडून त्याने आत पाऊल टाकताच त्याच्या मागोमाग आलेला सीडर पळत तिच्या पायापाशी आला, तीपण लगेच गुडघ्यावर खाली बसून तिच्या नवीन मित्राशी खेळायला लागली.
ती चक्क इतक्या लवकर उठून किचनमध्ये काम करते आहे! हातातली काठी दारामागे ठेऊन तो स्टुलावर बसला. गुडघ्यापर्यंत येणारे जड बूट काढता काढता तो आश्चर्याने बघत होता.
"आता वादळ थोडं कमी झालं आहे." तो हळूच म्हणाला."पण रस्त्यावर इतका बर्फ आहे की आज काही रस्ते सुरू होतीलसे वाटत नाही. फतेला येता नाही येणार आज तरी. बघू संध्याकाळपर्यंत बर्फ थांबला तर बरं होईल." त्याने खांद्यावरच्या जड सॅकमधून गडद नारिंगी रंगाची, हार्ट शेपसारखी दिसणारी पण तिने कधीही न बघितलेली मऊ, रसाळ फळं काढून टेबलावरच्या बांबूच्या टोकरीत रचून ठेवली.
"अरे यार..." तोंड वाकडं करत ती म्हणाली. तिला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडत होतं. तिने चहाचा कप त्याच्या हातात दिला.
"तू चहा केलास!" तो अश्या सुरात म्हणाला जसे काही ते रॉकेट सायन्स आहे.
"हम्म." रात्रीच्या अंधारात तो समोर नसताना त्याला उलट उत्तरे देणे, वाद घालणे सोपे होते पण असे समोरासमोर उभे राहून त्याच्या डोळ्यात बघून काही बोलायला शब्द फुटत नव्हता. रात्री ती जे काही बोलली त्याबद्दल आता तिला स्वतःची लाज वाटत होती. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचा तिला काय अधिकार होता? चूकच होती ती.
आदित्यही जरा अस्वस्थ वाटत होता.
"नाश्ता झाला तुझा?" तिने उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. आणि नसेल झाला तर तू काय करणार आहेस? जसा काही इथे फ्रीज भरलेला आहे वस्तूंनी! तिने मनातल्या मनात स्वतःला टपली मारली. फ्रीजमध्ये फक्त फळंच फळं होती, नाही म्हणायला दुधाचा मोठा कॅन, थोड्या शिमला मिरच्या, मटार आणि मश्रूम्स होते. मोठा फ्रीझर फक्त फ्रोझन चिकन आणि बाकी वेगवेगळे मीट कट्स आणि रेडिमेड रोट्यांच्या पॅकेट्सने भरलेला होता. इथे मैलोन मैल जंगलाशिवाय काहीच नाहीये, त्याला नक्की सांगला किंवा अजून लांब दुसऱ्या गावाला जाऊन किराणा, भाजीपाला वगैरे आणावा लागत असणार.
"मी निघतानाच कॉर्नफ्लेक्स खाल्ले होते. तू?" हे पहिल्यांदाच त्याने तिला सरळ उत्तर दिले असेल.
"नाही अजून." त्याचे हे अचानक थोडे मवाळ वागणे तिला आता झेपत नव्हते. त्यांनी रात्री एकमेकांबरोबर जेवढा वाद घातला होता त्यानंतर आता तरी त्याला सगळ्या गोष्टी सांगून टाकणे तिला गरजेचे वाटत होते. कुठून सुरुवात करावी ते तिला सुचत नव्हते.
"त्या कपाटात दोनतीन प्रकारचे जॅम आणि ब्रेड आहे."
"नाही नको, मला ब्रेकफास्टची सवय नाही. सकाळी उशिरा उठते आणि ऑफिसला गेल्यावर लंचटाइम पर्यंत सारखा चहा होत असतो." तिला बऱ्याच वेळाने ऑफिसची आठवण झाली. बिचारी अना दोघींचे मिळून डबल काम करत बसली असेल.
"ओके." म्हणून कप टेबलावर ठेऊन त्याने जॅकेट, बीनी, मफलर, ग्लव्हज सगळे काढून स्टँडला अडकवले. बर्फाने ओलसर झालेले केस झटकून तो कप उचलून टेबलपाशी बसला. तिच्याकडे न बघता तो कपकडेच बघत होता.
जणू काही कपमध्ये बघून भविष्यच सांगायचंय याला! ती त्याच्याकडे बघत मनात म्हणत होती.
ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. जरासे खाकरून तिने बोलायला सुरुवात केली. "काल रात्री-"
"काल रात्री काय?" त्याने एकदम तोंड वर कर करून, डोळे बारीक करत तिच्याकडे पाहिले.
"रात्री मी तुझ्या आईबद्दल, तुझ्याबद्दल जे काही बोलले त्यासाठी मला माफी मागायची होती. खरंच मला तुमच्या खाजगी गोष्टीत बोलायला नको होतं."
"डोन्ट मेन्शन इट!" त्याने बेफिकिरपणे मान हलवली.
"तरी तुला बायकांबद्दल ट्रस्ट इशूज आहेत हे नक्की." ती बारीक डोळे करून त्याला निरखत होती.
"आता बस्स." त्याच्या ओठांची आता सरळ रेष झाली होती.
"राईट! सॉरी." ती दोन्ही हात वर करत म्हणाली. तो ऐकतोय म्हणून आपण आपला मुद्दा पुढे ढकलू शकत नाही हे तिला जाणवलं. जरा विषय पुढे गेला की त्याचा राग फणा काढत होता.
त्याने रिलॅक्स होत पुन्हा उरलेल्या चहाचा घोट घेतला.
"मला अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे. पण प्लीssज प्लीssज तू चिडू नको. तुला माझा खूप राग येईल, मी आधीच सांगून ठेवतेय. पण प्लीज तुझा राग कंट्रोल कर." ती अजिजीने म्हणाली.
"आता काय अजून?" तो आधीच वैतागला होता.
ती उठून सेंटर टेबलापाशी गेली. तिने पर्समधून त्याच्या आईने दिलेली अंगठी काढून मुठीत घट्ट आवळत एक खोल श्वास घेतला. स्टे स्ट्रॉंग. तिने स्वतःला म्हटले.
वळून ती पुन्हा त्याच्यासमोर जाऊन बसली.
"तुझ्या आईने मी तुला जर शोधू शकले तर तुला द्यायला एक वस्तू दिली आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं त्यामुळे ते पूर्ण करावंच लागेल."
"वस्तू?"
"तुझ्या बाबांची अंगठी. एंगेजमेंट रिंग. त्यांनी आईला परत केली होती ते तुला माहिती असेल. आईला ती तुझ्याकडे असावी अशी इच्छा होती म्हणून त्यांनी पाठवली आहे. " ती त्याच्यासमोर मूठ उघडत म्हणाली.
त्याने जोरात एक श्वास घेत दात घट्ट आवळले.
"ठेव तुलाच."
"मी ती ठेवू शकत नाही, मी प्रॉमिस केलंय त्यांना."
तो तिच्याकडे बघून खुनशीपणे हसला. "हा! हेच सांगून तू फतेला इथे यायला पटवलंस तर. त्याने मला वस्तूबद्दल सांगितलं पण काय वस्तू ते मुद्दाम सांगितलं नाही."
तीला सगळंच खरं सांगून टाकायचं होतं. "फते माझ्या बोलण्यामुळे किंवा या अंगठीमुळे तयार नाही झाला. त्याला वाटलं की मी जे करतेय तुला बरं वाटेल, तुझ्या भल्यासाठी तो तयार झाला. तुझ्या आईचा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचायला हवा असं त्याला वाटलं म्हणून तो तयार झाला. तो धोकेबाज नाही, फक्त चांगला मित्र आहे."
"मला वाटलंच असंच काहीतरी असणार म्हणून. फते इतक्या ईझीली फुटणारा माणूस नाही."
तिने ती अंगठी टेबलावर त्याच्या पुढ्यात सरकवली. "माझ्यामते तू आईला भेटावं आणि त्यांच्याशी काहीतरी संपर्क ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे. तू त्यांचा एकुलता एक मुलगा असून का त्यांना प्रतिसाद देत नाहीस? खूप थकलेल्या वाटल्या त्या."
"स्टॉप इट. उलट तीच आम्हाला सोडून गेली होती. तू मला एकुलत्या एक मुलाचं सांगतेस तर त्याच एकुलत्या एक मुलाला जेव्हा त्याच्या आईची गरज होती तेव्हा वाऱ्यावर सोडून कायमची निघून जाणाऱ्या आईची काहीच चूक नाही?" संतापून त्याच्या कपाळाची शीर ताडताड उडत होती.
रागाने त्याचे डोळे बर्फाच्या लादीसारखे थिजले होते. घाबरून अजून उत्तरे न देता ती त्याची नजर चुकवत गप्प बसून राहिली.
"झालं तुझं समाधान?" दहा पंधरा मिनिटे त्या अंगठीकडे टक लावून पाहिल्यानंतर त्याने विचारले.
"आता झालं." त्याने अंगठी हातात घेतलेली पाहिल्यावर मनात हुश्श म्हणत ती किंचित हसली.
त्याने लाकडी फ्लोरिंगवर खर्रर्रर्र चरा पाडत खुर्ची मागे सरकवली आणि उभा राहिला. दाराकडे जाऊन त्याने दार उघडलं. बाहेरून सोसाट्याचा वारा आणि बर्फाचे कण त्याच्या अंगावर आपटूनही तेवढ्याच वेगाने आत आले. तिला काही कळायच्या आत हात मागे नेत पूर्ण जोर लावून त्याने ती अंगठी बाहेर साचलेल्या उघड्या बर्फाच्या पलीकडे जंगलाच्या हद्दीत कुठेतरी लांबवर फेकून दिली.
क्रमशः
तो काय करतोय हे पुरतं कळेपर्यंत ती उठून उभी राहिली होती. अंगठी फेकताच ती उघड्या दारातून जोरदार वादळात मुसंडी मारून सरळ पळत सुटली. झाडांपर्यंत पोचल्यावर तिला कसाबसा श्वास घेता येत होता. बर्फात ओली होऊन कुडकुडत ती गुडघे टेकून बसली. बर्फाचे पाणी डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते. हाताने सगळा नव्याने भुरभुरलेला फुसका बर्फ बाजूला करत, मध्येच हाताला टोचणाऱ्या बारीक काटे, काटक्यांमधून हात फिरवत ती शोधत राहिली. एव्हाना तिच्या केसांमध्ये बर्फाचे कण जमू लागले होते. किती वेळ गेला कोण जाणे पण तिचे हात पाय तिलाच जाणवेनासे झाले तेव्हा ती उठली आणि वाऱ्यातून जोर लावून कशीबशी दारापर्यंत पोहोचली. दार उघडे होते पण तो दारात नव्हता. सीडर दाराबाहेर येऊन जोरजोरात भुंकत होता. ती जवळ आल्यावर तो शांत होऊन तिच्या मागोमाग आत आला.
घोंगावणाऱ्या वाऱ्यात अंगातली सगळी शक्ती लावत जीव खाऊन तिने ते दार बंद केले. शेवटी दमून तिला श्वास येईनासा झाला. धपापत ती दारालाच टेकून उभी राहिली. तो दाराकडे पाठ करून खुर्चीत बसला होता.
"किती बेपर्वा माणूस आहेस तू? तुला जराही काही वाटलं नाही?" थोडा श्वास घेतल्यावर ती ओरडली.
"जर माझ्या आईने तिच्या लग्नाची कधी पर्वा केली नाही तर त्या नुसत्या रिंगची पर्वा मी कशाला करू?" तो शांतपणे म्हणाला.
ती डोअरनॉबला धरून कशीबशी उभी होती. हात आणि सगळे शरीर गारठून बधिर झाले होते. हळूहळू पायांच्या मुंग्या गेल्यावर ती कोपऱ्यात आगीसमोर जाऊन बसली. धगीसमोर हात, पाय शेकवल्यावर तिच्या जरा जीवात जीव आला.
"ती रिंग तुझ्या वडिलांची होती" ती आगीत बघत म्हणाली. तिला वाटले होते निदान बाबांची आठवण म्हणून तो ती अंगठी स्वतःकडे जपून ठेवेल.
"माझ्या वडिलांनी ती अंगठी आईला परत केली होती. जर त्यांना त्या अंगठी जपून ठेवावीशी वाटली नाही तर मी का ठेवू."
"पण तुझ्या आईने तरी ती जपून ठेवली होती. यावरून काहीतरी कळायला हवं होतं तुला." ती त्याच्या आईची एवढी वकिली का करत होती तिला समजत नव्हतं. एका अर्थी ती जगातल्या सगळ्या स्त्रियांची बाजू मांडतेय असं तिला कुठेतरी वाटत होतं.
"माझ्या मते बायका फक्त पुरुषांकडून त्यांना हवी असलेली गोष्ट मिळवायला बघतात. त्यासाठी त्या काहीही मार्ग वापरतील, कुणालाही दुखावतील. एकदा का त्यांना ती गोष्ट मिळाली की ज्यांना चिरडून त्या पुढे गेल्या त्याचे त्यांना काहीही वाटत नाही. एकदा प्रेम करून मी चूक केली पण आता नाही, अजिबात नाही."
तीने एकदम वळून त्याच्याकडे पाहिले. "बायका? सगळ्या बायका? हे काय विचित्र जनरलायझेशन आहे?" तिला त्याचं बोलणंच काही कळत नव्हतं. "तुला बायकांवर विश्वास नाही, बायका स्वार्थी वाटतात कारण फक्त तुझी आई तुला सोडून गेली आणि काल तूच मला सांगत होतास की लोकांनी सोडून जाण्याबद्दल तुला काहीच इशूज नाहीत." तिला आता हसू येत होतं. कसला नमुना आहे हा!
"तुला हे फक्त आईबद्दल वाटतंय, तुला बाकी काही माहिती नाही अजून."
"मग सांग मला." ती आता हाताची घडी घालून कपाटाला टेकून उभी होती.
"नताशा." तो पुटपुटला. "धडा नं. दोन."
"हूं! झालं तर मग. एका मुलीपायी तू अख्या स्त्री जातीला नावं ठेवतो आहेस. किती क्लिशे! काय झालं होतं? नताशाला ह्या जंगलात रहायला आवडलं नाही? सेम तुझ्या आईची स्टोरी?
"तुला काय करायचंय!"
"बरोबर. मला काय करायचंय! मी फक्त एक गोष्ट सांगते नंतर काहीही बोलणार नाही. आय प्रॉमिस. आदित्य! ह्या सगळ्याच्या पलीकडे विचार कर."
पुढचा श्वास घेण्याच्या आत आदित्यचा चेहरा तिच्या चेहऱ्यासामोर दोन इंचावर होता. जराही हालचाल केली तर त्याचं भलंमोठं नाक तिच्या नाकाला लागेल इतक्या जवळ. कपाटावर तिच्या चेहऱ्याच्या बाजूला हात ठेवून खुनशीने तिच्या डोळ्यात बघत तो उभा होता त्यामुळे कुठूनही पळायला जागा नव्हती.
त्याच्या पायाशी येऊन सीडर लोळण घेऊन भुंकत होता. दोघांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
"मी नताशाला आम्ही दोघेही बालवाडीत असल्यापासून ओळखत होतो. किंवा असं म्हटलं पाहिजे की मी ओळखतो असं मी समजत होतो. नंतर दिल्लीला कॉलेजमध्ये एकत्र होतो. मग मी बाबाला मदत करायला इकडे आलो आणि ती मास्टर्ससाठी बँगलोरला गेली. इतकी वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. ती इथे आली की आम्ही नेहमी एकत्र असायचो, तिचं मास्टर्स संपून नोकरीही तिकडेच सुरू झाली होती. मी तिला सरप्राईज करायला एकदा न सांगता बँगलोरला गेलो. आणि मलाच सगळ्यात वाईट सरप्राईज मिळालं.
तिथे जाऊन मला कळलं की ती कोणा रुममेट बरोबर रहात नव्हती तर तिने तिच्या बॅचच्याच एका मुलाशी लग्न केलं होतं. तो ऑलरेडी कॅनडात गेला होता आणि ही व्हिसा मिळेपर्यंत इथे थांबली होती. मी तिच्यासाठी फक्त इथे असेपर्यंत वापरायचं एक खेळणं होतो. शी वॉज टोटली प्लेइंग मी! सो, माझ्या आयुष्यात कोणीही बाई नकोय मला. गॉट इट? माझी आई निघून गेल्यावर माझ्या वडिलांची झालेली हालत मी माझ्या डोळ्यांनी बघितलीय. आणि त्याच कडू औषधाचा जरा कमी प्रमाणात मीही डोस घेतलाय. म्हणून माझ्या आयुष्यात मला आता कुणीही नकोय. बॅक ऑफ! समजलं?"
आवंढा गिळून तिच्या ओठातून बारीकसं 'हो' निघालं. त्याने जसा काय खोलीतला सगळा ऑक्सिजन शोषून घेतल्यासारखा तिचा श्वास रोखला होता. तिच्या हातांवर, मानेवर काटा आला होता आणि ती तळहात कपाटावर घट्ट चिकटवून उभी होती. तो तिथून गेल्यावर काही सेकंदानी तिला पहिल्यासारखा श्वास घ्यायला जमला.
तो तरातरा जाऊन टोकाला असलेल्या लॅपटॉप टेबलापाशी बसला होता जसं काही त्याला तिच्यापासून शक्य तितक्या लांब राहायचं होतं.
तिने खाली बसून घाबरून विव्हळणाऱ्या सीडरच्या कानामागे, मानेवर खाजवत त्याला शांत केलं. आता सगळा ताण कमी झाल्यावर तिला जाणवलं की ती पूर्ण वेळ थरथरत होती.
इतकं कडवट बोलूनही तिला आदित्यसाठी वाईट वाटत होतं. ना ती नताशाला ओळखत होती ना त्यांच्यातील रिलेशनशिपबद्दल तिला काही माहीत होतं, पण आदित्यला झालेला आणि होत राहिलेला त्रास तिला दिसत होता.
"माझ्या कॉलेजमधल्या बॉयफ्रेंडने मला डंप केलं." तिचा आवाज अजूनही थरथरत होता.
"ओह रिअली? मग? तू 'सगळ्याच्या पलीकडला' विचार केलाच असशील. नो बिग डील!" तो थंड आवाजात म्हणाला.
"खरं सांगायचं तर, नाही. मी माझ्या पहिल्या असाईनमेंटसाठी एक वर्ष दिल्लीला होते आणि तो मुंबईला. आम्हाला लॉंग डिस्टन्स जमणार नाही हे त्यानेच ठरवून माझ्याशी ब्रेकअप केलं आणि पुढच्या सहाच महिन्यात माझ्याच बेस्ट फ्रेंडशी लग्न! मी मला काहीच फरक पडत नाही असं दाखवत त्यांच्या रिसेप्शनलाही हजर होते!"
तो मान वळवून तिच्याकडे रोखून बघत, ती खरं सांगतेय का याचा अंदाज घेत होता. तीही काही सेकंद त्याच्याकडे पहात राहिली आणि शेवटी किचनमधल्या खुर्चीत जाऊन बसली. खाली मान घालून थरथरणारा ओठ दातांनी चावत ती कशीबशी रडायला येणं थांबवत होती.
सीडर थोडा वेळ त्याच्या पायाशी बसून, वाट पाहूनही तो लाड करत नाही दिसल्यावर उठून तिच्याकडे आला. तिच्या खुर्चीशेजारी उभा राहून दोन पाय उचलून त्याने तिच्या मांडीवर ठेवले. डोळ्यांच्या कोपऱ्यात गोळा झालेला जाडा थेंब पुसून ती सिडरकडे बघून हसली आणि त्याचे पाय हातात घेऊन त्याच्याशी खेळायला लागली. पण तरीही त्यांच्यामध्ये तणाव पसरलेला होताच. हा ताण नाहीसा करण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत होती.
तो अजूनही तिच्याकडे पाठ करून खुर्चीत पाय हलवत बसला होता.
"सो. आपण दोघेही हर्ट झालोय पण हा काही जगाचा अंतबिंत नाही. हे डिस्कशन विसरून जाऊ आपण. लेट्स मूव्ह ऑन."
ऐकून तो फक्त ओठांचा कोपरा वाकडा करत हसला आणि बेफिकिरपणे खांदे उडवले.
"इथे चेसबोर्ड आहे?"
नाही.
"स्क्रॅबल?"
नाही.
"सापशिडी, लुडो?" तिने डोळे फिरवत विचारले.
नाही.
"मग काय खेळू शकतो?"
"फुलीगोळा!" या ऑप्शनवर त्यालाच हसायला येत होते.
"डन. सो फुलीगोळा इट इज!" ती हसत उठून उभी रहात म्हणाली.
क्रमशः
"हम्म, सुरू करूया." तो एक नोटपॅड आणि पेन टेबलावर त्यांच्या मधोमध ठेवत म्हणाला.
तिने फुली घेऊन सटासट तीन गेम्स जिंकले.
"आत्ताच कुणीतरी म्हणत होतं की हा गेम मी फार खेळले नाहीये म्हणून." तो एक भुवई वर करून तिच्याकडे बघत म्हणाला.
"मी म्हणाले का?" ती हसत म्हणाली. "बायका मूर्ख नसतात माहितीये ना!"
"मूर्ख नसतातच. पत्थरदिल? येस! पण मी भेटलेल्या बऱ्याचश्या बायकांमध्ये थोडी तरी हुशारी दिसलीच होती."
"तुझ्याबद्दल लिहायच्या विशेषणांच्या लांबलचक लिस्टमध्ये मी आता शॉविनिस्ट पण टाकते." तो तिला जाळ्यात पकडत होता हे कळून ती म्हणाली.
"खरं तर रिअलिस्ट म्हटलं पाहिजे."
"प्लीssजच म्हणजे. काहीही!" ती हेल काढून नंतर हसत म्हणाली.
अचानक तो वाकडंतिकडं न हसता पहिल्यांदाच सरळ नॉर्मल माणसासारखा हसला. त्याला हसताना बघून तिच्याकडून गडबडीत पेन खाली पडले.
"तू अजून जास्त वेळा हसत जा." टेबलखाली वाकून पेन उचलून वर येताना ती म्हणालीच.
"रिअली?" त्याने भुवया उंचावल्या.
"हम्म."
त्याच्या डोळ्यात एक ओळखीची चमक आली होती. तो इतका रफ, इतका विस्कटलेला असला तरी तो तिला खूप अपीलींग वाटत होता. दाढी आणि चांगला हेअरकट केला तर कदाचित तो हँडसमही दिसेल. ती बराच वेळ त्याच्याकडे बघत असावी कारण त्याने "काय?" असे मोठ्याने विचारले.
"ओह सॉरी" तिने जरा शरमून नजर दुसरीकडे वळवली.
"तू माझ्याकडे टक लावून बघत होतीस."
"माहितीये."
"का?"
ह्या प्रश्नाचे उत्तर फार कठीण होते. ती हे कबूल करू शकत नव्हती की त्याच्यातला तिचा इंटरेस्ट वाढत होता किंवा त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायला ती उत्सुक होती. त्यामुळे पटकन जे सुचले ते तिने बोलून टाकले. "तू कसा दिसतोस ते लक्षात ठेवते आहे. तू मला फोटो काढू देणारच नाही बहुतेक, म्हणून."
लगेच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. "तुझ्या आर्टिकलसाठी?"
उत्तर न देता तिने नवीन चौकोनात फुली मारली.
आता सलग तीन गेम ती हरली. तिला सरळ विचार करणे कठीण झाले होते.
"टाय ब्रेकर? पुन्हा तीन गेम्स!" त्याने विचारले.
"हो च!" तिला आता ह्या चढाओढीत मजा येत होती.
त्याने नोटपॅड समोर ओढले.
"मग दिवाळीसाठी तू इथे काही डेकोरेशन करतोस का?" तिला अचानक आठवले.
"अजून सात आठ दिवस आहेत ना आत्तापासून काय करायचंय? तसंही मी काही करत नाही." तो म्हणाला.
"आय गेस मलाच दिवाळीची आठवण येतेय. मुंबईत एव्हाना सगळे रस्ते, दुकानं सजली असतील कंदील, चांदण्या आणि पणत्यानी."
"आत्तापासून?"
"हो, आतापासूनच सगळीकडे गर्दी, लगबग सुरू झालेली असेल."
"हम्म, तू भरपूर शॉपिंग, डेकोरेशन करत असशील ना? म्हणजे तू त्या टाइपची वाटतेस मला." तो तिचा अंदाज घेत म्हणाला.
"ऑफ कोर्स!" ती अजून एक फुली मारत म्हणाली. "मी एकटी राहते तेव्हाही मी आकाशकंदील लावते, पणत्या रंगवते आणि बाल्कनीत फेअरी लाईट्सच्या माळा सोडते. त्याशिवाय दिवाळी दिवाळी वाटतच नाही. तू खरंच अजिबात काही डेकोरेशन नाही करत?"
"माझं काय? तू ही सगळी माहिती आर्टिकलमध्ये टाकायला खणून काढत असलीस ना तर आत्ताच बंद कर."
"अजिबात नाही, मी सहज विचारलं." ती जे काही बोलेल, विचारेल त्याच्याकडे तो संशयाने बघणारच होता.
कदाचित त्याला दिवाळीत काहीच इंटरेस्ट नव्हता."म्हणजे तुझ्या आणि सीडरच्या शेड्युलमध्ये काहीच बदल नसेल. नेहमीसारखेच दिवस.."
"हम्म बऱ्यापैकी तसंच असतं. क्वचित एखाद्या वर्षी मी नातेवाईकांकडे जातो किंवा फतेची आई आणि आजी दिवाळीला घरी बोलावतात, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो."
ऐन दिवाळीत तो इथे एकटा नसेल या विचाराने तिला जरा बरं वाटलं.
"बरं झालं."
"म्हणजे?" तो पेन तिच्याकडे पास करत म्हणाला.
"म्हणजे तू ऐन दिवाळीत इथे एकटा-एकटा नसशील हे ऐकून मला बरं वाटलं."
तिच्या उत्तराने त्याला मजा वाटली. "तू मला काय समजतेस माहीत नाही पण मला स्वतः ची कंपनी आवडते. तरीसुद्धा हे एकटं राहणं, लिखाण वगैरे सोडून मी इतर कामही करतो. बराचसा वेळ मी इथे असतो पण हे सोडून माझं घर.. दुसरीकडे आहे."
"काय? खरंच? आणि तिकडे तू काय काम करत होतास, म्हणजे पुस्तकापूर्वी."
"बाबाने इथे सांगलामध्ये एक छोटीशी फॅक्टरी सेटअप केली आहे. हिमाचलमध्ये खूप प्रकारची फळं आणि भाज्या पिकतात त्यामुळे आम्ही त्यांचे जॅम, चटण्या, लोणची, सरबत वगैरे तयार करतो. बऱ्याचश्या गोष्टी इथल्या बायका बचत गट बनवून तयार करतात आणि पॅकिंग फॅक्टरीत होते. इथली फार्मर्स सोसायटी आणि मी असे मिळून ती चालवतो. त्याच ब्रॅण्डखाली मी आणि एक मित्र मिळून एक छोटीशी वायनरी पण चालवतो. हा सगळा माल मोस्टली एक्स्पोर्ट होतो त्यामुळे इथल्या दुकानात तुला दिसणार नाही." अचानक त्याच्या कपाळावर पुन्हा आठ्या पडल्या, जणू काही त्याने चुकून खूपच माहिती उघड केली. "विसरून जा मी हे सांगितलं म्हणून."
तिने ओठांना झिप लावल्याची ऍक्शन केली. "डोन्ट वरी, मी हे काहीच लिहिणार नाहीये."
"भूक लागली ना? लंच ब्रेक!" तो विषय बदलत म्हणाला. एव्हाना दोघांनी एकेक गेम जिंकून पुन्हा टाय ब्रेक बाकी होता. त्यांनी पटापट सँडविचेस बनवून सीडरच्या सोफ्यावर बसून खाल्ली. सीडर आगीसमोर लवंडून मस्तपैकी कुंभकर्ण झाला होता. खिडकीबाहेर एव्हाना वादळ आणि बर्फ दोन्ही थांबून उजेड पसरला होता.
"शिट! मी आईला फोन करायला विसरले. मी पोचल्यावर कॉल करेन म्हणून सांगितलं होतं." ती सेलफोन बघत म्हणाली. बॅटरी संपली नव्हती पण नेटवर्क झीरो होतं. "नेटवर्क अजिबातच नाहीये. अजून काही ऑप्शन आहे कॉलसाठी?
"माझा सॅट फोन आहे पण तो इमर्जन्सीतच वापरतो. खूप महाग आहे."
"जे काही चार्जेस असतील ते मी पे करेन ना, जास्त वेळ बोलणारही नाही. मला फक्त मी सुखरूप आहे एवढंच सांगायचं आहे."
"उद्या तू इथून जाशील हेच पेमेंट खूप आहे." तो जराशी जीभ दाखवत म्हणाला.
"आऊच! मला वाटलं होतं आपलं आता थोडंसं का होईना जमायला लागलंय" ती उदास होत म्हणाली.
"आपण जवळजवळ फ्रेंड्स झालोच होतो पण तेवढ्यात तू मला फुलीगोळ्यात हरवलंस. फुलीगोळ्यात!" तो हसत म्हणाला.
"हुं! मेन अँड देअर इगोज!" तिने नाक मुरडले.
