हॉस्टेलमधली भित्तीचित्रे बघून एकदम मस्त वाटले. हॉस्टेलच्या गच्चीत ब्रेकफास्ट करायला गेले. ब्रेकफास्टला घरगुती बनवलेले स्ट्रींग हॉपर्स, डाळ आणि पोल होते. ऑस्सम होते ते. ब्रेक्फास्ट करता करता हॉस्टेल मॅनेजर सॅमबरोबर गप्पा चालू झाल्या. गप्पा दरम्यान शेजारीच बसलेल्या मुलाने आम्ही ऑस्ट्रेलिया वर्सेस श्रीलंका क्रिकेट मॅच पहायला चाललो आहे. तू येतेस का विचारले. मला त्यावेळेस झोपेशिवाय काही सुचत नव्हते आणि क्रिकेट हा माझ्या अज्जिबात आवडीचा विषय नसल्याने त्याला पास म्हणून सांगितले.
हॉस्टेल मधील रंगवलेल्या भिंती
दोन तास महान झोप काढून झाल्यानंतर सॅमला कुठुन कुठे जाऊ वगैरे विचारायला गेले आणि इथल्या 'टुकटुक बार्गेन सिस्टिमची' माहिती करून घेतली. जेवणासाठी राजा भोजुन मध्ये जायचे ठरवले. इथे चांगले श्रीलंकन जेवण मिळते. श्रीलंकन जेवणाची स्वप्ने मी मागचे काही महिने बघत होते. जेवण खरच उत्तम होते. एकुणातच अन्न या फ्रंटवर ओपनिंग चांगली झाली होती.
श्रीलंकन जेवणाची झलक
जेवण झाल्यावर कोलंबो शहरात चक्कर मारावी असं ठरवले. मला कोलंबो म्युझिअम बघण्यात जास्त इंटरेस्ट होता पण काम चालू असल्याने ते बंद होते.
सर्वात आधी कोलंबो पाहिल्यावर मला काय वाटले ते लिहीते. मला कोलंबोत शिरल्याबरोबर अमेरीकेची आठवण आली. मस्त प्रशस्त रस्ते, स्वच्छता आणि शिस्तीत चाललेले ट्राफिक. फक्त एवढ्याच मुद्द्यासाठी अमेरीकेबरोबर तुलना. एकुणातच कोलंबोमधील रहाणीमान उत्तम आहे असे वाटले. संध्याकाळी एका श्रीलंकन मैत्रीणीला भेटल्यावर हा विचार बोलून दाखवला. त्यावर ती म्हणाली, हा एरीया उत्तम आहे, बाकी सर्वत्र असेच कोलंबो नाहीये. तरीपण भारतापेक्षा बरीच बरी परिस्थिती आहे. श्रीलंका बरीच स्वच्छ आहे याची थोडीफार कल्पनाआधी होती, तरीसुद्धा तिथे पोहचल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसलाच. एकुणातच श्रीलंकेत सर्वत्र स्वच्छता आहे. लोकं शांत आहेत, ट्राफिक शिस्तीत चालते. त्यांची लोकसंख्याही कमी आहे.
कोलंबोमधील ऐतीहासिक स्थळे
थोड्याफार जवळपासच्या ऐतीहासिक स्थळांना भेट देउन झाल्यावर मी हॉस्टेलवर परत आले. संध्याकाळी एका नवीनच ओळख झालेल्या श्रीलंकन मैत्रीणीला जेवणासाठी भेटायचे होते. त्याआधी हॉस्टेलच्या गच्चीवर इतर हॉस्टेलमेटसबरोबर गप्पा चालू झाल्या. शेजारी बसलेला मुलगा त्याचे प्रवासाचे प्लान्स सांगत होता. माझ्या डोक्यात उद्या डंबुलला (Dambulla, श्रीलंकन्स याचा उच्चार डंबुल्ल असा करतात) रहायचे की हबारानाला याचा विचार होता. दोन्हीचा बसमार्ग एकच होता. सॅमला मी हे विचारणारच होते तेवढ्यात एक मुलगा डंबुलाला जाणारी बस किती वाजता सुटते हे विचारायला आला. बोलताबोलता मीसुद्धा उद्याची बस पकडणार आहे, असं सांगितले. मग एकत्रच जाऊयात असं दोघांनी ठरवले. त्याला विचारले किती वाजता निघायचा प्लॅन आहे? तर त्याने उद्या सकाळी ८ किंवा ९ सांगितले. मनात म्हटले, हे काही मला जमणार नाही. मला लवकर निघायचे होते. चला जरा वेळ निगोशिएट करता येतेय का बघुयात असा विचार करून त्याला विचारले ५ किंवा ६ यापैकी काय? मला वाटत होत ७ वाजता निघुयात यावर सौदा होईल. तर तो म्हणाला खरतर वेळ "हाऊ हार्ड आय पार्टी टूनाईट यावरच ठरवू शकतो" मग मी सांगितले मी ६ वाजता निघणार आहे. तर तो पण एकदम तयार झाला. मला ते अपेक्षित नव्हते. मी माझे आवरून रात्री झोपायला गेले आणि सकाळी सहा वाजता उठले. डॉर्मच्या बाहेर येऊन बघते तर जॉनथन बॅगपॅक वगैरे घेऊन तयार होऊन शू लेस बांधत होता. मी मनातल्या मनात स्वताला शिव्या घातल्या. कारण काल संध्याकाळी त्याचे बोलणे मी सिरीअसली घेतले नव्हते. तो उठून तयार होईल असं मला वाटलं नव्हतं. मी एकट्याने निघायच्या हिशोबात होते आणि हा तयार होऊन बसला होता. त्याला सॉरी म्हणून पंधरा मिनीटात आवरून तयार झाले बॅग उचलली आणि भर सकाळी ६.१५ ला आम्ही टुकटुक शोधायला बाहेर पडलो...