उगाच काही बाही

Cool अ‍ॅडमिनटीमने सृवा घोषित केल्यावर मी लगेचच थंड्या वाहत्या गंगेत हात धुवून घेते आहे Cool

उगाच काही बाही बोलून ठंडी ठंडी कूल कूल राहणारी विशाखा इथल्या मैत्रिणींसाठी.....

*************************************************************************************

झाडांना पाणी घालताना नीताला कोपर्‍यावर विशाखासारखी कोणीतरी मुलगी दिसली तशी ती हातातलं काम थांबवून बारकाईने पाहायला लागली. हल्ली एक बरं झालं होतं, समोरची सोसायटी पाडली होती त्यामुळे पार कोपर्‍यावरच्या सिग्नलपर्यंतचा रस्ता थेट दृष्टीक्षेपात येत होता. ती विशाखाच आहे ह्याची खात्री पटल्यावर नीता लगेचच किचनकडे वळली. सकाळी तशीच काही न खाता घाईघाईत निघाली असेल विशाखा आणि इथे आल्यावर भूक, भूक करेल... खरं म्हणजे पोळी भाजी तयार आहे पण विशाखाचे नखरेच भारी! तिच्या मते ही वेळ काही पोळी भाजी खायची नव्हे, तिला काहीतरी गरम गरमच लागेल, आपण आपलं तयारीला लागलेलं बरं.... वेगाने विचार करत नीताने लगबगीने पोहे भिजवले आणि एकीकडे कांदा चिरायला घेतला.

आज सकाळीच कसा काय विशाखाचा इथे दौरा? तब्येत वगैरे बरी असू दे म्हणजे झालं..... गाड्यांचा काही गोंधळ आहे की काय? आज काही बँक हॉलिडे नाही.... नाहीतर कसली तरी खरेदी करायची असेल.. पण काल काही बोलली नाही फोनवर येणार आहे वगैरे! घरी काही झालंय का भांडण-बिंडण? नीताचं मनोमन अंदाज बांधणं चालू होतं.

विशाखाचा स्वभाव काही भिडस्त वगैरे नव्हता, मागचा पुढचा विचार न करता मनात येईल ते सरळ बोलून टाकणारी मुलगी ही. सासूशी भांडखोरपणा केला तर? अशी भिती सारखी नीताला वाटत राहायची. भरीस भर म्हणजे आजेसासूही घरात.. मग तर काय बघायलाच नको..खरंतर विशाखाच्या लग्नाला तशी झाली होती ७-८ वर्ष. पण आपल्या लेकीविषयी नीता कायमच धास्तावलेली असायची.

अशी ऑफिसला न जाता विशाखा यायची कधीतरी माहेरी. म्हणजे घरच्यांना न सांगता, नेहमीप्रमाणे ऑफिसच्या वेळेत बाहेर पडून थेट आईकडे यायची ती. कधी गुपचूप काही खरेदी करायची असेल तर किंवा घरी कधी काही बिनसलं असेल, मूड वगैरे गेला असेल, मन अस्वस्थ असेल तरच.. घरी येऊन आईला काहीतरी फर्माईश करायची खाण्याची आणि मग छानपैकी पुस्तक घेऊन लोळत पडायचं. दुपारी बाबा येऊन जेवून गेले की मग घरीच, गॅलरीत खुर्च्या टाकून मनसोक्त गप्पा चालायच्या दोघींच्या किंवा मायलेकी बाहेर पडायच्या खरेदीला. अखंड बडबड चालू असायची विशाखाची. नवर्‍याची तक्रार, कधी सासूला नावं ठेव तर कधी ऑफिसच्या नावाने शिमगा, मैत्रीणींच्या खबरी, सोसायटीतलं गॉसिप! यथेच्छ बोलून झालं की मग नव्याने भूक लागायची बयेला. मग पुन्हा काहीतरी खादाडीची फर्माईश, पुन्हा गप्पा. माहेरी आल्यावरचे सगळे लाड पुरवून घेऊन ऑफिस सुटायची वेळ झाली की मग निघायची घरी जायला.

ही अशी घरी येऊन मन मोकळं करून गेली की दरवेळी नुसता गोंधळ माजायचा नीताच्या डोक्यात. न जाणो, पण तिचं हे असं येणं सासरच्यांना कळलं तर... माहेरीच येतेय म्हणा... पण कशाला ना उगाच त्यांना बोलायला संधी.. वगैरे वगैरे!

अक्षय झाल्यापासून विशाखाचं हे असं गुपचूप येणं - तिच्या भाषेत श्रमपरीहारासाठी येणं - तसं कमीच झालं होतं. आधीच घर, ऑफिस, लोकल प्रवास करून जीव मेटाकुटीला यायचा बिचारीचा. त्यातून कधीतरी मिळणारी ही अशी सुट्टी लेकाच्या सहवासात घालवावी असं विशाखाला वाटे. म्हणूनच आज ही अशी न कळवता अचानक येतेय ह्याचं नीताला फारच दडपण आलं होतं.
कांदा फोडणीला टाकून झाला तरी विशाखाबाईंची स्वारी अजून उगवली नव्हती. भेटलं असेल कोणीतरी खाली सोसायटीत... ह्या बायका सुद्धा ना .. अशीच दारात उभी करतील विशाखाला.. कशाला असं दाराबिरात बोलत उभं राहायचं.. घरात जाऊन बोला ना.. सगळ्या बिल्डिंगला कळायला कारण एकेक.. कोणाला पाणी पण प्यायला द्यायचं सुचणार नाही... एवढी दगदग करून आलेली ... आणि ही कार्टी सुद्धा बोलणं आवरतं घेईल तर शप्पथ! काकू, काकू करत माना वेळावत उभी राहील गप्पा छाटत पण लवकर घरी यायचं काही सुचायचं नाही हिला... चांगलीच अस्वस्थ झाली होती नीता. दहा वेळा तिने खिडकीतून खाली डोकावून पाहिलं तरी विशाखाचं यायचं काही चिन्ह दिसेना. शेवटी मोबाईलवर फोन करून पाहावा म्हणून नीता फोनजवळ गेली तोच विशाखा दारात हजर झाली.

"सही आई, पोहे करत्येस ना? कसला वास सुटलाय मस्तं! भूक लागलीच होती मला प्रचंड."

हम्म्, प्रचंड भूक लागलीये म्हणजे काहीतरी गंभीर दिसतंय झालेलं. लहानपणापासूनच भुकेचं आणि विशाखाचं अगदी गूळपीठ होतं. टेन्शन आलं, काही मनाविरुद्ध घडलं, कोणाशी भांडण झालं की हीला प्रचंड भूक लागायची. मग काहीतरी आवडीचं, खमंग पोटभर खाल्लं की जीव थंडावायचा विशाखाचा.

"अगं हात-पाय घे धुवून... पंख्याखाली बस जरा, पाणी पी... तोवर देतेच खायला तुला. आज काय गाड्यांचा गोंधळ बिंधळ नाही ना?"

"गाड्यांचा काय गं... रोजच असतो गोंधळ. सवय झालीये आता त्याची."

"मग काय आज खरेदी ठरलीये का कसली?"

"छे गं.. खरेदी गेल्याच महिन्यात नाही का केली बेदम.. नविन जागेच्या निमित्ताने... मकरंदने सांगितलंय आता दोन-चार महिने घरात काही नविन म्हणून आणायचं नाही." विशाखा नॅपकीनला तोंड पुसत म्हणाली.

"दोन-चारच महिने का? बरं! अगं मगाशीच बघितलं तुला कोपर्‍यावर. कुठे रमलीस एवढा वेळ?"

"अगं खाली नम्रता भेटली, ती पण भवानी आज सुट्टीवर आहे. बोलत बसली बराच वेळ.. विचारत होती दुपारी नाटकाला जाऊया का?"

"म्हणजे तूही सुट्टी घेतली आहेस का आज? मग काय ठरलं तुमचं?" निदान आतातरी विशाखाच्या येण्याचं प्रयोजन कळेल अश्या अपेक्षेने नीताने विचारलं.

"आई, मस्त झालेत पोहे एकदम. आता आमच्या मार्केटातही हातसडीचे मिळतात पोहे पण तुझ्यासारखे नाही होत कधी आईंचे.."
झालं! सासवेला टोमणा मारून झाला म्हणजे तिच्याशीच काहीतरी झालेलं दिसतंय.

"सासूबाई काय म्हणताहेत? झालं का रूटीन सेट?" नीताने विचारलं.

"देहू-आळंदी मस्त चालू आहे आमचं त्यांच्यामुळे. 'नीलम-प्रकाश' मध्ये रहायला नाहीच यायचं म्हणतात. आपल्यासाठी चार लोकांना कसं नाचवायचं ते बरोबर माहीत्ये त्यांना." विशाखा प्लेटमध्ये पुन्हा पोहे घेत म्हणाली. नक्कीच आज सासूबाई टारगेट होत्या.

हल्लीच विशाखाच्या सासर्‍यांना क्वार्टर्स मिळाले होते रहायला. चांगलं तीन बेडरूम्सचं मोठं घर होतं. आणि राहत्या घरापासून अगदी जवळ होतं. पण विशाखाच्या सासूबाई 'जुनं ते सोनं' पंथातल्या होत्या. जुनं घर बंद ठेवायला त्यांनी ठाम नकार दिला. मग काय... विशाखा, मकरंद, अक्षय आणि खुद्द सासरेबुवा नविन घरात म्हणजे 'नीलम-प्रकाश' मध्ये आणि सासूबाई, आजेसासूबाई आणि विशाखाचा दीर जुन्या घरात म्हणजे 'साई-आनंद' मध्ये अशी विभागणी झाली होती. संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी एकत्र जेवायचं असा सासर्‍यांचा दंडक, त्यामुळे सगळे आपापल्या ऑफिसमधून परस्पर 'साई-आनंद' मध्ये जमायचे. आणि जेवून मग 'नीलम-प्रकाश' गाठायचं. सकाळी उठून अक्षयचं आवरणं, नाश्ता आणि चौघांचे डबे करणं विशाखाला जमायचं नाही म्हणून मग 'नीलम-प्रकाश' मध्ये फक्त नाश्ता करून सगळे जण 'साई-आनंद' मध्ये जायचे आपापले डबे घ्यायला. तिथून मग ऑफिस. अशी सगळ्यांची कसरत चालू होती. संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी विशाखावर होती. आजींना आठच्या ठोक्यावर जेवायला वाढायचं म्हणजे तिला ऑफिसमधून अगदी धावत पळतच घरी पोचावं लागे. घरून मग अक्षयला घेऊन 'साई-आनंद' मध्ये जायची ती. तश्या सासूबाई इकडून तिकडे खेपा घालायच्या, पण ते त्यांच्या सोईने आणि आवडीने. हे सगळं निदान आत्तापर्यंत तरी विशाखाने न कुरकुरता पार पाडलं होतं. आज त्यावरच घाला बसतोय की काय असं राहून राहून नीताला वाटत होतं.

"काय ठरलंय मग तुझं आणि नम्रताचं? नाटकाला जाणार आहात का?" विशाखाचा कार्यक्रम जाणून घ्यावा म्हणून नीताने तिला टोकलं.

"आई, काल काय धमाल झाली माहीत्ये... काकाचं गुपीत अक्षय जवळ जवळ उघड करायच्या बेतातच होता." नीताच्या प्रश्नाला परत बगल देत विशाखाचं नवं पुराण सुरू झालं.

"अगं कसलं गुपीत?"

"आई, मागे मी तुला बोलले नव्हते का मयूरच्या मैत्रिणीबद्दल. अक्षय भेटलाय ना तिला.. हल्ली अक्षयला रात्री फिरायला घेऊन जायच्या निमित्तानेच मयूरला तिला भेटता येतं ना."

"हो का..... अरे वा!"

"तशी मला आणि मकरंदला कल्पना दिली आहे गं मयूरने. पण घरी अजून सांगायची हिंमत होत नाहीये त्याची. आणि मकरंदने त्याला सांगूनच ठेवलंय की तुझी भानगड तूच निस्तरायचीस. आम्ही मध्यस्थी करणार नाही."

"भानगड काय गं म्हणतेस विशाखा."

"अगं जोपर्यंत ऑफिशियल होत नाही सगळं तोवर भानगडच गं ती. ऐक ना! काल जेवण झाल्यावर निघाला मयूर अक्षयला घेऊन तर आजींनी टोकलंच तेवढ्यात दोघांना, कुठे चाललात म्हणून.. तर हा आगावू पठ्ठ्या म्हणतो - पणजी आजी, ती काकाची मैत्रीण आहे ना गोरी गोरी.. तिला रोज काका आईस्क्रिम देतो, तिला भेटायला चाललोय आम्ही. मयूरची मस्त धांदल उडाली. नशिबाने आजींनी फक्त 'आईस्क्रिम' एवढाच शब्द स्पष्टपणे ऐकला त्यावरून त्यांनी समज करून घेतला की ते दोघं आईस्क्रिम आणायाला चाललेत."

"हम्म्! आजींचं बरंय का गं आता? ताप आला होता ना गेल्या आठवड्यात?" विषय बदलायला म्हणून नीताने एक वाक्य टाकलं.

"होऽ बरंय आता. अगं डॉक्टर खिशातच घेऊन बसतात त्या. होणारच बर्‍या लवकर. आम्हालाच काय ती धाड भरते कायम."

आजींनी हल्लीच मकरंदच्या पाठी लागून स्वतःसाठी एक मोबाईल घ्यायला लावला होता. त्यात मकरंदचा, विशाखाचा, तिच्या सासरेबुवांचा आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरांचा असे मोजकेच नंबर घालून घेतले होते. उगाच उद्या रस्त्यात पडल्या बिडल्या तर लोकांची पंचाईत नको 'कळवायचं कोणाला' म्हणून! वास्ताविक त्या सहसा एकट्या कुठे जात नसत. विशाखाच्या सासूबाई नाहीतर अक्षयला सांभाळणारी बाई जात असे त्यांच्याबरोबर सगळीकडे. पण काय बाई! आजकालच्या म्हातार्‍यांचं खूळ सांगता येत नाही.

"हल्ली उकडून सॅलड खायची सक्ती झालीये आमच्यावर. कवळी बसत नाही नीट तोंडात, मग गाजराची, बीटाची, मुळ्याची कोशिंबीर उकडलेलीच असते आमच्याकडे. उतरत नाही घशाखाली माहीत्ये?"

"अगं मग आजींपुरेसं गाजर, बीट उकडव वेगळं... तुम्हाला का जबरदस्ती? आणि काकडी, टोमॅटोचं काय करतेस मग? की तेही उकडलेलंच?"

"नाही, ह्या गोष्टी आणतच नाहीत हल्ली घरात. आणि आई, हे असं ह्याच्या त्याच्यापुरेसं जेवण करत बसले ना तर ह्या नियमाने मला उद्या प्रत्येकाचं ताट वेगवेगळं सजवावं लागेल. पण मी म्हणते ह्या वयात कोशिंबीरी हव्यात कशाला खायला? कसली प्रोटीन्स मिळवायची आहेत आता? काय तो भात, आमटी, धिरडं, दही, ताक, दूध असल्या मऊसर गोष्टी खाऊन गप्प बसा की.."

"तू असं बोललीस आजींना?" धास्तावतच नीता म्हणाली.

"नाही गं बाई, ही असली बडबड मी फक्त इथेच करू शकते, माहीत्ये ना तुला."

हे मात्र खरंच होतं. कितीही मनाविरुद्ध झालं तरी सासरी विशाखाच्या तोंडून एकही उणा शब्द बाहेर पडत नसे. तरीही नीताला तिची खात्री वाटत नव्हती.

"नशीब माझं!" नीताने एक मोठा सुस्कारा टाकला.

विशाखाला आजमावत राहण्याचा तिला आता खरंतर कंटाळा यायला लागला होता. ऑफिसला दांडी मारून इथे येण्याचं तिचं कारण अजून समजत नव्हतं. तिचा दिवसभराचा कार्यक्रम कळला असता तर नीताला त्याप्रमाणे तिचे कार्यक्रम ठरवायचे होते. आज योगाच्या क्लासमध्ये प्राणायामाचा वार होता. नंतर शेजारच्या लेले काकूंबरोबर तिने सोनाराकडे जायचं आधीच कबूल केलं होतं. रात्री बाबांचे एक मित्र जेवायला यायचे होते. त्याचीही थोडीफार तयारी तिला करायची होती. पण इतका वेळ आडून आडून विचारलं तरी विशाखाने मात्र कसलाच पत्ता लागू दिला नव्हता. कसं काढून घ्यावं बाई हिच्याकडून? खरोखरंच डोकं सटकलेलं असेल तर 'माझ्याच घरी यायची मलाच चोरी' टाईप काहीतरी तिरसट उत्तर नक्की मिळणार ह्याची नीताला खात्री होती. मोठीच पंचाईत झाली होती तिची. मग उगाचच काहीतरी काम काढून किचनमध्येच चुळबुळत राहिली ती.

बाहेर विशाखाचा फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. कोणाचा फोन आहे असं खुणेने विचारलं तर 'जावई तुझा.... ' असं जोरातच म्हणाली.

"तिकडे कशी गेलीस म्हणजे काय? शहाणाच आहेस तू. आणि माझ्याकडे मोबाईल असताना ऑफिसच्या लँडलाईनवर कशाला करायचा फोन?"

अरे देवा! आपल्या नवर्‍याशी बोलतेय ही, ठाऊक आहे ना हिला? नारायणा! हिला सरळ बोलायची अक्कल कधी येणार?

"अरे माझी चप्पल तुटली ब्रिज चढताना. खाली उतरून स्टेशनजवळच्या दुकानातून दुसरी घेईपर्यंत वेळ गेला. मग म्हटलं, उशीर झालाच आहे तर हाफ डे जावं ऑफिसला. नाहीतरी जाऊन काय त्या ढेरपोट्याशी भांडणच करायचं ना? हसू नकोस तू... तूही त्याच वळणार आहेस."

नविन ऑफिसर म्हणजे ढेरपोट्या वाटतं. मकरंदची पण कमालै बाई, ही काय वाटेल ते बोलते आणि हा पण हसतो त्यावर. टोकत नाही जरासुद्धा.

"आता निघते ना पाच-दहा मिनीटात..... बाबा नाही भेटणार बहुतेक... नाही, नाही सांगितलं अजून....तू येणार आहेस संध्याकाळी मला घ्यायला?.. हो... हो.... चल, बाय.."

"कार्टे, चप्पल तुटल्याचं निमित्त..... उगाचंच वेळ काढायचा म्हणून आलीस ना तू इथे? आणि 'शहाणाच आहेस तू....' वगैरे असं बोलतं का कोणी आपल्या नवर्‍याशी?" विशाखाने फोन ठेवल्या ठेवल्या नीता बरसली तिच्यावर.
इतका वेळ धीर धरलेला, फारच असह्य झालं होतं तिला.

"आई! तुझा चेहरा मला बघावासा वाटला गं..... म्हणून आले मी." विशाखा खुसखुसत उत्तरली.

"फाजीलपणा करू नकोस जास्त. तू अशी अवचित घरी आलीस की केवढा मोठा गोळा उठतो माहीत्ये माझ्या पोटात. मला वाटलं.... मला वाटलं की..."

"तुला वाटलं की मी घरी काहीतरी भांडण आलीये करून. आई गं! असं कसं तुला सारखं उगाचंच काहीतरी वाटत राहतं? तसं काही नाही होत. मी ठरवलं तरी माझ्याकडून तसं काही होणार नाही बाई. बरं चल मी निघते आता. नाहीतर तो ढेरपोट्या हल्लागुल्ला करेल."

"विशाखाऽऽ"

"अगं मी त्याला उठसूठ 'ए ढेरपोट्या!' अशी नाही गं हाक मारत. तोंडावर मवाळपणे 'सर'च म्हणते. चल मी निघते! बाबा भेटले असते तर बरं झालं असतं. मकरंदचं जरा कानावर घालायचं होतं त्यांच्या."

"मकरंदबद्दल काय?"

"जाऊ दे गं. बाबांजवळच बोलेन मी त्याच्याबद्दल. चल, अच्छा!"

अरे देवा! आता आणखी मकरंदचं काय बोलायचंय हीला ह्यांच्याजवळ? कार्टी कायम काहीतरी घोर लावून ठेवते जीवाला. आता माझ्याजवळ बोलली असती मकरंदचं काय ते तर काय बिघडणार होतं? पण नाही! प्रत्येक वेळी आईच्या डोक्याला काहीतरी नविन भुंगा लावून द्यायचा. जाऊ दे! जाऊ दे तरी कसं म्हणायचं? सोडून द्यायचं म्हटलं तरी जमत नाही अजिबात. छे बाई! आता कधी ही बोलेल ह्यांच्याजवळ? आणि कधी हे सांगणार मला... देवा! नारायणा!!

------समाप्त---------

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle