सृजनाच्या वाटा - क्रीडा जगत - आठवणी, आठवणी आणि आठवणी

सर्वप्रथम मैत्रीण टीमचे आभार 'सृजनाच्या वाटा' अंतर्गत 'क्रीडा जगत' या उपक्रमात जे विषय सुचवले आहेत त्यातील ५ नं. बद्दल - लहानपणीचे खेळ आणि आठवणी. ही ओळ वाचूनच मी लहनपणात मस्त बागडून आले आणि हे सारे इथे लिहावेसे वाटले.

रायगडने तिच्या लेखात जे म्हटलंय त्याला "मम". माझाही कोणत्याही सांघिक, मैदानी खेळाशी दूरदूरचाही संबंध नाही. लहानपणापासून गुटगुटीत, गब्दुल या कॅटेगरीत मोडत असल्यामुळे मैदानी खेळांचा अंमळ कंटाळाच. पण असे असले तरीही, मी दरवर्षी न चुकता शाळेतील स्पोर्टस डे मध्ये आयोजित केलेल्या प्रत्येक खेळात भाग घेत आलेय आणि अर्थात हरतही आलेय. :devil: खेळात भाग घेण्याचे कारण माझे त्या खेळांबद्दलचे प्रेम, आपल्यालाही जमायला हवंय अशी आंतरीक उर्मी असे काही मुळ्ळीच नसून,पी.टी.च्या परीक्षेत पास होणे हे होते. Lol स्पोर्टसमध्ये भाग घेतला की प्रत्येक खेळागणिक ५ मार्क्स अ‍ॅड होत असत. ३ खेळांत भाग घेतला की १५ मार्कांची निश्चिती, बाकीचे काही कवायतींचे प्रकार, कदम ताल असे इकडून-तिकडून खेचत ३५ हे टार्गेट पुरे व्हायचे माझे. तर या १५ मार्कांपुरताच माझा खेळांत उत्साह. १०० मीटर्स धावणे, गोळा फेक आणि तिसरा अजुन एक, (आता आठवतही नाही) खेळ असे.यांत माझी टर्न आली की बघ्यांची भारीच करमणूक आणि माझी मात्र पुरती दमणूक होई. धावण्यात मी शेवटीच असणार हे तर प्रत्येकाला पक्के ठाऊक. बरेचसे लोक स्वतःचं मनोरंजन करायला अवतीभवती उभे राहत, काही तर चक्क माझ्या नावाने चीअर करत असत. माझ्या आधी धावणारी मुलगी फिनिश लाईनला पोचली की खेळ कंडक्ट करणार्‍या बाई बिचार्‍या दयार्द्र नजरेने लांबूनच हात करुन मला धावणे थांबव असे सांगत आणि मी तिथूनच धापा टाकत परत फिरत असे. फिनिश लाईन कशी असते ते मी कधी पाहिलेच नाही जवळून. Whew गोळाफेकीची कथाही काही वेगळी नाही. इतक्या वर्षांत तो अति वजनदार गोळा हातात पेलून माझ्या कुवतीनुसार नेम धरुन, योग्य पवित्रा का काय ते घेऊन, माझ्या हिशोबाने दूर पर्यंत टाकलेला गोळा माझ्याच पायांवर पडला नाही हे माझं अहोभाग्य. माझ्या मैत्रिणीही अगदी माझ्यासारख्याच, खेळांशी वावडं असलेल्या, त्यामुळे आमची या तासाला गप्पांची मैफिल मस्त रंगत असे. त्या एका तासात किती नि काय काय विषयांवर चर्चा झडत होत्या हे आठवून आताही आम्ही आमच्या व्हॉटस अप ग्रुपवर हसत असतो. Bighug

माझे हे क्रीडाविषयक प्रेम जरी यथातथाच असले तरीही मज्जा, टाईमपास म्हणून कॉलनीत मीसुद्धा भरपूर खेळत असे. माझ्या लहानपणीच्या आणि त्याही खेळांच्या आठवणी म्हटल्या की माझे दोन मामे भाऊ - ज्यांना मी वेगळे काढूच शकत नाही. आम्ही एकाच कॉलनीत वाढलो. वयातही २-३ वर्षांचेच अंतर. त्यामुळे आमचे मित्र-मैत्रिणीही कॉमन होते. सुट्टीत समवयस्क मावसबहीण येत असे. आम्ही चौघांनी मिळून आमचे लहानपण अक्षरशः भरभरुन उपभोगले. कायम चौघे एकत्र. चांडाळचौकडीच जणू. भांडायचो ही भरपूर. भांडणाच्या टीम्सही मजेदार. एका वेळी कुणा एकाला एकटे पाडून बाकीचे तिघे त्याला नको जीव करून सोडत असू. दुपारच्या वेळी आजी आम्हाला बाहेर पाठवत नसे. त्यामुळे घरात भातुकली, घर-घर, चोर पोलिस पासून ते टीक्करबिल्ला, मुद्दाम काचेच्या बांगड्या फोडून जमवलेल्या काचा आणि ते काचापाणीचे खेळ, पत्त्यांचे लॅडीज, झब्बू, नॉटॅट होम, मेंढीकोट, बदाम सत्ती असे एकसे एक डाव आणि असेच काहीही. संध्याकाळी खाली गेले की बिल्डींगमधली इतर मुलंही जमत. मग लपाछुपी, आबादुबी, खो -खो, रंग रंग, डबाऐसपैस, लगोरी,विषामॄत, साखळी, सोनसाखळी या खेळांना ऊत येई. खेळ खेळतांना बरेच चिटींग, रडीचा डाव हे सारे मनसोक्त होई. पण मला वाटतं यांतूनच 'टीमवर्क' ची संकल्पना मनात रुजत जाते. कधीतरी हरणे हे ही खिलाडूपणे कसे स्वीकारायचे हे लहानपणीचे खेळ कोणत्याही पुस्तकाशिवाय शिकवतात. Thumbsup

अशीच एक हॄद्य आठवण आहे लहानपणीची. मे महिन्यात बरीच मुले गावीही जायची. आम्ही चौघं भावंडं मात्र कॉलनीतच पडीक. मग आम्ही आमच्यातच काही तरी टीपी करत असू. एकदा असेच काहीतरी हटके करायचे असे ठरवून आजीच्या घराबाहेर, पण घरासमोरच एक आयत्या वेळी सुचलेले काहीसे कथानक आम्ही सादर करत होतो. प्रत्येकाचा एक ठराविक रोल. अभिनय करता करताच गोष्ट पुढे पुढे सरकत होती नाटकातील. आम्हाला चौघांनाही हे खूप आवडले आणि मग रोज हाच खेळ झाला. रोज कथानकात काही बदल, काही गाळायचे, काही नवे संवाद असे सारे चालायचे. शेजारी चित्रे नावाचे कुटुंब राहत होते. दोघेच वयोवॄद्ध पती-पत्नी. त्यांच्या गॅलरीला जोडून पायर्‍या होत्या. त्यांवर आम्ही ठाण मांडत असू खेळताना. त्यांच्या घराला जाळ्या, त्यामुळे बाहेरून आतील कोणाचाही मागमूस लागत नसे, शिवाय गॅलरीचे दारही कायम बंद. आम्ही आपले आमच्या नशेत खेळत, आमचे कथानक सादर करत असू. एक दिवस काही कारणाने आम्ही बाहेर खेळायला गेलो नाही. त्यानंतरच्या दिवशी बाहेर आलो आणि परत कोणते तरी स्किट सादर करण्याची योजना ठरवत चित्र्यांच्या पायर्‍यांवर बसलो होतो. काही वेळातच दार उघडून काका काकी दोघेही बाहेर आले. आम्ही चपापून उभे राहिलो. आमच्या कुजबुजण्याचा आवाजही फर्लांगभर ऐकू जाण्याइतका असल्यामुळे आता दम मिळणार हे निश्चित होते. पण त्यांनी काल का नाही आलात? असे विचारले. आम्ही न येण्याचे कारण वगैरे सांगितल्यावर काका पुढे म्हणाले ,"येत जा रे पोरांनो, खेळत जा इथे, तुमच्या आवाजामुळे, आमच्या घरात चैतन्य पसरतं. आम्ही आत बसून रोज तुमचे नाटक बघत असतो. पण काल भारी एकटेपण वाटत होते". आमच्या स्टे़ज परफॉर्मन्सला मिळालेली पहिली दाद होती ती........पण त्याला असलेली एकाकीपणाच्या असहाय्यतेची झालर आम्हाला त्या वयात जाणवलीच नाही. किती गोंधळ घालता, इथे खेळू नका, तुमच्या बॉलने काच फुटली वगैरे ऐकायची सवय असलेल्या कानांना हे काहीसे वेगळे आहे हे मात्र नक्की जाणवले. त्यानंतर कैक दिवस तो आमचा खेळण्याचा, गप्पांचा अड्डा होता.

मोठ्या सुट्टीत चुलत भाऊ, आत्येबहिणी यांनी घर भरुन जाई. आम्हीही जात असू त्यांच्याकडे. काकाकडे रहायला गेल्यावर मुलुंडच्या डोंगरावर एकतरी ट्रेक असायचाच.आमच्या घरी आई-बाबा दोघेही नोकरी करणारे त्यामुळे सकाळी ९.३० ते ५ आम्हाला मोकळं रान मिळे. असेच एकदा सारे जमले असता 'स्नोव्हाईट आणि सात बुटके' हे नाटक करायचं आमच्या तायांच्या सुपीक डोक्यांत घाटलं. आमची सगळ्यांत मोठी ताई (इकडची मामी) हिने फटाफट प्रत्येकाला रोल्स असाईन केले. लिड रोल अर्थात स्वतःकडेच राहील याची काळजी घेऊनच :P . नाही, नाही, स्नोव्हाईट वगैरे सारख्या क्षुद्र भूमिका मामीच्या खिजगणतीतही नव्हत्या. मामी होणार होती राणी म्हणजे मूळची चेटकीण. त्या निमित्ताने कधी प्रेमळ आई, आरशाशी बोलणारी धूर्त कावेबाज राणी आणि जहरीली चेटकीण अशा विविध वेश-केश-रंगभूषा तिला करायला मिळणार होत्या. नाही म्हणायला आपल्या स्नो व्हाईट झालेल्या लहान बहिणीला तिने चार-दोन फुटकळ संवाद देऊन खूष केले होतेच. चिल्ल्या पिल्ल्यांत रायगड होती का नीटसे नाही आठवत पण कुणीतरी दोघेच होते. मग ते दोघे म्हणजेच सात बुटके असं आपसात ठरलं. नाहीतरी उरलेल्या ५ बुटक्यांची पैदास कुठून करणार? Heehee

एक मात्र अगदी वाखाणण्याजोगी बाब मामीतली म्हणजे तिने कधी आम्हा लहान भावंडांना लिंबूटिंबू कॅटेगरीत ढकलले नाही. सगळे मिळून एकत्र काय आणि कसे खेळता येईल असेच तिचे नियोजन असे. कोणालाही लेफ्ट आउट फिलिंग ती येऊ द्यायची नाही.

तर सर्व कामाला लागले. आमचा डबलबेड म्हणजे रंगमंच. आईच्या साड्यांचे पडदे टांगून झाले. ओढण्या - बिढण्या नेसल्या-नेसवल्या गेल्या. राजपुत्र झालेल्या चुलत भावाला काजळाच्या मिशा रेखाटल्या. आईच्या लिपस्टीकी, पिना, क्लिपांवर डल्ला मारला गेला आणि सगळे रंगून तयार. Party

नाटक सुरु झाले, पुढे पुढे सरकत राहिले आणि अचानक दाराची बेल वाजली. सगळे हादरलोच. दुपारी भांडी घासायला येणार्‍या मावशींनाही आम्ही त्या दिवशी मॅनेज केले होते. त्यामुळे आता कोण आले असावे? आयहोलमधून पाहिले आणि'हाय रे कर्मा" आमची आत्या, मामीची आई थेट डोंबिवलीहून न सांगता सवरता हजर. आमची जी तारांबळ उडाली होती की विचारता सोय नाही. मामीने ठरवले की सगळे घर नीट आवरल्याशिवाय आईला दार उघडायचे नाही. बस्स. जो तो घराचे आणि स्वतःचे मूळ रुप परत आणण्याच्या मागे. कुणी बाथरूममध्ये तोंड धुवायला घुसले, कुणी साड्या आवरुन कपाटात कोंबू लागले. आत्या बिचारी उन्हातून येऊन बेल वाजवतेय.का आम्ही इतके घाबरलो देव जाणे.शेवटी एकदाचे दार उघडले. आत्याच्या उशीर का झाला दार उघडायला या प्रश्नावर आम्ही सगळे झोपलो होतो , बेल ऐकूच नाही आली हे ठरवलेले उत्तर देऊन मोकळे. खरंतर आमचा खिदळण्याचा आवाज तिने ऐकला असावाच.

त्यानंतर काय झाले काही आठवत नाही आता. पण या आणि अशा कैक खेळांनी आमचे लहानपण समॄद्ध केलेय. आजही लेकाला या सार्‍या आठवणी सांगताना, आत्ता इथे लिहीतांनाही त्या चलतचित्रासारख्या डोळ्यांसमोरुन सरकतात. काही दिवसांपूर्वी तिथे गेले असता हे सारे आठवले. पण आता तिथे ती माझी हक्काची दोन घरे राहिली नाहीत. म्हणजे घरं आहेत तशीच, पण तिथे आता माझी माणसं नाहीत. कॉलनीत लहानपणी खेळता बागडताना साध्या सिमेंटच्या फरशीवर कित्येकदा ठेचकाळाले असेन. ते व्रण आजही हाता-पायांवर आहेत. आता तिथे पेवर ब्लॉक्स बसवलेत. आम्ही खेळत असताना येणारी-जाणारी माणसे , आमचा बॉल, शटल कॉक चुकवून मार्ग काढायची. आज मी ही तसाच मार्ग काढत होते, मुलांच्या खेळातून नाही तर अवती भवती पार्क केलेल्या अगणित गाड्यांतून. मुले तर नव्हतीच तिथे. हल्ली सगळी मुले अ‍ॅक्टिव्हीटी क्लासेसना जातात म्हणे. हसले स्वतःशीच, कालाय तस्मै नमः|दुसरे काय?

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle