नवीन लग्न होऊन ऑस्ट्रेलियात गेले तोवर भारतीय आणि भारतीय चायनीज एवढ्याच cuisines माहित होत्या. पण ऑस्ट्रेलियापासून माझी सफर चालू झाली विविध खाऊगिरीचे अनुभव घेण्याची. तिथपासून आजपर्यंत अन्नविषयक माझे विचार आमूलाग्रपणे बदलेले आहेत. माझ्या रसनेला विविध प्रकारचे पदार्थ कसे खावेत ह्याचे खूप मोठे शिक्षण मिळाले. मी खादाड आधीपासूनच होते पण आता मर्मज्ञ (कॉनोसूर) होण्याचा प्रयत्न करते आहे. ह्याचे सर्व श्रेय खरेतर माझ्या नवऱ्याचे आहे. माझ्या इतकीच किंबहुना माझ्याहून अधिक त्याला खाण्याची आवड आहे. ह्या एका खूप महत्वाच्या धाग्याने आम्ही अगदी घट्ट बांधले गेलो आहोत.
माझे काही अनुभव मी शेयर करण्यासाठी मला लेखमाला करायची इच्छा आहे. आज सुरुवात करते. दर वेळेस फोटो शेयर करता येतीलच असे नाही कारण बऱ्याच ठिकाणी फोटो काढायचे लक्षात राहिलेले नाही. पण इंटरनेटवरून प्रताधिकारमुक्त फोटो मिळाले तर निश्चित शेयर करेन. तर आज मी सगळ्यात पहिल्यांदा केलेल्या मोहिमेचे अनुभव शेयर करणार आहे.
तर नवीन लग्न झाले आणि मी ऑस्ट्रेलियाला गेले. न्यूकासलला राहात होतो तेव्हा आम्ही. सिडनीपासून २.५ तासाच्या अंतरावर. न्यूकासल तसं फारच बोर गाव होतं एक-दोन मॉल्स, एक समुद्रकिनारा आणि एक रस्ता जिथे बरीचशी रेस्टॉरंट्स होती हे वगळता तिथे करण्यासारखे तसे काही नव्हते. मी नवीन नवीन आले होते आणि सिडनीला जायचे फार म्हणजे फारच आकर्षण होते तेव्हा नवऱ्याने एका वीकएंड चा प्लॅन बनविला. न्यूकासल रेल्वे स्टेशनवर गेले की सिडनीची तिकिटे अगदी लगेच मिळायची. एका शनिवारी सकाळी लवकर म्हणजे ७.३० वाजताची ट्रेन पकडायची ठरली. साधारण ७.१५ ला स्टेशनवर आलो. नाश्ता केला नव्हता त्यामुळे खूप भूक लागली होती. रेल्वे स्टेशनवर एक कँटीन होते तिथे (नवऱ्याच्या मते) उत्कृष्ठ सॉसेज रोल्स मिळायचे. तेव्हा सॉसेजेस म्हणजे माझ्या दृष्टीने नाक मुरडायचा प्रकार होता. तेव्हा मी नवऱ्याला धन्यवाद म्हटले आणि एक एग रोल मागवायला सांगितले (तेव्हा ऑस्ट्रेलियन अॅक्सेंट समजत नव्हता. तेव्हा वेळ घालविण्यापेक्षा त्यानीच ऑर्डर केलेले परवडणार होते) त्याने खांदे उडवून माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि स्वत:साठी सॉसेज रोल आणि माझ्यासाठी एक एग रोल मागविला. मग मीसुद्धा त्याच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि मनात म्हटले "खा बाबा. मला काय!!!"
आमचे आमचे रोल्स घेऊन आम्ही ट्रेनमध्ये एक बऱ्यापैकी जागा पाहून बसलो. तेव्हा सिडनीच्या ट्रेनला बोगी नंबर तिकीट नंबर असे काही नसायचे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे. शनिवार भली पहाट(!) असल्याने गर्दी फारशी नव्हती तेव्हा एक आरामशीर जागा आम्हाला मिलून गेली. आमचा प्रवास सुरु झाला. परदेशातील पहिला ट्रेन प्रवास. फारच मजा वाटत होती. साधारण १० वाजता आम्ही सिडनीला पोहोचलो. मला परत प्रचंड भूक लागली होती. म्हणून स्टेशनवरच एका छोट्याश्या टर्कीश टेकअवे मध्ये चिकन कबाब खाल्ले. टर्किश कबाब ही ऑस्ट्रेलियाची खासियत बरका!! पण त्याविषयी पुढच्या कोणत्यातरी लेखात लिहीन.
सिडनी शहर प्रचंड मोठे. त्यात वीकेंडची सकाळ. त्यामुळे गजबजलेले!! मला न्यूकासल आणि सिडनीमध्ये जमीन अस्मानाचे अंतर जाणवले. मी सिडनीच्या प्रेमात पडले. अजूनही आहे!! सिडनी स्टेशन जवळ थोडे इकडेतिकडे केल्यावर आम्ही लोकल ट्रेन पकडून सर्क्युलर कीला जायला निघालो. सिडनी ऑपेरा हाऊस बघायला. ऑपेरा हाऊस, हार्बर ब्रिज वगैरेजवळ फोटो काढून झाले. वातावरण खूप छान होते. पर्यटकांची वर्दळ होती त्यातच एक नेटिव्ह ऑस्ट्रेलियन डीजरीडू वाजवून सगळ्या पर्यटकांचे मनोरंजन करत होता. मला फार म्हणजे फारच रोमँटीक वाटत होते. जरा हिंडून फिरून झाल्यावर पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले. लोकल ट्रेन पकडून आम्ही डार्लिंग हार्बरवर आलो. डार्लिंग नदीवरचे हार्बर म्हणून डार्लिंग हार्बर!! येथेसुद्धा फार सुंदर वातावरण होते. खूप वेगवेगळी रेस्टॉरंट्स होती. नवऱ्याने निक्स सिलेक्ट केले. हे डार्लिंग हार्बर वरचे उत्तमपैकी एक सीफूड रेस्टॉरंट होते. अजूनही तेथे आहे.
मी नवऱ्याला सांगितले की "तूच ऑर्डर दे बाबा!! मला काही समजत नाही." त्यानी ऑर्डर दिली आणि थोड्या वेळात आमचे जेवण आले. वेगवेगळ्या माशांची (फिश) भरपूर प्रमाणात भजी आणि सोबत बटाट्याचे चिप्स. मी खूप भुकेलेली होते. त्यात सीफूड आवडीचे!! जेवण आल्याआल्या भलत्याच उत्साहत खायला सुरुवात केली आणि अरे देवा!!! त्या भज्याला "काहीही" चव नव्हती (निदान तेव्हा तरी मला असे वाटले) बटाटा चिप्सला तर मीठ पण नव्हते (येथे मी नमूद करू इच्छिते की मला परदेशी पदार्थ खाणे त्याचा आस्वाद घेणे माहीतच नव्हते). नवरा जेवणाचा मस्त आस्वाद घेत होता करत होता. मला मात्र काही ते जेवण आवडले नव्हते. पण पानात टाकायचे नाहीत ह्या भारतीय संस्कारापोटी मी जे मिळेल ते गप्प बसून खाल्ले. नवऱ्याच्या एव्हाना हे लक्षात आले असावे की मला जेवण अजिबातच आवडले नाही. त्याला वाटले असावे इतक्या मस्त रेस्टॉरंट आपण हीला आणले आणि हिची ही हालत??? त्याला फार टेन्शनसुद्धा आले असावे की असल्या "नाकाने कांदे सोलणाऱ्या" बायकोबरोबर आपला संसार कसा होणार!!!
जेवण आटोपून आम्ही बाहेर पडलो. बिलाचा कागद पहाता डोळे पांढरे झाले (अजून डॉलर रुपयात कन्व्हर्ट करायची सवय होती ना!!!) इतक्या तुच्छ भज्यांसाठी एवढे पैसे!!! माझा नवरा वेडा आहे अशी तेव्हा मला खात्री पटली होती. आम्ही दोघेही आता आपले कसे होणार ह्या विचारातच न्यूकासलला परत आलो.
पण फिश अँड चिप्स ची मजा काय आहे ते कळण्यासाठी मला भविष्य स्कॉटलंडला घेऊन येणार होते!!!
तळटीप - मी खाण्याच्या बाबतीत अतिशय अननुभवी होते आणि हा केवळ माझा अनुभव आहे. निक्स हे सीफूडसाठी प्रसिद्ध असलेले अतिशय मस्त रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटची बदनामी करण्याचा हेतू नाही. सीफूड आवडत असेल आणि डार्लिंग हार्बरला गेलात तर निक्सला निश्चित भेट द्या.