त्याने तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलून तिला कॉल कनेक्ट करून दिला. "हॅलो बाबा, मी बोलतेय. पटकन बोला, इथे नेटवर्क नाहीये. मी अजून हिमाचलमधेच सांगलाजवळ आहे. उद्या निघेन इथून. आईला सांगा मुंबईला पोचल्यावर फोन करेन आता."
"आई खूप चिडली आहे तुझी काळजी करून करून."
"हो, तिला आता देऊ नका फोन. मी सॅटेलाईट फोनवरून बोलतेय. खूप चार्जेस आहेत."
"काय? अश्या कुठल्या रिमोट एरियात आहेस? ओह तू त्याला शोधून काढला की काय?" बाबा एक्साइट होऊन विचारत होते.
यांना आता उत्तर दिलं तर चौकश्या संपायच्या नाहीत. "म्हटलं ना सांगलाच्या जवळ आहे. डोन्ट वरी परवापर्यंत मी मुंबईत असेन, मग बोलू सगळं. अजिबात काळजी करू नका."
"ओके, पण घरी आल्यावर सगळा रिपोर्ट हवाय मला."
"येस बॉस! बाय बाय" ती ओरडून म्हणाली. होपफुली त्या खरखरीतून तिचा आवाज पोहोचला असेल.
फोन ठेवून ती वळली तर तो जॅकेट आणि बूट घालून उभा होता. "तू कुठे चालला आहेस?" तिने आश्चर्याने विचारले.
"सीडर कंटाळलाय, बर्फ थांबलाय तर त्याला बाहेर फिरवून आणतो. त्याला पळवायची गरज आहे. ढोल्या!" तो उड्या मारणाऱ्या सीडरच्या मानेला खाजवत म्हणाला.
दारात जाऊन तो जरासा घुटमळला. "तुला एकटी राहायला काही प्रॉब्लेम नाही ना? लवकर येईन मी."
"चिल, नो वरीज. बाय बाय सीडूss" ती हात हलवत म्हणाली. त्याने विचारलं हेच तिला खूप वाटत होतं.
खरं म्हणजे तिला प्रायव्हसी हवीच होती, त्याशिवाय लिहायला सुचलं नसतं. तो दाराबाहेर पडल्यापडल्या तिने बॅगेतून टॅब काढला. तिला सगळ्या पॉईंट्सची जमवाजमव करायला अजिबात वेळ लागला नाही. त्याच्यावर एक फुल पेज लेख होईल इतकी माहिती तिच्या डोक्यात जमली होती. ती आगीसमोर रगवर मांडी घालून बसली. तिच्या डोक्यातला डेटा पटापट टाईप करत तिने टॅबवर उतरवला. अर्ध्यापाऊण तासात तिच्या मनासारखा रफ ड्राफ्ट तयार झाला होता. वर्ड फाईल सेव्ह करून तिने टॅब बंद केला आणि प्लॅस्टिक कव्हरमध्ये गुंडाळून परत बॅगमध्ये ठेवला. लिहीत असताना तो परत आला नाही ते एक बरं झालं. ती मनात म्हणाली. फ्रीजमधून एक लालभडक सफरचंद काढून, धुवून, ती सोफ्यावर येऊन खात बसली.
क्रमशः
डोक्यात साठलेले सगळे काही वर्डपॅडवर उतरल्यानंतर तिला एकदम रिते रिते वाटायला लागले. इथे तिथे पडलेल्या दोन तीन वस्तू जागच्या जागी ठेवल्यावर तिला कंटाळा आला. नेटवर्क असते तर अनाबरोबर गप्पा मारता आल्या असत्या. ट्रिप प्लॅन करायला वेळ मिळाला असता तर तिने निदान किंडल तरी न विसरता बॅगेत टाकले असते. बरेच जर-तर सिनारिओ कल्पून तिला अजूनच कंटाळा आला.
शेवटी तिने पर्समधले गुळगुळीत फिल्मी मॅगझीन काढले आणि तिला कल्पना सुचली. पर्समधून इमर्जन्सीसाठी ठेवलेला सुईदोरा आणि किचनमधली कात्री घेऊन तिने काम सुरू केलं. पटापट कागद कापून गोलसर करवती करंज्या, लांब लांब झिरमिळ्या लेवून तिचा क्यूटसा न्यूजप्रिंट आकाशकंदील तयार झाला. "आह! हॅन्डमेड डिझायनर लँटर्न" चिमटीत दोरा पकडून कंदील बघत, ती उगीच ऍक्सेन्ट मारत म्हणाली.
त्याला हे असले उद्योग न आवडण्याची तिला खात्री होती. पण तिचा वेळ तरी मजेत गेला आणि तो आल्यावर असा कंदील बघून त्याला निदान हसायला तरी येईल!
सोफ्याच्या समोरच सीलींगला उंचावर एक हुक दिसत होता. दोन प्लास्टिक खुर्च्या एकावर एक ठेवल्यावर तिची उंची पुरत होती. ती खुर्चीत चढून, पाय उंचावून, हात वर ताणून कंदील बांधत होती.. तोच धाडकन दार उघडून आदित्य आणि सीडर आत आले.
"व्हॉट द..!" तो शॉक होऊन ओरडला.
चमकून तिचा तोल गेला आणि हात हलवत काहीतरी पकडण्यासाठी शोधत ती खाली कोसळली. आदित्यने पटकन पुढे पळत तिला पडण्याआधी हवेतच हातात झेलले. त्याला घट्ट चिकटलेली असतानाच तिने हळूच घाबरून रोखलेला श्वास सोडला. एक क्षण ते फक्त एकमेकांच्या डोळ्यात टक लावून बघत राहिले. हृदयाची धडधड तर शांत व्हायचे नावच नव्हते. तिने त्याच्या पाठीवर मूठभर जॅकेट घट्ट धरले होते. तिच्या नाजूक गळ्याची शीर थरथरत होती. तिची रिऍक्शन कळल्यासारखी त्याची नजर आधी तिच्या गळ्याकडे गेली. त्याने तिला सोडले नव्हते आणि असे अर्धवट हवेत लटकूनही तिला जमिनीला पाय लावावेसे वाटत नव्हते.
तिच्या गळ्यावरून, हनुवटीवरून त्याची नजर हळूहळू तिच्या ओठांवर स्थिरावली आणि जेव्हा त्याने पुन्हा तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा तिच्या तोंडाला कोरड पडली होती. तिने नकळत कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली. 'हे कधी झालं?' तिला प्रश्न पडला आणि लगेच पुढचा विचार आलाच, 'आता तू काय करशील उर्वी?' काय करायचंय ते तिला आता कळलं होतं. ती डोळे मिटून त्याची वाट बघत राहिली.
पण काहीच नाही!
त्याने अलगद पाय जमिनीवर टेकवत तिला खाली उतरवले. लगेच एक पाऊल मागे होऊन तो थोडे अंतर ठेवून उभा होता, जसं काही इतकं जवळ येऊन त्याने स्वतःभोवती उभी केलेली सगळी भिंत तिने तोडूनफोडून टाकली होती.
"हे सगळं काय आहे?" त्याने घोगऱ्या आवाजात विचारले. त्याचा आवाज अजिबात त्याचा राहिला नव्हता.
"काय?" तिला स्वतःला ती काय करतेय समजत नव्हते. तो काय विचारतोय त्याचा अर्थ लागत नव्हता. त्यांच्यात तयार झालेला हा नवा, नाजूक बंध त्यालाही जाणवला होता का? "अं.. मी" तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.
"हे." तो सिलिंगकडे बोट दाखवत म्हणाला.
"ओह आकाशकंदील!" तिच्या मनात एकाचवेळी मूर्खपणाची, लाजिरवाणे आणि सुटका झाल्याचीही भावना होती. "मला वाटलं इथून जायच्या आधी तुझ्या घरात थोडं दिवाळी स्पिरिट भरून ठेवावं."
त्याने आठ्या घालून वर कंदिलाकडे पाहिले.
"सॉरी, तुला नको असेल तर काढून टाकते मी." ती म्हणाली.
तो हळूच हसला. "आणि काय दुसऱ्यांदा पडून मान मोडून घ्यायची रिस्क घेणार? जाऊदे!"
"माझ्यामते तो खूप भारी दिसतोय." ती त्याच्याकडे बघून म्हणाली.
"तुझ्या मते!"
"का? तुझ्या नाही का?"
"मग डिनरला काय? पास्ता चालेल? मला खूप भूक लागली आहे. सीडर आज सुटका झाल्याच्या आनंदात इतका उंडारत होता की त्याचा पाठलाग करून मीच थकलो." त्याने उत्तर न देता विषय बदलला.
कोपऱ्यात सीडर खाली मान घालून गपागप त्याच्या डिशमधलं किबल खात होता. आदित्यने आत जाऊन गॅसवर पाणी उकळत ठेवले. फ्रीजमध्ये आधीच करून ठेवलेल्या मरिनारा सॉसचा डबा बाहेर काढून ठेवला.
"मी काही मदत करू?" तिने त्याच्या मागोमाग जात विचारले.
"उम्म.. फ्रीजमध्ये लाल झाकणाच्या बरणीत विनेगरमध्ये बुडवलेल्या मश्रूम्स आहेत. त्या फक्त काढून क्रिस्पी ब्राऊन दिसेपर्यंत भाज. नंतर वरून मीठ आणि थोड्या ह्या बाटलीतल्या हर्ब्ज घाल की झालं." तो उकळत्या पाण्यात स्पगेटी ओतत म्हणाला.
"ओके शेफ!" ती सॅल्युट करत म्हणाली. त्याच्या शेजारी उभी राहून तिने दुसऱ्या शेगडीवर तवा ठेऊन थोड्याश्या बटरवर मश्रुम परतायला सुरुवात केली. त्या दोघांनाही मघाशी झालेली ती जाणीव विसरून जायचे होते. दोघेही एकमेकांना काही घडलंच नाही, सगळं पूर्वीसारखंच आहे असं दाखवायचा प्रयत्न करत होते. त्यातही ती जास्तच कारण ती अक्षरशः त्याच्या गळ्यात पडली होती अँड शी वॉज बेगिंग टू बी किस्ड! ते आठवूनही तिला आता शरमल्यासारखं होत होतं. ती अधूनमधून त्याच्याकडे आणि स्पगेटी ढवळणाऱ्या त्याच्या मजबूत रफ हातांकडे चोरटे कटाक्ष टाकत होती. त्याचा पूर्ण फोकस समोरच्या उकळत्या पाण्यावर होता. हवेतील उष्णता उकळत्या स्पगेटीपेक्षा ह्या लहानश्या जागेत दोघांच्या तिथे असण्यामुळे वाढली होती.
स्पगेटी थोडी शिजेपर्यंत तिच्या रोस्टेड मश्रूम्स तयार होत्या. तिने कपाटातून प्लेट्स, चमचे, पाण्याचे ग्लास वगैरे काढून टेबल सेट करून ठेवले. तो सॉस गरम करून पास्ता ढवळत असताना ती खुर्चीत बसून, गालावर हात ठेवून त्याला निरखून बघत होती. अचानक त्याने मागे वळून पाहिले आणि गडबडून तिचा हात निसटला. ती त्याच्याकडे बघून कशीबशी हसली. त्याने स्पगेटीचे भांडे टेबलवर आणून ठेवले. ती प्लेटमध्ये वाढत असताना तो आतून हातात एक रेड वाइनची एक बॉटल घेऊन आला.
"तुला वाइन चालेल?" त्याने विचारले.
"धावेल!" ती हसून म्हणाली.
त्याने बॉटल टेबलवर ठेवली आणि ग्लासेस आणायला गेला.
"स्पगेटी मरीनारा पास्ता विथ रोस्टेड मश्रुम सॅलड आणि आता रेड वाइन! आपण काही सेलिब्रेट करतोय का?" तिने त्याला चिडवत विचारले.
"हो. फते तुला सकाळी घ्यायला येणार आहे."
"ऑफ कोर्स! ते कसं विसरेन." ती शांत होत म्हणाली."आणि मी लवकरच इथून जाणार म्हणून तुझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील."
आश्चर्य म्हणजे त्याने तिला उलट उत्तर दिले नाही. त्याने शांतपणे ग्लासेस आणून ठेवले आणि वाइन उघडली. "चीअर्स" ती ग्लास उचलून म्हणाली.
"टू फुलीगोळा!" तो ग्लास टेकवत म्हणाला. "आपला टाय ब्रेकर गेम अजून बाकी आहे."
"टू फुलीगोळा!" तिने हसत मान डोलावली.
"Wow किती लाईट आणि अर्दी आहे ही! कुठली आहे?" वाईनचा एक घोट घेताच ती म्हणाली.
"आमचीच आहे, 'लुंग ता' हिमालयन पिनो न्वा!" त्याने प्राउडली बॉटल उचलून तिच्याकडे दिली.
गुळगुळीत लेबलवर रंगीबेरंगी तिबेटी पताकांची अर्धगोलाकार माळ आणि त्याच्या वर एका निळसर स्नो फ्लेकमध्ये Lung Ta असं कॉमिक फॉन्टमध्ये लिहिलेलं होतं.
"लुंग ता म्हणजे काय?" तिने उत्सुकतेने विचारले.
"तिबेटी भाषेत लुंग ता चा अर्थ आहे wind horse. तू बुलेटच्या हॅण्डलला बांधलेल्या तिबेटी झेंड्यांच्या माळा बघितल्या असशील ना? ते फ्लॅग्स म्हणजे भिक्खूंचा प्रेयर फ्लॅग असतो. प्रेयर फॉर वेल बीइंग अँड गुड लक. त्याला म्हणतात 'लुंग ता'. आपल्या इथून पुढे तिबेट बॉर्डर सुरू होते त्यामुळे इथे त्या कल्चरचा खूप प्रभाव आहे. मग आम्ही तोच ब्रँड बनवून टाकला. जॅम, सॉस वगैरेपण याच ब्रॅण्डमध्ये बनतात."
"कूल!" तिने पुन्हा ग्लास तोंडाला लावला. ग्लासच्या काठावरून तिने त्याच्याकडे बघितले तेव्हा आधीच तिच्याकडे बघणाऱ्या त्याच्या नजरेत ती अडकून पडली. शेवटी मुद्दाम तिने नजर हटवून लोळत पडलेल्या सीडरकडे पाहिलं. ती स्वतःला पुन:पुन्हा आठवण करून देत होती की ती इथे फक्त त्याची मुलाखत घ्यायला आली होती. त्याच्याबरोबर २४ तासांहून अधिक वेळ घालवल्यानंतर तिच्याकडे गरजेपेक्षा खूप जास्त माहिती गोळा झाली होती आणि तिने आर्टिकल पब्लिश केल्यावर कदाचित आदित्य संत तिच्याशी जन्मात परत कधी बोलणार नव्हता.
क्रमशः
'हे असं चालणार नाही' आदित्य मनोमन ठरवत होता. उर्वी इथे अचानक येऊन थडकली हे त्याला अजिबात पटले नव्हते. ती दिसल्यावर तिला घरातच घ्यायचे नव्हते पण ती इतकी थकलेली, गारठलेली होती की शेवटी तिला उचलूनच न्यावे लागले. त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, घरात आली तर आली पण तो तिला कणभरही माहिती मिळू देणार नव्हता. ना तिच्याशी कामाशिवाय काही बोलणार होता. फक्त हो, नाही मध्ये उत्तरे द्यायची आणि वादळ जरा थांबले की लगेच तिला पिटाळून लावायचे हाच त्याचा प्लॅन होता.
आणि तरीही गेल्या २४ तासात तिला स्वतःबद्दल नको तितकी माहिती दिली गेली होती. त्याचे सगळे खाजगी आयुष्य, त्याचे नताशाबरोबरचे नाते, जे खूपच कमी लोकांना माहीत होते ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर उघड झाल्या होत्या. वर हे कमी की काय म्हणून आता त्याला तिच्या उद्यापासून तिथे नसण्याची हुरहूर लागली होती. तिचे केस, डोळे, ओठ, चेहरा राहूनराहून त्याला आठवत होता. संध्याकाळी तिला घट्ट मिठीत घेण्याची एवढी तीव्र इच्छा झाली होती की तो शेवटी सीडरला घेऊन घराबाहेर पडला.
काही किलोमीटर पळून मनातले सगळे विचार खोडून तो घरी पोचतो तोच ती त्याला खुर्चीवर उभी दिसली आणि थेट त्याच्या हातातच पडली. त्याने तिला पकडल्यावर तिने तिच्या त्या सोनेरी मधाळ डोळ्यांनी त्याच्याकडे असे पाहिले की त्याने स्वतःभोवती उभी केलेली मजबूत भिंत कधीच कोसळून गेली. पण पुढे न जाता त्याने पाऊल मागे घेतले कारण त्याला तिसऱ्यांदा पुन्हा तुटून पडायचे नव्हते. हृदयावर आधीच झालेल्या जखमा इतक्या खोल होत्या की आता एखाद्या ओरखड्यानेसुद्धा त्याचे तुकडे झाले असते. त्याने मन घट्ट केले पण तरीही त्याच्या हृदयात कुठेतरी खोलवर मऊ मऊ वाटत होते आणि आतून येणारी उबदार जाणीव काही कमी होत नव्हती.
मन ताळ्यावर ठेवायला म्हणून त्याने फुलीगोळा खेळून पाहिला, स्वयंपाक करून पाहिला, वाईनही उघडली. पण त्याला जेवणापूर्वी ती जेवढी सुंदर दिसत होती, त्याहून आता खळखळून हसताना ती अक्षरशः चमकत होती. इतकी जीवघेणी गोड दिसत असताना तो तिच्यावरुन डोळे अजिबात हटवू शकत नव्हता.
तो हातातल्या पिनो न्वा ला दोष देऊ शकत होता, पण तिच्या त्याच्याकडे बघून साध्या हसण्याची नशा त्याहून जास्त होती. काय घडतंय कळण्याचा आत त्याचा स्वतःवरचा कंट्रोल हळूहळू सुटत चालला होता. दिस इज बॅड! रिअली बॅड.
"आदित्य? आदित्य?" ती त्याच्या तोंडासमोर हात हलवत होती.
"ओह सॉरी, काय म्हणत होतीस?" तो एक क्षण डोळे मिटून म्हणाला.
"तुझं पुस्तक एवढं प्रसिद्ध झालं ऐकल्यावर तुला आश्चर्य वाटलं असेल ना?"
त्याने होकारार्थी मान हलवली. त्याच्या साध्या सरळ, raw लिखाणाला एवढं यश मिळाल्यावर त्याला धक्काच बसला होता. त्याचा पब्लिशर त्याला पुस्तक बेस्टसेलर लिस्टमध्ये गेल्यापासून सारखे अपडेट्स देत होता. "माझा पब्लिशर सांगत होता की पुस्तक खूपच पॉप्युलर झालं आहे म्हणून."
"ते आहेच! आदित्य, आजपर्यंत हजारो लोकांनी पुस्तक वाचलंय आणि सगळेच त्याच्या प्रेमात आहेत. अगदी माझे बाबासुद्धा! तुला पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी काय सुचली?"
तो रिलॅक्स होत हाताची घडी घालून खुर्चीत मागे टेकून बसला. "मी आजूबाजूची, नातेवाईकांची मुलं सदैव स्क्रीन्समध्ये गाडलेली बघत होतो. आमच्या घरासमोरच्या रिकाम्या शेतात पिच बनवून लहानपणी आम्ही दिवस दिवसभर क्रिकेट खेळायचो, गेल्या काही वर्षांपासून तिथे चिटपाखरूही नसतं. नदीत पोहणे, डोंगर चढणे अश्या साध्या गोष्टीतली मजा या मुलांना कळतच नाही त्यामुळे माझ्या लहानपणापासूनचे माझे अनुभव, पहाडातल्या गोष्टी, दंतकथा, किस्से हे सगळं एकत्र करून काहीतरी लिहायचं होतं. सुरुवात केली आणि लिहितच सुटलो. त्याचं पुस्तक कधी झालं ते कळलंच नाही. माझ्या एका मित्राने स्वतःच ड्राफ्ट पब्लिशरला पाठवला आणि पुढची बोलणी झाली."
ती गालावर हात टेकून उत्सुकतेने त्याचं बोलणं ऐकत होती.
"तुला माहितीये ह्या पुस्तकामुळे इंस्पायर होऊन कितीतरी लोकांनी ट्रेकिंग, हाईक्स आणि इतर ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये भाग घेणे सुरू केलं आहे. ऑन माय ओन नावाने पुस्तकाचे आणि तुझे कितीतरी फॅनक्लब्ज, ग्रुप्स सोशल मीडियावर तयार झाले आहेत. या सगळ्या लोकांना आपला आयडॉल, इन्स्पिरेशन म्हणून तुला बघायची, समजून घ्यायची खूप इच्छा आहे." सांगताना उत्साहाने तिचे डोळे चमकत होते.
तिच्या तोंडून कौतुक ऐकून त्याला जरा जास्तच बरे वाटत होतं. बट दिस शुड स्टॉप! त्याने स्वतःला बजावले. तो तिच्याबरोबर जास्तच कम्फर्टेबल झाला होता हा मुख्य प्रश्न होता. तिने काहीच प्रयत्न न करता तो स्वतःहूनच तिच्यासमोर खुली किताब बनला होता. तिच्यातल्या कुठल्या गोष्टीने तो इतका मऊ पडला ते त्यालाच आठवत नव्हते. कदाचित तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगताना तिच्या डोळ्यात जी वेदना दिसली ती त्याला कुठेतरी तिच्याशी जोडून गेली. आधी ती त्याला बोलतं करण्यासाठी खोटं बोलतेय वाटलं होतं पण तिच्या डोळ्यात भरलेलं पाणी आणि नंतर ते लपवून तिला काही फरक पडत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न किती खरा होता ते त्याला जाणवलं होतं.
आता फक्त उद्या फते वेळेवर यावा नाहीतर आधीच अस्ताव्यस्त झालेले त्याचे आयुष्य सुधारण्याचे काही चान्सेस नव्हते.
जेवण झाल्यावरही प्लेट्स वाळून जाईपर्यंत त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. त्याच्याशी बोलणं इतकं रिलॅक्सिंग, इतकं सोपं असेल असं तिला इथे आल्यापासून वाटलंच नव्हतं. पुस्तकाबद्दल तो ज्या मोकळेपणाने बोलत होता ते ऐकून ती थक्कच झाली होती.
"आय लाईक यू आदित्य!" सिंकसमोर त्याच्याशेजारी उभं राहून त्याच्या हातून प्लेट घेऊन पुसत ती म्हणाली.
"एक्स्क्यूज मी?" तो भुवई उंचावून म्हणाला.
"म्हणजे सुरुवातीचे काही रोडब्लॉक्स सोडले तर मला इथे तुझ्याबरोबर घालवलेला सगळा वेळ मजा आली."
"खरंच?" तिच्या बोलण्याची त्याला मजा वाटत होती. अजून ऐकायला तो हातातली प्लेट खाली ठेवून तिच्याकडे बघत होता.
तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. "कमॉन! मी तुझ्या इगोत भर घालणार नाहीये. आधीच भरपूर आहे तुझ्याकडे." तिने चिडवले.
"प्लीज! मला खरंच ऐकायचंय."
तिला आता हसू दाबता आले नाही. "ओके.. म्हणजे तुझ्यातला खरेपणा लपून नाही रहात. तू जसा आहेस तसा आहेस आणि लोकांना तसं दाखवायला तू अजिबात घाबरत नाहीस. तुझ्याकडे कुठलेही मुखवटे नाहीत. आय लाईक दॅट."
खरं सांगायचं तर ती त्याच्या मॅनली मॅन असण्याकडे पण अट्रॅक्ट झाली होती पण मान्य करत नव्हती. त्याचे मसल्स कुठल्या जिममध्ये वर्कआऊट आणि प्रोटीन पावडर खाऊन नव्हे तर खऱ्याखुऱ्या अंगमेहनतीचे फळ होते.
तो लक्ष देऊन ऐकतोय म्हटल्यावर ती पुढे बोलायला लागली. "सोसायटी पेज कव्हर करताना मी इतक्या माणसांना भेटते, ते सगळे एकजात फक्त पैसा, इन्व्हेस्टमेंट्स, नवीन गाड्या आणि स्वतःची खोटी प्रतिमा यातच गुंतलेले असतात. या सगळ्यातून तुझ्याशी बोलणं म्हणजे खूप रिफ्रेशिंग चेंज होता."
"मी खूपच हुशार आहे ना?" तिच्या विशेषणांमध्ये भर टाकत तो तिला चिडवत हसला.
"ओह आणि किती तो नम्र माणूस!" तिने झब्बू दिला.
"तूशे! आणि गुड लुकिंगबद्दल काय मत?"
"ते मत देण्याइतकी मी क्वालिफाईड नाही." मान वाकडी करून त्याच्या चेहऱ्याचे ऑडिट करत ती म्हणाली.
"पण का?"
"कारण त्या दाढीने तुझा निम्मा चेहरा झाकून टाकलाय, ठरवणार कसं मी?"
"ट्रू! पण मी सांगतोय म्हणजे ते खरं असायला हवं तुझ्या म्हणण्याप्रमाणे. दाढी वाढवणे ही इथे जिवंत रहाण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे."
"अरर.. हे मला आधीच कुणी सांगितलं असतं तर मी वाढवून आले असते." यावर दोघेही एकदम हसले आणि हसता हसता नजरानजर होताच पुन्हा मान खाली घालुन प्लेट्स धुवायला लागले.
"मग परत टाय ब्रेकर तीन गेम्स? फक्त यावेळी जिंकणाऱ्याला झोपायला बेड मिळेल" तो हात पुसत म्हणाला.
ही बेट तिला आवडली होती. "येस्स!" ती लगेच म्हणाली. काल तिला जी काही बरी झोप लागली ती त्याच्या बेडमुळेच होती. नाहीतर त्या सोफ्याने तिच्या पाठीचं पार भजं करून टाकलं होतं. निम्मी झोप त्या सोफ्याने खाल्ली होती आणि निम्मी थंडीने कुडकुडत. नाही म्हणायला तिथे एक सीडर तेवढा बोनस होता. तिला आधीच उबदार झालेल्या त्याच्या गुबगुबीत ब्लॅंकेटमध्ये लपेटून जाणे आठवले आणि तेव्हा न जाणवलेला पण लक्षात राहिलेला ब्लॅंकेटला लागलेला त्याच्या कलोनचा फ्रेश, लेमनी गंध! नुसत्या आठवणीनेच तिच्या अंगावर शहारा आला.
विचारांमध्ये रमून पहिला गेम हरल्यावर ती जागी झाली. आता काही करून जिंकलंच पाहिजे म्हणून अखंड बडबड करत त्याला डिस्ट्रॅक्ट करून ती सहज दुसरा गेम जिंकली. एव्हाना तिचे सोफ्यामुळे दुखावलेले खांदे आणि मान जरा त्रास द्यायला लागले होते. तिला अधूनमधून बोटांनी खांदा दाबायचा प्रयत्न करताना बघून तो खुर्चीतून उठला.
"टाय ब्रेकआधी तुझा मेंदू जरा शांत करण्याची गरज आहे." म्हणत त्याने बोटांनी हळुवारपणे एकेक स्नायू मोकळे करत तिची मान आणि खांदयांमधली एकेक गाठ सोडवली. त्याचवेळी तिच्या कण्यातून अनेक नवनव्या जाणिवा थरथरत तिच्या मेंदूपर्यंत पोचत होत्या. त्याच्या स्पर्शात विरघळून जात, हम्म.. म्हणून एक लांब श्वास सोडत तिची मान झुकली. त्याचक्षणी तिला मानेच्या बाजूला हळूवार उष्ण श्वास जाणवला. जसं काही तो तिला किस करायला झुकला होता. त्याच्या ओठांचा इतका पुसट, मुलायम स्पर्श होता की तिला हे तिच्या कल्पनेतच घडल्यासारखं वाटत होती. आतापर्यंत तो जे काही बोलला, वागला त्यावरून तरी तो इथून तिला लवकरात लवकर पाठवून द्यायलाच उत्सुक वाटत होता. ती जरावेळ डोळे मिटून तशीच खुर्चीत बसून राहिली.
क्रमशः
तिने डोळे उघडून एक खोल श्वास घेतला. "मला मोकळ्या हवेत जायचंय, इथे जरा बंद बंद वाटतंय." खरं तर तिला तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके जरा शांत करायचे होते. त्यांच्यामुळे खोलीतील तापमान तर आधीच वाढलेले होते.
"चलो" म्हणून शांतपणे त्याने तिचा स्वेटर हातात दिला. त्याने त्याचं जाडजूड जॅकेट चढवून दार उघडलं. बाहेर पाऊल टाकताच गार वाऱ्यात हुडहुडी भरून तिने हाताची घट्ट घडी घातली. तिच्या पातळ स्वेटरला तिथली थंडी झेपत नव्हतीच. डोक्यावर आणि आजूबाजूला पसरलेले काळ्या मखमलीसारखे गडद, मऊ आकाश आणि त्यात हिऱ्यामोत्यांची रास उधळून दिल्यासारखे चांदणे चमचमत होते. सत्तावीस वर्षांच्या तिच्या अख्या आयुष्यात तिने एवढे चांदणे बघितले नव्हते. चंद्र समोरच्या कुठल्यातरी देवदारामागे लपला होता पण त्याची कमी अजिबात जाणवत नव्हती.
"अनबिलीव्हेबल!" त्या जादुई क्षणात हरवून जात ती हळूच म्हणाली.
सीडर बाहेर पडू नये म्हणून दार लॉक करून तो तिच्यामागे आला. "ह्या व्ह्यूचा मला कधीच कंटाळा येत नाही." तीच्या खांद्यावर हात टाकून तो तिच्या कानापाशी कुजबुजला.
