माझ्या आयुष्यातील पहिला पुरुष

'माझ्या आयुष्यातील पहिला पुरुष'

माझ्या आयुष्यातील पहिल्या पुरुषांची पहिली आठवण , डोक्यात अजूनही पक्की आहे ...एक हातगाडीवाला गोदरेजचं कपाट लादलेली गाडी ओढतोय नी हा त्याच्या मागून भरभर चालतोय ...त्याच्या बोटाला लोंबकळत दोन लाल गमबुट चालले आहेत ,जे हट्ट करताहेत ,"उचलून घे मला" ...तो त्यांना म्हणतो," घेतो मी उचलून पण त्यापेक्षा एक मस्त आयडीया आहे.आपण ह्या कपाटासोबत रेस लावली तर? ते जातय आधी आपल्या घरी...की तू ?...की मी?"
ते लालेलाल गमबुट एक क्षण थबकले नी दुसऱ्याच क्षणी त्याच्या भोवती गिरकी घेत , कपाटामागे धावू लागले...थोडं धावले की दमून थांबायचे मग तो हळूच ," मी पुढे जातोय हां...जिंकणार मीच आता " म्हणत चार पावलं पुढे जायचा... "नाही नाही मीच जिंकणार" म्हणत गमबुट परत पळत सुटायचे ...
अशाच काही बाही क्लुप्त्या करत तो मला आयुष्याच्या रेसमध्ये पळवत राहिला नी मला जिंकवण्यासाठी स्वतः हरत राहिला.तो असताना हे कधी जाणवलंही नाही ...आज तो नाही आहे तर पदोपदी कळतंय ...काय काय शिकवून गेलाय हा माणूस

बॉक्सिंग पंचेस , टाय नॉट ( ही गाठ येणारी मी माझ्या शाळेतली एकमेव मुलगी होते ...कसलं भारी वाटायचं तेंव्हा , कॉलेजमध्ये ही टाय डे ला भरपूर मुलं रांगा लावून उभी असायची समोर टाय बांधून घ्यायला )
जेंव्हा मुलांना स्वतःचे शूजही घालता यायचे नाहीत तेंव्हा मला शुलेस ओवता यायची ...ती परफेक्ट ऍडजस्ट करून दोन्ही एन्ड एकसमान केल्यावर दरवेळी "पां कडे " ( हो, पा च म्हणायचे ...म्हणते मी त्यांना) नजरेनेच ,' काय मग ...कसलं परफेक्ट जमलंय' चा लूक टाकला नी त्यांची नजरेचीच पावती मिळवायची , ह्या सारखा आनंद नव्हता ... आता ही गोष्ट वेगळी होती की शुलेस जरी मी घातल्या तरी मला शूज तेच घालायचे ...अगदी दहावी होईपर्यंत , मी मोजे घालून खुर्चीत पाय फाकवून बसून रहायचे ...ते त्याची ऑफिसला निघायची तयारी करत करत मला शूज घालून द्यायचे ...यात मला कधीच काही ऑड बीड वाटलं नाही ...8-9 ला असताना एका मैत्रिणीने हा कार्यक्रम पाहिला नी विचारलं, " तुला लाज वाटत नाही का ? वडिलांकडून शूज घालून घेतेस ते " ...मी अगदी निरागसपणे तिला विचारलं,"कसली?"
यावर 'कठीण आहे' लूक देऊन ती गेली होती नी मी तिला 'मेंटल आहे' लूक देऊन कामाला लागले होते...आता लेक जेंव्हा तिच्या मैत्रिणींच्या सेम तक्रारी ऐकवते तेंव्हा मज्जा येते हे आठवून ...

आमच्या घरी टीव्ही रिपेयर करणे हा सोहळा असायचा ...पा काही टीव्ही मेकॅनिक नव्हते पण त्यांना गोष्टी दुरुस्त करायचा शौक होता ...एकच थंम्ब रुल असायचा त्यांचा ' उघडलेली गोष्ट जशीच्या तशी बंद करता आली पाहिजे' , एवढं एक पाळलं की कोणती ही वस्तू उघडायला त्यांची ना नसायची ... त्यामुळे उघडतानाच सगळ्या स्क्रुची पोझिशन नीट बघून ठेवायची सवय लहानपणीच अंगात मुरली जीचा पुढे खूप उपयोग झाला नी होतोय ... इतकुशी मुलगी निव्वळ कुतूहल म्हणून घरातल्या महाग महाग वस्तू उघडून बघतेय पण त्यांच्या कपाळावर कधी एक आठीही उमटली नाही ,आज सेम रुल माझी लेक अप्लाय करते तेंव्हा काळजावर काय दगड ठेवावा लागतो ते माझं मला माहित ...

तर मी काय सांगत होते ...हां,टीव्ही रिपेरिंग , त्यांना बुधवारची सुट्टी असायची ...त्यादिवशीचा हा खास कार्यक्रम असायचा ...पा तो डायनॉराचा ब्लॅक न व्हाइट टीव्ही काढून टेबलावर ठेवायचे ... मी हातात स्क्रु ड्रायव्हर , टेस्टर घेऊन सज्ज असायचे, "मी उघडणार , मी उघडणार " करत त्यांच्या डोक्यावर बसायचे , तेही दिलदारपणे उघडू द्यायचे ...आत ट्यूब चा निमुळता त्रिकोण नी त्यावर बसवलेला तो छोटा ग्रीन पीसीबी ...सगळं अगदी लक्ख आठवतंय ...'थांब ग आधी कॅपासीटर डिसचार्ज करू दे ' ही त्यांची विनवणी मी साफ धुडकावून लावायचे , मीच करणार सगळं हा आमचा बाणा ... मजे मजेचे दिवस होते सगळे , आता आठवून नवल वाटत... नॉर्मली लोक जी काम आपल्या मुलांनाही करू देत नाहीत ती त्यांनी आम्हा मुलींकडून करून घेतली...फ्यूज, बल्ब, ट्यूब लाईट, चोक बदलणे असली सगळी काम आमची आम्हीच केली कायम ...शॉक बिक लागेल अशी भीती ही त्यांनी कधी घातली नाही उलट अतीशहाणपणा करण्याच्या नादात शॉक लागत असेल तर लागू दिला...शॉक लागल्यावरही , चल काही नाही झालंय ...रक्तप्रवाह चांगला होतो म्हणत हातातलं काम पूर्ण करायला लावलं...

" ही वॉझ टू अहेड ऑफ हिज टाईम"
बलात्कारीत स्त्रियांना मानाचं स्थान द्या , त्यात त्यांचा काय दोष इत्यादींचा डंका आतासा सोशल मीडियावर वाजू लागलाय ... मी लहान असताना तर प्रत्येक सिनेमात ,' झाला बलात्कार , दे जीव' हेच पाहिलं होत ... 10 -12 वर्षांची असेन , बलात्कार काय असतो नक्की माहित नाही ...पण काही तरी खूप वाईट असतं जे स्त्री सोबत होत ...जे झालं की कंपल्सरी जीव द्यावा लागतो ,इतपत कळू लागल होत टीव्ही कृपेने ...तेंव्हा पां नी एक नाटक पहायला लावलं होत ...एकत्र पाहून डिस्कस बिसक्स केलेलं ते पहिलं नाटक...
त्या नाटकाची नायिका समाजसेविका असते ...तिच्यावर बलात्कार होतो , हे कळताच नायक नी तिचे काही मित्र नातेवाईक , तिला भेटायला धावतपळत तिच्या घरी पोहचतात ...तर ती गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत असते ...सगळे आश्चर्यचकित होतात , खोटी बातमी मिळाली की काय?
यावर ती म्हणते , " काय अपेक्षा होती ? मी अस्ताव्यस्त अवस्थेत जीव द्यायच्या प्रयत्नात दिसायला हवं होतं का ? झाला तो एक अपघात होता माझ्या शरीराला ...त्यानंतर करायच्या त्या गोष्टी , केल्या की मी ...पोलीस कम्प्लेंट केली , डॉक्टरकडे गेले ...या पेक्षा काय जास्त करायला हवं एका स्त्रीने ?
त्यांनी तो अप्रोच माझ्यापर्यंत पोहचवला ...काय काय विचार आले असतील तेंव्हा त्यांच्या डोक्यात ?
हे आत्ता काल परवा , मी माझ्या 12 वर्षाच्या लेकीला सेम सीनचा रेफरन्स देऊन समजावलं तेंव्हा जीवाची काय कालवाकालव झाली तेंव्हा कळलं ...त्यांच्या बद्दलचा आदर अजूनच वाढला ...

ते माझ्या बघण्यातल्या वडिलांपेक्षा खूप वेगळे होते ... दरारा तर त्यांचा होताच पण तो भीतीयुक्त नसून आदरयुक्त होता... ते दुखावले गेले तर?, ही भीती आम्हाला चुकीचं वागू द्यायची नाही ...आमच्या आयुष्यातला हिमालय होते ते ...कायम कामात व्यस्त असायचे , लोकांच्या गराड्यात फिरायचे ... मम्मीच्या शब्दात सांगायचं तर 'लष्कराच्या भाकऱ्या भाजायचे'
युनियन लीडर होते , कामगारांचे प्रश्न सोडवायचे, सभा घ्यायचे, त्यातलं राजकारण ही आमच्या सोबत शेयर करायचे , (डॉ दत्ता सामंत पहिल्यादा जेंव्हा निवडणुकीला उभे राहिले ती पूर्ण प्रोसेस मी पां सोबत अनुभवलीय ,अगदी फॉम भरण्या पासून प्रचार ,निकाल नी नंतरची मिरवणून सगळं आठवतंय जसेच्या तसे)... एखादी अग्रिमेन्ट साइन करताना तिचे प्रोज नी कॉन्स डिस्कस करायचे घरात ... यातून एक नजर तयार झाली माझी ...एखादा निर्णय घेताना , लोकांना पारखताना जिचा खूप उपयोग होतो .

लोकांना मदत करणे पॅशन होत त्यांच ... कुणी हॉस्पिटलमध्ये आहे त्याला मदत कर, रक्त दे , ओळखीतून काम करवून दे , ह्यातून मोबदला तर लांबचीच गोष्ट झाली उलट बऱ्याचदा गाठीचे पैसे देऊन यायचे ... घरी आले की मम्मी ची चिडचिड मुकाट ऐकून घ्यायचे , ती शांत झाली की इतकंच म्हणायचे , " प्रिया , जमतंय तेवढंच करतोय ग मी " ती तरी काय करू शकत होती ह्या माणसाचं , वेळेला निमूट मंगळसूत्र काढून देतानाही पाहिलंय मी माझ्या आईला , ते ही कुणा भलत्याच माणसाच्या गरजे साठी ...
बरं, हे सगळं भरल्या पोटाला होतं का?.. तर नाही स्वतःचं 6 माणसांचं कुटुंब , चार मुलींच्या शिक्षणाचा खर्च काटकसर करत, ढोर मेहनत करत त्यांनी भावंडांची लग्न लावून दिली, त्यांचे संसार सांभाळले ...भावाला मुंबईला आणून स्वतः उपाशी राहून त्याची खाणावळ भरली, नोकरीला लावलं पण तो झेपत नाही म्हणत परत गावी पळून गेला..( त्यावेळची ते आठवण सांगायचे ते तब्बेतीने हेल्दी असल्याने कुणाला खरं वाटायचं नाही की ते उपाशी आहेत ...मोठं पोट बघून लोक मस्करी करायचे )
तरीही त्याला नी त्याच्या कुटुंबाला त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले, शेती साठी पैसा पुरवला ...बदल्यात पेजेच्या तांदळाची ही कधी अपेक्षा नाही केली...त्याने ही हक्काने त्यांना कायम फक्त वापरलं ,ही गोष्ट वेगळी...इतकं की ते गेल्यावर गावच्या घराच्या 7/12 मधून त्यांचं नाव गायब करताना त्याचे हातही नाही कचरले ...असो
ह्यावर ते म्हणायचे तेच म्हणेन , "ज्याचं त्याच्याकडे"
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता घेणाऱ्याने , देणाऱ्याचे हात घ्यावे

जर त्यांना देता हात बनता नाही आलं हे त्यांचं फुटकं नशीब ...स्वतःकडच सगळं देऊनही, कसं समाधानात रहाता येत , हे शिकता आलं हे आमचं भाग्य ... त्यांच्या सारखे वडील मिळणं ह्या पेक्षा अजून वेगळं भाग्य ते काय?
इतक्या कामांत व्यस्त असतानाही त्यांनी आम्हा चौघीनाही पुरेसा वेळ दिला...
आज जेंव्हा आम्ही गप्पा मारतो तेंव्हा जाणवत , प्रत्येकीकडे त्यांच्या सोबतच्या खास अशा वेगळ्या आठवणी आहेत ...इथे एका मुलीला पुरे पडताना जीव नकोसा होतो ...त्यांनी कसं मॅनेज केलं असेल ? याचं राहून राहून आश्चर्य वाटत रहात..

त्यांना आजारी पडलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं , साधा सर्दी खोकला ही नाही झाला त्यांना...
आजारी पडले ते शेवटचेच... ऑफिस मधून आले तेच ताप घेऊन , जास्त सिरीयस असेल असं वाटलं नाही पण लघवीलाच होईना म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट केलं... डॉक्टर , डायलिसिस करायला लागेल म्हणाले... आय सी यू मध्ये भर्ती केलं... बेफाम ताप होता पण ते आत थांबेनात...जेंव्हा जेंव्हा शुद्धीत यायचे , तेंव्हा तेंव्हा सगळ्या सुया खेचून काढून तरातरा चालत बाहेर यायचे ... चिडलेले असायचे खूप ...
" मला माझ्या बायको मुलांपासून दूर ठेवता म्हणजे काय? मी कधीच राहिलो नाहीय लांब...दंगल भडकली होती, लोक रक्ताने माखली होती तरी कुठे आश्रय न घेता घर गाठलं होत" ...असं काही बाही बडबडायचे... त्यांना कसं कसं करून आत न्यायचे... एक तर धिप्पाड माणूस ,त्याला त्याच्या मर्जीविरुद्ध आत घेऊन जाणं ही कठीण मग मलाच उभं करायचे त्यांच्या समोर ... मी 20 - 21 वर्षाची असेन , मीच हादरून गेले होते , मी काय समजवणार , तरी जवळ गेले की ते शांत व्हायचे ... "मी आहे पा ... ह्या दारालाच टेकून उभी आहे पा " असं काहीसं पुटपुटायचे, इतकंच आठवतंय...
१स्ट डायलिसिस पार पडलं नी ते परत नॉर्मल वॉर्डमघ्ये आले...छान फ्रेश वाटत होते त्या सकाळी ...मी नेहमी सारखी समोर उभी राहून तक्रार करू लागले, "कित्ती घाबरवलत काल तुम्ही " त्यावर हसून म्हणाले , " तू आहेस ना, मग कसली काळजी? तू करशील सगळं नीट "
बापरे, केवढी मोठी ही जवाबदारी ...आजही काही बिनसलं की हेच वाक्य आठवत... नी सुरु होते असह्य तगमग ...मी प्रयत्न करते पण प्रत्येकवेळीच गोष्टी नीट होतातच असं नाही मग गिल्ट भरून रहातं मनात ...जप सुरु होतो आतल्या आत , मी प्रयत्न केले ,पा...तुम्ही बघताय ना ? मी शक्य होते ते सगळे प्रयत्न केले ... त्या अस्वस्थ फेजमध्ये कधीतरी रात्री डोक्यावरून फिरणारा त्यांचा हात जाणवतो नी सगळं वादळ शांत होऊन जातं...

त्यांना हॉस्पिटल ला भेटायला खूप लोक यायचे ...जत्राच भरायची ...त्यातले बरेच अनोळखी चेहरे असायचे ...आम्हाला ही येऊन भेटायचे ,त्यांना केंव्हा न कशी मदत केली यांनी ते सांगत बसायचे ... मी तक्रार केली पा ना की तुम्हाला आराम करायलाच मिळत नाही ,लोक येत रहातात सारखे ...मी स्ट्रिक्टली सांगते, सगळ्यांना नका येऊ म्हणून पण ते म्हणाले ," अरे ते प्रेम करतात आपल्यावर म्हणून येतात ...नको अडवूस त्यांना ...मी लोकांच्या गराड्यातच फ्रेश असतो ...

लोक येत राहिले पण दोन दिवसात परत त्यांची तब्बेत बिघडली ... परत आय सी यू... परत त्यांचं ते बाहेर येणं... ह्या वेळी ते कुणालाच ऐकायचे नाहीत ... त्यांना भास होत होते... त्यांच्या चारी बाजूला चार काळ्या कपड्यातले लोक उभे आहेत ... ते त्यांना चल म्हणताहेत ... ते जीव तोडून सांगायचे मला ह्या हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन चला ...मी इथे राहिलो तर परत घरी येणार नाही ...
मी आईला म्हटलं ही, दुसरं हॉस्पिटल पाहूया ग , ते इतकं सांगताहेत तर पण इतर मोठ्या लोकांनी ऐकलं नाही ...इथे सगळ्या सोई आहेत म्हणत हॉस्पिटल बदलू दिल नाही ...माझ्या समोर अगदी कळवळून सांगत होता माझा बाप नी मी खोटं बोलले त्याच्याशी की "दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जागा नाही" तर तो म्हणाला की ,"मग घरी जाऊ आपल्या पण इथून जाऊ नाही तर ते लोक मला घेतल्या शिवाय जाणार नाहीत ,बघ तू मी घरी नाही येणार परत ,इथे अजून थोडं राहिलो तर"...
आणि तसंच झालं , दुपारी 2 वाजता डॉक्टर ने बोलवून सांगितलं की ते गेले
विश्वासच बसला नाही ...असं कसं होईल ...काही ही बोलतो हा माणूस

आम्हाला सोडून जावूच शकत नाहीत ते ... ते उठतील परत म्हणून सगळे घरी निघून गेले तरी मी हट्टाने त्यांच्या सोबत ठिय्या मांडून होते ... गप्प बसले होते पण मनातून त्यांना हाका मारत होते , त्यांनीच सांगितलं होतं तस त्यांच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत होते ... उठा पा उठा ... घरी आले त्यांच्या सोबत ... लोकांचा समुद्र उसळला होता ...समोर मोठा बोर्ड लावला होता "दुःखद निधन " ...वाचताच तिडीक गेली डोक्यात , तरातरा गेले नी नाव पुसून टाकलं त्यांचं नी ओरडले खबरदार जर परत इथे त्यांचं नाव लिहाल तर ... त्यांच्या पाया जवळ बसून होते , कोण कुठे काय करत होत काहीच शुद्ध नव्हती ...मी फक्त त्यांचे पाय धरून बसले होते ...त्यांची विनवणी करत कि , पा आता तरी उठा हो , बास झालं ना ...चुकलं माझं , तुमचं ऐकलं नाही ...झुगारून द्यायला हवं होतं लोकांचं म्हणणं , प्रत्यक्ष बाप सांगत होता नी मी त्यांच न ऐकता ,लोकांचं ऐकलं... त्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला , पा उठा हो , हे लोक घेऊन जातील तुम्हाला , उठा आता तरी उठा हो ... त्यांना न्यायला लागले लोक , मला ही जायचं होत त्यांच्या सोबत मी हि उठले नी निघाले पण कुणी तरी हातपाय धरून उचलून घरी आणून टाकलं ... मग काहीच आठवत नाही

ही माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पुरुषा सोबतची शेवटची आठवण...

हि इतकी खोल जखम आहे ना की मी माझ्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पुरुषाकडून वचनच घेऊन टाकलं ...जर मी एखादी गोष्ट तुला पोटतिडकीने सांगत असेन मग भले ती कित्ती ईललॉजिकल वाटत असेल , सगळे शहाणे लोक त्याची तुला पटण्या सारखी कारण देत असतील तरी तू माझ्यावर विश्वास ठेवायचास नी मी सांगेन तेच कारायचस...

त्याच पुरुषाने समजावलं की ,समज तू ते म्हणाले तसं सगळ्यांचं म्हणणं धुडकावत त्यांना घरी आणलं असतं... नी घरी त्यांना काही झालं असतं तर तू स्वतः ला माफ करू शकली असतीस का ?
पण ह्या सगळ्या जर नी तर च्या गोष्टी ... आज ही कुठेतरी वाटत रहातं माझीच चूक आहे ... 18 वर्ष झालीत या गोष्टीला पण ती जखम काही भरत नाही ... लोक म्हणतात काळ हे मोठ्या मोठ्या जखमा भरतो ... मग मलाच का अश्वथाम्याचा शाप ...की हीच शिक्षा आहे माझी ?

आज वाढदिवस आहे त्यांचा , असते तर काय थाट असता आज ... सगळ्या सुखसुविधा आहेत फक्त ते नाही आहेत ... ते गेल्या नंतर समर्थपणे दुनियेची आव्हान पेलता आली प्रत्येकाला ...त्यांनीच तर तसं मोठं केलं होतं ना आम्हाला, फक्त त्यांच्या शिवाय कसं जगायचं तेवढं शिकवलं असत तर जगता ही आलं असतं थोडं...

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle