आसाममधील वीरांगना - मूला गाभरु

मूला गाभरु

शाळेत भारताचा इतिहास शिकलो पण उत्तर पूर्व राज्यांचा इतिहास, तिथले राजे ह्याबद्दल शिकल्याचं काही आठवत नाही. आसामच्या इतिहासाबद्दलची माहिती साधारण इ.स. चवथ्या शतकानंतरची उपलब्ध आहे. आसाममध्येही भारतातील इतर राज्याप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यकर्त्या व योध्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही. अश्याच एका अपघाताने, बदलेच्या भावनेने बनलेल्या लढवैय्या स्त्रीची कहाणी.

ही आहे मूला गाभरु ! सेनापती फ्रांचेंमुं बरगोहाईंची पत्नी! त्याकाळी आसाममध्ये आहोम वंशाचा राजा चुहुंमुं (इ.स. १५३२)राज्य करत होता. गौर(बंगाल) चा नवाबाला आसामवर राज्य करायचे होते त्यासाठी त्याने सेनापती तुर्बकला मोहिमेवर पाठवले होते. ही खबर राजा चुहुंमुं ला लागली तसे त्याने पराक्रमी सेनापती फ्रांचेंमुंला तुर्बकशी लढण्याचे आदेश दिले. फ्रांचेंमुं शूर, वीर, पराक्रमी होता. त्याने प्रतिज्ञा केली की शत्रुला संपवल्याशिवाय परतणार नाही आणि लढण्यासाठी सज्ज झाला. घरी येऊन त्याने ही वार्ता आपल्या पत्नीला सांगितली. ती एका वीर सेनापतीची वीर पत्नी होती.

आहोम वंशात एक परंपरा अशी होता की जर कोणी पुरुष युध्दावर जात असेल तर त्याची पत्नी किंवा बहीण एका रात्रीत सूत कातून एक वस्त्र विणून देत असे व ते घालून तो योध्दा युध्द करायला जात असे. त्या वस्त्राला ' कवच' म्हणतात. त्यांची अशी श्रध्दा होता की हे कवच योध्याला सुरक्षा देतं, त्यांना इजा होत नाही व युध्दात हमखास विजय मिळतो. अर्थात मूला गाभरुला पण 'कवच' विणायचे होते. पण अडचण अशी आली की ती रजस्वला होती त्यामुळे तीन
दिवस ती विणू शकणार नव्हती. तिने आपल्या पतीला तीन दिवस थांबायची विनंती केली. पण देशावर संकट चालून आलेले असताना तो कसं काय थांबणार होता. तीन दिवसात सर्वनाश झाला असता. त्याने तिला आपली अडचण सांगितली. तिचं श्रध्दाळू मन विचलीत झालेलं पाहून तो म्हणाला, 'अग, वेडे! असं काही नसतं. ही एक खुळी, भाबडी श्रध्दा आहे. ही एक फक्त परंपरा आहे, जय-पराजयाचा ह्याच्याशी काही संबंध नाही. घाबरू नको मी विजयी होऊनच परतीन.' आणि तो युध्दासाठी सज्ज झाला.

मूला मात्र अस्वस्थ होती. तिच्या मनात वाईट साईट विचारांच काहूर माजलं असतानाच बारगोहाईच्या वीर मरणाची बातमी पोचली. शोकाकुल मूला स्वत:ला कोसू लागली,कवच विणून दिले नाही म्हणूनच बारगोहाईचा मृत्यु झाला. तिने आपल्या पतीच्या मृत्युचा बदला घेण्याचे ठरवले. तिने तसे राजाला सांगितले. त्यांना शंका होती की एक स्त्री हे धाडस कसं काय करु शकेल. पण तिने निर्धारपूर्वक सांगितले, 'मला वीर मरण आलं तरी बेहत्तर पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढीन. देशाची सुरक्षा करणं हे माझेही कर्तव्य आहे, मला परवानगी द्यावी, महाराज.'

मूलाचा दृढनिश्चय बघून राजा चुंहुंमुंने परवानगी तर दिली त्याचबरोबर हाथीदळ, कनचें बरपात्र सारखा लढाऊ सेनापती व सैनिकांची फौज दिली. मूला सैनिक वेश धारण करुन लढायला सज्ज झाली, ही बातमी वाऱ्यासरशी देशभर पसरली. मूला लढू शकते तर आम्ही का नाही? म्हणत अनेक स्त्रिया सहभागी झाल्या. सैनिकांमध्येही जोश आला. दिकराई नदीकाठी मूलाचा सामना तुर्बकशी झाला. मूला व तिच्या नारीसेनेने अशी काही मारकाट केली की तुर्बकची सेना मागे हटू लागली तेव्हा खुद्द तुर्बक मैदानात उतरला. हजारो सैनिकांना मारुन मारुन मूला दमली. शेवटी जखमी होऊन धारातिर्थी पडता पडता तिने सैनिकांना ललकारले, "बहादूर जवानांनो तुर्बकच्या सेनेचा फडशा पाडा, मातृभूमीचं रक्षण करा." सैनिक अधिक त्वेषाने तुर्बक सेनेवर तुटून पडले. तुर्बकची हार झाली. सेनापती कनचें बरपात्र गोहाईंने तुर्बकला मारुन मूलाने केलेला संकल्प पूर्णत्वास नेला. मूलाचं बलिदान व्यर्थ गेले नाही.

अशा प्रकारे, वीरांगना मूला गाभारूने आपल्या राज्यावरचं मुघलांचं परकीय आक्रमण स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्ती परतावून लावलं, सूडाच्या आगीचा असा योग्य उपयोग इतिहासात फारच कमी वेळा झालाय. तिचे देशप्रेम, पतीवरची निष्ठा, आणि तिचा त्याग तरूण आसामी पिढीसाठी स्फूर्तीदायक आहेत.

रेफरंस : Assamese Women in Indian Independence Movement
Mula_Gabharu

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle