Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद
सागरओढ
आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गुढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.
मला पुन्हा जायलाच हवं, समुद्रात खोल खोल, बोलावतेय प्रत्येक लाट
वाऱ्याचा तो पुकारा, अगदी आतून आलेला, नाहीच टाळता येणार आता;
शुभ्र नभांनी गच्च भरलेला वादळी दिवस हवाय फक्त एक,
फेसाळलेल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषार, सीगलचा आर्त पुकारा.
मला गेलच पाहिजे समुद्रात खोल खोल, त्या वेड्या दर्यावर्दीसारखं,
उजेडाच्या तिरिपीसारख्या त्या, गील आणि व्हेलच्या वाटेवरून;
आठवणींच्या लडीतून घुसत, हास्याच्या धबधब्यातून वाट काढत,
आणि शांत, सुमधुर स्वप्नात हरवून जायचय, ती गुढ गप संपायच्या आत...