भाग १ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

हा ट्रेक घडायला तशी बरीच कारण घडली. एक कारण म्हणजे सिनेमातल्या हिरॉईनिंना जसा ‘आपले बालवय संपून आपण तारुण्यात प्रवेश केला आहे’, हा शोध अचानक लागतो, तसा मला आणि माझ्या मैत्रिणींना आपण आता चाळीशी पार केली आहे, असा महत्त्वपूर्ण शोध एका महान दिवशी लागला. आता आपल्याला ट्रेकिंग करायला थोडीच वर्षे राहिली, दरवर्षी एक तरी ट्रेक झाला पाहिजे, असा ठराव एकमताने मंजूर झाला.

अजून एक कारण म्हणजे माझा मुलगा तसचं बाकी मैत्रिणींची मुलं, ह्या सुट्टीत मोकळी होती. सगळ्यांची १० वी- १२ वी अशी महत्त्वाची वर्षे नुकतीच संपली होती. सुट्टीतले क्लासेस आणि तत्सम अडचणी नव्हत्या. त्यामुळे मुलांच्या आघाडीकडून एकदा सगळे मिळून ट्रेकला जाऊया, अशी मागणी जोर धरायला लागली.

आमची परदेशी वास्तव्यास असलेली बालमैत्रीण, अश्विनी, भारतात त्याच सुमारास सुट्टीवर येणार होती. ती सुट्टीवर आली की आम्ही नेहमीच भेटतो. पण तसा थोडाच वेळ. ह्यावेळेला ती आणि तिची मुलगी अनुजाही आमच्या बरोबर येणार, अस ठरल्यावर आम्ही मार्च महिन्यात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायच्या बेतात होतो. पुणे मनपाच्या इमारतीवर रोषणाई करण्याचा बेत, आचारसंहिता लागू झाल्यामुळे नाईलाजाने रद्द करावा लागला!!

एकदा हे सगळ ठरल्यावर नक्की कुठे जायचं हा विचार सुरू झाला. २०१३ च्या जून महिन्यात उत्तराखंड आणि परिसरात निसर्ग कोपला होता. बरेच ट्रेक-रूट बंद झाले होते. तिथे जाता येईल की नाही, ह्याबद्दल थोडी अनिश्चितता होती. आत्तापर्यंत केलेल्या भटकंतीत काही ट्रेक माझे तर काही मैत्रिणींचे झालेले होते. त्याच त्याच जागी पुन्हा जाण्यापेक्षा नवीन जागा पहावी, अस वाटत होत.
आमच्या ग्रुपमधले काही मेम्बर हिमालयातला ट्रेक प्रथमच करणार होते. अश्विनी तिच्या सुट्टीच्या भरगच्च कार्यक्रमात हा ट्रेक अक्षरशः कोंबणार होती. शाळेपासूनच्या मैत्रिणींबरोबर असे आणि इतके दिवस घालवण, ही कल्पना सगळ्यांसाठीच खूप छान असली, तरी तिचे सुट्टीचे दिवस मोजलेले होते. तिच्या माहेर-सासरचे लोकं तिच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असणार. त्यात किती दिवस ट्रेकमध्ये घालवायचे? हा एक महत्त्वाचा पण अवघड प्रश्न होताच.

ह्या सगळ्या कारणांमुळे हा ट्रेक थोडा सोपा असावा आणि फार दिवस लागतील असा नसावा, अस वाटलं. सोपा असला म्हणजे कँपवर पोचल्यावर गप्पा मारायला, पत्ते खेळायला वेळ आणि ताकद शिल्लक राहील, अस वाटत होत. हिमालयातल्या ट्रेकला बेस कँपला पोचायला आणि परतीला दोन-दोन दिवस जातातच. ते कमी करायचे, तर विमानाने दिल्लीपर्यंत आणि रात्रीचा ट्रेनचा प्रवास, हीच आयडिया करायला लागणार होती. एकदा हे नक्की झाल्यावर बऱ्याचशा जागा आपोआपच रद्द झाल्या. शेवटी चर्चांच्या असंख्य फेऱ्या पार पाडून उत्तराखंडमधील ‘पिंढारी ग्लेशियर’ ही जागा नक्की झाली. तो रुट काहीसा बदलून पुन्हा सुरू झाला आहे, अस समजल्यामुळे सगळे उत्साहाने तयारीला लागले.

खरं तर आम्ही काय पहिल्या ट्रेकला जात नव्हतो. पण इतके दिवस गेलो होतो ते यूथ हॉस्टेल किंवा तत्सम संस्थांच्या, ज्याला ट्रेकच्या भाषेत ‘सर्व्हायव्हल’ ट्रेक्स म्हणतात अश्या ट्रेकना. तिथे आपल्या बाजूने ठरवा-ठरवी करायला फारशी संधी नसते. त्यांच्या बॅचेस आणि वेळापत्रक ठरलेलंच असत. आपण आपल्या सोयीची बॅच निवडायची, पैसे भरून आपली जागा पक्की करायची, की संपल. फक्त घर ते बेस कॅम्प आणि परतीच्या प्रवासाची जुळणी करावी लागते.

इतकचं ठरवायचं असल, तरी त्या निमित्ताने आम्ही असंख्य पर्यायांचा विचार करतो आणि त्याबद्दल भरपूर चर्चाही! ट्रेन की विमान, ही ट्रेन की ती, चेअरकार की स्लीपर, एक न दोन.. बर, कोणाची कशाला हरकत असते, असही नाही. थोडे जास्त पैसे खर्च झाले किंवा ह्या सगळ्यात काही गडबड झाली, तरी तक्रार नसते. पण चर्चा झाल्या नाहीत, तर आम्हाला काही मजा येत नाही, हे मात्र खर!!

बऱ्याच चौकशा केल्यावर ह्या ट्रेकला कुमाऊँ मंडळ विकास निगम बरोबर जायचं, अस ठरल. युथ हॉस्टेल्सपेक्षा महाग , पण सोयी जास्त. राहण्याच्या, खाण्या-पिण्याच्या सोयी चांगल्या. ट्रेकिंगच्या भाषेत चैनच. अशाही संस्था असतात, हा शोध तसा नवीनच होता. आपला ४-५ लोकांचा ग्रूप असला, तरी राहणे, जेवण तसेच सामानासाठी पोर्टर किंवा खेचर, गाईड ही सगळी सोय ह्या संस्थेमार्फत केली जाते. ह्या प्रकाराच्या ट्रेकला 'टी-हाऊस' ट्रेक म्हणतात, अशी आमच्या ज्ञानात कोणीतरी भर घातली.

सुरवातीला ओळखीतल्या, नात्यातल्या बऱ्याच लोकांनी ‘आम्ही येणार’ अस भरघोस आश्वासन दिल होत. पण काहीना काही कारणांनी एक-एक जण गळत गेले. कधी १५ तर कधी ७ अश्या बेरजा वजाबाक्या होत होत अखेर आमचा ९-१० लोकांचा ग्रुप पक्का झाला. त्यात चाळीसच्या वरच्या चार बायका आणि वीसच्या खालची पाच मुल असा ग्रुप पक्का झाला. त्यातले सात मेम्बर पुण्यातले आणि दोन अमेरिकेतले होते!

ह्या ट्रेकमध्ये तर गोष्टी ठरवायला आम्हाला अमाप संधी होती. कुमाऊँ वाल्यांच्या काही ठरलेल्या बॅचेस आणि वेळापत्रक नव्हत. आम्ही म्हणू त्या तारखा, आम्ही ठरवू ते वेळापत्रक. अर्थातच चर्चा करायला प्रचंड वाव होता. कधी भेटूया हे ठरवायला भेटणे इत्यादी गमतीदार प्रकार सुरु झाले. घरी / ऑफीसमध्ये / रेस्तराँमध्ये अश्या चर्चांच्या फेऱ्या झाल्या. मुलांच्या परीक्षांच्या, आमच्या रजांच्या, अश्विनीच्या सुट्टीच्या वेळापत्रकाची असंख्य वेळा उजळणी झाली. कामाच्या मिटींगमध्ये पुढचं काही नियोजन करताना, ‍त्यातल्या काही तारखांचा उल्लेख झाला, तर ‘हो, म्हणजे मुक्ताची परीक्षा संपेल, त्या दिवशी बांधकाम संपेल’ अश्या गोष्टी मनात येऊन, पुढच्या कामाकडे लक्ष लागेना! ते उल्लेख अनवधानाने क्लायेंट किंवा सहकाऱ्यांसमोर होऊ नयेत, अशी काळजी घ्यायला लागत होती!!

मला हा ट्रेकच्या प्लॅनिंगचा काळ अगदी मनापासून आवडतो. थोड्याच दिवसात आपलं नेहमीचं ‘उठा- स्वैपाक करा-तयार व्हा-ऑफिसला जा-स्वैपाक करा-झोपा’ हे रुटीन सोडून लांब जायचं असत. तिथे ना मोबाईल चालत, ना टीव्ही असतो. त्यामुळे दिवसभर चालणे आणि नंतर गप्पा मारणे, हाच करमणुकीचा कार्यक्रम! जवळच्या पाठपिशवीत असेल, तेवढीच आपली संपत्ती. उठायचं आणि चालायचं, जेवायचं आणि झोपायचं. साधा-सरळ कार्यक्रम. सतत उद्याच्या काळज्या, पुढच्या तयाऱ्या करून गळून गेलेल्या मनाला अगदी भरपूर विश्रांती मिळणार असते. त्या आनंदात आधीपासूनच अगदी मोकळ-ढाकळ वाटत असत. ट्रेकच-ट्रेनच नुसत बुकिंग चालू असतानाच तिकडची स्वप्न पडायला लागतात.

ह्या वेळी सोबतही फार छान होती. समजायला लागायच्याही आधीपासूनच्या मैत्रिणी, त्यांची मुलं आणि माझा मुलगा बरोबर होते. म्हणजे माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही होते! ज्यांच्या सहवासात कुठलाही आव आणावा लागत नाही, हिशेब करावे आणि द्यावे लागत नाहीत, असा हा ग्रुप होता. रोजच्या धकाधकीत एका गावात राहूनही मैत्रीणीना भेटायला जमत नाही. मग सातासमुद्रापलीकडे गेलेल्या मैत्रिणीला किती भेटता येणार? ह्या निमित्ताने १०-१२ दिवस सतत बरोबर राहता येणार!! ह्या कल्पनेने झालेल्या आनंदाने अगदी वेडावून टाकलं होत. त्या मैत्रिणींच्या सहवासात परत एकदा लहान व्हायची सुवर्णसंधी होती.

पृथ्वीप्रदक्षिणा करायची असेल तरी पडू शकणार नाहीत, असे असंख्य प्रश्न आम्हाला पडायचे. मग फोनाफोनी. तेवढ्याने नाही भागलं, तर शंकासमाधान करण्यासाठी कुमाऊँच्या ऑफीसमध्ये फेरी! आम्ही ट्रेकला निघाल्यावर ‘गेल्या ह्या बायका एकदाच्या,’ ह्या आनंदात कुमाऊँच्या पुणे ऑफिसने नक्की पार्टी केली असेल. अस करता करता शेवटी एक-एक करत सगळी बुकिंग, रिझर्वेशन्स झाली, सर्वसाधारणपणे सगळ्या शंकांच निरसन झालं आणि सात जूनला आमचा हा नवरापात्र-विरहीत ट्रेक सुरु होणार हे नक्की झाल!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle