आणि तो ही दिवस आठवतो
मध्यान्हीचे उन अलवार होत होते; सारीकडे अलगद गारवा पसरू लागला होता. आम्ही सारे गोप कालिंदी तटी खेळायला निघालो. पेंद्या नेहमीप्रमाणे मागून हळू हळू एका पायावर लंगडत येत होता. आम्ही पऴत पळत किना-यावर आलो. वाळू आता छान नरम-गरम अन ओलसर होती. कोणी त्यात घरं बांधू लागले, कोणी विहीर खणू लागला. कोणी पारंब्यांवर लटकला तर कोणी नदीत डुंबू लागला.
मी वळून पाहिले, पेंद्या अजून येतच होता. लांबून पाहताना तो खूप मजेशीर दिसत होता. एका छोटया पायावर हलकेच झोका देऊन लगेच मोठ्या पायावर येत - हेलकावे घेत तो येत होता. त्याच्या मागे सूर्य अस्ताला चालला होता, त्यामुळे पेंद्या; छोटया पायावर आला की सूर्य दिसे, हेलकावा घेऊन मोठ्या पायावर गेला; की सूर्य दिसेनासा होई.
एवढासा, लुकडा पेंद्या सुर्याला झाकत होता. मला माझ्याच कल्पनेचे हसू आले.
माझे खिदळणे पाहून सारी माझ्या भोवती जमा झाली. मी बोट दाखवून ती गंमत सगळ्यांना दाखवली. झाले, सारी "ए मला बघू मला बघू" करून ढकला ढकली करू लागली. एक नवीनच खेळ मिळला गोपांना...
अन इतक्यात मागून तू आलीस. आधी तुलाही कळेना काय चाललेय. सारी ओरडत होती, "पेंद्या-सूर्य, पेंद्या-सूर्य..." " झाकला , दिसला..." "झाकला, दिसला.."
पेंद्या बिचारा लाजून चूर झालेला. कसातरी भरभर यायचा प्रयत्न करत होता तो; तर ही जमाडी गंमतही भरभर होत होती. सारे गोप खिदळत होते.
अन मग तुला समजलं... अगदी सारं समजलं.
रागा रागाने तू पुढे झालीस. एकेकाला बखोट धरून बाजुला केलस. रागे भरू लागलीस...
" बिचारा पेंद्या, एक जण हात द्यायला पुढे येत नाही, वर दात काढतात. मित्र अहात की वैरी रे "
तेव्हढ्याने तुझे समाधान होईना. सगळ्या गोपींना हाका मारत पुढे आलीस. माझ्या समोर उभी राहिलीस. मला तर अजूनच हसू आवरेना. मग तू अजूनच चिडलीस. कमरेची ओढणी तावातावाने सोडवलीस, वाकून शेजारची एक काठी घेतलीस. अन खस्सकन माझा हात ओढलास. मी धप्पकन खाली बसलो. तशी माझ्या, गुढगा वाकलेल्या पायाला आपल्या ओढणीने काठी बांधलीस. माझा एक पाय पेंद्यासारखाच लहान केलास. "बांधा ग सगळ्यांचे असेच पाय. कळू दे पेंद्याला होणारा त्रास , यांनाही! " तू रागानेच सा-या गोपींना हाक दिलीस.
अन क्षणात कालिंदी तटी पेंद्यांची फौज उभी... उभी कसली लंगडी झाली.
"आता रात्री घरी जाई पर्यंत सोडली काठी, तर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवतेय. " रागाने तू नुसती फणफणलेलीस.
आमच्याकडे पाठ फिरवून तू पाणी भरायला तटावर गेलीस. सा-या गोपीही तुझ्या पाठोपाठ गेल्या.
आम्ही सारे किंकर्तव्यं अवस्थेत द्रिढमुढ झालो. हा काही विचार आमच्या मनातच नव्हता. आम्ही आपले नेहमीसारखे पेंद्याची गंमत करत होतो.
थोडया वेळात त्या धक्यातून वर आलो अन मी उभे राहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कसचे काय? साधे उभे राहणेही जमेना. सा-यांची हीच कथा. कसे बसे झाडाला धरत, एकमेकांना टेकू देत आम्ही उठलो. आता पेंद्याही नजरेच्या टप्प्यात आला. आता तर मला पुन्हा हसू यायला लागले. पेंद्यापेक्षा आमची अवस्था वाईट होती. मी हसू लागलो तशी बाकीचेपण सारे हसू लागले. झालं. पुन्हा सगळे एक एक करत धपाधप पडले. कोणी मातीत, कोणी दुस-याच्या अंगावर, कोणी तिस-याच्या, हीsss धम्माल नुसती.
कोणी उभा रहायला लागला की शेजारच्याच्या काठीत त्याची काठी अडके. एखादा उभा राही तर त्याचा धक्का लागून उभा राहिलेला दुसरा पडे.
सारे खिदळत होते, पडत होते, मार लागत होता. पण कोणालाच काही वाटत नव्हते. एक नवीन खेळत जणु मिळाला सा-यांना. सगळे ओरडत होते, "पेंद्या, पेंद्या, सारे सारे पेंद्या "
नुसता गदारोळ चालू होता. मागे चाहूल लागली म्हणून वळून पाहिले तर पेंद्या माझ्या समोर उभा. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहात होते.
"माधवा, माधवा..." म्हणत माझ्या पायाशी तो वाकला. सर्रकन बांधलेली ओढणी त्याने सोडवली, काठी दूर भिरकावून दिली. अन दुस-या गोपाकडे धावला, त्याला मोकळं केलं तशी तिस-याकडे... सगळ्यांना धावून धावून मोकळं केलं त्याने. अन दुसरीकडे डोळ्यांतून अभिषेक चालूच...
"अरे राधा ओरडेल, असे नको करूस... राधे, ए राधे . हे बघ. आम्ही नाही सोडलं. हाच बघ सोडतोय...."
अन मग तू गर्रकन वळलीस... धावत पेंद्याजवळ गेलीस. "का रे, का सोडवलस? तुझी चेष्टा करतात म्हणून शिक्षा केली ना मी"
" राधे.... राधे...
तुला कळत नाही गं...
अग या पांगळेपणाचे दु:ख तुला कळतच नाही राधे....
नको ग, मी सोसतोय तेव्हढं, अगदी तेव्हढच पुरे गं...
अजून कोण्णा कोण्णाला नको हे दु:ख...
राधे..." पेंद्या रडतच कसं बसं बोलला, अन पाठ वळवून दूर दूर निघून गेली...
त्या दिवशी केवळ तूच नाही, तर पेंद्यानेही जीवन बदलून टाकलं माझं... करुणेचे संचित सतत पाझरत राहिलं तेव्हापासून...
राधे...