उत्खनन - गौरी देशपांडे

अलिकडेच उत्खनन पुन्हा एकदा वाचलं, तेव्हा जाणवलेल्या काही गोष्टी लिहिते. अजून कोणाला या पुस्तकाबद्दल काही प्रतिसादात लिहायचे असल्यास लिहा, मग आपण ते हेडरमध्ये अपडेट करू.

सुरुवात पुस्तकाच्या माहितीपासून करते.
उत्खनन - गौरी देशपांडे
किंमत- रु. ७०/-
११४ पाने, मौज प्रकाशन

गौरी आणि तिच्या साहित्याची पहिल्यांदा ओळख झाली ती माझ्या ngo मध्ये काम करणाऱ्या रुममेटकडून. तिच्या टेबलावर 'एकेक पान गळावया' दिसलं आणि तेव्हापासून गौरी जी मनात खोलवर जाऊन बसली ती कायमची. त्याच वेडात तिची सगळी पुस्तकं मिळवून वाचून काढली अर्थात त्या वयात ज्या गोष्टी उमजल्या नाही त्या आता एका दशकाने परत वाचल्याने नव्याने अर्थवाही होत आहेत. कदाचित अजून एका दशकानंतर त्यांचे अर्थ अजून बदललेले असतील..

'उत्खनन' मध्येही गौरीने 'दुनिये'च्या नजरेतून तिच्या आयुष्यातील घडामोडी, वयानुसार तिची बदलणारी आपल्याच आयुष्याची समज टिपली आहे. गौरीच्या पात्रांची नावंसुद्धा अगदी वेगळीच पण त्यातूनही ती प्रत्येक व्यक्तिमत्व मिश्कीलपणे डिफाईन करते. जशी इथे आपली दुनिया, जी दुनियेला पुरून उरली पण स्वतःच्या मनात कुठेतरी आयुष्यभर बारीकसा न्यूनगंड बाळगून दुनियेचं ऐकतही राहिली. तर तिची मुलगी 'मणी' जीला खरंच जगावेगळ्या स्यमंतक मण्यासारखं घरच्या सगळ्यांनी जपलं आणि बहरू दिलं. अनंत हे तर त्याच्या अनंत आकांक्षा आणि आणि जगभर कुठेही फिरण्यावरून दिलेलं. तर दयाल जरी केसांच्या छटेवरून असला तरी त्याच्याएवढा बुद्धिनिष्ठ दयाळू प्राणी मिळणं कठीणच!

गौरीच्या कथा ह्या रूढार्थाने कथा नसतातच. मला ते त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातले snipets वाटतात. त्यांच्या मनाच्या कलावरून, त्यांच्या musings मधून त्यांच्या कहाण्या उलगडत जातात. त्याना ना अंत ना आरंभ.. पण त्याचं जगणं आपण जगत जातो. हीच खरी गौरीची हातोटी आहे.

दुनियेने जे वेगळं आयुष्य जगलं, ज्या गोष्टीमुळे तिचे जीवन बदलून गेले त्या गोष्टी तिच्या तरुणपणी महत्त्वाच्या असतील त्यामुळे मणीची सामाजिक प्रतिमा चार मुलींसारखी राहावी हा प्रयत्न ती करते. पण ती जे आयुष्य जगली ते किती सुंदर होतं याची जाणीव तिला जबरदस्तीने केलेलं मणीचं लग्न तुटल्यावर होते. अभया हि तिची मैत्रीण म्हणजे तिचा alter ego आहे. ज्या गोष्टी करायला दुनिया घाबरते त्या करण्याचं बळ तिला अभयाकडून मिळतं आणि तिची जी समाजमान्य होण्याची गरज आहे ती अभयाचे कुटुंब, अर्णव, सती, तीर्थंकर यांच्याकडून पूर्ण होते. अर्णवची विचारी तरीही गोड अशी व्यक्तिरेखा खूप छान आहे. तशीच मणीमधली बुद्धिनिष्ठ आणि प्रॅक्टिकल डॉक्टर. गौरीचे कथानायक (जरी त्यांना कमी वाव असला तरी) खूप समजूतदार, तात्त्विकदृष्ट्या सक्षम, बुद्धिमान आणि या जगावेगळ्या नायिकांना सांभाळून घेतील असे असतात. इथे दयालही तसाच आहे. त्याचं आणि मणीचं नातं खूप खऱ्या वडील मुलीपेक्षाही खूप सुंदर आहे.

मध्ये मध्ये उल्लेख केलेल्या बोर्हेजच्या कविता दुनियेच्या आयुष्याचंच प्रतीक आहे. पुढे आजारी अनंत घरी आल्यावर त्याला समजलेली दुनिया आणि इतक्या वर्षांनी तिने अनंतबद्दल केलेला विचार हे खूप इंटरेस्टिंग आहे. गौरीच्या बाकी कथांप्रमाणे यातल्या व्यक्तिरेखा वेगळ्या असल्या तरी एकंदरीत जास्त सकारात्मक आणि आनंदी आहेत. बहुतेक हे पुस्तक लिहिताना गौरी एकदम happy mood मध्ये असणार!

शेवट त्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना ज्यात उलगडतात त्या अर्णवच्या भाषांतरित कवितेने करते,

"चांदण्यात वाघ, सोन-काळा,
बघतो नख्या आपल्या.
पत्ताच नाही त्याला
की, पहाटे भल्या
खतम केलंय त्यांनी एका माणसाला."

वर
0 users have voted.