Infatuation

Infatuation- एका शब्दात conclude केलंस
कारण..
कारण तू कधी पाहिलंच नव्हतंस
खिडकीत बांधलेल्या wind chins सारखा
हसतोस ना
तेव्हा माझ्या चेहऱ्यावर उमटत जाते अगणित रंगांची आतिषबाजी
किणकिणणाऱ्या लोभस निरागस हसण्याने
धरत जाते हळुवार खपली
मला मुळापासून हादरवणाऱ्या जखमेवर
तुला दिसत नाही
मला जाणवत राहतं
तू बोलतोस ना
मेंडोलीनवर.. त्याच्या तारांवर
बरसात होते सुरांची !!
माती जसा पाऊस साठवते
तसा खोल खोल झिरपत राहतो आवाज तुझा
आणि मग तुझ्या भाषेत बोलणारी मी -
Infatuated !

तुझ्या लहान-सहान गोष्टीत
गुरफटताना पाहिलंयस मला?
रेशमाचा एकेक धागा गुंतत जावा
अन कशिदा व्हावा
तशीच गुंतत गेलेय
तुझ्या "utter nonsense" म्हणण्यात
"मूर्ख आहेस" म्हणण्यात
"Take yourself seriously" म्हणण्यात
आणि आता seriously घेतेय
तर मी
Infatuated!!

तुझ्या प्रत्येक गोष्टीशी नाळ जोडणारी मी
तू पहिली नाहीसच
तुझा स्पर्श झालेली प्रत्येक वस्तू स्पर्शणारी मी
तू पहिलीच नाहीस
डोळ्यांना स्पर्शभास देणारी
चेहऱ्यावर वादळ थोपवणारी
आणि पापण्यांच्या कुंपणातून
एक गहिरी भाषा तुझ्याशी बोलणारी मी
Infatuated !

तुझ्या हातात हात देताना प्राण हातात ठेवले होते
सळसळत होता आवेग बोटामधून
तळव्यात जपून ठेवलेल्या तुझ्या आठवांना
माझ्यातून तुझ्यात transfer केलं ना
तेव्हाचं रितेपण आणि
आणि तू मिठीतून परत केलेलं दामदुपटीचं देणं
अजून गोळाच करतेय मी वेड्यासारखी
तरी मी
Infatuated !

तुला कधी कळलंच नाही रे
नदीला सागराची, उल्केला धारेची ओढ ही अनादी अनंत असते
कुठल्याही बंधनापल्याड असते
ते INFATUATION नसतं
तो ध्यास असतो
पूर्णत्वाचा
But I believe, hope floats
एक दिवस कुठून तरी खोल श्वासातून तू कबूल करशील
माझं तुझ्यासाठी वेडं होणं
आणि मग पाऊस कोसळेल इथेही आणि तिथेही
तोपर्यंत पूर्णत्वाचा समानार्थी शब्द माझ्यासाठी
"Infatuation" च !

- अनुजा

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle