काsssssय? आतापासून बरोब्बर चार तासांनी माझा मॄत्यू होणार? कसे शक्य आहे हे? काय झालेय काय मला? की मी काही गुन्हा केलाय म्हणून मला ही शिक्षा मिळणार आहे? काहीच कळेनासं झालंय. काय करु? कुणाला विचारु? कसले डॉक्टर हे मेले? असाध्य आजार असलेल्या रुग्णालादेखील तू लवकरच खडखडीत बरा होणार आहेस असं सांगितलं जातं आणि नखात रोग नसलेल्या, अजुन 'यौवनात' असलेल्या मला, तू चार तासांनी मरणार आहेस हे तोंडावर सांगून मोकळे? वेंटीलेटर नाही का हो तुमच्याकडे? निदान त्याच्यावर तरी जगवा मला आणि काही वेगळी ट्रीटमेंट देऊन वाट बघा, जर तुमच्यामते मी आजारी असेन तर. हे म्हणजे माझ्या नावाची सुपारीच दिल्यासारखं की ! शी: बाई काही सुचेनासं झालंय. कुणाला आवडेल असं तडकाफडकी मरण? तडकाफडकीच काय हो, मरण तर कुण्णालाच आवडत नसतं. पण माझं मरण म्हणजे अगदी डाव रंगात आला असतांनाच अर्धवट उठून निघून जाण्यासारखं .
काही निरवानिरव करायला वेळही नाही हाताशी. जरा चिमुरड्यांना डोळे भरुन पाहिले असते, त्यांच्यासह काही दिवस निवांत राहिले असते. जगाचे टक्के टोणपे समजावून सांगितले असते त्यांना. सगळं राहूनच गेलं की.
पण मी हा असा कितीही त्रागा करुन काय उपयोग? हे सारे चराचर 'त्याच्या' हातातील कळसुत्री बाहुल्या. तो कधी कुठली कळ दाबेल आणि कुणाला कधी एक्झिट घ्यावी लागेल हे एक 'तो'च जाणे. मी तरी कुठे अपवाद ठरणार या नियमाला? माझी सुत्रेही त्या ''कोण्या'नियंत्याच्या हातात. त्याने ठरवलं आणि माझी गाशा गुंडाळायची वेळ आली.
आता जे आहे ते स्वीकारले तर पाहिजेच मला. पण माझ्या अशा अचानक निघून जाण्याच्या विचाराने ही अवतीभवतीची मंडळी किती व्यथित झालेली दिसतायत. अगदी हवालदिल झाली आहेत बिचारी. जणू काही माझ्या जाण्याने जगबुडी येणार अशीच वागतायत लोकं. हीच तर खरी कमाई माझी. सर्वांना हवीहवीशी वाटत असतांना गुपचुप निघून जाण्यात तर खरा आनंद आहे. या सर्वांचं प्रेम घेऊन जाईन बरोबर.
मी नीट थंड डोक्याने याचा विचार करतेय का पण? नाही.... जरा सारासार विचार केल्यावर लक्षात येतंय माझ्या की या प्रेमाला स्वार्थाची किनार आहे. यांपैकी कुणीही माझ्या एकटीच्या विचाराने नाही अस्वस्थ झालेलं तर माझ्याशिवाय यांचे आयुष्य कसे असेल? या विचाराने ते अस्वस्थ झालेत. म्हणजे ते स्वतःसाठी अस्वस्थ आहेत, माझ्यासाठी नाहीत. मी मात्र उगाचच हुरळून गेले होते. उद्या माझ्या जागी कोणीतरी दुसरी येईल आणि सगळे मला विसरुनच जातील. माझा रंग, रुप हे सारं म्युझियमच्या काचेआड बंदिस्त होईल. अरेरे इतकी वर्षे मी या लोकांच्या मनावर राज्य केलं. मी जवळ असल्याची आश्वस्त जाणीव प्रत्येकाला सुखावह वाटायची. पण आता 'जन पळभर म्हणतील हाय हाय आणि मी जाता म्हणतील बाय बाय' हेच होणार नक्की.
काय कमावलं मी नक्की इथे येऊन? मझ्या शरीरावर याच लोकांनी उमटवलेल्या ओरखड्यांचे व्रण सोसत राहिले बापडी. कधी चकार शब्द म्हणून काढला नाही. खरंच माझं आता या वेळी इथून निघून जाणंच उचित असेल का? सर्वांसाठी आणि माझ्यासाठीही? अरेरे... हे काय ऐकले मी आत्ताच? ताईही जाणार माझ्यसोबत? माझ्या ताईवरही हा प्रसंग? जी एका साम्राज्ञीसारखी राहिली तिलाही गच्छंती? वाईट वाटलं खरंच. खरं तर वयाने आणि अनुभवाने मी मोठी. पण माझ्यापेक्षा मानमरातब तिला दिला गेला म्हणून मी स्वतःच तिचं ताईपण स्वीकारलं. आता मावशीही नसणार लेकरांची तर चार अनुभवाचे बोल सांगायलाच हवेत त्यांना. या जगात तीच बिचारी वावरणार आता. एकदा ताईला पण डोळेभरुन पहावं म्हणते.
अरे ही काय... ताई आहेच की इथे."ताई..अगं काय ही तुझी अवस्था? नाकातोंडात नळ्या, श्वास लागलाय का गं?" ‘छोटे, अगं कसलं ताईपण घेऊन बसलीस? जीव नकोसा झाला गं या घुसमटीने. अगं मी मोठी आणि माझी किंमत जास्त म्हणून लोकांनी पलंगाखाली, भिंतींमध्ये कुठे कुठे लपवले गं मला? आता ४ तास उरलेत ना आपल्याकडे म्हणून शोधून काढतायत आणि खपवायला बघतायत. छोटे, तुला खरंच कल्पना नाही गं काय काय भोगलंय मी. अगं आपल्या दोघींच्या नकला बनवून घेऊन विघातक शक्ती पोसल्यात या माणसांनी !!" "काय सांगतेस ताई?" मग, आपलंच घबाड कसं वाढेल या स्वार्थी हेतूने आपल्या दोघींना लपवलं, मग भले देशाची आर्थिक प्रत का कोसळेना. चल बाई आपल्या पोरांना सांगू पोरांनो मोठेपणाचा हव्यास बाळगू नका, तरच या परिस्थितीत टिकाल आणि चल निघू आपण".
ताईचे अनुभवाचे बोल कानी पडले मात्र....हादरलेच मी.हा निर्णय चुक की बरोबर यावर मला आता भाष्यच नाही करायचंय. नाही मला कुणाला निंदायचं नाही वंदायचं. एक मात्र आहे आमचा दुरुपयोग करुन जर कुणी या देशाचं नुकसान करत असेल तर त्यांना शासन होण्यासाठी मी माझं बलिदान द्यायला आनंदाने तयार आहे. या निर्णयाचे परिणाम येणारा काळ ठरवेलच. पण माझा पुनर्जन्मावर ठाम विश्वास आहे बरं का, त्यामुळे मी पुन्हा केव्हातरी नव्या रुपात, नव्या रंगात, नवे मूल्य बाळगून जन्म घेईनच.
तोपर्यंत गुडबाय
कळावे आपली नम्र
राष्ट्रहितार्थ आत्मसमर्पण करणारी रु. पाचशेची नोट