राधे : हे माझ्यास्तव

आणि तो ही दिवस, छे तो ब्राह्ममूहूर्त आठवतो मला...

संध्याकाळ होत आलेली. आपण यमुनातीरी बसलेलो. अचानक तू म्हणाली होतीस, "तुझी बासरी दिवसभर माझ्या आसपास वाजत असते."
अन मग थबकून म्हणालीस, "पण सगळे कुठे दिवसाला सामोरे जाऊ शकतात रे ?"

अन उदास होऊन यमुनेच्या पाण्यात पाय हलवत बसून राहिलीस किती तरी वेळ.

अन मग दिवस कलला, रात्र यमुनेच्या पाण्यासारखी गडद होत गेली. तू तिथेच बसून राहिलीस. मग मी कसा हलणार होतो? सारीकडे शांत शांत होत गेले. आता मी ही पावा बाजूला ठेवला

गोपाळांचे पायारव लांब जात गेले, गायीच्या गळ्यातील घुंगरू नाजूक होत गेले. आता तर गोठ्यात, पार शांतावले ते नाद. मग घर घरातील बाल बोलही थांबले. अन प्रेमळ अंगाई हळुवार झाल्या. हळूहळु माईचे थोपटणेही थांबले.

सारीकडे अलवार शांतता नांदू लागली, एक फक्त यमुनेच्या लाटांचे चुबकावणे, सा-या आसमंतात भरून राहिलेले.
अन तू, त्यात संथ नजरेने दूरवर काही पहात तशीच बसलेली.
अन मी तुला.
कसली, कोणाची वाट पहात होतीस तू ?

असेच अजून काही प्रहर गेले. यमुना, तू, मी अन शांत-क्लांत आसमंत.

आता तर चंद्रही मावळला. चांदण्याची धूसर दुलई पांघरून यमुनाही पहुडली.

तू हळुच पाय काढून घेतलेस. तुझे, माझे अस्तित्वही जाणवू नये अशी खबरदारी घेऊन तू माझ्या सोबत कदंबाला टेकलीस. हळूच पावा माझ्या हातात अलगद टेकवलास. अन नजर उचलून यमुनेच्या खालच्या तीरावर नजर नेलीस.

एक वाकलेली काळी सावली यमुनेला हलकेच स्पर्श करत होती. अगदी यमुनेलाही कळेल, न कळेल इतका अस्पर्श स्पर्श... जगाला, कोणालाही आपले अस्तित्व कळुच नये; यासाठी जीवाचे रान करत; एक एक पाऊल सावकाश टाकत ती पुढे झाली.

अन मला कळलं
मला कळलं, तू कोणाची वाट बघत होतीस.

दिवसाला सामोरी जाऊच न शकणारी ती कुब्जा, रातीच्या अंधारात आपले आन्हिक उरकत होती. तिचा आयुष्यभरचा हा नमस्कार मला आज पोहचत होता. आज तिच्यासाठी; केवळ तिच्यासाठी मी पावा उचलला.

केवळ मला, तुला अन तिला ऐकू येतील असे सूर मी छेडू लागलो. अन चांदण्यात तिची थरथरणारी काया सा-या यमुनेला हेलावून गेली.

तू हळूच पुढे झालीस अन तिला आधार देत बाहेर आणलस.
कुब्जेच्या तोंडी केवळ दोनच शब्द " हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव..."

तिचा नव्हे, माझाच जन्म सफल झाला....
राधे, राधे, केवळ तुझ्यामुळे!

राधे ...

-------

या लेखाची ऑडिओ व्हिज्युअल तयार केलीय.
त्याची ही लिंक http://arati-aval.blogspot.in/2015/01/blog-post.html.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle