भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे.