भाग ३ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

काठगोदाम – बागेश्वर – लोहारखेत (९ जून २०१४)

२०११ मध्ये कैलास-मानस यात्रा केली तेव्हा कुमाऊँ मंडळाच्या ह्याच गेस्ट हाऊसमध्ये जाता-येता दोन्ही वेळा जेवायला थांबलो होतो. जाताना यात्रा कशी होईल ह्या विचाराने काळजी दाटून आली होती आणि येताना ‘आज यात्रेचा शेवटचा दिवस’ ह्या कल्पनेने गलबलायला झालं होत. परत येताना एका छोट्या पण अत्यंत हृद्य कार्यक्रमात यात्रा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे इथेच मिळाली होती. त्याच जागी तीन वर्षानंतर आले होते. यात्रेच्या, सहयात्रींच्या आठवणी येत होत्या. जागा तीच असली, तरी ह्या वेळेला ग्रूप, जायची जागा आणि प्रवासाचा मूड.. सगळच वेगळ होत.

आज आम्हाला बागेश्वर पर्यंत जीप किंवा बसने जायचं होत. तिथे पोचल्यावर कुमाऊँ मंडळाच पॅकेज सुरू होणार होत. तिथे पोचल्यावर दुपारच जेवण आणि जास्तीच सामान जमा करणे हा कार्यक्रम उरकला, की पुढे जीपने ‘सॉंग’ ह्या गावापर्यंत जायचं होत. तिथून आमची चालायला सुरवात होणार होती. तीन किलोमीटर चालल्यावर लोहारखेत ह्या गावी मुक्काम होता.

रात्री सगळी बच्चा कंपनी ‘लवकर उठवू नका’ अस (रोजच्या सारखच) सांगून झोपली होती. पण प्रवास आणि ट्रेकच्या उत्सुकतेने कोणी फार उशीरापर्यंत झोपू शकले नाहीत. भराभरा जागे होऊन आणि पुढे बाथरूम्स कधी आणि कश्या मिळतील, ह्याची खात्री नसल्याने अंघोळी उरकून सगळे चकाचक तयार झाले.

बसअड्डा गाठतो, तर बागेश्वरला जाणारी बस आमची वाटच पाहात असल्यासारखी थांबली होती. बसच्या वाहकाने घाईघाईने आमच सामान टपावर चढवल सुद्धा. लगेच बस मिळाल्यामुळे आम्ही अगदी आनंदात आतमध्ये शिरलो. मात्र बसायला जागाच दिसेना. कंडक्टरने जादू करून त्या गच्च भरलेल्या बसमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी, मागे अश्या विविध ठिकाणी जागा निर्माण केल्या आणि आम्ही तिथे स्थानापन्न झालो. आमच्या नऊ जणांच्या गँगमधे हमखास बस लागणारे, आजिबात बस न लागणारे, आणि वेळ-प्रसंग बघून ह्या पार्टीतून त्या पार्टीत जाणारे ‘आयाराम-गयाराम’ असे तीन प्रकार होते. पहिल्या गटातल्या लोकांना सन्मानाने चांगल्यात चांगल्या जागा (आणि प्लास्टीकच्या पिशव्या!!) दिल्या गेल्या. तिसऱ्या गटातले लोक ‘मन्नू, तेरा हुआ, अब मेरा क्या होगा,’ अशा विचारात केविलवाणे चेहरे करून बसले होते. दुसऱ्या गटातले लोकं आरामात उर्वरीत जनांचे आंबट चेहरे बघत होते!

थोड्याच वेळात सपाट रस्ता संपून वळणा-वळणाचे पहाडी रस्ते सुरु झाले. ही बस अगदी ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ ह्या प्रकारातली असल्याने दारोदार थांबून प्रवासी चढत- उतरत होते. खच्चून भरलेली बस, डिझेल आणि अन्य वास, गैरसोयीच्या सीट, सगळच नकोनकोस होत. आम्हाला पुण्यात कळलं होत, की काठगोदाम ते बागेश्वर ४-५ तास लागतात. जेवायच्या वेळेपर्यंत पोचू, अस वाटत होत. निघताना वेळेवर निघालोही होतो. पण बस फारच हळूहळू जात होती. दुपारपर्यंत पाच तास प्रवास झाला, तरी आम्ही फक्त अल्मोड्यापर्यंतच आलो होतो. म्हणजे साधारण अर्धच अंतर पार झाल होत.

उशीर होणार, अस लक्षात आल्यावर बागेश्वरला फोन केला, तर त्या लोकांनी ‘टॅक्सीने न येता बसने आल्याबद्दल आम्हाला रीतसर मूर्खात काढल. किती वेळ लागेल, ही चौकशी केली नाही, हे चुकलच होत आमच. त्यातून बस लागणाऱ्या मंडळींची अवस्था बिकट झाली होती. शेवटी सर्वानुमते आम्ही मधल्या एका गावात बसमधून उतरलो, आणि टॅक्सी करून बागेश्वरला पोचलो. बसचं तिकीट बागेश्वरपर्यंत काढलेलं होत. वर टॅक्सीचे वाढीव पैसे देऊन आम्ही आमची आधीच बाळसेदार असलेली अक्कलखाती अजून जरा गुटगुटीत केली!!

ठरलेल्या वेळेपेक्षा बराच उशीर झाला होता. आता आणखी हे लोक काय काय ऐकवणार? अशी भीती वाटत होती. पण तस काही झालं नाही. आमच्या बरोबर गाईड म्हणून येणार असलेले देवेन सर तिथे कधीचेच आलेले होते. त्यांनी भराभर सूत्र हातात घेतली. त्यांनी आम्हाला सगळ्यात आधी जेवून घ्यायला लावल. मग जमा करायचं सामान देणे, हे काम उरकलं. ‘आता सॉंग पर्यंत न जाता सरळ लोहारखेतपर्यंत जीपनेच जाऊया. काळोखात चालायला त्रास होईल’ असा सोपा पर्याय त्यांनीच सुचवल्याने आमचं टेन्शनच संपलं!

दोन जीपमध्ये आम्ही सगळे, आमचं सामान आणि शिधा असे लोहारखेतकडे निघालो. संध्याकाळ होत होती. जिकडे तिकडे डोंगर रांगा दिसत होत्या. कैलास यात्रेनंतर तब्बल तीन वर्षांनी हिमालयाची गळाभेट होणार होती. त्या दरम्यान एकदा सिक्कीमला फिरायला गेले होते. पण तो हिमालय नुसता दिसला होता, भेटला नव्हता. हिमालयातल्या नद्यांचे आवाज ऐकणं, तिथली शांतता मनात-कानात साठवणं, टुरीस्टी स्पर्श नसलेला निसर्ग डोळ्यात भरून घेणं, म्हणजे हिमालयाची खरी भेट. ती भेट उद्यापासून होणार होती.

पहाडातल्या वेड्यावाकड्या, अरुंद रस्त्यांवरून आमच्या जीपचा चालक वेगात गाडी चालवत होता. जोडीला शेजारच्या देवेन सरांशी गप्पा, मोबाईलवर बोलणेही चालू होतच! ड्रायव्हरच्या उजव्या हाताशी येईल अशी एक छोटीशी घंटा गाडीत बसवलेली होती. रस्त्यावर देऊळ दिसलं, की तो इथे घंटा वाजवायचा. व्हीलवरचे हात सोडून नमस्कार करण्यापेक्षा ही कल्पना नक्कीच बरीच सुरक्षित होती!

एखाद्या क्रॉसकंट्री ड्रायव्हरला लाजवेल अश्या वेगाने आणि कौशल्याने गाडी चालवत त्याने आम्हाला लोहारखेतला पोचवल. हा कँप अतिशय देखणा आहे. लांबवरचे डोंगर, दऱ्या दिसाव्यात अश्या बेताने ह्याची जागा योजली आहे. काळोख झाला होता. चंद्र उगवला होता. पौर्णिमा जवळ होती. कृत्रिम दिव्यांच जग आम्ही आता मागे टाकल होत. दृष्टीपथात येणारे सगळे डोंगर चंद्रप्रकाशात मऊ, मवाळ दिसत होते. रात्र बरीच झाली. उद्याला चालायला सुरवात करायची आहे, हा विचार डोक्यात होताच. त्यामुळे नजरबंदी करणारा तो नजारा डोळ्यात साठवून आम्ही उबदार खोल्यांमध्ये गुडूप झालो.

लोहारखेत – धाकुरी (१० जून २०१४)

ज्या साठी गेले २-३ महिने आम्ही अट्टाहास करत होतो, तो ट्रेकचा दिवस एकदाचा उजाडला! इतके दिवस ‘कधी हा दिवस उजाडतोय’ अशी आतुरतेने वाट बघितली होती. पहाटे उठून पुन्हा तशीच वाट बघितली, पण सूर्याची! कँपची जागाच इतकी छान होती, की बस. रात्रीच चंद्रप्रकाशातल दृश्य जास्त छान की पहाटेच कोवळ्या उन्हातल? इतकाच प्रश्न पडू शकत होता.

काल रात्री डोंगरांच्या फक्त बाह्यरेषा दिसल्या होत्या. आता दिवसाच्या उजेडात त्यांची प्रचंड उंची डोळ्यात भरत होती. ह्या कँपपर्यंत गाडीरस्ता आहे, त्यामुळे म्हातारपणीही इथे पोचता येईल. हे लक्षात घेऊन आम्ही, अजून वीस-पंचवीस वर्षांनी मैत्रिणींच संमेलन ह्या जागी करायचं, असा निर्णय पहाटेला घेऊन टाकला. ह्या पहाटेची स्वप्ने खरी होतात, अस म्हणतात. पहाटेच्या तीव्र इच्छा खऱ्या होतील, अशी आशा आहे!!

ह्या ट्रेकला जी बरीच चैन होती. राहण्यासाठी सुसज्ज खोल्या होत्या. जेवायला सुग्रास जेवण होत. जेवल्यावर ताट-वाट्या-डबे घासायचे नव्हते. जड सॅक आपण उचलायची नाही ही सगळ्यात मोठी चैन होती. प्रत्येकी १० किलो सामान खेचरावरून जाणार होत. त्यामुळे सगळ्यांनी आधीच ‘पोर्टर सॅक’ आणि ‘डे सॅक’ वेगळ्या करून ठेवल्या होत्या. चालायच्या अंतराचे आकडेही फार घाबरवणारे नव्हते.

सकाळची सगळी आन्हिके आवरून आम्ही चालायच्या तयारीने खाली आलो. देवेन सर तयारच होते. महाराष्ट्रातून पिंढारीला बरेच ट्रेक ग्रूप जातात. देवेन सर अशा कितीतरी ग्रूप बरोबर गाईड म्हणून गेले होते. त्यामुळे त्यांना जुजबी मराठी येत होत.

त्याच कँपवर कलकत्ता इथून आलेला ग्रुप मुक्कामाला होता. रात्रीच्या गप्पांमध्ये तो ग्रुपही हाच ट्रेक करणार असल्याच समजलं. त्या सगळ्यांनी एकसारखे पिवळे टी-शर्ट घातले होते. त्या ग्रूपच नामकरण आम्ही ‘पिवळा ग्रूप’ अस केलं. खरतर ह्या नावात काहीही कल्पनाशक्ती लढवली नव्हती. पण देवेन सरांना हे नाव फारच आवडलं. ते सगळ्यांना ‘हमारे बच्चोंने क्या बढिया नाम रखा है ‘पिवळा ग्रूप’..अस हसत ज्याला-त्याला सांगायचे.

सगळ्यांचा नाश्ता, चहा झाला. पाण्याचा बाटल्या भरणे हा एक रोमांचकारी कार्यक्रम झाला. रोमांचकारी का? ते पुढे येईलच. ट्रेकिंगचे बूट, टोप्या, गॉगल्स सगळा साजशृंगार करून झाल्यावर आम्ही चालायला सुरवात केली.

ट्रेकिंग ग्रूप बरोबर येणारे गाईड लोकं, आपण चढून चढून अगदी मरायला टेकू, असा चढ असला, तरी कध्धीही, चुकुनही तसं सांगत नाहीत. ‘शुरूमें थोडीसी चढाई है, उसके बाद तो कँपतक ढलानही ढलान है’ असं तोंडभर आश्वासन मिळालं होत. आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हतो. ‘सोप्पच तर आहे ना, मग अगदीच सावकाश येतो’ असं म्हणून चालायला सुरवात केली. आजचा टप्पा धाकुरीपर्यंत होता. नऊ किलोमीटर चालायचं होत.
सगळी मुलं झपाझप चालत कधीच पुढे निघून गेली. त्यानंतर रोज चालताना अशीच विभागणी व्हायची. मुलं पुढे आणि आम्ही मागे. ‘बच्चे लोग और दिदी लोग’ असं आमचं नामकरणही झालं होत.

मागचे दोन दिवस एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसणे आणि वेळ घालवायला खात राहणे, असे गेले होते. आता चालताना शरीर आनंदाने कुरकुरत होत. सुदैवाने हवाही चांगली होती. पाउस नव्हता. अगदी कडक, चटके देणार ऊनही नव्हतं. आसपास सुरेख अशी झाडी होती. मोकळ्या, स्वच्छ, प्रदुषणमुक्त हवेत श्वास घेतानाही किती चांगल वाटत. हिमालयातली ही करकरीत हवा आणि नीळभोर आकाश मला अतिशय आवडतं. इथली हवा नुकतीच तयार झाल्यासारखी, अस्पर्श असावी अस वाटत राहत!

चढाच्या रस्त्यामुळे मधेमधे थांबावं लागत होत. आमच्यासारख्या लोकांची सोय म्हणून ठीकठीकाणी ‘रेसटिंग पिलेष’ बांधल्या होत्या. तिथे नाही थांबलं, तर बांधणाऱ्यांना किती वाईट वाटेल, अशा विचाराने आम्ही प्रत्येकच ठिकाणी पाच मिनिटे टेकून त्यांना दाद देत होतो!

काही ट्रेकरूटवर ट्रेकर्स, स्थानिक लोकं ह्यांची वर्दळ असते. लहान लहान वस्त्या, गावे असतात. पण आजच्या रस्त्यावर असं काहीही नव्हत. आमचा ग्रूप आणि पिवळा ग्रूप इतकेच लोकं होतो. आम्ही ‘दिदी लोग’ जरी सावकाश चालत होतो, तरी पिवळ्या ग्रुपच्या पुष्कळ अंतर पुढे निघून गेलो होतो. डोळ्यावर गुंगी यावी, इतकी निरव शांतता होती. पक्ष्यांची शीळ ऐकू येत होती. लहान लहान झरे-ओढे वाहत होते. थोडक्यात म्हणजे अगदी यश चोप्रांच्या चित्रपटात शोभून दिसेल अशी जागा होती.

कधी अगदी गर्द झाडी, तर कधी हिरवीगार गवताची कुरणं असा सुरेख रस्ता होता. हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा डोळे तृप्त करत होत्या. सपाटी मात्र नव्हती. चढ होता. पण तोही फार थकवणारा नव्हता. आम्ही फार मागे तर पडत नाहीये ना, ही खात्री करायला देवेन सर अधूनमधून थांबत होते. आम्ही दिसलो, की पुन्हा भराभर चालून मुलांना गाठत होते.

आज माहितीपत्रकाप्रमाणे आम्हाला नऊ किलोमीटर चालायच होत. पण ती माहिती चुकीची होती, हे सिद्ध करणारा एक बोर्ड दिसला. त्यावर लोहारखेत पाच आणि धाकुरी पाच किलोमीटर असं लिहिलेलं होत! अर्थात ह्या आकड्यांना तसाही काही अर्थ नसतो. ते आपले असेच माहितीफलकाची शोभा वाढवण्यासाठी असतात. आपण आकड्यांचा विचार न करता एका पावलानंतर दुसर टाकत राहणे, हे उत्तम धोरण असतं.

थोड्याच वेळात आम्ही एका खोपट्याजवळ येऊन पोचलो. हिमालयन पद्धतीप्रमाणे इथे मॅगी, चहा-कॉफी, शीतपेयांची सोय होती. मुलांनी अर्थातच मॅगी आणि कोल्ड्रींक्स घेतली! घरच्या मॅगीपेक्षा पहाडात मिळणार मॅगी खूप चांगलं लागत, हे त्या पाचही मुलांनी इतक्या जोरात पटवून दिल, की आम्हाला ते पटावचं लागलं! पण ट्रेकिंगला गेल्यावर इतपतच मागण्या करता येतात, बाकी काही मिळतच नाही. त्यामुळे ही मागणी वाटाघाटींशिवाय मंजूर झाली.

मॅगी पॉइंटनंतर थोड्याच वेळात चढ संपला. त्या जागी एक चिमुकलं देऊळ होत. कोणीतरी भाविक पूजा-अर्चा करून गेला होता. नवस फेडायला बांधलेल्या घंटा वर टांगल्या होत्या. पताका फडफडत होत्या. साध-सरळ निरागस असं देऊळ आणि तसेच तिथले भक्त! श्रद्धा होती पण बाजार नव्हता.

इथून कँप तीन किलोमीटर आहे, अशी बातमी देऊन देवेन सर पुढे गेले. तिथे मोबाईलला रेंज मिळत होती. त्यामुळे घरी फोन करून सर्वांनी ‘आम्ही अजून आहोतही, आणि ठीकही आहोत’ अशी बातमी दिली. पुढे सगळा उताराचा रस्ता होता. आम्ही निवांत होऊन गप्पा मारत रस्ता उतरायला लागलो. थोड्याच वेळात कँप दिसायला लागला. आमच्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही जेवायच्या वेळेआधी पोचलो सुद्धा!

धाकुरी कँप

तिथे जाऊन पाहतो, तर पाचही मुलं हिरवळीवर एकीकडे खिदळत लोळत होती! काय झालं, ते सांगायलाही त्यांना हासणं थांबवता येत नव्हतं. बराच वेळानंतर हास्याच्या ह्या उकळ्या शांत झाल्या. कारण कळल्यावर आम्हीही हसायला लागलो. ते कारण असं होत की, मुलांना पोचून बराच वेळ झाला होता. आल्याआल्या मिळालेलं स्वागत-सरबत पिऊन ते लोळत होते. डोळ्यांवर गॉगल होते. अचानक मुक्ता म्हणाली,’ ए, आभाळात दिसतोय, तो सूर्य आहे की चंद्र?’ वाजला होता दुपारचा एक. आत्ता कुठला आलाय चंद्र? मग हा इफेक्ट नक्की कसला? सरबताचा की रस्त्यात खाल्लेल्या स्ट्रॉबेरीजचा? नक्की काय चढलं होत काय माहिती? हा विनोद ट्रेकभर तर पुरलाच पण अजूनही घरी काही विचित्र बोललं की ‘स्ट्रॉबेरी खाल्ल्या का?’ असा प्रश्न येतोच!

सूप अॉन द रूफ

हा कँपची जागाही सुरेख होती. आमच्यासाठी लगत बाथरूम्स असलेल्या दोन खोल्या होत्या. बसायला छानसा व्हरांडा होता. समोर मस्त लॉन होत. पिवळा ग्रूप आणि आम्ही एकाच कँपवर होतो, तरी राहण्याच्या जागा दूर होत्या. जवळच एक नवीन बांधलेलं गेस्ट-हाउस होत. चौकशी केल्यावर ‘वो डिलक्स गेस्ट-हाऊस बनाया है, उधर बॉयलर वगैरा सब है, अशी माहिती मिळाली. पण इथे जनरेटरची वीज संध्याकाळी दोन तास मिळते. बॉयलरचं काय करणार कोण जाणे?

आमच्या शेजारच्या खोलीत हा ट्रेक संपवून आलेल एक जोडपं होत. त्यांच्याशी गप्पा झाल्या. ते उत्तराखंडातच राहणारे होते. अनेक वेळा ह्या ट्रेकला येऊन गेलेले होते. त्यांचा प्रत्येक कँपवर आरामात थांबत थांबत जायचं, असा हेवा वाटण्यासारखा प्लॅन होता.

मुलांनी व्हरांड्यात पत्त्यांचा डाव मांडला. बदाम सातचा डाव सुरू झाला. कँपवरचे मदतनीस त्यांचा खेळ बघत होते. मुलांनी आग्रह केल्यावर खेळ समजून घेऊन तेही सामील झाले. पुढचे सगळेच्या सगळे डाव ही नवी मंडळीच जिंकली!!! मुलांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

रात्री जेवण झाल्यावर गाणी-बजावणी झाली. ‘संगीsssत-सरिता, भुले-बिसरे गीत आणि चित्रलोक- गाने नये जमानेके’ अशी विविधभारती झाली. झोपायची वेळ झाल्यानंतर टॉर्च, पाण्याची बाटली, कोल्ड क्रीम, लोकरी पायमोजे, स्कार्फ इत्यादी वस्तुंच्या शोधाशोधीत सॅक उपसल्या आणि परत भरल्या गेल्या, प्लास्टिक पिशव्यांचे कुरकुर आवाज करून झाले, दिवसभरातल्या मजेदार गोष्टींमधलं काहीतरी आठवून खुसूखुसू हसून झालं. आता करण्यासारखं अगदीच काही उरल नाही, तेव्हा नाईलाजाने सगळे झोपून गेले.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle