काळा

एक काळा जावळाचा
एक डोळियाचा काळा
एक आकाश झुम्बरी
दाटे मेघीयाचा काळा

बाकदार भुवईचा
एक मोरपिशी काळा
मीटझुकल्या पापणी
एक कासाविशी काळा

किर्र शर्वरी रानात
गूढ घुमणारा काळा
अमावसी रातीमध्ये
चमचमणारा काळा

तटीनीच्या रात्र काठी
लहरत गूढ काळा
रात सागर किनारी
उचंबळे हूड काळा

एक हरीची सानिका
तिचा सुरमय काळा
एक राधिका बावरी
तिचा हरीमय काळा

दुष्ट अनामी भीतीचा
भयदायी मिट्ट काळा
कधी भूताचा खेताचा
करणीचा कुट्ट काळा

सावलीचा सोबतीचा
सवे चालणारा काळा
खोल मनाच्या तळ्यात
कधी सलणारा काळा

ब्रम्हांडास व्यापणारा
भव्य भीमरूपी काळा
पृथेवर सांडणारा
सूक्ष्म व्योमरुपी काळा

अनुजा

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle