पाँपै -ज्वालामुखीचे शहर (इटलीतील भटकंती)

रोमन आणि ग्रीक इतिहासाबद्दल मला फार पूर्वीपासून अतिशय उत्सुकता वाटत आली आहे. इतिहासाची आवड आणि खास करुन या प्राचीन युरोपियन महासत्तांबद्दल उत्सुकता यामुळे ग्रीकांची लोकशाही, रोमन लोकांचे प्रजासत्ताक, ज्युलियस सिझरनंतर वाढीस लागलेली साम्राज्यवाद, रोमन साम्राज्यसत्तेचा अस्त इत्यादींबद्दल मी पूर्वी थोडेफार वाचन केले होते. गेल्या डिसेंबरच्या सुटीत कुठे जायचे हे ठरवत असताना ग्रीस ठरता ठरता राहिलं आणि एकमताने इटलीवर शिक्कामोर्तब झालं. इटलीला गेलो आणि आम्ही दोघं (आणि मुलंही) इटलीच्या प्रेमात पडलो. इतकं की ट्रिप संपल्यावर तिथून पाय निघत नव्हता आणि परत आल्यावरही पुढचे काही आठवडे आम्ही इटलीच्या आणि खास करुन रोमच्या आठवणींबद्दलच बोलत रहायचो (नवर्‍याच्या शब्दात इटली विड्रॉअल सिंप्टम्स :)). संपूर्ण इटलीभर तुम्हाला इतिहास ठिकठिकाणी भेटत राहतो. जागोजागी उभी असलेली स्मारकं, इमारती, रस्ते त्याची साक्ष देतात. इटलीत भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणाबद्दल कितीतरी लिहिण्यासारखं आहे. सुरुवात पाँपै पासून करते, पुढे वेळ मिळेल तसे लिहित जाईन.

पाँपैबद्दल पूर्वी थोडंफार वाचनात आलं होतं. मला माहिती असलेलं पाँपै म्हणजे माउंट व्हेसुव्हियसच्या ज्वालामुखीचा उद्रेकात गडप झालेलं आणि मग १५०० वर्षानंतर सापडलेलं इटलीतील एक गाव. मागे एका मायबोलीकराने इटली आणि त्यात पाँपैबद्दल लिहिलेला लेख वाचल्याचं आणि काही फोटो बघितल्याचं आठवत होतं, तेंव्हा त्या ठिकाणाला कधीतरी प्रत्यक्ष भेट द्यायची अतिशय इच्छा झाली होती हे ही आठवत होतं. अजुन एक संदर्भ म्हणजे नवर्‍याकरता देवासामन असलेल्या (!) ब्रिटिश बँड Pink Floyd नं 'Live at Pompeii' नावाचा एक संपूर्ण म्युझिक अ‍ॅल्बम तिथल्या amphitheatreच्या भग्नावशेषात चित्रित केलाय. आमच्याकडे त्याची पारायणं होत असतात आणि पाँपै त्याकरता जास्त प्रसिद्ध आहे :winking:. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर इटलीच्या ट्रिपमध्ये पाँपै नक्की बघायचं हे ठरवलं होतं. फोटो व्हिडीओ मध्ये बघितलेलं भग्न अवशेषांचं गाव प्रत्यक्षात बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. इंग्रजीत surreal म्हणतात तशी काही ती भावना होती. (surreal ला मराठीत काय म्हणावं बरं? भासमान?)

माझ्या पाँपैच्या अनुभवांबद्दल लिहिण्यापूर्वी थोडीशी त्या ठिकाणाची माहिती देते (गाईडने सांगितलेली आणि विकी आणि इतर साईट्सवरुन). इटलीच्या दक्षिण-पश्चिम किनार्‍यावर असलेल्या पाँपैमध्ये इसवीसनापूर्व सहाव्या ते आठव्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुख्यत्वे रोमन साम्राज्याचा भाग असलेले पाँपै हे ग्रीक आणि रोमन साम्राज्यांच्या चढाओढीत काही काळ ग्रीक साम्राज्याचाही भाग होते. इटलीच्या पश्चिम किनार्‍यावर, नेपल्ससारख्या महत्वाच्या शहराच्या जवळ असलेले पाँपै हे इसवीसनपूर्व काळापासून भूमध्यसागरातील महत्त्वाचे बंदर होते. इसवीसनानंतर पहिले शतक हे पाँपैचा सुवर्णकाळ होता. शहराची लोकसंख्या साधारणतः ११,००० पर्यंत पोहोचली होती. बंदरामुळे आणि त्याबरोबर येणार्‍या उद्योगांमुळे शहराला एक प्रकारची सुबत्ता आली होती. गलबतांची, खलाश्यांची शहरात वर्दळ असायची. दक्षिण इटलीत पोहोचवला जाणारा माल इथे उतरवून घेतला जायचा. निर्यात होणार्‍या मालाची बोटींवर भरणी व्हायची. मोठे रस्ते, कारंजे, बाजारपेठ, सार्वजनिक स्नानगृहे, मंदिरं, लोकांना भेटण्याची ठिकाणे आणि अनेक छोटी, मोठीमोठी, व्हिला याने शहर गजबजले होते. त्या काळात अतिशय आधुनिक अशी सांडपाण्याची व्यवस्था, वातानुकुलीत गृहे, गरम पाण्याची व्यवस्था, सॉना बाथ इत्यादी सुखसोयी पाँपैमध्ये तेंव्हा उपलब्ध होत्या. मनोरंजन आणि इतर खेळांकरता शहरात एक मोठं मोकळं सभागृह ( amphitheatre) बांधलं होतं. पाँपैच्या आसपासच्या खेड्यांभोवतालची जमीन अतिशय सुपीक असल्याने पिकही चांगले होते. त्यामुळे पाँपैला सतत फळ, भाज्या आणि इतर मालाच पुरवठा होत रहायचा. बर्‍याच श्रीमंत रोमन सरदारांची इथे सुटी व्यतीत करण्याकरता मोठी घरे होती. तर अशा प्रकारे पाँपै हे दृष्ट लागेल इतक्या सुखा, समाधानात आणि समृद्धीत होते.

इटलीचा नकाशा आणि पाँपै

pompeii-map.png

(फोटोचा स्त्रोत - गूगल शोध)

पाँपैपासून साधारण १० किलोमीटरवर (६ मैल) असलेला माउंट व्हेसुव्हियस हा पर्वत एक जिवंत ज्वालामुखी आहे. व्हेसुवियसच्या आसपास भूगर्भात सतत हालचाल सुरु असे आणि बारीकसारीक भुकंपाचे धक्के हे तिथल्या रहिवाश्यांना ओळखीचे होते. ६३ साली एका मोठ्या भुकंपाच्या धक्क्यातून पाँपै आणि जवळचा भाग सावरत होता. त्या काळात झालेल्या पडझडीची दुरुस्ती काही ठिकाणी झाली होती, तर काही ठिकाणी अजूनही सुरु होती. २४ ऑगस्ट ७९ झाली माउंट व्हेसुव्हियस परत धुमसायला लागला. पर्वताच्या मध्यभागी असलेल्या पोकळीमधून वितळलेले दगड, सच्छिद्र दगड (pumice) आसमंतात फेकले जाऊ लागले. अत्यंत गरम आणि विषारी वायू या पोकळीमधून वेगाने बाहेर पडू लागला, आणि या वायूचे ढग हे कित्येक मैलांपर्यंतच्या गावांमधून दिसू लागले. या ज्वालामुखीचा वेग थोड्याच वेळात इतका वाढला की सेकंदाला १.५ मिलियन टन या वेगाने राख, दगड इत्यादी ज्वालामुखीच्या मुखातून फेकले जाऊ लागले. पाँपै आणि जवळच्या गावांमध्ये (हर्क्युलेनियम हे व्हेसुव्हियसच्या अगदी पायथ्याशी असलेले एक गाव) राख वेगाने जमा व्हायला लागली. येणार्‍या या राखेमुळे दिवस अक्षरशः रात्रीसारखा भासु लागला. काही लोक पळून जायला प्रयत्न केला तर लवकरच येणार्‍या आपत्तीची अजुनही पुरेशी कल्पना नसल्याने बरेचसे लोक अजुनही गावांमध्ये थांबले. २४ ऑगस्टच्या मध्यरात्री मात्र या ज्वालामुखीच्या मुखातून येणार्‍या कोरड्या राखेचे आणि दगडांचे रुपांतर २५० डिग्री सेल्सियस एवढ्या तप्त लाव्हामध्ये झाले. ताशी १०० मैल या प्रचंड वेगाने हा लाव्हा सभोवतालच्या गावांच्या दिशेने प्रवास करु लागला. काही मिनिटातच जवळची छोटी गावे ५० ते साठ फूट, तर पाँपै १४ ते १७ फूट लाव्हा, राख आणि दगडांखाली पूर्ण बुडून गेले. राखेने गुदमरुन, अतीव उष्णतेने आणि लाव्हामुळे जवळच्या गावांमधल्या सर्व जीवित या उद्रेकात सृष्टीचा करुण अंत झाला! नेपल्स जवळ राहणार्‍या, आणि या घटनांचा साक्षीदार असणार्‍या 'प्लायनी द यंगर' याने या सर्व घटना नंतर २५ वर्षांनी लिहून काढल्या आणि इतिहासकारांना हा आंखो देखा हाल लिहित स्वरुपात उपलब्ध करुन दिला. लाव्हात, राखेत बुडून गायब झालेले पाँपै काळाच्या पडद्याआड गुडूप झाले, हळू हळू लोकांच्या विस्मरणात गेले आणि अनेक शतकं एका चिरनिद्रेत राहिले.

व्हेसुव्हियस

Vesuvius_from_plane.jpg

(फोटोचा स्त्रोत - गूगल शोध)

१७३८ मध्ये जुन्या वस्तु, ठिकाणं खोदकाम करुन शोधणार्‍या संशोधकांना त्या भागात काही वस्तु सापडल्या. १७४८ मध्ये स्पॅनिश इंजिनियर्सनी पाँपैजवळ मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु केलं. त्यानंतर १८व्या आणि १९व्या शतकात फ्रेंच, इटालियन इंजिनियर्स, संशोधक यांनी हे काम पुढे नेलं. थोडीफार पडझड झाली असली तरी लाव्हाखाली गाडले गेलेले संपूर्ण गाव शाबूत होते. घरे, रस्ते, चित्रे, स्मारके ही उत्खननातून पूर्वपरिस्थितीला आणली गेली. कित्येक हजार प्रेते या उत्खननात सापडली. शरीर पूर्णपणे कुजले असल्याने शरीराच्या जागी पोकळी निर्माण झाली होती आणि त्याभोवती लाव्हाचा दाट थर होता. ही पोकळी या दुर्दैवी लोकांचा शेवटच्या स्थितीतला आकार दाखवत होती. संशोधकांनी वरचा लाव्हा काढून आणि आतल्या पोकळीमध्ये प्लॅस्टर टोचून भरुन (इंजेक्ट करुन) सापडलेल्या प्रत्येक शरीराला आकार दिला आहे. यातली काही शरीरे प्रत्यक्ष पाँपैमध्ये तर इतर अनेक नेपल्सच्या म्युझियम मध्ये पहायला मिळतात. पाँपैच्या उत्खननात सापडलेली आणि जरा धक्कादायक किंवा वादग्रस्त ठरलेली शोध म्हणजे तिथे सापडली अतिशय कामुक, बोल्ड पेंटींग्स आणि फ्रेस्कोज/frescos (फ्रेस्कोस म्हणजे एक प्रकारची म्युरल्स किंवा भिंतीत काढलेली पेंटींग्ज). ही चित्रे पाहून बर्‍याच संशोधकांना ही लोकांपुढे आणायची का नाही असा संभ्रम पडला होता म्हणे, लोकांना बघण्याकरता अगदीच अयोग्य असल्यामुळे काही नष्टही करण्यात आली. एकोणीसाव्या शतकात इटलीचा राजा त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत पाँपैच्या उत्खननात सापडलेल्य वस्तुंच्या प्रदर्शनाला गेला होता तेंव्हा तिथली धक्कादायक पेंटीग्स पाहून तो इतका शरमला की त्याने ती पेंटींग्स बंद करुन ठेवायला सांगितली. पहिल्या शतकातला स्त्री पुरुष संबंधातला मोकळेपणा आणि त्याचे प्रदर्शन हे १९व्या शतकाकरता सुसंस्कृत (!) समाजाकरता धक्कादायक होते. (गूगलवर तुम्ही योग्य ते कीवर्ड्स टाकून ही चित्र आणि फ्रेस्कोज बघू शकता.)

असो, नमनाला बुधलाभर तेल झालंय :winking:, तर अशा माहितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाँपैला गेलो. इथून निघतानाच मी आणि नवरा दोघेही पाँपै बघण्याकरता अतिशय उत्सुक होतो. नवर्‍याला amphitheater ला भेट देण्यातही अतिशय इच्छा होता. रोमहून सकाळी लवकर निघून आधी आम्ही नेपल्सला पोहोचलो. सुटी असल्याने नुकतंच निवांत उठलेल्या सुंदर नेपल्सची बसमधूनच सैर केली. गावातली मुख्य स्मारकं, चर्चेस वगैरेची माहिती गाईड देत होता. मग एका ठिकाणी फोटो काढायला बस थांबवली आणि तिथून दिसला तो माउंट व्हेसुव्हियस. तोच तो धुमसणारा, भूकंप, ज्वालामुखीने थैमान घालणारा, सध्या शांत असलेला माउंट व्हेसुव्हियस! तो पर्वत बघुनच अंगावर रोमांच उभे राहिले. नेपल्सहून पाँपौला जाताना या पर्वताच्या शेजारुन गेलो आणि वेगवेगळ्या दिशेने हा पर्वत कॅमेर्‍यातून टिपला. (महत्त्वाची टीपः मी इटलीहून आल्यावर देनंदिनीत लिहिलं होतं त्याप्रमाणे, पुढे पिसाला गेल्यावर माझा फोन ज्याच्याच मी भ र पू र आणि छा न फोटो काढले होते तो खिसेकापूंनी मारला. Crying फोनपेक्षा शेकडो फोटो गेले याचं अतीव दु:ख झालं. पाँपैमध्ये काढलेलेही सगळे फोटो गेले. इथे टाकणार आहे ते नवर्‍याने कॅमेर्‍यातून काढलेले थोडेफार आणि काही इंटरनेटवरचे. पण ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी इंटरनेटवर पाँपै जरुन पहावं) पाँपै गावात उत्खनन केलेल्या आणि लोकांना बघण्याकरता उपलब्ध असलेल्या अनेक साईट्स आहेत. मुख्य साइट्स अगदी गावातच आहेत आणि आमचा टूर गाईड आम्हाला तिथे नेणार होता. (खरं तर सगळ्याच साईटस बघण्याची खूप इच्छा होती, पण आता त्याकरता वेगळी ट्रिप करावी लागेल)

पाँपैची मुख्य साईट अगदी गावाच्या मध्यभागी आहे. म्हणजे उत्खनन केलेल्या ठिकाणांच्या भोवतीच आता गाव वसले आहे. जवळच बस थांबवून आम्ही पाँपैचे बरेचसे भग्न पण तरी सुस्थितीत असलेले आणि २००० वर्षापूर्वीच्या गावाचा सहज अंदाज देणारे अवशेष पहायला निघालो. साईटमधे शिरल्या शिरल्या समोर दिसतो तो व्हेसुव्हियस! पाँपै गावापासून त्याचं एवढं कमी अंतर आणि २४ ऑगस्ट ७९ झाली रात्री झालेला गहजब याचा विचार करुन सुन्न व्हायला सुरुवात होते. पूर्ण टूरभर घर, वेगवेगेळी ठिकाणं बघताना ही भावना आपल्या मनात असते.

व्हेसुव्हियस, पाँपैपासूनचे दृष्य
Vesuvius.jpg

या साईटची सुरुवात एका ब्रॉथेल उर्फ कुंटणखान्याने होते. पाँपैला खलाश्यांची वर्दळ असायची. कित्येक महिने हे खलाशी समुद्रावरच असायचे. पोटाबरोबर शरीराचीही भूक असते आणि ती शमवण्याकरताही सोय हवी. त्या काळच्या रोमन मुक्त संस्कॄतीमध्ये यात काही वावगं किंवा लपवण्यासारखं नव्हतं. हे ब्रॉथेल म्हणजे गिर्‍हाइकांकरता आनंद आणि आराम देणारं ठिकाण होतं. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या सोयी होत्या. सर्वात सुरुवातीला मेन्युकार्ड प्रमाणे भिंतीवर कामक्रीडेतल्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्था दाखवलेल्या होत्या. गिर्‍हाइकांनी हव्या त्या निवडायच्या, हवे तिला निवडायचे आणि विश्रांतीकरता असलेल्या खोल्यांमध्ये जायचे. या खोलीत नेण्यापूर्वी गाईडने आम्हा मुले असलेल्या लोकांना काय चित्र पहायला मिळणार आहेत याची आधीच कल्पना देऊन ठेवली होती. चित्रे थोडीफार पुसट असली तरी नीट बघितल्यावर वेगवेगळ्या क्रीडा व्यवस्थित कळत होत्या. (गूगल केल्यावर जास्त स्पष्ट दिसतील). हे ब्रॉथेल सॉना बाथ, स्पा, मसाज, वातानुकुलीत हवा वगैरे सर्व सोयींनी सुसज्ज होते. खलाशीच काय तर गावातल्या इतर पुरुषांमध्येही हे लोकप्रिय नसेल तर नवल!!

ब्रॉथेल

Brothel.jpg

ब्रॉथेलमधील कामक्रिडेतील विविध अवस्था दाखवणा फ्रेस्कोज (वरच्या लाईनमधली ही चित्रे फोटोमध्ये जास्त पुसट दिसत आहेत, गूगल देवता इछुकांना व्यवस्थित फोटोज दाखवू शकेल)

Brothel_Fresco.jpg

पाँपैमधला अजून एक प्रमुख भाग आहे फोरम. रोमन साम्राज्यातील शहरांमध्ये फोरम ही एक महत्वाचा जागा असायचा. फोरम हा शहरातला प्रमुख गजबजलेला भाग जिथे सरकारी इमारती, कचेर्‍या, बाजारपेठा, मंदिरं आणि लोकांची भेटायची जागा हे एक सर्व एकत्रित असायचे. लोकांना फिरण्या भेटण्याकरता मोठे पटांगण असायचे, कारंजे, सुंदर रस्ते, फुलझाडे याने शहरातल्या हा भाग अतिशय आकर्षक केलेला असायचा. काम संपवून पुरुष मंडळी इथे दिवसाचा शीण घालवण्याकरता यायची. (रोम हे राजधानीचे शहर. तिथला फोरम चा भाग तर अतीव सुरेख आहे. भग्नावशेषातलं सौंदर्य पहायचं असेल तर रोमन फोरम फोटोमध्ये का होईना पहायलाच हवी. तिथले फोटो मी दुसर्‍या भागात टाकते). आता भग्न झालेले हे फोरम डिजिटली रिकन्स्ट्रक्ट करुन दाखवलेले ही पहायला मिळते.

फोरम

Forum.jpg

अपोलोचे मंदिर हे गावातले एक महत्त्वाचे ठिकाण फोरमच्या शेजारीच आहे. अपोलोचे हे मंदिर शहरातले सर्वात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण होते. २००० वर्षांपूर्वी या मंदिरात सतत वर्दळ असायची. कित्येक उत्सव या मंदिराने पाहिले आहेत. आता या मंदिराचे फक्त तुटलेले कॉलम्स (खांब) बाकी आहेत. पण या कॉलम्सवरुन भव्य मंदिराचा अंदाज बांधता येऊ शकतो. (टिपः कॉलम्सवरुन आठवलं, ग्रीक आणि रोमन बांधकामांमध्ये तीन प्रकारच्या डिझाईन्सचे कॉलम्स वापरले जायचे. डॉरिक, आयॉनिक आणि कॉरिंथियन. माझ्या मुलाला शाळेच्या पहिल्या सत्रात ग्रीक इतिहासाबद्दल काही वर्ग झाले होते, आणि त्यात त्याला ग्रीक इतिहासाबरोबर स्थापत्यकलेचीही ओळख करुन देण्यात आली होती. पूर्ण ट्रिपभर आम्ही कुठल्या इमारतीत कोणते कॉलम्स वापरले आहेत हे त्याच्याकडून ऐकत राहायचो :). कॉलम जिथे वरती संपतो तिथे ज्या प्रकारचे डिझाईन असते त्यावरुन तो कॉलम कोणत्या प्रकारचा हे ओळखता येते.) अपोलोच्या मंदिरात मुख्यत्वे डॉरिक आणि आयॉनिक कॉलम्स दिसतात. खालील चित्रांमध्ये असलेले ब्राँझचे पुतळे हे इटलीच्या पर्यटन विभागाने नंतर उभे केलेले आहेत, बाकीचे सगळी बांधणी मात्र २००० वर्षांपूर्वीची आहे.

अपोलोचे मंदिर

ApolloTemple1.jpg

ApolloTemple.jpg

संपूर्ण गावात कॉबलस्टोनचे रस्ते आहेत. २००० वर्षांच्या मानाने रस्ते अगदी सुस्थितीत आहेत. या रस्त्यांवरुन कित्येक घोडेस्वार, घोडागाड्या, खेचरं आणि हजारो लोकांची वर्दळ होत असेल. रस्ते आणि दुतर्फा उभी असलेली घरे, काही मोठ्या मोठ्या, पब (मदिरा मिळण्याचे ठिकाण) वगैरे आम्ही पाहिले. बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या व्हिलांमध्ये जाऊन आतली रचना, सुरेख फ्रेस्कोज हे सगळे डोळे भरुन पाहिले. उत्खननात सापडलेली शेकडो मातीची भांडी एका ठिकाणी रचून ठेवलेली आहेत.

रस्ते आणि सभोवतालची घरे

Street2.jpg

Street1.jpg

रस्त्याच्या दुतर्फा घरांची रांग आहे. त्यातल्या काही घरांमध्ये आम्ही जाऊन पाहिले. काही घरं सर्वसामान्यांची, छोटी, तर काही श्रीमंत सरदारांच्या व्हिला. (घरांचे वेगवेगळ्या अँगलने कित्येक फोटो मी माझ्या फोनमध्ये काढले होते :sad:, असो). मोठ्या घरांमध्ये आपल्या वाड्यासारखाच मध्ये चौक होता. चौकामध्ये कारंजे, झाडांकरता जागा. सभोवती खोल्या. खोल्यांमध्ये फ्रेस्कोज.

घर, फ्रेस्को

House1.jpg

House2.jpg

कुत्र्यापासून सावधान! हा पब होता म्हणे.

PUb.jpg

पाँपैमध्ये सापडली भांडी

POts.jpg

संपूर्ण साईटभर फिरताना या भग्नावशेषांबरोबरच मनाच्या डोळ्यांनी २००० वर्षापूर्वीचं पाँपै बघत असता. गाईड्स या प्रक्रियेत आपली खूप मदत करतात. कारण सतत ते आपल्याला वर्तमानातून भूतकाळात आणि परत वर्तमानात आणत असतात. आम्हाला मिळालेला गाईड छान होता. भरपूर माहिती, त्याबरोबरच सगळ्या प्रश्नांची उत्तरंही व्यवस्थित देत होता. या सुंदर ठिकाणाची दाद देतात देता, कुठेतरी तुमच्या मनावर इथल्या लोकांच्या शेवटच्या क्षणांचा विचार करुन एक उदासी येत राहते.

पाँपैमध्ये 'गार्डन ऑफ फ्युजिटिव्ह' म्हणून एक ठिकाण आहे. ज्वालामुखीच्या आपत्तीपासून सुटण्याचा प्रयत्न करणार्‍या छोट्या आणि मोठ्यांचे तिथे एकाच ठिकाणी १३ मृतावशेष सापडले होते. प्लॅस्टर भरलेले हे अवशेष लोकांची शेवटची स्थिती दाखवतात. (चित्र गूगलवरुन साभार)

गार्डन ऑफ फ्युजिटिव्हज

garden-of-fugitives9[2].jpg

खरंतर इतरही साईट्सना भेट देण्याची आमची इच्छा होती पण वेळेअभावी ती पूर्ण होऊ शकली नाही.

अजुनही माउंट व्हेसुव्हियस जगातल्या अतिधोकादायक ज्वालामुखींपैकी एक समजला जातो. व्हेसुव्हियसचा शेवटचा मोठा उद्रेक १९४४ झाला. मात्र आता त्याच्या सूक्ष्मातीसूक्ष्म हालचालींकडे वैज्ञानिकांची नजर आहे.

पाँपैहून निघताना ७९ साली जीव गमावलेल्या लोकांकरता आपण कळवळतो, घटकाभर श्रद्धांजली वाहतो, आणि अशी आपत्ती परत न येवो अशी प्रार्थना करुन पुढच्या प्रवासाला लागतो.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle