..
पाचूच्या रानात पुन्हा बासरी घुमली
सागरनिळाई ओल्या दिठीत सजली
हरपली राधा मनी मोरपंखी साज
मेघियात दाटू आले कान्हाचे आभास
सोनसळी हूरहूर अंतरी दाटली
हसुनिया पळभर सांज रेंगाळली
निमिषात पानोपानी कान्हा उमलला
आभासछबीत कान्हा राधेस भेटला
वा-यावर लहरली जणू रूणझूण
मेघातून दाटू आले निळे-श्याम क्षण
पाखरांच्या चाहूलीचा करुनी बहाणा
वेध घेई राधा..म्हणे आला यदुराणा..
प्राण आसावला तरी चाहूल देईना..
निजू पाहे सांज तरी श्रीरंग येईना
यमुनेचे नीर नयनात भरू आले
मोरपीसावरी दोन मोती विसावले
वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा
सरसर सरींसवे आला प्राणसखा..
सरसर सरींसवे आला प्राणसखा..