मी, न्या नी .... दंगल भाग 2 (फोटो व फाइटच्या लिंक सहीत)

https://www.maitrin.com/node/1426 भाग १

फाईट म्हणजे एक पर्व असत... फाईट डीक्लेयर झाली कि मुलांची वजन तपासा मग वेट गृप पहा ... बोर्डर लाईनला असली मुल तर त्यांना आधीच्या वेट गृपमध्ये आणायचा प्रयत्न करा...पण उपासमार बिलकूल नाही... अटलिस्ट वजन वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा. आम्ही कायमच वजनामुळे आमच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या मुलीच्या समोर येतो.

मग सुरु होते फाईटची प्रॅक्टिस जी इतर वेळी ही होत असते पण ह्या काळात विशेष भर दिला जातो. अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस फाईट कुणासोबत ही होते... यात मुलगा, मुलगी, बेल्ट, वय, वजन, उंची हे भेदभाव पाळले जात नाहीत... त्यामुळे एखादा जुनिअर आपल्या सिनिअर ला एखादी परफेक्ट किक मारण्यात यशस्वी होतो तेंव्हा त्याचा अविर्भाव ‘एकच मारा पर क्या सॉलिड मारा ना’ असतो :ड

मग उजाडतो फाईटचा दिवस... रिपोर्टिंग टाईम अर्ली मॉर्निंग असतो.मुलांना अगदी कमी खायला देवून घेवून जायचं कारण आपण जरी घरी वजन केल असल तरी त्यांच्या काट्याचा भरोसा नसतो . भारतात खेळाच्या बाबतीत किती उदासीनता आहे हे ह्या दिवशी प्रकर्षाने जाणवते ... टोटल मिस मॅनेजमेंट
वजन झाल की खावून आपल्या फाईट ची वाट बघत बसून रहायचं... खरतर आयोजक वेट गृपनुसार साधारण किती वाजता फाईट सुरु होईल हे सांगू शकतात... नीट क्रमाने फाईट ठेवू शकतात पण यातलं काहीही होत नाही... सकाळपासून नुसत बसून रहायचं , कधी कधी संध्याकाळी शेवटी नंबर लागतो ...तोवर मुलही कंटाळलेली असतात ,मध्ये कुठे जावूही शकत नाही कारण फाईट कधी सुरु होईल हे माहित नसत आणि एकदा आपला नंबर लागला नी आपण जिंकलो की पुढच्या फाईटसाठी मध्ये १० मिनिटांचाही वेळ मिळत नाही... फायनलला पोहचेपर्यंत पोरांचा पार दम निघालेला असतो... बिचाऱ्यांना आधीच्या फाईट मधून रिकव्हर व्हायला पुरेसा वेळही मिळत नाही ,याचं खूप वाईट वाटत ... तरी जमेल तसा ,जमेल तिथे निषेध नोंदवत असतो आम्ही ... होप लवकरच सुधारणा होतील.

जर मुंबईमध्ये फाईट असेल तर आमचा दिवस पहाटे सुरु होतो...मुंबई बाहेर असेल तर आदल्या दिवशी ...पिकनिक सारखी तयारी असते फक्त मन धास्तावलेलं असत... पोर सुखरूप परत येवू दे हा घोष सुरु असतो मनात पण चेहऱ्यावर ऑल वेल ...
नाश्त्याचा डबा,जेवणाचा डबा,स्नॅक्स,ग्लुकोनडीच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या ,लेकीचा युनिफोर्म (हा घालून नेत नाही तिला नाहीतर वाढलेच दोन किलो ) , तिचे गार्डस इतक सगळ घेवून घरातून निघावं लागत. हे मस्ट असत कारण बर्याचदा अशा ठिकाणी फाईट असतात की आसपास हॉटेल सोडा दुकानंही नसतात. ह्या दिवशी बाबाही सोबत येतो ... सोडतो नी जातो आणि अंदाजे फाईटच्या वेळेला परत येतो किंवा पूर्ण दिवस ही थांबतो ... जसं जमेल तसं पण इतकं नक्की असत की अनन्या रिंगमध्ये असताना, बाबा बाहेर असतोच असतो.

अनन्या रिंगमध्ये वेगळीच असते... खरतर तिच्या सारखी मुलगी ह्या खेळात टिकली याचंच आश्चर्य वाटत रहात ... न्या प्रचंड नाजूक आहे ...तिच्या गालाला लाडात हळुवार जरी पकडल तरी लालेलाल होतात , नाक चिमटीत पकडलं मस्करीत अलगद तरी काळा डाग उमटतो(यावरून मी आईच्या किती तरी शिव्या खाल्या आहेत... जेंव्हा पहिल्यांदा असं झाल तेंव्हा मी जीव तोडून सांगत होते की मी हलकच पकडलं होत नाक पण कुणी विश्वास ठेवला नव्हता मग नंतर स्वानुभवाने खात्री पटली ), उन्हात गेली की तिचा रंग बदलतो, लालेलाल ... टोमॅटो म्हणतात तिला तिच्या वर्गातले तर अशी मुलगी रिंगमध्ये उतरते नी ते ही बऱ्याचदा स्वत:पेक्षा फुटभर तरी उंच व वयाने मोठ्या मुली विरुद्ध ... नॉर्मली मुलांना जेंव्हा अंदाज येतो आपण ही फाईट हरणार तेंव्हा ती उगीच मार खात थांबत नाहीत क़्विट करतात पण न्या कधीच म्हणजे कधीच फाईट अर्धवट सोडत नाही ... बाहेरून आम्ही कितीही बोंबलू दे ... Vaitag

न्या रिंगमध्ये नी मी गॅसवर ... तीन मिनिटांचे दोन किंवा तीन राऊंड मोस्टली दोनच ...ह्या ६ मिनिटात माझं जे होत ते शब्दात सांगूच शकत नाही .तिच्याकडे येणारी प्रत्येक किक काळजाचं पाणी करून जाते. इतरवेळी कधीच देवाच नाव न घेणारी मी ,त्या ६ मिनिटात इतक्या वेळा त्याला आळवते Praying ...रिंगच्या आत मी नाही करू शकत तिला सोबत, तू उभा रहा तिच्या मागे... देवा, माझी लेक येऊ दे सही सलामत बाहेर ...बास ... मला नको कोणत मेडल... फक्त तिला सुखरूप ठेव नी तोंडाने ओरडत असते ...दे अनन्या ... येस्स यु आर डुइंग गुड ... मार पुश किक... टाक तिला रिंगच्या बाहेर. :hhh:
हे दोन्ही एकाच वेळी जमवण महाभयंकर Whew

एकदा एका फाईटमध्ये अनन्याच्या तोंडावर जबरदस्त किक बसली Sad ...तोंडातून रक्तच रक्त ...तरी पोरगी तोंड पुसून परत उभी राहिली ,मी फक्त नाही म्हणतच राहिले...इतकी चिडले की रिंगच्या बाहेर आल्याबरोबर न्याला घेवून तडक घरी निघाले :raag: ...निघतानाच म्हणाले ,’बास झालं तुझं तायक्वांदो ,हा शेवटचा चढला युनिफॉर्म अंगावर ... पूर्णवेळ न्या शांत होती नी मी पॅनिक ...डॉक्टर कडे नेल ...दात ओठात घुसला होता ,नाक फुटलं होत ... डोळ्याच्या आसपास काळनिळ झाल होत... तपासून घेतल ... मार लागला होता पण सिरीयस काही नव्हत ...पण माझ्यासाठी, ते सिरीयसच होत... माझा निर्णय झाला होता.
दुसऱ्याच दिवशी न्या युनिफोर्म घालून तयार , मी म्हटल “हे काय आहे ?”
न्या म्हणाली “शाळेत पडते तेंव्हा लागतच ना ? म्हणून शाळेत जायचं सोडलंय का मी ? डिफेन्स करताना अंदाज नाही आला म्हणून इतकं लागल ... अजून प्रॅक्टिस करायला हवी” नी बापाचा हात धरून निघून ही गेली. मी एकदम ,क्या से क्या हो गया स्टेट मध्ये ... त्या सगळ्या पिरीयडमध्ये तिने एक पेनकिलर घेतली नाही... माझ्यासाठी हे सगळ खूप जास्त होत. त्याच वर्षी मी तिला बॅडमिंटनकडे वळवायचे जोरदार प्रयत्न केले. एक दिवस आड त्याच कोचिंग असायचं तर पठ्ठी ते ही करू लागली नी हे ही ... मी म्हटल करू दे किती करतेय ते ... खूप जास्त मेहनत झाली की कंटाळून तायक्वांदो सोडेल ... मी नाही मागे हटणार Nerd ...पण कसलं काय मीच हट्ट सोडला. :uhoh:

एक फाईट घराजवळच्या शाळेत होती त्यामुळे हौशी ने माझी आई बघायला आली... न्या मस्त खेळत होती ... फायनल पर्यंत पोहोचली पण तोवर पार दमली होती नी समोर खूप मोठी मुलगी... तरी न्या मस्त प्रयत्न करत करत होती... सेकंड राऊंडला मात्र न्यासाठी खूपच जास्त झालं ...ती दमलीय हे दिसत होत पण समोरची ची पुढे येवून मारायची हिम्मत होत नव्हती ...तर तिचे वडिल रिंगच्या बाहेरून ओरडले , “ये पुढे नी मार ,ती दमलीय पूर्ण”
फिर क्या ... मातोश्रींनी जी तलवार उपसली , “लाज वाटते का ? केवढस ते पोर आहे ... मार म्हणता ...माराच ,बघते तुम्हाला” ... :waiting:
अरे देवा ! सगळे फाईट सोडून हा सामना पहायला गोळा ... हसून हसून धमाल ROFL ... आईला शांत करताना नाके नऊ आले ... तो माणूस पण बिचारा, “अहो आई हा खेळच असा आहे” टाईप बोलून समजावतोय पण आमचं महाराणा प्रतापांच रक्त असं सहजी थंड होत होय...
न्या ला सिल्व्हर मिळालं पण आईसाहेब ठणकावून आल्या , “हे गोल्ड्पेक्षा भारी आहे , किती मोठ्या मुलीच्या विरुद्ध खेळत मिळवलय” बिचारी गोल्ड्वाली कानकोंडी झाली. भास्कर सरांनी आज्जीला तायक्वांदो जॉईन करायची ऑफर दिली लग्गेच :ड .त्यानंतर मात्र ‘नो आज्जी फॉर मॅच’ हा फतवा निघाला ... Lol

न्याचा अजून एक प्रोब्लेम आहे ,तिच्या विरुद्ध तिची मैत्रीण आली कि न्या पाय उचलतच नाही ... मग सरांकडून हे एवढ लेक्चर , डोळ्यातून पाण्याच्या धारा पण तोंडातून एक शब्द नाही, वाटत आता सुधारणार नक्कीच पण नेक्स्ट इव्हेंटला सेम सिच्युएशन आली की आहेच... ये रे माझ्या मागल्या. किती समजावलं पण अजून तरी काही काही उपयोग नाही..  106

सरांच्या हाताखाली शिकून गेलेल्यांनी स्वताच्या अकाडमी उभारल्या आहेत. त्यातले काही तरीही इथे येवून मुलांना ट्रेन करत असतात. त्यातल्या एकाने फाईटच्या वेळेला ह्या मुलांना येवून सांगितल कि माझ्या मुलांना मारायचं नाही. मुलं सरांना काय उलट बोलणार ? काही बोललीच नाहीत पण मॅचला जे धुतलंय ...अरे देवा! .... एका मुलाने आपल्या अपोनंटला नीट ऍडजस्ट करून ते सर बसले होते त्यांच्या समोर आणलं नी जी किक मारली कि समोरचा जावून त्या सरांच्या मांडीवर बसला ... फोर्स इतका होता की ते सर खुर्ची सकट मागे पडले ... धमाल हसले होते सगळे तेंव्हा ...त्यानंतर पासून ह्या एक्सट्रा इंस्ट्रक्शन बंद झाल्या अगदी ... मॅचचे किस्से सॉलिड असतात नेहमीच Lol Lol

रेड वन नंतर ट्रेनिंग अजून खडतर होत गेलं, ब्लॅक बेल्टची तयारी ... असं वाटायचं जावून सांगाव सरांना , ‘सीमेवर धाडायचं नाही आहे हो पोरांना’ पण काय बोलणार पोरंच सरांना सामील .एकदा बांबू घेवून मुलांच्या दिशेने धावत जाताना पाहिलं सरांना ... धस्स झालं होत काळजात ,इथे पाच बोट उचलताना हजारवेळा विचार करतो आम्ही नी हे बांबूने फोडतात ...मी तर जाणारच होते तावातावाने भांडायला पण लेकंच मध्ये पडली , म्हणे , ‘ह्या ! हे तर काहीच नाहीय ,आम्हाला पोट कडक करायला सांगून पोटात मारतात ... आता काहीच लागत नाही, आम्हाला सवय झालीय, आमच शरीर तयार करताहेत... तेच आमचं हत्यार’

हे अगदी खरंच होत म्हणा , इतकी वर्ष मेहनत करून ह्या मुलांची शरीरं चांगलीच तयार झालीत.आता सगळी परिमाणंच बदलली आहेत घरात. आधी न्या नी तिचा बाबा मस्तीत मारामारी करायचे ,तेंव्हा मी बोंबलायचे , ‘विनू सांभाळून ...लागेल रे त्याला’ आता फक्त एकच अक्षर बदललंय , ‘मनू सांभाळून ...लागेल रे त्याला’ Heehee

हळूहळू मला पाहून माझ्याकडे धावत येणाऱ्या न्याला पाहून आनंदापेक्षा भीती वाटू लागली ... omg Praying ही आता येवून धडकणार . आता तर नियमच काढलाय मी ‘माझ्या अंगाशी मस्ती नाही , जे असेल ते लांबून’ ,बाबाशी अजून सुरु असते पण मी पहाताच बोंबाबोंब सुरु करते. :ड

ह्यावरून एक गंमत आठवली , ह्यावर्षी न्याच अधिवेशन बदलल्याने सगळे शिक्षक नवीन ,कुणीच ओळखीच नाही. तर झालं असं , यांचे पीटी चे सर पहिल्यांदाच वर्गावर आले नी स्वत: बद्दल सांगू लागले . ‘माझं अस ट्रेनिंग झालय ,मी इतका स्ट्रॉंग आहे नी ऑल’ मग विचारल ‘वर्गात मार्शल आर्ट कुणी शिकतंय का ? पूर्ण वर्गाने न्याकडे बोट दाखवल... तिला पुढे बोलावल नी सांगितल , ‘पूर्ण ताकतीने माझ्या हातावर पंच मार’ हे ऐकल्या बरोबर मी ,” बाळा , नाही ना मारलास जोरात ?” :confused: न जाणो मोडून आलेली असायची पण नशीब ती म्हणाली , ‘कस मारेन ग मी जोरात ? हळूच मारला पण नंतर ते जे बोलले ते ऐकून वाटल मारायलाच हवा होता’
“का ग ? काय बोलले ?”
म्हणे , 'बघा , ही मुलगी इतकी वर्ष ट्रेनिंग घेतेय पण तिच्या पंच ने मला काही झाल नाही'
मग त्यांनी ह्यांच्या वर्गातल्या सगळ्यात उंच धिप्पाड मुलाला बोलावल नी न्या च्या शेजारी वर्गाच्या दारात उभ केल मग मुलांना म्हटल,

‘बघा , मी माझी मुठ यांच्या पोटावर ठेवणार नी फक्त उघडणार’... नी त्या मुलाच्या पोटावर मुठ ठेवली नी उघडली , तो बिचारा भेलकांडत खिडकी पर्यंत गेला .. मग न्याची टर्न , ती म्हणे ते मुठ उघडताना धक्का देत होते त्यामुळे तो इतक्या लांब गेला . मग मी विचारल ,’तू कुठवर गेलीस ग ?’ तर म्हणे , ‘शक्य आहे का, मी जाग्यावरून तरी हलणे’ मी सरांचा विचार करून गपच झाले. सर म्हणे सांगत होते , बघा हा फायदा असतो ट्रेनिंगचा म्हणूनच ही बिलकूल हलली नाही. आता आमची सरांशी छान गट्टी झालीय . मजा मजा सुरु असते हल्ली ...नी माझं धास्तावन आहेच फक्त आता ते समोरच्या साठी असत बऱ्याचदा :straightface:

दंगलमध्ये आमीर मुलीचे पाय चेपत असतो , ते पाहून टचकन पाणी आलं डोळ्यात ... रात्री लेक झोपल्यावर मी तिच्या अंगावरून हात फिरवते तेंव्हा तिच्या हाता पायावरचे नवीन नवीन काळे डाग माझं काळीज चिरत जातात ...दगडासारखे तिचे हात हातात घेवून वाटत, मी तिला तायक्वांदोला घालून चूक तर केली नाही ना ? पण या प्रश्नाला आता काहीच अर्थ नाही... मी आता गोष्टी बदलू शकत नाही , तिचा निर्णय झालाय नी मला तिच्या सोबत वहायचं आहे ...तिला जायचं आहे त्या दिशेने ... त्यामुळे चुपचाप तिच्या हातापायांना तेल लावते नी दुसऱ्या दिवसासाठी तयार करते .... स्वत:ला कारण ती तर आधीच तयार असते , येणाऱ्या उद्याला सामोर जायला... :)

इन ऍकशन :hhh:

IMG-20170124-WA0019.jpg

मेहनत का फल :ty:

IMG-20170124-WA0018.jpg

भास्कर सरांसोबत :)

IMG-20170124-WA0020.jpg

टीम सोबत धमाल करताना Dancing

IMG-20170124-WA0021.jpg

बेस्ट टीमचं बक्षीस घेताना कोच नी सिनियर :talya:

IMG-20170124-WA0017.jpg

सबकी मेहनत का फल Love

IMG-20170124-WA0023.jpg

न्याच्या फाइटची ची लिंक आहे , रेड गार्डमध्ये न्या ...नॉर्मली रेकॉर्डिंग करता येत नाही पण हे एक लकिली मिळालं :)

https://youtu.be/YiiNznkWgVM

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle