लागणारा वेळ:
५ तास
लागणारे जिन्नस:
मैदा चार वाट्या / कप
बटर अर्धी वाटी / कप
कोमट दूध एक वाटी / कप
मीठ १ टि स्पून
साखर पाव - अर्धा वाटी / कप
ड्राय यिस्ट १ टेबल स्पून
अंडी २ * (अंडी न खाणारे अंडी वगळू शकता मात्र आणखी अर्धा वाटी दूध घ्यायचे)
केशर (ऐच्छीक)
सारण / फिलिंग
ब्राऊन शुगर पावडर एक वाटी / कप
दालचिनी पावडर १ टेबल स्पून (३ टि स्पून)
मेल्टेड बटर १/३ वाटी / कप
वेलची पावडर (ऐच्छीक)
व्हॅनिला पावडर / इसेन्स (ऐच्छीक)
सजावटीसाठी ग्रॅन्युलेटेड साखर
क्रमवार पाककृती:
१) एका भांड्यात मैदा घेवून एका बाजूला यिस्ट व दुसर्या बाजूला मिठ टाकावे व व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.
२) दुसर्या भांड्यात कोमट दूध, केशर पावडर, बटर, साखर घेऊन बीटर ने एकत्र करून घ्या. * मिश्रण कोमट आहे ह्याची खात्री करून ह्यात व्यवस्थित फेटलेली अंडी घालून परत सगळे मिश्रण परत फेटून घ्या.
३) मैद्यात दुसर्या भांड्यातील मिश्रण ओतून चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यावे (मळायचे नाही) . ते साधारण असे दिसेल.
४) तासभरासाठी हे मिश्रण उबदार जागेत झाकून ठेवावे. त्यानंतर ते असे मस्त फुगून येईल.
५) त्यातली हवा काढून व्यवस्थित फॉईल गुंडाळून ह्याची रवानगी (१ ते ३ दिवसांसाठी) फ्रीज मधे करावी. हवे तेव्हा फ्रीज मधून बाहेर काढावे व साधारण तापमानाला वापरायला घ्यावे.(साधारण अर्ध्या तासाने)
६) फिलिंग / सारणासाठीचे साहित्य एकत्र करुन घ्यावे.
७) क्र. ५ मधील पिठाचे साधारण दोन गोळे करून घ्यावे. एक गोळा / उंडा घेवून लांबसर लाटावे. व त्यावर सारण एकसारखे पसरवून घ्यावे.
८) लांब बाजूने घट्ट गुंडाळी करून घ्यावी व साधारण १ ते दिड इंचावर कापावे.
९) हे रोल साजावटीच्या साखरेत एका बाजूने घोळून बटर पेपर लावलेल्या बेकींग ट्रे मधे एकमेकांपासून जरा अंतरावर ठ्वावे.
१०) रोल्स रेज होण्यासाठी तासभर तरी उबदार जागेत ठेवावेत. मी ओव्हन जरासे गरम करून त्यातच ठेवते.
११) १८० डिग्री तापमानाला साधारण १५-२० मिनिटे ओव्हन मधे बेक करावे.
जरा जवळून
स्विडन मधे ह्या कानियेल / कानेल बुलार (kanelbullar) च्या नावाने खास एक दिवस साजरा केला जातो. ह्याच्या अनेक रेसेपी युट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहेत.
वाढणी/प्रमाण:
साधारण २५- ३० नग होतात.
अधिक टिपा:
मी वर दिलेल्या प्रमाणाच्या दुपटीने केले होते. साधारण ५० नग झाले होते.
साखर तसेच दालचिनी पावडर कमी अधिक प्रमाणात वापरता येईल.
फ्रीज बाहेर आठवड्याहून अधिक टिकायला हवेत. माझ्याकडे ३-४ दिवसांहून अधिक शिल्लक राहतच नाहीत.
खाताना असेच थंड किंवा जरासे गरम करून खाऊ शकता.
डायट करत असणार्या मैत्रिणींनी फक्त फोटो पाहूनच समाधान मानायचे. :)