सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी'
विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे!
एक जीवन एक ध्येय चा मंत्र देणाऱ्या माननीय एकनाथजींचा एकशे दोनवा जन्मदिवस! त्यांना भावपूर्ण आदरांजली! त्यांचा व त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय देणं केवळ अशक्य आहे तरी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न...
एकनाथजींचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौदा साली अमरावती जिल्ह्यातील टिमटाळा येथे झाला. आठ बहीण भावंडात हे शेंडेंफळ. वडील रामकृष्ण रानडे रेल्वेत स्टेशनमास्तर होते व आई रमाबाई गृहिणी. आर्थिक परिस्थिती बेतासबात. वडील अतिशय शिस्तप्रिय व कठोर शासक होते.
१९२० मध्ये नागपूरला काॅंग्रेस काॅनफरन्स तर्फे प्रदर्शन भरले होते. नाथ (लाडाने त्यांना घरचे लोक नाथ म्हणत) आपल्या आई बरोबर प्रदर्शन बघत असताना त्यांना शंख, गदा, पद्म, व चक्र हातात असलेले लोकमान्य टिळकांच चित्र दिसलं. जिज्ञासू वृत्तीचा गप्प बसेल तो नाथ कसला! त्याने आईला प्रश्न विचारून भंडावून सोडलं. आई यथामति उत्तरे देत होती. टिळक देव नाहीत, माणूस आहेत तर त्यांना चार हात का?त्यांनी आपल्या मातृभूमी करता इतकं अवतारी काम केलंय जणू काही देवच म्हणून त्यांचं असं चित्र काढलंय. छोट्या नाथाच फारसं समाधान नाही झालं पण एक गोष्ट मनात ठसली की एक सामान्य मनुष्य देशाकरिता देवा सारखं अलौकिक काम करू शकतो.
एकदा प्रसिद्ध ज्योतिष्याला रामकृष्णरावांनी सगळ्या मुलांची पत्रिका दाखवली. नाथाची पत्रिका बघून त्यांनी सांगितले की नाथाचा भविष्यकाळ फार उज्ज्वल आहे जर आईवडीलांपासून त्याला दूर ठेवले तर. त्यासाठी ज्योतिष्याने सुचविले की नाथाला दत्तक द्यावे. वडील तयार झाले पण आईचे मन मानेना पण त्या काळी नवऱ्यासमोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती. नियतीच्याही मनात काही वेगळेच होते. एकनाथजींचे वडील बंधू व त्याची पत्नी नागपूरला राहत होते त्यांच्याजवळ त्यांना पाठवलं. अश्यातऱ्हेने दत्तक विधान टाळलं असं त्या मातेला वाटलं. पण दत्तक विधान अटळ होतं आणि ते झालं भारतमातेच्या नावाने.
एकनाथजी नागपूरला सरकारी शाळेत शिकू लागले. त्यांच्या वडिलांची नोकरी गेली आणि संपूर्ण कुटुंबच नागपूरला आलं. एकदा त्यांच्या आईच्या बांगड्या वाढवल्या ( फुटल्या) आणि ते अशुभ लक्षण समजल्या जायचं. बाजारातून बांगड्या आणण्यासाठी त्यांनी नाथाला टोपी घालून बरोबर चलायला म्हटलं. त्या काळी टोपी न घालता बाहेर पडणं अशुभ मानत. नाथाने टोपी शोध शोध शोधली पण सापडली नाही आणि ते टोपी न घालताच गेले. झालं! ही गोष्ट त्यांच्या वडिलांना कळली. ते तर जमदग्नीचाच अवतार. वेत आणि नाथाची पाठ ह्यांची अशी काही गाठ पडली की ती त्यांच्या आयुष्याची शिदोरी बनली ती अशी की, वस्तू जागच्या जागी व वेळेत ठेवलीच पाहिजे जेणेकरून ती अंधारातही सापडलीच पाहिजे. एकनाथजींचे मेहुणे श्री अण्णा सोहोनी ह्यांचे डाॅ हेडगेवारांशी घनिष्ठ संबंध होते आणि अर्थात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ताही होते. ते अण्णांबरोबर शाखेत जाऊ लागले घरच्यांच्या विरोधाला न जुमानता. त्यांनी प्रचंड शारीरिक व मानसिक ताकद , धाडसी वृत्ती, निर्भयता कमावली ती शाखेच्या संस्कारातून व इथेच त्यांच्या मनात देशभक्तीचे बीजही रोवल्या गेलं.
एकदा त्यांची भाची दुर्गा तापाने फणफणली होती. डाॅंनी तिच्या डोक्यावर बर्फाच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या. बर्फाचा कारखाना जवळपास तीन किमी लांब होता. एकनाथजी आपल्या पाठीवर दोन लाद्या घेऊन आले. लाद्या का आणल्या विचारल्यावर त्यांचे स्पष्टीकरण असे की बर्फ आणला असता तर येईपर्यंत विरघळून गेला असता व दोन लाद्या अशासाठी की कमतरता पडू नये. ह्या प्रसंगातून त्यांच्यातील दूरदृष्टीपणा दिसून येतो.
१९३२ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रचारक व्हायचे होते. डाॅ हेडगेवारांनी आधी शिक्षण पूर्ण करून मग प्रचारक होण्याचा सल्ला दिला. बाबूरावांना (थोरले बंधू) त्यांनी इंजिनिअर व्हावे वाटत होते पण त्यांचा ओढा तत्त्वज्ञानाकडे होता. इंदिरावहिनींच्या मध्यस्थीमुळे ते हिस्लॉप काॅलेजमध्ये दाखल झाले. काॅलेजमध्ये बायबलचा वर्ग अनिवार्य होता. प्रो फिलिप्स बायबलच्या वर्गात बायबल हा विषय न शिकवता हिंदू धर्मावर टीका करायचे. हा अत्याचार त्यांना चार पाच वर्ष सहन करणं शक्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी टिळकांच गीतारहस्य, उपनिषद व विवेकानंदांच्या साहित्याचे वाचन व अभ्यास केला. प्रो फिलिप्स सरांशी चर्चा,वाद, प्रतिवाद करून त्यांना निरुत्तर करता येऊ लागले अन मग गंमत अशी झाली की, वर्ग बायबलच्या ऐवजी एकनाथजींचा झाला. त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला त्यात प्रो फिलिप्सही सामील झाले. बायबलच्या वर्गातली अनुपस्थितीमुळे त्यांना परीक्षेला बसता येणार नाही हे कळलं तेव्हा खुद्द प्रो फिलीप्सांनी पूर्ण उपस्थितीचं पत्र दिले. प्रो गार्डनरही इतके प्रभावित झाले होते की त्यांनी परीक्षेला बसू तर दिलेच शिवाय शिष्यवृत्तीही देऊ केली. अशी शिष्यवृत्ती मिळणारे ते पहिले हिंदू विद्यार्थी होत.
एकीकडे बीए व एमए तत्त्वज्ञानाचा अभ्यास व दुसरीकडे संघाचे काम करत होते. शिक्षण संपल्यावर त्यांनी संघाच्या कार्यात झोकून दिले. त्यांच्या वहिनीला वाटत होते की त्यांनी लग्न करून स्थिर व्हावे त्यासाठी त्या सोमवार उपास करत होत्या व नाथाने पण एखादा वार उपासासाठी पकडण्याचा आग्रह करत होत्या. एकनाथजी मिश्किलपणे म्हणाले की मी तर कैक दिवसांपासून वार पकडलाय. वाहिनीने भाबडेपणाने विचारले की कोणता वार? हेडगे 'वार'!
प्रचार प्रमुख, महाकोशाल प्रांत, पूर्वांचल, बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सर कार्यवाहक असे अनेक दायित्व त्यांच्यावर सोपवण्यात आले व ते निष्ठेने पार पाडत होते. विवेकानंदांवरच्या साहित्याचा अभ्यास केला.
त्यांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद! कलकत्त्याला असताना ते बंगाली भाषा शिकले.स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी संपूर्ण विवेकानंद साहित्य वाचले, अभ्यासले. विवेकानंदांच्या प्रत्येक शब्दाने ते प्रभावित झाले. त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय गवसले. त्यांनी "Rousing Call To Hindu Nation" हे पुस्तक लिहिले ज्याच्या दोन महिन्यात दहाहजार प्रति विकल्या गेल्या. दुसरी आवृत्तीही हातोहात खपली व सगळ्या भारतीय भाषांमध्ये अनुवादीत झाली.
स्वामीजी परिवज्रक असताना कन्याकुमारीला आले होते. हिंद महासागरात देवी पार्वतीने ज्या दगडावर तपस्या केली होती त्याच दगडावर स्वामीजी तीन दिवस तीन रात्र ध्यानमग्न बसले होते. अश्या ह्या पवित्र स्थानी स्वामीजीचं स्मारक व्हावे अशी एक जन्मशताब्दी वर्षाच्या निमीत्त्याने कल्पना कन्याकुमारीत मांडल्या गेली. कन्याकुमारीतीलच नव्हे तर संपूर्ण भारतवासियांनीच हे दायित्व त्यांच्यावर सोपवलं म्हणण्यापेक्षा त्यांचा जन्मच ह्या कामाकरिता झाला म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
सर्वोत्तमाचा ध्यास असणाऱ्या कर्मयोगी एकनाथजी रानड्यांनी ती कल्पना 'स्वामी विवेकानंद शीला स्मारक' मूर्त स्वरूपात प्रत्यक्षात आणली.
सम्दर्भः एकनाथजी, निवेदिता रघुनाथ भिडे