नाही खळखळाट,आहे फक्त अविरत गाज
साऱ्या आयुष्यभराचा,एक धीरगंभीर साज
लाटांच्या पाठीवर पडते, लाटांचीच थाप
न वाहता उचंबळत राहण्याचा तुला अभिशाप
तू श्वास उश्वास शशीचा, अखंड- निरंतर
पिउनि आसवे विश्वाची, तू करुणाकर
पोटात तुझ्या सामावली किती किती गुपीतं
सारे सारे देऊनही, अपार तुझं मन नाही होत रितं
सामावतोस साऱ्या, जगभराचं पुण्य पाप
सारे सारे रिचवून तू पुन्हा स्वच्छ, निष्पाप
ना राग ना लोभ, ना सुरुवात ना अस्त
सतत सारे जगूनही, तू मात्र संन्यस्त