केबिनबाहेर पडल्यावर तिने पुस्तक उलटसुलट करून, उघडून बघितले. त्यात लेखकाचा फोटो किंवा इमेल, पत्ता वगैरे काहीही छापलेच नव्हते. नशीब नाव तरी लिहू दिलं या माणसाने! मनात म्हणत ती अनाच्या क्यूबिकलसमोर थांबली. अनाचं दिसणं सोडता ती तिवारी नाही अगदी गटणेच वाटेल. तसा चौकोनी काळ्या फ्रेमचा अर्थात स्टायलिश चष्मा तीही लावतेच. बारीकसं हसत ती अनाशेजारी जाऊन तिच्या डेस्कला टेकली.
"अना, एक बात पूछनी थी.. आदित्य संत करके एक बंदा है, नाम सुना है कभी?"
"मनीssषा, विथ टू 'ई'ज अँड टू 'ए'ज" तिच्यासमोरची हिऱ्यांनी मढलेली मध्यमवयीन बाई तिला मोठ्या आवाजात सांगत होती.
"ओकेss गॉट इट" म्हणून सवयीचे खोटे हसू चेहऱ्यावर आणत उर्वीने हातातल्या नोटपॅडवर बरोबर नाव लिहून अंडरलाईन केले. टू 'ई'ज अँड टू 'ए'ज वाल्या मनीषा मेहताने आत्ताच एका चिवित्र पेंटिंगवर दोन लाख रुपये वाया घालवले होते. ठिके, चांगल्या कारणासाठी दिले पैसे, पण तिला तिचं नावपण बरोब्बर स्पेलिंगसकट उर्वीच्या लेखात छापून आणायचं होतं.