हे डाएट तीन भागात केले जाते असे म्हणता येईल.
डाएटच्या पहिल्या भागात पूर्वी सांगितलेल्या आहारातून कर्बोदके कमी करून स्निग्ध पदार्थ वाढवायचे आहेत; पण ते चवदार लागते
म्हणून दिवसभराच्या एकूण कॅलरीजचे भान ठेवायचे. सुरुवातीच्या काळात भूक लागली की हाताशी सुकामेवा ठेवायचा. सुरुवातीच्या काळात प्रमाणात पाणी पिण्यावर लक्ष द्यायचे. प्रमाणात अशासाठी की अगदी मिनिटा मिनिटाला, तहान लागलेली नसताना दिवसाचे टार्गेट पूर्ण करायचे म्हणून, गरज नसताना ४-५ लिटर पाणी पिणे योग्य नाही.
पहिले १२ ते १६ आठवडे हा डायटचा पहिला टप्पा करायचा असतो. त्यात आपल्याला योग्य आहार घेण्याची सवय लागते. ऊठसूट भूक लागणे बंद होते. दर दोन तासाला खाणे, जे चुकीचे आहे ते सरावाने बंद होते. दोन जेवणांत किंवा खाण्यांत साधारण ४ तासांचे अंतर असावे.
नंतर दुसऱ्या टप्प्यात ज्याला इंटरमिटंट (intermittent) फास्टींग म्हणतात त्यात शरीराला जास्त कालावधीसाठी उपाशी राहाण्याची सवय लावायची असते म्हणजेच दोन खाण्यातले अंतर वाढवायचे. ह्यात दिवसाचे दोन भाग करायचे ज्यात एक तर 'न खाणे' किंवा 'हलका आहार घेणे' आणि दुसऱ्या भागात 'पोटभर जेवणे'. समजा रात्रीचे जेवण तुम्ही रात्री ८ वाजता केलेत तर आणि सकाळचा नाश्ता सकाळी ८ वाजता केलात तर हे दिवसाचे दोन भाग १२- १२ तासांचे झाले. मग दुसऱ्या दिवशी किंवा २ दिवसांनी सकाळचा नाश्ता १० वाजता घ्यायचा. सकाळी उठल्यावर एक कप चहा किंवा लिंबू पाणी किंवा एक पेरू असा हलका आहार घ्यायचा. परत दोन दिवसांनी सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवणच १२:०० वाजता घ्यायचे; तोवर हलका आहार घ्यायचा. असे करत करत दिवसभरातल हलका आहार घेण्याचा कालावधी वाढवत न्यायचा.
इंटरमिटंट फास्टींगचा हा एक प्रकार झाला. तुम्हाला हे झेपणारे नसेल तर २ दिवस पहिल्या टप्प्यात घेतो तसा नियमित आहार घ्यायचा आणि दोन दिवस हलका आहार घ्यायचा. किंवा आठवड्यातून एकदा कडकडीत उपवास करायचा. एकादशीसारखा नाही (काय योगायोग आहे, हे लिहिताना आज नेमकी आषाढी एकादशी आहे.) तर रमादान सारखा किंवा जैन करतात तसा उपवास.
तिसरा टप्पा म्हणजे मेंटेनन्स डाएट. तुमची साखर मूळ पदावर आली म्हणजे नॉर्मल आली की परत हळूहळू आहारात कर्बोदके वाढवायची. जसे की नट्सचे प्रमाण वाढवायचे, रताळी खायची, साखर - मैदा सोडून इतर पदार्थ जसे की जरासा भात, एखादी चपाती असे करत आहार मूळ पदावर आणायचा.
मी अद्याप मधुमेहमुक्त झालेली नाही. पण डायबेटीसवरून प्रीडायबेटीस असा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. मी ह्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतच राहणार आहे. मी भविष्यात ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट जरी पास केली तरी मी आता यापुढे साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ यांच्यापासून हातभर दूरच राहणार आहे.
हल्ली बऱ्याचदा दिसते की पॅलिओचा मसाला, महागडे बदाम (कारण ते खास हिमालयातून येतात), अमुक एखादी गोष्ट, खास तुम्ही हा डाएट करता म्हणून शुद्ध, चांगल्या प्रतीच्या नावाखाली खपवणे, दिसून येते आहे. मी तरी ह्याला बळी न पडण्याचे ठरविले आहे.
ज्यांना हृदयाचे विकार आहेत, बीपीचा त्रास आहे त्यांनी हे डाएट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांच्या नियंत्रणाखालीच करावे. थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर हे ही वर्ज्य करावे.
तुम्हाला मधुमेह नाही पण वजन कमी करायचे आहे तरी हा डाएट तुम्ही करू शकता. ह्यात तुम्हाला अधूनमधून काही फळांचा समावेश करता येऊ शकतो.
प्रत्येकाने आपल्या उपलब्धतेनुसार, आवडीप्रमाणे, प्रकृतीनुसार स्वतःचा दिवसभराचा डाएट ठरवावा.
डाएटची सवय होईस्तोवर माझा आहार साधारण असा असायचा
६:३० १ कप चहा
९:३० उकडलेली ३ अंडी
१३:०० तूप घालून केलेली झुकीनीची भाजी, ताक
१५:०० ग्रीन टी
१८:०० चहा
१९:३० लेमन चिकन, (काकडी, टोमॅटो, ऑलिव्ह, ऑऑ, व्हिनेगर) सलाड, आवळा सुपारी, जवस मुखशुद्धी,ओमेगा ३, व्हि. ई
६:३० १ कप चहा
९:३० भिजवलेले साधारण ५० बदाम
१३:०० २-३ अवाकाडोचे ग्लुकामोले, प्रोबायोटीक दही
१५:०० ग्रीन टी / काफे लात्ते विनासाखर
१८:०० मुठभर नट्स, चहा
१९:३० ३ अंड्याचे ऑम्लेट, (काकडी, टोमॅटो, ऑलिव्ह, ऑऑ, व्हिनेगर) सलाड, आवळा सुपारी, जवस मुखशुद्धी, ओमेगा ३, व्हि. ई
ज्यादिवशी मासे/ चिकन /अंडी खात नाही तेव्हा शक्यतो हेम्प प्रोटीन घेते.
आता डाएटची सवय झाल्याने
६:०० चहासोबतच क्रिस्प ब्रेड, चीज असा नाश्ता करते.
१२:०० ला जेवण
१८:०० ला चहा, अवाकाडो
२०:०० जेवण
लेक्चरनिमीत्त दुसर्या शहरांमध्ये जावे लागते तेव्हा जेवणात सलाड विकत घेते( उ. अंडी, ऑलिव्ह, चीज, गाजर, पाप्रिका, ब्रोकोली)
या विषयात मी तज्ञ नाही हा केवळ माझा अनुभव आहे. आपल्यास काही शंका असल्यास माझ्यापरीने त्यांचे निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
प्रमाणलेखन सुधारणेसाठी मदत केल्याबद्दल अदितीचे मन:पुर्वक आभार!