मोगऱ्याचा गजरा

***मोगऱ्याचा गजरा***
तिला मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा ...
केसात माळला नाही तरी गाडीत, पर्समध्ये कुठे ना कुठे गजरा दरवळतच असायचा कायम ...तिच्या अवती भोवती...
आज तर काय डोहाळ जेवण होत तिचं ...
वेणी लगडली होतीच मोगऱ्याने... पण तिला आवडतो मोगरा म्हणून पूर्ण वाडीच मोगऱ्याची मागवली होती... खास तिच्यासाठी!
आज्जी कौतुकाने म्हणाली...
"घे हो माळून मोगरा... पुन्हा लेकरु अंगावर पित राहील तोवर वासही घेता नाही येणार फुलांचा."
आज्जीचं आपलं काही तरीच... ती मनात पुटपूटली...
"असं काही नसतं ग आज्जी" , म्हणायचं होतं तिला, पण हातात मोगरा गोवता-गोवता विसरलीच ती... ...
दिवस सरत होते सोनोग्राफी, तिचं वजन, बाळाचं वजन - सगळं आलबेल होतं...
नऊ महीने भरले... कळा सुरू झाल्या तशी ती कुटुंब-कबिल्यासकट हाॅस्पिटलमधे भरती झाली.
अवघे काही तास शिल्लक होते तिला बाळाला कुशीत घ्यायला! डॉक्टर, नर्स सगळे भोवती होते... पहिली वेळ असुनही ती अगदी धीराने सोसत होती कळा ... forceps delivery असं कानावर पडलं तिच्या... मग बरीच गडबड ऐकली... कानात प्राण आले तिच्या ते पहिलं रडू ऐकण्यासाठी...
sedate की असंच काही कानावर पडलं तिच्या.... मग गाढ झोप लागून गेली तिला...

तीन दिवस उलटले होते...
तिची लेक तिला सोडून निघून गेली होती... maternity ward मधे तान्हे आवाज ऐकत आणि रिकामा पाळणा बघत पडून राहिली होती ती...
डॉक्टर आल्या भेटायला...
समजावत होत्या नक्की काय झालं... कसं झालं वगैरे वगैरे... तिने नेहमीचाच समजुतीचा आणि धीराचा बुरखा पांघरला...
डॉक्टरचेच सांत्वन करु लागली...
बोलता बोलता त्या समजावत होत्या...
"दूध आले नाही पाहिजे... त्रास होईल पान्हा फूटला तर... घट्ट कपडे घाल... "
ती उदास हसली...
Discharge घेउन घरी पोहोचली तोच किंचित ओल जाणवली छातीला...
Clinic गाठलं... डॉक्टर म्हणाल्या...
"इतक्यात hormones च injection नको...
एक काम कर... मोगऱ्याचा गजरा ठेव जवळ... वास घेत रहा... कपड्यांच्या आतही ठेव फूलं... अगं, पाहतीयेस काय अशी? मोगऱ्याच्या वासाने hormone level control होते... दूध यायचं बंद होइल..."
तिला काही ऐकू येईना पुढचं...
आज्जीचे शब्द फिरत राहिले मनात...
"घे हो माळून मोगरा...पुन्हा लेकरु अंगावर पित राहील तोवर वासही घेता नाही येणार फुलांचा..."!

- प्राची!!!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle