माझ्या मनाचा झोका उंच उंच गेला
उंचावरुनी क्षितिजे पहायची होती त्याला …
महान उंचीमुळे मला भोवळ आली
कारण उंची एवढीच खोली होती खाली …
मन अस्वस्थ झाले ,हेलकावे खात राहिले
मोठमोठ्या पहाडाना धडकत खाली आले
जेथून क्षितिजे दिसत नव्हती
लहान लहान टप्पे होते ,
झाडे झुडपे खडक होते ,
मला न्याहाळता येत होते
आता मन शहाणे झाले
त्याला जणू जाण आली
स्वप्न बघायचीच ,पण
जोखून उंची नि खोली
लहान स्वप्नात रंग भरत
मी पूर्ण गुंगून गेले ,
स्वप्नाना कवेत घेत
स्वतःलाच विसरून गेले
कधी पाउलवाट होती
निसरडे रस्ते होते ,
कधी खाचखळगे अन
कधी सुंदर घाट होते
मग स्वप्नांची चढण आली
उंच सुळके बोलावू लागले
आणि पठार येता क्षणी ,
मी क्षितिजच होवून गेले ……