दूर दूर चालतांना वाट काही दिसत नाही..
जीवघेण्या वाळवंटात साथ कुणाची मिळत नाही..
आधार घ्यावा कोणाचा हे माझं मलाच कळत नाही..
आणि रडू नये, हताश होऊ नये हे कळूनसुद्धा वळत नाही..
ज्यांनी या जगात आणले त्यांच्याशी नाळ कधी तुटली.. कळलंच नाही..
ज्यांचा हात हातात धरला त्यांना नक्की काय हवंय.. कळलंच नाही..
नक्की कोणासाठी हा आटापिटा.. कोणास ठाऊक..
नक्की काय मिळतंय यातून.. झुरण्याशिवाय.. कोणास ठाऊक..
खूप एकटं वाटतं तेव्हा वाटतं तू या जगात यावं..
काही न बोलता सुद्धा खूप काही बोलून जावं..
तुझ्यासाठी वाटतं जगावं आणि तुझ्यासाठी मरून जावं..
माझ्यासाठी तुझ्यासाठी.. तू माझ्या जगात यावं..
इथलं सगळं पुसून टाकून मला तुझ्या जगात न्यावं..
वचन देते तुला.. मी तुझा हात सोडणार नाही..
स्वत: मोडेन एकवेळ पण आपली नाळ तोडणार नाही..
तुझ्या रुपात घेईन मी उद्याचा श्वास नवा..
तुझ्या रूपाने बांधेन मी स्वप्नझुला नवा नवा..
आवडेल का तुला.. माझ्या आयुष्यात येणे?
प्रेमाचे, सोबतीचे हे नवे देणे घेणे?
तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी जगते आहे..
लवकर ये माझ्यापाशी मी वाट तुझी बघते आहे..
-पियु (३१ मार्च २०१७)