नियोजित वेळी विमान मुंबईहून निघाले आणि मी हुश्श केलं. खिडकी मिळाली होती. सहज म्हणून बाहेर पाहते तो अहो आश्चर्यम ! चक्क इंद्रधनुष्य !! पावसाचे दिवस नसतांना इतकं सुस्पष्ट इंद्रधनुष्य कसं काय दिसतंय याचंच अप्रुप वाटत होतं. फक्त मुंबईच्या स्कायलाईनवरच नाही तर चक्क चेन्नई येईपर्यंत त्याने साथ केली माझी. खूप छान वाटत होतं. एकमेकांत मिसळलेले तरीही स्वतःचं वेगळं अस्तित्व जपणारे सप्तरंग. बराच वेळ न्याहाळत होते मी ते.
दोन तासांनी उतरले चेन्नईला. संपूर्ण विमानतळ रंगीबेरंगी दिसत होता. विविधरंगी फुलांच्या, पडद्यांच्या माळा, झिरमिळ्या, सगळंच कसं कलरफुल :thumbsup:. यांचा कसला सण वगैरे असावा बहुदा किंवा कोणी अति महत्वाची व्यक्ती येणार असावी म्हणून इतका सजवलाय एअरपोर्ट असा आपला माझा अंदाज.ज्या हॉटेलात राहणार होते तिथे काही वेळातच पोचले. फ्रेश होऊन रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेले. फ्लाईटमध्ये अगदी सकाळी काही खावेसे वाटलेच नव्हते.
आज एक्झिबिशनचा पहिला दिवस. उद्घाटनाचा समारंभ सुरु व्हायला तासभर बाकी होता. तेव्हढा वेळ हाताशी होता. आमच्या सेक्टर हेडचे प्रेझेंटेशन होते उद्घाटनाच्या वेळी. त्या प्रेझेंटेशनचं काम गेले काही दिवस आमची टीम करत होती. फायनल कॉपी सेव्ह केलेली पेनड्राईव्ह माझ्याकडे होती. ती गेल्यावर लगेच सुपुर्द करायची त्यांच्याकडे. समोर आलेले मेनूकार्ड चाळत असतांना विचार चक्र फिरत होतं. मद्र देशात आलो असतांना गपगुमान दाक्षिणात्य पदार्थ खावेत तर नाही, आमच्या जीभेचे चोचलेच फार. इडली कोरडीच लागते. डोसा, उतप्पा तेलकट असला की सकाळी-सकाळी खाववत नाही म्हणून दुसरे ऑप्शन्स पाहत बसले.. येस्स... "शेफ स्पेशल" यात प्रत्येक राज्याची एकेक डीश होती. महाराष्ट्र - दडपे पोहे (एसपी.) हे एसपी म्हणजे स्पेशल असावं बहुतेक. पण दडप्या पोह्यांत काय ते स्पेशल असणार हा विचार स्वस्थ बसू देईना. माझी ऑर्डर ठरली होती स्पेशल दडपे पोहे आणि फिल्टर कॉफी.
मी कुठलं संकट स्वतःवर ओढवून घेतलंय याची काही वेळातच कल्पना आली जेव्हा स्पेशल दडपे पोहे माझ्या समोर येऊन विराजमान झाले.वेटरच्या चुकीने कोणा दुसर्याची ऑर्डर माझ्यासमोर नाही ना आली?, अशी शंका येऊन मी वेटरला खूणेनेच हे काय असे विचारले. 'यिस्पेशल द्येप्पा पौsssआ' तमिळी अॅक्सेंट आदळला कानांवर. तरी विश्वास बसेना. समोर केवळ पांढरे किंवा पिवळे नाही तर चक्क रंगीबेरंगी दडपे पोहे होते. :surprise: त्यात जांभळा रंग आणण्यासाठी कोनफळ किसून घातलेलं :devil: अजून कायकाय दिसत होतं... काय आणि कसं सांगू. त्या क्षणी मला सर्वांत जास्त कोणाची आठवण आली असेल तर अवल ताई आणि मामीची. दडप्या पोह्यांत हळद घालायची म्हटली तर करवादणार्या दोघी, हे द. पो. वर्जन बघून तर शस्त्रास्त्रांनिशी धावून आल्या असत्या.
हसावं की रडावं ते समजेना. पण 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे संस्कार झालेल्या मनाला त्या ‘पूर्णब्रह्माकडे’ पाठ फिरवावीशी वाटली नाही. महत्प्रयासाने एक चमचा खाल्ला. घास फिरत होता तोंडात. वेटर आजूबाजूलाच घुटमळत होता. मी पहिला घास घेताच "म्याडम, हाऊ डिड यू फाईंड द्येप्पा पौआ?" मी (स्वगत) मेल्या दडपे पोहे शाप देतील तुला. (प्रकट)- "ओह दे आर नाईस, वेरी अनयुजवल टेस्ट" असं म्हणत बोळकं फासलं. तो इतका खूश झाला म्हणून सांगू, : “ज्येस्ट अ मोमेंट” करुन पळालाच माझ्या पुढ्यातून. एखाद्याच्या आनंदासाठी असं छोटंमोठं 'खोटं' वक्तव्य चालून जातंच, नाही का? प्रत्यक्षात मात्र ते दडपे पोहे दिनवाण्या नजरेने मला न्याहाळतायत असंच वाटत होतं त्यांना पाहून. मागे जसे चमचा आणि फूटपट्टी आपापलं गार्हाणं मांडायला आले होते त्याच रांगेत दडपे पोहेही आपली कैफियत मांडण्यासाठी उभे आहेत असं चित्र दिसू लागलं नजरेसमोर. पण तो विचार मनातच दडपून टाकला.
तो वेटर पुन्हा माझ्या दिशेने येत होता, अजून एक व्यक्ती त्याच्यासह होती. शेफ... शेफला सोबत घेऊन आला होता तो. त्याची भलीथोरली टोपी नजरेत भरली एकदम. त्याने पुन्हा येऊन तशीच दडप्या पोह्यांची चौकशी केली आणि मी पण तेच डिप्लोमॅटीक उत्तर दिलं. दडप्या पोह्यांवर प्रयोग करणारा हाच तो ‘शूरवीर’ होता तर. मुंबईहून आलेली मराठमोळी बाई त्याने केलेल्या अस्सल मराठी पदार्थाची तारीफ करत होती याचाच आनंद झाला होता त्याला. "सो मॅम, हाऊ डिड यू फाईंड द विज्युअल इफेक्टस आय गेव टू दडपा पोहा?" विज्युअल इफेक्ट्स? मी उडालेच. "ओह येस, द कलरफुल प्रेपरेशन? हॅ हॅ हॅ". कसनुसं हसत,” आय अॅप्रिशिएट द एफर्ट्स यू हॅव टेकन” असं म्हणत मी त्याच्या नजरेला नजर भिडवली. अजूनपर्यंत ती त्याच्या टोपीतच अडकली होती. अरे... हे काय पाहतेय मी? मुंबई -पुण्यात हातांवर-मानेवर टॅटू काढतात हे पाहिलंय मी पण ही सप्तरंगी दंतपंक्ती? :surprise: सप्तरंगी दडपे पोहे बनवण्यामागचा प्रेरणास्त्रोत या शेफ दादाच्या सप्तरंगी आवडीत दडला होता तर... अगदी गहिवर दाटून आला मला.
पुढचे ३ दिवस आपल्याला या हॉटेलात रहायचंय आणि हे ‘विज्युअल इफेक्टस’ पोटात ढकलायचेत या धसक्याने मी हाय खाल्ली. झटपट बील चुकते करुन तिथून काढता पाय घेतला. ते पोहे संपवणं मला काही जमलं नाही शेवटपर्यंत. आता दुपारी तर एक्झिबिशनच्या ठिकाणीच जेवायचं आणि रात्री बाहेर जेवूनच इथे यायचं हे ठरवून टाकलं. उद्याचं बघू उद्या.
आता मी यापुढे कधीही आयुष्यात दडपे पोहे खाईन असे वाटत नाही या मताला येऊन मी टॅक्सीत बसले. एक्झिबिशनचे ठिकाण आले. आत प्रवेशतांच आमच्या कंपनीचे लोक दिसले. काही कालपासून आले होते. तर काही माझ्या थोडा वेळ आधी. मी सर्वप्रथम पेन ड्राईव्ह एकाला दिली आणि ज्या लॅपटॉपवरुन प्रेझेंटेशन रन करायचंय त्यावर एकदा चेक करायला त्याला सांगितले. बाकी लोकांची चौकशी करत असतांनाच तो मुलगा पेन ड्राईव्ह चेक करुन "ऑल इज ओके" असं सांगून गेला.
काही वेळातच मुख्य कार्यक्रम सुरु झाला. स्वागत, ओळख इ. होऊन आमचे सेक्टर हेड व्यासपीठावर गेले. आम्ही खाली समोरच बसलो होतो, बॅक अप डेटा तयार ठेवून. प्रेझेंटेशन सुरु झाले. पहिली स्लाईड - कंपनीचे नाव, लोगो आणि या एक्झिबिशनचं नाव अर्र्र्र्र्र्र्र... हे काय असं दिसतंय? कंपनीचे नाव आणि लोगो यांची साईझ, रंग हे ठरलेलेच असतात की केव्हाही. मग हे असे सप्तरंगी नाव आणि लोगो? :thinking: काल ऑफिसातून निघतांना मी स्वतः शेवटचा हात मारला होता आणि सगळे व्यवस्थित पाहून घेतले होते, ही कलर स्कीम कशी काय बदलली? शेजारीच बसलेल्या माझ्या टीम मेंबरला ढोसले, " हे काय आहे?" तो उलट मला गप्प रहाण्याची खूण करतोय. “अरे गप्प कशी राहू मी? आपले बॉस माहीत आहेत ना किती पर्टीक्युलर आहेत या लहान-सहान गोष्टींत? मुंबईहून पेन्ड्राईव्ह घेऊन आलेली मीच म्हणून मलाच पकडतील आता, काय सांगणार मी त्यांना?” हा पठ्ठ्या काही ऐकायलाच तयार नाही.माझे धाबे दणाणले होते. एकाएकी टाळ्यांचा कडकडाट कानी आला. प्रेक्षकांना आवडत होतं हे एकंदर. स्क्रीनवर पाहिलं, तसेच भडक रंग, कंटेंट मात्र तेच आम्ही बनवलेलं. या लोकांना काय आवडतंय नेमकं? या भगभगीत स्लाईड्स की त्यावर लिहीलेले आकडे? की काहीच नाही? मघाशी मी जशी वेटरला दडप्या पोह्यांबद्दल पोचपावती दिली तशीच हे लोक आपल्याला देतायत? आता हे संपल्यावर बॉस काय आणि कसं रिअॅक्ट करणार यावरच सर्व अवलंबून होतं. मला दुसरे काहीही सुचेना. एकदाचं संपलं भाषण. उपस्थितांनी अनेक प्रश्न विचारले, त्याची यथासांग उत्तरे दिली गेली आणि बॉस आले खाली. "देवा वाचव रे" मन आक्रंदत होतं. सर आले हसतहसत आणि "यू ऑल हॅव डन अ फंटॅस्टीक जॉब" म्हणत कौतुक केलं आमचं.
आश्चर्याने 'आ' वासला माझा. तिथे आमची टीम आनंदोत्सवात मग्न होती. इतक्या मोठ्या कार्यक्रमाची सुरुवात तर उत्कॄष्ट झाली होती. मलाही खाणाखूणा करुन बोलवत होते ते. मला मात्र एकाएकी अस्वस्थ वाटू लागलं. सकाळपासून धड काही खाल्लं नव्हतं. त्यात जिथे तिथे हे 'सप्तरंग' माझ्या डोक्याचा भुगा करत होते. ते सात रंगच माझ्या अवतीभवती फेर धरुन नाचतायत चक्राकार गतीत असं वाटून भोवळ येऊ लागली आणि एका क्षणी असह्य होऊन माझी शुद्ध हरपली.
कसलासा कर्कश्श आवाज झाला आणि भानावर आले. मोबाईलवर अलार्म वाजत होता.चाचपडत फोन हातात घेतला आणि पाहिले पहाटेचे सव्वा चार ! इतक्या पहाटेचा गजर? अरे हो की, विसरलो की काय आपण ? आज सकाळी सातची फ्लाईट पकडून चेन्नईला जायचंय आपल्याला, ३ दिवसांसाठी, एक्झिबिशन अटेंड करायला.... मेंदूने अॅलर्ट सिग्नल देताच खडबडून जागी झाले आणि दिवा लावला. रात्री साधारण एक वाजेपर्यंत निमिषबरोबर जागून पूर्ण केलेल्या त्याच्या 'रेनबो' या थीमवरील प्रोजेक्टच्या 'सप्तरंगी' खाणाखुणा खोलीत इतस्ततः विखुरल्या होत्या. स्टडी टेबलवर पूर्ण झालेलं प्रोजेक्ट बूक मुखपॄष्ठावर इंद्रधनुष्याची कमान मिरवत दिमाखात मला वाकुल्या दाखवत होतं.
समाप्त