सकाळची आवरा-आवर करून सुवर्णा हाश-हुश करत स्वयंपाकघरातून बाहेर आली. ११ वाजत आलेले. घामाच्या नुस्त्या धारा लागलेल्या. बाल्कनीत जाऊन जरा निवांत ५ मिनीटं उभी राहिली ती. हे रोजचंच. उन्हाळा वाढत होता, घामाच्या धारा लागत होत्या. नुस्त्या पंख्याने काम भागतच नव्हतं. त्यातून सुधाकरचा तो नीटनेटकेपणाचा अट्टाहास! प्रत्येक गोष्ट न गोष्ट त्याला स्वच्छ - स्वच्छ कसली, चकचकीत आणि जागच्या जागी लागायची. त्यामुळे सकाळी नाश्ता आवरून तो कामावर गेला की मागून सगळी साफसफाई, झाडलोट, फरश्या पुसणे ह्यात तिचा वेळ जायचा. आणि लगेच परत स्वयंपाकाची तयारी! कारण दुपारी १ वाजता सुधाकर परत जेवायला घरी येऊन जायचा.
२-३ महिन्यांपूर्वी लग्न होऊन सुवर्णा इथे आली होती. सुधाकरही त्याआधी काहीच दिवस बदली होऊन या शहरात आलेला. सुधाकरने भाड्यावर घेतलेललं हे घर तसं गावाबाहेर जरा आडजागीच होतं. ही अशी आड्बाजूला असणारी बंगली सुधाकरने का निवडली असेल याचं तिला कोडंच होतं. पण परवडेल अशी जागा हीच मिळाली असं सांगून तो तिला गप्प करत असे. आजूबाजूला, जवळपास शेजार असा नाहीच. दुकानं, मार्केट पण दोन-तीन किमी. वर. अधून मधून गाडीवर भाज्या, इतर सामान घेऊन येणारे फेरीवाले, सायकल, स्कूटर्सवरून भुरकन जाणारे - इतकाच काय तो वावर. चालत जाताना दिसणारे विरळाच.
कामाची सुवर्णाला सवय होतीच - त्याचा कंटाळा नव्हताच. माहेरी गावाकडे तर ह्याहून बरंच काम असे. पण ती कंटाळायची ते कोणी बोला-चालायला सोबत नाही याला. माहेरी बराच गोतावळा... सुवर्णा, धाकट्या दोघी बहिणी, त्यांच्यामागचा भाऊ, आई-वडिल, आजी, एक आत्या...असं सगळं लटांबर होतं. शिवाय शेजार-पाजार, मैत्रिणी..त्यातून ती अशी एकांतात येऊन पडली. खरंतर लग्न ठरलं तेव्हा ती हुरळून गेलेली. सुधाकर एकटा. घरात ना त्यांची आई ना वडिल. राजा-राणीचा संसार करायला मिळणार, शहरात रहायला जाणार यामुळे ती फार खूश होती. आई - वडिलही खूश. त्यांच्या अपेक्षेपेक्षा बराच कमी हुंडा देऊन हे लग्न जमलेलं. त्यामुळे पोरीनं नशिब काढलं असं सगळेच जणं म्हणत होते. पण ती नवी नवलाई २ महिन्यांतच संपून ह्या अश्या एकटेपणाला सुवर्णा पार कंटाळून गेली होती.
त्यातून सुधारकचं ते स्वच्छतेचं वेड - हो, वेडच म्हणायला हवं या थरावर त्याला सगळं स्वच्छ लागायचं. कुठे भांड्यावर हाताचे ठसे दिसले म्हणून, कुठे सिंकमध्ये २ भांडी न घासता पडलेली दिसली म्हणून, कधी कपड्याची घडी त्याला हवी तशी अगदी नीटनेटकी नाही झाली म्हणून - अश्या काहीही कारणांनी सुधाकरचा मूड पालटून जायचा. एखादी वस्तू इकडची तिकडे झाली की त्याची आदळआपट चालू व्हायची. मग अगदी चहा-साखरेच्या डब्यांपासून ते सोफा-बेडवरच्या उश्यांपर्यंत – सगळं अगदी जागच्या जागी – घडी न मोडता हवं असायचं त्याला. ऑफिसमधून आल्या-आल्या सगळं सोडून कुठल्यातरी कोपर्यातली छोटीशी केसांची गुंतावळ दिसायची त्याला आणि मग झालं - कधी टोकणार्या शब्दांत, कधी चिडून तो सुवर्णाला ते दाखवूनच द्यायचा. खरं तर दोन माणसांच्या संसारात अशी कायशी घडी विस्कटणार होती दिवसांभरांत! पण लग्नानंतर थोड्याच दिवसांत सुवर्णाच्या लक्षात आलं की साध्या-साध्या गोष्टींत सुधाकरला पराकोटीची स्वच्छता, नीटनेटकेपणा लागतो. ह्या प्रकारामुळे घर साफ आहे ना हे बघण्यात आणि करण्यात दिवसाचा बराच वेळ निघून जायचा. आणि तरीही मनात सदैव एक भीती - कधी सुधाकरचा स्फोट होईल सांगता येत नाही याची!!
*************************************
त्यादिवशीही नेहेमीप्रमाणमाणे ती सकाळचं आवरून बाल्कनीत येऊन जरा उभी होती. थोड्याच वेळात अंघोळ वगैरे उरकून स्वयंपाकाला लागायचं होतं. दिवसभराचं काम, दुपारी सुधाकर येऊन गेला की जरा वाचनालयातून आणलेले पुस्तक वाचत पडणे, मग टि.व्ही. बघणे, अधे-मधे थोडा वेळ बाल्कनीत उभं रहाणे एवढाच काय तो तिचा दिनक्रम. संध्याकाळ झाली की आहेच परत रात्रीचा स्वयंपाक वगैरे. कधी-मधी सुधाकर स्कूटरवरून बाहेर घेऊन जायचा बाजार-हाट, वाचनालयात पुस्तक बदलायला - तेवढाच काय तो अधून-मधून बदल!
दहा-एक मिनिटं बाल्कनीत उभं राहून "चला, अंघोळ करून स्वयंपाकाला लागू" असं म्हणून ती वळणारच आत तेवढ्यात तिला ती दिसली. अधून-मधून क्वचित ती दिसायची. संथ गतीने, पाय ओढत चालावे अशी तिची चाल! तिचं नाव - गाव सुवर्णाला काही माहिती नव्हतं पण साधारण तिच्याच वयाची ती तरूणी दिसली की तिला फार आनंद व्हायचा. त्यांची कधी बोलाचाल पण झाली नव्हती. चालताना कधी हिच्याकडे लक्ष गेलं की ती थोडसं अस्पष्ट हसून, कधीतरी हात करून जायची.त्यातून कोणीतरी ओळखीचं भेटावं असा आनंद सुवर्णाला व्हायचा. हिच्याशी ओळख करून घ्यावी. थोडं बोलावं, गप्पा माराव्या अशी तिची मनापासून इच्छा होती. पण ती आपली तशीच निघून जायची - तिच्या संथ गतीने.
आज मात्र ती दिसल्यावर सुवर्णाने जरा पुढाकार घेऊन तिला शुक-शुक असे पुकारले. सावकाशपणे वळून बघत ती सहजपणे सुवर्णाच्या दिशेने आली. जणू काही ती देखील हिच्याशी ओळख करून घ्यायची वाटच बघत होती. बारकुडी, निस्तेज चेहेरा असलेली ती, प्रत्यक्षात फार बोलणार्यातली नाही हे सुवर्णाच्या ५ मिनीटांत लक्षात आले. सुवर्णाच आपलं काही- बाही बोलत राहिली. "कुठे रहातेस" यावर "तिथे-पलिकडे". "इथे कुठे मग?" तर "काहीतरी काम असतं इथे"...अशी काहीशी तुटक उत्तरं देत ती नुसतीच सुवर्णाकडे टकामका बघत बसली. तिचं नाव मनीषा एवढंच सुवर्णाला कळलं. मग सुवर्णाच आपलं तिचं सांगत राहिली. ती इथे कशी नविन आहे, कसा कंटाळा येतो, बोलायला कसं कोणी नसतं...काय न काय! ती आपली नुसतीच हं-हं करत मान डोलावत राहिली. मग एकाएकी सुवर्णाला आठवलं...अजून अंघोळ करून स्वैपाक करायचाय. तिला अच्छा म्हणून सुवर्णा आत आली.
पण त्यानंतर मात्र सुवर्णाला सवय लागली मनिषाची वाट बघण्याची. सकाळचं आवरून ती बाल्कनीत येऊन मनिषाची वाट बघू लागली होती नकळतच. तशी ती काही अगदी रोज दिसायचीच असं नाही. आठवड्यातून एखाद-दोनदा दिसायची. कधी नुसतीच मान डोलवून निघून जायची.तर कधी यायची बोलायला. पण बोलायचं काम मात्र सुवर्णालाच करावं लागे. अधे-मधे काही प्रश्न सोडले तर ती फार काही बोलायची नाहीच.पण हिचं सारं सारं ऐकून घ्यायला तिला कुठलीही घाई नसल्यासारखा मुबलक वेळ मात्र असायचा. सुवर्णा हपापल्यासारखी तिला काही-बाही सांगायला उत्सुक असायची. मग कधी आपल्या माहेराविषयी बोल, माहेरी केलेल्या ओझरत्या फोनविषयी बोल, कधी टि. व्ही. वरची एखादी बातमी- कार्यक्रमाविषयी बोल, तर कधी वाचलेल्या कादंबरीबद्दल. एकतर्फीच ती तिचं सांगत रहायची.
*************************************************
दिवस चालले होते.... सुवर्णाच्या आयुष्यात काहीच फरक पडत नव्हता. उलट हल्ली हल्ली हे फारच होऊ लागलं होतं.... छोट्या गोष्टींत सुधाकर तिच्यावर डाफरू लागला होता. कपड्यांना इस्त्री नीट केली नाही, भाजीत मीठ कमी जास्त पडलंय, कुठलीतरी साधीशी गोष्ट जागेवर नाहीये,भाजीपुरत्या दिलेल्या पैशांचा हिशोब - काहीही कारण पुरायला लागलेलं त्याला. सुवर्णाला हे सारं असह्य होऊ लागलं होतं. मग ती देखील सुधाकरशी वाद घालू लागली होती. कधी शांत पणे तर कधी रडून-ओरडून तिची नाराजी प्रकट करायला लागली होती.
कंटाळून कधी-मधी ती सुधाकरला बोलून दाखवायची की मला पण कुठेतरी नोकरी करायची आहे. तशी ती पण बी. ए. झालेली होतीच. कुठेतरी काहीतरी साधीशी नोकरी मिळाली तर ह्या चक्रातून थोडी सुटका आणि ४ लोकांच्यात मिसळायला - बोलायला मिळेल. पण ह्याला तर सुधाकरने साफच नकार दिलेला. काही गरज नाहि....मग घरचं एवढं सगळं कोण बघेल असं कारण देऊन तिचा हा विचार त्याने पार उडवून लावलेला.
किती वेळा मनात यायचं तिच्या - सोडावं हे इथलं सारं - निघून जावं परत आईच्या कुशीत. पण धाकट्या बहिणी- त्यांची लग्नं, आजू-बाजूचे, नातेवाईक काय म्हणतील - असा सर्व विचार करून ते शक्य नाही हे तिला माहिती होतं. आणि तसंही लौकिकार्थाने नवरा काय वाईट आहे? दारू पिऊन येतोय, की हात उगारतोय? - असंच कोणीही म्हणालं असतं. असा विचार करताना तिला दारावर भाजी विकायला येणाऱ्या भाजीवाल्या मावशीची कहाणी मनात यायची.
कधी-कधी संध्याकाळी बाल्कनीत उभं असताना, दिवसभर बाजारात भाजी विकून परत घरी चाललेली भाजीवाली, सखूबाई, सुवर्णा दिसली की कधी उरलेली भाजी संपावायला तिच्याकडे यायची. खरं तर दिवसाभराची भाजी विकून परत जाताना उरली-सुरली, सुकलेली भाजी असायची. पण संपवायला म्हणून सखू तिला अगदी स्वस्त्यात देऊन टाकायची. तसाही सुधाकर तिच्या हाती फार पैसे द्यायचा नाही. पण ही भाजी स्वस्त मिळते सांगून ती थोडे पैसे मागून घ्यायची. त्या पै न पै चा हिशोब तिला अर्थातच दयावा लागायचा. भाजी घ्यायच्या निमित्ताने दोघींची तेवढीच बोलाचाल व्हायची. त्यातून मग सखू कधीतरी तिच्या आयुष्याची कर्मकहाणी सुवर्णाला ऐकवायची. दारु पिऊन पडून राहणारा नवरा - ना कुठे काम-धाम करायचा. आणि हिच्याकडून पैसे घेऊन हिलाच मारहाण करायचा. "कशाला गं अश्या नवर्याला पोसतेस?" असं सुवर्णाने विचारलं की म्हणायची, "ताई, मी नाही पोसलं तर कोण पोसेल त्याला? काही झालं तरी नवरा हाय तो माजा!"
सुवर्णापण कधी सुधाकर विषयी काही तक्रारीच बोलली तर सखू तिला म्हणायची, “ताई, मारहाण तर नाही करत ना नवरा? नोकरी करून दोन वेळा जेवायला तर घालतो. अजून काय हवं तुम्हाला? बाईच्या जातीला अजून काय लागतं? लई चांगला नवरा मिळालाय, नीट र्हावा त्याच्याबरोबर” मग सुवर्णा गप्प बसायची.
सखू आणि आता मनिषा भेटल्यापासून सुवर्णाची कोणाशी बोलण्याची भूक जरा भागू लागली होती. सखूला जरी घरी जायची घाई असायची तरी पण तेवढ्यात नवर्याला सांभाळून संसार कसा करावा याचे धडे देऊन जायची ती. आणि मग सुवर्णालाही पटायचं - चाललंय ते बरं चालंलय.... तसंही दुसरा काही पर्याय नसल्याने आहे त्यात समाधान मानून टिकवून धरावं - असं ती मनाला समजावायची. सखूचं हे सांगणं तर मनिषाची उलटी तर्हा!
गेल्या काही दिवसांत ती मनिषाजवळ सुधाकरविषयी, तिच्या संसारातल्या तक्रारी पण सांगायला लागली होती.मनिषाला कधी घाई नसायची त्यामुळे सुधाकरचं स्वच्छतेचं- नीटनेटकेपणाच पराकोटीच वेड, न संपणारी घराची स्वच्छता, अडकून पडलेली ती....जे मनात असेल ते बोलून तिला मोकळं होता यायचं..तेवढाच तिच्या मनाला दिलासा. पण एरव्ही गप्प-गप्प असणारी मनिषा या विषयावर मात्र तिला खोलात शिरून बोलतं करायची...कित्येकदा तर तिच्या एरवीच्या शांत स्वभावाला न साजेलसे काहीतरी सुचवायची - "निघून जा माहेरी...हे असं इथे का रहातेस?" असं म्हणायची. मग सुवर्णा तिला परत परत तिच्या बहिणी- ती परत गेली तर त्यांची लग्न कशी होणार असे प्रॉब्लेम्स सांगून रडून घ्यायची..."मी अशी परत गेले तर आई-बापूंना कोणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.", असं सुवर्णाने सांगताच मनिषा पण त्याला दुजोरा देत,"असंच असतं गं बाई, तू जपून रहा", सांगायची.
सुधाकरला मात्र तिने कटाक्षाने सखूबद्दल वा मनीषाबद्दल, त्यांच्याशी चालत असलेल्या तिच्या गप्पांबद्दल काही सांगणं टाळलेलं. न जाणो त्याला नाही आवडलं असं कोणा अनोळखी बायाकांबरोबर आपण बोलतो ते - त्याच्या नाराजीला अजून एक कारण! तसंही तो तिला कुठे बाहेर घेऊन जाई तेव्हा तिने कोणाशी फारसं बोललेलं त्याला पसंत पडत नाही हे तिच्या लक्षात आलेलंच. ती जरा कोणाशी जास्त बोलताना दिसली की सुधाकर त्याची नाराजी व्यक्त करायचाच. त्यामुळे ह्या दोघींशी होणार्या गप्पा- टप्पांबद्दल त्याला न सांगणच योग्य ह्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली होती.
************************************************************************
त्या दिवशी ती सकाळचं आवरून बाल्कनीत येऊन उभी राहिली. मनात आदल्या दिवशीचेच विचार घोळत होते. आदल्या संध्याकाळी ते दोघे बाजारात जाऊन बाजारहाट वगैरे नेहेमीची खरेदी उरकून आलेले. महिन्यातून एकदा फोन बूथवरून तिला घरी फोन करायला परवानगी मिळायची, तो फोन काल झालेला. अर्थात तिला फोनवर काही फार बोलता पण यायचं नाही... तिच्या माहेरी, घरात तर फोन नव्हता. शेजारी कुठेतरी फोन करणार, ते तिच्या घरून कोणाला बोलावून आणणार यात वेळ जायचा, तेवढ्यानेच सुधाकर त्रस्त व्हायचा. भरीस भर म्हणून ती बोलताना तिच्या शेजारून तो हलायचा पण नाही, त्यामुळे मनमुराद-मोकळेपणे तिला बोलताही यायचं नाही. अर्थात ती काही घरी स्वतःची कर्मकहाणी सांगून त्यांना चिंतेत लोटणार नव्हतीच.
तर फोनवर आई-वडिल-भावंडं मागे लागलेले. लग्नाला वर्ष होत आलं. दोघं या घरी... तुम्ही दिवाळसणाला पण नाही आलात. आल्यासरशी तू रहा आठवडा- पंधरा दिवस...सगळेच तिला सांगत होते. हो हो बघते म्हणत तिने फोन ठेवलेला. फोन ठेवल्यानंतर मात्र तिला रडू आवरेना. परत परत ती सुधाकरला विनवत राहिली - माहेरी जायचंय थोडे दिवस म्हणून. आणि सुधाकरने मात्र काही न बोलता घराकडे स्कूटर वळवली होती.
नेमकी मनिषा भेटली बोलायला आणि सुवर्णाचा बांध फुटला. मनिषाजवळ माहेरी जायची इच्छा, सुधाकरचा विरोध सारं सारं सांगून ती रडत राहिली. "निघून जा तू इथून", अचानकच मनिषा जोरात म्हणाली..."निघून जा, माहेरी. का रहातेस इथे?" तिच्या ह्या अचानक विचारण्याने सुवर्णाच कावरी-बावरी झाली. गेल्या सहा-सात महिन्यांच्या ओळखीत मनिषा बरेचदा तिला हे असे सल्ले द्यायची. पण आज प्रथमच तिने एवढा आवाज चढवून काही सांगितलं होतं. "काय सांगू तुला मनिषा, ते शक्य असतं तर काय हवं होतं?" म्हणून सुवर्णाने तिला आधीही अनेकदा ऐकवलेली कर्म कहाणी ऐकवली. "अगं, एरव्ही आई- बापूंनी ठेऊन घेतलंही असतं. एवढी काही मी जड नाही त्यांना. पण मग मी अशी परतून गेले तर धाकट्यांचं लग्न होणं पण मुश्किल होईल गं.", जड आवाजात सुवर्णा म्हणाली. तिच्याकडे नुसतीच बघत मनिषा पुटपुटत राहिली - "हं!!! तेच तर!! मग वादावादी करून काय होणार? सोडून तर जायचं नाही मग वादावादी कशाला करत रहातेस? जपून रहा कशी!" तिचं ते सारखं "सोडून जा नवर्याला, सोडून जा नवर्याला" हे बोलणं ऐकताना सुवर्णाला मनात परत सखू आणि तिचा दारू पिऊन मारहाण करणारा नवराच येत राहिला......
हिचं असं - तर सखूचं म्हणणं “आई-बाप बोलवायला लागलेत - किती भाग्याच्या ताई तुम्ही. माझ्या आयला तर मला बोलवायला पण नाही व्हायला. माझा बापूस काय माझ्या नवर्याहून येगला न्हाय. तो बी तासाच दारू पिउन पडलेला असतो. आयशीनी कसं बसं ये लग्न लावून दिल्यान. आता कसलं माहेर नी कसलं काय!”
**************************************************
माहेरी जाण्याचा हट्ट सुवर्णाने अजून सोडला नव्हता. लग्नाला वर्ष होत आलंय आता माहेरी जाते थोडे दिवस असा तिचं सुधाकरच्या मागे लागणं चालूच होतं. त्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर तसं तिने सुधाकरसमोर बोलून दाखवलं तर सुधाकर काहीच न बोलता उठून गेला. रात्रभर त्या विचारात काढून सकाळी परत तिने हा विषय धसास लावावा अस ठरवलं होत. तिनं परत तो विषय काढला तर तो डावलून सुधाकर तिला म्हणाला, संध्याकाळी ६ वाजता तयार रहा. आपण फिरायला जाऊ आज. हे स्वप्न का सत्य हे तिला उमजेना.... बाजारहाट आणि काही कामापुरतं बाहेर जाणं सोडलं तर गेल्या वर्षभरात हे कधी घडले नव्हते... तिचा आनंद गगनात मावेना. "कुठे जायचं?" तिने आनंदून विचारले. "गावाबाहेर टेकडीवरून सूर्यास्त चांगला दिसतो तो बघायला जाऊ", असं जेवढ्यास - तेवढं उत्तर देऊन सुधाकर ऑफिसला निघून गेला.
तिला मात्र काय करू आणि काय नको असं होऊन गेलं होतं. सगळं आवरून ती बाल्कनीत जाऊन ती उभी राहिली. संध्याकाळी फिरायला जाणार या विचारात असतानाच जराश्याने मनिषा दिसली. तिच्या मंद गतीने येताना. सुवर्णाने हातवारे करून तिला बोलवून घेतले. आणि घाई-घाईने अगदी आनंदात तिला संध्याकाळी आपण बाहेर जाणार आहोत ते सांगितले. नेहेमीच विचारात वाटणारी मनिषा आज अजूनच विचारात पडलेली वाटली. बहुदा तिलाही आश्चर्य वाटल असावं, हे कस घडलं याचं... आणि जराशाने ती म्हणाली, “तू कशाला जातेस बाहेर, तू माहेरीच जा.” "हे काय बोलणं झालं?" सुवर्णाच्या मनात आलं...कधी-काळी नवरा फिरायला नेतोय आणि ही म्हणते कशाला जातेस..? आता मात्र सुवर्णाला वाटू लागलं. ही बाई आपल्या संसारात विष कालवायलाच बसल्ये. ह्यापुढे हिला सुधाकरविषयी काही सांगायचं नाही... कसाही असला तरी हा संसार आपल्याला टिकवायचाय.
सुवर्णाच्या चेहेर्यावरील भावांवरून तिला आपलं बोलणं अजिबात आवडलं नाहीये हे मनिषाला कळलं असावं म्हणून की काय, मग मात्र मनीषाने तिला “किती वाजता जाणार” वगैरे उगाच फुटकळ प्रश्न विचारले आणि ती गेली निघून तिच्या वाटेने. जाताना उगिच "जपून रहा" सांगायला ती विसरली नाही, नेहेमीप्रमाणेच!
तिचा विचार करत बसण्यात सुवर्णाची मात्र सगळी सकाळ गेली. तिच्या लक्षात आलं.. "लग्न झालंय का, नवरा कुठे काम करतो" अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनिषाने कधी दिलीच नव्हती. "बहुदा नवर्याने सोडलेली असणार हिला.", सुवर्णाच्या मनात आलं - स्वतः धड संसार न करता नुसतीच इथे-तिथे फिरते आणि मला मात्र सारखी नवर्याला सोडून जा सांगते. या बाईशी आता फारसे संबंध ठेवायला नको, अशी तिने मनाशी खूणगाठ बांधली.
दिवसभर ती आनंदात होती. दुपारी सुधाकर जेवायला येऊन गेला तेव्हाही तिने सुधाकरला "आज संध्याकाळी कुठची साडी नेसू" वगैरे प्रश्न विचारून भंडावून सोडले. सुधाकर आपला नेहेमीच्या तटस्थ भुमिकेत शांतपणे जेवत होता. “भाजीत तिखट जरा जास्त पडलंय”, हे सांगायला तो विसरला नाही. पण निदान आज आवाज तरी चढवला नाही.
संध्याकाळी सखू दिसताच तिने तिला पण बोलावून ही बातमी दिली. आणि सखुच्या "सांगितलं न्ह्याय, तुमचा नवरा लई देवमाणूस हाये" यावर पहिल्यांदाच तिने मान हलवून दुजोरा पण दिला.
संध्याकाळी ती तयार होऊन सुधाकरची आतुरतेने वाट बघत बसली. सुधाकर आला आणि चहा वगैरे घेऊन लगेच निघाले ते. स्कूटर वरून गावाबाहेरच्या टेकडीकडे जाताना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर बघून ती खूश झाली. एरव्ही आठवड्यातून एकदा गावातल्या बाजारात जाऊन भाजी-सामान आणणे एवढाच काय तो तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क यायचा. ही मोकळी हवा, आजू-बाजूचा नजारा बघून ती सुखावून गेली.
टेकडीच्या पायथ्याशी स्कूटर लावेपर्यंत साडेसहा वाजून गेलेले. "चला भरभर वर जाऊ, सूर्यास्त वरून सुंदर दिसतो म्हणालेलात ना!", असं म्हणत तिने पटापट पावलं उचलायला सुरुवात केली. २५-३० मिनीटात धापा टाकत दोघं वर चढले. सूर्य क्षितिजाला टेकायलाच आलेला एव्हाना! "चल तिकडे सनसेट पॉईंटला जाऊ, तिथून चांगला दिसतो सूर्यास्त.” असं म्हणत सुधाकने तिला एका कड्याच्या दिशेने वळवले. समोरचा मावळता सूर्य सुंदर दिसत होता. कोणीच कसं नाही इथे, इतकं सुंदर दृश्य बघायला, असा विचार ती करतच होती - तेवढ्यात कुणाची तरी चाहूल लागावी असं काहीसं तिला वाटलं. आजूबाजूला त्या दोघां खेरीज कोणी नव्हतं, तरी कोणीतरी असल्यासारखं का वाटतंय. जणू कोणी नजर ठेऊन आहे अशी काहीशी जाणिव तिला होऊ लागली. एकदा सभोवार नजर टाकून कोणी नाही बघून तिने परत मावळत्या भास्कराकडे नजर वळवली. ते सुंदर दृश्य तिला चुकवायचं नव्हतं. आणि तेवढ्यात झपाट्याने पुढल्या घटना घडल्या...अचानक सुधाकरने तिला जोरात धक्का दिल्याची जाणीव, तोल जाऊन ती समोरच्या दरीत पडणार ही तिला झालेली जाणिव, पण तितक्यात कोणीतरी सावरून तिला मागे खेचल्याची जाणिव आणि....आणि हे सारं घडेपर्यंत अचानक कोणाचा धक्का लागावा व त्यामुळे तोल जावा असा सुधाकरचा तोल जाऊन तो धडपडत समोरच्या दरीत कोसळला - त्याची आर्त किंचाळी दरीत घुमली.
सारं अकल्पित- अचानक घडलं...तिला नक्कीच सुधाकरने मागून मुद्दाम धक्का दिल्याचं तर जाणवत होतं. अद्याप तिच्या हृदयातली धडधड कमी झाली नव्हती. पण असे कसे नाही पडलो आपण? असा-कसा सुधाकरच तोल जाऊन पडला? याचं कोडं काही उलगडत नव्हतं. आपल्याला जणू कोणीतरी धरून मागे ओढावं असं वाटल्याची भावना मनातून जात नव्हती. सुन्नपणे दरीकडे बघत ती कितीतरी वेळ तशीच उभी राहिली.
*************************************************************************************
आज महिन्याभराने ती त्या घरी परत आलेली. मागचं सारं आवरायला. महिनाभर माहेरीच होती ती. तिचे आई-वडील, भावंडं - सार्यांच्या दु:खाला पारावार उरलेला नव्हता. लोकांना सांगताना तिने जरी सुधाकरचा पाय निसटून तोल जाऊन तो दरीत पडलला असे सांगितले असले तरी ती मात्र मनाशी परत परत तिथे घडलेल्या घटना उगाळत होती. आणि तिला अजूनही त्यांची संगती लावता येत नव्हती. नक्की काय घडले तिचे तिलाच उमजत नव्हते. एक मात्र मनाशी नक्की उमजले होते...सुधाकर तिला तिथे घेऊन गेला होता ते सूर्यास्त दाखवायला नाही तर तिच्या जीवनाचा अस्त करायला....हे देखील ती अर्थातच कोणाला बोलली नव्हती...सर्वांसमोर दु:खी असल्याच दाखवताना, ती झाल्या घटना - एवढंच काय गेल्या वर्षभर तिला झालेला त्रास हेच मनात आठवत असायची.
इथलं तिथलं आवरून तिने सुधाकरचं कपाट आवरायला काढलं... बंद असलेला लॉकर तिने आजतागायत कधी उघडला नव्हता. बरीच शोधाशोध करून मग एकदम खालच्या कप्प्यात, मागच्या बाजूला असलेली लॉकरची चावी तिला मिळाली. लॉकर उघडला तर पैसे वर इतर काही सामानाबरोबर तिला ३-४ फोटोज, काही वर्तमानपत्रातली कात्रणं, कसलीतरी फाईल काय-काय होते तिथे..... एक फोटो हातात घेऊन बघायला घेतला तर तिला भोवळच आली - सुधाकर व मनिषाचा लग्नाचा फोटो होता तो!!! कसं-बसं सावरत तिने वर्तमानपत्राचं एक कात्रण हातात घेतलं. गोव्यातल्या कुठल्या आडगावातल्या दोन-एक वर्षापूर्वीच्या एका लोकल वर्तमानपत्रातली बातमी होती - "पाय घसरून दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू!" - खाली फोटो होता - मनिषाचा!
अचानक तिला आठवलं...त्यादिवशी टेकडीवर तिला कोणीतरी मागे ओढत असताना कानात अस्पष्टसे काहीतरी शब्द पुटपुटल्यासारखे ऐकू आलेले. आज ते शब्द लक्षात आले तिच्या- 'सांगितलेलं ना जपून रहा, माझं झालं तसं तुझं होऊ देणार नाही मी'!!!