अगदी लहानपणीची एक आठवण आहे. माझी एक नेहमी सोबत असणारी, अगदी घट्ट मैत्रीण. काही तरी खेळताना झालं भांडण. मला खूप राग आला, खूपरडू आलं की मी डोकं भिंतीकडे करून झोपून जायची. तशीच त्याही दिवशी भींतीकडे तोंड करून झोपले. पण डोळे टक्क उघडे होते. मला खूप खूप राग आलेला. का बरं ही अशी वागली? अशी कशी ग तू?
अन मग मला ती दारातून धाडदिशी बाहेर गेली ते आठवलं. मला खूप खूप रडू आलेलं.
मग थोडी मोठी झाले. माझी सगळ्यात आवडती बहिण. तीने एकदा एक गणित शिकवताना, बावळट आहेस का, असं काय करतेयस म्हटलं. झालं. पुन्हा भींत, धुमसणं, बहिणीचा वैतागलेला चेहरा आणि शेवटी माझं रडणं....अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
मग अजून थोडं मोठेपणी माझा काहीतरी खूप हट्टीपणा. आईचं रागावणं. पुन्हा माझी भींत, धुमसणं, आईचा हताश चेहरा आणि माझं रडणं... अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
मग तरूणपणी एका मैत्रिणीशी झालेले वाद, मैत्री तुटणं. भींत, धुमसणं, मैत्रिणीचा रडवेला चेहरा आणि मग माझं रडणं.... अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
मग नंतर नवऱ्याशी झालेला एक वाद. भींत, धुमसणं, नवऱ्याचा गोंधळलेला चेहरा आणि माझं रडणं.... अन मनात प्रश्न, असा कसा रे तू?
मग एकदा लेकाशी झालीच वादावादी. भींत, धुमसणं, तुझा कावराबावरा झालेला चेहरा, आणि माझं रडणं, अन मग सगळं झुगारून तुला कुशीत घेणं.... अन मनात प्रश्न, असा कसा रे तू?
अगदी परवा परवाही असाच एका मैत्रिणीशी झालेली झकाझकी. भींत, मैत्रिणीचा न दिसणारा पण गोंधळलेला, हळवा चेहरा आणि मग माझं रडणं.... अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
असे हजारो प्रसंग. का होतं बरं असं? प्रत्येकाचे प्रसंग वेगळे असतील.
पण धुमसणं सेम असतं.प्रश्न तोच असतो, अशी कशी तू?
भींत नसेल पांघरूण असेल, डायरी असेल, कचाकचा भांडणं असेल, रुसणं असेल, अजून काय काय असेल....
आणि शेवटी पुन्हा रडणं असेल, हताश होणं असेल, वैतागणं असेल, जगाचा राग येणं असेल किंवा स्वत:चा, स्वत:च्या नशीबाचा राग येणं असेल. आणि मग असतोच तो प्रश्न, अशी कशी ग तू?
70% लोकं तरी या प्रोसेस मधून जातच असतील.
मी माझ्याबाबतीत एकदा विचार केला. का होतं असं?
माझ्या मनात काही परिघ तयार होत गेले. एक परिघ नुसता ओळखीचा, खूप मोठा. त्याहून थोडा लहान, आतला एक परिघ नात्यांचा - रक्ताची आणि मैत्रीचीही नाती. त्याच्या आत नेहमीच्या संपर्कातला व्यक्तींचा परिघ. त्याही आत, मनात घर केलेल्या व्यक्तींचा परिघ.
आणि लक्षात आलं की प्रत्येक परिघाशी मी वेगवेगळी जोडली गेलेय. त्या त्या परिघानुसार त्या त्या व्यक्तीकडून माझ्या अपेक्षा बांधल्या गेल्यात.
मी काय आहे हे कोणाला किती कळावं, कळायला हवं याच्या अपेक्षा ठरल्यात. जेव्हा या अपेक्षा तुटतात तेव्हा त्या त्या परिघानुरुप माझी चिडचिड होते.
सर्वात मोठ्या परिघात काहीही घडलं तरी मी फार वैतागत नाही. म्हणू दे काय म्हणायचं ते. माझ्या कॉन्शन्सशी मी बांधील आहे न झालं तर. मग मी पाठ फिरवून शांत झोपू शकते.
आतला, रक्ता-मैत्रीच्या नात्याच्या परिघापासून घोळ सुरू होतो. माझ्या अपेक्षा, समोरच्याच्या अपेक्षा, मधल्या कोणाच्या तरी अपेक्षा,.... सगळ्यांचा गुता व्हायला सुरुवात होते. एकीकडे आपण त्या व्यक्तीला जवळची म्हणून मान्य तर केलेले असते, पण पूर्णपणे ती व्यक्ती आपल्याला माहिती नसते, काही बाबतीत पूर्णच अनोळखी असते. मग कधी भांड्याला भांड लागतं. कधी ठिणग्या उडतात. तर कधी सरळ खडाजंगी होऊन परिघ रिअॅरेंज केला जातो. याही बाबतीत थोडाच वेळ भींत समोर असते. पण तरीही स्वत: ला सावरून, हवा तसा कोट उभारून पाठ फिरवून झोपणं जमतं याही परिघात.
मग असतो रोजच्या संपर्कातला परिघ. म्हटलं तर ओळखीचा, रोज संपर्कात येणारा, काहीसा अपरिहार्य असा हा परिघ. बऱ्याच अंशी ओळखत असतो आपण एकमेकांना. आपले संवादाचे क्षेत्र, आपले वादाचे क्षेत्र मनात छान डिफाईन असते. त्यामुळे छान सजगपणे आपण हाताळत असतो परिस्थिती. पण शेवटी कधी न कधी उडतातच खटके. बरं झट्टकन तोडून टाकावं अशी परिस्थिती नसते, काही कारणांनी समोरासमोर येणं भागही असतच. मग आपली चिडचिड वाढते. बऱ्याचदा ती मनातच दडपून ठेवावी लागते. मग भींत सारखीच पुढे असते. कधी डोकं भिंतीवर आपटून घेत, कधी वैतागून, रडून, कशा कशाला दोष देऊन, आणि शेवटी दमून भागून अपरिहार्य पणे शरण जाऊन झोपून जातो आपण, भींतीकडे तोंड करूनच!
हा परिघ अतिशय दमवणारा असतो. ना तोडता येत, ना जोडता येत. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी कुचंबणा नुसती. या परिघाची सीमारेषा थोडी सैल करून काही लोकांपुरती सीमा किलकिली करून त्या व्यक्तींना हळूच बाहेरच्या परिघात ढकलणं हे हळूहळू जमवावं लागतं. मगच हा परिघ थोडा सुसह्य होतो.
सगळ्यात अवघड असतो तो सर्वात आतला, कोअर परिघ. खूप खूप अपेक्षांनी दाट, नात्यातल्या बंधनांनी घट्ट बांधलेला, प्रेमाच्या नाजूक रेशमी धाग्यांनी विणलेला हा परिघ! अतिशय प्रेशस, आपण स्वत: विणलेला, प्रेमाने मऊसूत केलेला, आपुलकीने उबदार केलेला हा अगदी मनातला परिघ. यात कोणालाही शिरकाव सहजासहजी नाहीच मिळत. खूप घट्ट दार असतं. खूप खूप तटबंदी असते. आपली बुद्धी, विचार, भावना, स्वभाव, अनुभव, इंस्टिक्ट, अन काय काय. सगळ्या पायऱ्या चढून ती व्यक्ती या परिघात येते. पण आली की मात्र पूर्ण पूर्ण आपली होऊन जाते. कोणतीही गोष्ट कधीही, कशीही सांगितली की त्या व्यक्तीला ती बरोब्बर तशीच समजणार आहे हा विश्वास, गाढ विश्वास असतो. जगात कुठल्याही कोपऱ्यात असू दे, माझ्या एका उच्चारावर तिला माझी सगळी परिस्थिती कळणार आहे हा विश्वास तयार होतो. माझा अगदी एक स्वल्पविरामही समोरच्याला कळणार आहे. इतकेच नाही तर माझे अव्यक्त, स्वगतही तिच्या पर्यंत पोहचणार आहे, असा विश्वास या परिघातल्या सर्व व्यक्तींना एकमेकांबद्दल वाटत असतो.
हा परिघ अतिशय, अतिशय प्रेशस, अतिशय नाजूक, अतिशय डेलिकेट, अतिशय संवेदनाशील असतो. हा तयार करताना अतोनात काळजी घेतलेली असते.
पण
पण हाच परिघ जपणं अतिशय कौशल्याचे असते. सर्वात मोठा तडाखा याच परिघाकडून मिळू शकतो आणि ती परिस्थिती नीट हाताळली गेली नाही तर दोन्ही बाजूंना पराकोटीचा त्रास, नुकसान होत असतं.अगदी नैराश्याच्या कडे पर्यंत ढकलली जाऊ शकते व्यक्ती.
आणि याच परिघाला कसं सांभाळायतं याचं कोणतच मार्गदर्शन नसतं. प्रत्येक घटना, क्षण वेगळा.
पण प्रत्येकावर उपाय एकच असतो. वेळ देणं आणि पूर्ण विश्वास ठेवणं. पण हे सांगितलच जात नाही कधी.
या परिघातले जे काही समजगैरसमज असतील ते भांडून, वाद घालून नाही तर केवळ आणि केवळ थांबून, वेळ देऊन, विश्वास दाखवूनच दूर करता येतात. त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रचंड पेशन्स हवा. आणि कधीतरी या गैरसमजामागची कारणं आपोआप दूर होतील यावर विश्वास हवा. इथे घिसाडघाई केली तर ह्या परिघाची तरलता जाते, त्यातला जो मूलत: असणारा ओलावा, तरलपणा हरवता कामा नये.
भले नाही पटली एखादी गोष्ट? सर सांगा, एेका. थांबा. एकमेकांना पटवापटवी नको, नकोच. तुम्ही मांडलेली बाजू तिची तिला कळेल कधीन कधी. हा विश्वासच पुरतो, हा विश्वासच हे नातं अधिक घट्ट करतं.
त्याहूनही महत्वाचं हे, की कोणाची बाजू चूक बरोबर या पेक्षा दुसऱ्याची काही बाजू आहे हे समजणं! एखाद्या गोष्टीला दोन / चार बाजू असूच शकतात न? हे स्विकारण्यासाठी हा कोअर परिघ सर्वात सुरक्षित! आयुष्यातला फार मोठा धडा आपण केवळ आणि केवळ, या कोअर परिघातच शिकू शकतो. जग फक्त काळं पांढरं नाही. आणि माझी बाजू बरोबर म्हणजे समोरच्याची चूक असे नाही हे कळण्यासाठी, समजण्यासाठीच तर हा असा परिघ हवाच. माझ्या डोळ्यासमोर एक दिशा आहे, तशीच समोरच्याच्या डोळ्यासमोरही दिशा आहे, ज्यामुळे मी त्याला दिसतोय. अन मला तो दिसतोय. हा दृष्टिकोन मला फक्त या कोअर परिघातच मिळू शकतो.
तो स्विकारणं हा या परिघाची अन आपलाही सकारात्मक बाजू असते.
व्यक्ती जितकी मोठी तितके तिचे परिघ कमी होत जातात. तिचा कोअर परिघ वाढत जातो अन बाहेरचे परिघ त्यात समाविष्ट होत जातात.
तर काहींच्या बाबतीत बरोब्बर उलटे घडत जाते बाहेरचा परिघ आत आत येत जातो अन कोअर परिघ फक्त स्व: मधे केंद्रित होतो.
प्रत्येकाचा स्वभाव, विचार, अनुभव, ... यांतून हे घडतं. पण आपण या सगळ्या घडामोडीकडे थोडं जाणीवपूर्वक बघितलं तर यातले काही बदल आपण नियंत्रित करू शकतो. जितका कोअर परिघ वाढेल तितका आपल्याला समजून घेणाऱ्या , आपल्याला सामावून घेणाऱ्या व्यक्ती वाढतील. जीवनातले धक्के, नैराश्य पचवायला हा परिघ शॉक ऑब्झॉर्व्हरचे काम करेल.
आजही अनेकदा मी चिडते, धुमसते, भींतीकडे तोंड करते, पण गंमत म्हणजे हल्ली ह्या भींतीत मला त्या व्यक्तीचा चेहरा दिसू लागतो. मग ती व्यक्ती कोअर परिघात आहे असच वाटू लागतं. तरीही जुन्या सवयीने करतेच कधी तडतड, चिडचिड, अगदी तावातावानं भांडणं ही. पण मग कोअर परिघातल्या व्यक्तींमधून मला आरपार दिसतं काही, मग भींत आरसा बनत जाते हळूहळू. काश भींत राहणारच नाही कधी :dd:
थांकु कोअर परिघ