हुश्श, आज पार दमलो बुवा, त्या तिथे मेजवानीसाठी किती ते पदार्थ, भारीच दमछाक झाली काम करुन, :tired: अंमळ टेकावे इथेच जरा... आई, आई गं....ऑ.. काय म्हणता? हो, हो माहिती आहे बायांनो, ही जागा आमच्यासाठी नाही, हे संकेतस्थळ केवळ स्त्रियांसाठीच आहे. इथे बाप्या लोकांना मज्जाव आहे ते. पण मी इथे रितसर परवानगी घेऊन आलोय बरं का. खरं नाही वाटत तर विचारा तुमच्या अॅडमिनताईंना. मला इथे येऊ द्यावं का नाही यासंदर्भात आतमध्ये एक मीटींगही झाली म्हणे आणि माझ्यासाठी एका ताईंनी वशिलाही लावलाय बरं, पण मी त्या ताईंचं नाव नाही घेणार, अगदी या कानाचं त्या कानाला नाही कळू देणार. अगं अगं बायांनो, किती चिडता, जरा शांत व्हा की, माझी तक्रार करण्याआधी मी का आलोय हे तर ऐकून घ्याल की नाही? हं आता कसं, ऐका, मी काही मैत्रीण.कॉमचे सदस्यत्व मागायला नाही आलो, तुम्हाला माझी कसलीही अडचण, त्रास होणार नाही याची गॅरेंटी. मी फक्त आज, तुमच्याशी थोडंसं बोलायला आलोय, स्त्रियांसाठी असलेल्या संस्थांत कसं काही कार्यक्रमानिमित्ताने पुरुष येतात, मदत, मार्गदर्शन करायला तसं काहीसं समजा हवं तर. पण मी ना तुम्हाला कसलं मार्गदर्शन करु शकतो ना मदत. मी फक्त माझ्या मनीच्या काही गोष्टी तुमच्यासह वाटून घ्याव्यात म्हणून आलोय इथे, तुमच्याशी बोलायला, आता तुम्ही म्हणाल की इथेच कशाला कडमडलास? इतरत्र कुठे उभं केलं नसेल कुणी याला, तर याचं उत्तर 'हो' असंच आहे. तुमच्यासारख्या सुज्ञ, समंजस स्त्रिया मला निदान ऐकून घेतील याची खात्री वाटली, म्हणून आलो मी इथे आणि मैत्रीण टीमचे धन्यवाद मला चार शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल.
आता मी बोलायला सुरुवात करतो, म्हणजे तशी सुरुवात केलीच आहे मी, पण मी माझ्या येण्याचे प्रयोजन आता सांगतो. तुम्ही सार्यांनी मला ओळखलेच असेल. काय म्हणता? नाही ? कसे शक्य आहे? अगदी लहानपणापासून प्रत्येक माणूस मला हातात धरतच आला आहे आणि तुमच्यातील काही जणींच्या तर मी खासच जिव्हाळ्याचा... नाही लक्षात येत अजुन? ठीक ठीक, मीच सांगतो माझी ओळख.
मी आहे 'चमचा'
अहो, ताई, काही वाट्टेल ते काय बोलताय? :raag: 'कुणाचा म्हणे', कुणाचाही नाही, मी आहे चमचा, फक्त चमचा. डाव, पळी, झारा या जातकुळीतला मी ' च म चा', आता आलं लक्षात? आहे ना आपली ओळख जुनी?
तर मी 'चमचा' स्वयंपाकघरातील तुम्हा सार्यांचा जीवलग साथी, आज तुमच्याशी बोलणार आहे थोडंसं. माझं आणि तुम्हा प्रत्येकाचं नातं हे तुम्ही सगळी माणसं अगदी छोटं बाळ असतानाच जडलंय नाही का? तुम्हाला आठवतही नसेल. पण मी लक्षात ठेवलेय ना. प्रत्येक बाळ प्रथम घन पदार्थ खाऊ लागतं, ते माझ्या साक्षीने आणि साथीनेही. दूधानंतरचं पहिलं अन्न, भरवते ती बाळाची आई किंवा आजी वाटी चमच्याने, बाळाला पायांवर घेऊन, तो चमचा कसा हवा, किती मोठा, लहान हे निकष ठरलेले असतात. खरोखरचं ‘स्पून फिडींग’ असतं ते.
या पहिल्या ओळखीनंतर मी जो तुमच्या जीवनात प्रवेश करतो तो कायम तुमची संगत करत राहतो. अगदी शेवटच्या क्षणी गंगासुद्धा माझ्यामार्फतच तुमच्या मुखी येणार, खरंय ना? जाऊ दे, मला तुम्हाला इमोशनल नाही करायचे .
सांगायचा मुद्दा म्हणजे पाककला हा तुमच्या जिव्हाळ्याचा भाग असो वा नसो माझे तुमच्या जीवनात एक निश्चित स्थान आहे हे निश्चित. सुग्रणींची तर बातच और. त्या तर अगदी नजाकतीने मला हाताळत असतात. कसं विशिष्टपणे मला धरायचं, माझ्यामार्फत पदार्थ कसा घाटायचा, ढवळायचा, उलथायचा,परतायचा, त्या प्रत्येक वेगळ्या कामासाठी माझे कोणते रुप वापरायचे हे एक ती ललनाच जाणे. काहीजणी तर अमुक एक चमचा हाताशी असल्या शिवाय सुरुवातही नाही करीत स्वयंपाकाला. मलाही खूप खूप मज्जा येते तुम्हा सार्या जणींकडून हाताळले जायला. कधी कोणत्या स्वयंपाकघरात आई मुलीला सांगत असते, कालथा घेऊन परत, म्हणजे हातावर अन्न उडून चटका बसणार नाही, तर कुठे फोडणीची लोखंडी पळी कशी सावरायची हे शिकवले जाते. पिढ्यानपिढ्या ही अशी माहितीची, अनुभवाची, संस्कॄतीची देवाणघेवाण मी बघत आलोय बरं का.. हल्ली बापेही आलेत या क्षेत्रात घुसखोरी करायला, मास्टरशेफ बघतो ना मी पण.
आपल्या देशात पारंपारीक पदार्थ हे हातानेच खाल्ले जात. माझा संबंध फक्त रांधणे आणि वाढणे इतकाच. मात्र खाण्याच्या प्रक्रियेत माझा अंतर्भाव झाला तो साहेब इथे आल्यावर आणि काय सांगू तुम्हांला, या गोर्या साहेबाने माझं रुपडंच पार बदललं की हो. नाजुक नक्षीदार काटे, चमचे, विविध सुर्या हे माझे मित्र-मैत्रिणी कटलरी या नावाने विराजमान झाले. हळूहळू मी भारतीय ताटातही मिरवू लागलो. आता तर काय, ऑफिसात, हॉटेलात ‘टेबल एटीकेटसच्या’ नावाखाली सारे सर्रासपणे माझा उपयोग करु लागले. चपाती हाताने खाणे मान्य पण भाजी तीसुद्धा जर रस्सा भाजी असेल तर मी हवाच हो, माझ्याशिवाय काय कधी टेबल मॅनर्स पूर्णत्वाला गेलेत?
खरं सांगू? भारी खुश होतो मी, ही टाकलेली कात पाहून, एकदम चकाचक पॉलिश्ड लो़कांच्या अवतीभवती बागडायला मिळत होतं, त्या स्वयंपाकघरातल्या गरम हवेने, फोडण्यांच्या वासा-धुराने जेरीला आलेला जीव एकदम सुखावला. पण.... हाय रे माझ्या कर्मा..... हे सुख अगदी क्षणिक होतं याची कुठे मला बापड्याला कल्पना असायला? काही दिवसांतच माझे नाव कॉर्पोरेट, राजकीय वर्तुळात घेतले जाऊ लागले. मात्र ते चांग्ल्या हेतूने नाही हो...कुणाचीतरी चापलुसी करणे, हाजी हाजी करणे या आणि तत्सम क्रियापदांबद्दल माझी एक विशेष नाम म्हणून योजना होऊ लागली. "हा साहेबाचा 'चमचा' आहे ".... हे जीवघेणे शब्द, तप्त लोहरस कानांत ओतल्यागत मला जिव्हारी लागू लागले... अशा स्वार्थी, आप्पलपोटी माणसांसाठी माझे नाव का? मी असा वागलोय का कुणाशी कधीतरी? जे जे माझ्या वाट्याला येईल, ते सारे मिळून - मिसळून देणे, एखाद्या घटक पदार्थातलं न्यूनत्व नगण्य होईल अशा प्रकारे एकजीव पदार्थ तुम्हां हाती सुपुर्द करणे हे माझे काम, फार फार तर अन्न खाण्यासाठी मदत करणे, तुमचा हात खराब न होऊ देणे हे. पण म्हणून काय मी असा लाळघोटेपणा करणारा आहे काय? मुळीच नाही.
खरंच खूप अपमानित झाल्यागत वाटतं हो मला. पण मी काय आणि कुणाकडे बोलणार सांगा. तसंच अजुन एक. मघाशी मी बोललो ना बाळाला अन्न भरवण्याबाबत, किती पुण्याचं काम हो, अन्न भरवणे हे, पण "स्पून फिडींग" या गोंडस नावाखाली कष्ट न उपसता विनासायास, आयतं मिळवण्याची क्रिया हे अपेक्षित असतं तुमच्या बोलीत. परत माझाच उपमर्द? का? वीट आलाय या सार्याचा अगदी.
म्हणून मी तुमच्याकडे आलोय माझी एक विनंती घेऊन माझ्या नावाला लागलेला काळिमा पुसायला मदत कराल काय? मला माहिती आहे इथे या संकेतस्थळावर अनेक कलानिपुण, हरहुन्नरी, गुणी मैत्रिणी आहेत. कुणी क्विलिंगचे दागिने बनवते तर कुणी खड्यांचे आणि वायर्स वाकवून. कुणी फॅशन फ्रीक तर कुणी स्थापत्य विशारद. कुठेतरी कशात तरी माझा उपयोग करा की बायांनो, मला एक नवी ओळख द्यायचा प्रयत्न करा जेणेकरुन मी आहे तिथून पार उंचावर पोहोचेन आणि माझे नाव कुणाला घालून पाडून बोलण्यासाठी वापरले जाणार नाही. होईल का कधीतरी असं? कधी होईल?
आपल्या सफरचंद दादाने पाहिलीत ना कसली गरुडभरारी घेतली आणि कुठल्या कुठे पोहोचला? ते सुद्धा लाल रसरशीत काश्मिरी सफरचंद नाहीच, असेच कुणीतरी चावा मारुन फेकून दिलेले, आज 'अॅपल' हे ब्रँडनेम मिरवतेय. त्या नावावरुन ते वापरणार्याची योग्यता जोखली जातेय आज. तो अन्नधान्याची नासधुस करणारा उंदीरही त्याच गटातला. बाप्पाचं वाहन म्हणून मिरवत होताच पण नाही, ते कमीपणाचं वाटलं आणि आता संगणकाचा एक अविभाज्य भाग बनून राहिलाय, वर मला खिजवतो तिथून की तू चमचेगिरी करत ढवळतच राहणार म्हणे जन्मभर!! या दोघांना धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे मात्र नक्की.
परवाचीच गोष्ट सांगतो. एक आजीबाई चौकशी करत असतांना मी ऐकलं. आजीबाईंना पणतू झाला, त्याप्रित्यर्थ नातलग बाळाच्या बारशाच्या दिवशी आजीबाईं वर सोन्याची फुले उधळणार, मग आजीबाईंनाही वाटलं आपण तोडीस तोडा अहेर करायला हवा, काय ठरवलं त्यांनी? बाळासाठी सोन्याचा चमचा बनवू म्हणे. हे ऐकताच मी पातेल्यातून बाहेर उडीच घेतली की, 'बॉर्न विथ गोल्डन स्पून' किती भारी... माझाही भाव वधारला ना ! पूर्वीचे राजेरजवाड्यांचे दिवस आठवले हो.एका क्षणात स्वप्नरंजनात रमलो मी… की माझी सोन्यामुळे अशी हायफाय ओळख जनमानसांत झालीय वगैरे वगैरे.. पण कसचं काय.... सोन्याचा भाव, चमच्यासाठी लागणारे सोन्याचे वजन आणि रोख रक्कम यांची गणिते मांडताच आजीबाईवर फेफरे यायची वेळ आली आणि बारशात आमची सोन्याऐवजी चांदीने बोळवण झाली.
तर अशी ही माझी कैफियत आज तुम्हासमोर मांडली आहे, बघा जमल्यास व इच्छा असल्यास मला मदत करा आणि नाही जरी मदत करता आली, तरी काही हरकत नाही. मी काही तुमच्या कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करायला येणार नाही आणि तुमच्याच भाषेतील चमचेगिरी? ती तर त्याहूनही नाही करणार. माझं रडगाणं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद येतो आता, संध्याकाळच्या जेवणाची वेळ होत आली, लवकरात लवकर कढई गाठायला हवी.