तुझ्या नजरेतून पहायचय जग मला
कसं दिसतं तुला हे समोरच झाड?
हिरवकंच उत्साहाने डवरलेलं
की उगाच रस्त्यात अडगळ ठरलेलं
तुझ्या नजरेतून पहायचय मला
कसं दिसतय तुला आत्ताचं आकाश?
वेडावून ओथंबून बरसू पाहणारं
की उगाच काळोखं मळभ दाटलेलं
तुझ्या नजरेतून पहायचय मला
कसं दिसतं तुला हे घराकडे नेणारं अंतर?
थकल्या जीवाला विश्रांत मुक्कामी नेणारं
की शुष्क करडं कोडं दिशाहीन पसरलेलं
तुला दिसत ना रे हे सगळं नक्की
हे झाड ,आकाश ,तो रस्ता, मी?
खरतर तुझ्या नजरेतून पहायचय मला
स्वतः कडेच
आणि मग ठरवायचय
मी प्रेमात पडावं स्वतःच्या...
घृणा करावी माझी की...
करावा अनुल्लेख स्वतःचाच!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle