भाग २ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

पुणे - मुंबई सेंट्रल - दिल्ली - काठगोदाम (७ आणि ८ जून २०१४)

सात जूनला सर्व पुणेकर मंडळी स्वारगेटला जमली. प्रवासाला जाणारे जास्त आनंदात की सोडायला आलेले, ह्याचा निर्णय होत नव्हता! भारतात एशियाड झाल्याला आता तीस वर्षे होऊन गेली, तरी राज्य परिवहनने ‘एशियाड बसच्या’ स्वरुपात ती स्मृती सांभाळून ठेवली आहे. तश्या एशियाड बसमध्ये आमचं रिझर्वेशन होत. सिंहगड एक्प्रेसच तिकीट डेक्कन एक्सप्रेसला वापरलेलं रेल्वेवाल्यांना आजिबात, मुळीच, कधीही चालणार नाही. पण रा.प. वाली मंडळी दयाळू असतात. साडेअकराच्या बसचं तिकीट काढलेलं होत. पण साडेअकराला इथे जी बस उभी होती, ती वेळापत्रकाप्रमाणे पावणेअकराची होती. मास्तरांनी आम्हाला त्या बसमध्ये आमच्याच सीटवर बसून घ्यायला सांगितलं!! कुठल्यातरी बसचं तिकीट काढलंय ना, झालं तर मग.. असा उदार दृष्टीकोन ठेऊन त्यांनी आमची व्यवस्था केली.

बसची रिझर्वेशन्स मी केली होती. स्वारगेटला येऊन मी समजा ‘अग, मी तिकीट घरीच विसरले’ असं म्हटल असतं, तर मैत्रीणी ‘हो का, असुदे. आपण परत काढू तिकीट.’ असं म्हटल्या असत्या ह्याची पूर्ण खात्री होती, इतका मोकळेपणा वाटत होता. पुढचे दहा-बारा दिवस कितीही गोंधळ, बावळटपणे करायला मोकळीक होती. शहाण्यासारखं, जबाबदारीने वागायचं ओझं नसल्याने हलकं-मोकळं वाटत होत!

पुणेकर सोडून उरलेली मंडळी ठाण्याहून यायची होती. कितीही आधीपासून तयारी केली, तरी बसमध्ये बसल्यावर आठवणींचे कोंब मेंदूला फुटतातच. मग फोनाफोनी झाली. जास्तीचे सेल, क्लोरिनचे ड्रॉप्स, सुईदोरा, कॅरीबॅग्ज अश्या असंख्य ऑर्डर गेल्या. त्या दोघी ठाण्याहून निघाल्या, अस कळल्यानंतर ऑर्डर थांबवाव्याच लागल्या.

मुंबई सेंट्रलला अश्विनी व तिची कन्या भेटल्या. अश्विनी तब्बल दोन वर्षांनी भेटत होती. त्यामुळे भरतभेटीसारखा एक छोटासा कार्यक्रम झाला! रेल्वेच्या कृपेने सर्वांची रिझर्वेशन्स एकाच डब्यात आली होती. नाहीतर सांस्कृतिक सरमिसळ व्हावी व नवीन लोकांच्या ओळखी करून घ्यायला उत्तेजन मिळाव म्हणून रेल्वेवाले शक्यतो ग्रूप मोडून सगळ्यांना वेगवेगळ्या डब्यात नाहीतर कंपार्ट‌चमेंटमध्ये तरी विखरून टाकतात.

सर्व मुल एका कंपार्ट‌ मेंटमध्ये आणि महिला मंडळ दुसऱ्या कंपार्ट‌तमेंटमध्ये अशी व्यवस्था झाली. राजधानीने वेग घेतला. आमच्याही साठलेल्या गप्पा जोरात सुरू झाल्या. चौघींपैकी आम्ही तिघीजणी एका शाळेतल्या, एका वर्गातल्या, एका गल्लीतल्या मैत्रिणी. कॉमन मित्र-मैत्रिणी, ओळखीचे प्रचंड लोकं. ह्या गटातली नसलेली मैत्रीण होती मंजिरी. ती कंटाळून जाणार, ह्याची गॅरेंटी होती. त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही तिघींनी तिला कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूल, कल्याण, येथील माजी विद्यार्थी संघाचं ‘मानद सदस्यत्व’ समारंभपूर्वक दिल! संपूर्ण ट्रेकभर आम्ही तिला शाळेतल्या इतक्या स्टोऱ्या ऐकवल्या, की आता तिला कधी आमच्या शाळेतलं कोणी भेटलं, तर हीच त्यांना चार गमतीच्या गोष्टी ऐकवू शकेल!

मुंबईतील एकेक स्टेशन्स मागे जात होती. कॉलेजला असताना हा नेहमीचा प्रवास होता. त्या आठवणी ताज्या होत होत्या. हल्ली वेळेच्या अभावी बरेच प्रवास हवाई मार्गानीच होतात. पुष्कळ वर्षांनी रेल्वेचा लांबचा प्रवास घडत होता. पाय लांब करून बसणे, बाहेरची पळती दृश्य पाहणे, सगळ्यांची रिझर्वेशन असली तरी बऱ्याचशा जागा रिकाम्या ठेवून सगळ्यांनी थोड्या जागेत दाटीवाटीने बसणे, ही सुखं विमानप्रवासात मिळत नाहीत. ह्या सगळ्याची मजा घेत होतो. वसई सुजाताच्या मामाचं गाव आणि डहाणू माझ्या मामाचं गाव. त्यामुळे हा प्रवास नेहमी ‘मामाच्या गावाचा’ प्रवास असायचा. वसईच्या मोठ्या, रुंद पात्र असलेल्या खाड्या पार केल्या, की डहाणू जवळ आलं अस वाटत असे. पण आता सुजाताचाही मामा नाही आणि माझाही. संपलच ते सगळं....

प्रवासाचा हा पहिलाच टप्पा होता, अजून पुढे बराच पल्ला गाठायचा होता. ती थोडी हुरहूर असतेच. पण तरी मस्त वाटत होत. अश्विनीशी आत्तापर्यंत फोन किंवा मेलवरच संपर्क झाला होता. तिला पुढची माहिती देणे व तिच्या प्रश्नांना थोडक्यात किंवा सविस्तर उत्तरे देणे हा एक कार्यक्रम झाला. राजधानीत खाण्या-पिण्याची चैन असल्यामुळे मेथीचे पराठे, बटाट्याची भाजी, गोड शिरा, दहीभात हे प्रवासी जेवणाचे डबे बरोबर घेणे, ते बॅगेत सांडणे, पदार्थ उरणे; इत्यादी नेहमीच्या (अ)यशस्वी कार्यक्रमातून सुटका झाली होती. राजधानीवाले दर अर्ध्या तासाने काहीतरी खायला आणून देत होते. आम्ही इतकं सगळं खाऊ नाही शकलो, तरी पाच तरूण आणि अत्यंत खादाड मुलं बरोबर होती. त्यांना ‘पोट भरल्याने खाता न येणे’ असले क्षुल्लक प्रश्न पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी मजा करून घेतली.

एव्हाना एकमेकांच्या मोबाईलची माहिती घेऊन झाल्यामुळे मुलांनी उनो खेळणे सुरू केलं होतं. त्यांच्या हसण्याच्या आणि बोलण्याच्या टीपेच्या आवाजामुळे वैतागून राजधानीतून आपल्याला नक्की कुठच्या स्टेशनवर उतरवून देतील? अशा पैजा आम्ही लावत होतो. ह्या मुलांना न्यायचं असेलं, तर दुरांतो इतकी चांगली (मध्ये थांबतच नसल्याने!) दुसरी गाडी नाही, ह्यावर आमचं एकमत झालं.
सहप्रवासी सहनशील असल्याने आम्हाला दिल्लीपर्यंत प्रवास करता आला! आम्ही ह्या राजधानीतून त्या राजधानीत पोचलो. पुढची ट्रेन पाच तासांनी होती. हजरत निजामुद्दीन ते पुरानी दिल्ली असा एक टप्पा पार पडायचा होता. आमचे मुंबईकर संस्कार उफाळून आल्याने, तो प्रवास आम्ही लोकल ट्रेनने करायचा ठरवला.

मुंबईतल्या लोकांना तिथल्या(च) लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असते, असा अभिमान असतो. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे, की त्यांनी दिल्लीच्या लोकलने एकदातरी प्रवास करून पहावा. ह्या प्रवासाची चव वाढवण्यासाठी मीठमसाला म्हणून आमच्याबरोबर प्रत्येकी दोन असे सामानाचे डागही होते. मग काय विचारता, तुंबळ गर्दीत आम्ही मनात ‘हरहर महादेव’ असा गजर करून आत शिरलो. ती ट्रेन ‘पुरानी दिल्ली’ स्टेशनला जाते की नाही, ह्याबद्दलच पब्लिकला खात्री नव्हती. शेवटी बरेच एका वाक्याचे, सविस्तर स्पष्टीकरणाचे असे निरनिराळे प्रश्न सोडवून, ट्रेन ‘पुरानी दिल्ली’ला जाणार असा निर्णय झाला. ट्रेनमध्ये पाण्याचे पाऊच, खोबऱ्याचे तुकडे, तळलेले पापड असे चमत्कारिक पदार्थ विकायला येत होते. अश्या अर्ध्या तासाच्या रोमांचकारी प्रवासानंतर आम्ही पुरानी दिल्लीच्या फलाटावर ढकलले गेलो.

सगळीकडे प्रचंड गर्दी होती. भीषण उकाडा. माणसं, प्राणी आणि वस्तूंच्या वासाच्या मिश्रणातून तयार झालेला रेल्वे स्टेशनवरचा एक खास भारतीय वास. असा बराच वेळ काढायचा होता. प्रतीक्षागृहात मुंग्यांना सुद्धा आत शिरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, इतकी गर्दी होती. मग आम्ही एका वातानुकुलीत खान-पान गृहाला आमचं प्रतीक्षागृह बनवलं! एका वेळेला एकाने एकच डीश मागवायची. ती संपली की दुसऱ्याने. अस करत तो कंटाळवाणा वेळ ढकलला.

पुढची काठगोदामपर्यंत जाणारी ट्रेन एकदाची फलाटाला लागली. त्याच्या कुर्सी-यान मध्ये स्थानापन्न झालो. बाहेरची दृश्य झरझर बदलत होती. आता मोठ्या इमारती मागे पडून बसकी घर, शेत दिसत होती. हिमालयाचा मात्र अजून पत्ता नव्हता. कधी एकदा ह्या त्रस्त करणाऱ्या उकाड्यातून गारव्यात जातोय, अस झालं होत. रात्री उशीरा काठगोदामला पोचलो. हे त्या मार्गावरील शेवटचे स्टेशन आहे. कुमाऊँ मंडळाचा माणूस इतक्या रात्री आम्हाला घ्यायला रेल्वे स्टेशनवर आला होता. त्याने हसतमुखाने ‘नमस्ते’ म्हणत आमचे मनापासून स्वागत केले आणि त्याचा तो हसरा, उत्साही चेहरा पाहून आपण पुणे, मुंबई, दिल्ली सगळं मागे टाकून देवभूमी उत्तराखंडात पोचल्याची खात्री वाटली!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle