अश्रू--
तू बोलत होतीस भडाभडा, मनातली सगळी भडास उतरवत होतीस
होता तो आरसा तुझ्या मनाचा
तुझ्या बोलण्यातून मला दिसणारा...
तुझे मन भयचकित कधी स्वत:च्या वागण्याने
तर कधी उद्विग्न इतरांच्या प्रतिसादाने
किती महत्त्व असते ना या साऱ्याला
मी बोलले - ते वागले
ते बोलले - मी वागले
मनभर पसरत राहतात
बोलण्या-वागण्याचे साद-पडसादही
निसटून पुढे जात असतो वेळ
आपले जगणेही....
किती जागा द्यायची अशा क्षणांना
आपल्या इवल्याशा मेंदूत अन देहकुडीत?
क्षण तर संपलेला अन आपण त्यात अडकलेले
कशासाठी?
इतकं का आपलं आयुष्य कवडीमोल आहे
की ते टाकायचं संपवून
अशा बेचैन करणाऱ्या निरर्थक क्षणांमध्ये?
क्षणांची ही माळ न संपणारी
अन त्यात अडकून आपण
कणाकणाने झिजणारे
आतआतून स्वत:च स्वत:ला पोखरत राहणारे...
बोलत रहा, मोकळी होत रहा
थांबव
झिजणं पोखरणं
ओघळत राहतील अश्रू थेंब थेंब
बनेल त्याची उष्ण धार
वाहील नाकावर गालांवर
विरघळून जातील क्षार
ओरखडणारे...
तुझ्या मनातले
अन
तुझ्या मनात अडकलेल्या माझ्याही मनातले.....
चित्रा --- २०.०९.२०१५