आई तू कुठे आहेस ?
मला अशी सोडून गेलीस,
एकटेपणाची शिक्षा दिलीस,
तुझ्या आठवणीने घरही रडतंय,
तुझ्याशिवाय जगणंही अडतय !
आई तू कुठे आहेस ?
तुझी खूप आठवण येते,
मनाला खोल जखमा देते,
तुझ्या हाकेची आता कशी ऐकू साद ?
कसा लाभेल आता तुझा आशीर्वाद ?
आई तू कुठे आहेस ?
तुझ्या कुशीत मी झोपायचे,
तुझा पदर धरून चालायचे,
दुखायचे मला तर तुझ्या डोळ्यांत पाणी,
आठवतात मला तुझी अंगाई गाणी !
आई तू कुठे आहेस ?
हरवून गेली आपुलकी माया,
दुरावली तुझ्या ममतेची छाया,
माझ्या वाट्यास आला फक्त एकांत,
झाला सगळ्या सुखाचा अंत !
आई तू कुठे आहेस ?
तू खूप सोसल्यास यातना,
अखेरीसही तुला झाल्या खूप वेदना,
का तुझी तळमळ मला कळली नाही ?
मृत्युची वेळ का टळली नाही ?
आई तू कुठे आहेस ?
काहीच सुचत नाही तुझ्याशिवाय,
या लेकीस सोडून गेली गं माय,
तुझाच आधार होता गं मला,
आता हाक तरी कशी देऊ तुला ?
आई तू कुठे आहेस ?
माझी शक्ती तुझे विचार आहेत,
माझी शिदोरी तुझे संस्कार आहेत,
तुझ्या प्रेमाची अजूनही आस आहे.
तू सोबत असण्याचाच विश्वास आहे !
आई तू कुठे आहेस ?
ही लेक तुझी एकटी पडली,
तुझ्या आठवणीत वेड्यासारखी रडली,
तू ये..... परत ये......
माझ्यासाठी तू परत ये......!
कविता- सौ. शाल्मली ओंकार पोंक्षे