श्रीलंकेच्या विमानतळावर विमान पहाटे ४ वाजता उतरले आणि इमिग्रेशन वगैरे सोपस्कर पार पडून मी विमानतळाबाहेर आले. त्याआधी डेटा असलेले एक सिमकार्ड घेतले आणि I was immediately connected to the world again. ही कनेक्टिविटी हवी की नको यावर मी विचार केला होता. पण आईबाबांना उगाच चिंता नको म्हणून घेऊन टाकले. हॉटेल्स मध्ये शक्य तेवढे रहायचे नाही, हॉस्टेल्स शोधायची असा विचार केला होता. त्यामुळे वायफाय प्रत्येक ठीकाणी उपलब्ध असेलच की नाही याची खात्री नव्हती. माझी पुढाची सगळी बुकींग्ज व्हायची होती. त्यामुळे एकदाचा तो डेटा प्लान घेतला आणि कित्ती खर्च झाला असे एकदम वाटले. एवढे काही महाग नाही पण असच- श्रीलंकन रुपीज ('श्री. रु.') ९००/- भारतीय रु. ४५०/-
या ट्रीपमध्ये इतर काही गोष्टींबरोबर तीन गोष्टी मला करुन पहायच्या होत्या: प्लान न केलेली आयटनरी, हलकी बॅग आणि कमीत कमी खर्चात प्रवास. नो फ्रिल्स. हे असच, सहजच सुचलेले खुळ. त्याने मला काय मिळालं हे मी अजून शोधती आहे पण असा प्रवास करताना मज्जा आली.
तर विमानतळावरुन बाहेर आले. श्रीलंकेचे बंदरनायके एअरपोर्ट हे कोलंबोपासून ३० किलोमिटर तर नेगंबो पासून २० किलोमिटरवर आहे. एका मित्राने कोलंबोत अज्जिबात एक तास सुद्धा वाया घालवु नकोस नॉट वर्थ इट सांगितल्याने, मी निघायच्या आधी नेगंबोत उतरावे अश्या विचारात होते. कारण एकतर ते एअरपोर्ट पासून जवळ आणि दुसरे म्हणजे नेगंबो हे बीच टाऊन आहे. पण जायच्या अगदी आदल्या दिवशी मी विचार बदलला आणि कोलंबोत हॉस्टेल बुक केले. कारण मला कॅन्डीला १७ तारखेला जायचेच होते. त्यांचा मोठा सण Esala Perahera चा १७ ऑगस्ट हा महत्वाचा दिवस होता. https://www.lanka.com/events/kandy-esala-perahera/. तो पहायचा होता. त्यामुळे बाकीची स्थळ नीट बघण्यासाठी माझा विचार परत बदलून, कोलंबोत पहिल्या दिवशी जायचे ठरवले.
विमानतळावरुन कोलंबोत जायला सरकारी बस नं. १८७ सुटते. टॅक्सीचा पर्यायही उपलब्ध आहे. ज्याचे श्री. रु ३,०००/- होतात आणि बसचे काहीतरी श्री. रु ६०/-. टुरीस्ट शक्यतो टॅक्सी करतात. पण मला आलेल्या हुक्कीमुळे मी सकाळी ६ वाजता बसच्या शोधात निघाले. आधी वाचल्या प्रमाणे फ्री एअरपोर्टशटल टू बसस्टॉपच्या शोधात निघाले (जी मला शेवटपर्यंत सापडली नाही आणि शेवटच्या दिवशी भारतात परतताना अशी एअरपोर्टशटल अस्तित्वात नाही असेही समजले.)
तर या बस शोध मोहिमेमध्ये लोकांनी मला वेगळ्या बसकडे नेउन पोहचवले. ती कोलंबोला जाणारी एसी बस होती ज्याचे टिकीट श्री. रु. १२०/- होते. म्हटलं ठीक आहे. एकतर मी प्रचंड दमले होते. झोप येत होती म्हणून बसले त्या बस मध्ये. बस भरल्यावर निघाली आणि टु माय सरप्राईज, भर सकाळी हेवी मेटालिका असते तसे सुगम संगित विडिओ सकट सुरु झाले. हे नंतरच्या प्रवासात श्रीलंकेत सर्वत्र पहायला मिळाले.
बस एअरपोर्ट वरुन मुख्य रस्त्याला लागली आणि मग एकच विचार मनात आला. Abundance!! मस्त भरून वहाणारी नदी आणि तो हिरवा रंग!! फायनली!! हो. या देशात फिरल्यावर मला Abundance हाच शब्द आठवतो. भरभरून मिळालेलं दान!!
जवळजवळ एक तासाचा प्रवास झाल्यावर बस श्रीलंकेच्या फोर्ट एरियामध्ये थांबली. तिथून माझे हॉस्टेल तीन ते चार किलोमिटर लांब होते आणि माझे बस चे खुळ काही संपत नव्हते. आजूबाजूला चौकशी केल्यावर एका भल्या माणसाने मी त्याच दिशेची बस पकडायला चाललो आहे असं सांगितले. मग त्याच्या पाठोपाठ वरात निघाली आणि एका मिनी व्हॅन सद्रुश्य बस मध्ये बसले आणि भर सिटीमध्ये कुठेतरी उतरले.
आता हॉस्टेल शोधायचे तर गुगल मॅप मला गोलगोल फिरवू लागले. शनिवार सकाळचे सात वाजले होते, सुट्टीचा दिवस त्यामुळे रस्त्याला जास्त वर्दळ नव्हती आणि कोणाला विचारायचे समजत नव्हते. एक रिक्शावाला मागे मागे करायला लागला. तर त्याला नाही म्हणून सांगितले. जवळच्या एका हॉस्टेलला जाऊन पत्ता विचारायला गेले, तो माणूस मला मदत करायला बाहेर आला, तर ह्या रिक्षावल्याने त्याला खूण केली, त्यामुळे तो मला रिक्षाने जा सांगायला लागला. आतातर मी मुळीच त्या रिक्षाने जायचे नाही असं ठरवले.
मी हॉस्टेलच्या अगदी जवळ आहे हे मला समजत होते, पण नक्की कुठे आहे आणि कसे हॉस्टेलपर्यंत पोहचायचे ते समजत नव्हते. मग रस्त्यात एक मुलगी आणि मुलगा दिसले. मी हॉस्टेलला फोन केला आणि त्या मुलाला मी कुठे आहे ते हॉस्टेलवाल्याला सांगायला आणि हॉस्टेलला कसे पोहचायचे ते विचारायला सांगितले. मग त्याने एका बारीक गल्ली कडे बोट दाखवले आणि मी त्या दिशेने चालायला लागले. दहा मिनीटे चालल्यावर कोलंबो सिटी हॉस्टेलला पोहचले.
तर आता कोलंबो हॉस्टेल प्रकरण पुढच्या भागात...