१५ ऑगस्ट, म्हणजेच आपल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी हा तिरंगा जागोजागी अभिमानाने फडकत असेल. मग मैत्रीणवरही झेंडावंदन व्हायला हवंच ना! आणि होणारच आहे, अगदी मैत्रीण स्टाईलने!
आपण बनवलेले तिरंगे मैत्रीणवर आणून हा एकोणसत्तरावा स्वातंत्र्यदिवस इथे साजरा करणार आहोत. "बनवलेला तिरंगा" म्हणजे नक्की काय? तर ते तुम्ही ठरवा! भारताच्या राष्ट्रध्वजाचे तीन रंग: केशरी, पांढरा आणि हिरवा वापरून केलेली कोणतीही कलाकृती तुम्ही मैत्रीणवर पोस्ट करु शकता.
अंबर कुंकवाने लावलेलं तिरंगी कुंकू आणि पांढऱ्या पंजाबी ड्रेसवरची केशरी-हिरवी ओढणी.. किंवा अजून जरा छान फेशनेबल ट्विस्ट देऊ शकता का? तिंरगी पुलाव, तिरंगी पुऱ्या, राईस-पालक-माखनवाला, केशर-पिस्ता-मलई बर्फी आणि अजून असे बरेच तीन रंगातले पदार्थ करणार का?
आपण आता अवलकडून क्रोशा, मॅगीकडून जलरंग, स्नेहश्रीकडून बेकिंग आणि ज्युनिअर मेम्बर्स कडून नेलआर्ट, loomband, रांगोळी, टीशर्ट पेंटिंग शिकलो आहोत. त्या कला वापरुन नक्कीच तिरंगा साकारू शकाल.
शिवाय फोटोग्राफी, केलिग्राफी, भरतकाम.. इतकंच कशाला? केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या तीन लहान कथा, कविता आणि आठवणीही चालतील.
दोनच सोपे नियम, ते हवे तसे वाकवा. :winking:
१. कलाकृती तिरंगी हवी.
२. ती १५ ऑगस्टला प्रकाशित व्हायला हवी.
* ऑस्ट्रेलियातल्या १५ ऑगस्ट पासून कॅलिफॉर्नियातल्या १५ ऑगस्ट पर्यंत आपला मैत्रीणचा १५ ऑगस्ट सुरू राहील.
झेंड्याचे, तिरंगी कलेचे फोटो, लेखन, 'कलाकृती' कप्प्यात प्रकाशित करावे. (अॅडमीनकडून त्या कलाकृती, 'उपक्रम' ह्या भागात हलवल्या जातील.)
लागा तर मग तयारीला. लाँग वीकेंड आहे, हातात चांगला वेळ आहेच! हा १५ ऑगस्ट धडाक्यात साजरा करूया!