देवनागरीच्या पाऊलखुणा (१)

'मराठी भाषेची गंमत' या धाग्यावर रायगडची पोस्ट वाचून मी फार पूर्वी देवनागरीबद्दल लिहिलेलं आठवलं. मी या विषयातली तज्ज्ञ नाहीये, सहज आवड म्हणून गोळा केलेली माहीती आहे.
--
काही वर्षांपूर्वी एका कामासाठी दिल्लीला धावती भेट दिलेली. तेव्हा वेळात वेळ काढून 'नॅशनल म्युझियम' बघून घेतलं. तिथे एका मजल्यावर भारतातल्या निरनिराळ्या लिपी आणि त्यांची उत्क्रांती याचं छोटसं प्रदर्शन बघून इतकं भारावून गेल्यासारखं झालं की लगेच देवनागरी लिपीचा इतिहास शोधायला सुरवात केली. "भारतात लेखनकलेचा उगम कधी आणि कसा झाला असेल?" म्युझियममधली अक्षरं बघून सहाजिक मनात आलेला प्रश्न आणि त्या अनुशंगाने गोळा केलेली ही माहीती आणि त्यातून सापडलेला हा 'आपल्या देवनागरी लिपी'चा प्रवास.
--

लिपी म्हणजे काय? लिपी कशाला म्हणायचं?

मोल्सवर्थ मराठी- इंग्रजी शब्दकोशात लिपी या शब्दाचा अर्थ, 'writing a character', 'painting, drawing', 'smearing' असा सांगितला आहे. पाणिनीने अष्टाध्यायीत (३.२.२१) 'लिपी/लिबी' या शब्दाचा उल्लेख केला आहे परंतु लिपी म्हणजे नक्की कुठली, देवनागरी, ब्राह्मी की आणखी कुठली याचा उल्लेख मात्र केलेला नाही. साध्या शब्दात लिपीची व्याख्या करायची तर, डोक्यात्/मनात येणारे विचार लिखीत स्वरुपात मांडता येण्यासाठी ज्या चिन्हांचा वापर होतो, त्या चिन्हांना एकत्रितपणे आपण लिपी म्हणू शकतो. लिपी भाषेचा एक महत्त्वाचा पैलू. लिपी मुळे भाषा जतन करुन ठेवता येते.

एखाद्या भाषेला लेखन व्यवस्थेची/लिपीची गरज का भासावी? जगात अशाही भाषा आहेत ज्या फक्त बोलल्या जातात. या भाषांना लिपी नाही. त्या भाषा लिहिल्या जात नाहीत. फिन्नो-उग्रीक भाषाकुटुंबातल्या अनेक भाषा अगदी १९व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत फक्त बोलीभाषा होत्या. तरीही या भाषांमधे संवाद, वादविवाद, रोजचे व्यवहार सुरळीत चालू होते. भाषा आधी जन्माला आली आणि लिपी, लिहीण्याची साधनं त्यानंतर. त्यामुळे सुरवातीला संभाषणाचं साधन म्हणून भाषा फक्त बोलल्या जात. लिहीण्याची निकड फार नंतर भासू लागली. सुरवातीच्या काळात अगदी गरज म्हणून किंवा धार्मिक कारणांसाठी लेखनाचा वापर होत असे. या काळात लेखन प्रणाली विकसित होत असतांना अगदी प्राथमिक स्वरुपात चित्रांच्या रुपात कोरून किंवा खणून लिखाण केलं जाई. दगडात कोरणं जिकीरीचं. त्यामुळे आदीम काळातल्या लिपी (प्रोटो-स्क्रिप्ट्स) अगदीच साध्या स्वरुपात कोरलेल्या दिसतात. यांचा वापर महत्त्वाचे व्यवहार, मालकी हक्क , व्यापार यासारखी माहिती लिहून ठेवणे एवढाच होत असे. आता, काही प्राचीन लिपींची उदाहरणं बघूया :

पहीली प्राचीन लिपी अर्थातच, क्यूनिफॉर्म (Cuneiform). इसवी सन पूर्व ३५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमियामध्ये जन्माला आलेली ही लेखन पद्धत. मातीच्या पाट्या आणि गोळ्यांमध्ये 'स्टायलस' दाबून लिहीत असत. (हे 'स्टायलस' आपल्या फोन स्टायलस सारखे दिसत.) हिशोबाची नोंद ठेवायला सहसा या लिपीचा वापर होत असे.

त्यानंतर इजिप्शियन चित्रलिपी (Hieroglyphic) साधारणपणे इसवी सन पूर्व ३२०० वर्षांपूर्वी इजिप्तमधे रुढ झाली. यात शब्द किंवा एखादी संकल्पना चित्रचिन्हं वापरुन लिहीले जात.

जर्मेनिक लोकांनी दगडांत आणि लाकडांत कोरलेली अक्षरं, रुनिक अल्फाबेट्स (runic alphabets) च्या खुणा इसवी सनाच्या दुसर्‍या शतकापासून सापडतात. भारतात लिपी नक्की कधी अस्तित्वात आली याबाबत बरीच मतमतांतर आहेत.

या सर्व लेखन पद्धतींच्या स्वतःच्या अशा मर्यादा होत्या. अगदी सुरवातीच्या काळात लिपी विकसित होत असतांना लेखन दगडात कोरून लिहीलं जात असे. त्यामुळेच त्या काळच्या अक्षरांच्या आकारात विविधता कमी दिसते. आकार अगदी प्राथमिक, जसं की सरळ रेषा, तिरक्या रेषा, एखादा बिंदू. कोपरे अगदी टोकदार दिसतात. अक्षरं सुद्धा सहसा जाड असत. दोन अक्षरातलं अंतर समान असेलचं असं नाही. ब्राह्मी लिपीतही सुटीसुटी अक्षरं लिहिलेली दिसतात. ताडपत्र, चर्मपत्र, ताम्रपत्र, शाई, बोरु या शोधानंतर या आकारांनी कात टाकली.हातोडा, छिन्नी या अवजारांमधे काळानुसार झालेले बदल आणि पुढे बोरु, ब्रश फिरवून वर्तुळ सहजतेने काढ्ता येऊ लागलं तसं, तसं तसं लिपीमधे गोलाकर वळणं दिसू लागली. जाडजूड अक्षरं ते रेखीव गोलाकार आकार हे स्थित्यंतर अगदी टप्प्याटप्प्यांत झालं. सवय म्हणा किंवा एक औपचारिकता म्हणून जुने जाड ( ब्लॉक) आकारातली अक्षरं वाक्यांच्या सुरुवातीला लिहीली जात. त्यापुढची अक्षरं गोलाकार, लहान आकारात लिहीत. याचीच परीणती पुढे कॅपिटल अक्षरांमध्ये झाली. जर्मन भाषेतही बराच काळ प्रत्येक शब्दाचं सुरवातीचं अक्षरं कॅपिटल स्वरुपात लिहीलं जाई. काळाच्या ओघात ही पद्धत हळूहळू बंद पडली.

आजच्या घडीला जगभरात सात हजारांच्या वर भाषा बोलल्या जातात पण त्यातल्या अर्ध्याहून जरा जास्त (अंदाजे चार हजार) लिहिल्या जातात. लेखन स्वरुपातल्या भाषांमधे ज्या लिपी वापरल्या जातात त्यात बरीच विविधता आहे. बर्‍यचश्या युरोपियन भाषा लॅटीन लिपीत लिहीतात. ग्रीक भाषा लिहिण्यासाठी ग्रीक लिपी वापरली जाते, तर सिरिलिक लिपी रशियन, बल्गेरियन, सर्बियन आणि इतर स्लाव्हिक भाषांसाठी वापरली जाते. हिंदी, मराठी सारख्या भारतीय भाषा लिहिण्यासाठी प्रामुख्याने देवनागरी लिपी वापरात आहे. जर का, एखादी युरोपियन भाषा लिहिण्यासाठी देवनागरीचा वापर केला तर भाषा नीट मांडता येईलच असं नाही. तसंच अनेकदा आपण मराठी, हिंदी लिहीतांना रोमन लिपीचा वापर करतो तेव्हा अडचणी येतातच, गमतीजमती पण होतात. त्यामुळे भाषेला साजेशी लिपी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. जगभरातल्या अनेक भाषांनी एक तर लेखनासाठी आधीच वापरात असलेली लिपी जशीच्या तशी किंवा काही सुधारणा करुन वापरायला सुरवात केली. असं म्हणतात, आजवर फक्त पाच वेळा स्वतंत्रपणे लिपीचा शोध लागला आहे. अन्यथा, भाषा तयार असलेल्या, आसपासच्या भाषांमधूनच लिपी वापरतात.
इस्टोनियन भाषा जेव्हा लिखीत स्वरुपात जतन करण्यची गरज भासली तेव्हा तत्कालीन जर्मन राज्यकर्त्यांनी लॅटीन लिपीचा वापर केला. अर्थातच, काही ध्वनी जे फक्त इस्टोनियन भाषेत आहेत ते मात्र लॅटीन लिपीत पकडणं अशक्य होतं. मग त्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरवातीला, लॅटीन लिपी सुधारुन काही नविन अक्षरं जोडण्यात आली. परत, मूळ विषयाकडे वळू, या आहेत पाच प्राचीन आद्य लिपी :

१. मेसोपोटेमियन क्यूनिफॉर्म (Cuneiform)
२. प्राचीन इजिप्शियन लिपी (Egyptian hieroglyphs)
३. प्राचीन चीनी हांझी (Chinese Hanzi)
४. मेसोअमेरीकेत वापरली जाणारी चित्रलिपी
५. इस्टर्न आयलंडवरील रोंगोरोंगो (Rongorongo)

आज वापरात असलेल्या लिपींचा उगम, याच पाच लिपिंमधे कुठेना कुठे आहे असं एक मत आहे. लिपींची विभागणी सहसा पाच प्रकारात होते. थोडं या विभागणी बद्दल समजून घेऊ.

१.वर्णमाला (alphabets) - या प्रकारच्या लेखन प्रणालीत, व्यंजन आणि स्वर, या दोन्हीसाठी स्वतंत्र चिन्हं असतं. उदाहरणार्थ, युरोपियन भाषा वर्णमाला वापरुन लिहिल्या जातात. यात रोमन आणि सिरीलिक लिपीचाही समावेश होतो.

२. अबजाद (abjad) - 'अबजाद' हा शब्द अरबी शब्द 'अल-बा-जद' पासून आला आहे, ज्याचा अर्थ 'लेखन प्रणाली' (writing system) असा होतो. या प्रकातात स्वरांसाठी स्वतंत्र अक्षरं/चिन्हं नसतात. फक्त व्यंजनांसाठी अक्षरं असतात. अरबी, हिब्रू आणि उर्दू आणि पर्शियन सारख्या भाषा लिहिण्यासाठी अबजदचा वापर केला जातो. या भाषांमध्ये, आवश्यकतेनुसार स्वर सूचित करण्यासाठी डायक्रिटिकल मार्क्स किंवा इतर पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रकारातली लिपी वाचतांना संदर्भ आणि उच्चार खूप म्हत्त्वाचा ठरतो.

३. सिलेबरी (syllabary) - प्रत्येक अक्षर स्वतंत्र चिन्ह म्हणून लिहिली जाते. चिन्ह आणि ध्वनीं यामध्ये दृश्यमान संबंध दिसेलच असं नाही. सिलॅबरीत 'एक अक्षरं- एक सिलॅबल' अशी जोडी असते. सिलॅबलमधे सहसा स्वर आणि एक किंवा अधिक व्यंजनं असतात. सिलॅबरीमध्ये, प्रत्येक चिन्ह एकाच सिलॅबल दाखवतं. जपानी (हिरागाना आणि काताकाना), चेरोकी अशा भाषा लिहिण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. अक्षरं आणि लोगोग्राफी यांचा संगम म्हणजे सिलॅबरी.

४. अ‍ॅबुगिदा (abugida) - व्यंजनं आणि स्वर दोन्हीसाठी राखीव चिन्हं असतात. व्यंजन लिहितांना, व्यंजनांच्या चिन्हांमध्येच स्वर मिसळून लिहीली जातात. उदा. देवनागरी, क् + अ = क. बाराखडी लिहीतांना आपण स्वर मिसळून व्यंजनं लिहीतो. या पाय मोड्क्या 'क' खाली जे चिन्ह आहे त्याला 'हलन्त' (zero vowel) असं म्हणतात.

५. लोगोग्राफी (logography) - काही लिपी या ध्वनीऐवजी शब्द किंवा संकल्पना चिन्हांमध्ये सांकेतिक चिन्हं वापरुन लिहिल्या जातार. यात प्रत्येक चिन्ह ध्वनी किंवा अक्षराऐवजी शब्द दाखवतं. हा प्रकार, वर्णमाला आणि सिलेबिक लेखनाच्या अगदी उलटा आहे. लोगोग्राफीचं उदाहरण म्हणजे चिनी हांझी लिपी आणि इजिप्शियन हायरोग्लिफिक्स. इजिप्शियन हायरोग्लिफिक्समधे प्रत्येक चिन्ह एक शब्द किंवा संकल्पना दाखवण्यासाठी वापरतात.लोगोग्रफीचा एक तोटा म्हणजे भरपूर चिन्हांमुळे ही लिपी किचकट होते.तसंच शिकायला वेळ लागतो.

ज्या भाषांमधे कमी स्वर आहेत (जसं की, अरेबिक - तीन स्वर) अशा भाषांसाठी अबजाद योग्य आहे, तर क्लिष्ट अक्षररचनांसाठी वर्णमाला ही सर्वात जास्त अनुकूल असते. लोकोग्राफी पद्धतीत चित्रं (glyphs) थोडी गुंतागुंतीची ठरु शकतात. स्पष्ट अर्थ पोचवायचा म्हणजे चित्र अजूनच क्लिष्ट होत जातात.पण जेव्हा लेखन कला विकसित होत होती तेव्हा, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्हं तयार करण्यापेक्षा फक्त माहीती देणारं चित्र काढणं अधिक तार्कीक होतं. लेखनाचा वापर जास्तीत जास्त होऊ लागला आणि लोगोग्राफी ऐवजी साध्या अक्षरचिन्हांचा वापर वाढला.

लिपी लिहीण्याची दिशा अगदी नक्की नसे. ज्याला जसं वाटेल त्या दिशेत अक्षरं , चित्रं काढली जात. त्यामुळेच प्राचीन इजिप्त चित्रलिपी उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे , उभी, आडवी अशी वेगवेगळ्या प्रकारात लिहिलेली आढळते. अरबी, हिब्रू सारख्या लिपी मात्र नेहमीच उजवीकडून डावीकडे लिहिल्या जात. ग्रीकांनी जेव्हा 'फिनिशियन अक्षरं' आपलीशी केली, तेव्हा ती लिहीण्यासाठी 'बुस्ट्रोफेडॉन' (Boustrophedon) पद्धतीचा वापर करीत. बुस्ट्रोफेडॉन लेखनशैलीत लेखनाची दिशा प्रत्येक ओळीसह बदलते. पहिल्या ओळीत डावीकडून उजवीकडे लिहीलं तर दुसर्‍या ओळीत उजवीकडून डावीकडे. झिगझॅग पद्धतीने लिहील्यासारखी. ही शैली प्राचीन काळात ग्रीक आणि एट्रस्कॅन लिपींसह अनेक लेखन पद्धतींमध्ये वापरली जात होती. नंतर मात्र या प्रकारात बद्ल होऊन डावीकडून उजवीकडे ही पद्धत अवलंबण्यात आली. नंतरच्या काळात सर्वच युरोपीय भाषांनी हीच दिशा अवलंबली.

