( एक साधी, सरळ आठवण. ना काही सांगायचय, ना काही सुचवायचय. फक्त त्या दिवसाची आठवण. बस )
"आणि तो ही दिवस आठवतो का गिरिधारी ?"
तू म्हणालीस....
अन मला लख्खकन आठवला तो दिवस
धुम पाऊस पडत होता. कितीतरी दिवस आकाश कोसळतच राहिलेले. सारी सुष्टी नुसती चिंब भिजत, काकडलेली. गाई गुरं गोठ्यातच थरथरत होती. मुलं भिजून भिजून कंटाळली होती. गवळणी दुधाच्या कळशा घेउन कशाबशी मथुरेला जात होत्या. गोपी सारे घरात बसून बसून कंटाळून गेले होते.
आता तर माझी बासरीही मऊ पडली, सूर हवे तसे येईचनात. अन तूही भेटली नव्हतीस कितीतरी दिवस, कशी बरं सुरेल वाजावी ती तरी...
बघावं तिथे फक्त पाणी पाणीच दिसत होतं, सगळीकडून पाण्याचे ओहळ वाहात होते. यमुनातर तुडुंब वाहत होती. पावसाच्या माऱ्याने तिचे पाणी अजूनच काळे दिसू लागले होते.
सारे गोकुळ त्रस्त त्रस्त झाले होते. "आकाशीचा बाप्पा असा का रागावलाय" असा सूर सगळे काढत होते. माईपण अगदी त्रासली होती. ना बाहेर जाता येत होतं, ना घरातली काही कामं काढता येत होती...
नंदबाबाला तर साऱ्या गोकुळाची चिंता पडलेली. हा असाच पाऊस पडत राहिला तर शेतात उभं राहिलेलं कोवळं पीक पार वाकून जाईल, मातीत मिळेल या भीतीने, साऱ्या गोकुळवासियांच्या काळजीने त्यांची झोपच उडालेली.
अन तो दिवस उजाडला. पहाटे पासून पाऊस थोडा मंदावला, उत्तरेकडचे आकाश खरं तर अगदी काळेकुट्ट झालेले, जणुकाही सारे सारे ढग उतरेत एकवटलेले. पण गोकुळावर मात्र एक उन्हाची तिरिप उमटली. सगळे गोकुळवासी आपापल्या घरांमधून बाहेर पडले, गोप आपल्या गाईंना थोडे उन दाखवायला बाहेर पडले, काही आपल्या शेतीकडे पहायला गेले. गोपी आज जरा उघडिप आहे तर पटकन मथुरेला जाऊ म्हणून लगबग बाहेर पडल्या. मग आम्ही सगळी पण यमुनेतीरी आलो. तू ही मैत्रिणींसह यमुनेचे तुडुंब रुप पहायला धावलीस.
सगळे उन्हात जरा बसलो, "किती हा पाऊस" अशा गप्पा केल्या. तोच तू यमुनेकडे बोट दाखवलस, म्हणालीस " कान्हा रे, अरे काही वेगळच घडतय बघ..."
यमुनेच्या पाण्याला प्रचंड वेग आलेला, नेहमीची संथ, शांत यमुना हळुहळू रौद्र रुप धारण करू लागली. तिच्या काळ्या पाण्याच्या लाटा जणू सगळे भक्ष करण्याच्या तयारीत मोठ्ठा आ वासू लागल्या. सगळे गोप, गोपी गावाकडे धाऊ लागले. यमुना आता तीर सोडू लागलेली.
तू पुन्हा लक्ष वेधलस, म्हणालीस, " कान्हा, काही तरी कर रे, ते बघ वरच्या अंगाला नदी कशी दिसतेय..."
मी मान वर उचलून बघितलं, खरच यमुना यमुना राहिलीच नव्हती, आभाळातले सारे जलद आपल्या कुशीत घेऊन धावत सुटलेली ती यमुना आता नदी नव्हेतर जलकुंभ झालेली. काही तरी करायला हवं.
मी मान वळवून गोकुळाकडे बघितलं, या नदाचे पाणी गोकुळात शिरायला फार वेळ लागणार नव्हता. तू हात धरून दुसरीकडे दाखवलास, गोवर्धन पर्वत. हो आता गोवर्धनच आपल्या साऱ्यांना वाचवणार होता.
मी साऱ्या गोपांना आवाज दिला, " सुदामा, मुकुंदा, पेंद्या, अरे तिकडे नाही, इकडे गोवर्धनकडे चला... राधा , तू या सगळ्यांना ने तिकडे"
अन मी पळत गोकुळात आलो, सगळ्यांना गोवर्धन कडे चला सांगत पळत राहिलो. दिसेल त्या बांधलेल्या गाईला सोडवत गेलो, लोकांबरोबर त्या अन त्यांची वासरं गोवर्धन कडे जाऊ लागली. यमुना आता आपला काठ सोडत होती. आम्ही सगळे गोवर्धन पाशी पोहचतो न पोहचतो तोवर आभाळ अंधारून आलं. इतकावेळ दर्शन देणाऱ्या सुर्यदेवांना काळ्या ढगांनी ग्रासून टाकलं. अन कडकड कडकड करत एक विज चमकली अन पुन्हा मुसळधार पाऊस पडू लागला. आपण सगळे गोवर्धन पर्वत चढू लागलो.
अन मला आठवण झाली. मागे एकदा खेळता खेळता मला इथली एक मोठी गुहा सापडलेली. " चला, सगळे माझ्यासोबत चला, इथे एक मोठी गुहा आहे, तिथे आसरा घेऊत. "
आणि मग तो पूर्ण दिवस सारे गोकुळ त्या गुहेत विसावले. मनामधे भिती होती सगळ्यांच्याच. धाकधूक होती, काळजी होती... आता काय होईल??? गाईगुरं कावरीबावरी झालेली. लहानमुलं आपापल्या आईला गच्च धरून बसलेली.
तू हळूच पुढे झालीस, माझ्या हातात बासरी दिलीस.
“ आत्ता?"
" हो, सगळ्यांना एक दिलासा हवाय, एक विश्वास हवाय. तो फक्त तू, तुझी बासरीच देऊ शकतो. वाजव. विसरतील सारी सगळे. वाजव"
अन मग मी बासरी ओठांना लावली....
पळ गेले, जात राहिले....
संध्याकाळ होत आली, आभाळातले जलद बरसून बरसून थकले. हळूहळू विरळ होत गेले. अन पुन्हा एकदा सुर्यनारायणाने पश्चिमेला दर्शन दिले. खाली बघितलं, यमुनाही हळूहळू आपल्या मर्यादेत वाहू लागली होती. सारे गोकुळ तिने उलथेपालथे करून टाकले होते. पण आता ती परतली होती. तिचा ओघही मंदावला होता. ती रात्र आपण सगळ्यांनी तिथेच काढली. अन सकाळी खाली उतरून गोकुळ पुन्हा आपलसं केलं सगळ्यांनी.
किती तरी दिवस लागले सारे सुरळीत व्हायला. पण झाले.
हळूहळू ती आठवण साऱ्याच्या मनात पुसट होत गेली....
पण राधे तू लक्षात ठेवलीस न? अजूनही?
राधे....