"नो वंडर! इथे माझ्याकडची सगळी विशेषणं संपली." ती वर बघत म्हणाली.
"आपल्या डावीकडे उत्तर दिशा आहे." त्याने तिला डावीकडे अर्धवट वळवत वर बोट दाखवले.
तिकडे बघताच ती अवाक झाली. चिमणीतून निघणाऱ्या धुराच्या लोटासारखा, चांदणचुऱ्याने भरलेला एक लोळ देवदारांच्या शेंडयांपासून लांबवर हिमालयाच्या शिखरांपर्यंत पसरलेला होता. थोडेसे उधळलेले लाल, निळे, पिवळे रंगही मध्येच चमकून जात होते. "इज दॅट द.. मिल्की वे?" ती अजूनही आश्चर्याने ते अभूतपूर्व दृश्य डोळ्यात साठवून घेत होती.
"येस, आपल्या आकाशगंगेचा लहानसा भाग! आधी कधी बघितली नाहीस का?" तो समोर आकाशात बघत म्हणाला.
"कधीच नाही. म्हणजे ऐकून माहिती होतं पण नुसत्या डोळ्यांनी हे दिसेल असं वाटलं नाही. किती सुंदर, जादू आहे ही!"
"आज आपण लकी आहोत, जेव्हा पूर्ण काळोखी रात्र असते तेव्हाच आकाशगंगा दिसते. आत्ता चंद्रावर ढग आलेले असणार." तो म्हणाला.
तो चमकणारा लोळ बघूनच तिला वाजणारी थंडी नाहीशी झाली होती. मग अचानक तिच्या लक्षात आलं की आजूबाजूला थंडी आहेच पण तिच्याभोवती त्याचे हात वेढलेले होते. त्याच्या शरीराच्या उबेने थंडी बाहेर रोखून धरली होती.
"श्श्.. एक मिनिट डोळे मिट." तो तिला गप्प करत म्हणाला.
ती डोळे मिटून शांत उभी राहिली.
"काही ऐकू येतंय?" त्याच्या गरम श्वासाने तिचे कान थरारले.
"हम्म.. बारीक आवाज येतोय, काच तडकल्यासारखा... मधेच काच खळकन फुटल्यासारखा पण येतोय" ती कुजबुजली.
"तू जिथून चालत आलीस त्या पुलाखालून बस्पा नदी वाहते. आता तिचा वरचा लेयर गोठून बर्फ झालाय पण आत पाणी पूर्ण गोठलेले नसते ते वाहण्याचा प्रयत्न करत असते त्या प्रवाहामुळे बर्फाचे तुकडे हलून बाहेरच्या घट्ट बर्फावर मोठमोठे तडे जातात. त्याचा आवाज आहे हा."
"ओह! तुलाही ऐकू येतोय?" तिच्या तोंडून आता शब्द फुटत नव्हते. त्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे तिचा श्वास जवळजवळ थांबला होता.
"हम्म." पुन्हा त्याचा श्वास तिच्या मानेजवळ जाणवला आणि तिने हळूच सुस्कारा सोडला.
त्याच क्षणी दोघांना ते एकमेकांना किती घट्ट चिकटून उभे आहेत ते जाणवले. काही न बोलता त्याने पटकन तिच्या खांद्यावरून हात काढला आणि घरात निघून गेला. ती काही मिनिटे तशीच देवदारांच्या नागमोडी रांगेवरून दिसणारा आकाशातला चमचमता चुराडा न्याहाळत उभी राहिली. एव्हाना चंद्र अक्खा ढगाबाहेर येऊन आकाशगंगा पुसट झाली होती. चंद्रप्रकाशात पायाखालचा आणि झाडाझुडपांवरचा बर्फ चांदण्यासारखाच चमकत होता. तिच्यासाठी ही रात्र खरंच जादुई होती.
अखेरीस तिने घरात शिरून दार बंद केले. तो आधीच टेबलासमोर बसला होता. "मेंदू रिस्टार्ट झाला का तुझा?" तो घसा खाकरत म्हणाला.
"हो, बराचसा." तिच्या आवाजातली थरथर त्याला जाणवू नये म्हणून ती प्रार्थना करत होती.
"मी आजपर्यंत अनुभवलेली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे." ती पुढे म्हणाली.
"मीपण" तो तिला वरपासून खालपर्यंत डोळ्यात साठवत म्हणाला.
तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले तेव्हाही तो तिचे निरीक्षण करत होता. त्याने त्याचे घर, त्याचे आयुष्य दोन दिवस तिच्याबरोबर शेअर केले म्हणून तिला त्याचे आभार मानायचे होते. शब्द तिच्या अगदी ओठांपर्यंत येऊन थांबत होते.
ती घाबरत होती की ती आता एक शब्द जरी बोलली तरी ती डोळ्यातून येणारा पाण्याचा ओघ थांबवू शकणार नाही. हे शेवटी अनुभवलेले काही क्षण इतके दैवी होते की तिला एखाद्या निबीड अरण्यात भग्न देवालयाच्या थंड दगडी फरशीवर बसून आवर्तने घेणारा घंटानाद ऐकल्याप्रमाणे वाटत होते.
ती त्याच्याकडे बघून हसली आणि पुन्हा खेळायला खुर्चीत जाऊन बसली. सगळं नॉर्मल आहे काही घडलंच नाही असं दाखवायचा तिचा प्रयत्न होता. पण मनातून आता काहीच नॉर्मल नाहीये हे पक्के समजलेले होते. नशिबाने ती सकाळीच इथून निघून जाणार हेच बरं आहे. हा विचार येताच एकीकडे तिचा घसा दाटून येत होता. फक्त दोन दिवसात हिमाचल आणि आदित्यने तिच्या मनात घर केले होते.
टाय ब्रेकर गेम ती काही सेकंदात हरली कारण तिचा मेंदू बंद पडला होता. तिला हे समजत नव्हतं की ती उद्या त्याचा, ह्या उबदार घराचा निरोप कसा घेणार होती? ती निघाली तरी तिचे हृदय ह्या एकांतातच मागे राहून जाणार होते.
त्याने तिला जिंकू द्यायचा प्रयत्न करूनही ती हरलेली पाहून त्याला धक्काच बसला. तिला सोफ्यावर झोपून किती त्रास झाला ते त्याला समजत होते. "तू झोप बेडवर." तो तिच्याकडे पाहून म्हणाला.
"नाही तू झोप. तू जिंकलास शेवटी!" ती उसना उत्साह आणत हसून म्हणाली. सीडर तिच्याजवळ असेलच सोबतीला. ह्या सुंदर दोन दिवसांसाठी अशी सोफ्यावरची झोप कुर्बान! सकाळी लवकर निघून connecting फ्लाईट्स पटापट मिळाल्या तर निदान तिथे झोप तरी पूर्ण करता येईल.
त्याने उठून नोटपॅड, टेबलभर पसरलेले कागद, पेन वगैरे गोळा करून सेंटर टेबलच्या खणात ठेवले.
"मला माहितीये, मी तुला नको असणारी पाहुणी होते." ती खुर्चीवर मागे टेकत म्हणाली. "पण तरीही तू माझी काळजी घेतलीस, माझ्याशी इतका चांगला वागलास आणि मुख्य म्हणजे मला सहन केल्याबद्दल मला खरंच तुझे आभार मानायचे आहेत."
"तू इतकीही वाईट पाहुणी नव्हतीस." तो खांदे उडवत म्हणाला.
"आणि लोकांच्या मताविरुद्ध, तू ही नाहीस!"
"आणि तुझ्या मते?" तो हसला.
"अम्म्म.. आपली सुरुवात इतकी काही चांगली नव्हती."
"खरंय." त्याने मान्य केलं.
"तू फतेवर अजून नाराज आहेस का?"
त्याने थोडा विचार केला. "त्याला मी नंतर बघून घेईन."
"प्लीज त्याला फार त्रास देऊ नको." ती विनवत म्हणाली. "त्याने खरंच तुझ्या भल्याचा विचार करून हे केलं. तुझा चांगला मित्र आहे तो."
"हम्म, ते आहेच. आता झोपूया आपण, पहाटे तुला लवकर उठायचंय." म्हटल्यावर ती आत कपडे बदलायला गेली. ती आत असताना त्याने फतेबीरला कॉल केला. त्यांचे संभाषण तिला तुटक ऐकू येत होते.
ती आवरून बाहेर आली तेव्हा आदित्य फोन बंद करत होता. "फते पहाटे पाचच्या आसपास इथे येईल. तो तुला शिमला एअरपोर्टला सोडेल आणि पुढच्या फ्लाईट्सचेही बुकिंग करून देईल."
"पण कसं काय? केवढी गर्दी आहे, सगळ्या फ्लाईट्स भरलेल्या असतील."
"डोन्ट वरी. तो ट्रॅव्हल एजन्सीवाला आहे, रिमेम्बर? काहीतरी जुगाड करून एक सीट मॅनेज करेल तो." त्याचा चेहरा गंभीर दिसत होता.
त्याला अजूनही तिला लवकरात लवकर उठून पाठवून द्यायचं होतं. तिला वाटत होतं की तिला जाणवलेल्या भावना त्यालाही जाणवत होत्या. नक्कीच जाणवलं असेल, कारण त्यांच्यामध्ये चमकून जाणारी वीज अख्या गावाचे दिवे पेटवू शकली असती. कदाचित यामुळेच तो तिच्याइतकाच अस्वस्थ आहे आणि म्हणून लवकर तिला इथून पाठवायच्या मागे असेल.
तो उशी आणि ब्लॅंकेट्स घेऊन आला. "तू खरंच इथे झोपणार आहेस? मला काही प्रॉब्लेम नाही, मी सोफ्यावर झोपू शकतो." तो काळजीने म्हणाला.
"नोप! बेट इज अ बेट. मी झोपेन इथेच." ती खोटं हसत म्हणाली.
"ओके, मी लाईट घालवतो" त्याचा आवाज तुटक झाला होता. फायरप्लेसमध्ये दोन लाकडं टाकून तो आत निघून गेला.
क्रमशः
सीडर आज आधीच सोफ्याखाली झोपून गेला होता. पळून पळून दमला असणार बिचारा. तिने सोफ्यावर ब्लॅंकेट अंथरून झोपायला तयार झाली पण तिला झोप अजिबात येत नव्हती. ती उशीला टेकून गुडघ्याना मिठी घालून बसली. एकदा बोलून झाल्यावर त्याने पुन्हा तिच्या लेखाचा विषय काढला नव्हता. तिला वाटले होते तो बराच वाद घालेल, त्याच्या खाजगी गोष्टी उघड न करण्यासाठी बजावेल. कदाचित भांडेलसुद्धा.
पण त्याने यातले काहीच केले नव्हते. लेखासाठी नाही तर स्वतःसाठी तिला त्याच्याविषयी अजून खूप जाणून घ्यायचे होते, खूप काही बोलायचे होते पण या क्षणी अजून काही बोलणे चुकीचे होते. तिच्या मनातून सध्या तरी त्या लेखाबद्दलचे विचार मागेच पडले होते.
शेवटी थकून ती आडवी झाली. तिच्या मनावर फक्त त्याच्या विचारांनी गारुड केले होते. तिला आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या पुरुषांपेक्षा हा वेगळाच होता ही गोष्ट तिला सगळ्यात जास्त भुरळ घालत होती. तिच्या आजूबाजूला वावरणारे सगळेजण अति चकाचक, गुळगुळीत, स्वतःच्यात जास्तच रमलेले, आपली परफेक्ट करिअर्स फ्लॉन्ट करणारे, माज दाखवणारे असे होते. याच्यातला साधा, सरळ, सच्चा आणि रफ अराउंड द एजेस माणूस तिला मनापासून आवडला होता. विचार करता करता तिला केव्हा झोप लागली कळलेच नाही.
मध्यरात्री तिला अचानक जाग आली तेव्हा तो तिला हलवून उठवत होता.
"सकाळ झाली?" तिने डोळे चोळत विचारले. अचानक तिला तिथून निघण्याची जाणीव होऊन तोंडाला कोरड पडली. तिला जायचं नव्हतं. इतक्या लवकर तर नाहीच.
त्याने नकारार्थी मान हलवली. "तू बेडवर झोप. मला झोप येत नाहीये." तो सीडरला न उठवण्याची काळजी घेत हळू आवाजात म्हणाला.
तिने वाद घालून काही उपयोग होणार नव्हता. ती ब्लॅंकेट बाजूला सारून उठायला लागली इतक्यात त्याने तिला सहज उचलले आणि आत घेऊन गेला.
तिला हलकेच बेडवर ठेऊन अंगावर ब्लॅंकेट पांघरले. काही वेळ तिच्याकडे बघत राहिल्यावर शेवटी तो वाकला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले. "स्लीप टाईट." तो हळूच म्हणाला. तो उठून वळणार तोच अर्धवट ऊठत तिने त्याच्या गालावर हात ठेवला आणि मऊ डोळ्यांनी त्याच्याकडे बघून जरासं हसली. त्याची खरखरीत दाढी तिच्या हाताला टोचत होती. तिच्या डोळ्यांमधली उत्कंठा, विलग झालेले ओलसर ओठ त्याला जे सांगत होते ते तो ऐकत होता. तिला काय हवे आहे तेही त्याला समजले होते. तरीही अनिच्छेनेच तो उभा राहिला आणि खोलीबाहेर निघून गेला.
तिने डोक्यावरून ब्लॅंकेट ओढून झोपायचा खूप प्रयत्न केला पण तीचे डोळे टक्क उघडे होते. झोप न यायला ब्लॅंकेटला येणारा त्याच्या लेमनी कलोनचा सुगंधही तेवढाच कारणीभूत होता. त्यालाही बहुतेक झोप लागत नसावी कारण बाहेर त्याच्या वावरण्याचे आवाज येत होते. तोही तिच्याइतकाच अस्वस्थ होता.
कुस अदलून बदलून, शेवटी सरळ पाठीवर आढ्याकडे बघत ती पडून राहिली. कितीतरी वेळाने ब्लॅंकेट बाजूला करून ती खाली उतरली. या खोलीला खिडकी होती. तिने अलगद खिडकीपाशी उभी राहून पडदा सरकवला. बाहेर अजूनही रात्रच होती. पण पुन्हा तेच चांदण्याची पखरण असलेले आभाळ तिच्या हृदयाचा ठाव घेत होते. आता पूर्ण चंद्र वर आल्यामुळे लांब लांबपर्यंत पसरलेला पांढराशुभ्र बर्फ त्याच्या उजेडात चमचमत होता. ह्या सगळ्या चमकत्या कॅनव्हासवर काळोखात देवदारांच्या जंगलाची काळी नागमोडी रेषा उठून दिसत होते.
त्याला हिमाचल आवडणं साहजिक आहे. इतकी जादुई, साधी, रफ आणि एकदम सुलझी हुई जागा आहे ही.. अगदी त्याच्यासारखीच! शहराच्या वेडेपणापासून अगदी दूर.
बराच वेळ तिथे थांबून मग ती बाहेर आली तेव्हा तो टेबलासमोर बसून लॅपटॉपवर भराभर काहीतरी टाईप करत होता. दारात तिचा आवाज आल्यावर त्याने लगेच खुर्ची गोल फिरवत तिच्याकडे वळून पाहिले. तिला जागी पाहून त्याला आश्चर्य वाटले.
"मलापण झोप नाही आली." तिने कबूली दिली.
तो काय लिहितोय ते लपवत असल्यासारखी त्याने चटकन वर्ड फाईल बंद केली.
"अजून एक पुस्तक?" तिने विचारले.
"माहीत नाही, बघूया."
"ऑन माय ओन'चा सिक्वल असेल तर फॅन लोक वेडे होतील. खरंच!" ती हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली.
"तासाभरात फते इथे पोचेल. तो घरून निघालाय." तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता भिंतीवरच्या घड्याळात बघून तो म्हणाला.
"निघाला पण?!" ती आश्चर्याने म्हणाली. हे खूप लवकर होतं, तिचा पाय तिथून निघत नव्हता. तरी तिने आत जाऊन ब्रश वगैरे करून, कावळ्याची आंघोळ करून तिचं विखुरलेलं थोडं सामान बॅगमध्ये भरलं. ब्लॅक जीन्सवर मरून फुल स्लिव्जचा टॉप घालून वर तिचा ग्रे हूडी अडकवला. केस एका क्लिपमधे कोंबले. चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि तिचा आवडता फ्रेंच व्हेनिला लिप बाम लावून ती तयार झाली. गळ्यापाशी न विसरता तिचे लाडके टॉमी गर्ल फवारले. फतेने दिलेली जाड बीनीसुद्धा आठवणीने डोक्यात घातली.
"कॉफी?" ती बाहेर आली तेव्हा तो टेबलावर दोन मग ठेऊन वाटच बघत होता. कॉफी पिताना दोघांची एकमेकांत मिसळलेली नजर हटत नव्हती. दोघांमध्ये एक अस्वस्थ शांतता पसरली होती. तो किचनमधून एक पिशवी घेऊन आला. "थोडी चॉकलेट्स आणि काही प्रोटीन बार्स आहेत. रस्त्यात उपयोगी पडतील आणि हे 'लुंग ता' तुला गुड लक म्हणून!" तीन छोट्याश्या काचेच्या बरण्या दाखवत तो म्हणाला.
"Wow, थँक यू सो मच! किती क्युट आहेत ह्या" म्हणत तिने बरण्या हातात घेऊन पाहिल्या. लुंग ता जॅम होते. ऍपल सिनेमन, पर्सिमॉन स्ट्रॉबेरी जिंजर आणि पीच एप्रिकॉट. तिने ते नेऊन बॅगेत ठेवेपर्यंत बाहेर फोनचा बीप बीप आवाज आला. "उर्वी, तो मॉनेस्टरीपर्यंत आलाय, दहा मिनिटात इथे येईल. आपण पुलाच्या पुढे जाऊन थांबू." तो मोठ्याने म्हणाला.
सीडर अजूनही झोपलेलाच होता. तिने निघता निघता त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते बाहेर पडले. बाहेर अजूनही अंधारच होता. तो घरातल्याच ग्रे स्वेटपॅन्ट आणि ऑलिव्ह ग्रीन हूडीवर बाहेर पडला होता. आज बॅग त्याने उचलल्यामुळे तिला नीट चालता येत होते. उदासवाण्या शांततेत पूल क्रॉस करून रस्त्याकडेच्या कठड्याला टेकून ते थांबले. दोघेही शक्य तितकी एकमेकांची नजर टाळत होते. तिचा घसा दाटून आला होता. पण तिला रडायचं नव्हतं, इतका वेडेपणा बघून हसेलच तो. त्याला नक्कीच आपण इथून लवकरात लवकर जावं असं वाटत असताना आपण उगाच इतकं इमोशनल नको व्हायला. तिने उगीचच केसांतून हात फिरवला.
तेवढ्यात लांबून फतेची जिप्सी येताना दिसली. "हॅलो बॉस!" गाडी थांबवून खिडकीतून निम्मा बाहेर येत हात दाखवून तो ओरडला. आदित्य पुढे होऊन त्याच्या डोक्यात टपली मारून काहीतरी म्हणाला. फते हसत तिच्याकडे बघून हात हलवत गाडी सरळ पुढे घेऊन गेला.
तिने आदित्यकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"ह्या नॅरो रोडवर जिप्सी वळवता येत नाही. तो पुढे चिटकूलपर्यंत जाऊन वळून येईल."
"ओह अच्छा.." ती त्याला डोळ्यात जमणारे पाणी न दाखवायचा प्रयत्न करत कशीबशी हसली. त्याच्याशी निरोपाचे काय बोलावे तिला सुचत नव्हते.
"आदित्य, थॅंक यू फॉर एव्हरीथींग!" जे तोंडात आलं ते तिने बोलून टाकलं.
त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्याइतके गडद इंटेन्स डोळे तिने आधी कधीच पाहिले नव्हते. तिने त्याच्या नजरेला नजर भिडवली. तिला न बोलता तिला वाटणाऱ्या फीलिंग्ज त्याच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. गेल्या दोन दिवसात तिला मिळालेला आनंद, ती त्याच्यामुळे किती प्रभावित झाली होती हे सगळं आणि बरंच काही त्याला सांगायचं राहून गेलं होतं. तिला अजून वेळ हवा होता.
तिच्याकडे बघताबघता खांद्यावरची त्याची पकड घट्ट झाली. त्याने असहायपणे एक खोल श्वास घेतला आणि तिला जवळ ओढले. पटकन तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत धरत आवेगाने त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याची गरजही तिच्याइतकीच स्ट्रॉंग होती तर. तिच्या डोक्यातली बीनी घसरून खाली पडली आणि तिने पापण्या घट्ट मिटून घेतल्या.
एक क्षण ती एवढी आश्चर्यचकित झाली की तिच्या पायातली सगळी शक्ती निघून गेली. तिला अगदी हेच हवं होतं आणि हेच घडावं असं वाटत होतं. हा किस अगदी तसाच होता जशी तिने कल्पना केली होती. किंवा त्याहून जरा जास्तच एक्सायटिंग! तो त्याच्या कॉफीसारखाच होता, बिटर-स्वीट आणि स्ट्रॉंग! तो थांबल्यावर तिचे डोके गुलाबी धुक्यातून जरा बाहेर आले. तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या डोळ्यात बघत पुन्हा त्याला किस केलं. त्याच्याकडून मिळालेलं सगळं तिला परत करायचं होतं. तिचा फ्रेंच व्हेनिला कधीच नाहीसा झाला होता!
बऱ्याच वेळाने त्याने चेहरा बाजूला केला पण तिला अगदी जवळ घट्ट मिठीत पकडून ठेवलं. बर्फावरून त्याने जवळजवळ तिला उचललंच होतं. "गुडबाय आदित्य." लांबून जिप्सीचा आवाज ऐकू आल्यावर ती त्याच्या कानात म्हणाली.
"गुडबाय!" तो तिच्या कानामागे केसांमध्ये तोंड लपवून तिचा सुगंध मनात साठवून ठेवत म्हणाला.
जिप्सी येऊन थांबल्यावर तो मागे तिची बॅग ठेवायला गेला. बीनी उचलून ती त्याच्याशेजारी जाऊन थांबली. त्याने बॅग ठेवल्यावर ती वळू लागताच त्याने हात धरून तिला मागे ओढले.
"उर्वी?" तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला.
"हुं?" तिचं हृदय आता जोरजोरात धडधडत होतं. तो इथेच अजून थांबायला सांगतोय का? आता इतक्या उशिरा फतेसमोर कसं काय थांबणार? किती एम्बरासिंग आहे हे. त्याला नक्कीच माझ्यासारखंच वाटतंय. तिच्या मनात एकदम शेकडो विचार आले.
तिला जवळ घेत त्याने पुन्हा एकदा पटकन किस केले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला "ते आर्टिकल लिहू नको."
क्रमशः
म्हटल्याप्रमाणे फतेबीरने काहीतरी जुगाड करून तिला सीट्स बुक करून दिल्या. पण दिल्लीहून connecting फ्लाईट उशिरा असल्यामुळे खूप वेळ गेलाच. रिकाम्या वेळाचा काही उपयोग करण्याऐवजी गर्दीमुळे तिला काही सुचत नव्हतं. रात्री अकरा वाजता ती घरी पोहोचली तेव्हा अचानक शांत, निवांत वातावरणातून एकदम दिवसभर एअरपोर्टवर आणि विमानात बर्फात सुट्ट्या घालवून येणाऱ्या गर्दीची कलकल ऐकून तिचं डोकं उठलं होतं.
घरात शिरताच बॅगा हॉलमध्ये तशाच टाकून ती फ्रेश झाली आणि तिचा जुनाट, भोकं पडलेला, वापरून मऊशार झालेला लॉंग टीशर्ट घालून रोजच्या पातळ दुलईत घुसली. तरीही डोक्यात ठणठणगोपाळ सुरूच होता म्हणून उठून एक कॉम्बिफ्लाम घेऊन ती मेल्यासारखी झोपली.
आठ वाजता डोळ्यावर उन्हाची तिरीप आली तेव्हा ती जागी झाली. जाग येताच तिला समोर कॉफीचा मग ठेऊन बसलेला आदित्य आठवला. 'हम्म.. उर्वी मॅडम! उठा नाहीतर डिमेलो तुम्हाला जगातून उठवेल' म्हणत घाईघाईने ब्रश करून तिने किचनमध्ये चहाचे आधण ठेवले. चहा पितापिता ती आदित्यचा विचार करत होती.
इतक्या सगळ्या गप्पा मारून शेवटी त्याने लेख लिहायला परवानगी का दिली नसेल? माझ्या करियरसाठी हा लेख किती महत्वाचा आहे हे त्याला माहिती आहे. लोकांना तो लेख किती आतुरतेने वाचायचा आहे तेही माहिती आहे. ठीक आहे, त्याला त्याची प्रायव्हसी जपायची आहे. त्याला लेख छापणे आवडणार नाही म्हणून तर तो पत्रकारांना इतके लांब ठेवतो आहे. त्याच्या ईच्छेकडे दुर्लक्ष करून लेख छापणे खरंच वर्थ आहे का हा तिच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. तो लेख छापू नको म्हणाला म्हणून आपल्याला खडूस, स्वार्थी वाटतोय पण त्याचं खाजगी आयुष्य त्याच्या परवानगीशिवाय जगासमोर आणणारी ती कोण आहे? ती तर दुप्पट स्वार्थी ठरेल.
खूप विचारांती शेवटी ती तिच्या निर्णयावर आली. त्याची परवानगी नसताना फक्त तिच्या फायद्यासाठी लेख छापणे हा स्वार्थीपणा ती करू शकत नाही. ती तो रफ ड्राफ्ट कधीच फेअर करणार नाही. त्यांच्यामध्ये काहीही घडलं किंवा नाही घडलं तरीही तिने तो लेख लिहिणं बरोबर नाही. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीने फक्त स्वतःचा फायदा बघितला, आता तीही त्याच्याबरोबर असे वागू शकत नाही. त्याला जर जगात विश्वास आणि प्रेम अजूनही शिल्लक आहे हे त्याला जाणवून द्यायचे असेल तर ते काम तीच करू शकेल. कोणी ना कोणी पत्रकार त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याला जगासमोर आणेल. नक्कीच! पण तो पत्रकार तिला व्हायचं नाही.
भराभर सगळं उरकून ती ऑफिसला पोचली. तिच्या डेस्कवर दोन मिनिटंही झाली झाली नसतील तोच अना "हेलो डार्लिंग" म्हणत ओरडत आलीच. "तो अब बोलो! मुझे पूरी रिपोर्ट चाहीये" अना तिच्या डेस्कवर पीसीशेजारी बसत म्हणाली.
"कौनसी रिपोर्ट?" उर्वी त्या गावचीच नाही असे दाखवत म्हणाली.
"तुमने उसे ढुंड तो लिया ना?" चष्मा केसांवर चढवत अना म्हणाली.
"आदित्य संत! इट वॉज अ बॅड आयडिया यार.. मुझे डिरेक्टली नही जाना चाहीये था." ती वाक्य गुंडाळत म्हणाली.
"हाँ, लेकीन वो मिला या नही?" माहिती काढणं कुणी अनाकडून शिकावं.
"अगर मिला होता तो मै तुम्हे ऐसे मूह लटकाए नही दिखती!" तिचं खरंच तोंड पडलेलं होतं पण त्याची कारणं वेगळी होती. एक तर अपूरी झोप आणि दुसरं आदित्य संत. ती खरंच त्याला प्रचंड मिस करत होती. तिला सारखे त्यांचे शेवटचे क्षण आठवत होते. ती त्याला तिच्या मनातल्या किती किती गोष्टी सांगू शकली असती पण तिच्या डोक्याने तेव्हा काम करणेच बंद केले होते. नुसते एक जेनेरिक थॅंक्यू आणि गुडबाय! कसलं ले..म होतं ते. तिला सीडरलाही नीट भेटता आले नव्हते.
तिला आठवलं, इव्हन फतेलासुद्धा त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता होती. त्यानेही अनासारखेच प्रश्न विचारून रस्ताभर तिला भंडावून सोडले होते.
"लगता है तुम दोनोंकी अच्छी बन रही थी. मिस्टर खडूसने तुम्हारा बॅग उठाया! बाय गॉड ये तो कमाल ही हो गया." फते इम्प्रेस होऊन म्हणाला होता.
"शुरुआत से ऐसा नही था" ती थोडीशी हसली.
"हा हा वो त्तो पता ही है, लेकीन मुझे लगता है, आखीरतक तुमने उसे जीत ही लिया." तो मोठ्याने हसत म्हणाला.
"सच में?" तिचा प्रश्न निम्मा स्वतःलाच होता.
"मुझे लगा था की तुम्हे पुरा चान्स है!" अना हातवारे करत तिला वर्तमानात घेऊन आली. "तुम तो उसकी मम्मीसे भी मिली थी." सोमवार तसेही ब्लू असतात, आजचा डार्क ब्लू होता. उर्वीच्या मनातून आदित्यचा विचार हटत नव्हता. कुणी एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध असतील तर ते उर्वी आणि आदित्य होते पण तरीही ते चुंबकासारखे एकमेकांकडे खेचले जात होते. तिच्याइतकीच त्यालाही ती आठवत असेल का? तिच्या मनाला प्रश्न पडला होता.
"हम्म उसकी माँ से उसका कोई कॉन्टॅक्ट नही है. उन्होने सिर्फ शिमला के एक ट्रॅव्हल एजंटका पता बताया जो मुझे लेके जा सकता था. मै वहां पहूंची लेकीन उसने मना कर दिया." ती म्हणाली.
"तुम्हारे लिए बुरा लग रहा है यार.." अना उदास होत तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाली. "लेकीन वहां दुसरे किसीं को तो पता होगा? उनको कुछ ब्राईब दे देती" अनाची उत्सुकता आता संपत नव्हती.
उर्वीला तिला जास्त कळू द्यायचं नव्हतं पण सांगितल्याशिवाय राहवत पण नव्हतं. "अना तुम्हे कुछ काम नही है क्या?" तिला अजून व्हेग उत्तरे देणे कठीण झाल्यामुळे उर्वी म्हणाली.
"हां, लेकीन तुम ऊस ट्रॅव्हल एजंटको ले जाने के लिए पटा सकती थी, वापस क्यू आ गयी?"
"अना, मै अभीअभी आयी हूँ और मेरा बहुत काम पेंडिंग पडा है."
"ओके, ओके. ज्यादा उदास मत हो.. तुम कही कुछ छुपा तो नही रही ना?"
"उदास नही हूँ. कुछ छुपा नही रही हूँ. मैने पूरी कोशीश की लेकीन उसके आगे कुछ नही कर सकती. "
तिच्या खांद्यावर थोपटून अना तिच्या क्यूबिकलमध्ये निघून गेली.
हुश्श, पहिली टेस्ट तरी क्लीअर झाली. तिचा ताण आता बराच हलका झाला आणि ती खुर्चीत मागे रेलून बसली. आता तिला फक्त सोसायटी पेजवर फोकस करून राहिलेली कामे संपवायची होती. इतक्या कष्टाने जुळवून आणलेला लेख न छापणे तिच्या जीवावर आले होते पण ती ठरवल्याप्रमाणे वागणार होती. काही करून ती त्याला फसवणार नव्हती.
तिची अक्खी सकाळ तीन दिवसांच्या साचलेल्या इमेल्सना उत्तरे देण्यात गेली. एका जुन्या, प्रसिद्ध अभिनेत्रीची अर्धवट राहिलेली मुलाखत लिहून पूर्ण केली. गडबडीत दुपारचे जेवण ती विसरूनच गेली. शेवटी चार वाजता घाईघाईने तिने डेस्कवरच एक पनीर रोल खाल्ला. संतूने पेपर कपमधून आणून ठेवलेली मशीनची बेचव कॉफी तिने उचलली इतक्यात तिचा फोन खणखणला. एका हातात कॉफी धरून तिने रिसीव्हर कानाला लावला.
"येस? उर्वी काळे." ती फॉर्मल आवाजात म्हणाली.
"हाय!" कुठेतरी खोल गुहेत घुमल्यासारखा आवाज आला.
ती खुर्चीतून पडायचीच बाकी होती. "तू इथे का कॉल करतोयस?" ती पॅनिक होत क्यूबिकलच्या कोपऱ्यात घुसून अत्यंत हळू आवाजात बोलली.
"तू नीट पोहोचलीस ना चेक करत होतो."
"हो व्यवस्थित पोचले. ऑफिसच्या फोनवर कॉल करू नको, हे खूप डेंजरस आहे." ती माऊथपीस ओंजळीत धरून कुजबुजली.
"तुला मी फोन करायला हवाय का?"
"हो, हो, हो!" तिला आनंद लपवता येत नव्हता. त्याच्या नुसत्या आवाजानेच हाय एसीमध्येसुद्धा तिला उबदार वाटू लागले होते.
"मग तुझा सेल नंबर दे."
तिने भराभर नंबर सांगून त्याला रिपीट करायला लावला. "तू सॅट फोनवर आहेस का?" तिने श्वासावर जरा नियंत्रण मिळवत विचारले.
"हो"
"पण तू तर म्हणाला होतास तो महाग आहे म्हणून."
"खूपच!"
तिच्या चेहऱ्यावर एक मोठ्ठं हसू पसरलं आणि तिने खुशीत पापण्या मिटल्या. "याचा अर्थ तू मला मिस करतोयस?"
"कदाचित. करत असलो तर तुला बरं वाटेल का?"
"खूपच!"
तो गालातल्या गालात हसला. "रात्री कॉल करू?"
"हो!" ती हो म्हणण्याच्या ऑटो मोडवर होती. मग अचानक तिला रात्रीची पार्टी आठवली. "अरर नाही, मला रात्री एका मूव्ही प्रीमियरला जायचं आहे."
"विल देअर बी मेनी मेन अराऊंड?"
"बरेच!"
"हम्म" त्याने जोरात श्वास सोडल्याचा आवाज आला.
"आर यू जेलस?"
"शुड आय बी?"
ती हसली. "डिपेंडस्.. तू जर क्लीन शेव्हड, गुळगुळीत, ब्लॅक सूटवर बो टाय घातलेल्या आणि त्यांच्या फ्लॅशी कारचे इंजिन कुठे आहे हेही माहीत नसलेल्या माणसांना घाबरत असशील तर.. यू शुड बी!"
"म्हणजे मी सेफ आहे!"
"मी असंच म्हणेन."
"तू घरी किती वाजता असशील?"
"सांगता येत नाही, ह्या पार्ट्या खूप उशिरापर्यंत चालतात. तरी साडेअकरा बारापर्यंत घरी जाईन."
तिला अचानक त्याच्या कॉल करण्यामागचा उद्देश जाणवला. तिचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला रहावत नाहीये ह्या कारणाने ती खुश झाली असती पण खरं कारण वेगळंच असावं.
"मी आर्टिकलबद्दल काय ठरवलं हे विचारायचं आहे ना तुला?"
पलीकडे शांतता पसरली. "फक्त तेवढंच नाही, मी.."
"मी काय करायचं ते ठरवलंय."
काही क्षणांच्या शांततेनंतर त्याचा आवाज आला. "काय?"
"टेक इट इझी डॉन! तुझी सिक्रेट्स माझ्याकडे सुरक्षित आहेत."
"डॉन?"
"ग्यारह मुल्कोके रिपोर्टर्स तुम्हे ढूंढ रहे है!"
पलीकडून रिलॅक्स होत हसण्याचा आवाज आला.
"तू मला इमेल करू शकतोस" तिने त्याला पर्सनल इमेल ऍड्रेस दिला, ऑफिस इमेल वापरणे धोक्याचे होते.
"मला जायला हवं" तो म्हणाला.
तिला खूप बोलावेसे वाटले तरी इथे कोणी ऐकून सगळे डॉट्स कनेक्ट करू शकेल. "रात्री नक्की फोन कर" ती बारीक आवाजात म्हणाली."
"ओके. बारा वाजता?"
"परफेक्ट!"
युहूं! रिसिव्हर ठेऊन तिने खुर्ची गोल फिरवली.
क्रमशः
प्रीमियरचा अक्खा इव्हेंट ती ऑटो पायलटवर असल्यासारखी वागत होती. इकडेतिकडे खोटं खोटं हसणं, लोकांची नावं लिहून घेणं, चार दोन प्रश्न आणि फोटो झाल्यावर तिला त्यात इंटरेस्ट उरला नव्हता. काही सेलिब्रिटींची परवानगी घेऊन फोटो आणि सेल्फी तिने तिथेच बसल्या बसल्या सिटी बझच्या इंस्टा पेजवर पोस्ट केले. पटापट नोटपॅड ऍपवर तिच्या लेखासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लिहिले. प्रीमियरनंतरच्या पार्टीतही काही खावंसं वाटत नव्हतं म्हणून तिने फक्त एक मोहितोचा ग्लास उचलला. तिचे लक्ष सारखे हातातल्या घड्याळाकडे होते. रवी फोटो काढता काढता मध्येच तिच्याकडे संशयाने बघत होता.
इव्हेंट संपल्यावर घाईत पार्किंगकडे जाताना त्याने तिला थांबवलेच. "ओ सिंड्रेला! अशी का पळते आहेस?"
"कुठे काय?" ती भोळेपणाचा आव आणत म्हणाली. खरं तर तिला तिथून लवकरात लवकर कटायचं होतं.
"तू काही खाल्लं पण नाहीस, सारखं घड्याळ बघतेस आणि आता पळून जातेस." रवीला टाळणे कठीण होते. "नेहमीसारखी एन्जॉय नाही करत तू, काही प्रॉब्लेम आहे का?"
"छे छे प्रॉब्लेम वगैरे काही नाही. तुला उगीच असं वाटतंय. मी निघतेच आहे. बाय!"
"ठीक आहे. टेक केअर, बाय!" म्हणत त्याने खांदे उडवले आणि हेल्मेट घालून बाईक काढली. तिने पुढे होत टॅक्सीला हात केला.
ती साडेअकरालाच घरी पोहोचली. हील्स काढून फेकत तिने पटकन ड्रेस काढून नेहमीचा मऊ पजामा चढवला. मोकळ्या केसांची जुडी करून बो मध्ये गुंडाळली. मेकअप पुसला. एवढं सगळं करूनही दहा मिनिटे शिल्लक होती. ती बेडवर मांडी घालून हातात मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत बसली. दमल्यामुळे मध्येच तिचे डोळे मिटत होते. अचानक फोनवर River flows in you च्या पियानो नोट्स वाजल्या तेव्हा ती खाडकन जागी झाली, हातातून फोन तर उडून खालीच पडणार होता.
"हाय!" ती भराभर श्वास घेत म्हणाली. "शार्प बाराला हां?"
"हाय!" यावेळी त्याचा आवाज वेगळा वाटला.
"कुठे आहेस तू?"
"मी केबिनमध्ये नाहीये, सांगलाला घरी आलोय. इथून मोबाईलवर बोलणं सोयीचं पडेल म्हणून."
"ओह, तरीच तुझा आवाज समोर बोलल्यासारखा येतोय, आऊटर स्पेसमधून नाही."
"पहिला कॉल आऊटर स्पेसमधूनच होता!" तो हसला.
"तेच!" तीही हसली.
"कसा झाला प्रीमियर?"
"ठिकठाक. मुव्ही खूपच क्लीशेड आहे. मी जाम कंटाळले होते. रवीला पण माझा संशय आला होता."
"रवी कोण?" त्याच्या आवाजात काळजी होती. त्यामुळे ती खुश झाली.
"तो माझ्या टीममधला फोटोग्राफर आहे. आम्ही इव्हेंट्स एकत्र कव्हर करतो. पंचेचाळिशीचा बाल बच्चेवाला माणूस आहे तो. अरे हो, नुसते बच्चेच! बाल कधीच उडालेत त्याचे."
"हम्म त्याला कसला संशय आला?"
"म्हणजे मी नेहमीसारखी वागत नाहीये, तिथे लोकांच्यात जास्त न मिसळता पळायला बघतेय असं."
"प्रत्येक कॉलला एवढा त्रास करून घेण्यापेक्षा मला वाटतं आपण इमेलच करूया. तेच सोयीचं आहे." तो म्हणाला.
ती विचारात पडली. "हम्म बरोबर आहे."
"तू नाखूष का बरं वाटते आहेस?" तिचा बारीक झालेला आवाज ऐकून तो म्हणाला.
आतापर्यंत त्याच्याबद्दलच्या तिच्या कुठल्याच भावना लपवायला तिला जमले नव्हते. मग आता कशाला म्हणून शेवटी ती बोललीच, " मला तुझा आवाज ऐकायला आवडतो."
तो आधी गप्प राहिला "मलापण तुझा आवाज ऐकत रहायचा आहे. अम्म्म माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे."
"काय?" तिने उत्सुकतेने विचारले.
"सरप्राईज"
"काही गिफ्ट आहे का?"
"गिफ्ट नाही म्हणता येणार, असं काहीतरी आहे जे तुझ्याकडे असावं असं मला वाटतं. मी ते ऑलरेडी कुरियर केलं आहे. तुला वीकएंडपर्यंत मिळेल."
"Wow आदित्य मला कल्पनाही नाही करता येत काय असेल ते." नक्की काहीतरी हँडीक्राफ्ट किंवा त्याने कोरलेली एखादी लाकडी वस्तू असणार. त्याने बोलता बोलता तो कंटाळा आल्यावर बनवत असलेल्या छोट्या छोट्या लाकडी वस्तू तिला दाखवल्या होत्या.
एक्साइट होऊन जवळजवळ एक तास ते बोलत राहिले. शेवटी तिला जांभया थोपवणे कठीण झाले होते.
"तू खूप दमली आहेस. झोप आता, मी त्रास नाही देत." तो कुजबुजला.
"नको ना, प्लीज अजून थोडा वेळ.." तिने पुन्हा जांभई देत विनवले.
"उर्वी! तू प्रॅक्टिकली झोपते आहेस फोनवर. मी तुला इमेल करतो म्हणजे तू उठशील तेव्हा माझा मेसेज तुझी वाट बघत असेल."
"नक्की?"
"नक्की."
तिच्या चेहऱ्यावर एक झोपाळू हसू पसरले. "खरं सांगायचं तर गेल्या काही रात्री मला झोप लागत नव्हती."
"मी पण जागाच होतो."
"आज मी शांत झोपेन."
"मीही! स्वीट ड्रीम्स.."
आज तिची ड्रीम्स स्वीटच असणार होती कारण त्यात तो असणार होता.
परत परत स्नूझ केलेला अलार्म शेवटी सात वाजता खणखणून तिला जाग आली. हात ताणून आळस देत ती डोळे मिटून हसली. चहा ठेवल्यावर आदित्यचे प्रॉमिस आठवून तिने इमेल उघडली. त्याने म्हटल्याप्रमाणे एका मेलमध्ये कुरियरचा ट्रॅकिंग नंबर पाठवला होता आणि त्यांनतर एक वेगळी इमेल पण होती. तिने मेल उघडताच त्यात फक्त कवितेचा काही भाग होता.
एक जल में,
एक थल में,
एक नीलाकाश में ।
एक आँखों में तुम्हारे झिलमिलाती,
एक मेरे बन रहे विश्वास में ।
क्या कहूँ , कैसे कहूँ.....
कितनी जरा सी बात है ।
चाँदनी की पाँच परतें,
हर परत अज्ञात है ।
ती पुन्हा पुन्हा ती वाक्ये वाचत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते आणि ती त्याच्या अजूनच खोलवर प्रेमात पडली होती.
पुढचे दोन दिवस त्याच्या कुरियरची वाट बघत तिने कसेबसे निभावून नेले. रोज कॉल तर शक्य नव्हताच. तिसऱ्या दिवशी दुपारी टपरीवरचा चहा पिऊन आत आली तेव्हा एक बॉक्स तिच्या डेस्कवर ठेवलेला होता. तिला लगेच कळले हा नक्कीच आदित्यकडून असणार.
"क्या है ये?" अनाने क्यूबिकलच्या पार्टीशनवरून वाकून बघत विचारले.
"पता नही.." तिने बॉक्स उचलून जरासा हलवून बघितला, काही समजत नव्हतं.
"किसने भेजा है?" अनाची उत्सुकता आता शिगेला पोचली होती.
तिने रिटर्न ऍड्रेस वाचायचे नाटक केले. "एक फ्रेंड ने."
"मेल या फीमेल?" अनाने जीभ दाखवत विचारले.
"मेल. बट ओन्ली फ्रेंड!" ती अनाकडे मोठे डोळे करून म्हणाली.
"अर्रे इतना सस्पेन्स मत क्रिएट करो. खोलो अब उसे!" अना ओरडलीच.
उर्वी काही कमी उत्सुक नव्हती. तिने कात्रीने पॅकिंग व्यवस्थित कापले. आत बऱ्याच हवेच्या पिशव्या बाजूला केल्यावर तिला तिचं गिफ्ट दिसलं. तिने ते काळजीपूर्वक बाहेर काढताच अना हसायला लागली. "इज धिस अ जोक?"
उर्वीकडे उत्तर नव्हतं. ही गोष्ट तो तिला पाठवेल अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
तिच्या डेस्कवर एक अँटिक, लाकडी मूठ असणारी तांब्याची चहाची लहानशी केटल विराजमान झाली होती.
अना परत तिच्या क्यूबिकलमध्ये खाली बसली. ती गेलेली बघून उर्वीने प्रेमाने ती केटल हातात घेऊन पाहिली. झाकण उघडून तिने आता पाहिले तर त्यात एक पोस्ट इट चिकटवली होती.
"To my Tea lover girl, तुला थंडी वाजू नये म्हणून."
उफ यार, काय माणूस आहे हा! ती हसत हसत म्हणाली.
क्रमशः
From: urvee.k@gmail.com
Sent: November 10, 2019
To: staaditya@gmail.com
Subject: A Kettle?आदित्य,
एवढे कष्ट घेऊन तू मला एक केटल पाठवलीस? माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला हा prank वाटतोय. मला माहितीये तू काहीतरी वेगळा विचार करून ती पाठवली असणार. किटलीमागची गोष्ट काय आहे?
उर्वी.
From: staaditya@gmail.com
Sent: November 10, 2019
To: urvee.k@gmail.com
Subject: Yes, a kettle.उर्वी,
Yes, a kettle. हा prank नाही. मला तू ती वापरायला हवी आहे. किटलीमागे गोष्ट आहे पण ती नंतर आरामात सांगेन. मी रात्री उशीरा कॉल करेन. १० वाजता?
आदित्य.
From: urvee.k@gmail.com
Sent: November 10, 2019
To: staaditya@gmail.com
Subject: Waiting...आदित्य,
हो, मी रात्री घरीच आहे. कधीही कॉल कर. रात्री फक्त गाणी ऐकत हॉट चॉकलेट प्यायचा प्लॅन आहे आणि हो, आज मी pb जॅम मफिन्स बनवलेत लुंग ता पर्सिमॉन वापरून. Yumm! काश तुम यहां होते! (कपाळावर पालथा हात टेकून आकाशात बघणारी स्मायली)
उर्वी.
लॅपटॉप बंद करून आदित्य सोफ्यावर टेकून बसला. सीडर येऊन त्याच्या मांडीवर डोके ठेऊन पडून राहिला. नकळत त्याची मान खाजवत आदित्य विचार करत होता. गाणी ऐकत सोफ्याला टेकून हॉट चॉकलेट पिणाऱ्या उर्वीचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर आले. त्यात नवीन काहीच नव्हतं. ती केबिनमधून निघून गेल्यापासून तिने त्याच्या विचारांवर कब्जा केला होता आणि खरं सांगायचं तर जायच्या आधीपासूनच.
हे असं होणं त्याला अपेक्षित नव्हतं. एकदा का ती निघून गेली की आपण तिला विसरून जाऊ असे त्याला वाटले होते. पण तसे काही घडत नव्हते. तिचा स्मार्टनेस, फटकळपणा, बेधडक संकटांना भिडायची वृत्ती, obv ती दिसायला बॉम्ब होतीच पण तो बोनस होता आणि तरीही तिने कितीही बेफिकिरपणाचा आव आणला तरी अजाणता क्वचित समोर येणारा तिचा निरागस गोड स्वभाव या सगळ्याच्याच तो प्रेमात पडला होता पण अजूनही त्याचे मन हे मान्य करत नव्हते.
इव्हन सीडरसुद्धा ती गेल्यापासून उदास झाला होता. सगळ्यात आधी तिने त्यालाच तर जिंकून घेतले होते. सीडर नुसता तोंड लटकवून, शेपूट पायात घालून घरभर फिरत होता. त्या भल्या मोठ्या कुत्र्याची भिगी बिल्ली झाली होती. अर्थात त्याच्या मालकाची काही वेगळी हालत नव्हती. त्याला समजत होतं की ही डेड एन्ड रिलेशनशिप आहे. ह्या नात्याला फार काही भविष्य नाही हे तो जितक्या लवकर मान्य करेल ते दोघांच्याही दृष्टीने चांगले होते. पण तरीही तो तिला विसरू शकत नव्हता.
त्या एका किसमुळे हे सगळे सुरू झाले होते. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत त्याचा स्वत:वर ताबा होता. त्याने स्वतःला हेही समजावून पाहिले की हे सगळं फक्त ते इतक्या जवळ कोंडून राहिल्यामुळे होत होते. दोघेही तरुण होते, एकटे होते आणि दोन दिवस एका केबिनमध्ये बंद होते. ती एकदा का तिथून गेली, ही जवळीक संपली की सगळं पूर्वपदावर येईल. पण आता तिला जाऊन आठवडा होत आला तरी काहीच पूर्ववत नव्हते.
उलट त्याने ती पोचली का चेक करायला फतेकडून तिच्या ऑफिसचा नंबर मिळवला आणि तिथून घसरण सुरू झाली. व्यसन लागल्यासारखे दिवसरात्र त्यांचे कॉल्स, टेक्स्ट आणि इमेल्स सुरू होत्या. त्यातच त्याने तिला ते गिफ्ट पाठवले.
त्याला सगळ्यात मोठी भीती होती ती त्याच्या वडिलांसारखीच चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडण्याची. त्यांचं अक्ख आयुष्य त्यांनी एकाच मुलीवर प्रेम केलं आणि तीच त्यांना सोडून गेली. त्याची आई निघून गेल्यावर वडील कधीच पूर्वीसारखे राहिले नव्हते. अचानक त्यांच्यातलं सगळं प्रेम, सगळा ओलावा आटून गेला होता. आता अगदी त्यांच्यासारखाच तो त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. म्हणूनच त्याच्या डोक्यात सारखी धोक्याची घंटा वाजत होती.
त्याने घड्याळात पाहिले. सात वाजले होते. एव्हाना उर्वी घरी पोचली असेल. अर्थात ती डिनरसाठी मित्राला भेटली नसेल तर. तिने मागे एका मित्राचा आणि कॅज्युअल डेटिंगचा उल्लेख केला होता. नुसत्या विचारानेच त्याचे रक्त उकळू लागले. ती दुसऱ्या कुठल्या माणसाबरोबर असण्याचा विचारही त्याला सहन होत नव्हता. इतकी तीव्र जेलसी त्याला कधीच वाटली नव्हती, नताशाबरोबर असतानाही नाही. त्याला इतकी जेलसी वाटू शकते हे जाणवूनच त्याला काळजी वाटत होती.
बास! त्याने त्याच क्षणी निर्णय घेतला. तिच्याशी सगळे कॉन्टॅक्टस बंद करायचे. तेच दोघांसाठी चांगले असेल. पण पुढचा विचार करताना लगेचच त्याला एकटेपण आणि रिकामपण खाऊ लागले. तिच्याशी जवळपास रोज बोलून आणि इमेल पाठवून दोघांनाही एकमेकांची इतकी सवय लागली होती की हे असं पटकन तोडता येणार नाही. हळूहळू यातून बाहेर पडू. हे एकदा ठरल्यावर त्याने पहिली स्टेप ठरवली, आज दिवसभर तिला कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा नाही.
त्याने थोडा वेळ घर आवरून काढला, नंतर फते आणि इतर एकदोन मित्रांबरोबर थोडा वेळ डिनर साठी बाहेर जाऊन आला. पण जास्त वेळ न घालवता तो बरोबर नऊ वाजता घरी पोहोचला. दार उघडून आत येताच त्याचे लक्ष फोनकडे गेले. दोन मिनिटे तो तसाच दाढीवरून हात फिरवत उभा राहिला. शेवटी न राहवून त्याने खिशातून सेलफोन काढलाच. तिला उद्या कॉन्टॅक्ट नको करायला. आज शेवटचा एक कॉल करायला हरकत नाही. म्हणून त्याने कॉल केलाच. भुकेल्या माणसाला समोर ताटभर जिलबी दिसावी तशी त्याची अवस्था फक्त तिचा आवाज ऐकून होत होती. राईट! हे त्याच्यासाठी अत्यंत वाईट होतं.
टेबलवर ठेवलेला फोन वाजला आणि उर्वी बाथरूमच्या दारातून धडपडत तो घ्यायला धावली.
"हॅलो!" पुढे आदित्य म्हणता म्हणता ती थांबली. कोणाचा कॉल ते तिने पाहिले नव्हते.
"उर्वी, मी बोलतेय. काय झालं बाळा? तू परत आल्यापासून आपलं नीट बोलणंच नाही झालं. फक्त दोनदा कॉल केलास तू." पलीकडून आई तिला काळजीने विचारत होती.
"आई मी आज करणारच होते फोन. गडबडीत राहून गेला." ती म्हणाली.
"तुला खरंच दिवाळीला सुट्टी नाही मिळणार का? आम्हाला तुझ्याशिवाय दिवाळी सुनी सुनी वाटेल. तुला आवडतात म्हणून मी आतापासूनच चकल्या करून ठेवल्यात. मस्त कुरकुरीत झाल्यात पण बाबा ज्या स्पीडने त्या खात आहेत ते बघता दिवाळीत मला पुन्हा घाट घालावा लागणार असं दिसतंय. "
"हो ना, मलापण यायचं होतं. पण मी त्या बदल्यात आधी सुट्टी घेतली ना, आता नाही मिळणार दिवाळीला." तिला स्वतःला हे विचित्र वाटत होतं. आतापर्यंत ती कधीही दिवाळीला एकटी नव्हती. दरवर्षी घरी त्यांचे बहुतेकसे नातेवाईक एकत्र जमून दिवाळी साजरी होत असे.
"तू कधी कॉल केला नाही असं होतं नाही.."
"आई, अग जितके दिवस मी सुट्टी घेतली ती सगळी साठलेली कामं मला आत्ता करावी लागतायत. त्यामुळे राहून गेलं. आय एम सॉssरी" ती मुद्दाम लाडात येत म्हणाली.
"अग मुली, इथे मी आणि तुझे बाबा तुझ्या ट्रिपचा वृत्तांत ऐकायला अधीर झालोय. तू थोडंसंच सांगितलंस. आता आदित्य संतबद्दल नीट सांग. इथे सगळ्यांना उत्सुकता आहे तो कसा आहे आणि त्याने लिहिलेल्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत का याची." आई खूपच उत्सुकतेने म्हणाली.
तिच्या पोटात मोठा गोळा आला.
"आई? मी आदित्य संतला भेटले हे तू नक्की कुणाकुणाला सांगितलं आहेस?" ती जवळजवळ ओरडलीच!
क्रमशः
आईला तिच्या आवाजातली धास्ती जाणवली. "बापरे, तुला हे सिक्रेट वगैरे ठेवायचं आहे की काय?" आईने विचारले.
"हो! मी त्याला भेटले हे कुणालाही अजिबात कळू द्यायचे नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, प्लीssज." ती थोडी ओरडूनच म्हणाली.
"सिक्रेट ठेवायचं असेल तर ठीक आहे. पण तुझा लेख छापल्यावर-"
"लेख छापायचा नाहीये." ती वाक्य तोडत म्हणाली.
"अग पण-"
"आय नो. माझी त्याच्याशी नीट ओळख झाली आणि मी ठरवलं की त्याच्या इच्छेविरुद्ध लेख छापणार नाही. त्याला त्याचं खाजगी आयुष्य जपण्याचा हक्क आहे." त्याचा निरोप घेतानाच्या आठवणीने तिचा आवाज अगदी मऊ झाला होता.
"उर्वी?" आईचा आवाज आता थोडा गंभीर झाला होता."तुझ्यात आणि त्या रानटी माणसात नक्की काहीतरी सुरू आहे. माझ्यापासून अजिबात लपवू नकोस. तुझ्या आवाजावरून कळतंय मला."
आईच्या डोक्यात नक्की काहीतरी रडार बसवलेले आहे, माझ्या सगळ्या गोष्टी ती कायम अश्याच ओळखते. उर्वी काय सांगावं याचा विचार करत होती. तशीही तिला ही गोष्ट आईपासून लपवून ठेवणे कठीणच होते.
"मला वाटतंय की मी त्याच्या प्रेमात पडतेय." तिने पटकन बोलून टाकलं. एकदाचं हे ओठावर आणून तिला आतून खूप बरं वाटलं.
तिचं बोलून होताच एक शांतता पसरली. "फक्त दोन दिवसांच्या ओळखीत?" आईने विचारले.
"हा वेडेपणा वाटतोय ना?" आणि स्वतःलाच काही समजायच्या आत तिने पूर्ण गोष्ट आईला ऐकवली अर्थात त्यांचा फेअरवेल किस गाळून!
"तरीही बेटा इतक्या लहानश्या ओळखीनंतर आपल्या भावनांना प्रेम म्हणणे मला थोडे अती वाटतेय." आईने तिला सावध केले.
"तुझं म्हणणं मला पटतंय. खरंच पटतंय. पण मला जे वाटतंय ते थांबवता नाही ना येत. त्याच्याबरोबर थोडाच वेळ राहून तो मला इतका आवडला की मला त्याच्याबाबतीत लॉजिक लावता येत नाहीये. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. हे अट्रॅक्शन थांबवायला ही रिलेशनशिप का वर्क होणार नाही याची अक्षरशः मनात एक लिस्टच बनवली. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. उलट मी तिथून परत आल्यापासून अट्रॅक्शन अजूनच वाढतंय." तिने गंभीर होत सांगितले.
"कठीण आहे..." सुस्कारा सोडत आई म्हणाली.
हे तिला आईने सांगायच्या आधीच माहीत होते!
"पण तुझ्या ह्या फीलिंग्ज असू देत, तरीही तो लेख छापता येईल ना. तू लिही आणि त्याला वाचायला दे. त्याला जी काही काटछाट करायची असेल ती करुदे. मग त्याचं अप्रुव्हल मिळालं की छापून टाका लेख. प्रॉब्लेम काय आहे?"
"मी तोही विचार केला होता." ती रबरबॅण्ड काढून केस मोकळे करत म्हणाली. तिने खूप शक्यता तपासून पहिल्या होत्या. पण तरीही कुठल्याही मार्गे लेख छापणे हा त्याच्या विश्वासाचा अंत असेल असे तिचे मत झाले होते.
"तुझ्या करियरसाठी हा लेख किती महत्वाचा आहे हे त्याला माहिती आहे का?"
"माहिती आहे. पण त्याने ऑन माय ओन लिहिल्यावर त्याच्या प्रकाशकाला ही अट घातली होती. त्याच्यामते लोकांचा फोकस पुस्तकातल्या आशयावर रहायला हवा, लेखकावर नको."
"मग त्याने हा विचार पुस्तक लिहिण्या आधी करायला हवा होता. त्याने एखादं टोपणनाव वापरायचं होतं मग!" आई म्हणाली.
अरे हो, हा चांगला मुद्दा आहे. विचारायला हवं त्याला. उर्वी विचारात पडली.
थोडावेळ उर्वीची त्याच्याबद्दल आणखी बडबड ऐकून आईने काळजीपोटी शेवटी विचारलेच,
"उर्वी, तुमचं हे नातं नक्की कुठल्या दिशेने जाईल हे कळतंय का तुला?"
"मला नाही माहीत आणि बहुतेक त्यालाही नाही.
पण सध्या तरी आम्ही एकेक दिवसाचाच विचार करतोय. आणि हो आई, ऐक ना, त्याने मला एक गिफ्ट पाठवलं. गिफ्ट काय होतं माहितीये, एक अँटिक चहाची किटली!"
"काय?" विचारताना आई हसत होती.
"चहाची किटली! त्याच्यासाठी तिचं काहीतरी महत्व आहे पण ते त्याने अजून सांगितले नाही. आता मी चहा करतेय ती वापरून." ती खळखळून हसली.
"बघ, उर्वी! मला तुझा फुगा फोडायचा नाहीये पण अजून तुम्ही एकमेकांना तेवढे ओळखत नाही. सगळंच नवीन आहे. पण एकदा का हा हनिमून पिरियड संपला की तुम्हाला दोघांनाही परिस्थितीची जाणीव होईल. आणि मला तुझं मन मोडायला नकोय. म्हणून काळजी घे, ठीक आहे?" आई तिची समजूत घालत म्हणाली.
"हो आई, काळजी करू नको." तिने होकार दिला पण मनातून तिला तिच्या प्रेमावर विश्वास होता. कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण तरून जाऊ. आदित्य आणि त्याच्या किटलीसकट! फोन ठेवल्यावर तिच्या चेहऱ्यावर मोठे हसू पसरले.
लॅपटॉपजवळ जाऊन तिने पॉझ केलेले गाणे पुन्हा सुरू केले. आदित्य कॉल करणार होता पण अजून कसा आला नाही म्हणून ती थोडी धास्तावली होती.
तेवढ्यात मोबाईल चिवचिवला. तिने झडप घालून फोन उचलला. त्याचाच टेक्स्ट होता.
U: Listening to 'weather any storm' by cody francis from my favorite playlist. It reminds me of you :)
A: Never heard of it. But there is a thing tied at the cabin. That reminds me of you.
U: It's not a thing! Aakash kandil! So is it still up?
A: I can't risk my life falling down alone.
U: :p
तिने हसून फोन खाली ठेऊन हॉट चॉकलेटचा ग्लास उचलला. एक घोट घेते तोच river flows in you वाजलं. तिने त्याच्यासाठीच आता ही ट्यून स्पेशली सेट केली होती.
"हाय!" ती कुजबुजली.
"हाय! कॉल करू शकताना आपण मेसेज का करत होतो?" तो हसत म्हणाला.
"तू घरी आहेस? मला माहित नव्हतं तू इतक्या वेळा गावात जातोस ते."
"जनरली नाही जात. शेवटचं घरी येऊन मला काही आठवडे झाले असतील. पण गेले चार दिवस मी घरीच आहे."
ओह म्हणजे फक्त तिच्याशी बोलू शकण्यासाठी तो इतके दिवस तिथे थांबलाय. तो टिपिकल रोमँटिक माणूस नव्हता. तो तिला ज्यूलरी, फुलं वगैरे पाठवणार नाही हे तिला माहीत होते. पण तो तिच्यासाठी हे जे काही करत होता त्यातून त्याचे प्रेम स्पष्ट दिसत होते.
"आज मी किटलीत भरपूर आलं आणि साखर घालून तिखट चहा केला आणि बरोबर ऍपल जॅम लावलेली एक ब्रेड स्लाइस." त्याच्या गिफ्टचा ती चांगला उपयोग करतेय हे त्याला कळावे म्हणून तिने सांगितले.
"बस एवढासा नाश्ता?"
"सकाळी मी खूप घाईत होते. दिवाळी पहाटच्या प्रॅक्टिसला जायचं होतं. दिवाळीच्या पहाटे बिल्डिंगमधलेच हौशी लोक मिळून एक छोटासा प्रोग्रॅम करतात."
"तू गातेससुद्धा?" त्याने आश्चर्याने विचारले.
"थोडंफार. लहानपणी आईच्या आग्रहाने शिकले होते. गाण्यापेक्षा आवडीने मी बासरी वाजवते. बासरी खूप वर्ष शिकले. ह्या प्रोग्रॅममध्ये गाणं म्हणेन एखादं, पण बासरीची साथ असेल बाकीच्यांच्या गाण्यात."
"Wow तू खरंच खूप टॅलेंटेड आहेस." तो इम्प्रेस होत म्हणाला.
"आय'ड लाईक टू थिंक सो" ती जीभ चावत म्हणाली.
त्यांच्या गप्पा तासभर सुरूच राहिल्या. ती त्याला तिचे आईबाबा आणि त्यांच्या दिवाळीबद्दल सांगत होती. शेवटी तिच्या फोनची बॅटरी अगदीच संपत आली तेव्हा अचानक जरा चाचरत त्याने विचारले.
"परत गेल्यापासून तू माझ्या आईला भेटलीस का?"
"नाही. त्यांच्याशी बोलायला वेळच नाही झाला. त्यांना फार उत्सुकता असेल त्या अंगठीचं काय झालं म्हणून.." खरी गोष्ट म्हणजे त्यांना अंगठीबद्दल सांगून त्यांचे मन दुखावणे तिच्या जीवावर येत होते.
"तिला कशाची गरज असेल तर मला सांग." त्याचा आवाज नेहमीपेक्षा जरा हळू येत होता.
"त्यांची तब्येत छान आहे, तुला तेवढंच विचारायचं असेल तर. पण त्यांच्या गरजा वेगळ्या असू शकतात."
"म्हणजे?"
ती आता खोलात शिरत होती. पण त्याच्या आईने इतकी मौल्यवान गोष्ट तिच्या ताब्यात दिल्यामुळे प्रयत्न करणे ही ती तिची जबाबदारी समजत होती.
"त्यांना त्यांच्या मुलाची गरज आहे."
पलीकडून त्याच्या फिस्कारण्याचा आवाज आला.
"वाटलंच होतं तू हेच्च म्हणणार! बरं मला दोन दिवस व्हॅलीतल्या एका बागेत जावं लागेल. तिथे फ्रुट पिकिंग सिझन सुरू आहे. नेटवर्क नसेलच. मी परत आल्यावर तुला फोन करेन"
"चालेल." ती हो म्हणाली खरी पण दोन दिवस त्याच्या आवाजाशिवाय काढणे हे तिला आता अनंतकाळासारखे भासणार होते.
क्रमशः
दोन दिवसांनंतर
---
"आजकल क्या चल रहा है उर्वी?" अना मागे वळून तिच्याकडे बघत म्हणाली. ऑफिसखालच्या छोट्या सेल्फ सर्व्हिस कॅफेच्या रांगेत त्या उभ्या होत्या. लंच टाइममुळे आजूबाजूला प्रचंड घामट गर्दी होती.
"यू मीन फॉग?" म्हणत उर्वी मुद्दाम खोटं हसली.
"पीजे मत मार! आय एम सिरीयस." उर्वीची प्लेट तिच्या हातात देत अना रागाने म्हणाली.
समोरचे टेबल रिकामे होताना बघून दोघी पटकन तिथे जाऊन बसल्या. "कुछ भी तो नही. तुम क्या सोच रही हो?" उर्वी म्हणाली.
"जबसे तुम शिमलासे वापस आयी हो, कुछ अलग लग रही हो. लाईक.. हॅपीअर." व्हेज काठी रोल तोंडात कोंबत अना तिचा चेहरा निरखून बघत होती.
उर्वी खुशीत हसली. हो, ती होतीच हॅपीअर!
"तुम्हे कोई मिल गया है, है ना?" अनाने डोळे बारीक करून विचारले.
"मेबी." उर्वी ओठ चावत म्हणाली.
"हाय राम उर्वी! तुम मुझसे कभी कोई बात नही छुपाती, इस बार क्या हुआ? ये वही लडका होगा केटल वाला? है ना?" ती चोरी पकडल्याच्या आनंदात म्हणाली.
"वो केटल रिअल गिफ्ट थी. और तुम्हे जानना ही है तो उसका नाम ललित है." अर्धे नाव तरी! ती मनात म्हणाली. तिने रात्री त्याच्याशी बोलताना टोपणनावाचा विषय काढला होता. तेव्हा त्याने सांगितले की आदित्य हेच मुळात टोपणनाव आहे! हे ऐकताच ती एवढी शॉक झाली की तिने डिटेल्स विचारले. त्याचं म्हणणं होतं की तो आदित्य असला तरी त्याचं वडिलांनी ठेवलेलं आणि कागदोपत्रीही असलेलं नाव ललितादित्य होतं. सातव्या शतकातील काश्मीर आणि हिमाचलचा महापराक्रमी सम्राट. अच्छा! तरीच मागे खूप शोधूनसुद्धा कुठल्याही जन्म दाखले किंवा शाळेच्या रेकॉर्डसमध्ये तिच्या हुशार हॅकर समीराला आदित्य संत सापडला नव्हता. नंतर तिने त्या नावावरून त्याला खूप चिडवलं होतं.
"अच्छा! और कहांसे है?" अनाचे प्रश्न सुरू झाले.
"मुंबईसे ही है, लेकीन सेल्स मे है तो मोस्टली बाहर ही रहता है." तिने अजून एक थाप मारली.
"तो? सीन क्या है? मुझसे छुपा क्यू रही थी तुम?" फ्राईजचा बकाणा भरून बोबडं बोलत तिने विचारलं.
"ये चीज ग्रील बहुत टेस्टी है, मै एक और लेके आती हूँ." संपत आलेल्या सँडवीचकडे बघत ती म्हणाली.
"उ हूं, डोन्ट चेंज द सब्जेक्ट." हातातलं सगळं खाली ठेवत अना ठामपणे म्हणाली.
"तो समझो ना अना! जब बताने लायक कुछ होगा तो सबसे पहले तुम्हे बताऊंगी. ठीक है?
"फाईन! जैसा तुम कहो!" अना चांगलीच फुरंगटली होती.
इतक्यात तिचा मोबाईल पिंग झाला.
आदित्य होता. A: I am back.
"वही है ना?" अना वाकून तिच्या फोनमध्ये बघत होती.
उर्वी दुर्लक्ष करून उठली आणि सँडविच घ्यायला गेली. टोकन घेऊन रांगेत तिने पटकन त्याला टेक्स्ट केला. U: Can't talk now. Having lunch with a snoopy friend.
A: Gotcha. In half an hour?
U: Yup. अना यायच्या आत तिने फोन पटकन पर्समध्ये टाकला.
"अरे अभी मुझे वहां क्राऊडमे कुणाल दिखा था." अना तिच्या मागे येत म्हणाली.
"ओह शिट! लास्ट मंथ उसने मुझे मुव्ही के लिए पुछा था और मैने हा कर दी थी. कमिंग सॅटरडे जानेवाले थे, तो उसने टिकेट्स भी निकाली होगी" कपाळावर हात मारत उर्वी उद्गारली.
"तो तुम जाओगी या इस नये लडके की वजहसे कॅन्सल करोगी?"
"मुव्ही ही तो देखनी है, जा सकती हूं."
"वैसे ये कुणाल कितना क्युट बंदा है. नेचरभी अच्छा है उसका. वो क्यू पसंद नही आया तुम्हे?" कॉफी पिता पिता अनाने विचारले.
"वो बहुत ज्यादा पॉलिश्ड है, ज्यादा हँडसम है और खुदकी बहुत ज्यादा केअर करता है. उसके हाथ देखे? मुझसे भी महंगा मेनिक्युअर है उसका! इतने ओव्हर स्वीट लोगोंके साथ मै पूरी लाईफ स्पेन्ड नही कर सकती. वो फ्रेंडही ठिक है. तुम वो जलेबीके उपर रबडी डालकर खाती हो ना वैसे है वो. लेकीन मुझे नमकीन पसंद है!" ती अनाला डोळा मारत म्हणाली आणि दोघी लिफ्टमध्ये शिरल्या.
डेस्कवर पोचताच तिने त्याला टेक्स्ट केला.
U: I am back.
A: Did you miss me?
U: You were on my mind the whole time!
A: Good to know. Snoopy friend?
U: Need to be careful. I told her your name is Lalit and you are from Mumbai. please keep that in your mind.
A: Np. Is that Ana?
U: Yes Ana. Talk tonight?
A: Ok
सेलफोन डेस्कवर ठेऊन ती बसते तोच डेस्क फोन वाजला.
"उर्वी काळे." ती घाईत रिसिव्हर उचलत म्हणाली.
"हॅलो उर्वी" आवाज ऐकताच तिला ओळखीचा वाटला. "मी माया कासेकर बोलतेय. आदित्यची आई. इथे कॉल करून तुला त्रास द्यायचा नव्हता. पण आदित्यबद्दल लवकरात लवकर ऐकायचं होतं म्हणून अजून धीर नाही धरू शकले." त्यांच्या आवाजातून त्या ऐकायला किती अधीर झाल्यात ते समजत होते.
इतके दिवस त्यांना कॉल न केल्यामुळे उर्वीला भयंकर गिल्टी वाटत होते. ती पुढे करण्यासाठी काहीतरी कारण शोधत होती पण तिने खरे बोलायचे ठरवले. "हॅलो मॅम, मी रोज तुम्हाला कॉल करेन म्हणता म्हणता गडबडीत राहून जात होतं."
"तुला आदित्य सापडला? बोलणं झालं का त्याच्याशी?"
"हो" त्यांना पुढची अंगठीची गोष्ट कशी सांगावी या विचारानेच तिला वाईट वाटत होतं.
"तू अंगठी दिलीस त्याला?"
"द्यायचा प्रयत्न केला." कमीत कमी शब्दात तिने काय झालं ते त्यांच्यापर्यंत पोचवले.
"ओह.." त्यांचा आवाज बारीक झाला होता.
कोणी ऐकू नये म्हणून उर्वी अगदी हळू बोलत होती. "मी केबिनपर्यंत पोचले तेव्हाच बर्फ आणि वादळ सुरू झाले. मला दोन दिवस त्याच्याबरोबर केबिनमध्ये रहावं लागलं. त्याचा कुत्राही होता तिथे."
"कसा आहे गं तो?" त्यांच्या आवाजातली माया आणि त्याच्याबद्दलची आस जाणवून तिचा घसा दाटून आला.
"त्याचं सगळं व्यवस्थित चाललंय. चांगला दिसतोय आणि त्याला सोबत एक भलामोठा कुत्रा आहे, सीडर नावाचा."
"सीडर?"
"हो, मी पहिल्यांदा त्याला बघितले तेव्हा तो मोठ्या लांडग्यासारखा दिसत होता. मला वाटलं होतं याचा आजचा डिनर मीच आहे." वातावरण थोडं हलकं करायचा प्रयत्न करत ती म्हणाली.
त्या मंद हसल्या. " अच्छा, मी शेवटची आदित्यला भेटले तेव्हा हा अगदी लहानसा पपी होता. आदित्यच्या बाबानेच नाव ठेवलं असणार. त्याला हिमाचलमध्ये गेल्यापासून देवदारांचं भारी प्रेम होतं."
पहिल्या रात्री सीडरने केलेली सोबत तिला आठवली आणि त्याला परत भेटावंसं वाटलं.
"आदित्यने अंगठी घ्यायला नकार दिला. पण बाकी काही बोलला का तो?" त्यांनी चाचरत विचारले.
"अंगठी नाही घेतली पण त्याने तुमची चौकशी केली."
"खरंच!" आनंदाने त्या ओरडायच्याच बाकी होत्या. "चला म्हणजे काहीतरी चांगलं होण्याची आशा तरी ठेऊ शकते मी."
"हे खरंच पॉझिटीव्ह साइन आहे. अजून काही काळाने नक्की तो तुमच्या अजून जवळ येईल." कदाचित मी त्याला समजावून काही उपयोग होईल ती मनात ठरवत होती.
"तुझ्या तोंडात साखर! त्याला भेटण्यासाठी तुझ्या एवढ्या कष्टांचे खरंच कौतुक आहे. आय रिअली अप्रिशीएट" त्या आनंदाने म्हणाल्या.
"अजून त्याला समजत नाहीये पण कधीतरी जाणवेल की तुमच्याइतकीच त्यालाही तुमची गरज आहे."
"थॅंक्यू उर्वी. तुझा कामाच्या ठिकाणी खूप वेळ घेतला मी."
"अं.. मॅम एक मिनिट, मला काहीतरी विचारायचं होतं."
"हो, विचार ना."
"आदित्यने मला एक गिफ्ट पाठवले आहे. एक अँटिक टी केटल. मी त्याला डिटेल्स विचारले पण तो सांगायचं टाळतोय. तुम्हाला काही माहिती आहे का?"
त्या हसायला लागल्या. "त्याने तुला ती किटली पाठवली?"
"हो, मी रोज वापरतेय ती सध्या."
"ती त्याच्या बाबाने माझ्यासाठी घेतली होती. आम्ही लग्न करून हिमाचलला गेलो तेव्हा फॉरेस्ट ऑफिसर्सना रहायला आतल्या सामानासकट मोठा बंगला मिळायचा. त्यामुळे आमच्यावर भांडीकुंडी विकत घ्यायची वेळच आली नाही. पण एके दिवशी त्याने मला तिथल्या लोकल मंडीतून हिमाचली स्टाईलची खास बनवून घेतलेली चहाची किटली आणून दिली. तांब्यावर ठोके असलेली, घुमटासारखं झाकण आणि लाकडी मूठ. आमच्या घरातलं पहिलं 'आमचं' असं भांडं होतं ते."
"ओह मग आदित्यने ते मला का पाठवलं असेल?"
"सरळ आहे. तो तुझ्या प्रेमात पडलेला दिसतोय. त्याच्या बाबाने प्रेमात पडल्यावर केलेल्या गोष्टीच तो करतोय. तू त्याच्यासाठी किती महत्वाची आहेस हेच सांगायचा तो प्रयत्न करतो आहे असे दिसतेय."
आता त्यांना मजा येत होती.
"माझ्यासाठीही तो खूप महत्त्वाचा आहे." ती पटकन बोलून गेली.
"ओह डिअर.. आर यू इन लव्ह विथ माय सन?"
"आय थिंक सो" ती हळू आवाजात बोलली. "हो" मग सरळच म्हणाली. इतक्या कमी ओळखीतसुद्धा तिच्या मनाला ते जाणवत होते. इतर कुठल्याच माणसामुळे तिच्या मनाला असा स्पर्श झाला नव्हता जो आदित्यचा होता.
"खूप विचार करून पुढे पाऊल टाक." माया तिला समजावण्याचा सुरात म्हणाली. "तो अगदीच त्याच्या बाबावर गेलाय. तो कुठलंच काम वरवर करणार नाही, प्रेमात पडला असेल तर तो पूर्णपणे वाहवत जाईल आणि जर हर्ट झाला तर जंगली अस्वलासारखा बोचकारेल. तुला खूप काळजीपूर्वक पुढे जावं लागेल. हे अजिबात सोपं नाहीये, आधीच विचार कर. मी अनुभवाने सांगतेय."
क्रमशः
दिवसभर आदित्यच्या आईचे शब्द तिच्या डोक्यात घुमत होते. तिच्या स्वतःच्या आईचेही शब्द पुसले गेले नव्हते. ती आणि आदित्य दोन निराळी माणसे होती, आपापल्या वेगळ्या जगात वावरणारी. ती मोठ्या गर्दीच्या शहरातली एक चुणचुणीत, भरपूर लोकांच्यात मिसळणारी, बिनधास्त मुलगी आणि तो जगाच्या कोपऱ्यात, स्वतःच्या धुंदीत, एकटा राहणारा, डोंगरदऱ्या भटकणारा मुलगा. प्रॅक्टिकली विचार केला तर त्यांच्यात काहीच सारखेपणा नव्हता पण तिचं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. दोन्ही आयांनी तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजवून ठेवली होती आणि एकटी असताना ती जास्तच खणखणत होती.
संध्याकाळी तिला कधी एकदा त्याच्याशी बोलतेय असं झालं होतं. डोक्यावर केसांचा नारदमुनीछाप अंबाडा घालून, सोफ्यावर मांडी घालून, हातात फोन घट्ट धरून ती बसली होती. फोन वाजताक्षणी तिला उचलायचा होता. फोन वाजेपर्यंत तिच्या डोळ्यातून पाणी ओघळायचंच बाकी होतं.
"थँक गॉड तू फोन केलास." फोन लगेच उचलून ती म्हणाली.
"काय झालंय उर्वी, तू बरी आहेस ना?" त्याने काळजीने विचारले.
"माझी आई. आणि तुझीपण.."
" नक्की काय सुरू आहे हे? तू माझ्या आईशी बोललीस का?" त्याचा सूर वैतागलेला होता.
"व्हेरी गुड. आता तू पण चिडचिड कर माझ्यावर. तेवढंच बाकी राहिलं होतं." तीही वैतागली होती.
"उर्वी, हे बघ शांत हो. एक लांब श्वास घे आणि मला सुरुवातीपासून सांग काय झालंय ते."
एक मोठा श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली. "एक दोन दिवसांपूर्वी माझं माझ्या आईशी बोलणं झालं. मी तिला आपल्याबद्दल सगळं सांगितलं. तिने मला तुझ्या प्रेमात पडण्यावरून वॉर्न केलंय. तिच्या मते आपल्याला आत्ता सगळं गोडगोड गुलाबी दिसतंय पण नंतर आपल्यातले सगळे फरक हळूहळू उघडे पडायला लागतील आणि आपण दुःखी होऊ."
थोडावेळ पलीकडे शांतता होती. तो तिचे म्हणणे समजून घेत होता. "आणि माझ्या आईने पण हेच सांगितलं असेल." तो रागाने म्हणाला.
"मोर ऑर लेस, तसंच!"
"आणि यामुळे तुला आपल्याबद्दल चिंता वाटतेय?"
"हो. म्हणजे मला काळजी करायची नाहीये पण ती केली जातेय आपोआप. आपल्याला भेटून साधारण फक्त तीन आठवडे झालेत आणि मला आत्ताच काही वर्ष गेल्यासारखी वाटतायत. इतक्या कमी वेळात कोणाबद्दल इतक्या तीव्र जाणीवा तयार होणे बरोबर आहे का? तुझ्यामुळे मला इतकं छान, आनंदी वाटतंय की आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांनाही माझ्यातला फरक लक्षात येतोय."
"नंतर आपल्या दोघांनाही त्रास होऊ नये, हार्टब्रेक होऊ नये म्हणून तू मला आत्ताच तुझ्यापासून तोडून टाकणार आहेस का?" त्याने सरळसोट प्रश्न विचारला.
"अजिबात नाही" तिचं तात्काळ उत्तर आलं. "तुला असं करायचं आहे का?"
"नाही. तुला आठवतंय, तू भिजलेला स्कार्फ फायरप्लेस शेजारच्या खुर्चीवर वाळत घातला होतास. मऊ पांढऱ्या कापडावर चेरी ब्लॉसम्स आहेत तो स्कार्फ. तो वाळून खुर्चीमागे पडला होता, त्यामुळे तू विसरलीस बहुतेक. मी तो घडी करून उशीशेजारी ठेवलाय. रोज तुझी आठवण आली की मी त्या स्कार्फला बघून तुला आठवतो. इतकी शांत झोप मला खूप वर्षांनी लागत असेल."
"ऑss आता तू मला रडवणार आहेस आदित्य." तिला इतके दिवस का वाटत होतं की हा माणूस अजिबात रोमँटिक नाहीये.
"फतेबीरपण माझ्याकडे बघून, हा गेला कामातून अशी मान हलवत असतो. आणि मी एकटाच नाही सीडरसुद्धा तुला खूप मिस करतोय. बिचारा एखाद्या लहानश्या लॉस्ट पपीसारखा शेपूट घालून घरभर फिरत असतो."
"माझीही तशीच अवस्था आहे. काय झालंय आपल्याला? हल्ली तुझा विचार आला की मला रडायला यायला लागतं की आपण परत कधी भेटणार आहोत तरी की नाही म्हणून." ती कुजबुजली.
"आपल्याला आज कुठलाही निर्णय घ्यायचा नाही ना?" त्याने मोठा श्वास सोडत विचारले.
"नाही." ह्या एका गोष्टीवर ती ठाम होती. "कारण मी ते अजिबात सहन करू शकणार नाही."
"गुड. आता हे ठरलं आहे तर हा विषय बदलून टाकू." तो जरा उत्साहात म्हणाला. "मग तुझा तो क्यूट बॉयफ्रेंड काय म्हणतोय?" क्यूटवर जोर देत त्याने चिडवत विचारले.
"प्लीssज! आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत." आता तीही चिडवायच्या मूडमध्ये होती. "फक्त एक दोनदा डिनर आणि एकदा मुव्ही डेटवर गेलो होतो पण सिरीयस काही नाही. आणि खरंच तुला कुणालपासून काही धोका नाहीये."
"सो, त्याचं नाव कुणाल आहे. हम्म.."
"तो एक चांगला माणूस आहे पण तो मला किटली गिफ्ट करण्याचा विचारही नाही करू शकणार." ती हसत हसत म्हणाली. "खूप दिवसांपूर्वी म्हणजे तुला भेटायच्या आधी आम्ही नवा टर्मिनेटर बघायला जाऊ असं ठरवलं होतं. त्याने आता तिकीटं काढली असतील, मी कॅन्सल करायला विसरून गेले. तर आता शनिवारी संध्याकाळी जाऊन येईन एकदा शेवटचं."
"तुला कळतंय ना, तू जेवढा वेळ ह्या माणसाबरोबर असशील तेवढा वेळ माझी जळून जळून राख होईल."
"मला ऐकून मजा वाटतेय, असाच बोलत रहा." ती हसली.
"तुला खरंच मजा वाटतेय?"
"हो, म्हणजे असं वाटलं तर तू अलर्ट राहशील. अशीच कॉम्पिटीशन सुरू राहिली तर कदाचित किटलीला मॅचिंग कपबश्या मिळू शकतील मला!" ती ओठ चावत म्हणाली.
----
शनिवारी ती ऑफिसमधून घाईघाईत घरी निघाली. कूल, हँडसम कुणालबरोबर थिएटरमध्ये जायचं तर जरा तयार होऊन गेलं पाहिजे. फार विचार न करता तिने निळसर स्कीनी डेनिम्स आणि क्रीम स्पगेटी घालून वर ढगळ काळा क्रोशे टॉप घातला. केसांवरून थोडासा जेलचा हात फिरवून केस मोकळेच ठेवले. न्यूड मेकअप आणि नेहमीची पीच लिपस्टिक लावून ती तयार होती.
सकाळपासून आदित्य शांत होता. त्याचा एकही टेक्स्ट आला नव्हता. तिच्या मुव्ही डेटबद्दल त्याला काळजी वाटत होती हे तिला माहितीच होते. पण त्याच्या इतक्या जेलस होण्याचे कारण समजत नव्हते. त्याला कुठल्याच माणसाचा धोका नव्हता, अर्थात ती त्याच्या किती खोल प्रेमात पडली आहे याची त्याला अजून कल्पना नव्हती. ती सारखी फोनवर नजर ठेवून होती की कधीही त्याचा मेसेज येईल. तिने दुपारी पाठवलेल्या मेसेजलाही त्याचे उत्तर आले नव्हते. कदाचित तो केबिनमध्ये परत गेला असेल. तसं असेल तर आता त्याने कॉल केल्याशिवाय कॉन्टॅक्ट होणे शक्यच नव्हते.
चुळबुळत तिने खिडकीचा पडदा सरकवला. बाहेर भुरभुर पाऊस सुरू झाला होता. त्याने तिच्या मनावर अजूनच मळभ आलं. नव्हेम्बर महिना ही काही पाऊस पडायची वेळ आहे का! तिला ती शेवटची भिजून केबिनमध्ये आगीसमोर हात शेकताना आठवली. दिवाळी दोन दिवसांवर आल्यामुळे सगळेजण बिझी होते. दिवाळी पार्टीसाठी तिला अनासकट दोन तीनजणांनी आमंत्रण दिले होते. पण तिला कुठेच जाण्याचा मूड नव्हता. ती घरीच थांबणार होती.
पावसाकडे बघत, ती शांतता सहन न होऊन शेवटी तिने सवयीने टेक्स्ट पाठवलाच.
U: Miss you.
आणि लगेच उत्तर आले. A: Good.
तिला आनंदाने धक्काच बसला. U: where have you been all day?
A: in the air
U: to Delhi? Where? You didn't tell me.
हा दिवसभर फ्लाईटने कुठे गेलाय? तेही न सांगता. दिल्लीला गेला असेल तर फक्त तासभर लागतो. आता ती थोडी जेलस होत होती.
A: You still have your hot date?
U: Of course! Are you jealous?
A: You bet.
वाचून तिला एकदम उबदार वाटलं, मनावरचं सगळं मळभ अचानक निघून गेलं. तिने हसून उत्तर दिले.
U: It's raining here and I am missing you like anything.
A: I know.
U: You know??
A: It's only drizzling
तिने एकदम श्वास घेतला आणि पटापट टाईप केले.
U: Where are you Aaditya??
A: Mumbai
आपण काय वाचतोय हे कळेपर्यंत तिचा फोन वाजला आणि कॉल रिसिव्ह करेपर्यंत तिच्या हातून पडतापडता राहिला.
"सरप्राईज!" तो हळूच म्हणाला.
तिला एकाच वेळी हसू आणि रडू दोन्ही येत होते. तो आल्याच्या आनंदात ती वेडीच व्हायची बाकी होती आणि रडायला कारण ही स्टूपिड मुव्ही बघायला तिला जावं लागणार होतं. अजून दोन तासांनीच ती त्याला भेटू, बघू शकणार होती.
"कुठे आहेस तू?"
त्याने तिच्या बिल्डिंगपासून दहा मिनिटावरच्या एका हॉटेलचे नाव सांगितले. "मी आत्ताच चेक इन केलंय. मी असं अचानक इथे येणं हा खूप वेडेपणा आहे पण मला तुला दिवाळीत एकटं राहू द्यायचं नव्हतं."
"वेडेपणा की काय ते मला माहित नाही. पण तुझ्या इथे असण्यानेच मी हवेत गेलेय. I am too happy to care!" तो समोर आला की ती त्याला कशी भेटेल, पळत जाऊन मिठी मारेल की किस करेल की रडायला लागून स्वतःचेच हसे करून घेईल ह्या सगळ्या कल्पना तिला डोळ्यासमोर दिसत होत्या.
"तुला मुव्हीला जावंच लागेल का?" विचारून लगेच त्याला चूक लक्षात आली. "सॉरी, मी असं विचारलं ते विसरून जा. तुला जायचं आहेच. तू जाऊन ये, तोपर्यंत मी आराम करतो."
तो बोलत असतानाच तिला खालून हॉर्न ऐकू आला. कुणाल तिला हात करत होता.
"हे केवढं टॉर्चर आहे तुला कळतंय का?" ती तोंड वाकडं करून दार उघडताना म्हणाली.
"तुझ्यासाठी की माझ्यासाठी?"
"आपल्या दोघांसाठी." तिने लिफ्टचे बटण दाबले. तो तिच्या इतक्या जवळ आहे हे डोक्यात असताना ती दोन तास कसे काढणार होती कुणास ठाऊक.
"इट्स ओके. तू जा खरंच."
"ओके, पण तू मला इतका त्रास दिल्याचा पुरेपूर बदला लवकरच घेतला जाईल." ती नाक फुगवून म्हणाली.
त्याने हसतच फोन ठेवला.
क्रमशः
लिफ्टमध्ये शिरताच पर्समधून बॉटल काढून ती घटाघट पाणी प्यायली. थोडा श्वास घेतल्यावर तिच्या हृदयाचे ठोके जरा ताळ्यावर आले. कुणाल नेहमीप्रमाणेच चकाचक तयार होऊन आला होता. लेदर जॅकेट, महागडे शूज, त्याहून महागडं घड्याळ आणि डोळ्यावर रेबॅन. संध्याकाळी गॉगल्स!? असतात, कुणालसारखे लोक असतात! ती हसून त्याच्याशेजारी बसली. तो हँडसम होताच पण त्याला बघून कधीच तिचे हृदय जोरजोरात धडधडले नव्हते. आदित्य आत्ता त्याच्या खोलीत बसून तिची वाट बघतोय या विचारानेच तिचे रक्त सळसळत होते.
समोर मूव्ही सुरू होती पण तिचे तिकडे लक्ष नव्हते. टर्मिनेटर डार्क फेटचे रिव्ह्यूज बरे होते पण तिला फारच बोर झालं. काहीच नावीन्य नाही, त्याच त्या जुन्या ग्रेव्हीत नवीन मसाला बस्स! चुळबुळ करत ती कशीबशी शेवटापर्यंत बसून राहिली. सात वाजेपर्यंत मुव्ही संपली एकदाची. कुणालने तिला डिनरसाठी विचारलं तेव्हा तिने त्याला शेवटी हे वर्कआऊट होत नाही आणि ती कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे म्हणून सांगून टाकले. तसेही ते मैत्रीच्या पुढे गेलेच नव्हते, त्यामुळे त्यालाही तिचे म्हणणे समजले.
तिच्या बिल्डिंगखाली त्याने कार थांबवली तेव्हा पाऊस पडायचा थांबला होता पण गर्दी आणि लखलखणाऱ्या दिव्यांखाली रस्ताभर चिकचिकाट आणि ट्रॅफिक जॅम होताच. तिला निरोप देण्यासाठी कुणाल खाली उतरला होता. तिने त्याला हॅन्ड शेक करून थँक्स म्हटले. त्याने तिच्याकडे बघत काही क्षण तिचा हात हातात धरून ठेवला.
"He's a lucky guy!" तिने भुवया उंचावल्यावर भानावर येत हात सोडून तो म्हणाला.
"मी सांगेन त्याला." ती हसत म्हणाली. तिने सोसायटीच्या कमानीतून आत जाऊन हात हलवल्यावर त्याने कार सुरू केली. तो जाता क्षणी तिने पर्समधून मोबाईल काढून टेक्स्ट केला.
U: I am home!
A: I know
तिने फोनमधून नजर उचलून समोर पाहिलं तर लॉबीत काचेच्या दारामागे आदित्य उभा होता. एक क्षण ती त्याच्याकडे बघतच राहिली. पावसाच्या गार हवेने थरथरून तिच्या अंगावर काटा आला पण आज त्याने ते भलेमोठे जॅकेट घातले नव्हते. आज त्याच्या सगळ्या विंटर ऍक्सेसरीज सोडून फक्त बूट, जीन्स आणि बॉटल ग्रीन चेक्सचा शर्ट बाह्या कोपरापर्यंत फोल्ड करून घातला होता. ताजा ताजा हेअरकट केलेला दिसत होता आणि दाढीपण थोडी कंट्रोलमध्ये होती. तिच्या अक्ख्या आयुष्यात तिला कुठला माणूस त्याच्याइतका आकर्षक वाटला नव्हता.
घाईघाईने दार ढकलून आत जात तिने त्याच्या नजरेला नजर मिळवली पण समोर टेबलवर सिक्युरिटी गार्ड होता. तिने पटकन जाऊन रजिस्टरमध्ये गेस्ट एन्ट्री केली. लॉबीतून डावीकडे जाऊन लिफ्ट येईपर्यंत दोघेही घट्ट हात धरून धडधडत्या हृदयाने उभे होते. ती एकाच वेळी त्याच्याकडे बघून हसत होती आणि तिचे डोळे पाण्याने भरले होते.
लिफ्टचे दार नीट बंद होण्यापूर्वीच ती त्याच्या उबदार मिठीत गुरफटली होती. ती त्याच्या गळ्यात हात टाकून हसत होती आणि त्याने कंबरेपाशी घट्ट धरून तिला काही इंच वर उचललं होतं. किस करता करता तिने दोन्ही हात त्याच्या गालांवर ठेवले. ते एकमेकांच्यात एवढे गुंतून गेले होते की लिफ्ट दहाव्या मजल्यावर थांबून दार उघडलेलेही त्यांना कळले नाही. दार परत बंद होणार इतक्यात त्याने तिला सोडून पटकन दारात हात घालून ते थांबवले.
लॅच उघडून ती त्याच्याबरोबर घरात गेली. ती पाणी आणायला किचनमध्ये गेली तेव्हा तो टेरेसच्या काचेच्या दारातून बाहेर बघत होता. आदित्यला या कितीही चकाचक असेल तरी एवढ्याश्या जागेत रहाणे आणि खाली लांबवर दिसणारी घामट माणसांची, धूर सोडणाऱ्या, कचाकच ब्रेक आणि हॉर्न वाजवणाऱ्या गाड्यांची, बुरसटलेल्या इमारतींची, कुबट झोपड्यांची गर्दी पाहून काय वाटत असेल याचा विचार तिच्या डोक्यात आला.
"कित्येक वर्षात अशी गर्दी पाहिली नाही. माणसांची सवय गेलीय माझी." तो स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला.
पाण्याचा ग्लास टेबलवर ठेऊन तिने त्याला मागून हलकेच मिठी मारून पाठीवर डोके टेकले.
"आपण दोघेही आपापल्या कम्फर्ट झोनच्या बरेच बाहेर आहोत." ती म्हणाली.
त्याने त्याचे मजबूत रफ हात तिच्या हातांवर ठेवले.
"खरंय."
"तू इथे आल्यामुळे मला इतका आनंद झालाय की मला तो सांगताही येत नाहीये धड."
"माझ्यासमोर दोनच पर्याय उरले होते. एकतर तडक इथे निघून यायचं किंवा तुझा आणि त्या क्युट बॉयफ्रेंडचा विचार करत हळूहळू वेडं व्हायचं."
"तू त्याला बघितलंस?"
"त्याने तुझा हात धरून ठेवलेला बघितला. पुढे जराही काही करायचा प्रयत्न केला असता तर मी त्याला तिथेच कारमधून बाहेर ओढून चोपला असता."
डोक्यात अश्या सीनची कल्पना करून ती खळखळून हसली.
"आय एम नॉट जोकिंग!" तो रागातच म्हणाला.
"ओह आदी, तुला एवढं इनसीक्युअर व्हायची काहीच गरज नाही. तू माझ्या हृदयाच्या किती जवळ आहेस ते तुला समजत नाहीये."
तिचे बोलून होईतो त्याने वळून पुन्हा तिला मिठीत घुसमटून टाकले.
"उर्वी, मी असा जेलस वगैरे टाईप कधीच नव्हतो पण तू.. तुझ्यामुळे मला गोष्टी जरा जास्तच जाणवायला लागल्या आहेत." सोफ्यावर बसून तिचे हात हातात घेत तो म्हणाला.
"फतेबीर तुला घेऊन जाण्यापूर्वीचा फक्त एक किस आणि त्याने माझं आयुष्यच हलवून टाकलंय. मी स्वतःच स्वतःला ओळखेनासा झालोय इतके बदल झालेत."
"पण तुला असं हललेलं आयुष्य आवडतंय का?" त्याचा गंभीर चेहरा बघून तिने काळजीने विचारले.
"माहित नाही, आधी कधीच असं झालेलं नाही."
तिने वाकून त्याचा चेहरा हातात धरून त्याच्या ओठांवर ओठ टेकले. काही वेळाने ती बाजूला झाल्यावर त्याने लांब श्वास सोडला. "कदाचित हळूहळू या सगळ्याची सवय होईल मला."
"बाय द वे, आय लव्ह कॅरमल पॉपकॉर्न.." तो तिच्या केसांत तोंड खुपसून कुजबुजला.
ती ओठ चावत हसली.
त्याला घर वगैरे दाखवून हातातली कॉफी गार होईपर्यंत ते बोलतच होते. तेवढ्यात तिने ऑर्डर केलेलं इंडियन चायनीज आलं. स्प्रिंग रोल्स, चिली चिकन, मंचुरियन ग्रेव्ही आणि ट्रिपल फ्राईड राईस. शेवटी गोड म्हणून फ्रीझरमध्ये तिच्या लाडक्या, स्वतः केलेल्या पिस्ता आईस्क्रीमचा एक डबा होताच. आज मी सगळं डायटिंग सोडून हवं ते खाणार आहे असं तिने आधीच अनाउन्स केलं होतं. जेवण होऊन, भांडी वगैरे आवरून ते टेरेसमधल्या बीन बॅग्जवर जाऊन बसले.
"बघ इथे एकही तारा दिसत नाही. बिचारा बारकुडा चंद्रच कुठून तरी डोकं वर काढतो. आयुष्यभर हे बघितल्यावर शेवटी तुझं आकाश बघून मला काय वाटलं असेल ते आता कळेल तुला" ती आकाशात बघत म्हणाली.
"मुंबईत पाऊल ठेवल्यापासूनच कळतंय ते." तो तिरकस हसून म्हणाला.
महिनोंमहिने न भेटल्यासारख्या त्यांच्या एका विषयावरून दुसऱ्यावर गप्पा सुरू होत्या. एव्हाना त्या दोघानाही आपण एकमेकांना आयुष्यभर ओळखतो वाटायला लागलं होतं. त्याने त्याच्या दुसऱ्या पुस्तकाचा विषय काढला. ड्राफ्ट लिहून पूर्ण होता पण त्याला त्यात पहिल्या पुस्तकापेक्षा काहीतरी कमी जाणवत होतं.
"हम्म.. पहिल्या पुस्तकाला एवढं प्रचंड यश मिळाल्यावर हा प्रश्न उभा राहतोच." ती विचारात पडली.
"म्हणजे?"
"म्हणजे पहिल्या पुस्तकाने वाचकांच्या ज्या अपेक्षा शिगेला पोचलेल्या असतात त्या दुसऱ्यामध्ये पुऱ्या करू शकू की नाही याची प्रत्येक लेखकाला भीती असते. हाच ताण इतका जास्त असतो की हातून त्या पद्धतीने लिहून होत नाही."
त्याने मान हलवली. "माझे पब्लिशर्स म्हणजे मुंबईचीच एक कंपनी आहे. मी त्यांच्याबरोबर तीन पुस्तकांचा बॉण्ड साइन केलाय. ते माझ्याकडे कधीपासून मॅन्युस्क्रिप्ट मागत आहेत पण पूर्ण लिहूनसुद्धा मी द्यायला टाळाटाळ करतोय."
"मी एकदा वाचलं तर चालेल का तुला?" तिने विचारले.
"तू वाचशील? पण मला अगदी खरा अभिप्राय हवा आहे."
"नक्कीच." त्याने विश्वासाने तिला वाचायला देणं हीच तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.
पहाटे दोन वाजत आले तेव्हा तो इच्छा नसतानाही उठला. त्याला हॉटेलवर परत जायचे होते. त्या दोघानाही माहिती होतं की त्याला रात्री थांबवायला आग्रहाची गरज नाही. पण तिला सकाळी लवकर ऑफिसला जायचे होते म्हणजे संध्याकाळी वेळेवर निघता येईल. दिवाळीमुळे आधीच बराचसा स्टाफ सुट्टीवर होता.
ती त्याला दारापर्यंत सोडायला गेली. "मग उद्या भेटू शकतो ना आपण?" त्याने तिच्या गळ्यात हात टाकत विचारले.
"ऑफ कोर्स! हा काय प्रश्न आहे!"
"म्हणजे, तुझ्या अजून काही सोशल कमिटमेंट्स नाहीत ना?" त्याने डोळा मारत विचारले.
"आssदी" ओरडत तिने त्याच्या दंडावर एक गुद्दा मारला.
क्रमशः
पहाटे सांगलाहून निघाल्यापासून खड्डेदार रस्ता मग मग दोन फ्लाईट्स त्यात एअरपोर्टवरचा वेटिंग पिरियड यांनी आदित्य अतिशय थकून गेला होता, पण उर्वीची भेट आणि तिच्याबरोबर ही सुट्टी एकत्र घालवणे हे त्या सगळ्या त्रासापेक्षा खूप जास्त आनंदाचे होते. हॉटेलमध्ये परतून बेडवर पडल्यापडल्या त्याला शांत झोप लागली.
खिडकीचे जाड पडदे बंद असल्यामुळे खोलीत पूर्ण अंधार होता त्याला जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. तो सेलफोनवर वेळ बघून ताडकन उठून बसला, सीडूला भूक लागली असेल! मग त्याला आठवले तो मुंबईत आहे आणि दिवसभर रिकामाच असेल. सीडर असता तर त्याने सकाळीच त्याला पंजे मारून, चाटून चाटून उठवलं असतं. त्याला आठवणीने हसायला आले.
त्याच्या लहानपणी बाबा कायम जंगलात असायचा. घरी फक्त रखवाली आणि बाहेरची कामे करणारा एखादा सरकारी नोकर असे आणि खूप वर्ष त्याला सांभाळायला आणि स्वयंपाकासाठी गावातलीच एक आजी यायची, तिच्या नातवंडांबरोबर खेळता खेळता तोही तिला बडी माँ म्हणायला लागला. बडी माँच्या नातवाने एकदा त्याला भटक्या कुत्र्याचे पिल्लू खेळायला म्हणून आणले ते नंतर त्याच्या घरचेच झाले. तो त्यांचा शेरा! त्याचे सगळे लहानपण शेराबरोबर मस्ती करण्यात आणि त्याला वाढवण्यात गेले. पण तो कॉलेज संपवून दिल्लीहून परत घरी येईतो शेरा म्हातारा झाला होता. एके दिवशी तो झोपला तो परत उठलाच नाही.
बाबा आणि आदित्य दोघेही पुन्हा एकटे पडले होते. त्यांना कुत्रा हवाच होता आणि त्यांच्या मित्राकडे हे बऱ्यापैकी ट्रेन केलेलं हस्की पिल्लू होतं. बाबा लगेच त्याला घेऊन आला आणि इतकं पिल्लू असतानाच लांबलचक होता म्हणून त्याचं नाव सीडर ठेवलं. बाबाचं आवडतं झाड. वर्षभरातच बाबा अचानक कॅन्सरने गेल्यानंतर सीडूच त्याची फॅमिली होता.
त्याने बेडवर बसूनच फतेला व्हिडीओ कॉल केला. दिवाळीमुळे फते दोन तीन दिवस घरीच होता. त्याच्याशी जनरल हालहवाल, गप्पा झाल्यावर त्याने सीडरची चौकशी केली. तिथे लाड करायला भरपूर माणसं, लहान मुलं असल्यामुळे सीडर खुष होता. फक्त रात्री त्याची आठवण आल्यावर विव्हळून रडत होता म्हणे. ऐकून त्याच्या घशात जरा दुखलं. त्याला स्क्रीनवर बघून सीडर आनंदाने शेपूट हलवत उड्या मारत होता. त्याला बराच वेळ बघून शेवटी त्याने कॉल कट केला.
आंघोळ वगैरे उरकून तो बाथरूमच्या बाहेर आला तोपर्यंत उर्वीचा एक मिस्ड कॉल आणि मेसेज होता.
U: Wake up sleepyhead
A: Done! Just having tea and missing you.
U: You should! ;) Very busy right now. Leaving bit early today. I'll be there at 4pm.
A: Waiting..
रात्री निघतानाचा उर्वीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याने ठरवून ठेवलेले एक काम आठवले. सहज एक दोन चौक चालत जाऊन त्याने लंच आणि त्याचे काम उरकले. हॉटेलवर येऊन परत एक डुलकी काढली तोपर्यंत उर्वीचा ती घरी पोचल्याचा मेसेज आलाच.
तो कपडे घालून बाहेर पडणार तोच फोन वाजला. तिने त्याला खाली हॉटेलच्या गेटपाशी यायला सांगितले. तो खाली गेला तेव्हा ती फुटपाथवर त्याची वाट बघत उभीच होती. त्याला समोरून येताना बघून तिने आधी ओळखलेच नाही. तो जवळ आल्यावर तिने डोळे मोठे करत आश्चर्याने आ वासला आणि गपकन तोंडावर हात ठेवला. चक्क दाढी गायब आणि गाल गुळगुळीत होते!
"तो चले?" तो तिच्या बोटांत बोटे गुंफत म्हणाला.
"आता तू हॉट बॉयफ्रेंड दिसतोयस!" तू वर जोर देत त्याच्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली.
"सो व्हॉटस् द प्लॅन?" तो इकडेतिकडे बघत म्हणाला.
"शॉपिंग!"
त्याने कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहिले.
"प्लीज प्लीज प्लीज.. मला माहिती आहे तुला बोर होईल. पण यावेळी इथे आई नाहीये आणि माझ्याबरोबर यायला आत्ता बाकी कोणी नाहीये. अना आली असती पण ती सुट्टीवर आहे. प्लीज जाऊया ना.." त्याच्या हातावरची पकड घट्ट करत ती म्हणाली.
"तुझ्यासाठी काय काय करावं लागतंय मला" पुटपुटत त्याने मान हलवली.
"थॅंक्यू सोss मच" तिने डोळे मिचकावले आणि टॅक्सीला हात केला.
दोन मॉल पुरेपूर फिरून झाल्यावर हातात पिशव्या सांभाळत दमून शेवटी ती त्याला ओढत पिझ्झा एक्सप्रेसमध्ये घेऊन गेली.
"इथले रोमानो म्हणजे थिन क्रस्ट खूप मस्त असतात. त्यातही मला पोलो फोर्झा आवडतो. स्पायसी असतो एकदम! तोच घेऊया आणि डो बॉल्सss विथ गार्लिक बटर!" एवढी शॉपिंग करूनही ती न दमता जास्तच एक्साइट झाली होती. कितीतरी दिवसांनी डाएट सोडून ती बिंज करत होती.
त्याने न बोलता मागे आरामात टेकून तिला थंब्स अप दिला. वेटरने टेबलाच्या मधोमध त्यांची ऑर्डर आणून ठेवली. तिला प्रयत्न करूनही त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवता येत नव्हती. दाढी गायब होती, त्याचे गाल अगदी मऊ आणि चमकत होते. आणि मोठा धक्का म्हणजे हसताना त्याच्या दोन्ही गालांना खळ्या पडत होत्या! दाढीतून कळलंच नव्हतं हे, आठवून तिने ओठ चावला.
"उर्वी, स्टॉप इट." तो तिच्या टक लावून बघण्याने जरा अस्वस्थ झाला पण एकीकडे त्याला हसायलाही येत होतं.
"सॉरी, कान्ट हेल्प इट! तू त्या पिझ्झापेक्षाही टेम्पटींग दिसतोयस." ती अजूनच त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. जंगली माणूस गायब होऊन तिच्यासमोर प्रिन्स चार्मिंग बसला होता. तिला तरी आता तो खूपच हँडसम वाटत होता आणि आजूबाजूला बसलेल्या बहुतेकश्या बायकांनासुद्धा, असं त्यांच्या पुन्हा पुन्हा त्याच्याकडे वळणाऱ्या नजरांवरून वाटत होतं.
"तुला मजा माहितीये," तो टिशूला हात पुसत बोलत होता. "आता तू समोर आहेस तरी माझी बोटं सारखी तुला टेक्स्ट करायला शिवशिवत असतात."
"सेम सेम!" ती हसत म्हणाली. रोज एकमेकांना सारखे मेसेज करायची इतकी सवय लागली होती की समोर असूनही काहीतरी विसरतोय असे वाटत होते.
"मग आता तरी शॉपिंग संपली ना?"
"संपलीच आहे, तुझी पुन्हा गर्दीत जायची काही सुप्त इच्छा वगैरे नाही ना?" तिने चिडवत म्हटले.
"नो वे. एका दिवसात इतके लोक बघूनच दमलो मी. हे कायमच असं असतं की आत्ताच दिवाळी म्हणून आहे?"
"कायमच. गणपतीच्या दिवसात येऊन बघ एकदा. पाय ठेवायची जागा नसते." ती हसू लपवत म्हणाली.
त्याने कपाळाला आठ्या पाडत मान हलवली आणि पुन्हा एकदा गालावरून हात फिरवला. दाढीशिवाय त्याला विचित्र उघडं उघडं वाटत होतं. काल रात्री निघताना त्याला तिचे गाल खरचटल्यासारखे लाल झालेले दिसले होते. त्याने त्याच्या खरखरीत दाढीला हात लावून पाहिला आणि कारण कळलं. इतक्या दिवसांची दाढी स्वतः काढण्यापेक्षा तो जवळच्या सलोनमध्ये जाऊन चेहरा नीटच सफाचट करून आला होता.
त्याला इतकं अस्वस्थ वाटतंय बघून तिला हसू येत होतं.
"अजूनही तू माझ्याकडे टक लावून बघते आहेस."
"सॉरी मला कंट्रोलच होत नाहीये. तू इतका हंक आहेस हे आत्ता कळतंय." ती जीभ दाखवत म्हणाली. ती काहीतरी विनोदी बोलल्यासारखा तो हसला पण ती खरं बोलत होती. तिच्या फ्रेंड्सना तो भेटेल तेव्हा सगळ्या मुली याला बघताच नक्की याच्या गळ्यात पडतील. इतक्या फ्लर्ट करणाऱ्या मुलींना कसं थांबवावं विचार करूनच तिचा चेहरा पडला.
"काय झालं उर्वी?" त्याने कार्ड स्वाईप करायला देत म्हटले. ती शांतच होती.
उठून दाराबाहेर पडल्यावर त्याने तिचा हात हातात घेऊन दाबला. किती पटकन त्याला तिचा बदललेला मूड समजला या विचाराने तिला आश्चर्य वाटलं.
"मी मुव्हीला गेले तेव्हा तुला कसं वाटलं असेल ते मला आत्ता जाणवलं."
"कशावरून?" त्याने थांबून तिच्याकडे बघत विचारले.
"मी अशी कल्पना केली की मी तुला माझ्या फ्रेंड्सना भेटायला घेऊन गेले तर मुली तुझ्याशी किती फ्लर्ट करतील. तेव्हढ्यानेच मला इतकं वाईट वाटलं. पण तू फक्त माझा आहेस ओके?"
त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला आणि तिच्या हातावरची पकड घट्ट झाली. "मला आता कोणीही अट्रॅक्ट करू शकत नाही. नो वन!"
एव्हाना ते तिच्या बिल्डिंगपर्यंत पोचले होते. तिच्या बॅग्ज त्याने तिच्या हातात दिल्या. "उद्या तुला त्या प्रोग्रॅमसाठी पहाटे लवकर उठायचं आहे. मी वर आलो तर उगीच खूप वेळ जाईल. त्यापेक्षा तू रियाज कर, मी हॉटेलवर जातो."
"तू वर आला असतास तर मला जास्त आवडलं असतं. एनिवे मी रियाज करते. उद्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये प्रोग्रॅम आहे आणि तू येणार आहेस. दिवाळी पहाट आहे, शार्प सहाला सुरू होईल." फायनली तिने त्याच्या गालावर हात ठेवत सांगितले.
"नक्की." एका हाताने तिला जवळ घेत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकले.
क्रमशः
पहाटे पाच वाजताच उठून तो आंघोळीला गेला. आरशात बघून डोके पुसता पुसता त्याला लहानपण आठवत होते. बाबा गेल्यापासून तो पहाटे उठणे आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान विसरूनच गेला होता, तेच कशाला, दिवाळीच विसरून गेला होता. एरवी फटाके नसायचे पण तो आंघोळीला गेल्यावर बाबा एक सुतळी बॉंब नक्की फोडायचा. माझा आळशी मुलगा शेवटी आंघोळीला गेssला हे जगाला कळण्यासाठी! हे त्याचं नेहमीचं कारण असायचं आणि तो आंघोळ करून आल्यावर बाबा हे हमखास बोलून दाखवायचा. आई असेपर्यंत त्याला केसांना तेल आणि अंगाला सायीत कालवलेलं सुवासिक उटणं पाठ दुखेपर्यंत रगडून हिमाचलच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत गरमागरम पाण्याने आंघोळ घालायची आणि मग मोठया, मऊमऊ, उबदार टॉवेलमध्ये गुंडाळून घरात न्यायची ते एकदम डोक्यात चमकून गेलं. अचानक एकटं करून टाकणारे ते विचार त्याने डोकं हलवून बाजूला केले.
मुंबईच्या दमट गारव्यातून, हो त्याला थंडी म्हणूच शकत नाही, चालत तो हॉलमध्ये जाऊन बसला. अगदी पुढे नको म्हणून स्टेज व्यवस्थित दिसणारी तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यातील खुर्ची त्याने पकडली. बरोबर सहाच्या ठोक्याला कार्यक्रम सुरू झाला. सगळीकडे काळोख करून स्टेजवर स्पॉटलाईट होता. एक साधारण पन्नाशीच्या काकू उत्साहाने सूत्रसंचालन करत होत्या. स्टेजवर बाकी लोक मागे अंधारात बसलेले दिसत होते. सुरुवातीला भक्तिगीते, काही दिवाळीची गाणी काही शास्त्रीय संगीत गाऊन झाल्यावर शेवटी मराठी - हिंदी भावगीते आणि फिल्मी गाणी सुरू झाली. कार्यक्रम छानच होता पण त्याचे डोळे आणि कान उर्वीसाठी आसुसले होते. मध्येच एखाद दोन गाण्यांच्या कोरसमध्ये त्याने तिचा आवाज ओळखला होता पण कोरस गाणारे अंधारात असल्यामुळे कोणीच ओळखू येत नव्हते.
कार्यक्रम संपत आला तरी त्याला उर्वी दिसलीच नव्हती. आता शेवटचा परफॉर्मन्स होईल म्हणून काकूंनी घोषणा केली आणि उर्वीचे नाव पुकारले.
मिनिटभर सगळीकडे अंधार झाला, स्टेजवर मधोमध स्पॉटलाईट पडला. उर्वी हातात बासरी धरून एका उंचश्या स्टुलावर माईकसमोर बसली होती. फोकसमुळे मोकळे सोडलेले तिचे ओलसर मऊ कुरळे केस चमकत होते. कपाळाच्या दोन्ही बाजूनी दोनच बटा मागे घेऊन तिने क्लिप लावली होती. थोडासा मेकअप केलाच होता पण आनंदाने तिचा चेहरा दुप्पट चमकत होता. तिने फिक्या आकाशी रंगाचा, गळ्याजवळ बारीक सोनेरी वेलबुट्टी, बारीक सोनेरी काठ नि खूप चुण्या असलेला टिशूसारखा नाजूक स्लीव्हलेस अनारकली घातला होता. कानातली मोत्याची चांदबाली सोडून बाकी काही दागिने वगैरे घातले नव्हते. मागच्या तबला आणि कॅसिओवाल्याशी काहीतरी बोलली आणि नंतर बासरी तोंडाजवळ धरत तिने डोळे मिटले. तल्लीन होऊन तिने बासरीत फुंकर मारली आणि तिच्या बासरीच्या सुरांनी त्या बंद खोलीचे सगळे अवकाश व्यापून टाकले.
तुम मिले, दिल खिले
और जीनेको क्या चाहीए..
त्याच्या चेहराभर एक मोठं हसू पसरलं. तिचा आनंद तिच्या वाजवण्यात झळकत होता. समोर उमटणारे इतके सुंदर बासरीचे सूर तो पहिल्यांदा अनुभवत होता. हे गाणं त्याच्यासाठीच आहे हे माहिती असल्यामुळे सकाळपासून एकटेपणाने थंड पडलेल्या त्याच्या हृदयात खोल कुठेतरी ऊब जाणवायला लागली आणि ती वाढतच होती. त्याचे डोळे बासरीवरच्या तिच्या लांब निमुळत्या बोटांवर आणि गुलाबी ओठांवर खिळून राहिले होते.
गाणे संपल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात ती उठून उभी राहिली आणि आभार, नमस्कार करून मागे सगळ्या टीमबरोबर जाऊन उभी राहिली. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर लोकांच्या गराड्यातून वाट काढत ती त्याच्यापर्यंत पोहोचली. तिने कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच स्टेजच्या पडद्याआडून त्याला येऊन बसलेले पाहिले होते. तो शेजारच्या माणसाशी हसून काहीतरी बोलत होता. कालच तिच्या पसंतीने घेतलेला चायनीज कॉलरचा, बाह्या फोल्ड केलेला पांढराशुभ्र शर्ट आणि ग्रे चिनोजमध्ये तो नेहमीपेक्षा वेगळाच भासत होता. केस नीट विंचरलेले होते आणि तिच्याकडे असलेल्या गालावरची खोल खळी दिसत होती. ती डोळे भरून त्याला बघत असतानाच त्याची नजर इकडेतिकडे तिला शोधताना बघून तिला फारच मजा आली होती.
"तुझा परफॉर्मन्स द बेस्ट होता. इतकी सुंदर लाईव्ह बासरी मी अजूनपर्यंत कधी ऐकली नव्हती." तिचे हात हातात घेऊन प्रेमाने तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
'लव्ह यू' ती फक्त ओठ हलवून म्हणाली. "इथे अजून काही करता येणार नाही ना" म्हणत ती हसली. "तू वर जाऊन बसशील का? इथे सगळ्यांना विश करून येतेच मी पटकन." त्याच्या हातात किल्ली देत ती म्हणाली.
"लवकर ये." म्हणून तो वर निघून गेला. वर जाऊन तिने सजवलेलं घर तो नीट न्याहाळत होता. प्रत्येक गोष्टीत तिचा काही ना काही क्रिएटिव्ह हात फिरलेला होताच. अगदी तलम पांढऱ्या पडदयांना खाली लावलेल्या रंगीबेरंगी पॉमपॉम बॉर्डरपासून ते पुस्तकांच्या पानांमधून बोट वर केलेल्या कार्टूनच्या बुकमार्क्सपर्यंत. टेरेसमध्ये तिने पांढऱ्यावर चंदेरी नक्षी असलेली फोल्डिंगची चांदणी बांधली होती.
त्याने किचनमध्ये जाऊन गॅसवर चहासाठी किटली ठेवली. चहा उकळेपर्यंत डोअरबेल वाजलीच. त्याने जाऊन दार उघडताच तिने हातातली पिशवी आणि गळ्यातली ओढणी सोफ्यावर ठेऊन त्याच्या गळ्यात हात टाकत मिठी मारली. "आज तू इथे माझ्या बरोबर आहेस म्हणून मला खूप खूप बरं वाटतंय." ती त्याच्या कानात कुजबुजली. "हेच खाली करता येत नव्हतं ना!" म्हणत तिने पिशवीतून तिला मिळालेले काचेचे स्मरणचिन्ह काढून त्याला दाखवले. "हा उपमा आणि दिवाळी फराळ सोसायटीकडून" म्हणत खाण्याचे बॉक्सेस काढले. तिने किचनमध्ये जाऊन दोन ताटल्यांमध्ये उपमा आणि फराळातले चिवडा, चकली आणि करंजी ठेवली. "उर्वी, तू आत्ता कंदील नाही केलास का?" त्याने पाण्याचा जग उचलत विचारले.
"अरे, ऑफिस, तू, बासरीची प्रॅक्टिस ह्यातून वेळच नाही झाला. खूपच गडबड होती म्हणून शेवटी ही चांदणी काल ऑफिसमधून येता येता घेतली." म्हणत तिने त्याची डिश त्याच्या हातात दिली.
"ओह असा मराठी फराळ मी लहानपणीच खाल्लाय, आईने केलेला." चुकून आईचा उल्लेख होताच तो गप्प झाला. "ही ओल्या नारळाची आहे?" त्याने करंजी उचलत विचारले.
"अम्म नाही बहुतेक." ती करंजीचा तुकडा मोडत म्हणाली.
"मग नको मला" म्हणून त्याने करंजी काढून ठेवली आणि मोतीचूराचा लाडू उचलला.
"तुला काय माहिती रे ओल्या नारळाची करंजी?" तिने आ करून त्याच्याकडे बघत हसून विचारले.
"अरे, मला खूप आवडतात. हिमाचलमध्ये नारळ खूप मुश्किलीने मिळतात. बाबा खास माझ्यासाठी दिवाळीआधी कुठूनतरी नारळ पैदा करायचा. त्याने बडी माँना रुचिरा की कुठल्यातरी पुस्तकातून करंजी करायला शिकवली होती. बाबा नारळ फोडून, खवून द्यायचा आणि पुढे सगळं बडी माँ करायची."
"आणि तू काय करायचास?" तिने हसत विचारले.
"मी? मी खायचो!" त्याने लाडू भरलेल्या तोंडाने हसत हसत उत्तर दिले.
खाऊन झाल्यावर तिने आत जाऊन चहा गरम केला. त्याच्यासमोर चहाचा कप ठेवताना तिला अचानक आठवलं.
"आदी, तू मला या किटलीची स्टोरी अजून नाही सांगितलीस हं.."
"हो ते राहूनच गेलं. स्टोरी विशेष काही नाही. ती किटली माझ्या जन्माच्या आधीपासून होतीच घरी. पण गोष्ट अशी आहे. लहानपणी बाबा फक्त नाश्त्यापुरता घरी असायचा मग दिवसभर फॉरेस्टमध्ये आणि रात्री बहुतेकदा मी झोपल्यावरच यायचा त्यामुळे फक्त नाश्ता करताना आम्ही एकत्र असायचो. बाबा रोज त्या किटलीत आमच्या दोघांचा चहा करायचा. त्याला फार मिठ्याबिठ्या मारून प्रेम दाखवता यायचं नाही पण ही त्याची पद्धत होती. माझ्यासाठी रोज तो प्रेमाने चहा आणि काहीतरी ऑम्लेट वगैरे नाश्ता बनवत असे. त्यामुळे मी त्या किटलीशी फार अटॅच्ड होतो."
"पण बाबा गेल्यानंतर त्याची खूप आठवण येते म्हणून मी ती किटली वापरणे बंद करून बाजूला ठेऊन दिली होती. पण तू येऊन स्वतःहून केलेली पहिली गोष्ट म्हणजे त्या किटलीत चहा! तोही बाहेरच्या बर्फाचा. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की तू बाकी शहरी मुलींसारखी नाहीस. किती पटकन अडॅप्ट केलंस तू स्वतःला, कुठलाही ड्रामा न करता, इतक्या साधेपणी. केबिनमध्ये आल्या आल्या तू माझ्या हातात चहाचा कप दिलास. बाबा गेल्यापासून मला त्या किटलीत कुणीही चहा करून दिला नव्हता. तेव्हापासून मला आतून तुझ्याबद्दल काहीतरी ओढ वाटायला लागली. तू परत गेल्यावर वाटलं मी तर ही किटली वापरणार नाही, पण ती तुला देऊन मला बरं वाटेल. म्हणून पॅक करून तुला पाठवून दिली. तेव्हा तर आपण प्रेमातही नव्हतो पडलो तरीही मला ती किटली फक्त तुलाच द्यावीशी वाटली." जवळ सरकून तिच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणाला.
ती त्याच्या छातीवर डोके टेकून वर त्याच्या डोळ्यात बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
क्रमशः
तुम मिले, दिल खिले बासरीवर इथे ऐकता येईल. मला हे फार आवडलं होतं.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी उर्वीच्या आईबाबांच्या फोनने सुरुवात झाली आणि कॉल्सची रीघच लागली. तो सोफ्यावरून अचानक उठू लागल्यामुळे उर्वीने फोनवर हात ठेवून त्याला इशाऱ्यानेच काय झालं? अशी खूण केली.
"कालपासून तुझी खूप दगदग झालीय. आज आराम कर. टुडेज लंच इज ऑन मी!" म्हणून त्याने तिच्या हातावर थोपटले आणि किचनमध्ये गेला.
"थोड्या वेळात मी येते मदतीला.." ती फोनवर हात ठेवून ओरडून म्हणाली.
त्याने आत जाऊन फ्रिजशेजारी अडकवलेला तिचा एप्रन उचलला, त्याच्यावर लिहिलेलं Caution: Extremely Hot वाचून तो गालात हसला. एप्रन घालून त्याने दाल तडक्यासाठी डाळ भिजत ठेवली. गव्हाचं पीठ शोधून कणीक मळायला घेतली. बाहेरून उर्वीच्या उत्साहात बोलण्याचा आवाज येत होता.
तिची तिच्या आईबाबा आणि नातेवाईकांशी जी अटॅचमेण्ट होती ती त्याने कधीच अनुभवली नव्हती. त्याचे बाबाच फक्त त्याचे होते. उर्वीने लगेच आईची आठवण करून दिली असती. पण तो लहानपणापासून आईविना राहिला होता आणि आता भेटून तिच्याशी बोलायला आपल्याकडे काही शिल्लक असेल असे त्याला वाटत नव्हते. काही लांबचे नातेवाईक होते पण हिमाचलमधल्या जंगलात राहिल्यामुळे त्यांच्याशी फार काही संबंध राहिला नव्हता.
उर्वीला तिचे आईबाबा, नातेवाईक, त्यांच्या आठवणी, किस्से सांगताना ऐकून त्याला छान वाटत होतं. तिच्यासाठी ही सगळी नाती किती खोलवर रुजलेली, महत्वाची आहेत हे बघून त्याला आनंद होताच पण एकीकडे तो थोडासा जेलसही होत होता. तिला जितकं अधिक ओळखेल तितकी जास्त तो तिची काळजी करायला लागला होता. कदाचित हे प्रमाणाबाहेर चालले आहे, हे दोघांच्याही भल्याचे नाहीये. हे विचार तो टाळायचा प्रयत्न करूनही पुनः पुन्हा त्याच्या डोक्यात येत होते.
निदान हे दिवाळीचे चार पाच दिवस एन्जॉय करू, एकमेकांना वेळ देऊ मग पुढचं ठरवू असा विचार करत त्याने ते विचार बाजूला लोटले. "हुश्श संपले कॉल्स." म्हणत ती दारातून आली. आतापर्यंत तिने ड्रेस बदलून नेहमीचा पिंक टॅन्क टॉप आणि शॉर्टस घातल्या होत्या. मेकअप पण पुसून झाला होता. त्याचे हात कणकेत असतानाच अलगद त्याच्या मागे उभी रहात तिने "आदी? तू काय करतोयस?" विचारत त्याचा एप्रन काढून त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या अटॅकने तो गडबडला. हसत हसत बरबटलेले हात वर धरत "स्टॉप इट, स्टॉप इट उर्वी" म्हणून ओरडत तो तिच्याकडे वळला. तिने पटकन त्याला मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोके टेकले. तिच्या कपाळावर ओठ टेकत त्याने तिच्या केसांमध्ये खोल श्वास घेतला. हे स्वप्न असेल तर त्यातून त्याला कधीच जाग यायला नको होती. तिच्या अंगाला नाजूक गुलाबांचा आणि चमकत्या उन्हाचा गंध होता. त्याचे बर्फाळ हृदय त्या उष्णतेत त्याच्या नकळत विरघळत होते.
"मी तुझ्यासाठी लंच तयार करतो आहे. रिमेम्बर?" तो उगीचच म्हणाला.
"थॅंक्यू सो मच आदी.. तुझ्याशिवाय मी काय करणार होते.." ती मिठी अजूनच घट्ट करत त्याच्या कानात कुजबुजली.
त्याला शोधून काढल्याबद्दल त्यानेच तिचे आभार मानायला हवेत, त्याच्या डोक्यात विचार आला. क्षणात त्याचा घसा दाटून आला आणि त्याला बोलवेनासे झाले. त्याने पिठाच्या हातांनीच तिचे गाल ओंजळीत धरले आणि तिला खोलवर किस केले. ते दोघेही एकमेकांसाठी इतके भुकेले होते की त्यांना श्वास घेण्याचीही फुरसत नव्हती. त्याच्यासाठी ह्या एका मुलीचा स्पर्श, तिची चव, तिची गरज श्वासापेक्षाही जास्त झाली होती. एका क्षणात भविष्याबद्दलच्या त्याच्या चिंता आणि काळज्या वाफ होऊन उडून गेल्या. त्याच्यासाठी फक्त तिचे त्याच्या बरोबर असणे महत्वाचे होते.
थोडीशी मागे होत तिने वर बघत त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि त्याच्या शर्टचे एकेक बटण काढू लागली. "उर्वी, स्टॉप!" तो पुटपुटला. तिने मान हलवत अजून एक बटण काढले. "उर्वी! नको!" त्याची कानशिलं तापली होती. त्याच्या डोळ्यात गुंतलेले तिचे डोळे गडद झाले होते.
"ह्याचा बदला घेतला जाईल" तो जवळ जात तिच्या डोक्यावर हनुवटी टेकत म्हणाला.
"घे!" तिने पटकन शेवटचे बटण काढले आणि बोटाने त्याच्या रेखीव ऍब्जच्या रेषा ट्रेस करत म्हणाली.
त्याने रिऍक्ट करेपर्यंत कॉलर मुठीत धरून तिने त्याचा शर्ट ओढून काढला आणि हॉलमध्ये पळून गेली. अर्धवट कणीक ओट्यावर तशीच टाकून तो लिटरली हात धुवून तिच्या मागे लागला.
दंगा करत ते तिच्या बेडरूमपर्यंत पोचले. त्यांचे बरेचसे कपडे एव्हाना जमिनीवर होते. एकमेकांच्या स्पर्श आणि गंधाच्या नशेत चूर होत त्याने तिला उचलून बेडवर टाकले आणि त्याचे स्वतःवरचे उरलेसुरले नियंत्रण तिच्या शरीराच्या उष्णतेत वितळून गेले. आतापर्यंत अज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या शरीरांनी एकमेकांना सांगून टाकल्या आणि त्या गोड थकव्यात त्यांना कधीतरी झोप लागली.
बऱ्याच वेळाने त्याला जाग आली तेव्हा ती त्याच्या गालावर नाक टेकून त्याच्या रेशमी केसांतून बोटं फिरवत होती. तो डोळे उघडून कुशीवर वळत कपाळ तिच्या कपाळाला टेकवून हसला. ती अजून गुंगीतच होती. त्याने पाठीवर हात टाकून तिला जवळ ओढले आणि तिच्या मिठीत तसाच पडून राहिला. थोड्या वेळाने तिने पूर्ण जागी होत त्याच्या गालावर हात ठेवून चमकत्या मधाळ डोळ्यांनी हसत त्याच्या डोळ्यात बघितले तोच बाहेर सोफ्यावर तिचा मोबाईल मोठ्याने खणखणला. तिने कपाळावर आठ्या घालून तोंड वाकडं केलं, स्वतःभोवती एक दोहर गुंडाळली आणि उठून बाहेर गेली.
तिचा आवाज वाढल्याचं ऐकून तो ट्रावझर्स घालून बाहेर आला. त्याचा शर्ट अजूनही सोफ्यावर पडलेला होता. त्याने शर्ट उचलून अंगात अडकवला. फोनवर हात ठेवून ती 'अना' म्हणून पुटपुटली. तो मान हलवून तिला प्रायव्हसी देण्यासाठी टेरेसमध्ये बीन बॅगवर पाय लांबवून बसला.
पाचेक मिनिटात ती कपडे घालून टेरेसमध्ये आलीच. ती येऊन त्याच्या गळ्यात हात टाकून मांडीवर बसली. तिचं तोंड पडलेलं होतं.
"व्हॉट्स अप स्वीटहार्ट?" त्याने तिचे केस कानामागे करत गालाला नाक घासत विचारले.
"आदीss" ती अगदीच निराश सुरात म्हणाली. त्याने तिच्याकडे भुवया उंचावून बघितले.
"अनाचं तिच्या पेरेन्ट्सबरोबर मोठं भांडण झालंय आणि ती रात्री इथे राहायला येतेय. ती घरातून कपडे घेऊन बाहेर पडलीय." ती जरा वैतागून म्हणाली. "दिवाळीमुळे ती दुसऱ्या कुणाकडे जाऊ शकत नाही. तिला वाटतंय मी घरी एकटीच आहे."
"व्हॉट द.." म्हणता म्हणता तो थांबला. "तिला यायला किती वेळ लागेल?"
"तासाभरात येईल."
"लेट मी किस यू सम मोर.." म्हणून त्याने पुन्हा तिच्या अजून हुळहुळणाऱ्या ओठांचा ताबा घेतला.
---
तो गेल्यापासून ती पटापट घर आवरत होती. अनाच्या शरलॉकींगला तोंड देण्याची तिची अजिबात मनस्थिती नव्हती. अजून काही प्रश्न येऊ नयेत म्हणून तिने कॉलरवाला पूर्ण बाह्यांचा मोठा पजामा घातला. अनाने आल्या आल्या आईवडील आणि तिच्या भांडणाचा वृत्तांत वर्णन केला. अर्थात नेहमीप्रमाणे ते लग्नासाठी मागे लागणे आणि हिची टाळाटाळ हाच विषय होता. अनाला अरेंज मॅरेज करायचे नव्हते आणि सस्ता, टिकावू बॉयफ्रेंड काही मिळत नव्हता.
तिचं रडगाणं ऐकून, मग फ्रीजमधलं उरलं सुरलं जेवून त्या टीव्हीसमोर बसल्या. अना भलामोठा कफ्तान घालून, आईस्क्रीमचे बकाणे भरत रेचल आणि चॅन्डलरला चीजकेकसाठी भांडताना मन लावून बघत होती. बाहेरून फटाक्यांचे, उडणाऱ्या रॉकेट्सचे धडाम धुडूम आवाज येत होते. तेवढ्यात मोबाईल पिंग झाला. फोन बघताच तिचे डोळे चमकले. अनाकडे एक नजर टाकून ती हळूच फोन घेऊन टेरेसमधल्या झुल्यावर जाऊन बसली.
तिने आदित्यचा टेक्स्ट उघडला.
A: 'फिर वही जागना है दिन की तरह
रात है और जैसे रात नहीं'
ओह, शायराना मूड! तिने ओठ चावत काय रिप्लाय करावा विचार केला.
U: 'सहमी है शाम, जागी हुई रात इन दिनों
कितने ख़राब हो गए हालात इन दिनों'
तिचा टेक्स्ट सेंड झाल्यापासून दोन सेकंदात फोन पुन्हा वाजला.
A: 'रात आ कर गुज़र भी जाती है
इक हमारी सहर नहीं होती'
आता तिने खूप आठवून रिप्लाय लिहिला.
U: 'सिर्फ़ हल्की सी बेक़रारी है
आज की रात दिल पे भारी है
मेरे आँसू नहीं हैं लावारिस
इक तबस्सुम से रिश्तेदारी है'
परत लगेच त्याचा टेक्स्ट हजर होता.
A: 'ऐ शमा तुझ पे रात ये भारी है जिस तरह
मैंने तमाम उम्र गुज़ारी है इस तरह'
तिने निःश्वास सोडला. तिच्याकडे उत्तर नव्हते. तिने तीन फ्लाईंग किस देणारे स्मायली टाईप केले आणि सेंडचे बटण दाबले.
क्रमशः
मध्यरात्र होऊन गेली तरी आदित्य टक्क उघड्या डोळ्यांनी काळोखात वर धुरकट पांढऱ्या झुंबराकडे पहात बेडवर पडला होता. गेल्या दोन दिवसांत त्याने दाबून ठेवलेले नकारात्मक विचार आता एकटेपणात दुथडी भरून वर येत होते. काहीच तासांपूर्वी अनुभवलेल्या कोवळ्या, नवथर भावना आणि आणि त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच यांची सांगड काही बसत नव्हती. एकीकडे त्याचे तिच्यावरचे प्रेम उतू जात होते, तेव्हाच दुसरे मन पाऊल मागे घ्यायला सांगत होते. त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालेला बंध तात्पुरता होता.
त्यांच्या नशिबात एकत्र असण्याचा काळ मोजकाच असणार आहे हे त्याच्या मनाने कधीच ठरवले होते. तो विचार करत होता, आज नसले तरी भविष्यात एके दिवशी ते दोघेही ह्या गोड स्वप्नातून जागे होऊन वास्तवात येणार होते. त्याला आशा होती की त्यांनी एकत्र घालवलेले हे आनंदाचे क्षण कायम टिकून रहातील पण तेव्हाच दुसरे मन कबूल करत होते की कदाचित हे होऊही शकणार नाही.
माणसे बदलतात, आज बरोबर, अगदी बिनचूक वाटणाऱ्या गोष्टी उद्या पूर्णपणे चुकीच्या वाटू शकतात. एखाद्या दिवशी उर्वीला जाग येईल आणि त्यांच्यातील फरक जाणवेल. अजूनपर्यंत दोघांनीही त्यांच्या एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे असण्याकडे दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा ती ह्या स्वप्नातून जमिनीवर येईल तेव्हा त्याला स्वतःपासून तोडून टाकेल, त्याचे मन हे करायला धजावले नाही तरीही. त्याने हे खूपदा पाहिले होते. त्याची स्वतःची आई त्याला आणि बाबाला सोडून गेलीच होती की. एक स्त्री आणि पुरुष जे एकत्र राहूच शकत नाहीत, ते सगळ्या धोक्याच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून एकत्र आले तर काय घडू शकते याचे त्याचे आई-बाबा उत्तम उदाहरण होते.
पण या दोन तीन दिवसांत उर्वी आणि तो नकळत एकमेकांच्या इतके जास्त जवळ आले होते की पुढे काय करावे हेच त्याला सुचत नव्हते. तो तिचे चार पाच दिवस मजेत जावेत म्हणून आला होता पण तिला सोडून, तिच्यापासून लांब जायच्या विचारांनी स्वतः अजून अजून दुःखी होत होता. विचारांच्या क्रूर लाटा त्याच्यावर आदळत असतानाच कधीतरी त्याला झोप लागली.
सकाळी आठ वाजता twisted nerve रिंग जोरात वाजल्यामुळे त्याला जाग आली. शिट! तो रात्री फोन व्हायब्रेट मोडवर टाकायला विसरला होता. पण स्क्रीनवर उर्वीचे नाव बघून आपोआप त्याचा मूड सुधारला.
"हॅलो" डोळे चोळत, झोपाळू घोगऱ्या आवाजात त्याने फोन उचलला.
"आदीss उठ, उठ! अना घरी गेली आत्ताच." ती उत्साहाने फसफसली होती.
"काय? कशी काय?" तो उठून हेडबोर्डला टेकत म्हणाला.
"तिच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी तिला जरा शांत करून बोलावलं घरी. मीसुद्धा रात्री थोडं लेक्चर दिलं होतं त्याचा थोडासा परिणाम असेल." ती घाईघाईत सांगून टाकत होती.
रात्रीची हुरहूर दडपून टाकत तिच्या आवाजाने त्याचा चेहरा थोडासा फुलला.
"कूल! मी एक दोन तासात येतो. मुंबईत आल्यापासून रनिंग थांबल्यामुळे अंग जड झालंय. इथे जिम आहे तर थोडं रनिंग करून येतो. आपण शूज घेतलेच आहेत परवा, जरा वापर होईल त्यांचा"
"ओके, लवकर ये. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे!"
"उं हूं, आलोच!" त्याने फोन व्हायब्रेटवर करून ठेवला.
हॉटेलच्या जिममध्ये जाऊन ट्रेडमिलवर अर्धा तास पळून झाल्यावर त्याचे डोके आणि शरीर बरेच हलके झाले. परत येऊन आंघोळ उरकून त्याने बॅगमधून तिच्यासाठी आणलेले गिफ्ट बाहेर काढले. स्वतःशीच बारीकशी शिट्टी वाजवत त्याने नेहमीची ब्लॅक जीन्स आणि ऑलिव्ह टीशर्ट चढवला. न विसरता गिफ्ट बॅग हातात घेतली. एव्हाना उगवलेल्या स्टबलमुळे त्याचे गाल पुन्हा खरखरीत झाले होते त्यांना हात लावून तो स्वतःशीच 'नो वे!' म्हणाला आणि रूम लॉक करून बाहेर पडला.
शेवटची करंजी नागमोडी कातण्याने कातून तिने गरम तेलात सोडली आणि डोअरबेल वाजली. पटकन नॅपकीनला हात पुसत ती बाहेर पळाली. तिने दार उघडलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठं स्माईल होतं.
"हम्म, कसलातरी मस्त वास येतोय.." एका हाताने तिच्या घामेजल्या कपाळावरच्या बटा मागे सरकवत त्याने तिथे ओठ टेकवले.
"यक! आदी.. लांब रहा, मला खूप घाम आलाय.." ती नाक मुरडत मागे सरकत म्हणाली. अजून तिच्या अंगावर नाईट सुटच होता.
"मला चालतो घाम!" म्हणत त्याने डोळा मारला आणि तिला पुन्हा जवळ ओढलं.
तिने त्याला चिकटून खोल वास घेतला. "म्म्म.. कूल वॉटर! स्वतः कलोन लावून मला सांगतो आहेस." ती हसत वर त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली.
"तो माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी लावलाय" तो डोळे मिचकवत म्हणाला. "असाच गिफ्ट मिळालेला पडून होता. तुला आवडेल म्हणून वापरतोय."
"बरं, आता पटकन टेरेसमध्ये जाऊन बस. मला तुला सरप्राईज द्यायचं आहे." त्याच्या गालाची पापी घेत ती आत पळाली. तो शूज काढून आज्ञाधारकपणे बीन बॅगवर जाऊन बसला. एव्हाना उन्हाची तीव्रता वाढू लागली होती. दहा मिनिटात तिची हाक आलीच.
सरप्राईज! त्याच्यासाठी डायनिंग टेबलाची खुर्ची ओढून धरत ती मोठ्याने म्हणाली. टेबलवर प्लेटमध्ये चार पाच करंज्या होत्या.
Wow! ओरडून तो आनंदाने खुर्चीत बसला. तिने पटकन प्लेटमधली एक करंजी त्याला भरवली. "ओल्या नारळाची!" ती हसत म्हणाली. "आधी मी तुला खाणारे" म्हणत त्याने तिला मांडीवर ओढली पण वाकून हसतहसत ती त्याच्या हाताखालून सटकली. "तू करंजीच खा, मी पटकन आंघोळ करून येते. पाणी तापलंय कधीचं." म्हणून ती बेडरूममध्ये गेली. पडत्या फळाची आज्ञा मानून त्याने त्या परफेक्ट सोनेरी करंज्यांवर ताव मारला आणि तिची वाट बघत बसला.
ती ढगळ पांढरा टीशर्ट आणि स्लॅक्स घालून डोक्यावर मोठा टॉवेल गुंडाळून बाहेर आली. ती समोर आल्याआल्या त्याने तिच्यासमोर ब्राऊन पेपरमध्ये गुंडाळून बारीकशी लाल रिबन बांधलेला बॉक्स धरला.
"मीसुद्धा तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. आय होप तुला आवडेल. पहिल्यांदाच खूप विचार करून काहीतरी गिफ्ट बनवून घेतलंय मी." गिफ्ट देताना त्याचे डोळे चमकत होते.
"ओएमजी! चक्क दिवाळी गिफ्ट?!" तिने हसत हसत बॉक्स हातात घेतला. "पण मी हे आज नाही उघडणार."
"का??" त्याचा चेहरा जरा पडला.
"कारण मी ते उद्या उघडणार आहे." ती दात दाखवत म्हणाली.
"उद्या काय स्पेशल आहे?" तो आता अजूनच कन्फ्युज झाला होता.
"कारण उद्या पाडवा आहे. आता तू ते काय असतं विचारायच्या आत मीच सांगते. कारण ह्या पाडव्याच्या दिवशी नवरे बायकांना पाडव्याचं गिफ्ट देतात. आय होप हल्ली बॉयफ्रेंड्स देत असतील. रिवाज होता है, यू नो?" तिने हसता हसता गिफ्ट टिव्हीशेजारच्या शेल्फवर ठेवले.
तो काय बावळटपणा लावलाय असं तिच्याकडे बघून मान हलवत होता.
"आदी.. लंचसाठी काहीतरी करून मग मुव्ही बघूया का?" ती डोक्यावरचा टॉवेल काढून केस पुसता पुसता म्हणाली.
"करंज्या खाऊन आता लंचएवढी भूक नाहीये पण काहीतरी लाईट खाऊ शकतो."
"मलापण भूक नाहीच्चे. सकाळी अनाबरोबर खूप हेवी ब्रेकफास्ट झालाय. एक काम करू, मुव्ही बघू आणि मधेच भूक लागली तर जंक खाऊ."
"डन, कुठली मुव्ही?" त्याने विचारले.
"ऍक्शन आणि हॉरर नको हं प्लीज.. माझ्यासाठी एखादी रॉमकॉम बघ ना."
त्याने नाक मुरडले. "रॉमकॉम? रिअली?"
"प्लीss ज" ती पापण्या फडफडत म्हणाली.
"Stop overacting!" तो खो खो हसत म्हणाला.
"बरं. बघ तुझ्यासाठी काय काय सहन करतोय मी! काय काय ऑप्शन्स आहेत?"
"50 फर्स्ट डेट्स" त्याने डोळे फिरवले.
"नॉटिंग हिल?" त्याने डोळे मिटून मान हलवली.
"हॅरी मेट सॅली!" नोप!
"मग 500 डेज ऑफ समर? हा मी रेकॉर्ड करून ठेवलाय पण पाहिला नाही अजून.
"फॉर अ चेंज, हा मी बघितलाय दिल्लीला असताना. पण बघू शकतो पुन्हा, खूप वर्ष झाली." तो म्हणाला.
"मिस्टर संतांना आवडलेला रोमॅन्स! म्हणजे भारी असणार."
"मी आवडलेला शब्द वापरला नाहीये" तो तिला चिडवत म्हणाला.
खांदे उडवून तिने पडदे बंद करून काळोख केला, टीव्ही लावला आणि एक भलामोठा प्लेन सॉल्टी चिप्सचा पॅक उघडला. त्याने फ्रीजमधून कोक काढून दोन ग्लासेस भरून आणले. ती सोफ्यावर पाय घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बसली.
मुव्ही सुरू होताना मस्ती करणारे ते बघता बघता शांत होऊन गेले. समरच्या बोटातली रिंग बघून टॉमचं उध्वस्त होणं बघताना उर्वीच्या डोळ्यातून पाणी ओघळत होतं. तो मॅड म्हणून पुटपुटला आणि तिला घट्ट मिठीत घेत तिच्या ओल्या गालावर ओठ टेकले. एन्ड क्रेडिट्स येताना त्याचे पाय सेंटर टेबलवर होते आणि ती त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन समोर बघत होती. तो डोळे मिटून डोकं मागे टेकून बसला होता. तिने हळूच मान उचलून त्याच्याकडे पाहिलं.
तो झोपलाय बघून तिने उठून टीव्ही बंद केला. पडदे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर उन्हाची तिरीप पडली. ती त्याच्या कपाळावरून नाकावर तिथून ओठांपर्यंत बोट फिरवत आली आणि त्याने पटकन तोंड उघडून बोट चावले. "ऑss आदीss" ओरडत ती त्याला चापट्या मारत सुटली. तो हसत तोंडासमोर हात धरून तिला चुकवत होता. तेवढ्यात तिचा फोन वाजला.
"कहां हो? व्हॉट्सऍप क्यू नही देख रही?" अना ओरडत होती
"बिझी हूं. क्यू, क्या हुआ?" ती शांतपणे म्हणाली.
"अपने ग्रुपपे कबसे गेटटुगेदर की डिस्कशन चल रही थी अब जाके सब फायनल हुआ है. पूरा गॅंग आज ही मिल रहा है. बटरफ्लाय हाय, पाच बजे. और तुम्हे आना है."
"एक मिनिट, पूछ कर बताती हूँ."
"किसको पूछकर? ओ, ओ ओss क्या वो ललित है साथ मे?" अनाला आता फारच इंटरेस्ट आला.
"हाँ, वही है."
तिने फोन कट करून आदित्यकडे पाहिले. "आदी, माझे फ्रेंड्स भेटतायत एका पबमध्ये, तू येशील? प्लीज."
"उर्वी, तुला माहितीये मला बोर होतं अश्या जागी.."
"प्लीssज.. माझ्यासाठी? मला फक्त सगळ्यांना दाखवायचं आहे की माझा खरंच बॉयफ्रेंड आहे. गेल्या महिन्याभरातलं माझं वागणं सगळ्यांना विचित्र वाटतंय. प्लीज चल ना, आपण लवकर निघू तिथून." तिने त्याच्या मानेत डोकं खुपसत विचारलं.
"आय कान्ट रिफ्यूज यू एनीथिंग." तो श्वास सोडत म्हणाला. ती त्याच्याकडे बघून हसली आणि तिने कॉल बॅक केला.
"अना, सुन हम दोनो आ रहे है! बी एच मतलब बीकेसीवाला ना? ओके. यप शार्प पांच बजे." ती फोन ठेऊन पुन्हा आदीच्या मिठीत घुसली.
क्रमशः
आदित्यच्या हातात हात अडकवून उर्वी बिल्डिंगमध्ये शिरली. बटरफ्लाय हायच्या दारातच आतल्या संगीत आणि वर्दळीचा आवाज घुमत होता. दारातून आत शिरताच आवाजाने त्यांचे कान बधिर झाले. अना आणि विनय आधीच टेबल अडवून बसले होते. विनय त्यांच्याच ऑफिसमधील एक पत्रकार होता आणि हल्लीच अनाबरोबर एक दोन डेटस वर गेला होता. अनाच्या लेखी त्यांची फक्त कॅज्युअल रिलेशनशिप होती. त्यांचे एकमेकांबरोबरचे वागणे बघून उर्वीलाही ते पटले होते. बाकी अजून दोन तीन कपल्स त्यांचे जुने सहकारी, मित्र मैत्रिणी वगैरे होते. एरवी शांत, सूदिंग संगीत वाजणाऱ्या जागी आज रॉक म्युझिक ऐकून तिला धक्काच बसला पण कुणाच्या तरी बर्थडे पार्टीसाठी ही रिक्वेस्ट होती म्हणे.
लाऊड म्युझिकमुळे कुणालाच बोललेलं नीट ऐकू येत नव्हते. सगळे ओरडून ओरडून एकमेकांशी बोलत होते. सगळ्यांच्या 'ललित'बरोबर ओळखी करून दिल्यावर पुरुषांनी बीअर्स आणि बायकांनी कॉकटेल्स ऑर्डर केली. थोड्या वेळाने अजून एक कपल येऊन त्यांना जॉईन झाल्यावर ड्रिंक्सचा अजून एक राऊंड झाला. आदित्य पूर्ण वेळ तिच्यासोबत होता आणि गप्पांमध्ये भागही घेत होता. एक दीड तासात त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
"आज मजा आली. खूप वर्षांनी मी पबमध्ये गेलो म्हणून असेल." फुटपाथवरून तिच्या हातात हात घालून चालताना तो म्हणाला.
"पण गर्दी आणि आवाजाने तुला बोर होत होतं, हो ना?" तिने विचारले.
"नॉट एक्झॅक्ट्ली.. पण थोडंफार तसंच." तो हसला.
एव्हाना त्यांच्यावर पुन्हा पाऊस भुरभुरायला लागला होता. पण इतक्या बारीक पावसाला न जुमानता ते भिजत हातात हात घालून तसेच चालत राहिले. रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांची प्रतिबिंबे साचलेल्या पाण्यात पडली होती. एकदम "आदी!!" म्हणत तिने त्याचा हात दाबला आणि समोर बोट दाखवले. कोपऱ्यावरच्या क्रॉसवर्डमध्ये एक अक्खी काचेची भिंत भरून 'ऑन माय ओन' च्या कॉपीजचा डिस्प्ले होता. एक मिनिट थांबून दोघेही ते दृश्य पहात राहिले. आदित्यचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.
"कसं वाटतंय हे बघून?" तिने हसत टिपिकल पत्रकारी प्रश्न विचारला.
उत्तर द्यायला त्याने थोडा वेळ घेतला. "दिल्लीमध्ये काही दुकानात पुस्तक डिस्प्लेला होतं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. हे थोडंसं.. माहीत नाही.. विअर्ड वाटतंय मला."
"पण चांगलं विअर्ड, हो ना?" तिला त्याच्यातल्या प्रतिभेचा, त्याच्या यशाचा अभिमान वाटत होता आणि त्याच्याबरोबर असल्याचाही.
तिला माहिती होतं की तो अजूनही इतक्या प्रचंड कॉपीज विकल्या गेल्याच्या धक्क्यात होता. त्याला हे कळत नव्हतं की अजिबात कुठलाही नाटकीपणा, अलंकारिक भाषा किंवा प्रसिद्धी नसताना हे पुस्तक एवढे यशस्वी कसे काय झाले. लोक त्या पुस्तकाच्या एवढे प्रेमात पडणे, त्याचे इतके फॅनक्लब्स, बेस्टसेलर लिस्टमध्ये जाणे, इतके महिने लिस्टवर रहाणे ह्या सगळ्याचा त्याला फारच धक्का बसला होता. एवढ्या यशाची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.
"हम्म तुझ्या डोक्यातले विचार कळतायत मला.." तिच्या भुवईवर पुसटसे ओठ टेकवत तो म्हणाला.
"अच्छा! तू काय मेंटलिस्ट वगैरे आहेस की काय?" ती हसत म्हणाली.
"तुला माझ्यावर अजूनही तो लेख लिहायला आवडेल. हो ना?"
ह्या गोष्टीला नकार देणे अगदीच खोटे होते पण कबूल करण्याची बरीच वाक्ये तिने मनोमन बनवून खोडली. तिच्या लॅपटॉपमध्ये अजूनही रफ ड्राफ्ट असताना तिने काहीही सांगितले तरी ती त्याच्याशी बेईमानी होती. "हा वादाचा मुद्दा आहे. मी तुझ्या विश्वासाला कधीही धक्का लागू देणार नाही. तू हो म्हटल्याशिवाय मी एक शब्दही सबमिट करणार नाही."
"फेअर इनफ." बराच वेळ शांत उभा राहिल्यावर तो म्हणाला.
टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर बघताना, तिला तिच्या मित्रमैत्रिणींचे चेहरे आठवून हसायला येत होतं. आदित्य संत त्यांच्यामध्ये येऊन, गप्पा मारून गेल्याचंही त्यांना कळलं नव्हतं. कुणाला काही संशयदेखील आला नव्हता.
"आदी, आज घरी ये ना रहायला.. ह्या अनाच्या गडबडीत आपण धड बोललोच नाही आज एकमेकांशी.." ती त्याचा हात हातात घेत म्हणाली.
"खरंच खूप कमी वेळ आहे आता आपल्याकडे.. मला परवाची फ्लाईट पण बुक करावी लागेल आज." तिचा हात घट्ट धरून तो म्हणाला. "एक काम करू, हॉटेलवर टॅक्सी थांबवून मी कपडे घेऊन येतो."
"काही गरज आहे का कपड्यांची?" ती दातांनी खालचा ओठ चावत हसली.
"उर्वी!!" त्याने तिच्याकडे डोळे मोठे करत दटावले.
"चिल! त्याला काही ऐकू जात नाही." ती पुन्हा हसत ड्रायव्हरच्या डोक्याकडे बघत म्हणाली. समोर ड्रायव्हर 'सायको सैय्या'च्या बीट्सवर जोरजोरात मान हलवत होता.
वाटेत थांबून तो कपडे एका शॉपिंग बॅगमध्ये घेऊन आला. घरी पोहोचताच कुशन घेऊन तो सोफ्यावर आडवा झाला. "आज मी पहिल्यांदा एका दिवसात इतकी गर्दी फेस केली." तो जांभई देत म्हणाला.
"आदी आता झोपू नको हं प्लीज, मी कॉफी करते."
ती किचनमधून ओरडून म्हणाली.
त्याने आत जाऊन तोंडावर पाणी मारले आणि कपडे बदलून शॉर्टस घालून बाहेर आला.
थोड्या वेळाने ती लॅपटॉप आणि कॉफी घेऊन आली. त्याने आदल्या दिवशीच त्याच्या इमेल वरून पुस्तकाचे काही सेक्शन्स डाउनलोड करून उर्वीला रिव्ह्यूसाठी दिले होते.
"रात्री अना झोपल्यावर हेच वाचत बसले होते, मी काही पॉईंट्सही काढून ठेवलेत, आपण डिस्कस करूया." ती केस वर बांधून आणि चष्मा लावून अगदी अभ्यासू मुलगी दिसत होती.
त्याने थोडे थोडे भाग वाचून दाखवत तिच्या मतांवर सिरियसली चर्चा केली. तिने काढलेल्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यावर तिचे हेच मत कायम होते की हे पुस्तक 'ऑन माय ओन' इतकेच किंवा त्याहून जास्तच माहितीपूर्ण होते आणि आता त्याच्या लिखाणाची शैलीही सुधारली होती.
"एक्स्पर्ट ओपिनियनसाठी थॅंक्यू." बसल्या बसल्या तिच्या केसांतून स्क्रंची ओढून काढत त्याने केस मोकळे केले.
"माय प्लेझर!" म्हणून तिने खोटा खोटा आदाब केला. अजून एक कॉफीचा राऊंड होऊन त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन डोळे मिटले होते तरी त्याच्या केसातून बोटे फिरवत तिची बडबड सुरूच होती. शेवटी उठून त्याने सरळ तिला उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेला.
---
"ललित यहां कब तक है?" दुपारी बारा वाजता अना फोनवर विचारत होती. उर्वीने आत नजर टाकली. आदित्य आज फायनली तिला प्रॉमिस केलेला लंच बनवत होता. त्याचे आवडते कढी चावल आणि आलू गोभी. उर्वीच्या आत्ताच पोळ्या करून झाल्या होत्या.
"परसो उसकी फ्लाईट है, लेकीन मै उसे रोकने का पूरा ट्राय करुंगी." रात्रीच त्याने मेल चेक करून झाल्यावर फ्लाईट बुक केली होती. पण तरीही काहीतरी चमत्कार होऊन तो थांबू दे अशी उर्वीची मनापासून इच्छा होती. तीन दिवसांची सुट्टी संपून उद्या तिचं ऑफिसही होतं.
"तुम्हे लगता है वो रुकेगा?" अनाने पुन्हा विचारले.
"हो सकता है." त्याच्या जाण्याच्या विचारानेच तिच्या पोटात खड्डा पडला होता. पण तो आधीच मुंबईला कंटाळला होता आणि तिचं ऑफिस असताना तो दिवसभर काय करेल हाही प्रश्नच होता.
"कल तुम लोग इतना जलदी क्यू निकले? ठिकसे इन्ट्रो भी नही करवाया." अना जराशी फुगून म्हणाली.
"कितनी भीड थी! हम बहुत देर से बाहर ही थे और बहुत थक भी गए थे तो जलदी निकल गए."
"हम्म, किसीकी ठिकसे आवाज भी नही आ रही थी. एक आयडिया है!" अना उत्साहात म्हणाली.
"क्यू ना हम लंच साथमे करे? कही बाहर चलते है, मै विनय को साथ लाती हूं तो ललीतको भी थोडी कंपनी मिल जाएगी."
"अरे यार, मैने अभी खाना बनाया है." ती घरात एकटीच असल्याचं नाटक करत म्हणाली.
"गुड! फिर हम कुछ लेकर वहां आ जाते है! तुम ललित को भी बुला लो." अना आता मागेच लागली होती.
"रुको मै कॉल बॅक करती हूं."
तिने आदित्यला विचारले, तो ठीक आहे म्हणाल्यावर तिने कॉल बॅक केला. तिला खरं तर आता त्यांच्यात दुसरं कोणी नको होतं पण अनाने बळजबरी हो म्हणायलाच लावलं.
"आदी तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही? आय मीन मी तिला फोन करून कॅन्सल करू शकते." तिने विचारले.
"इट्स ओके यार, शेवटी तुझे फ्रेंड्स आहेत. चालेल मला." तो आलू गोभीचे पातेले टेबलवर ठेवत म्हणाला.
तासाभरात अना विनयला बरोबर घेऊन आलीच. आल्या आल्या तिने हातातल्या गुलाबी जरबेरांचा गुच्छ टेबलावरच्या फुलदाणीत ठेवला आणि रसमलाईचा मोठा डबा फ्रीजमध्ये. जेवता जेवता त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर भरपूर गप्पा झाल्या. अर्थातच 'ललित'ने त्याच्याबद्दलच्या प्रश्नांना व्हेग उत्तरं दिली. अना मुलाखत घेतल्यासारखे त्याला प्रश्नांवर प्रश्न विचारत होती. एकदा तर उर्वीने वैतागून तिला शांत बसवायला तोंड उघडलेच होते पण आदित्यने टेबलखाली तिचा हात दाबून डोळ्यांनी तिला शांत केले.
जेवून टेबल आवरून झाल्यावर तो विनयबरोबर ESPN वर जुनी कुठली तरी क्रिकेट मॅच बघत बसला. त्या दोघी आत प्लेट्स धुवत होत्या. ते दोघे बाहेर जाताच लगेच अनाने तोंड उघडले.
"हू डू यू थिंक यू आर किडिंग उर्वी? ये आदित्य संत है. है ना?"
उर्वीने आवंढा गिळून काहीतरी उत्तर द्यायला तोंड उघडताच अनाने तिला गप्प केले. "डोन्ट इव्हन ट्राय!" म्हणत अना तिच्याकडे डोळे बारीक करून बघत होती.
क्रमशः
"ओके, ओकेss हाँ, आदित्यही है! ललित उसका पेट नेम है." उर्वीने कबूल करून टाकले.
"हां! यू वर फूलिंग मी!और तुम्हे लगा मै ये बिलीव्ह करूंगी." अना डोळे फिरवत म्हणाली.
"अना तुम्हे याद है, तुमने ही एक बार कहा था की आदित्य यहां मुंबईमे हमारी आँखोंके सामने होगा और किसीको पता भी नही चलेगा. गेस व्हॉट! वैसेही हुआ, किसीको पता नही चला!" ती दात दाखवत म्हणाली.
"एक्सेप्ट मी!" अना तोऱ्यात म्हणाली.
उर्वीने तिला साबणाचे हात जोडून नमस्कार केला.
अना आता थोडी गंभीर झाली होती. " उर्वी, तुम सचमे मुझे डरा रही हो. रिलेशनशिप? तुम्हे पता है ना ये वर्क नही होगा. हमने कितने लॉंग डिस्टन्स देखे है, ये सब बहुत टफ है. तुम दोनो कितने अलग हो ये तो पता चल गया होगा तुम्हे. फिर क्यू?"
"वेल, अभीतक तो हमारे बीच सबकुछ अच्छा चल रहा है." उर्वी सारवासारव करत म्हणाली. तिला आत्ता भविष्याचा विचार करून दुःखी व्हायचं नव्हतं. कशाहीसाठी ती आदित्यला सोडू शकत नव्हती.
"जैसा तुम कहो! मैने मेरा वॉर्न करने का काम कर दिया. जब तुम दोनो इतने क्लोज हो गए हो तो अभी तक तुमने आर्टिकल क्यू नही लिखा?" अना थांबतच नव्हती. "यू नो वो पब्लिश करना तुम्हारे करियर के लिए कितना important है. दिस इज युअर गोल्डन अपॉर्च्युनिटी!"
"आर्टिकल पब्लिश नही होगा." उर्वी पुसलेल्या डिशेस बाजूला ठेवत ठामपणे म्हणाली. "आय डोन्ट वॉन्ट टू डिस्कस अबाउट इट."
"लेकीन क्यू?" अनाला काही समजतच नव्हतं.
"क्यूँकी आदित्यने मुझे मना किया है." ती सरळ अनाकडे रोखून बघत म्हणाली.
"व्हॉट??" अनाचा आता स्फोट व्हायचाच बाकी होता.
"श्श्.. अना, तुम धीरे नही बोल सकती क्या?" ती बाहेर नजर टाकत हळूच म्हणाली. नशिबाने बाहेर दोघे क्रिकेटमध्ये बिझी होते.
"सॉरी. लेकीन सोचो यार.. मुझे कोई एक रीझन बताओ ना लिखनेका. बस एक रीझन!" अना आवाज बारीक करत म्हणाली.
"तुमने शायद नोटीस नही किया, बट आय एम इन लव्ह विथ हिम. क्या ये रीझन इनफ नही है?" उर्वी थोडं तिरकसपणे म्हणाली.
"लेकीन तुम उसे ठीक से जानती भी नही. हॅव सम सेन्स लडकी!" अना मान हलवत म्हणाली.
"मै जानती हूं उसे."
"सुनो, मै समझ गयी की तुम अभी उसके प्यारमे हो. ठीक है. लेकीन ये बस इन्फॅच्यूएशन है. ही सीम्स टू बी अ नाईस गाय, हँडसम भी है. लेकीन मुझे ये बताओ, क्या तुम सचमे खुदको वहां पहाडोंमे पुरी लाईफ बिताते देख सकती हो?
अनाचं हे म्हणणं बरोबर होतं, ती स्वतःला तिथे बघू शकत नव्हती पण तिला आदित्यलाही सोडायचे नव्हते.
"और तुम्हारे करियर का क्या?"
"वो मै कही से भी लिख सकती हूँ."
"यू कॅन. रिअली. तुम उतनी टॅलेंटेड हो लेकीन अभी ये गोल्डन चान्स मिस मत करो. यू विल गो प्लेसेस." अना म्हणाली.
"मै उसे धोखा नही दे सकती. मै इतनी मीन नही हूँ." उर्वी कुजबुजली.
"इतना सॅक्रीफाय मत करो यार. तुम्हे उसके बारे मे इतना कुछ पता है वो सब तुम्हे लिखना चाहीए. तुम सच मे पागल हो." अना इंसिस्ट करत होती.
उर्वीला आता हे ऐकवत नव्हतं. "स्टॉप इट अना. मैने कहा मुझे नही लिखना अँड आय मीन इट. एन्ड ऑफ स्टोरी!"
अनाने मान हलवली. "तुम ये सोचना नही चाहती बट आय थिंक ही इज युजींग यू."
"व्हॉट?! ऐसा कुछ नही है, हम दोनो इतना तो ट्रस्ट करते है एक दुसरे को. और क्या युज करेगा वो मेरा" अनाचं स्टेटमेंट इतकं विचित्र होतं की उर्वी खो खो हसायला लागली.
"तुम्हारा ट्रॅक रखने के लिए, ताकी तुम आर्टिकल पब्लिश ना करो." ती गंभीरपणे म्हणाली.
आता तिचे बोलणे उर्वीला खूपच विनोदी वाटत होते. "वो ऐसा नही है." हसू दाबत ती कशीबशी म्हणाली.
"श्योर? मेरी मानो तो ये रिलेशनशिप कही नही जा रहा. फिर भी तुमने कन्टीन्यू किया तो हार्टब्रेक के सिवा कुछ नही मिलनेवाला. डोन्ट गेट मी रॉन्ग! तुम्हारी फ्रेंड हूँ, तुम्हारे अच्छे के लिए कह रही हूं." अना काळजीने तिच्याकडे बघत म्हणाली.
"स्टॉप इट!" नकळत उर्वीचा आवाज वाढला होता. "बस हो गया, मुझे ये सब नही सूनना." उर्वीने हातातला नॅपकिन ओट्यावर फेकला.
ती अनाच्या पुढ्यातून वळली आणि दोघींची नजर एकदम दारावर पडली. हातात पाण्याची रिकामी बॉटल घेऊन आदित्य दारात उभा होता.
अनाने आश्चर्याने आणि घाबरून आ वासला. "ऊप्स, सॉरी उर्वी." म्हणून ती पटकन आदित्यशेजारून बाहेर गेली.
"विनय, चलो हमे निकलना है.." ती पटकन चपला घालता घालता म्हणाली.
"अरे लेकीन मॅच..
"वो घर जाके देखो."
ते दोघे बाहेर पडून दार बंद होईपर्यंत उर्वीने वाट बघितली. "तू यातलं किती ऐकलंस?" तिने विचारले.
तो हाताची घट्ट घडी घालून उभा होता आणि कपाळावर हळूहळू आठयांचे जाळे पसरत होते.
"जेवढं ऐकायला हवं होतं तेवढं."
"आदी, तिचं मनाला लावून घेऊ नको. ती फटकळपणे काहीही बोलते. माझ्या मनात काय आहे हे तिला अजून कळलेलं नाहीये."
"डोंट बी सो श्योर." त्याच्या ओठांची घट्ट रेषा झाली होती.
तिच्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होते.
"केबिनमध्ये माझा तुझ्याबद्दलचा ऍटीट्यूड कशाने बदलला हे तुला अजून कळलं नाहीये?"
"आदी? मला कळत नाही तू काय म्हणतो आहेस.."
"तू आलीस तेव्हा मी तुला माझ्याबद्दल कणभरही कळू देणार नव्हतो. पण तू माझ्या इतकी मागे लागलीस की तुला आपोआप माहिती मिळत गेली. तशीही तू स्मार्ट आहेसच."
"मी मुद्दाम नाही केलं.. माझा खरंच तसा हेतू नव्हता." ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. मी त्याच्या आईची बाजू घेऊन भांडले ते त्याची अजून माहिती खोदून काढायला केलं असं वाटतंय का त्याला.. किंवा त्याच्या प्रेमात ती ज्या वेगाने पडत होती ते त्याची अजून माहिती गोळा करून जगाला दाखवण्यासाठी.. तो असा विचारच कसा करू शकतो? तिच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली होती. काही बोलायला तोंडच उघडत नव्हतं.
"तुला काही कळू न द्यायचा कितीही प्रयत्न केला तरी तू माझ्यावर दहा आर्टिकल लिहू शकशील इतकी माहिती तुझ्याकडे नक्कीच जमली होती." तो पुढे बोलत होता.
ती काय ऐकते आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. "तू आता अना सारखंच बोलतो आहेस. माझा तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही बसत. तू माझ्याबरोबर फक्त खेळत होतास? तुला खरंच मनापासून काही वाटलं नाही?" तिने अविश्वासाने मान हलवली.
"वाटलं होतं. तू खूप सुंदर आहेस, तुझ्याबरोबर मी मजेत होतो. काही काळ मला खरंच वाटत होतं की आपल्यात काहीतरी विशेष बॉण्ड आहे. पण इथे, मुंबईत आल्यापासून माझं मन मला रोज थोडंथोडं खातंय. ह्या रिलेशनशिपमधून आपण काही गेन करू असं वाटत नाही, झाला तर दोघांचाही लॉसच आहे." त्याच्या चेहऱ्यावर थोडा अपराधीपणा आला होता.
"तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मी खूप शांत होतो. मी स्वतःशीच कित्येक वर्षांपूर्वी तह करून ठेवला होता. तू नसशील तेव्हाही मी शांत असेन आणि तूही. आपण चांगला वेळ घालवला, बट नाऊ इट्स टाईम टू फेस द रिअॅलिटी. ह्या नात्याला काही फ्युचर नाही हे आपण आता अॅक्सेप्ट करायला हवं. इट वॉज ऑल्वेज अबाऊट दॅट डॅम आर्टिकल." त्याच्या कपाळावरची शीर तटतटून फुगली होती.
तो खरं बोलत नाहीये, हे सगळं काय चाललंय.. तिचं डोकंच काम करत नव्हतं. "प्लीज आदित्य, इतकं ओव्हररिऍक्ट नको करू ना. अना अशीच आहे, तिला हवा तो विचार करते आणि मग तेच धरून बसते. मी तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. ट्रस्ट मी."
त्याने तिच्याकडे रोखून पाहिले. "तू ते आर्टिकल लिहायला मरतेयस. हो ना? तू स्वतःच काल कबूल केलंस. माझ्यावरच्या एका लेखामुळे तुझं करियर बनेल वगैरे."
"आय डोंट केअर अबाऊट दॅट आर्टिकल, व्हॉट आय केअर अबाऊट इज यू!" ती आवाज वाढवत म्हणाली.
"तू खोटं बोलते आहेस." त्याने घामेजल्या कपाळावरून हात फिरवला.
"अजिबात नाही."
"मी रात्री तुझ्या लॅपटॉपवर तू लिहिलेलं ते आर्टिकल बघितलंय." तो हळू पण ठाम शब्दात म्हणाला.
"काय?" तिने मान हलवली. "पण ते मी आधीच.." मग तिच्या लक्षात आलं की त्या डिलीट करायचा राहून गेलेल्या ड्राफ्टचा शॉर्टकट स्क्रीनवरच होता आणि काल आदित्यने तिकीट बुक करायला लॅपटॉप वापरला होता. त्याने नक्कीच उघडून वाचलं असणार.
"ओके, हो आहे ते आर्टिकल. पण तू त्याची डेट पाहिलीस का? मी ते केबिनमध्येच लिहिलं होतं. त्यानंतर तू मला पब्लिश करू नको सांगितलं होतं. आय हॅव केप्ट माय वर्ड."
त्याने नकारार्थी मान हलवली. "आपल्याला फॅक्टस् मान्य करायलाच हव्या. अनाचं बोलणं आपल्यासाठी वेकअप कॉल आहे. तेच तुझ्या आईला वाटतंय आणि इव्हन काही संबंध नसताना माझ्या आईलासुद्धा. आय थिंक वी आर डूम्ड फ्रॉम द स्टार्ट. 'अस' इज नॉट गोइंग टू हॅपन."
"असं नको बोलू. मी आपल्यावर गिव्ह अप नाही करू शकत. आय लव्ह यू आदी.." तिने तिचे हृदय उघडून त्याच्या पुढ्यात ठेवले होते आणि श्वास रोखून त्याच्या उत्तराची वाट बघत होती.
क्रमशः