असं असं घडलं...२. दृष्टिकोन आणि भूमिका

पहिला भाग

प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन:

तर एक जपानी चित्रपट आहे. राशोमान नावाचा. बघितलायत? अतिशय अप्रतिम चित्रपट. नसेल बघितलात तर आवर्जून बघा. https://youtu.be/xCZ9TguVOIA हा चित्रपट अकुतागावा यांच्या इन ग्रोव्ह या गोष्टी वरून प्रसिद्ध दिग्दर्शक आकिरा कुरोसावा यांनी दिग्दर्शीत केला.

एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कशी दिसू शकते याचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हा चित्रपट. वाटल्यास इथेच थांबा, आणि तो चित्रपट बघून या, जेमतेम दिड तासाचा हा चित्रपट. पण आपली विचारप्रक्रिया उलटपुलट करून टाकणारा! :rollingeyes:  106

आता अशी एखादी घटना आठवा, की जी तुम्ही प्रत्यक्ष बघितली/ अनुभवली होतीत आणि तीच घटना नंतर कोणीतरी तुम्हाला सांगितली/ वृत्तपत्रात त्याबद्दल वाचलत. आठवली?

माझी एक आठवण सांगते. 1974 चा काळ. माझी मोठी बहिण भोसला मिलिट्री स्कुलच्या कोर्सला गेलेली. खास मुलींना सैनिकी शिक्षणाचा अनुभव मिळावा म्हणून दिड महिन्याचे अतिशय व्हिगरस ट्रेनिंग यात दिले गेले. अगदी शारीरिक मेहनत, तलवारबाजी, रायफल शुटिंग, स्विमिंग, घोडसवारी, लढाईसाठीची स्ट्रॅटेजिक माहिती, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होता. अतिशय सुरेख अनुभव होता तो. तर त्याच्या निरोप समारंभात तेव्हाचे .... मंत्री आलेले. त्यांच्या हस्ते बक्षिस समारंभ झाला अन नंतर त्यांनी अध्यक्षीय भाषण केलं.
आम्ही सगळ्यांनी ते भाषण प्रत्यक्ष एेकलेलं.
या भाषणात मुलींना हे सैनिकी शिक्षण कशाला द्यायला हवं, त्यांना याचा काय उपयोग? नवऱ्याशी युद्ध करणार का, अशा धर्तीची अतिशय विचित्र विधानं महोदयांनी केलेली. सगळे पालक भयंकर चिडलेले. कारण एका अर्थाने या सजग पालकांचे वागणे कसे चुकीचे होते असच ते बोलत होते.
दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमान पत्रांमधे सदर मंत्री कसे दूरदृष्टी असणारे आहेत, सैन्यातही महिला दल असलं पाहिजे, .... असे मांडले होते. आम्ही त्या बातम्या वाचून खरोखर चकित झालो. नराचा नारायण कसा केला जातो याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला.

आता तुम्ही म्हणील. ओके ठिके. मुद्दा कळला की एकाच घटनेला अनेक बाजू असतात, किंवा एकच घटना कशीही मांडली जाऊ शकते. याचा इतिहासाशी काय संबंध???

यस, इथेच तर खरा इतिहासाशी संबंध येतो. काल काय घडले किंवा 100 वर्षांपूर्वी काय घडले किंवा 1000 वर्षांपूर्वी काय घडले हे इतिहासात आपण अभ्यासतो. पण अभ्यासतो म्हणजे काय? तर एखाद्या इतिहास काराने त्या घटनेवर काय लिहिलय ते आपण अभ्यासतो. नाही पटत?
दोन उदाहरणं घेते. ब्रिटिश काळात 1857 च्या घटनेला सैनिकी असंतोष म्हटलं गेलं, स्वातंत्र्य लढ्यात याच घटनेला स्वातंत्र लढा म्हटलं गेलं तर आज या कडे उठाव म्हणून पाहिलं जातं. हे नुसते शब्दाला प्रतिशब्द नाहीत तर त्यामागे त्या त्या काळातील विचारप्रवाह स्पष्ट होतात.

दुसरी घटना. मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना 2010 पर्यंत दादोबा कोंडदेवांना शिवाजीच्या कारकिर्दित दिले गेलेले महत्व आणि 2010 पासून बदललेली परिस्थिती.

या दोन्ही घटना मी फक्त उदाहरणांसाठी घेतल्यात. याच चांगले/ वाईट, योग्य / अयोग्य, अशी कोणतीच भूमिका मी घेत नाहीये. इतिहासकाराने ती कधीच घ्यायचीपण नसते. मला सांगायचय ते इतकच की एकच घटना, पण तिचे अर्थ कसे वेगवेगळे लावले जाऊ शकतात. काळ, परिस्थिती, लोकांची मतं, लोकांचे विचार, नवीन पुढे आलेले पुरावे, इतर गोष्टी,.... अनेक कारणांमधून एकच एक घटना वेगळी वाटू शकते, दिसू शकते, अगदी असूही शकते.

राशोमानची पुन्हा आठवण करून देते.

तर हे असं आहे.

भूमिका:

नुसते पुरावे म्हणजे इतिहास नाही. त्या पुराव्यांचा अर्थ लावणे काळ, परिस्थिती, इतर पुरावे, अर्थ लावणारी व्यक्ती अशा सगळ्यांचा प्रभाव या अर्थ लावण्यावर पडणार. मग खरा इतिहास? प्रत्यक्षात काय घडलं हे कसं कळणार? खरं तर प्रत्येक इतिहासकाराने लिहिलेला इतिहास हा त्याच्या नजरेतून पाहिलेला इतिहासच असतो.
सो इथे मी जे लिहिणार आहे ते सगळं माझ्या नजरेतून बघितलेला, मला जाणवलेला, मला समजलेला इतिहास असेल. हे एकदा स्पष्ट असले की वादंगांना इथे स्थान असणार नाही. ज्यांना हे लिखाण पटले नाही, त्यांनी हे सगळे सरळ ओलांडून पुढे जावे, आणि स्वत: त्यांना पटलेला, वाटलेला, समजलेला इतिहास लिहावा, वाचावा.
परत सांगते, याचा असाही अर्थ नाही, की मी जे लिहेन त्याला पुरावे नाहीत  68 माझे सगळे लिखाण अगदी " बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल " या उक्ती प्रमाणेच असेल :ड . फक्त त्या पुराव्यांचा लावलेला अर्थ माझा असेल. उगाच पुराणातली सांगोवांगी गोष्टी मी लिहिणार नाही. पण त्याच बरोबर उगाच माझा मुद्दा पटवायला वादही घालणार नाहीये.

सो इतिहास! असे असे घडले ! हे माझ्या दृष्टीने, माझ्याकडे असलेल्या पुराव्यांवरून लिहिण्याचा हा प्रयत्न!

कधी एखादीच घटना लिहेन, कधी एकादा मागोवा घेईन, कधी पूर्णच आढावा घेईन, कधी एखाद्या व्यक्ती बद्दल लिहेन, कधी एखाद्या तत्वप्रणालीबद्दल.. हे मी जसं मनात येईल तसं लिहेन. जसजसे लिखाण होत जाईल तसतसे त्यांची रचना करत जाईन. खरे तर हे सगळं आधी लिहून, मग नीट संकलित करून इथे टाकायला हवं. पण त्याला मी खूप वेळ लावेन. आणि एखाद वेळेस माझ्याकडून कंटाळा केला जाईल. आताच इथे नोंदवले की हे सगळं लिहायचा तगादा माझा मलाच राहील. आणि मी उशीर केला तर तुम्हीही मला ढोसत रहाल :ड

कधी एखादी माहिती तुम्हाला हवी वाटली तर कळवा, मी अभ्यास करून लिहायचा प्रयत्न करेन.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मीही इतिहासाची अभ्यासक आहे. त्यामुळे काही गोष्टी मला माहित नसण्याचीही शक्यता आहे. पण मी त्या माहिती करून घेईन आणि मांडण्याचा प्रयत्न करेन. शक्य तिथे योग्य त्या पुस्तकांचा उल्लेख करेन, माहिती देईन.
या संपूर्ण लिखाणाची भाषा शक्य तेव्हढी साधी सोपी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. इतिहास म्हणजे क्लिष्ट, कंटाळवाणा हा समज बदलण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच मुळे हे काही संशोधनपर( रिसर्च लेव्हलचे) लिखाण असणार नाही. तसे लिखाण लिहिण्याचे हे व्यासपीठही नाही याची जाणीव मला आहे.
माझ्यातल्या गंजलेल्या इतिहास अभ्यासकाला जरा बाहेर ओढून काढण्याची ही धडपड आहे. गोड मानून घ्याल तुम्ही मैत्रिणी, हा विश्वासही आहे ___/\___

नमनालाच दोन घडे तेल झालं :ड तर ते एक असो. पुढच्या शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात करेन. शक्यतो आठवड्याला काही न काही लिहेन. किमान जुनं लिहिलेलं इथे आणेन.
पण तरी केलाय. बघु काय कसं जमतय... :thinking: Coffee

(पुढचा भाग )

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle