"आणि तो ही दिवस आठवतो माधवा...
आता हे स्पष्टच झालं होतं, की युद्ध होणार. अगदीच अटळ झालेलं ते आता. अगदी तुझी शिष्टाईही कामी आली नाही... की तू ती सफल होऊ नये; अशीच केलीस?
पण तो मुद्दा वेगळा, बोलेन कधी त्या विषयीही... आज वेगळं बोलायचय मला. हो वेगळच.
खरं तर तो कितीतरी तुझ्यासारखाच. तुझ्या जीवनातल्या कितीतरी गोष्टी त्याच्या आयुष्यातही डोकावल्या. पण किती वेगळ्या, दुखऱ्या. किती लसलसणारे दु:ख देणाऱ्या...
पण तू कधीच त्याला समजून नाही घेतलेस, कधीच त्याची पाठ राखली नाहीस, कधीच त्याला संशयाचा फायदा दिला नाहीस. फार फार कठोरपणे पारखलस त्याला, खरंतर तुझी दुखरी नस तो सांभाळत होता. अन तू मात्र कधीस ती नस ओळखली नाहीस... की ओळखून नाकारलीस?"
"राधे, खरच वाटतं तुला असं? की मी ओळखली नाही, समजून घेतली नाही त्याची बाजू?"
"माधवा, एरवी मी असं म्हटलं नसतं, पण तुझी एक राजकारणी खेळी... ती उघडं टाकून गेली बघ तुला. तुला होती न खात्री पांडवांच्या विजयाची? तुला होती न खात्री, त्यांचा पक्ष सत्याचा आहे? तुला होती न खात्री, सत्याचाच विजय होतो नेहमी? मग तरीही तुला ती चाल का खेळावी वाटली?
नक्की तो युद्धभूमीवरचा राजकारणी डाव होता? युद्धात सगळं माफ हे खरं, पण युद्धाआधीची ती चाल नक्कीच युद्धाचा भाग नव्हती."
"राधे, नक्की कशा बद्दल बोलते आहेस? त्या महा युद्धात अनेकदा सगळ्याचेच अर्थ बदलले, तू जाणतेस. किंबहुना सर्वसामान्य नियम युद्धात प्रसंगी चुकीचे, त्याज्य असतात, ते त्याजावेच लागतात, हे माहिती आहे तुला राधे ..."
"कृष्णा, तुझा नेहमीचा शब्द अन अर्थ बदलण्याचा खेळ निदान आता नको करूस रे. तू जाणतोस मी कशा बद्दल बोलतेय."
"हो, हो मला समजलं तू कर्णा बद्दल बोलतेयस. पण त्याने असत्याची बाजू निवडली होती. हे तर नाकारता येत नाही ना?"
"बघ पुन्हा तू तीच क्लृप्ती वापरतो आहेस. ठिक आहे, आता स्पष्ट शब्दात विचारते, माधवा असं का केलस तू? त्या रात्री द्रोणाचार्य धारातिर्थी पडल्यानंतर कर्णाला कौरवांचा सेनापती म्हणून जाहिर केलं. अन त्याच रात्री कुंती देवींमधे अनेक वर्ष दडपलेल्या पृथेला, तिच्यातल्या पहिल्या वहिल्या मातेला जागवलस तू . का? अगदी तोच मुहूर्त का गाठलास तू?
कर्णाच्या कर्तृत्वाला घाबरलास? त्याचातला सेनापती, पांडवांना जड जाईल असं वाटलं तुला? की तुझ्या प्राणप्रिय अर्जुनाला वाचवायचं होतं तुला, की पाच पांडवांना अभय द्यायचं होतं तुला? सांग माधवा असं का केलस तू?"
" राधे, अगं ... "
"नाही माधवा. मी ओळखते तुला. राजकारणी उत्तर मलातरी नको देऊस.
अरे तो ही तुझ्यासारखाच आईवडिलांपासून जन्मत: च दुरावला. इतकच नाही तर तुझ्याच सारखा राजकुलातील असून सेवाकुलात वाढला तो. तुझ्यासारखाच सत्य प्रेमी, हुषार, कर्तृत्ववान, अन्यायाची चिड असलेला तो.
मी तर म्हणेन काही बाबतीत काही वेळेस, चार पावलं पुढेच होता तो, तुझ्यापेक्षा"
"राधे, राधे हे तू बोलतेस? माझ्याहून अधिक कोणी तुला प्रिय वाटतोय? माझा विश्वासच नाही बसत नाहीये."
"थांब माधवा एकदम निष्कर्ष नको काढूस. तू मला प्रिय आहेस, आहेसच. अगदी माझ्या प्राणाहुनही जास्ती. पण तरीही हे प्रेम आंधळं नाही. निकोप दृष्टीने मी पाहू शकते, कर्णालाही अन हो, अगदी तुलाही!
तो तुझ्याहून काही बाबतीत चार पावलं पुढे होता; शक्य आहे ते पुढं असणं तुझ्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने वेगळ्या मार्गावरचं असेल, पण पुढे होतं हे निश्चित.
तू गोकुळी वाढलास, एक गोप म्हणून. गोेकुळ बहरले, वाढले, अगदी संपन्न झाले ते तुझ्यामुळे.
पण तू ही वाढलास तिथे, तिथेच. पण मग तू गेलास. गोकुळ सोेडून गेलास. अगदी परत न येण्यासाठी गेलास. समजून उमजून. परत वळूनही नाही बघितलेस. माई, नंदबाबाबा, गोप गोपी, धेनु, अगदी तुझी बासरी आणि मी ही.... वाट पहात राहिलो, पहातच राहिलो...
कर्णाने मात्र राधामाई, अधिरथबाबा, शोण आणि वृषालीलाही कधीच दूर लोटलं नाही. आपले धनुर्बाण कधीच अलग केले नाही स्वत:पासून, अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत.
तू गोकुळ सोडलेस अन गोप पणही. कर्णाने आपले सूत पण नाही सोडले कधीच.
तू गोप पणासोबत सारी नाती, सारे बंध सोडलेस, मुक्त झालास. तो नाही. शेवटपर्यंत जोडलेली नाती त्याने सांभाळली, जपली, निभावली.
असो, मुद्दा हाही नाही आज. आज मला बोलायचय ते त्या रात्रीबद्दल. जेव्हा तू काळाच्या महिम्यात गाडल्या गेलेला पृथेला जागवलस, इतकच नाही तर तिच्यातल्या आईला, आपले जन्मदात्री म्हणून दान मागायला लावलेस कर्णा समोर, त्या रात्री बद्दल बोलायचय मला."
"राधे, फार फार स्पष्ट बोलतेयस आज तू, कधी नव्हे ते. नको न ती आठवण. मी ही फार प्रयत्न पूर्वक दूर झालो त्यापासून..."
"तेच व्हायला नकोय मला. त्या साऱ्याची लख्ख जाणीव तळपायला हवीय मला तुझ्यात. केवळ म्हणूनच बोलतेय हे सारे. यात मलाही नाहीच आहे सुख जराही, मलाही होताहेत क्लेश अगदी तुझ्या एवढेच, काकणभर जास्तच. मीही होतेय घायाळ.... पण हे बोलले पाहिजेच आपण. आता माघार नको. सांग माधवा, तू का गेलास त्या रात्री कुंती देवींकडे?"
"राधे, काय सांगू? कसं सांगू? खूप गोष्टी एकत्र आहेत, खूप सरमिसळ, खूुप काही खरे, काही राजकारणही अन काही त्या त्या क्षणांचे देणेही.... पण खरे आहे तुझे म्हणणे. मला सामोरे जायला हवेच आहे याच्याशीही.
राधे, दुर्योधनाने घोषणा केली कर्णाच्या नावाची. ती अपेक्षितही होती. कधी न कधी हे होणारच होते. पण मला कर्ण युद्धभूमीवर यायला नको होता. पांडवांचा विजय व्हावा, यासाठी नाही हे तर तूही जाणतेस. मगाशी केवळ मी व्यक्त व्हावे म्हणून असे ध्वनित केले असलेस तरी तू अन मी दोघही जाणतो की कर्णाशी माझे वैर नव्हते.
पण तरीही मला कर्ण युद्धभूमीवर नको होता. आणि त्याचे कारण हेत होते की पांडवांचे आपापसातले युद्ध मी टाळू पहात होतो. केवळ मीच नाही तर युद्धात्या सुरुवातीलाच पितामहांनी ह्याच कारणा साठी कर्णाचा अर्धरथी म्हणून उल्लेख करून त्याचा अपमान केला. ज्यामुळे कर्ण युद्धापासून दूर राहिल असा प्रयत्न त्यांनी केला.
कोणत्याही परिस्थितीमधे कर्णाकडून इतर पांडव अथवा पांडवांकडून कर्ण मारला जाऊ नये, बंधुहत्येचे पातक कोणाला लागू नये हीच इच्छा होती. पण पितामह शरशय्येवर पडले, द्रोण धारातिर्थी पडले आणि कर्णाचा सेनापतीपदाचा मार्ग मोकळा झाला. जे मी टाळू पहात होतो तेच समोर उभे राहिले.
या परिस्थितीत कुंतीमातेला पुढे करण्यावाचून दुसरा कोणतीच मार्ग शिल्लक होता राधे? तिच्यातला कर्णाच्या आईला जागवणं भाग होतं मला. त्याशिवाय हे बंधुयुद्ध टळते ना"
"हेही मान्य माधवा, पण तू हे विसरलास की तो कर्ण आहे. आपले स्वत्व, आपला शब्द तो कधीच सोडणार नाही. अन त्यातूनही पाच पांडवांचे अभय कुंती देवींना तू सुचवलेस. एका अर्थाने बंधुहत्येचे एक पातक तू अधोरेखित केलेस."
"राधे पटतय तुझं म्हणणं, पण ती त्या काळची निती होती ."
"नाही माधवा, ही निती नव्हे, तो शुद्धमार्ग नव्हता. भले कळिकाळानुसार तो मार्ग गरजेचा असेल, पण तरीही तो स्वच्छ नितीचा भाग नाही. ही "कृष्णनिती" माधवा!
तिच्या समोर कर्णाची निष्ठा आणि सच्चेपणा जास्त उठून दिसला! म्हणूनच असेल पण तू "कृष्ण" राहिलास, तो मात्र ओळखला जातो तो त्याच्या आई वरून, पण "राधेय" म्हणून..."
"राधे...!"