खेळण्याचे दिवस (भाग १)

खेळण्याचे दिवस (भाग १)

https://www.maitrin.com/node/1066 (भाग २)

दोन भावांबरोबर वाढल्यामुळे की काय माझ्यात टिपिकल "बायकी" समजले जाणारे गुणधर्म निदान त्या काळात तरी खूपच कमी असावेत. कारण "जरा तरी मुलीसारखं वागत जावं गं!" अश्या कळकळीच्या विनंत्या घरातल्या मोठ्या बायका.........म्हणजे आई, मावश्या, काक्या, माम्या, आत्या यांच्याकडून मिळायच्या.
लहानपणापासून हुंदडण्यात खूपच रस!

हुंदडण्याची अगदी जुनी आठवण म्हणजे आमच्या जुन्या घरातली. चुलत भावंडांबरोबर लंगडी खेळतानाची. तेव्हा केवढं तरी मोठं अंगण वाटायचं ते! आणि मोठ्या चुलत बहिणीला आऊट करायची पाळी आली की अगदी आव्हानच वाटायचं ते!
नंतर वयं वाढल्यावर जेव्हा जेव्हा सणासुदीला आमच्या आत्ताच्या घरातून जुन्या घरी जायची वेळ यायची तेव्हा तेव्हा ताई पुढे पळतीये आणि मी लंगडी घालत तिच्यापाठीमागे जीव तोडून, दात ओठ खाऊन लंगडतीये हे चित्र अगदी डोळ्यापुढे स्पष्ट दिसतं! आणि हेही जाणवतं की अरे..... हेच अंगण तेव्हा केवढं मोठं वाटायचं.


वडिलांनीही प्राथमिक शाळेत असतानाच कॄष्णा नदीत पोहायला शिकवलं. स्वता: सायकल शिकवली. घरासमोरच्या ग्राउंडवर लालचुटुक रंगाची, कमी उंचीची दुचाकी चालवणारी ५वी/६वीतली मी आणि घरातल्या कपड्यातच माझ्या सायकलच्या कॅरिअरला धरून माझ्याबरोबर स्वता: पळत ग्राउंडला चकरा मारणारे वडील असं एक चित्र अगदी स्पष्ट डोळ्यापुढे आहे.
आणि जोडीने घरापलिकडेच असलेल्या आमच्या शाळेच्या ग्राउंडवरच्या सिंगलबार, डबलबार यावरचं लोंबकळणं, आणि इतर व्यायामप्रकार चालूच असायचे. जे तेव्हा व्यायामप्रकार न वाटता, उलट गंमत म्हणून केलेला मैत्रिणीबरोबरचा टाइमपास असायचा. डबलबारवर समोरासमोर बसून अधांतरी सोडलेले पाय हलवत तासनतास गप्पा मारणाऱ्या स्कर्ट ब्लाऊजातल्या, कानावर घट्ट वेण्या आवळलेल्या दोन अर्धवट वयातल्या मुली अजूनही डोळ्यापुढे स्पष्ट दिसताहेत.


भाऊ आणि जवळपासची इतर मुलं... गोट्या, विट्टी दांडू, आबाधुबी, डबडा ऐसपैस, लपंडाव ......जे काही खेळतील त्यात अस्मादिक हिरीरीने सामील!
"एकलम खाजा

दुब्बी राजा

तिराणी भोजा

चारी चौकटी

पंचल पांडव"......................
.........हे गोट्या खेळतानाचे म्हटलेले मंत्र, भोवरा घुमवताना, संपूर्ण गति मिळून हाताच्या तळव्यावर भोवरा फ़िरल्यानंतर "अर्रे........नादी घुमाट्ट".......अशी मारलेली आरोळी.....हे सगळं अजूनही काही स्पष्ट काही अंधुक असं आठवतंय!
या मंत्रांमधल्या शब्दांच्या लयीच्या, नादाच्या मी प्रेमातच पड्ले होते.


गलीतून विट्टी कोलतानाचा आणि दांडूने विट्टी पार कुठल्याकुठे टोलवल्याचा तो अवीट आनंद. !
ही "गली" क्रिकेटमधली गली नसून विट्टीदांडू या पुरातन कालातच लोप पावलेल्या खेळातील "गल" या शब्दाचं रूप आहे. गल म्हणजे मातीत हातातल्या दांडूनेच केलेला वीतभर लांबीचा इंचभर खोलीचा खळगा. या खळग्यावर विट्टी आडवी ठेवायची आणि जोर लावून दांडूने लांबवर कोलायची. असो....... आणि हो.....हल्लीची पिढी या असल्या गावरान खेळाच्या आनंदाला मुकलीय............असा सूर मला मुळ्ळीच इथे काढायचा नाहीये बरं!

रविवारी न्हाऊन मोकळ्या लांबसडक केसांची(हो ...तेव्हा बहुतेक सर्व मुलींचे केस लांब असायचे.) बटवेणी घालून परिसरातल्या चिंचा पाडायला मैत्रिणीबरोबर जाताना स्कर्टच्या खिशात तिखटमिठाची पुडी घेतलीय की नाही ही खिसा चाचपून एकदा खात्री करून घ्यायचीच. आणि चढण्यासारखं झाड असेल तर चढायचंच!


घरांच्या ओळीत सर्वात शेवटच्या घरानंतर शाखेचं( RSS) ग्राउंड होतं. त्याची भिंत चांगली ५/६ फ़ूट उंच होती. ग्राउंडही खूपच मोठं होतं. संध्याकाळी तिथे संघशाखा भरायची. तिथून "नमस्ते सदा वत्सले मातृभूमी" चे धीरगंभीर आणि भारलेले, सामुदायिक स्वर ऐकू यायचे. फ़ार छान वाटायचं ते ऐकायला! तर या ग्राउंडवर भिंतीकडेला सतत बरेच मोठे वाळूचे ढीग असायचे.
आम्हा दोघी मैत्रिणींचा मुक्काम रविवारी दुपारी या ग्राउंडवरच असायचा. भिंतीवर बसून खूप गप्पा मारायच्या. आणि जोडीने या भिंतीवरून खालच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर एकदम अंग झोकून देऊन, मुद्दाम खूप उंचावून आणि जमेल तेवढ्या लांब अंतरावर वाळूत उड्य़ा मारायच्या. अगदी कंटाळा येईपर्यंत, किंवा घरची आठवण येऊन आईची बोलणी खावी लागतील, हा विचार येईपर्यंत!
पण ही उडी घेतल्यानंतर अगदी "हवेत विहार" ज्याला म्हणतात ते फ़ीलिंग यायचे, कधी अगदी पक्षी झाल्यागतही वाटायचं! आणि मन अगदी तृप्त व्हायचं!


कॅरम, पत्ते आणि बुद्धीबळ( कोण म्हणतं ....नावात काय आहे?) यासारखे बैठे खेळ कधीच आवडले नाहीत. माझी बैठ्या खेळांची मजल फ़ार फ़ार तर सापशिडी, काचाकवड्या, व्यापार, ल्यूडो या सीझनल खेळापर्यंतच होती. सीझनल म्हणण्याचं कारण हे की हे खेळ फ़क्त सुट्ट्यांमधेच आणि खूपजण जमले असतील तरच खेळले जात.


कधी कधी आम्ही मैत्रिणी मिळून गजगेही(सागरगोटे) खेळत असू. याला मात्र गुळगुळीत फ़रशी हवी. मग एख्खई, दुख्खई करत अगदी ब्रम्हानंदी टाळी लागायची. सुंदर गुळ्गुळीत गजग्यांचा येणारा तो विशिष्ठ प्रकारचा आवाज अजूनही कानात आहे! फार आवडायचा तो नाद! 
असे कित्येक खेळ आम्ही मुली कितीतरी मोठ्या होईपर्यंत खेळत होतो.


त्या काळी पाऊसही प्रचंड असायचा. मग शाळेच्या ग्राउंडवरच्या खड्ड्यांमधून पाणी साठायचं. त्यात छोटे छोटे मासे असायचे. मग आम्ही दोघी मैत्रिणी घरून दोन रिकाम्या बाटल्या घेऊन या पाण्यातले मासे बाटल्यांमधून घरी आणायचो. आणि मग हातात असलेल्या मोकळ्या वेळातला बराच वेळ या माश्यांचं निरिक्षण करण्यात जायचा. अगदी तंद्रीच लागायची म्हणानात!


अश्या तंद्री लावणाऱ्या अनेक गोष्टी होत्या.........ज्याच्यात आम्ही दोघी तासनतास रमायचो.
असाच एक खेळ म्हणजे सायकल. हो.... सायकल हे एक बहुउपयोगी, बहुउद्देशीय असं खेळणंच होतं आमच्यासाठी. कधी एकेकट्या, कधी डबलसीट अशी कितीही सायकल चालवली तरी कंटाळा येत नसे.
शाळेतही तेव्हा अगदी सरांसकट, मुख्याध्यापकांसकट सायकलवरच येणारी बहुसंख्य जनता होती.
शाळेत....... हायस्कुलात गेल्यावरही सगळे खेळ आम्ही इमानेइतबारे खेळत राहिलो. अंगातल्या उर्जेला आपोआप वळण लागलं, खेळामुळे अंगातला सगळा जोर चॅनलाइझ झाला. आणि हळूहळू या स्पर्धांमधे अंगातली सगळी शक्ती, जोर एकवटून भाग घेणं सुरू झालं.

साधारण ७ वीत उंच उडीची सुरुवात झाली...शालेय स्पर्धेत पहिली येऊन.
रोजचीच इतकी दंगामस्ती, हुंदडणं असायचं की साधारण ७वी,८वी पर्यंत कोणत्याही खेळाची मुद्दाम प्रॅक्टिस कधी करायची वेळच आली नाही.
पण आठवीत(आता मी मोठ्या गटात दाखल झाले होते.) जेव्हा १०० मी. आणि ५० मी. पळण्याच्या स्पर्धांमध्ये १०वी ११वीतल्या "स्प्रिंट क्वीन" समजल्या जाणाऱ्या एका मुलीला मी हरवून पहिली आले तेव्हा एकदम काहीतरी अद्भुत घडल्याची जाणीव झाली.
कारण या स्पर्धेत भाग घेताना फ़क्त पळण्यातला आनंद घेण्याच्या उद्देशाने मी पळाले होते. आपण असं कुणाला हरवू वगैरे कल्पनाच नव्हती.
मग आंतरशालेय इ.इ. स्पर्धांमधे भाग, प्रॅक्टिस.......इ.इ. सुरू झालं.

(क्रमश:)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle