आणि तोही दिवस आठवतो...
कितीतरी युगं पुढे नेऊन ठेवलस त्या दिवशी तू मला...
यमुनेकाठची अशीच एक सुंदर सकाळ होती ती. पाणी भरता भरता, एका क्षणी तू थबकलीस, पुन्हा घट यमुनेत रिकामा केलास; अन पुन्हा भरू लागलीस. जरी मी पावा वाजवत असलो तरी लक्ष तुझ्याकडेच होतं माझं. तू पुन्हा घट रिकामा केलास अन पुन्हा भरू लागलीस...???
हसलीस अन वळून माझ्याकडे पाहिलस. मी नजरेनेच तुला काय विचारलं. तर तूही नजरेनेच जवळ बोलावलस. मी पावा थांबवला अन उठलो, तुझ्याजवळ यमुनेत पाय टाकत काही बोलणार, तर नजरेनेच गप्प केलस. आणि पावा वाजव म्हणालीस.अन एक नजर घटातल्या पाण्याकडे टाकलीस.मी पुन्हा आसावरी छेडला. वादी ध पाशी आलो तशी तू मला थांबवलस आणि घट पाण्यात बुड्वून भरलास.... माझ्या आसावरीतला ध तू बरोब्बर साधलास.
मग पुन्हा थांबलीस म्हणालीस, " मी रा..."अन घटातून पुन्हा धा वाजवलास. पुन्हा म्हणालीस " मीरा..." अन घट पाण्यात न बुडवता मला सामोरी झालीस अन माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलस. सर्र्कन माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.... आजवर माझ्याही लक्षात न आलेली गोष्ट तू अशी लख्ख उभी केलीस डोळ्यासमोर... तू मीरा......
तू खूप गूढ हसलीस अन पाठमोरी होत तो अर्धा भरलेला घट घेऊन निघून गेलीस. छे अर्धा माझ्यासाठी यमुनातीरी ठेऊन गेलीस. त्या मीरेला पोटात सामावून घेत, आतल्या आत रिचवत कितीतरी शतकं तसाच उभा आहे मी... राधे... मीरा....धे....