झाडांवर कोरुन लिहीण्याची ही एक पद्धत होती. यामुळे लेखनाची दिशा उभी आपसूकच झाली. उभं लिहील्याने झाडाची पूर्ण उंची वापरत येई. 'माया लिपी' सुरवातीला झाडांवर लिहिली गेली. नंतर अंजीराच्या झाडांच्या सालापासून बनवलेल्या कागदावर. चिनी लिपी मात्र, उभी, आडवी, खालून वर अशी कशीही लिहीली जाते. वरपासून खालपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. लिपी विकासाच्या सुरवातीच्या काळात विरामचिन्हांचा वापरही नगण्य होता. वाक्यात स्वल्प विरामाकरीता एक छोटा बिंदू वापरला जाई तर वाक्याच्या शेवटी दोन बिंदू वापरत. ग्रीक आणि लॅटिनमधली विरामचिन्हं बहुधा कवितेतील मीटर दाखवायला वापरत असत.

कागदाच्या शोधानंतर मात्र या प्रस्थापित लेखन पद्धतींना अडचणी भासू लागल्या. जलद लिखाणाची निकड वाढली, व्यापार, धर्म या अगदी मोजक्याच गोष्टींसाठी लागणारं लेखन हळूहळू वैयक्तिक संदेश,हिशोब, घरगुती कामांसाठी वापरात येऊ लागलं. चित्रपद्धत वेळकाढू आणि जास्त जागा घेणारी, तसंच समजायला, शिकायला क्लिष्ट. त्यापेक्षा अक्षरं कागदावर जास्तीत जास्त मावत आणि भरभर लिहीता येत असत. लिपींमधे बदलाचे वारे वाहू लागले. काळाच्या ओघात अनेक लिपींनी कात टाकायला सुरवात केली. पुढे छपाई यंत्राचा शोध बदलाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला. प्रमाणीकरणाची गरज वाढली. छपाईने लेखन लिपीचे प्रमाणीकरण झालं. आता ती कशीही लिहीता येत नव्हती. तसंच ग्रंथांचं मोठ्या प्रमाणात वितरण आणि जतन करण्याची गरज भासू लागली. छपाईतंत्राच्या वापराने मजकूर एकसारखा दिसू लागला त्यामुळे वाचायला, समजायला सोपा झाला. याच बदलाच्या प्रवासात आपण वापरात असलेल्या आधुनिक लिपींचा जन्म झाला.

पुढील भागः देवनागरीच्या पाऊलखुणा (२)
--
संदर्भः

१. Indian Epigraphy: A Guide to the Study of Inscriptions in Sanskrit, Prakrit, and the other Indo-Aryan Languages. Oxford University Press, Richard Salomon (1998).
२. Orthography development: Friederike Lüpke
३. Writing Systems: PETER T. DANIELS

Keywords: 

लेख: 

देवनागरीच्या पाऊलखुणा (२)

भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्‍या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे. ब्राह्मी लिपीत उत्तर सेमिटिक (North Semitic)१ लिपीशी काहीसं साम्य आहे. यावरुन असाही एक प्रवाद आहे की, इसवी सन पूर्व चौथ्या शतकात मेसापोटेमियन व्यापारी भारतात आले तेव्हा त्यांची लिपी सोबत घेऊन आले. याच लिपीचा पुढे विकास होऊन ब्राह्मी लिपी घडली. यावरुन लेखन कलेचा प्रारंभ भारतात इसवी सन पूर्व आठव्या ते नवव्या शतकात झाला आसावा, असं एक मत आहे. असं असलं तरी, ब्राह्मी लिपी ही उत्तर सेमिटिक लिपीतून निर्माण झाली होती हे खात्रीशीररीत्या सांगता येत नाही.

अर्थात, भारतात याअधीही लेखनकला अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेदांचं ज्ञान मौखिकरीत्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत केलं जात असे. परंतु वेदात कथन केलेली कठीण आणि किचकट माहीती फक्त आणि फक्त मौखिक स्वरुपात संग्रहीत करुन ठेवणं कठीणच. त्यामुळे अशोकपूर्व काळातही भारतात लेखनकला अस्तित्त्वात असावी असा कयास आहे. 'अक्षर' हा शब्द चांदोग्य उपनिषदात आढळतो तर 'वर्ण' आणि 'मात्रा' हे शब्द तैत्तिरीय उपनिषद आढळतात. ऐतरेय आरण्यकात शब्द आणि व्यंजनांच्या व्याख्या सापडतात. एक प्रवाद असाही आहे की, त्याकाळी काही प्रमाणात लेखनव्यवस्था अस्तित्वात असावी. ब्राह्मी फोनिशियन अक्षरांवरून आली असावी असाही एक सिद्धांत आहे. अजून एक मत अर्थातच ब्राह्मी , सिंधू खोर्‍यात वापरात असलेल्या चिन्हांवरुन तयार झाली असावी. पुराव्याअभावी यातल्या कुठल्याही एका निष्कर्षापर्यंत पोचणं कठीण आहे.

हे सर्व प्रवाद थोडावेळ बाजूला ठेऊन, अशोक काळात लिहिलेल्या गेलेल्या ब्राह्मी लिपीची ओळख कशी पटली याची गंमत बघू. फिरोझशहा तुघलकने तेराव्या शतकात दिल्ली जिंकली. त्याच्या काळात हिंदू धार्मिक ग्रंथांचं संस्कृतमधून फारसी आणि अरबीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्याने मेरठमधून दोन अशोकस्तंभ काळजीपूर्वक कापून रेशमात गुंडाळून बैलगाडीतून दिल्लीला आणलेले. त्यातला एक स्तंभ फिरोजशाह कोटला येथील त्याच्या राजवाड्याच्या छतावर त्याने उभारला. या स्तंभावर कोरलेले लेख समजून घेण्यासाठी त्याने अनेक संस्कृत पंडीतांना पाचारण केलं. पण एकाही संस्कृत पंडीताला स्तंभावार लिहीलेली लिपी वाचता येईना. पुढे दोनशे वर्षांनंतर अकबरानेही या लिपीचा शोध घ्यायचा निष्फळ प्रयत्न केला. सरतेशेवटी एकोणिसाव्या शतकात युरोपियन अभ्यासकांनी ही लिपी 'ब्राह्मी' असल्याचं सिद्ध केलं. जवळजवळ सहाशे वर्ष ब्राह्मी लिपीचं कोडं उकलायला खर्ची पडली.

ब्राह्मी लिपीचा उलगडा करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १८३६ मध्ये 'क्रिस्तीयन लॅसेन' या नॉर्वेजियन इंडोलॉजिस्ट्ने केला. इंडो-ग्रीक राजा 'अ‍ॅगॅथोकल्स' याने आपल्या नाण्यांवर ग्रीक दंतकथा छापल्या होत्या. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला या दंतकथांचा अनुवादही 'ब्राह्मी' लिपीत छापला होता. ही द्विभाषिक नाणी ब्राह्मी लिपी ओळखण्याच्या कामात बहुमुल्य ठरली. लॅसेनने नाण्यांवर छापलेली काही ब्राह्मी अक्षरं अचूक ओळखली. त्याच्यानंतर हे अपूर्ण राहीलेलं काम काम इंग्लिश ओरीयंटलिस्ट 'जेम्स प्रिन्सेप'ने पूर्ण केलं.

ब्राह्मी लिपी ही अ‍ॅबगिदा (abugida) लेखन पद्धत आहे. अ‍ॅबगिदा म्हणजे, प्रत्येक व्यंजनाला अक्षर नेमून दिलेलं असतं. स्वर लिहिण्यासाठी 'डायक्रिटिक' म्हणजेच 'मात्रा' वापरली जाते. जर का, शब्द स्वरांनी सुरू होणार असेल तर मात्र मात्रा न वापरता स्वरासाठी जे विशिष्ठ अक्षर असेल ते वापरलं जातं. अन्यथा स्वर वेगळे लिहिले जात नाहीत. व्यंजनांमधे 'अ' हा स्वर अद्यहृत असतो. 'अ' अद्यहृत असणं हे खरोष्ट्री आणि ब्राह्मी मधलं एक साम्य.

व्यंजनांचा समूह एकत्र लिहीण्यासाठी (उदा. प्र, र्व) संयुक्त व्यंजनांचा वापर केला जातो. आपण देवनागरीत अशी 'एकत्रित व्यंजनं' (consonants clusters) डावीकडून उजवीकडे एकामागे एक लिहीतो (उदा. वाङमय) तर ब्राह्मी लिपीत ती एका खाली एक लिहितात. (उदा. वाङ्मय) अगदी सुरवातीच्या काळात लिहिल्या गेलेल्या ब्राह्मी लिपीत विरामचिन्हांचा वापर दिसत नाही. अक्षरं अंतर ठेवून स्वतंत्रपणे लिहीली जात. त्यानंतरच्या काळात उभ्या, आडव्या रेषा, गोलकार चिन्ह आणि पूर्णविरामांचा वापर दिसून येतो. नंतर नंतर रचना पूर्ण झाल्यावर दोन तिरक्या रेषा पूर्णविरामासाठी दिलेल्या दिसतात. तरीही ब्राह्मीमधे कोरलेली चिन्हं किंवा अक्षरं अतिशय सोप्प्या पद्धतीची आहेत. कदाचित ही अक्षरं हाताने लिहीलेली नसून दगडावर किंवा स्तंभलेखावर छिन्नी हातोड्याने कोरलेली असल्याने फारशी किचकट अक्षरं कोरण्यास कठीण जात असावं. उभी रेष, आडवी रेष, बिंदू आणि वर्तुळ असे चार प्रकारची विरामचिन्हं संशोधनात सापडली आहेत.

देवनागरीप्रमाणेच ब्राह्मी डावीकडून उजवीकडे लिहीली जाई. ध्वन्यात्मक मांडणी (ध्वनीनुसार) आणि अनुनासिक चिन्हं ही ब्राह्मीची वैशिष्ठ्यं. खालच्या चित्रात नीट पाहीलं तर अक्षरांचा क्रम साधारणपणे आपण आज ज्या क्रमाने देवनागरी लिपी लिहितो त्याच क्रमाने दिसेल. सर्वात आधी स्वर, त्यानंतर कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य गट.

brahmi.png
(ब्राह्मी लिपी)

ब्राह्मी लिपीमधून पुढे प्रादेशिक लिपी विकसित झाल्या. कालांतराने या प्रादेशिक लिपी तिथल्या स्थानिक भाषांशी संलग्न झाल्या. गुप्त साम्राज्याच्या काळात उत्तरी ब्राह्मीने 'गुप्त लिपी'ला जन्म दिला, मध्ययुगात ब्राह्मी लिपी कर्सिव्ह स्वरुपात विकसित झाली. तिला 'सिध्दम् लिपी' म्हटलं जातं. याचच पुढे नवव्या शताकत 'शारदा लिपी' मधे रुपांतर झालं. दक्षिणेकडे पसरलेली ब्राह्मी लिपी 'ग्रंथ', 'वाटेलुट्टू' लिपीत विकसित झाली. तामिळ भाषा या लिपीमधे लिहीली जात असे. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात, उत्तर भारतातील 'गुप्त लिपी' एका वेगळ्या नवीन स्वरूपात विकसित झाली. त्या लिपीचं नाव 'सिद्धमातृका'. उत्तरेकडील लिपींवर या लिपीचा बराच प्रभाव आहे.ब्राह्मी लिपी काही भागात 'नागरी लिपी'मधे विकसित झाली आणि नगरी पुढे 'देवनागरी' आणि 'नंदीनगरी'मधे. या दोन्ही लिपी संस्कृत लिहिण्यासाठी वापरल्या जात.

ब्राह्मी लिपी खरंतर एका लेखात न संपणारा विषय आहे. या लेखातून फक्त एक छोटीशी झलक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या भागात देवनागरीविषयी...

---

या काही लिपी ब्राह्मी मधून विकसित झालेल्या:

grantha.png

telugu.png

bengali.png

अधिक टीपा:
(१) उत्तर सेमिटीक लिपी: ही सर्वात जुनी आणि पूर्णपणे विकास झालेली वर्णमाला आहे. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात सीरियामध्ये या लिपीचा वापर केला गेला. असं मानलं जातं की, नंतर विकसित झालेल्या सर्व वर्णमाला लिपी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, उत्तर सेमिटीक लिपीच्या वंशज आहे. याला अपवाद, दक्षिण सेमिटिक लिपी.

संदर्भः
१. The History and Development of Mauryan Brahnii Script, Qhandrika Singh Upasak
२. I: STAGES OF EVOLUTION OF BRAHMI , Dr. A. RAVISANKAR, Ph.D.
३. THE ORIGIN OF THE BRAHMI AND TAMI SCRIPTS, EGBERT RIGHTER
४. देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

देवनागरीच्या पाऊलखुणा (३)

मागील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (२)

मौर्य काळात ब्राह्मी लिपीचा प्रसार झापट्याने झाला. ब्राह्मी लिपी निरनिराळ्या प्रादेशिक लिपींमध्ये विकसित झाली. तिसर्‍या शतकात ब्राह्मी लिपीची विभागणी साधारणपणे दोन भागात करता येईल : भारताच्या उत्तरेकडची ब्राह्मी (जरा टोकदार कोन असलेली) आणि दक्षिणेकडची ब्राह्मी (गोलाकार, वळणदार). कालांतराने दोन्ही प्रकारच्या ब्राह्मी लिपी तिथल्या स्थानिक भाषांशी जोडल्या गेल्या. उत्तर ब्राह्मीमधून आजच्या वापरात असलेल्या देवनागरी, गुजराती, बंगाली, आसामी, काश्मीरी, उडीया, गुरुमुखी या लिपी बनल्या तर दक्षिण ब्राह्मीमधून तेलुगु, कन्नड, तामिळ इत्यादी लिपी निर्माण झाल्या.

'गुप्त काळा'त (पाचवं शतक) उत्तर ब्राह्मीमधून गुप्त लिपीचा (Late Brahmi) उदय झाला. 'गुप्त लिपी' हे या लिपीचं खरं नाव नसून काल्पनिक नाव आहे. याच गुप्त लिपीमधून सहाव्या शतकात 'सिद्धम' आणि नवव्या शतकात 'शारदा' लिपी तयार झाली. 'शारदा' लिपी, शारदामंडल या जम्मू -काश्मीर भागातली. जिच्यातून पुढे गुरुमुखी आणि टाकरी लिपींची निर्मिती झाली.

गुप्त लिपीमधून अजून एक जन्माला आलेली लिपी म्हणजे 'कुटील लिपी' किंवा 'सिद्धमातृका'. वाकडीतिकडी अक्षरं आणि मात्रा यामुळे या लिपीला 'कुटीलाक्षर' असंही म्हटलं जातं. कुटील लिपी प्राचीन भारतात प्रामुख्याने संस्कृत लिहिण्यासाठी वापरली जात असे. बौद्ध ग्रंथ आणि शिलालेख लिहिण्यासाठी कुटील लिपी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आली. उत्तर भारतात, कुटील लिपीचं रूप हळूहळू विकसित होऊन त्यांचं रुपांतर आधुनिक लिपींत व्ह्यायला सुरवात झाली. त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे 'नागरी'. दुसरी नंदीनागरी. नागरी लिपी सातव्या शतकापर्यंत नियमित वापरात होती. कालांतराने ती पूर्णपणे देवनागरी लिपीत विकसित झाली.

'नागरी' हा शब्द बरेचदा एकतर 'देवनागरी' शब्दाचं संक्षिप्त रुप किंवा 'देवनागरी' शब्दासोबत आलटून पालटून वापरतात. नागरी शब्दाच्या उगमाबद्दल एक प्रवाद असा आहे की, हा शब्द 'नृगर' या प्राकृत भाषेतून आला. 'नृगर' - 'पुरुष एकत्र होणे'. अर्थातच हा अर्थ प्रमाणित नाही. अशोकाच्या काळातल्या पाली भाषेतही 'नगर' शब्द सापडला. पण पहिला ज्ञात 'नगर' हा शब्द तैतरीय आरण्यकात आढळतो. त्यामुळे 'नागरी' शब्दाचा उगम 'नगर' या संस्कृत शब्दात आहे असं धरुन चालू. 'नगर' अर्थात शहर. त्यामुळे नगरात वापरली जाते ती नागरी.

काही जण गुजरातेतल्या 'नागर' ब्राह्मणांवरुन नागरी शब्द आला असं मानतात. पण ते तितकंस बरोबर नसावं कारण नागरी लिपीचा विकास मुख्यत्वे उत्तरेत झाला. एक मत असंही आहे, उत्तरेत त्याकाळी देवदेवातांची पू़जा सांकेतिक यंत्र वापरुन केली जाई. या यंत्रातल्या चिन्हांना 'देवनगर' म्हणत. कालांतराने ही देवनगरातली चिन्हं वर्णमालेत वापरली जाऊ लागली आणि या लिपीला 'देवनागरी' नाव देण्यात आलं.

दुसर्‍या मतानुसार, वेदांची भाषा संस्कृत नागरी लिपीत लिहीली जाऊ लागल्यानंतर देवनागरी शब्द अस्तित्त्वात आला असावा. तसंही संस्कृत भाषेचं वर्णन साहीत्यात 'गीर्वाणभारती' केलेलंच आहे. 'नगर' शब्द हा पाटलीपुत्र नगराशी संबंधित असावा असाही एक समज आहे. मौर्य आणि गुप्त साम्राज्यांच्या नगरात जन्मलेली नागरी लिपी असं नाव पडलं असावं. अजून एक मत पाहू, उत्तरेतल्या 'नागर' शैलीतल्या मंदीरांवरून 'नगर' नाव आलं असावं. या सर्व प्रकारच्या मीमांसेत, 'देव' हा शब्द 'नागरी' शब्दासोबत नक्की कधी जोडला गेला याचे मात्र ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, निदान ते कुठल्याही तज्ज्ञांनी दिलेले नाहीत. मुळात वर्णमालेला 'नागरी' का म्हणावं हा सुद्धा अनुत्तरीत प्रश्न आहे.

उत्तर भारतात देवनागरी लिपीचा वापर दहाव्या शतकापासून दिसतो. त्याआधीही केला जात असेल पण दहाव्या शतकापासून देवनगरी लिपी जास्त प्रमाणात वापरली जाऊ लागली. गुजरातेतल्या प्रतिहार राजघराण्यातल्या राजांची दानपत्र आणि शिलालेख यावरुन त्यावेळच्या नागरी लिपीचा अंदाज येतो. त्याआधी मोठ्या प्रमाणात 'कुटील लिपी' वापरात होती. कुटील लिपीतून देवनागरीकडे जातांनाच्या संक्रमण काळात, या दोन्ही लिपींचा संगमही दिसून येतो. अकराव्या शतकात मात्र कुटील लिपीची जागा पूर्णपणे देवनागरी लिपीने घेतली आणि तिचं रुपही पालटू लागलं. देवनागरी लिपीने अक्षरावर आडवी रेषा, आयताकृती कोपरे आणि चौकोनी चौकटीत बसणारी समान अक्षरं, आणि स्वरांवर दिलेल्या मात्रा दिसू लागल्या

चौदाव्या आणि पंधराव्या शतकात देवनागरी लिपीची पुन्हा पूर्व आणि मध्य अशी विभागणी झाली. पूर्व शाखेत बिहारी लिपी (सध्या वापरात नाही), मैथिली लिपी अशा काही प्रमुख लिपी आहेत. मध्य शाखेत, गुजराती लिपी (हा देवनागरीचाच एक वेगळा प्रकार आहे.), महाजनी लिपी (राजस्थानमधले व्यापारी वापरत असत), मालवी लिपी, आपली मोडी लिपी तयार झाल्या. मोडी लिपीच्या उगमाबद्दल एक प्रवाद असा की, हेमाडपतांनी ही लिपी श्रीलंकेवरुन महाराष्ट्रात आणली, परंतु तसे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. मोडीचा वापर शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु झाल्याचं दिसून येतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीनंतर देवनागरी लिपी अधिकृत लिपी म्हणून अवलंबली. असं असलं तरी देवनागरी लिहीतांना अक्षरांवर शिरोरेखा द्याव्या लागत, त्यामुळे लिखाणात फार वेळ जाई.असं म्हणतात, यावर उपाय म्हणून त्यांचे चिटणीस बालाजी आवजी यांनी देवनागरी 'मोडून' नविन लिपी तयार केली. मोडून बनवलेली 'मोडी' जी भरभर लिहीता येत असे. पुढे पेशव्यांच्या काळात मोडी लिपीत बरेच फेरफार करण्यात आले.

तर, परत वळुया देवनागरीकडे. नऊ ते बाराव्या शतकात मिळालेले ताम्रलेख, मुद्रा, नाणी यावर नागरी लिपीचा वापर स्पष्टपणे दिसतो. महंमद गझनीच्या नाण्यांवर देवनागरी लिपीत संस्कृतमधे कलमा लिहिलेला आढळतो. ही नाणी लाहोरमधे इ.स. १०२७ -२८ च्या दरम्यान टाकसाळीत पाडली गेली होती. या नाण्यांवर कूफी (Kufic) लिपीमधे 'ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वा सल्लम ' (१) असा मजकूर आहे तर दुसर्‍या बाजूला मजकूराचा अनुवाद संस्कृतमधे 'प्रत्यमेक मुहम्मद अवार नृपति महमूद' असा टंकलेला आढळतो. जैन ग्रंथ, नंदीसूत्रातही नागरी लिपीचा उल्लेख आढळतो. राजा जयवर्मन भट्ट सोलंकी (दहावं शतक), याने देवनागरी लिपीच्या वापराला प्रोत्साहन दिलं. परीणामी, त्याच्या कारकिर्दीत ही लिपी लोकप्रिय झाली. चौदाव्या आणि पंधराव्या शतकाततली नागरी लिपी आजच्या पेक्षा थोडी वेगळी दिसते. या काळात लिहिली गेलेली स, घ, प, म, ष, य ही अक्षरं डोक्यावर रेषा नसलेली, विभक्त टोकं अशी दिसतात.

काळाच्या ओघात अक्षरावर शिरोरेखा आखणं, अक्षरं अधिकाधिक गोलाकार, साचेबद्ध करणं असे प्रयोग देवनागरी लिपी सुंदर करण्याकरता वेळोवेळी झाले. पण त्याच वेळी वेगाने लिहिता येण्याजोगी लिपी बनवण्याकडेही कल दिसून येतो. पंधराव्या शतकात संस्कृत आणि मराठी, हिंदी या सारख्या भाषा लिहिण्यासाठी देवनागरी प्रामुख्याने वापरायला सुरवात झाली. इ.स. १५५६ मधे पोर्तुगींजांकडून छपाईतंत्र भारतात पोचलं. तरीही देवनागरी लिपी छापील स्वरुपात यायला अठरावं शतक उजाडावं लागलं. दरम्यान भारताबाहेर, देवनागरी लिपी 'कास्ट' करण्याचा पहीला प्रयत्न इ.स. १७४०ला रोममधे झाला. त्याची परीणती पुढे १७७१ मधे 'Alphabetum Brahmanicum' हे पुस्तक देवनागरीत छापण्यात झाली. या पुस्तकात देवनागरीचा पहिला लेटरप्रेस टाईपफेस दिसून येतो. मराठीने लेखनासाठी विसाव्या शतकाच्या सुरवातीला 'बाळबोध' स्वरुपात देवनागरी लिपी स्वीकारली. स्वातंत्र्यानंतर देवनागरी भारताच्या अधिकृत लिपींपैकी एक बनली.
---
पुढील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (४)

संदर्भः
१. कलमा या वेबसाईटवरुन घेतला आहे.
२. Indian Epigraphy: A Guide to the Study of Inscriptions in Sanskrit, Prakrit, and the other Indo-Aryan Languages. Oxford University Press, Richard Salomon (1998).
३. देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए

Keywords: 

लेख: 

देवनागरीच्या पाऊलखुणा (४)

मागील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (३)

"शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले..." खरंय, शब्दातून सगळ्या भावना व्यक्त करता येतीलच असं नाही. शब्दांच्या पलीकडलं अव्यक्त जग निराळं. पण दैनंदिन रहाटगाडगं हाकण्यासाठी भाषा हवीच. भाषेच्या उगम काळात अगदी सुरवातीचे शब्द निरळनिराळे ध्वनी (आवाज) एकत्र करुन बनले असावेत. बोलतांना तोंडातल्या अवयवांचा वापर करुन तयार झालेले ध्वनींना 'वर्ण' (Phonemes) म्हणतात. जसं की, 'घ्' हा वर्ण, त्यात 'अ' वर्ण मिसळला की 'घ' अक्षर तयार होतं. त्यापुढे 'र्' + 'अ' = 'र' हे अक्षर जोडलं की 'घर' असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. हा शब्द अर्थपूर्ण आपल्यासाठी, कारण मराठी भाषेत 'निवासस्थानाला' आपण 'घर' अशी संज्ञा दिली आहे. पण तेच एखाद्या रशियन किंवा फ्रेंच भाषिकासमोर 'घर' शब्द उच्चारला असता त्याला काहीही बोध होणार नाही. वर्णांमधून अक्षरं उमलली, या अक्षरांमधून शब्द. एक-एक शब्द गुंफून भाषा तयार झाली.

भाषा जसजशी विकसित होऊ लागली तसतसा तिचा वापर व्यापार उदीम, कायदे, अभ्यास अशा अनेक क्षेत्रात होऊ लागला. नव्याने तयार होणारी माहीती अचूक आणि कार्यक्षमपणे जतन करुन ठेवण्याची गरज भेडसावू लागली. जगातल्या विविध संस्कृतींनी यावर आपपल्या परीने तोडगा काढला. काहींनी भावभावना, संकल्पना यांची चित्ररुपात मांडणी करायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, इजिप्शियन चित्रलिपी, हडप्पा संस्कृतीतही चित्रलिपी अस्तित्वात होती. तर काही समुदाय उच्चार दाखवण्यासाठी चित्रांऐवजी सोय म्हणून चिन्हांचा वापर करु लागले.

या सगळ्या व्यापात जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात भाषा निराळया पद्धतीने विकसित होत होत्या. दळणवळणाची आणि संपर्काची मोजकी साधनं यामुळे जगाच्या एका कोपर्‍यात काय चाललं आहे ते दुसर्‍या त्याची दुसर्‍या कोपर्‍याला पुसटसी कल्पना नसे अशी परीस्थिती. प्रागैतिहासिक काळापासून जगायचं आणि पुढे जायचं तर संभाषण गरजेचं त्यामुळे आधी भाषा जन्माला आली आणि नंतर लिपी. शब्द सामावून घेण्यासाठी वर्ण तयार झाले. वर्ण लिखीत स्वरुपात मांडण्यासाठी जी चिन्हं तयार केली गेली त्यांना लेखनचिन्हं (Graphemes) म्हणतात. Grapheme हा शब्द जुन्या ग्रीक भाषेतून gráphō अर्थात लिहीणे या शब्दावरुन तयार झाला. आपण ज्यांना अक्षरं म्हणतो.

ध्वनींचा संबंध वर्णांसोबत जोडला जातो जातो. नंतर हे वर्ण लेखनचिन्हांशी जोडले जातात. बरेचदा वर्ण आणि लेखनचिन्हं यांचं १:१ गुणोत्तर असतं. जसं की, आपण 'क्' या वर्णासाठी 'क' हेच चिन्हं वापरतो पण काही वेळा भाषा अशा रितीने काही विकसित होते की प्रत्येक चिन्हं एकच वर्ण दाखवेल असं होत नाही. जसं की, इंग्रजी भाषेतला 'क्' वर्णासाठी 'k' चिन्हं वापरतात. पण 'cat' या शब्दात 'सी' चिन्हंसुद्धा 'क' ध्वनी दर्शवतं.

हे चिन्हरुपी ध्वनी विशिष्ठ क्रमात वर्णमालेच्या रुपात लिहू जाऊ लागले. अमेरीकन हेरीटेज डिक्शनरी 'alphabet' (वर्णमाला) या शब्दाची व्याख्या करतांना म्हणते, "the letters of a given language, arranged in the order fixed by custom; or it may mean the basic or elementary principles of anything." यातला 'custom' हा शब्द मला महत्त्वाचा वाटतो. वर्णमालेची मांडणी भाषेनुसार बदलते. आपल्या पटकन लक्षात येत नाही पण, अनेकदा ही मांडणी त्या त्या संस्कृतीची जडणघडण, वैचारीक प्रगती, भाषेचा प्रवास याचं द्योतक असतं. वर्णमालेच्या रचनेचा अभ्यास करुन, काही सिद्धांत मांडले गेले. १९२० च्या दशकात, पुरातत्वशास्त्रज्ञांना 'उगारीत', (आताचा सीरिया) मधील शाळेत वापरल्या जाणार्‍या डझनभर दगडी पाट्या सापडल्या, ज्या इ.स.पू. चौदाव्या शतकातील आहेत आणि यात उगारीत वर्णमालाचे दोन क्रम दिसून येतात. त्यातली एक, 'northen sematic order' फिनीशियन आणि हिब्रू अक्षरांशी संबंधित आहे. आपल्याला रोमन अल्फाबेट्सचा जो क्रम आज परिचित आहे, त्या क्रमाचा संदर्भ या फिनिशियन तुकड्यात सापडतो.

1280px-Ugaritic-alphabet-chart.svg.png
स्त्रोत : विकीपिडीया

भाषिक वर्णांची, लिखीत स्वरुपात कशी उत्क्रांती झाली ते आता पाहू. ब्राह्मी लिपी फोनिशियन 'उत्तर सेमिटीक लिपी'वरुन (जिचा वापर मुख्यत्वे व्यापार्‍यांद्वारे केला जाई) विकसित झाली असावी असा एक कयास आहे. 'आरामिक' वर्णमाला ही फोनेशियन वर्णमालेचं बदलेलं रुप. पर्शियातलं पहिलं साम्राज्य Achaemenid, यांची कारभाराची भाषा 'आरामिक' लिपीत लिहीली जाई. आरामिक व ब्राह्मी लिपीतली अक्षरं बरीचशी सारखी दिसतात. त्यामुळे, फोनिशयन व्यापार्‍यांकडून आरामिक साम्राज्याकडे आणि तिथून ही अक्षरं ब्राह्मी लिपीत आली असावीत. बहुदा सम्राट अशोकाने स्वतःसाठी हीच आरामिक वर्णमाला घेऊन ब्राह्मी लिपी तयार केली असावी. या गृहीतकाला धरुन माझं वैयक्तिक मत असं की, धर्मप्रसाराठी जलद गतीने, तांत्रिकदृष्या परिपूर्ण लिपी नव्याने तयार करण्यापेक्षा प्रचलित लिपी घेऊन गरजेनुसार तिच्यात बदल करणं जास्त सुकर ठरलं असावं. अर्थात मताला कुठलाही आधार नाही

देवनगरी वर्णमालेचा विचार करता, वर्णांचा क्रम हा उच्चारानुसार ठरतो. लिपीतल्या अक्षरांची मांडणी, ध्वनीविज्ञानावर आधारित केलेली आहे. (तोंडात ध्वनी कसे आणि कुठल्या भागात निर्माण होतात त्यानुसार अक्षरांची मांडणी). सध्या वापरात असलेले अक्षरांचे आकार कदाचित संस्कृत व्याकरणकारांनी विकसित केले असल्याची शक्यता वर्तवता येते. संस्कृत वर्ण लिपीमधे बसवण्यासाठी त्यांनी आधीच अस्तित्वात असलेली लिपी स्विकारुन त्यानंतर आकार विकसित केले असावेत. कारण ब्राह्मी वर्णमालेची पाळंमूळ जरी सेमिटिक अक्षरांत असतील तरी ती ज्या स्वरुपात आपल्याला ज्ञात आहे, तिची ध्वनीनुसार मांडणी, हे फक्त व्यापार्‍यांचं काम नसावं. यासाठी भाषाशास्त्राची नीट जाण असणं अत्यावश्यक आहे. कदाचित सेमिटीक वर्णमाला व्यापार्‍यांच्या संपर्कातून भारतात आली असेल आणि त्यानंतर अशोकाच्या काळापर्यंत ही टप्प्यटप्प्याने विकास झाला असेल.

ब्राह्मी लिपीत प्रत्येक ध्वनीला एक वर्ण नेमून दिलेला आहे. देवनागरीनेही तिथूनच एक वर्ण = एक ध्वनी पद्धत अवलंबली. उच्चार आणि लिपी यांचा थेट संबंध असणं हे देवनागरीचं वैशिष्ठ्य ब्राह्मीमधूनच आलं आहे. हे अल्फाबेट पद्ध्तीपेक्षा थोडं निराळं. रोमन लिपीत जसं, 'एल्' हा वर्ण आहे पण जेव्हा स्पेलिंग लिहीलं जातं तेव्हा तोच उच्चार 'ए' वगळून फक्त 'ल' असा केला जातो.

या ठिकाणी,चर्चेत 'पाणिनी'चं नाव घेणं अपरिहार्य आहे. संस्कृतमधील व्यंजन आणि स्वरांचं अचूक वर्णन अष्टाध्यायीत वाचायला मिळतं. वर्णमालेचा क्रम हा आपल्याला पाणिनीच्या माहेश्वरसूत्रात सापडतो. देवनागरी वर्णमालेतला व्यंजनांचा पहिला गट - 'क' वर्ग. यात येणारी व्यंजनं, 'क', 'ख', 'ग', 'घ', 'ङ.' ही सगळी कंठव्य आहेत. हे पाचही वर्ण वेदीक काळापासून अस्तित्वात आहेत. पाणिनीने माहेश्वरसूत्रात या कंठव्य व्यंजनांची नोंद 'अकुहविसर्जनीयानां कण्ठः' (ज्या वर्णांचा उच्चार कंठातून होतो असे वर्ण – अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह आणि विसर्ग) अशी केली आहे.

कंठव्य व्यंजनांच्या अक्षरांची उत्क्रांती बघतांना आपण 'अशोक काळातले शिलालेख ते आजच्या घडीला वापरात असलेली अक्षरं' असा काळ आपण बघणार आहोत. अशोकाच्या काळाआधीही ही अक्षरं अस्तित्त्वात असतील परंतु विषय सोपा करण्यासाठी अशोकाच्या काळापासून सुरु करु. याच काळापासून मुबलक पुरावे उपलब्ध आहेत. संदर्भासाठी फोनिशियन आणि आरामिक अक्षरं सुद्धा बघू.

अशोक काळातली ब्राह्मी लिपी शिलालेख, स्तंभ, गुहा इत्यादी ठिकाणी कोरलेली आढळते. लिपी कोरण्यासाठी वापरलेली प्राथमिक स्वरुपाची अवजारं, कुठल्याही आधुनिक यंत्रांची मदत न घेता खोदलेले आकार यामुळे सर्वसाधारणपणे सरळसोट आणि टोकदार दिसतात. विश्लेषणासाठी मी खाली दिलेल्या फोटोमधल्या माहितीचा वापर केला आहे. तरीही हा फोटो वाचायला अस्पष्ट असल्याने विकिपिडीयावरुन काही प्रतिमा उदाहरणादाखल दिलेल्या आहेत.

पहिल्या फोटोतला काळ, डावीकडून अनुक्रमे: अशोक (इ.स.पू. ३ ) , कुशाण (इ.स.२), गुप्त (इ.स.४), यशोवर्मन (इ.स. ६), वर्धन (इ.स.७), प्रतिहार (इ.स.९), परमार (इ.स. ११), कलिंग (इ.स.११), यादव (इ.स.१३), विजयनगर (इ.स. १५).

brahmi-nagari-evolution-header.png
brahmi-nagari-evolution.png

क :

अशोकन शिलालेखांमधे, वर्णमालेतलं पहिलं व्यंजन, 'क' हे मध्यभागी काटकोनात एकमेकांना दुभागणार्‍या 'अधिक' चिन्हासारखं दिसतं. सेमिटीक लिपीत 'Kaph' हे अकरावं अक्षर. ब्राह्मी लिपी सेमिटीक लिपीवरुन तयार झाली असल्याच्या गृहीतकानुसार आरामिक लिपीतून Kaph('K') अक्षर, ब्राह्मी लिपीत 'क्' वर्णासाठी 'अधिक' चिन्हं आलं असावं.

ph-k.png

(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

ब्राह्मी लिपीतलं 'क' हे अक्षरं कोरायला अगदीच सोपं असल्याने काळानुसार त्यात झालेले बदल अत्यल्प आहेत. काही ठिकाणी रेषा असमान आणि थोड्या वाकड्याही दिसून आल्या आहेत. बहुतेक दगडात कोरतांना नीट खोदलं नसेल तर आणि असमान आकार बनला असेल. हा आकार इतका सोप्पा आहे की, त्यात फार चूका दिसून येत नाहीत. हे 'अधिक' चिन्हं आजही थोड्याफार प्रमाणात आधुनिक 'क' मधे टिकून आहे. चित्रात नीट निरखून पाहीलं तर अशोकाच्या काळात अक्षरावर शिरोरेखा देण्याची पद्धत नव्हती.

मधली उभी दंडरेषा कुशाणकाळात निमुळती होत जाते. तसंच लांबी किंचीत वाढल्यासारखी दिसते. याच काळात दांडीवर त्रिकोण विकसित झाल्याचा आढळून येतो. अक्षराची लांबी वाढलेली दिसून येते. कुशाणांच्या काळात, डोक्यावर त्रिकोण दिसतो. कुशाणोत्तर काळात, त्याच त्रिकोणाची शिरोरेखा विकसित होतांना दिसते. तसंच बाजू थोड्या गोलाकार दिसून येतात.

प्रतिहार साम्रज्याच्या काळात 'क' ची एक बाजू गोलाकार होतांना दिसेल. तर दुसरी बाजू अधांतरी हवेत तरंगतांना. शिरोरेखाही त्रिकोणी दिसतेय. बहुतेक भरभर लिहीण्यासाठी बोरू, लेखणी न उचलता लिहीतांना तसा आकार तयार झाला असावा. कलिंगाच्या काळापासून 'क' हा सध्या आपण लिहीतो तसा दिसतो. मध्यदंड थोडा वाकलेला. हा आकार कलचुरी राजा 'कर्णदेव' याच्या ताम्रपत्रावर आढळला.

ख :

इंग्रजीमध्ये प्रतिरूप नसलेल्या अक्षरांपैकी एक 'ख' आहे. आरामिक भाषांमधेही 'ख्' व्यंजनं नसावं. पण बहुदा, आरामिक ('Q') चा अपभ्रंश होऊन 'ख' साठी चिन्हं ब्राह्मी लिपीत आलं, असा कयास आहे.

ph-kh.png
(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

अशोकाच्या काळातलं 'ख' अक्षर आणि आत्ता आपण जसं लिहीतो त्यात बरीच तफावत दिसते. अशोक काळातला 'ख' हा एखाद्या आकड्यासारखा दिसतो. बहुतेक खणण्यासाठी कुदळीच्या वापरावरुन हा 'ख'चा आकार तयार झाला असावा. कुशाण काळातलं 'ख' अक्षर हे गिरनार पर्वताच्या जवळ एका दगडावर सापडलं आहे. हे दुसर्‍या शतकातलं असून क्षात्रवंशाचा राजा 'रुद्रदामा' याच्या एका लेखात आढळतं. गुप्त काळातलं 'ख' हे अक्षरं थोडं आधीच्या 'ख'चं कर्सिव्ह स्वरुप असावं. पण याच्या तळाशी जो गोल आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. हाच गोल आजही आपण 'ख' अक्षरं लिहीतांना वापरतो. फक्त तो आतासारखा एका बाजूला नसून तळाशी आहे. दगडात कोरतांना तळपायाशी कोरणं जास्त सोपं जात असावं. प्रतिहार काळात मात्र बहुदा (कदाचित) सौंदर्य वाढवण्यासाठी शिरोरेखा आखली गेली आणि त्यानंतरच्या काळात दंडामुळे तळाचा गोल बाजूला सरकल्यासारखा दिसतो. त्यामुळेच पुढच्या काळात 'र' आणि 'व' हे आकार वेगवेगळे झाल्याचं दिसतं.
brahmi-kha-evolution.png
(स्त्रोत : विकीपिडीया)

याच आकारात 'ख' आपल्याला पुढेही वापरात असल्याचं दिसतं. काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली लिपी सुधार समितीने 'र' ला थोडं खेचून 'व' ला जोडावा अशी सूचना केली. त्यातूनच आधुनिक 'ख' तयार झाला.तोवर हा 'ख', 'रव' वाटत असे.

ग :

'ग' देवनागरीतलं तिसरं व्यंजन आणि ते आरामिक 'Gimel' या अक्षरावरुन तयार झालं असावं. कारण 'ग' हे अक्षर रोमन 'G' सारखंच पण उलटं दिसतं.

ph-g.png
(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

'क' प्रमाणे 'ग' चा आकार ही साधाच आहे. तसंच अशोकानंतरच्या काळात बाकी अक्षरांप्रमाणे या ही अक्षराला गोल आकार देण्याकडे कल दिसतो. इतर दोन अक्षरांप्रमाणे 'ग' सुद्धा प्रतिहाराच्या काळात जसा दिसे तसाच काहीसा आता आपण काढतो.

ga-brahmi-evolution.png
(स्त्रोत : विकीपिडीया)

'ख' प्रमाणे 'ग' सुद्धा अंत्यदंडयुक्त आहे पण 'ग' त्याच्या कान्यापासून वेगळा आहे तर 'ख' कान्याला जोडला आहे. 'ख' अक्षरात जसं शिरोरेखा दिल्याने 'र'आणि 'व' हे आकार सुट्टे झाले तसंच 'ग' मधे सुद्धा काना वेगळा झाला. गोलाकार 'ग' हा मथुरेचा राजा 'क्षत्रप' याच्या लेखात दिसून येतो. या गोलाकार 'ग' ची उजवी बाजू उभी केली आणि डोक्यावर रेष आखली तर साधारण आज वापरात असलेला 'ग' दिसून येतो.

आपण तपशिलात जातच आहोत तर, 'ग' आणि 'ग़'मधला फरक बघू. ग़ज़लमधला 'ग़', पर्शियन लोकांकडून आला. हा आपल्या 'गणपतीत'ल्या 'ग' पेक्षा वेगळा आहे. त्याचप्रमाणे, कयामत, क़ातिल, काझी यातील 'क' चा उच्चार हा आपल्या भाषेतील उच्चारापेक्षा वेगळा, 'क़' ध्वनी आहे. ध्वनींमधला फरक समजण्यासाठी मूळ अक्षराला नुक्ता देऊन सजवण्यात आलं.

घ :

देवनागरी लिपीतलं चौथं अक्षर 'घ' हे आरामिक 'H/X' मधून आलं असावं.
ph-gha.png
(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

अशोक काळातला 'घ' मासा पकडायला गळ वापरतात तसा दिसतो. फक्त पायाशी जो गोलाकार आहे त्यातून एक छोटी रेघ निघते. अशोक काळानंतर हा उभा गळ, आडवा झालेला दिसतो. मधल्या रेषेची लांबी ही वाढलेली दिसते. नवव्या शतकापासून शिरोरेखा जोडली गेली. हळूहळू गळासारखा दिसणारा आकार उभा होतांना दिसतो. आडव्या आकाराला शिरोरेखा देणं कठीण जात असावं असा माझा अंदाज. लिखाणाचा वेग वाढवाण्यासाठी बहुतेक 'घ' ही झालेला दिसतो.

brahmi-gha-evolution.png
(स्त्रोत : विकीपिडीया)

ङ:

ङ च्या उत्क्रांती विषयी फारशी माहीती मला मिळाली नाही. देवनागरीतलं हे पाचवं व्यंजन अशोककाळात सापडत नाही. या अक्षराचा वापर कुशाणकाळात जोडाक्षरात सापडतो. याचं पहिलं रुप समुद्रगुप्ताच्या एका लेखातून घेतलं आहे. त्यानंतर 'ङ'च्या पायाचं वळण गोलाकार होत गेलं आणि तो 'ड' सारखा दिसू लागला. आठव्या शतकात 'ड'च्या बाजूला बिंदू जोडायला सुरवात झाली. 'ङ' हा अल्पदंडयुक्त म्हणजेच 'ङ' ची काना छोटीशी, त्याच्या डोक्यावरआहे.ङ:

nya.png
(स्त्रोतः देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए, पृष्ठ क्रमांक : ११२)

'ङ' अक्षराविषयी काही अनुत्तरीत प्रश्न माझ्या डोक्यात घोळत आहेत. ते असे :

- 'ङ' वर्णाला ब्राह्मीमधे चिन्हाक्षर दिसत नाही. अशोक काळातल्या पाली भाषेत 'ङ' हा ध्वनी नव्हता का? त्यामुळे त्यासाठी वेगळा वर्ण तयार केला गेला नसावा का? वर्ण नाही, मग चिन्हंही बनलं नाही.

-चिन्हं पुढे नागरीमधे आलं. याच कारण असं असावं का, संस्कृतमधे 'ङ' वर्ण नियमित येतो. जेव्हा संस्कृत भाषा नागरी लिपीत लिहू जाऊ लागली तेव्हा 'ङ' या वर्णाला चिन्हाची गरज भासली. तसं असेल तर 'ड' च्या जवळ जाणारं चिन्ह का वापरण्यात आलं?

-वेगळेपणा दाखवण्यासाठी नुक्त्यासारखा बिंदू का देण्यात आला? जी संस्कृती त्या काळातली एवढी प्रगत वर्णमाला तयार करु शकते, तीच संस्कृती एखाद्या अक्षराला काहीतरी नाविन्यपूर्ण चिन्हं का शोधू शकली नाही?

माझ्या या प्रश्नावलीने या भागाची सांगता करुया.

पुढील भागात च, छ, ज, झ, ञ.
--

संदर्भः
१. The History and Development of Mauryan Brahmi Script, Qhandrika Singh Upasak.
२. THE ORIGIN OF THE BRAHMI AND TAMI SCRIPTS, EGBERT RIGHTER.
३. देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए.
४. Development of Devanagari script : A.K. Singh : 1990.

Keywords: 

लेख: